नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 31 October 2010

धुमश्चक्री

सातवीच्या उन्हाळी सुट्टीचा प्रथम दिवस.
झुंजूमुंजू व्हायला सुरुवात झाली होती. "रश्मीSSSSSSSS" पाचव्या मजल्यावर पोचेल अशी आरोळी मारली. दोन मिनिटांच्या अवधीत, पहिल्या मजल्यावरून गोरा गोबरा चेहेरा बाहेर आला. "थांब. आले." खरं तर ती आरोळी हा पहाटेचा रियाज होता. आणि घसा अजून मोकळा करायला आवडलंच असतं!
दोघी रस्त्याला लागलो तेव्हा नाक्यावरील दूध केंद्रावर बत्ती लागलेली होती. आणि बाटल्यांचा खळखळाट कानावर येत होता.
दोघींच्या दोन शेंड्या. एकीच्या नाकावर चष्मा. अंगावर गुढघ्याखाली येणारे झगे आणि पायात चपला. झपाझप चालत दोघी गडकरी चौकातील बाबू सायकल मार्ट समोर येऊन ठेपलो. किती ती घाई! पण हे काय? शटर अजून पडलेलंच! ठीक आहे. सख्ख्या मैत्रिणींच्या गप्पांना तोटा नाही! आणि बस्तान काय, फुटपाथवर बसू शकतं!
... अर्धा तास पसार झाला. शटर उघडलं. दोन डोकी आत डोकावली. बाहेरच्या उजेडातून नजर लगेच सरावली नाही. अंधारात नजर टाकावी तर सगळीकडे गोलगोल. उघड्या दारातून आता आत सूर्यप्रकाशाची तिरीप शिरली. डोळ्यांची उघडझाप केली. आता मात्र नजर सरावली. डोळ्यांसमोर इथे तिथे सायकली! छोटी मोठी! जमिनीवर. भिंतीवर! लाल, निळी, पिवळी, काळी! मान वर खाली, आजूबाजूला. गोंधळच आहे! आता कुठली घ्यायची? तितक्यात कोपऱ्यात काही हालचाल जाणवली. बघावं, तर एक छोटी लाल सायकल. तिने मान वेळावली. माझ्याकडे नजर लावली. का ती मला बोलवत होती?
"रश्मी, ती बघ!"
रश्मीची नजर दुसरीकडेच. कोणाकडे? पिवळी सायकल. काय तिला पिवळी सायकल बोलावत होती?
"अगं, ही पिवळी पण ठीक आहे गं."
"असं म्हणतेस? चालेल. चल तर मग. तू पिवळी घे. मी लाल घेते!"
"वो ले लो. लडकीयों का ही है."
म्हणजे काय आता? दोघींनी एकमेकींकडे बघितलं. डोक्यात काही प्रकाश पडला नाही. रश्मीने खांदे उडवले. निघायची खुण केली.
"कितना टाइम चाहिये?"
"हॅंडल चेक कर गं! म्हणे ते वाकडं असेल ना, तर पडू आपण!"
"वो सब ठीक है!"
"तुम पहले हवा भरो!"
"वो भरता हूँ. एक घंटेका पचास पैसा. एक घंटेसे जादा नही रखने का!"
"हाँ हाँ! नही रखेंगे!"
दोघींच्या खिशात पन्नास पन्नास पैसे. उशीर करून चालणारच नव्हतं. भराभर बाबूच्या वहीत आमची नावं नोंदवली. अवजड सायकली हातात उचलून पायऱ्यांवरून खाली उतरवल्या आणि घराच्या मार्गाला लागलो.
आयुष्यात पहिल्यांदाच हातात सायकल! चार चाकं आणि चार पाय. लाल पिवळी जोडगोळी हाताने ढकलत ढकलत निघालो. चालवण्याचा तर प्रश्नच नव्हता. सुट्टीत तेच तर शिकायचा निश्चय होता. आमच्या इमारतीला काही खाली सायकलचे प्रताप करण्यासारखी जागा नव्हती. म्हणजे सगळी भिस्त रश्मीच्या गृहनिर्माण संस्थेवर.
"देतील ना गं रश्मी आपल्याला सायकल चालवायला?"
"हो! त्यात काय?"
"तसं नाही गं. तुला देतील! पण मला देतील का?" तिच्या इमारतीमधील लोकांचा बाहेरील मुलांविरुद्ध आक्षेपाचे कडू अनुभव आतापर्यंत थोडे फार अनुभवले होते.
"बघू! चल तर!"
चौघीजणी घरापर्यंत पोचण्यातच दहा मिनिटे गेली! आता तर पुढची परीक्षा!

क्रमशःSaturday, 30 October 2010

एकरंग

"अरे चुकून तुझा पांढरा टी शर्ट आणि माझा लाल कुर्ता, एकत्र नाचले रात्रभर वॉशिंग मशीन मध्ये."
"मग?"
"शुभ्र बगळा, फ्लेमिंगो झाला!"
"अगं, कमाल करतेस तू! एव्हढी साधी अक्कल नाही तुला?"

अरे, खऱ्या आयुष्यात नाही तर नाही...वॉशिंग मशीनमध्ये का होईना, पण माझ्या रंगात तू रंगलासच ना?!
त्यातच आनंद आहे!
इति स्वगत.

Friday, 29 October 2010

शिवणकला

शाळेमुलींसाठी शिवणाचा वर्ग असे. मग त्यावेळी मुलं काय करायची, कोण जाणे!
सुई आणि दोरा ह्यांचं एकमेकांशी नातं आणि मग त्या दोघांचं कापडाशी नातं, फारच गुंतागुंतीचं. एक चौकोनी पांढरा तुकडा चारी बाजूंनी शिवायचा. त्यावर वेगवेगळे दहा टाके घालायचे. गहू, साखळी, काश्मिरी...वगैरे वगैरे. एक तारीख दिली जायची, त्या तारखेला बाईंच्या हातात सुपूर्त करायचं. बहुतेक वेळा ते गुंतागुंतीचं नातं काही फारसं सुरेख सुटायचं नाही. ते आपलं अनुभवी आईच्या हातात जान पडायचं. मग तिच्या जाग्रणामुळे दिलेल्या तारखी, तो पिवझालेला नक्षीदार कपड़ा शिवणबाईंच्या हातात पडायचा. मग अर्थात गुण...शेरा, प्रगतिपुस्तकात विराजमान व्ह्यायचे.

पुढील कालावधीत, बहि
णींनी कापडं कापून दिली. मी हेम घातली. कापडांची झबली झाली. त्यावर रंगीबेरंगी ससे, गोगलगाई, सुरुवंट भरले...माझं बाळ साजरं दिसलं.

तर मग आता कुठे
अडलं?

शिवणकाम नीट जमत नाही. शिवलेले टाके नीट रहात नाहीत. महिन्याच्या सुरुवातीला हेम घातलेलं खातं, अवेळी उसवतं. एकेक नाणं घरंगतं, निसटून जातं. महिनाअखेर खातं उपाशी होतं.

त्याच्या उलट, पाठीवरचंझं.
त्याची शिवण पक्की.
ना कधी उसवत. ना त्यातील दगड कधी सांडत.
दिवसागणिक दगड वाढतात.
त्यांचा पहाड़ होतो.
झ्याची शिवण? पक्की.
झं? दिवसागणिक जड.

का
त्या खात्याची शिवण कच्ची?
का ह्या ओझ्याची शिवण पक्की?

मला शिवणकला येत नाही.

Wednesday, 27 October 2010

सीने में जलन...

ना ती रात्र अमावस्येची, ना कोजागिरीची. काळ्याभोर आकाशात चंद्रकोर होती की नाही, आणि असलीच तर पंचमीची होती की अष्टमीची, काही कल्पना नाही. हवा थंड होती आणि नजर दूर टाकावी तर काळोखंच होता. नोव्हेंबर महिना. शांत सुस्तावलेलं जम्मू रेल्वे स्थानक.

रस्ता परतीचा होता. १८-१९ हे वय काही दमण्याचे नाही. अमृतसर, जयपूर, काश्मीर, पेहेलगाम, गुलमर्ग. तीस मुलामुलींची स्टडी टूर दिवसागणिक रंगत गेली होती. नुकत्याच उमललेल्या कळीसारख्या, नवथर चित्रकारांची ती टूर. आत्ताशी कुठे रंगांवर हात बसू लागला होता. समोर दिसणारा असीमित निसर्ग कागदावर उतरवणे, थोडं थोडं जमू लागलं होतं. अर्थात हे बालबुद्धीला वाटत होतं. मास्तरांनी त्याला संमती नव्हती दिली. सोनेरी देवळासमोरील सोनेरी पाणी, धुरसट दिसणारं दल सरोवर, काश्मिरी सुरेख तरुणी, टमाटर हेच गाल असलेली बाळं, शहाजहानच्या सदाबहार बागा आणि गुलाबी शहर. येताना भरलेल्या धोपटीतील स्केच बुकं आता शेवटच्या पानावर पोचली होती. चित्रं छोटी आणि पानावर गर्दी करू लागली होती. जलरंगाच्या सोंगट्या आता चवळीच्या दाण्याएव्हढ्या राहिल्या होत्या. पोस्टर रंगाच्या बाटल्या खडखडाट करू लागल्या होत्या. आणि दप्तरं निसर्गचित्रांनी भरून वहात होती.

रात्रीचे अकरा वाजत आले होते. जेवण आटपली होती. जम्मू तावी सकाळी निघायची होती. रात्र स्थानकावरच काढायची होती. आक्षेप कोणाचाच नव्हता. फक्त आजची रात्र संपूच नये एव्हढीच इच्छा मनोमनी. मुलं आणि मास्तर आपापल्या धोपट्यांवर विसावली. पिवळ्या दिव्यांखाली बस्तान, मुलींनी टाकलं. रातकिडे आसपासच कुठे सराव करत होते. इथेतिथे गप्पा रंगत होत्या. हास्याचे फवारे उडत होते.
"अभय, चल रे, मस्त हवा आहे. होऊन जाऊ दे एक!"
"नाही रे! थंडीने बसलाय घसा!"
सगळ्यांनी जोर धरला. अभयचा बसलेला घसा सुटला.

रात्रीच्या त्या काळोखात, मस्त गुलाबी थंडीत....'सीने में जलन'.

मंद आवाजात सुरु झालेली गझल पूर्ण स्थानकावर पसरली. दिल है तो धडकने का बहाना कोई ढूॅंढे...गहिरा सूर.
अंगावर शहारा. हृदयात तरंग तरंग. तन्हहाइसी ये कौनसी मंझील है रफी को....क्या कोई नयी बात नजर आती है हममें...आईना हमे देखके हैरांनसा क्यों है...नजर शून्यात. मुंबईतील गर्दीत हरवलेला फारुख शेख. आणि ते काळोखात हरवलेलं सुनसान जम्मू. आॅंखों में तुफानसा क्यूॅं है?

अचानक, त्याच पिसालेल्या मुंबईची ओढ!

१२ दिवसांचा कलाकारी, मुक्त संचार...
आता मात्र 'परेशान शक्स'वाल्या शहराचीच ओढ.

काही क्षणांपूर्वी रात्र संपू नये म्हणणारं मन...
नजरेसमोर मात्र ती गल्ली, तो जिना, त्या पायऱ्या...सताड उघडं दार.
...आणि सूर्यप्रकाशात लख्ख उजळून गेलेलं घर!

'बाबा येतील ना स्टेशनवर घ्यायला?'

Tuesday, 26 October 2010

अंगारिका

आज अंगारिका.
सिद्धीविनायकाकडे जाणारे सर्व रस्ते, सकाळी पांढऱ्या प्लास्टिकच्या पेल्यांनी भरलेले होते. रात्री भक्तांना चहा कॉफी दिली गेली असावी. त्यांची काळजी घेणे बरोबर. ते शेवटी मतदार आहेत.
देवाचं आणि त्याच्या ह्या पृथ्वीचं काय? तो थोडीच अवतरतो मत द्यायला!
नाही का?

Monday, 25 October 2010

पाठिंबा

वादाचा विषय.
चार व्यक्तिमत्व. दोन प्रत्यक्ष आणि एका जोडप्याचा नुसता नामोल्लेख.
मित्र आणि मैत्रीणीमधील संवाद...

