नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 30 October 2012

विहीर

मी विचारात पडते. त्यावेळी विचारांची ती एक विहीर असे. कधी माझ्या हातात कॉफीचा जाडजूड मग असतो, कधी एखादा कांदा तर कधी एखादे पुस्तक. मी फक्त आत डोकावू पहाते आणि विहीर मला आत ओढून नेते. ती काळ्याभोर पाण्यावर फुंकर घालते. पाणी शहारते. तरंगू लागते. मी त्यात फुका गोल गोल गिरक्या घेत रहाते. विहिरीला त्याची तमा नसते. एक गिरकी मला कुठे घेऊन जाईल ह्यावर माझा तो काय ताबा ? मी देखील ना विरोध करत...ना कधी रडत भेकत.

आज पहाटे पहाटे जाग आली. डोळे उघडते ना उघडते तोच मला तिने आत खेचून नेले.
शरण मी उभी राहिले, ती थेट एका न्हाणीघराच्या बंद दारासमोर. हलकेच मी दार ढकलते. पांढऱ्या फरशींवर लाल काळे रक्त. कुठे आतली फरशी दिसावी तर कुठे रक्त थांबून गेलेले. जणू वहाणे मरून गेले. चार दिवसांपूर्वीच स्तब्ध झालेले रक्त. वाटते गोठलेल्या रक्तावर बोट टेकवावे. बोट कपाळी लावावे. त्याच तर रक्ताचे मी कधी कपाळी कुंकू लावलेले. ते रक्त ज्या देहात वहात होते...त्याच देहाचे नाव मनी जपले होते...त्याच त्या नावाने गौरीहार पुजला होता. अंगभर पिवळा पदर...कपाळावर मुंडावळ्या...तांदळाच्या शुभ्र कण्यांत हळूहळू लपत जाणारी...नाजूक पार्वती...अन्नपूर्णा...
दारी आलेल्या पाहुण्याला दीर्घायुष्य दे...
दारी आलेल्या पाहुण्याला दीर्घायुष्य दे...
दारी आलेल्या पाहुण्याला दीर्घायुष्य दे...

तितक्यात गजर वाजतो.
क्रूर विहिरीच्या तावडीतून मला बाहेर फक्त घड्याळ खेचू शकते.
एक काम...दुसरे काम...तिसरे काम....
मग मी एक मुंगी होते.
स्वत:ला कामांच्या गर्तेत झोकून देते.

Thursday, 25 October 2012

तेरे लिये...

फिर एक बार...

रामाला जिवंत जाळण्यात आले.
रस्त्यांवर रावणाने थैमान घातले.
हनुमानाने पार्टी बदलली.
मर्कटे रावणाला सामील झाली.

देवी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये...

Friday, 12 October 2012

मावळते मावळे ?

