ऐंशी नव्वद वर्षांची वृद्धा. काही माणसे नजाकतीने म्हातारी होतात. तशीच ही एक मजली, गेल्या वर्षापर्यंत वावर असलेली इमारत. वय झालं, तर उलट तिचे आवाज वाढले. लहान मुले वाढली. हसण्याचा, ओरडण्याचा आवाज वाढला. तेव्हढीच त्या उतारवयाला सोबत. परंतु एका वर्षापूर्वी कोणा बिल्डरने तिला फाशी सुनावली. मग एकेक करून सगळे सोडून गेले. थोरांबरोबर लहानगे देखील गेले. दाराशी स्कूलबस थांबेनाशी झाली. तिचा भोंगा वाजेनासा झाला. भाजीवाला दार ओलांडून पुढे जाऊ लागला. दारातला कडूनिंब साथीला खंबीर उभा. परसातली विहीर जाणार कुठे? तीही पोटचं पाणी देखील न डुचंमळता साथीला उभी.
कालचक्राप्रमाणे पाऊस लागलाय. सकाळी पाणी पडलं. समोर डबकं जमलं. कागदी बोट कोण सोडणार...वृध्येने निश्वास सोडला. माडीवरच्या लाकडी खिडकीतून खाली पाण्याकडे नजर लावली.
पाऊस का थांबलाय....चिन्ह तर होती. आता रस्ते तुंबले, लोकल बंद पडली... उशिरा येणारं..घोर लावणारं कोणीच नाही उरलं.
उसासा सोडला...आणि पाऊस सुरु झाला. वृद्धेची नजर पुन्हा डबक्यात शिरली.
आणि एका लांबलचक वर्षानंतर विटलेल्या चेहेऱ्यावर हसू आलं. थेंब झरझर डबक्यात डुबकी मारत होते आणि पाण्यातील वृध्द इमारतीचं प्रतिबिंब थरारत होतं. एकाच तालात. गोलगोल. वेगवेगळी चक्र घेत. एका क्षणाची देखील विश्रांती न घेता.
"चला वर्षभराने का होईना आयुष्यात हालचाल झाली." म्हाताऱ्या इमारतीचं हसू विरलं देखील नसेल आणि दाराशी सर्व हत्यारांसहित दहा पंधरा माणसांची टोळी लॉरीतून उतरली आणि काही तासांतच तीक्ष्ण हत्याराचा पहिला घाव म्हातारीच्या मस्तकावर पडला.
12 comments:
कातिल.. कातिल.. कातिल..
"परसातली विहीर जाणार कुठे? तीही पोटचं पाणी देखील न डुचंमळता साथीला उभी."
सप्पकन घुसून रुतून बसलं... इमारतीवर झालेल्या वाराचा हादरा इथे बसला... सुरेख...
:( अनेक चेहरे डोळ्यासमोर तरळून गेले गं.
मोजके व यथार्थ. आवडलं.
:(
sad.
but that is how the new imarat will come there na!
डोळ्यातला ओलेपणा कागदावर उतरवता येत नाही मला. अनघा, मन हेलावणारे आहे गं हे.
शब्दांच्या माध्यमातून एक बोलके चलचित्र दाखवून गेलीस..... ! ते पण किती कमी शब्दांत .
शाळेतील निबंधाचा प्रश्न आठवला - लिहा एका जुन्या इमारतीचे `आत्मवृत्त ' !
किती नेमक्या व मोजक्या शब्दांत तिच्या व्यथा, आनंद , एकटेपण व अंत लिहिलायस .
व त्याच बरोबर तिच्या साथीदारांचा तिच्या बाबत असणारा जिव्हाळा .
सगळाच अप्रतिम !
( हे लिखाण मूळ लेखापेक्षा जरा लांबच झालेय नं ...)
ही इमारत आमच्या समोरची....माझी इतक्या वर्षांची सख्खी शेजारीण.
अनघा,
तुझे पोस्ट वाचताना हे आपणाला का सुचत नाही ? असे सारखे वाटत राहाते. आपण आयुष्याच्या वाटचालीत असे कित्येक प्रसंग अनुभवतो, परंतु दुसऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतील असे लिखाण आमच्या पेनाच्या शाईतून कधीच उतरत नाही. कधी कधी विचार करतो की, एक तर पेन तरी बदलावे किंवा पेनातली शाई. कोणी म्हणतात त्याला अक्कल लागते. म्हणजे त्यासाठी गुढघ्यान्ना मालिश करावे लागेल. सांगितलेय कोणी? नकोच ते. असो...
अशीच छान छान लिहित जा. आज गुरु पौर्णिमा. तुला आणि बु बेल ला गुरुपोर्णिमे निमित्त अनेक शुभेच्छा. - विचारे मास्तर.
विचारे सर,
गुरुपोर्णिमेच्या आशिर्वादांबद्द्ल धन्यवाद. आम्हां दोघींची अशीच मधून मधून आठवण काढत जा!
:)
आहा....निर्जीव वाटणा-या गोष्टींच्या मनाचा तळ गाठायचं तुझं कसब अफ्लातून आहे..त्यांच्या हातोड्याचा पहिला घाव माझ्या कानात घुमला...
आत्तापर्यंत बर्याचदा मी हे म्हटलंय, पण परत म्हणतो. मोजक्या शब्दांत गहन आशय मांडण्याची तुमची हातोटी विलक्षण आहे.
आभार संकेत! आता पूर्ण जमीनदोस्त झाला तो बंगला! ('जमीनदोस्त'? म्हणजे जमिनीशी दोस्ती असा अर्थ आहे का या शब्दाचा? आत्ता इथे टाइप केलं आणि प्रश्र्न पडला!) :)
हो, जमीनदोस्त म्हणजे जमिनीचा दोस्त. म्हणजेच जमिनीवर पडलेला... :-)
Post a Comment