"मी काय म्हणतो, त्याने बायकोला भरपूर पाठिंबा दिला. ती आज जी आहे ती त्याच्याचमुळे असे म्हणता येईल."
"म्हणजे?"
"अगं, तुला पटत नाहीये का?"
"पाठिंबा म्हणजे?"
"म्हणजे त्याने तिला सपोर्ट केलं!"
"पाठिंबा म्हणजे सपोर्ट ते माहितेय मला."
"मग?
"पण आता पुढची पाच मिनिटे मी बोलणार आणि तू ऐकणार. आहे कबूल?"
"बोला!"
"ऐक. जरी वेदकाळात स्त्रिया शिक्षण घेत होत्या तरीही धर्माच्या नावाखाली हळूहळू त्यांचा हा हक्क त्यांच्यापासून हिरावून घेण्यात आला. ब्रिटीशांच्या काळात राजा राममोहन रॉय, अॅनी बेझंट, न्यायमूर्ती रानडे ह्या सर्वांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि आपल्याला स्वतंत्र मिळाल्यानंतर कायद्यामध्ये बदल घडवून आणल्यामुळे शिक्षण घेणे हा आमचा हक्क मानण्यात आला."
"आता त्याचं काय?"
"मी तुला सांगितलं होतं, पुढची पाच मिनिटे मी बोलणार आहे आणि तू ऐकणार आहेस."
"सॉरी. बोल."
"आता, शिक्षण मिळाल्याकारणाने आम्हांला नोकऱ्या मिळाल्या, आम्ही पैसे कमवू लागलो आणि स्वतः च्या पायावर उभे राहू लागलो. बरोबर?"
"हं"
"आमची लग्नाची वये देखील आता पुढे गेली. जेवणखाण करणे, मुलांचे संगोपन करणे, घरातील लहानथोरांची जबाबदारी घेणे हे तर आम्ही आधी देखील करतच होतो. आता पैसे देखील कमवू लागलो. आजवर फक्त घरातील पुरुषमाणसे कमावत आणि बायका घर सांभाळत. आता कमावणे आणि घर सांभाळणे, दोन्ही आम्ही करतो. तर मित्रा, आता मला सांग, नवरा आपल्या बायकोला तिच्या करियरमध्ये पाठिंबा देतो असे म्हणताना, तो घरातील जबाबदारींमध्ये मदत करतो काय...हा प्रश्न उद्भवतो की नाही? घरात पैसे आणण्याची त्याची जबाबदारी तर ती खांद्याला खांदा लावून पार पाडतेय, नाही का?"
"हो"
"आता आपण ज्या दोघांबद्दल बोलत आहोत, ते दोघेही एकाच क्षेत्रात आहेत. बरोबर? तो तिला तिच्या कामात काही दिशा दाखवतो, मान्य. पण ती जेव्हा तिची व्यावसायिक जबाबदारी उत्तमरित्या सांभाळत आहे, त्यावेळी तुझा मित्र घरगुती कामात तिला थोडी तरी मदत करतो काय? मुलाची शाळा, कॉलेजची अॅडमिशन, त्याचा अभ्यास, त्याची आजारपणे, स्वयंपाक ह्यात काही तो मदतीचा भार उचलतो काय?"
शांतता. मित्राच्या कपाळावर बारीक आठी.
"मग तू जे आपल्या संभाषणाच्या सुरुवातीस म्हणालास, त्याने तिला खूप पाठिंबा दिला, हे तू खरंच म्हणू शकतोस काय?"
"झाली का तुझी स्त्रीमुक्ती सुरु?"
"पुन्हा चुकतोयस. हा विषय स्त्रीमुक्तीचा नाही. जे पुरुष आपल्या पत्नीला पाठिंबा देण्याचा आव आणतात, त्यांच्या दांभिकतेचा आहे."
"चला, झाला चहा पिऊन. निघूया आपण. ट्रेन पकडायचीय. आठ वाजलेत. आता कदाचित गर्दी ओसरली असेल."

ह्या एक अंकी प्रवेशातील हजर पात्रे आपापल्या रस्त्याला लागली.

Sunday, 24 October 2010

मी माझा...

सूर्यास्ताच्या थोडं आधी...आज अपघात बघितला. बाईकवरुन काही क्षणांपूर्वी डावीकडून पुढे निघून गेलेल्या जोडप्याला झाला होता. जमाव होता, पोलीस आलेले होते. डोक्यावर सुरक्षा कवच चढवलेला, ३० ते ३५ वर्षांचा तरुण, मोबाईलवरुन कोणाला घडल्या अपघाताबद्दल सांगत होता. त्याच्या बरोबर असलेली, तरुणी रस्त्यावर तळमळत होती. रक्तबंबाळ. पुढे दोन गाड्या थांबवलेल्या होत्या. भोवती गर्दी जमलेली होती. जमावाने गाडीतल्या लोकांना खाली उतरवले होते. वातावरण तापत होते.

पहिली गोष्ट मनात आली ती ही...चालक तरुणाने स्वतःचे शीर तर वाचवलेले होते. त्याच्या सहचारीणीचे तसे नव्हते. त्यामुळे जो काही अपघात झाला, त्यात तो तरुण तर शिरसलामत, धडधाकट स्वतः च्या पायांवर उभा दिसत होता. तरुणीचा प्रवास वेगळ्याच रस्त्याला गेला होता.

असे का? नेहेमीच बाईक चालवणारे तरुण स्वतः कवच घालून आणि पाठीपुढे बसलेले त्यांचे कुटुंब, विना संरक्षण का दिसून येते? ह्यात त्याचा स्वतः च्या वाहनशैलीवरील प्रचंड विश्वास दिसून येतो की अख्या जगात त्याचे स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या कोणावरही तितके प्रेम नसते? अगदी आपल्या बायकापोरांवर देखील? की बायका आपले वाऱ्यावर भुरभुरणारे केस आवरून, आपले डोके कवचात अडकवायला नकार देतात? की ते लोखंडी आवरण परिधान करणे म्हणजे आपल्या जोडीदाराच्या वाहनशैलीवर अविश्वास दाखवणे, असे त्यांच्या मनात येते? शक्य आहे. काही सांगू शकत नाही.

आशा आहे, आज यमराजाने पाश सैलच सोडला असेल...घट्ट घट्ट आवळलेला नसेल.

Saturday, 23 October 2010

गप्पा आणि टप्पा

शिवाजी पार्क. पहाटे साडे पाच. मैदान अजून आळसावलेलंच. कोणी दोरीच्या उड्या, कोणाचा प्राणायाम, कोणाच्या उठाबश्या तर कोणाचे सूर्य नमस्कार. धागा समान...आरोग्य. नऊवारीतील आज्या येऊन कट्ट्यावर टेकू लागतात आणि गप्पा रंग धरू लागतात. "काय ग, काल कुठे होतीस?"

पन्नाशीच्या पुढील पुरुष मंडळींच्या जोरदार हाळ्या ऐकू येऊ लागतात. आजूबाजूच्या रहिवाश्यांसाठी ह्या हाळ्या म्हणजे रोजचा गजर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुणाई मनात असते. पांढरीशुभ्र अर्धी चड्डी, लालबुंद टी शर्ट, कानात आणि पायात कुठल्या संगीताची धून, मग सुरकुत्यांचा काय संबंध? रात्रभर वस्तीत गस्त घालून आताच कुठे, मुटकून झोपलेल्या श्वानांचा ह्या जाग्या होणाऱ्या जगाकडे एकूणच काणाडोळा. भल्या पहाटे उठून 'आरश्या, आरश्या सांग, जगात सर्वात सुंदर कोण' ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणारी एखादी सुंदरी अचंबीतच करते. व्यवस्थित बसवलेला केशभार, नाजूक कपडे आणि लाल ओठ!

ही सर्व व्यक्तिचित्रं, रोजची. गप्पा मारता मारता, ठरवलेला टप्पा चटकन गाठला जात असावा. त्यांना न्याहाळता न्याहाळता ३ चकरा विनासायास मारून होतात. सहा वाजून गेलेले असतात. मोबाईलचा गजर, निघा आता, म्हणून संतापाने थरथरायाला लागतो.

लगबगीने वाहन घरापर्यंत आणावं तर....

आमच्या गल्लीत दोन गाई भेटाव्यात. रस्ताच्या मधोमध गप्पा रंगलेल्या. ही वेळ त्यांची आणि त्यांच्या मालकाची प्रातर्विधी आटोपण्यासाठी समुद्र गाठण्याची. ह्यांच्या रंगलेल्या गप्पांना कंटाळून बहुधा मालक घाईघाईत पुढे निघून गेला असावा. दोघी जश्या बहिणी, काळ्याभोर, टपोरे पाणीदार डोळे. एकीने माझ्याकडे तिरपी नजर टाकावी... दुसरीने तिचं वाक्य पूर्ण करावं. समस्त स्त्रीजातीबद्दल आदर बाळगून शांतपणे हॅंड ब्रेक लावून गाडी उभी केली. गप्पा मारण्यात ह्यांनीच का मागे पडावे? त्यांच्या सासरमाहेरच्या, तक्रारीच्या, शिळोप्याच्या जेव्हा गप्पा आटोपल्या तेव्हा कुठे त्या दोघी समुद्राच्या दिशेने निघाल्या. मागून गाडीत मी. त्यातील एका गाईने मान वळवून माझ्याकडे प्रेमाची नजर टाकल्यासारखे मला तरी वाटले, बाई!

...झाला सुरू दादरवासियांचा दिवस...
हाय, हॅलो...विचारपूस....आजी आजोबा, काका काकी, मामा मामी...गाई म्हशी...फुल्टू Cosmopolitan!

Thursday, 21 October 2010

एक होता ससा

हातात चिमुकला हात. सकाळचे सव्वा सात आणि पंधरा मिनिटांचा रस्ता. दोन शिंग डोक्याला, इस्त्रीचा गणवेश, काळे बूट... हा आहे पाच वर्षांचा बडबड्या ससा. आता तो निघाला आहे शाळेत. उड्या मारत जिने उतरावे आणि रस्त्याला लागावं.

इतक्या सकाळी सिग्नल तर बंद. मग अगदी जपून रस्ता ओलांडावा, आईवर विसंबून. मग लागावा फुटपाथ. टुणकन उडी मारून चढावा. जसं काही नीट पाऊल उचलून टाकलं तर त्या फुटपाथाला वाईटच वाटेल. परत टुणूक टुणूक. आईला अगदी प्रश्र्न पडावा, मी सश्याला का शाळेत सोडतेय? मग दूर दिसू लागतं वडाच झाड. पारंब्या, जश्या वाढलेली दाढी. ससा मग दुरूनच, "आले मी! वडकाका, कसे आहात तुम्ही? आणि आता मला दोन दिवस सुट्टी हां. शनिवार रविवार आहे ना! वाट नका बघू माझी!" वडकाका ह्या सश्याची वाट बघतच असायचे. मग थोडे खट्टू व्हायचे. पण तरी, पानं हलवायचे, तरंगत्या कोवळ्या पारंब्यांनी, अगदी निरोप पण घ्यायचे. मग पुढे पेट्रोल पंपवाले काका. सश्याचा एक टाटा त्यांना. आली आता गणपतीची गल्ली. तेंव्हा तिथे गणपती त्याच्या देवळात रहायचा. आता त्या अजस्त्र मंदिरात राजकारणी रहातात. "बाप्पा. टाटा!" ससा टुणूक टुणूक.

दुरून लागली दिसायला सश्याची शाळा. आता मात्र त्याच्या उड्या थांबल्या. ससा चिमुकल्या पावलांनी चालू लागला. पुढच्या मिनिटाला ससा आणि सश्याची आई शाळेच्या दारात उभे. आणि काय म्हणावं? गेली पंधरा मिनिटं उड्या मारणारा ससा, आईचं बोट घट्ट धरून. डोळे डबडबलेले!

"पिल्लू, जा आता."
"तू येशील ना घ्यायला आई?"
"हो तर! मी येणार नाही असं होईल का पिल्लू?" आईचे डोळे पण डबडबलेले.

आता ससा उड्या नाही मारत. शाळेच्या भल्या मोठ्या द्वारातून आत शिरतो. पुन्हा पुन्हा वळून आईकडे बघतो. इमारतीत शिरण्याआधी वळून अजून तिथेच उभ्या असलेल्या आईकडे बघतो. सश्याचा चिमुकला हात आईला टाटा करतो.
परतीचा रस्ता...एकट्या आईला जड.

ससा दुसरीत गेला...ससा तिसरीत गेला...तरी ह्यांचे डोळे डबडबलेलेच!

सकाळचे सव्वा सात ते साडे सात....
हा रिवाज...
ससा आणि त्याच्या आईच्या आयुष्यातला.

Wednesday, 20 October 2010

धडाम धाड...

धाड धडाम.....धडाड...खाड खाड...
आता मध्यरात्री ही बाई काय करतेय? स्वतः झोपत नाही आणि दुसऱ्याला स्वस्थ झोपून देत नाही! तिला काही ऑफिस नाहीये उद्या! पण मला आहे ना!
धाsssss ड!
पडलं वाटतं कपाट!
धाड धडाम.....
पहाटे उठायचंय, सगळी कामं आटपायचीयत आणि तेव्हां कुठे ते मस्टर मला दिसणार आहे!
धाड धाड!
हिला काय म्हातारीला?! वैताग नुसता!
फ्र्र्ररर्र्र्र! स्र्रर्र्र्रर्र्र्र!
कपाट आताच हिला सरकवायला हवंय का? सकाळी नाही का होणारेय हे काम?

शेवटी एकदाचे उघडले मी डोळे! ऑक्टोबर, हा काय पावसाचा महिना आहे?
ढगांचा गडगडाट! विजांचा कडकडाट!
परत एक वीज येऊन चमकून गेली आणि घड्याळ दिसलं.
एक वाजला होता.
झोपेचं खोबरं.
आता पुन्हा कधी लागेल कोण जाणे.

सकाळी दाराची घंटी वाजली.
वॉचमनकाका दारात उभे. हातात नोटीस.
वाचली तेंव्हा कळलं....
दोन दिवसांपूर्वीच आजींना हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं...आणि मध्यरात्री त्या देवाघरी निघून गेल्या होत्या.
सही करून कागद काकांना परत केला. गुपचूप कॉफीचा मग आणि ताज्या वर्तमानपत्रांचा गठ्ठा हातात घेऊन खिडकीपाशी जाऊन बसले. गरम कॉफीचा घोट घेतला...

आजी जेव्हा दूरवरच्या प्रवासाला निघाल्या होत्या, तेव्हां, अज्ञानाने का होईना, त्यांनाच मी बोल लावले होते!

Tuesday, 19 October 2010

शोध

आज तरुण मुलींना भेटून त्यांचे मन जाणून घ्यायचे होते. आयुष्याचा जोडीदार शोधताना त्या काय विचार करतात ह्याबद्दल तो शोध होता. त्या शोधाच्या निष्पन्नावर पुढील वर्षाचे क्लायंटचे जाहिरातीचे कॅम्पेन अवलंबून असणार होते. सुरभीने रात्रभर बसून सर्व प्रश्नमंजुषा तयार केली होती. मुली तरुण असणार होत्या, वयोगट २० ते २५. म्हणजे तिच्याहून जवळजवळ दहा वर्षांनी लहान.

सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. जुहूतील एका घरात. हे घर नेहेमीच अश्या प्रकारच्या शोधांसाठी वापरले जात असते.

सुरभीने प्रश्र्नांचा कागद स्वतः समोर ठेवला आणि मुलींशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यांच्या मनाचा तळ गाठण्यासाठी सुरुभीला त्यांची एक सखी बनणे गरजेचे होते. पंधरा सुंदरींचा तो गट होता. सगळ्यांची नावे जाणून झाली. कोणी नोकरी करत होते तर कोणाचे कॉलेजचे दिवस अजून संपायचे होते.

सकाळी ९ वाजता सुरु झालेला हा रंगलेला संवाद संध्याकाळी साडेपाच वाजता चहापानाबरोबर संपला.
आपले सर्व कागद गोळा करून सुरभी धावत धावत रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली. गर्दी सुरु व्हायच्या आत तिला बोरिवलीची लोकल पकडायची होती. नशिबाने लोकल मिळाली आणि दारात उभा रहायला हवेशीर जागाही मिळाली. थोडं स्थिरस्थावर झाल्यावर, तिला आठवले आज सकाळपासून ओळख झालेले चेहेरे. मनात एक उजळणी सुरु झाली. उडणारे केस कानामागे सारले. आणि तिला हसू फुटले. आता काय लिहून देणार होती ती तिच्या बॉसला?
सुरभीच्या नव्या तरुण मैत्रिणींनी तिला असे काय सांगितले होते?

"सुरभी, मी जेव्हा नवीन मोबाईल घ्यायला बाजारात जाते, त्यावेळी मी आधीच भरपूर माहिती मिळवून ठेवलेली असते. बाजारात कुठले मॉडेल मिळत आहे, त्याची किंमत काय आहे आणि त्यात कायकाय गोष्टी आहेत. बरोबर?" तरतरीत दिसणारी श्रीया तिला म्हणाली.
"हो. बरोबर."
"त्याचप्रमाणे, जेव्हा मी माझ्या आयुष्याचा जोडीदार शोधायला निघते, त्यावेळी बाजारात कायकाय मिळते आहे ह्याची मी अर्थातच आधी माहिती करून घेतलेली असते."
"आणि मग?"
"मग, मला हव्या त्या गोष्टी ज्यात आहेत असा नवरा मी ठरवेन."
"हो, पण मग बऱ्याचदा आपण आपल्याला आवडेल असा सेल घेऊन तर बसतो. आणि मग काही दिवसांनी आपल्या लक्षात येतं, आपल्या गरजेच्या बऱ्याच गोष्टी त्यात नाहीयेत!"
"अगदी बरोब्बर! मला माहितेय तसंच काही हे ह्या जोडीदार ठरवण्याच्या प्रकारात असणारेय. कितीही काहीही केलं, तरीही मला थोड्याच दिवसात कळणार आहे की मी सिलेक्ट केलेल्या मॉडेलमध्ये खुपश्या गोष्टी नाहीचेत! आणि बाजारात सतत अपग्रेडेशन तर चाललेलेच असते!"
"अगं, मग? मग तू काय अशी नवनवीन मॉडेल्सच्या मागे लागणार आहेस का आयुष्यभर?"
"छे गं! आताही नाही का कितीही झालं तरी हा जुना आउटडेटेड मोबाईल मी गेली चार वर्ष वापरतेय? तसंच! बाजारात त्या चार वर्षांत कित्ती मोबाईल येऊन जुने झालेत!" श्रीया रेशमी केस मागे टाकत उद्गारली.
"नशीब! शेवटी पदरी पडलं पवित्र झालं असंच म्हणायचं मग नाही का?"
"हो. म्हणजे जेव्हढा चालवता येतो तेव्हढा चालवेन मी त्याला!"

"किती वाजतील रे आज घरी पोचायला?" सुरभीने तिच्या नव्याकोऱ्या फोनवरून सात वर्ष जुन्या नवऱ्याला फोन लावला.

Sunday, 17 October 2010

हसू

एप्रिल महिन्यातील रविवार. उन्हं खंडाळ्यात कमीच तापतात. मुंबईहून मित्रमंडळी जमली होती. आपापल्या मैत्रिणींना सोबत घेऊन. राजू-गीता, शेखर-स्मिता, आनंद-स्नेहल, रवी-अस्मिता, संजय-नीता. सर्वच तसे पंचविशीतले. हॉटेलसमोरील बागेत हिरवळीवर गप्पा रंगल्या होत्या. पंधरा दिवसांवर, रवी-अस्मिताचं लग्न आलं होतं. बाकीच्यांच्या मनात लग्नाचा विचार अजून घोळत होता. जेवणे व्हायची होती. पुरुषांचे, मद्यपान चालू होते.

"मित्रांनो, रवी-अस्मिताचं लग्न आता अगदी उद्यावर येऊन ठेपलं. आपण, आज ना उद्या लग्न करणारच आहोत. तर इथे असलेल्या प्रत्येकाने, आज एका प्रश्नाचं उत्तर द्यायचे आहे." राजूला नेहेमी काही विचारी प्रश्न पडलेले असत.
"काय बाबा, आता कसली उत्तरं हवीत तुला?" संजयने घोट घेतघेत विचारलं.
"प्रत्येकाने सांगायचं आहे, आपापल्या जोडीदाराकडून आयुष्यात तिच्या वा त्याचा काय अपेक्षा आहेत?" राजूने कोडं टाकलं. "आणि लांबण लावायची नाही. एकाच वाक्यात सांगायचे." इति नियम. "चल आनंद, सुरुवात तुझ्यापासून."
आनंद विचारात पडला. स्नेहलच्या चेहेऱ्यावर उत्सुकता पसरली.
"मला वाटतं, माझ्या बायकोने घर उत्तम सांभाळावं. म्हणजे..."
"बस बस. कळलंsss! लांबण नको!" आनंद पुढे बोलणार तेव्हढ्यात राजूने त्याला तोडलं. "आता तू बोल स्नेहल."
"मलाही असंच वाटतंय...माझ्या नवऱ्याने घर उत्तम सांभाळावं." स्नेहल उद्गारली.
"अगं, मी घर सांभाळू, की पैसे कमवू?"
"शेखर, तुझी पाळी." राजूने एक होऊ घातलेला वाद थांबवत खेळ पुढे नेला.
स्मिताकडे नजर टाकत शेखर म्हणाला,"तिने, मला आणि घर, दोन्ही नीट सांभाळावं."
"माझ्या नवऱ्याने, मला सुखात ठेवावं." स्मिताच्या सुखाच्या कल्पना, जरी त्या भौतिक असल्या, तरीही अतिशय स्पष्ट होत्या.
राजूने एका वाक्याचे बंधन घातल्याने खेळ लवकर पुढे सरकत होता. आणि मोजक्या उत्तरातून स्वभावदर्शन होत होते.
आता पाळी संजयची.
"मला वाटतं, नीताला एकूण करियर करायची काही हौस नाहीये, तर मग माझी अपेक्षा देखील आनंदसारखीच आहे."
"असं उत्तरं चालणार नाही. नीट स्पष्ट बोल." राजू म्हणाला. नीताने त्याला दुजोरा दिला.
"अरे, म्हणजे मला वाटतं, ज्याने त्याने स्वतः ला आवडतं ते काम करावं."
"आणि मला वाटतं, माझ्या जोडीदाराने, स्वतः च्या करियरपुढे घराकडे दुर्लक्ष करू नये!" फुरंगटून नीता बोलली.
"सगळ्यांमध्ये भांडणं लावून देण्यापेक्षा राजू, आता तू बोल ना, तुझी काय अपेक्षा आहे, तुझ्या बायकोकडून?" संजयने राजूला पंचाच्या भूमिकेतून खेळात ओढले.
राजू हसला. "मला वाटतं, माझ्या बायकोने मला आणि स्वतः ला सुखात ठेवावं."
"हो का? म्हणजे ही दोन्ही कामं मीच करायचीत वाटतं? आणि मग तू काय करणार आहेस?" गीता खेकसली.
"अरे, ते तू सांग ना! मी काय करायचं ते?" राजू तसा हरणार नव्हता.
"मी सांगते, तू तुला वाटेल त्या नव्हे, तर मला वाटेल त्या सुखात तू मला ठेवणार आहेस!" गीता हट्टी होती आणि राजू राजकारणी आईबापाचा लाडावलेला लेक होता.
"बरं, बरं! अस्मिता, तू बोल आता."
अस्मिता विचारात पडली होती. ग्लास उचलून तोंडाला लावणाऱ्या रवीकडे प्रेमाने बघत ती उद्गारली,"माझा नवरा, आयुष्यभर, माझा मित्र असावा."
"अस्मिता, तू नेहेमीप्रमाणे एकदम वेगळं आणि विचार करून उत्तरं दिलंस हं!" राजू कौतुकाने म्हणाला.
"रवी, आता तू बोल रे?"
"माझं उत्तर त्याच्याच उलटं!" रवी घोट घेत म्हणाला.
"साल्या, तू ना!"
रवी मित्रांचा लाडका होता. सर्वांना हसवण्याची जबाबदारी नेहेमीच रवीची होती.

आणि हे रंगलेलं कोडं ऐकत हिरवळीवर पहुडलेली, नियती खोखो हसत सुटली.
हे तिचं नेहेमीचंच. विनोदबुद्धी शून्य. नको तिथे हसणार. आणि जसं वीज चमकते तेव्हा ती आधी दिसून येते, परंतु, भेदून टाकणारा गडगडाट बऱ्याच उशिरा आपल्या कानी पडतो. तेच गणित ह्या नियतीचं. ती हसते तेव्हा तो खळखळाट ऐकू येईस्तोवर किंवा ती हसली हे देखील कळेस्तोवर दशकं ओलांडून जावी लागतात. आणि तेव्हा कुठे नियतीचं हसू कानी पडतं.

अस्मिताला जेव्हां ते ऐकू आलं, तेव्हां रात्रीचा एक वाजून गेला होता. अजून जेवणाला अवधी होता. चार वर्षांचा लेक, यश बाजूला निजला होता. आणि रवी मद्याचे घुटके घेत समोर टीव्ही बघत बसला होता.

Saturday, 16 October 2010

उभे आयुष्य

इतक्या उंचीवरून किती सुंदर दिसते ही नगरी. दूरदूरपर्यंत समुद्र पसरलेला. रस्ते निमुळते होत जाणारे. आणि माणसं. ना उंच ना बुटकी. जसे काही हलते ठिपके. आणि गाड्या? बोटाच्या एक पेर...दोन पेर...जास्तीतजास्त तीन पेर एव्हढ्या. बघत रहावी ही दुनिया. इमारती. खिडक्या. जश्या काही काडेपेट्या. उभ्या ठेवलेल्या. सोसाट्याचा वारा सुटला तर पडतील की काय असंच मनात येतं. कधीतरी एखाद्या खिडकीत हालचाल दिसते, तेव्हां त्या क्षणापुरती तिथे जाग येते. नाहीतर फक्त आकाश बदलतं....दिव्यांची उघडझाप होते...बस्स इतकंच.

ह्या नगरीतलं प्रेम देखील ह्या किनारीच येऊन बिलगतं. ना भान वेळेचं. ना स्थळाचं. वरून लाटांच्या उंचीचा पत्ताच नाही लागत. फक्त पांढरी झालर असलेला निळा पदर, पुढे सरकतो...आणि जाऊन किनाऱ्याशी विसावतो...पुन्हा जातो उलट्या पायी माघारी....जसा कोणी पदर सावरावा. एखादी बोट आणि त्यावर जाळं हवेत फेकणारे कोळी. सगळं छोटं. बघत राहावं आणि कळू देखील नये, कधी सूर्याने पाण्यात डुबकी मारली. मी जातो अजून वर आणि दिसतं दुसरं जग. मी उभा चंद्रावर. आणि पृथ्वी खाली. दूर एखादं विमान ढग कापत जातं. कापलेले ढग पुन्हा जातात मिसळून...वनिला आइसक्रिम आणि त्यातून फिरावी सुरी.

आकाशात हा असा मी रोज हरवतो. पहाटे पहाटे दिवस सुरु होतो. सरसर वर. कधी पूर्वेला. सरसर वर. कधी पश्चिमेला. आजूबाजूचं जगच निराळं.

झालं आता साठ वय. भंडारी आम्ही. शाळेत मीही गेलो. अभ्यास करत देखील होतो. दहावी केली तोपर्यंत बाप दारू पिऊन मेला. मुंबईत तेंव्हा वाड्या होत्या. विहिरी होत्या. माड होते आणि माझ्यात माकड होता. हुप्प. माडावर चढायचो तेव्हा बाप वरून दिसायचा. दारू पिऊन राडा करताना. बाप चढायचा, माडी घेऊन खाली यायचा. ठरलेली केंद्र त्याची. तिथे जाऊन विकायचा. म्हणायचा माझं काम भगवान शंकरासाठी. दुनियेला सांगत फिरायचा. "शंकर चालेला लढायला. दमला भागलेला. त्याच्या घामातून माझ्या आज्याचा जनम झाला. शंकऱ्याला पियाला पानी हवं व्हतं. आजूबाजूला कुटंबी नाय मिळालं. मंग चढला माजा आजा माडावरी. आणली माडी! दिली त्या शंकऱ्याला. झाला खुश! तवापासून ह्येच काम धरलया आमी! देवाचं काम हाय!" मेला तो मेला, पण आयशीला एकटी टाकून गेला, पदरात दोन पोर घालून. मग कसली शाळा आणि कसलं काय. माकडाचे पैसे झाडावर. लागलो मी माडी विकायला. मग उशिरा का होईना पण बायको आणली...आणि पोरं झाली. डोलते माड आणि माझं चालतं घर.

रोज पहाटे माडावर चढतो आणि हा असा हरवून जातो. म्हातारा झालो पण हे वेड नाही सुटलं. सुटणार पण कसं म्हणा. ही वरची दुनियाच अशी...तरंगती. वारा सुसाटला कि माड माझा झोपाळा. नाहीतर रहातो बसून इथेच वर....खालची मजेशीर दुनिया बघत!

"आई, हे बघ लावलं मी रोप. चांगली पाच सात वर्ष लागतील नाही का माड उभारायला?"
"होय रे बाळा. पण हे तू खूपच मोठ्ठ काम केलंस पोरा. ह्यांच्या अस्थी इथे वाडीत आणल्यास आणि हे माडाचं रोप पेरलस. भारी प्रेम त्यांचं माडांवर. कसा रे पण ह्या माडांनेच जीव घेतला त्यांचा? इतक्या वर्षात कधी नव्हतं रे घडलं असं! कसा पाय घसरला ह्यांचा आणि कसे आपटले रे हे जमिनीवर?" आजींनी डोळ्याला पदर लावला.
"अगं आई, बाबा खुश असतील. वर बसले असतील माडावर चढून. मस्त समुद्राकडे ध्यान लावून!"
आजींच्या चेहेऱ्यावर हसू आलं..."तू पण त्यांचाच पोरगा! बरा रोप घेऊन आलास!"
"आई, मी काही माडावर चढणार नाही! पण उंचीवरून समुद्र मात्र नक्की दाखवेन तुला! अजून आठ दहा वर्ष!"

हे बरिक राह्यलं माझं. हिला नाही कधी दाखवू शकलो माझं जग. पण हा माझा शिकलेला पोरगा दाखवणार आईला आणि बहिणीला समुद्र! विसाव्या मजल्यावरून! मी आहेच तोपर्यंत असा वर माडावर लटकत!

Thursday, 14 October 2010

तू तू...मैं मैं

रविवारची दुपार. ऑफिस बरे असे वाटण्याइतके काम संपवून केतकी आवारात आरामखुर्ची टाकून नुकतीच विसावली होती. १० बाय १० च्या दोन खोल्या नावावर असणे हे मुंबईसारख्या उतू जाणाऱ्या शहरात मोठी जमेची बाजू. मात्र हे समोरचं चिंचोळ आवार तिचं अगदी लाडकं. रविवारी दुपारी अख्खी चाळ जेव्हा वामकुक्षी घेत असते तेंव्हा, त्या शांततेत एखादं पुस्तक वाचून काढावं. सुखाच्या केतकीच्या कल्पना तश्या फार डोईजड नव्हत्या.

हिरवट, लाकडी कठड्याला लागून तिने लहानपणीच डालडाच्या डब्यात लावलेली गुलबक्षी, रंगीबेरंगी गुलाबाची रोपे, तिला अजूनही साथ देतच होती. वडिल ती कॉलेजला असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेले होते. अर्धा सोडलेला त्यांचा संसार पुरा करताकरता तिची चाळीशी जवळ आली होती. धाकट्या बहिणीला, मिनूला, उच्चशिक्षित करून, लग्न लावून दिलं तेव्हां आईने केतकीच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला होता. आईने कितीही लपवले तरी देखील तो एक लबाड अश्रू केतकीशी फितुरी करूनच गेला.

केतकीने हातातील पुस्तक अर्धवट बंद करून पोटावर ठेवलं आणि दूर शून्यात नजर टाकली. शून्याचं एक बरं असतं, कुठेच नजर आपटत नाही....आता वाचायचा चष्मा लागला असला तरी देखील दूर जितकं शक्य असेल तितकं हिचं शून्य खोल. चाळीचं कौलारू छत वरून खाली आलं होतं. आणि त्याने आपोआप दिसणाऱ्या चित्राला एक नक्षीदार चौकट तयार झाली होती. कुठेतरी केतकीला जाणवलं, कोणीतरी बघतंय. टक लावून. शोधात नजर पुन्हा वर पोचली, तर छपरावरून कबुतर डोकावत होतं. करडं, गुबगुबीत. उन्हात बसलेलं. खालून केतकीला कबुतर दिसत होतं, फक्त छातीपुरतं. एक क्षण नजरानजर झाली आणि त्याने नजर फिरवली. पण केतकीची नजर तर गुंतून पडली. त्याच्या गळ्यावर. ती काय नजर हलवणार? कबुतराच्या गळ्यात हे काय होतं? लक्षलक्ष रंग. निळा, हिरवा, पोपटी, मोरपिशी. किती छटा. कोणा राणीच्या गळ्यातील कंठमणी फिका पडेल इतका लाख मोलाचा. वेळावणाऱ्या मानेवर चपखल बसलेला. आणि मग काय तो तोरा? केतकीला त्या नखऱ्यावरूनच जाणवलं, ती कबुतरी होती. तो तोरा एका स्त्रीचाच असू शकतो. गळ्यात एव्हढा सुंदर दागिना आणि कोण मिरवणार? बहिणीच्या लग्नाच्या खरेदीवेळी, कितीदा केतकी गेली होती सोनाराकडे. किती ती मिनूची, आवडनिवड. शहरातले सगळे सोनार पालथे घातले होते. पण हा असा दागिना? नव्हता कुठेच दिसला. त्यावेळी केतकीची नजर, एकदाच अडकली होती एका हिऱ्यामाणकांच्या चिंचपेटीवर. लालबुंद माणकं बसली होती तारकांच्या कोंदणात. केतकीने तो गळ्यात घालून देखील बघितला होता. आरसा अगदी हलकंच हसला सुद्धा. परंतु, पैसे जरी केतकीचे असले तरी लग्न मिनूचं होतं, खरेदी तिची होती. अपराधीपणाच्या भावनेने दुसऱ्या क्षणाला ती ठसठशीत चिंचपेटी पुन्हा पेटीत गेली होती.

मादक कबुतरीला केतकीच्या नजरेतील हेवा जाणवलाच होता जसा काही. मुद्दाम मान वर खाली. डावीकडे उजवीकडे. उन्हाचा तो खेळ आणि रंगांची ती चमक. मोराच्या लांबसडक पिसाऱ्याची गंमत वेगळी आणि कबुतरीच्या ह्या दागिन्याचे सौंदर्य वेगळे. सावळे शरीर आणि सावळ्या मानेवर हा खुलता हार. लाल मादक डोळे आणि आरपार नजर. केतकीला जाणवला तो कबुतरीचा गर्व. जेव्हा आपल्या शक्तीची जाणीव असते तेंव्हाच हा गर्व स्त्रीच्या नजरेनजरेतून समोरच्यावर मारा करतो. समोरच्याला गारद करतो. कबुतरीची मानसिकता तिला दुरून जाणवली. पुन्हा नजरानजर आणि केतकीने अपरं नाक उडवलं. कबुतरीने नजर रोखली. केतकीने नजर नाही हटवली. आता काय ही कबुतरी देखील तिच्यावर वर्चस्व दाखवणार होती? केतकीने नाक मुरडले. मान उडवली. काही क्षणांचा खेळ. तेव्हढ्यात कुठून गुटूरगुर कानी आलं. कबुतरीने मान वेळावली. पाय थरथरवले. पंख पसरले. कौलं सोडली. तोऱ्यात भरारी घेतली तेव्हा गिर्रेबाज कबुतरीबरोबर तिचा जोडीदार होता. कबुतरीला आता सगळं जग थिटं. बुटकं. आणि गिरकी घेण्याआधी केतकीच्या गुलबक्षीवर, पांढरीशुभ्र रांगोळी टाकायला ती नव्हती विसरली.

आता मात्र केतकी हरली. पुस्तक खुर्चीत आपटून ती उठली. म्हातारी आई दरवाज्यात येऊन उभी राहिली तेंव्हा केतकी मन लावून गुलबक्षीला अंघोळ घालत होती.
"काय गं? काय झालं?"
"काही नाही गं. हे कबुतर! घाण सगळी!..... एक काय कमी होतं, म्हणून आता जोडीदाराला घेऊन आलं!"

Wednesday, 13 October 2010

डोक्यावर हात!

दुबई. गाडीच्या डिकीत तिचे दोन हात बरेच दिवस पडून होते. गोरेपान हात आणि लांबसडक बोटं. बिचारे, किती दिवस हातावर हात घेऊन एकटेच बसलेले. म्हणून हातात घेतले. थोपटले. मी मागच्या सीटवर, नवरा गाडीचालक आणि लेक बाबाबरोबर पुढे. मग कधी ते नाजूक हात बाबाच्या खांद्यावर विराजमान होत, तर कधी ते त्याला गुदगुल्या करीत.

एक दिवस, गाडीच्या उघड्या खिडकीतून तिने, हात बाहेर काढले आणि हलवायला सुरुवात केली...जसं काही गाडीतून कोणी गोरी बाहेरच्यांना हातच करतेय. तेव्हढ्यात शिटी वाजली. मी डोकं बाहेर काढलं...मागून पोलिसांची गाडी. जवळजवळ ५ ते ६ दुबईचे पोलीस, मळकट करड्या गणवेषातील. त्यांच्या चेहेऱ्यावरची एकही रेघ कधी हलत नाही. आजही नव्हती हलत. ती हात हलवतच होती. एका पोलिसाशी माझी नजर मिळाली...त्याने भुवया उडवल्या, तिच्या हातांकडे बघत. त्यांचा चालक सोडून सगळ्यांची नजर त्या सुंदर हातांकडे! सगळ्यांच्या कपाळाला आठ्या. मी त्यांच्या नजरेचा रोख पकडला आणि तिच्या हातांकडे बघितलं. आपल्याला बघून कोण गोरी हात करतेय हे बघायला पोलीस बहुधा पुढे आले होते. त्यांच्याकडे बघितलं. एकाने पुन्हां शिटी मारली. काय चाललंय, खाणाखुणांतून विचारणा झाली. तिने हात वर केले आणि हलवून दाखवले. आठ्या अधिकच जमा झाल्या. 'हात बाहेर काढू नका, आतच ठेवा' आज्ञादर्शक खुणा झाल्या. लेक खोखो आणि मी आपली त्यांच्याकडे बघून हसले. आता काय कोणी लहान मुलगा थोडीच हात बाहेर काढत होता...उगाच शिट्या मारायला! मी गोरीचे हात मागे घेतले. पोलिसांची गाडी निघून गेली.

मॅनिक़्किनचे हात! नवऱ्याने शूटसाठी आणलेले.
आता मुंबईत कपाटावर...जणू, कपाट कुठला तरी ताल धरतंय...आपल्याच विचारात.

Monday, 11 October 2010

अगं पोरी...

शुक्रवारचे रात्रीचे ८. आठवड्याची सांगता नेहेमीप्रमाणे उशिरा झाली होती. अंधार पडला होता. कार्यालयातून गाडी बाहेर आणून उजव्या दिशेला काढली तर बरेच सिग्नल आणि वाहतुकीची कोंडी मिळू शकते. डावी दिशा पकडली तर थोडं पुढे गेलं की स्त्रिया नटून थटून रस्त्यावर दुतर्फा उभ्या असलेल्या दिसू लागतात. हे आता आम्हां सर्वांच्या सवयीचं झालेलं आहे. तरुण, मध्यमवयीन, प्रौढ. परकर पोलका, झगमगीत, रंगीबेरंगी लुगडं नेसून एकमेकींशी गप्पा मारत त्या उभ्या होत्या. काय फरक? ह्या कधीही न झोपणाऱ्या शहरात, स्त्रिया रात्रीबेरात्री; बस थांब्यावर, कार्यालयात, सिनेमा हॉलमध्ये नेहेमीच दिसून येतात. त्यात काहीच नवखे नव्हते. कोणाचा व्यापार बुद्धीचा तर कोणाचा शरीराचा. विचार स्पष्ट. गोंधळ काही नाही.

दोन दिवसांपूर्वीच घट बसले आहेत. सूर्यास्त झाला, काळोखाचे साम्राज्य वाढले की आता शहरात सर्वत्र गरबा चालू होतो. सगळीकडे रोषणाई. एक अभ्यास म्हणतो...नवरात्रीनंतर गर्भपाताचे प्रमाण वाढते. असो.

पुढे तीनचार गाड्या होत्या. वेग काही खास नव्हता. तो रस्ता ह्या दिवसांत देखील अंधारलेलाच. त्या कमी प्रकाशातही ते रंगीबेरंगी कपडे आणि ते रंगीबेरंगी चेहेरे उठूनच दिसत होते. जसजशी पुढे सरकले, ती रांग आटत गेली. तेव्हढ्यात डाव्या हाताला ती दिसली. चार फूट उंची. वय बहुधा सात किंवा जास्तीत जास्त आठ. पांढरा पोलका आणि गुलाबी तोकडा स्कर्ट. रंग सावळा कमी आणि काळाच अधिक म्हणता येईल. एका हातात कुठूनशी मिळवलेली एक फुटी काठी. दुसरा हात रिकामा. बाजूला तिच्याच वयाचा एक मुलगा. कमरेवर हात, नजर तिच्याकडे. चेहेऱ्यावर कौतुक. ती असे काय करत होती? गिरक्या घेत होती, काठी मोठ्या जोशात उडवत होती. आपल्याच धुंदीत. आपलं चित्रपटविश्व, हे मन वेडंपिसं करणारे धडे, अतिशय नेटाने देत असतं. तसेच ते तिनेही घेतले असावेत. ती गरबा खेळत होती. एकटीच. खरं तर त्या मुलाव्यतिरिक्त तिच्याकडे कोणीही बघत नव्हतं. पण मला मात्र त्याचं अस्तित्व जाणवलं. तो सैतान कुठे ना कुठेतरी होताच. तिच्याकडे बघत होता. त्याची ती वाईट नजर त्याच्या न दिसण्यातून सुद्धा मला जाणवली. तिचे हवेत फिरणारे चकचकीत काळे, लांबसडक बाहुच ते सांगत होते. जमिनीला स्पर्शही न करणारी पाऊलं तो नक्की बघत होता. ती अदाकारी...ते मुरडणं...ते त्या वयाला न शोभणारं मादक स्मित. कुठल्याही शाळेत तिच्या नावाची नोंद असण्याची शक्यता कमी. परंतु पैसे कमावण्याचे तिचे शिक्षण कधीच सुरु झाले होते. आणि ती पैसे उत्तम कमावणार हे तिची उडती पावलेच सांगत होती. कोण जाणे तिची माऊली कुठे होती!

पोटात खड्डा पडला.
पुढचा रस्ता मोकळा झाला.
माझी पांढरपेशी गाडी सफाईने पुढे निघाली.
मागे, मिट्ट काळोखात, समोरच्या आरशातून ती हळूहळू नाहीशी होत गेली...

निळी खिडकी

Sunday, 10 October 2010

"शाब्बास!"

लहानपणी, म्हणजे जेव्हांपासून अंगावर कामे टाकली जाऊ लागली तेव्हांपासून...ती कामे चांगलीच करण्याचा प्रयत्न असे. अर्थात त्या वयात ती कामे म्हणजे; केर काढ, गाद्या घाल, भांडी घास आणि धूळ पूस ही आणि अश्याच धर्तीची असत. परंतु ती पूर्ण झाली की घरातील वडिलधारी माणसं आपलं कौतुक करणार आहेत अशी एक अपेक्षा असे आणि म्हणून ते काम उत्तम करण्याचा जीवापाड प्रयत्न असे.

आजही मोठे झाल्यावर आपण त्याच अनुषंगाने जात असतो. अंगावर पडलेले काम चांगलेच करायचा प्रयत्न करतो. कौतुकाची थाप पाठीवर पडलीच पाहिजे ही इच्छा मनाशी बाळगून असतो.

आज एक अभ्यास वाचनात आला. काही संशोधकांनी उंदरांवर प्रयोग केला. त्यांना असे आढळून आले की बालपणी झालेल्या घटनांचा अतिशय तीव्र स्वरूपाचा परिणाम, आपल्या मेंदूच्या घडणीवर होतो.

"शाब्बास!"
ह्या शब्दाला फार महत्त्व आहे....
चिमुकल्या बाळाला देखील त्याचं महत्त्व कळतं आणि मग ते दुगण्या उत्साहाने पुढचं पाउल टाकतं! आपण आपल्या मुलांना लहानाचे मोठे करत असताना एक खात्री नाही का बाळगत, की पिल्लूने अगदी पेला जागेवर नेऊन ठेवला तरी देखील,"अरे वा! अगदी छानच केलेस बुवा तू हे काम!" अशी दाद आपण देत? आणि आपण बारकाईने जर बघितले तर आपल्याला दिसून येते की आपल्या ह्या दोन गोड शब्दांनी आपल्या बाळाला हुरूप आलेला आहे आणि त्याचा आत्मविश्वास देखील वृद्धिंगत झालेला आहे.

मग आपल्या ह्या पुढाऱ्यांचे लहानपण कसे गेले असावे? त्यांना ज्यावेळी अशी कामे सांगितली जात, त्यावेळी त्यांनी ती उत्तमरित्या पूर्ण केल्यानंतर (त्यांनी लहानपणी तरी ती केली असतील असे येथे गृहीत धरण्यात आले आहे) त्यांना अपेक्षित असलेले कौतुक कधी मिळालेच नाही काय? आणि त्यामुळे मग हळूहळू आपण केलेले काम कौतुकाच्या लायकीचेच असावे असा प्रयत्न करण्याची त्यांची इछाच नष्ट झाली?

वाटतं....
आपल्या बहुतेक नेत्यांनी, मेंदूला धक्का बसण्याइतक्या भयानक स्वरूपाच्या घटना त्यांच्या बालपणी अनुभवल्या असाव्यात!
आणि म्हणूनच कौतुकाला पात्र असे काही फार कमी प्रमाणात त्यांच्याकडून घडते!

पिंपळपान

गच्च भरलेल्या हिरव्यागार पिंपळावर,
एकेक पान एकटं असतं.
करंगुळीच्या नखाइतकं...
बाळपान एकटं येत.
एकटंच काय ते भरत जातं...
गुलाबी मांसल एकटंच होतं...
वेडं ते एकटंच लाजतं...
आणि वेडं, एकटंच थरथरतं.
गच्च भरलेल्या हिरव्यागार पिंपळावर
एकेक पान एकटं असतं.

तारुण्य...एकटंच.
वार्धक्य ते एकटंच.
एकटंच कसं ते गळून पडतं.
कधी नशीब असेल तर,
कोणी एक पोर येतं...
एखादं पान उचलतं.
उचलतं ते उचलतं...
जपतं ते जपतं....
पण शेवटी एका वहीत,
त्या काळपेटीच्या...
काळोख कोठडीत,
एकटंच तर बंदिस्त असतं!
गच्च भरलेल्या हिरव्यागार पिंपळावर,
एकेक पान एकटंच असतं.

Saturday, 9 October 2010

असाही वारसा...

आज सकाळीच कविताने कपाटे साफ करायला घेतली होती. बरेच दिवस झाले होते. वेळ नव्हता मिळाला. खरं तर फक्त वेळ हे काही कारण नव्हतं. कपाट उघडा आणि त्यातील आठवणींच्या बाणांचा घनघोर वर्षाव अंगावर घ्या... ह्यासाठी तिच्याकडे आता शक्तीच उरलेली नव्हती. कवचकुंडलं कधीच गळून गेलेली होती. पण मग कोळ्यांचं फारच फावलेलं दिसत होतं. सगळीकडे कोळिष्टकं. म्हणतात ना एकाच्या दुःखात दुसऱ्याचे सुख!

लेकीला बाबापुता करून, आठवडाभर गोडगोड बोलून मदतीला तयार केलं होतं. तिने कपाट उघडलं. एकेक गोष्टी खाली यायला सुरुवात झाली. एखाद्या उंच किल्य्यावरून प्रचंड मोठ्या आकाराच्या पाषाणांचा जसा माराच. सरलेली वर्षं जडशीळ होऊन खाली आदळत होती. कविताचे हात प्रयत्न करत होते...वजन हृदयावर पेलण्याचा.

प्रथम दगड...बालपणातील जपून ठेवलेली जिवलग सख्यांची पत्रं. कुठून कुठून पाठवलेली. कविता कधी उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी गेलेली असता...'तुझी खूप आठवण येते...कधी परत येणार तू?' तर कधी, 'अगं तू नाहीस आणि पत्ते रंगतच नाहीत.' 'लगोरी नीट लागत नाही...सुट्टीत आपण सायकल शिकणार होतो.' सगळ्याच तक्रारी, मनापासून केलेल्या.

लेक वरून दगड फेकण्यात मश्गुल होती. कविताच्या डोळ्यांतील पाणी नाहीतरी त्या जाड्या चष्म्याआडून पटकन दिसतच नाही.

दुसरा दगड...कविताच्या वडिलांचा... त्यांना शेवटचे हॉस्पिटलमध्ये ठेवले गेले. सगळीकडून नळ्या लावल्या गेल्या. त्यांना बोलता येईना...ते बोलत असूनही कविताला वडिलांचे शब्दच कळेनात. धावत जाऊन परिचारीकेच्या हातून कागद आणि पेन आणलं. बाबांच्या हातात दिलं. वेडेवाकडे शब्द बोलले...'मला पुस्तक वाचायचंय नळ्या कधी काढणार?'

आला...तिसरा दगड आला. कवितेच्या नवऱ्याचा. लेकीने तिच्या आईबाबांची प्रेमकहाणी कवितेच्या हातात दिली. कॉलेज चुकवून बघितलेल्या चित्रपटांची तारीखवार यादी..."आई, हे तुझं म्हणजे ना, त्या 'दिलं चाहता है' मधल्या सोनाली कुलकर्णीच्या बावळट बॉयफ्रेंड सारखंच दिसतंय! काहीही लिहून ठेवलंयस!!" त्याचा मोबाईल, त्याची टोपी, त्याने पाठवलेली कॉलेजमधील हळुवार पत्र...

सगळे दगड खाली आले. साफ केले...वर ठेवायला लायक केले.
"आई, हे असं सगळं किती दिवस जपायचंय?"
"तूच सांग बाई. देऊया का आजच फेकून? बोलावते मग रद्दीवाल्याला."
पलंगावर बसून लेकीने कविताकडे आणि खोलीभर अस्ताव्यस्त पसरलेल्या सामानाकडे नजर टाकली.
"नको. राहू दे. वर चढते मी परत. दे तू एकेक मला."
कवितामध्ये अजून त्राण नव्हतं आलं. दगड परत उचलण्याचं.
"अगं, मला वाटतं आपण असं करूयात का?"
"काय?"
"हे ना, आपण आत्ता असंच परत ठेवून देऊ. आणि ना, तुझं कधीतरी लग्न होईल...तुला मुलं होतील...मग आपण ना, त्यांनाच सांगू हे सगळं रद्दीवाल्याला द्यायला. म्हणजे आपण हे सगळं त्यांना कधी दाखवूयाच नको. आणि तुझी मुलं तर काही त्यांच्या आजोबांना आणि पणजोबांना ओळखणारच नाहीयेत ना! कारण त्यांनी त्यांना कधी बघितलेलंच नसणार! मग त्यांना हे सगळं फेकून द्यायला ना काहीच नाही वाटणार!" एका दमात कविताने बोलून टाकलं.
लेक तिच्या चेहेऱ्याकडे बघत राहिली. आजचं मरण हे आपल्या आईने, आपल्या मुलांवर टाकलेलं तिला कळून चुकलं. अजून लग्नाचा ना थांगपत्ता आणि...
"बरं, माते! तसंच करूयात आपण. नाहीतरी हे मलाही नाहीच शक्य...आजोबांच्या आणि बाबाच्या गोष्टी रद्दीत टाकून देणं! माझ्या पोराबाळांना काय फरक पडणार आहे!"

मायलेकींनी न जन्मलेल्या जीवांवर, मोठीच जबाबदारी टाकून, आठवणींची बोझी पुन्हां बांधायला घेतली.

Friday, 8 October 2010

पृथ्वीवरील संध्याकाळ

मुंबईतील एखादा कलाविष्कार बघण्यासाठी सर्वोत्तम... पृथ्वी थिएटर. मुख्य रस्त्यावर वाहन असेल तर लावावं आणि समोरच्या बोळात शिरावं. सूर्यास्त होत आला असले तर वातावरणनिर्मितीत भरच. झाडाखाली वसलेले कँटीन, पिवळे कंदील, वर बांबूंचं छप्पर आणि त्यातून तिरीपीने अंगावर पडणारा केशरी प्रकाश. बाजूला माडांना लगडलेल्या नाजूक दिव्यांच्या माळा. झकास. आपण थोड्याच वेळात जो अनुभव घेणार आहोत त्यात कसं आधीपासूनच शिरायला होतं. एक मात्र धोका! आपण देखील कोणी बुद्धिजीवी आहोत असं उगाच वाटू लागतं!

आत नाट्यगृह ग्रीक अॅम्पी थिएटरचे छोटेसे रूप. जे कलाकार त्यांची कला प्रदर्शित करणार आहेत ते जसे काही आपल्यातीलच वाटावेत अशी त्याची रचना. नसरुद्दिन शहा हाताच्या अंतरावर. आविर्भाव करताना त्याच्या चेहेऱ्यावरची रेषा न रेषा दिसावी. आपण दिलेली दाद अगदी त्यांच्या कानी पडावी. इस्मत चुगताईंची कथा, हिबा शाहच्या तोंडून ऐकावी आणि अंगावर रोमांच उभे राहावे.

परवा योग आला. मकरंद देशपांडेंचे "पोहा गॉन राँग' हे हिंदी नाटक. संध्याकाळी सहाचा प्रयोग.

पोहे म्हटले की मुलगी बघायला गेलात कि लाजत लाजत समोरून येणारी; नाजुकशी, सुरेखशी मुलगी समोर येण्याचे दिवस तर आता गेले. आणि महाभारतातील सुदाम्याचे पोहे तर त्याहून जुने! परंतु, इथे एक मनुष्यजीव असा आहे, ज्याला पूर्ण खात्री आहे की तोच तो महाभारतातील सुदामा! सुदामा, त्याच्या बालपणीच्या दोघी मैत्रिणी आणि त्या मैत्रिणींना धरून येणारी इतर व्यक्तिमत्वे.
ह्या सुदाम्याचे काही आक्षेप आहेत. त्याच्या जिवलग मित्राबद्दल तक्रारी आहेत.
सर्वप्रथम त्याला महाभारतात त्याचे व्यक्तिचित्र नक्की का रंगवले गेले हेच कळत नाही. फक्त कृष्णाच्या व्यक्तिमत्वाला अजून एक कंगोरा देण्यासाठी हे व्यक्तिमत्व तयार केले गेले हा पहिला आक्षेप. म्हणजे बघा... इतका मोठा कृष्ण, तरी देखील आपल्या बालपणीच्या गरीब मित्राचा त्याला विसर नाही पडला!
दुसरा आक्षेप... कृष्णाने आपल्याला सोडून अर्जुनाला का युगपुरुष केले? मी जर बुद्धिमान आहे तर मलाच का नाही सांगितली गीता? मला सांगितली असती तर कदाचित उगाच १८ अध्याय उगाळत बसायला नसते लागले! लवकर तरी संपली असती. आणि हे इतके १८ अध्याय जेव्हा कृष्ण सांगत होता, त्यावेळी बाकीचे योध्ये रणभूमीवर, काय झोपा काढत होते?
हे आणि असेच काही इतर आक्षेप, म्हणजेच अनेक फोडण्या देऊन हे पोहे, चविष्ट होण्याचा प्रयत्न करतात. परंतु, वाटले सपकच. म्हणजे थोडे बिनचवीचे. पंधरा मिनिटाचे मध्यांतर टाळता आले असते. एक अंकी नाटक जरा बरे वाटले असते. दोनतीन प्रसंग अगदी उचलून ट्रॅशबिनमध्ये टाकता आले असते. मकरंद देशपांडे मात्र सुदामा म्हणून सही! आता ह्यापुढे कधीही सुदाम्यावरील काही लिखाण वाचनात आले तर मकरंद देशपांडे डोळ्यासमोर उभे रहाणार हे नक्की!

आपण एखादं अतिशय सुंदर नाटक बघितलं असा आनंद हे नाटक नसेल देऊ शकलं...पण ते पृथ्वी थिएटरचं मातीशी जवळीक साधणारं वातावरण...त्या वातावरणाने त्या भावनेवर कधीच मात केलेली असते!

मग पृथ्वीची गंमत काय इथेच संपली?

मी बाहेर येते, उजव्या हाताला वळते आणि तिथे असलेल्या पुस्तकांच्या दुनियेत डोकावते. तो अनुभवही वेगळाच. हिंदी, उर्दू, इंग्रजी भाषेतील, एखाददुसरं पुस्तक तरी मी विकत घेते.

जेव्हां बटव्यामधून लेखणी काढून, मी माझ्या नव्या पुस्तकावर स्थळकाळ लिहिते, तेव्हा कुठे माझी सोनेरी संध्याकाळ पूर्ण होते!

Thursday, 7 October 2010

रडकी पुस्तकं!

परवा सकाळी घड्याळाचे काटे ९चा इशारा करत डोळे वटारत होते. माझं आणि त्याचं कधीच पटलेलं नाही! त्यामुळे नेहेमीसारखीच माझी धावपळ चालू होती.
"आई, मला पैसे हवेत."
"अगं, माझ्याकडे आत्ता नाहीयेत. आणि मला एटीएम मध्ये जाऊन काढायला पण वेळ नाहीये. तुझ्याकडे देऊ का मी कार्डं? काढशील का तू?"
"दे."
रात्री ती मला कार्ड परत करायला विसरली आणि मी ते परत घ्यायला विसरले.
मग कालचे माझे आणि माझ्या लेकीचे एसमेस...
मी ऑफिसमध्ये. अदमासे दूपारचे ११ वाजले होते. माझ्या मोबाईलने त्याच्या पोटातील हालचालीचा एक आवाज काढला. लेकीचा एसेमेस आलेला होता..
So we got done with our lecture! and we came to watch a movie and I remembered I have your card, we went to Crossword and 2 books called me, So I had to buy them. They started crying when I said I can't buy them. So I didn't have an option.

मी...
ag, pn mi visarale card tuzyakadun ghyayalaa tari tu dyayachs naa kaal raatri parat!

लेक...
:)

रात्री जेवताना....
"काय ग, बाजारात आणि काय काय रडत होतं तुझ्याकडे बघून?"
"आई, खरं तर ना, चार पुस्तकं रडत होती, आम्हांला घरी घेऊन चल म्हणून. पण मी त्यांना समजावून सांगितलंय, मी एकदम तुम्हां चौघांना घेऊन गेले ना, तर माझी आई चिडेल माझ्यावर. म्हणून ना आज मी फक्त दोघांना घेऊन जाते आणि परत पुढच्या आठवड्यात येऊन तुम्हांला दोघांना घेऊन जाईन. चालेल? मग कुठे ती थांबली रडायची!"
"हो का? मला वाटलं, कोण जाणे आणखी कोण कोण रडतंय! जीन्स, पर्सेस, दागदागिने, टॉप्स....म्हणजे मग संध्याकाळपर्यंत माझं कार्डं रडू लागलं असतं..आणि रात्री मी रडले असते!"
"नाही ग आई. फक्त पुस्तकंच रडतात नेहेमी माझ्याकडे बघून!"

पुस्तकप्रेमी आजोबांची लाडकी नात बोलली! आणि त्याच बाबांची मी लेक! मग हसण्यापलीकडे काय करणार मी?
:)

Wednesday, 6 October 2010

मश्गुल

भरगच्च गुलाबी आणि त्यावर पांढऱ्या रंगाची उधळण. म्हणजे जसं काही गुलाबी दुलई अंथरावी आणि त्यावर आभाळातून पांढऱ्या रंगाने थबथबलेला कुंचला झटकावा. मग कुठेही विसावतील ते थेंब. त्या गुलाबी रंगांवर त्या पांढऱ्या मुक्त पद्खुणा किती खुलून दिसतात. मोजून एक दोन आणि तीन, लाल कौलारू घरे. आणि त्याला पडलेला सिमेंटचा उभा आडवा वेढा. त्यात ही बोगनवेल. तशीच दिसते ती. तिसऱ्या मजल्यावरून. गालीचा अंथरलेला. असा गालिचा, ज्यावर कधी पाऊल ठेवूच नये. उंचावर, हातात हनुवटी खुपसून तासनतास बसावं आणि तो नाजूक गालीचा डोळे भरून बघावा.

आपल्यातच मश्गुल असतात असे काही जीव. आजूबाजूला तोडफोड होते. आभाळ कोसळतं. धरणीकंप होतो. जग उलथंपालथं होतं. कधी इमले कोसळतात. पण ह्यांचं मात्र जगणं चालू. फुलणं चालू. पानगळ होते. नाही असं नाही. पण त्यातही त्यांचं फुलणं संपत नाही.
मग प्रश्न पडतो...वरून बघणाऱ्याला. त्याला वाटतं...खिजवते ही बोगनवेल!
"मी इतकं थैमान घातलं...जग तुझं स्मशानात पोचवलं....तुझं फुलणं तरी संपतच नाही?!"

आपल्यातच मश्गुल असे असतात काही जीव!

Tuesday, 5 October 2010

असेही अतिक्रमण!

सकाळचे ९.२०. ऑफिसजवळचा मोठा सिग्नल. माझी गाडी, मी सिग्नल व झीब्रा पट्टयांचा मान ठेवून उचित जागी थांबवते. मला उजव्या दिशेला वळायचं असतं म्हणून त्या रांगेत. अचूकरित्या सांगायचं म्हटलं तर बरोब्बर १२० सेकंद माझी गाडी स्तब्धता पाळते. आणि इथेच रोज एक नाट्य घडते. तर आपण आता बघु या आजचा दिवस...

रोल...
कॅमेरा...
अॅक्शन...
फिल्म सुरु होते त्यावेळी पांढरी झेन शांत उभी आहे. चालकाच्या खुर्चीत बाई आहेत. लाल सिग्नल नुकताच पडला आहे. एफएमवर 'मुन्नी बदनाम हुई' आताच सुरू झाले आहे. बाई आजूबाजूला बघत आपला वेळ घालवायचा प्रयत्न करीत आहेत. उजव्या हाताला डोक्यावरून फ्लायओव्हर झेपावलेला आहे. खाली जवळजवळ ३० भिकाऱ्यांची वस्ती आहे...चूल, बॅगा, अंघोळी. समोरच्याच पदपथावर असलेल्या पोलिसांच्या नजरेला, का कोण जाणे, पण ही वस्ती कधी पडलेलीच नाही. बाजूला उभ्या असलेल्या बऱ्याच गाड्यांना, आता भिकाऱ्यांनी विळखा घातलेला आहे. आपल्या गाडीच्या उजव्या बाजूने काळा ६/७ वर्षांचा मुलगा पुढे आलेला आहे. हातात दगड आहे. काचेवर दगड आपटायला सुरुवात. बाईंच्या कपाळाला आठ्या. चेहेरा हताश...ठक ठक ठक. काचेवर चरे. बाईंचा भीक देण्याला कट्टर विरोध. सिग्नलकडे आशेचा दृष्टीक्षेप. रेडीओ बोलतो आहे...'मैं झेंडू बाम हुई'. सिग्नल खाली असलेला इंडिकेटर वेळ दाखवतो...९८. अजून ९८ सेकंद शिल्लक आहेत...गाड्यांसाठी हिरवा लागायला.
cut to...मुलाच्या जोडीला आता त्याच्याचसारखी दिसणारी चार पाच वर्षांची मुलगी आलेली आहे. गळकं नाक, झिपरे केस. हात काचेवर आपटून बाईंचे लक्ष वेधायाचा प्रयत्न चालू केलेला आहे. काचेवर शेंबडाचे ठसे. पुलाखाली बसलेल्या मध्यमवयीन बाईंशी गाडीवाल्या बाईंची नजरभेट...त्या बाईचा क्लोज-अप...चेहेऱ्यावर विजयी हसू...'है तुझमे पुरी बोतल का नशा...बोतल का नशा'...

cut to...गाडीवाल्या बाई. सिग्नलकडे दृष्टीक्षेप...7० सेकंद बाकी...
cut to...सिग्नल. हिरवा सिग्नल आता पडलेला आहे. वेगवेगळ्या हॉर्नच्या आवाजांनी आसमंतात अकस्मात घाई निर्माण झालेली आहे...'मुन्नी बदनाम हुई, डार्लीग मेरे लिये'. भाऊ आणि बहिण मागे सरलेले आहेत. बाईंनी पहिला गियर टाकलेला आहे. तेव्हढ्यात त्यांच्या डाव्या बाजूने एक साधारण पस्तिशीचा तरुण इयरफोन लावून, लॅपटॉपचे दप्तर पाठीला लावून पुढे आलेला आहे. त्याने बाईंना थांबण्याचा इशारा केलेला आहे. आणि रस्ता पार करायला सुरुवात केलेली आहे. बाई थांबलेल्या आहेत. तरुण गाडीपुढून गेलेला आहे...cut to...बाईंनी क्लचवरचा पाय उचललेला आहे...'डार्लिंग तेरे लिये'...आता एक तरुणी पुढे आली आहे. सलवार खमीज, भुरभुरणारे केस आणि हसरा चेहेरा. बाईंना अधिकाराने हात दाखवण्यात आलेला आहे...'गाल गुलाबी,नैन शराबी रे'....रस्ता पार करायला तरुणीने सुरुवात केलेली आहे. बाईंचा पाय ब्रेकवर आलेला आहे. बाई आता सिग्नलकडे बघत आहेत. इंडिकेटर वेळ दाखवतो...३० सेकंद. हॉर्नचा आवाज शिगेला पोचलेला आहे. सरळ जाणाऱ्या गाड्यांची रांग सूतभर पुढे सरकू शकलेली आहे...cut to...बाईंनी गाडीला गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाडी थोडी पुढे आलेली आहे. डावीकडून आता पाचसहा स्त्री पुरुषांचा घोळका सरसावलेला आहे. बाईना थांबण्यास सांगण्यात आलेले आहे. हताश बाईंचा पाय ब्रेकवर आलेला आहे...'तू झेंडू बाम हुई'...बाईंची सिग्नलवर नजर...इंडिकेटर...१० सेकंद...cut to...मुंबईचा जगप्रसिद्ध डबेवाला आत्मविश्वासाने हातगाडी घेऊन सरसावला आहे. रस्ता पार करायची त्याला घाई आहे...इंडिकेटर...३सेकंद...Loud Sound प्यॅ प्यॅ प्यॅ...cut to...आता उजव्या बाजूने गाड्या पुढे येण्यास सुरुवात झालेली आहे.सिग्नल लाल...बाई आणि इतर सर्व गाड्या जैसे थे स्थितीत...'आयटम बॉम्ब हुई, डार्लिंग तेरे लिये'...

मधुर भांडारकरांचा 'ट्राफिक सिग्नल' होता सिग्नलपाशी भीक मागणाऱ्यांच्या दृष्टीकोनातून...हा शब्दरूपी सिनेमा एका वाहनचालकाच्या दृष्टीकोनातून. पादचाऱ्यांचे गाडीवरील आक्रमण, शब्दांत पकडण्याचा प्रयत्न.

पादचाऱ्यांचा हिरवा सिग्नल तोडून एखादी गाडी निघाली तर शिटी ऐकू येते. परवाना जप्त होतो. दंड बसतो. गाड्यांसाठी हिरवा असताना गाडीला थांबवून पुढे जाणाऱ्या पादाचाऱ्यांना रोखणारा काही नियम?

की अतिक्रमण आपल्या रक्तात शिरले आहे?
कधी गाडीचे माणसावर...
तर कधी माणसाचे गाडीवर!

'है ये दुनिया सब, मेरे लिये...है मेरे लिये!'

Sunday, 3 October 2010

डुप्लिकेट

"डुप्लिकेट करून घ्यायला हवं."
ड्रायव्हिंग परवान्याच्या पत्रावळ्या जवळजवळ वर्षभर सविताने सांभाळल्या होत्या. परंतु आता त्यातील छायाचित्राचे पानच गहाळ झाल्यामुळे त्वरित उपाय करणे गरजेचे झाले होते. एका शनिवारी, वेळात वेळ काढून ती तिच्या जुन्या ड्रायव्हिंग शाळेत पोचली होती. तेथील तरुण कारकुनासमोर तिने त्या पत्रावळ्या मांडल्या होत्या. त्याने छायाचित्राचे पान नसल्याबद्दल तक्रार न करता, मन लावून पत्रावळ्या क्रमवार लावल्या.
सविताने शरमेने विचारलं,"मग काय करायला हवंय मला त्यासाठी?"
त्याने खणातून फॉर्म काढला. तिच्याकडून भरून घेतला. २ फोटो, पत्रावळ्या आणि ६५० रुपये जमा करून घेतले आणि सोमवारी RTO च्या कार्यालात येण्याचे फर्मान काढले. पुढचा महिनाभर तो सोमवार आलाच नाही. तो महिना सविताने परवान्याशिवाय गाडी चालवली. नेहेमीच कसोशीने नियम पाळणाऱ्या सविताचा आणि वाहतूक पोलिसाचा त्या महिनाभरात संबध देखील आला नाही. शेवटी एक दिवस ड्रायव्हिंग शाळेतून फोन आला आणि RTO मधून आता तुमचा फॉर्म रद्दबादल केला जाईल अशी तंबी दिली गेली. मग सोमवार नाही तरी एक शुक्रवार उजाडला.
काळी पिवळी घेऊन RTO ला सविता पोचली तेंव्हा दुपारचे अकरा वाजले होते. वरुणराजाने आमच्या शहरातून आता काढता पाय घेतलेला आहे आणि सूर्यमहाराज विजयोत्सव साजरा करत आहेत. सविताला दूर उभी असलेली, ड्रायव्हिंग शाळेची गाडी दिसली. तिला दिलेल्या सूचनांचे पालन करित ती गाडीपाशी जाऊन उभी राहिली. चढती उन्हं असह्य व्ह्यायच्या थोडं आधी, एक गृहस्थ तिच्या दिशेने येताना तिला दिसले.
"काय काम आहे?"
"डुप्लिकेट करून घ्यायचंय. म्हणून तुमच्या माणसाने इथे तुमच्या गाडीपाशी उभं राहायला सांगितलंय."
"बरोबर. पण आमचे मास्तर इथेच होते इतका वेळ. आताच कुठे गेलेत."
पुढची पंधरा मिनिटे सूर्याचे शरसंधान तिने झेलले. मास्तर आले.
"डुप्लिकेटसाठी आलेय."
"हो. थांबा दोन मिनिटं."
मास्तरांनी नवीन परवान्यासाठी आलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांना गोळा करून त्यांची उजळणी घेतली व त्यांच्या परीक्षेसाठी त्यांना तयार केलं. मग मास्तर तिच्याकडे वळले.
"चला मॅडम."
मॅडमांना एका खोलीत नेण्यात आलं. तिथे पुढच्या पाच मिनिटांत; फोटो काढणे, डाव्या आंगठ्याचा शिक्का घेणे आणि सही घेणे ही कामे उरकली गेली.
"मॅडम, सोमवारपर्यंत मिळून जाईल तुम्हांला डुप्लिकेट."
सविता सुटकेचा श्वास सोडत तिथून निघाली तेंव्हा साडे बारा झाले होते.

'डुप्लिकेट'या कथेचा पूर्वरित भाग इथे संपला.
उर्वरित भाग, पुढच्या पाचव्या मिनिटाला सुरु होणार होता.

जुन्या टॅक्स्या मोडीत काढण्याच्या आदेशामुळे RTO च्या परिसरात नव्या चकचकीत ताज्या काळ्यापिवळ्या दिसत होत्या.
"टॅक्सी!"
कोरी टॅक्सी सुळकन येऊन सवितासमोर थांबली. आत म्हातारेसे दिसणारे, पांढरी टोपी घातलेले काका ड्रायव्हर सीटवर बसले होते. आत शिरली तेव्हा दिसले, गाडीचे अजून प्लास्टिक देखील निघाले नव्हते.
"काका, नवीन गाडी?"
सविताचे निरीक्षण अचूक होते. काका मराठीच होते.
"हो. आताच रिसीट घेतली आणि पहिलं गिऱ्हाइक म्हणून तुम्ही सवाष्ण मिळालात!"
तरुण सविताच्या पोटात खड्डा पडला. घशात आवंढा आला. सतीविरोधी कायदा नकोसा झाला. कपाटात कडीकुलपात बंद करून ठेवलेलं मंगळसूत्र डोळ्यांसमोर गरकन फिरलं. पाच मिनिटे कोसळलेल्या डोंगराखालून जिवंत बाहेर पडण्यात गेली. काकांचा हात वारंवार हॉर्नवर पडत होता. आणि तो कर्कश आवाज सविताला खोल गर्तेत ढकलून देत होता. "काका, आपण हॉर्न कमी वाजवूया." काका हसले. "ठीक."
पाच मिनिटांच्या स्तब्धतेनंतर सविताने काकांना विचारले,"कोकणातले का तुम्ही?"
"नाही. पुण्याचा. गावी शेतीभाती आहे. घर आहे. चार मुलं आहेत. दोन मुलं. दोन मुली."
"मुलं शिकली?"
"एक मुलगा शेती सांभाळतो. एक भिमाशंकरला कारखान्यात काम करतो."
थोडा वेळ शांतता.
"मुलींची लग्न करून दिली. एका मुलीला दोन मुलं आहेत."
"थकला असाल नाही का काका, संसाराचा भार उचलून?"
"थकलो खरा. पण स्वतःचे पैसे स्वतःच मिळवलेले बरे म्हणून मुंबईत येऊन टॅक्सी चालवतो."
सविताचा हुंकार. मुंबईच्या चिकटलेल्या गर्दीत, टॅक्सी संथ गतीने सरकत होती.
"एक मुलगी तिच्या घरी सुखी आहे. दुसरी परत आलीय."
"काय झालं?"
"नवरा खूप दारू पितो. हिने सोडचिठ्ठी दिली. आणि घरी परत आली."
"केव्हढी आहे?"
"बत्तीस."
"मुलं?"
"नाही. पोरंबाळं नाहीत. मी म्हटलं तिला, तुझं दुसरं लग्न करून देतो. नको म्हणते."
काका नंतर गप्प होते. ऑफिसपर्यंत टॅक्सी पोचली. सविताने पैसे दिले आणि पर्स उचलली.
"मुलगी म्हणते...ओरिजिनल तो ओरिजिनल. आणि डुप्लिकेट तो डुप्लिकेट!"
"अं?"
सविता वर गेली. खुर्चीत जाऊन बसली. पाण्याबरोबर जड आवंढा गिळला.

कोण जाणे, सविता डुप्लिकेट लायसन्स कधी ताब्यात घेईल.

(सत्यकथेवर आधारित)

Saturday, 2 October 2010

आंबेघर

काळी रात्र होती. आणि त्या टेकडीवर अजून वीज चढली नव्हती. बरंच होतं. चांदण्यांना स्पर्धा नव्हती. काळी चंद्रकळा नेसावी आणि आसमंत चमकून उठावा. शंकराच्या डोक्यावरून धरणीकडे धाव घेणारी गंगा असाच खळखळ आवाज करत असेल काय? एक हात उंची असलेल्या आंब्याच्या रोपाला प्रश्न पडला. तसंच असावं. टेकडीवरचा धबधबा अवकाशात जाग राखून होता. चांदण्याच्या प्रकाशात चकाकणारं पाणी. जसा लखलखता रत्नहारच अवकाशातून ओघळावा. वाऱ्याची हलकीच झुळूक रोपाला डोलवत होती. रोपाची नजर राहून राहून थोड्याच अंतरावर असलेल्या त्या वेड्यावाकड्या सामुग्रीवर जात होती. कुदळ, फावडी, घमेली. आणि त्या बाजूला पडलेली रास. विटांची. का कोण जाणे पण त्या सरत्या रात्री रोपाच्या नाजूक देहातून भीतीची लहर गेली. त्या दिवशी भर दुपारी बरीच माणसे टेकडीवर येऊन गेली होती. आणि ही सर्व साधनसामुग्री पाठी सोडून गेली होती. रोपाचं वय कोवळं होतं. नुकतीच मान धरली होती. जनरीत माहिती नव्हती. कशाचीच ओळख नव्हती. काय होणार आता? मावळती चंद्रकोर काय देऊन जाईल? उगवता सूर्य काय घेऊन येईल? वाहत्या खळखळाटात तो सुस्कारा दाबून गेला.
"भय वाटतंय?" दूरवरून घनगंभीर आवाज आला. रोप दचकलं. कोण बोललं? मान उंचावून त्याने पलीकडे बघितलं. पण सगळंच तर जिथल्यातिथे होतं. मग?
"घाबरू नकोस गड्या!"
रोपाचा आवाज अति नाजूक. भीतीने तो हळूच उमटला. "कोण? कोण आहे?"
"अरे मी आहे. जरा समोर बघ पाहू. न घाबरता. तुझ्यासमोर जी रास पडली आहे, त्याच्या सर्वात वर शिखरावर मी आहे."
रोपाने मान अजूनच उंचावली. त्या नीट रचून ठेवलेल्या ढिगाऱ्याच्या माथ्यावर एक होतं खरं काही सर्वात वर. एकटं.
"बरोबर. मीच बोलते आहे तुझ्याशी. वीट. वीट म्हणतात मला."
अजून रोपाच्या तोंडून आवाज फुटत नव्हता.
"इथे आहे काय घाबरण्यासारखं? मला सखी समज."
धबधबा खाली झेपावतच होता.
"खरं तर कालपर्यंत तू एकटाच होतास. आज तर आम्ही आहोत तुझ्या सोबतीला. नाही का?"
वारा हलला. रोप शहारलं.
"पण तुम्ही कोण आहात? का आला आहात?"
"उद्यापासून इथे माणसे येतील. काम सुरु होईल."
"काम? कसलं काम?"
"अरे, इथे घर उभं रहाणार आहे. तुला काहीच माहित नाही?"
रोप फक्त डावीकडून उजवीकडे हललं.
त्या हालचालीने त्याची भीती आसमंतात शिरली. तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयावर जाऊन कोसळली. त्या धबधब्याला, त्या झुळूकीला आणि त्या प्रत्येक विटेला गलबलून आलं. रोप नाजूक होतं. त्याच्या भीतीचं भुयार उघडलं होतं. सगळ्यांना कळून चुकलं. तिथे घर वर येणार होतं. आणि भुईतून नुकतंच वर आलेलं हे इवलसं रोप थरारून गेलं होतं. त्याला नव्हतं कळत, त्याचं काय होणार होतं? काय त्या नवजन्मासाठी त्याला उखडून टाकलं जाणार होतं?
स्तबद्धता खाऊन टाकते. धबधबा देखील कसा नीरव होऊ शकतो? रोपाचं दुःखच तसं होतं. सुन्न करून टाकणारं.
वाऱ्याने सुस्कारा सोडला. इतका की दूरवर पडलेला एक कागद जमीन सोडून तरंगू लागला. छातीत भरलेला प्राणवायू जेव्हा संपला तेव्हा कागद त्या विटेपासून खाली थोड्या उंचीवर दुसऱ्या ढिगाऱ्यावर जाऊन टेकला होता. सखीची सुन्न नजर कागदावर पडली. कागद मोठा होता. हातभार लांबीचा. चांदण्यात दिसत होतं. त्यावरचा आलेख. सखी काही नवशिकी नव्हती. दुनियेतील रितीरिवाज जाणित होती. नजर बारीक केली. तिला कळून चुकलं, ते तिथे होणाऱ्या घराचंच चित्र होतं. वारा खिन्न होऊन पडलाच होता. कागदही हलण्याची चिन्ह नव्हतीच. आता मात्र सखी तो आलेख बारकाईने पाहू लागली. आणि हलकेच तीला हसू आलं. असं काय होतं त्यात?
तो हलका आवाज सगळ्यांच्याच कानी पोचला. रोपाने खाली घातलेली मान वर केली आणि तिच्याकडे नजर टाकली. चेहेऱ्यावर अविश्वास. का सखी आपल्या भीतीला हसली?
विटेने रोपाकडे नजर टाकली. तीला जाणवले. असे अवेळी हसणे कोणालाच नव्हते आवडले.
तरी ते हसू नाहीसं व्हायला तयार नव्हतं. वारा रागावला. त्याने हवेत हात फेकले. आणि कागद पुन्हा भिरभिरला. आता येऊन पडला तो रोपाच्या पायाशी.
वारा पुन्हा गुढघ्यात डोकं खुपसुन कोपऱ्यात जाऊन बसला. तो जग फिरला होता. अनेक पावसाळे बघितले होते. ही मानवाची जात पारखली होती. ते क्रूर आहेत. मोठे मोठे वृक्ष त्यांच्या कचाट्यातून सुटत नाहीत, हे अनुभवी वारा जाणत होता. मग ह्या इवल्याश्या रोपाची काय कथा?
"अरे, त्या कागदाकडे नजर तरी टाका!" वीट म्हणाली.
रोपाने मान फिरवली. त्याच्या आकलनशक्तीच्या ते बाहेरचे होते. .
"नजर नको फिरवू. कागदाकडे बघ. मी तुला समजावून सांगते. बघू काय सांगतोय तो कागद आपल्याला."
रोपाने हताश नजर कागदावर टाकली.
"अरे तो आलेख आहे. जे घर होणार आहे त्याचा."
"मग?"
"आता नीट बघ. काय दिसतंय तुला?" वऱ्यालाची देखील उत्सुकता आता जागृत झाली. तो उठून रोपाच्या दिशेने चालू लागला. पण मग काय झाले? कागदाने भूमी सोडली आणि कुठे भलतीच दिशा पकडली. वीट आता मात्र वैतागली."अरे तू आहे तिथेच बस पाहू! निघाला भिरभिरायला! आणि तो कागद घेऊन ये जा पाहू. दे आपल्या रोपाला परत!" दमटावणीच्या सुराने घाबरून वारा थोडा भिरभिरला आणि त्याने कागद पुन्हा रोपाच्या पायाशी आणून उतरवला. एखादं हेलीकोप्टर हलकेच उतरवावं तसं.
"आता मी काय सांगते आहे ते ऐका. दिसतोय का रे तुला आलेख नीट?"
रोपाने डावीकडून उजवीकडे मान वेळावली. वारा पुढे सरसावला आणि त्याने उलटा पडलेला कागद रोपाला सरळ करून दिला.
"लक्ष देऊन बघ. त्या आलेखात तुला घर आहे ते दिसतंय?" पळभरच्या एकाग्रतेनंतर रोपाला आधीचं धूसर चित्र स्पष्ट दिसू लागलं. त्याने वरखाली मान हलवली.
"छान. आता त्याच्यापाठी तुला काय दिसतंय?"
तिरपी मान करत रोपाने कागदाकडे बघितले. आणि अजिबात हालचाल न करता वाऱ्याने देखील त्यात मान डोकावली.
"काय आहे?"
"काय असावं?"
रोप जरी बाल होतं तरी मंद नव्हतं. "आंब्याचं मोठं झाड आहे काय?"
"अरे असं विचारतोस काय? तो तूच आहेस नाही काय? आणि जरा निरखून बघ. घराकडे बघ त्या. दिसलं का तुला? अरे, त्या घराने तुला तोडून नाही टाकलेलं. उलट तुला त्याने कुशीत घेतलं आहे. बघ जरा. घर कसं तुझ्याभोवती वळसा देऊन गेलंय? आणि तू बघ जरा त्या चित्रात किती बहरला आहेस? सुरेख आंबे देखील लटकत आहेत. नाही का?"
रोपाचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच नव्हता बसत. घर असं असू शकतं? मला कुशीत घेऊन बसू शकतं?
आता मात्र वाऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो नाचू लागला कागदाला पाठीवर घेऊन!

पहाटे जेंव्हा गवंडी आणि त्यांचा साहेब तिथे दाखल झाले तेंव्हा ह्या रात्रीच्या गंमतीचा त्यांना काय पत्ता? साहेब तरुण होते. तिशीच्या आसपासचे. हसतमुख. ते रोपाजवळ आले. आणि त्यांनी हलकेच त्याच्या मस्तकावरून हात फिरवला. गवड्यांना हाळी देऊन सांगितले," बाबांनो, ह्याला जपायचे बरं का? हाच उद्या ह्या घराची शोभा असणार आहे. त्याला त्याचा मान देऊनच तर मी हे घर रेखाटलं आहे. वेळावलेलं. आंब्याला कुशीत घेऊन सुखावलेलं."

दूरवर वीट, माणसाच्या निर्मितीवर कधी नव्हे ती खुष झाली होती. आणि तिच्या त्या हसण्याला धबधबा आणि वाऱ्याची साथ होती. रोपाला वाऱ्याच्या गुदगुल्या हसवून सोडत होत्या.

का हे गुपित साहेबांना कळलं? ते का हलकेच हसत तिथून निघून गेले?

ही गोष्ट घडली त्याला आता झाली सात आठ वर्ष. पेण गावात एका टेकडीवर धबधब्याशेजारी हे लालबुंद घर आंब्याला कुशीत घेऊन विसावलं आहे. लाडावलेलं हे आंब्याचं झाड मे महिना लागायची खोटी, दीड वीत लांबीच्या मधुर आंब्यांची नुसती उधळण करतं. आंबे बरसातात असंच म्हणा ना!

कधी रात्रीच्या नीरव शांततेत कान देऊन ऐकलंत तर येतील तुम्हांला ह्या चौकडीच्या गप्पा ऐकू!
आंबा, घर, वारा आणि धबधबा!