"काही कळत नाही. लोकं पुन्हां पुन्हां शिवाजी महाराज, संभाजी महाराज...कर्ण ह्यांच्यावरील कथा कादंबऱ्या, बखरी का वाचत असावेत ?"
"म्हणजे काय ? ही पुस्तक पुन्हां पुन्हां वाचण्यासारखी असतात म्हणून !"
"पण त्यापुढे देखील इतिहास आहे. आपल्या देशाचा आहे. जगाचा आहे."
"मग ?"
"तसं नाही रे ! आपण शिवाजी महाराजांवरील लिखाणाची पारायणं करीत रहातो. ह्याचा अर्थ ते आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात झिरपत असतात."
"काय म्हणायचंय तुला ?"
"शिवाजी महाराज वा आपले त्यापुढील पुढारी...म्हणजे सुभाषचन्द्र बोस, आगरकर, वल्लभभाई पटेल....मी हीच नाव जाणीवपूर्वक घेतलीयत...कारण मी गांधीजी, टिळक वगैरे म्हटलं तर वेगळेच वाद सुरु होतील !....तर हे आपले नेते, दैवते...त्या त्या वेळी ज्याच्याविरुद्ध लढायची गरज होती त्यासाठी लढले...बरोबर ना ?"
"हो."
"मग आज आपल्यापुढे तसाच वा त्याहून मोठा प्रश्न उभा आहे...मग त्यासाठी आपण प्रत्येकजण ही आपली जबाबदारी समजून का लढत नाही ?"
"म्हणजे काय ?"
"अरे, म्हणजे त्यावेळी निदान आपल्याला परकीयांशी लढायचे होते...आता इथे आपल्याला स्वकियांशीच लढायला लागणार आहे. पण मग आपल्या रक्तात शिवाजी आहे ना मग तो उसळून का येत नाही ? ते फक्त पुस्तकी ज्ञान का रहाते ? म्हणजे इतिहास पाठ..आणि बाकी वास्तवात....वर्तमानकाळात अंधार...असे का ?"
"कळलं...कळलं तुला काय म्हणायचंय ते."
"जर शिवाजीमहाराज हे आपल्या विराट वृक्षाचे मूळ आहेत, तर मग ह्या वृक्षाच्या प्रत्येक पानाने, प्रत्येक फांदीने अगदी लहानशी जरी कीड आली तर ती झटकून टाकण्यासाठी वा तिचा नायनाट करण्यासाठी झटायला हवे आहे ! शिवाजी महाराज मुघलांशी लढले...टिळक, गांधीजी इंग्रजांशी लढले....ना. ग. गोरे, दुर्गा भागवत...आणीबाणीशी लढले...मग आपण काय फक्त मढं आहोत का ? आपल्या आईवडिलांनी प्रेतांना जन्म दिला होता काय ? भ्रष्ट्राचार समोर येऊन ठाकला की आपण त्याला साष्टांग नमस्कार का घालतो ? ते तीर्थ समजून आपल्या डोळ्यांना व माथ्यावर का पसरतो ?"
"मी एकदा आमच्या एका कामासाठी असा लढायला उभा रहात होतो यार...पण माझी बायको मला म्हणाली...उगाच नाय ते करायला जाऊ नकोस ! म्हणून मग मी नाही पडलो त्यात !"
"हम्म्म्म...म्हणजे बायकोच्या मुळांशी झाशीची राणी नाहीये वाटतं...की...आपली मुळंच मरत चाललीयत...?"

Thursday, 4 October 2012

बदल...माझ्यातील...तुझ्यातील...आपल्यातील

मागील पोस्टवरील संहिता/अदिती ह्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर उत्तर लिहावयास सुरवात केली तर त्यातून बरेच विचार डोकावू लागले. आणि मग ती निव्वळ प्रतिक्रिया न रहाता एक नवी पोस्ट आकार घेऊ लागली.

त्यांनी मांडलेल्या एकेक मुद्द्यांवर मला सुचलेले विचार...

मुद्दा १) महानगरपालिका आणि सरकारची, शाळांची जबाबदारी.
लहान मुलं व त्यांना वळण लावणे ही जबाबदारी फक्त शाळांची होऊ शकत नाही. ती पालक म्हणून आपली अधिक असते. ह्याचेच एक दुसरे उदाहरण म्हणजे लाल सिग्नल असून देखील तो तोडून आपले वाहन पुढे दामटवणारे पालक गाडीत आपल्या बाजूला बसलेल्या आपल्या मुलांना चुकीचे धडे देत असतात. त्यामुळे तो मुलगा / मुलगी मोठी झाल्यावर जर दुर्दैवाने काही विचित्र घडले तर त्याचे मूळ कारण हे 'पालकांकडून चुकीची शिकवण दिली जाणे' हे बऱ्याचदा दिसून येते.
जागोजागी कचऱ्याच्या कुंड्या : जागोजागी कचरा कुंड्या असणे हे आवश्यक हे बरोबर. परंतु, शिवाजी पार्कच्या परिसरात अतिशय सुंदररीत्या ठेवल्या गेलेल्या कचराकुंड्या रातोरात गायब झालेल्या मी बघितल्या आहेत. त्यामुळे हातातला कचरा केवळ नजरक्षेत्रात कचराकुंडी नाही म्हणून आहोत तिथे टाकून देणे ही एक चुकीची मानसिकता आहे.

मुद्दा २) इतक्या गर्दीत कचरा होणे हे शक्य.
विसर्जनाची गोष्ट घेतली तर चौपाटीवर कचरा टाकण्यासाठी कुंड्या होत्या/आहेत. परंतु, पुन्हा वर मांडलेला विचार येथे लागू पडतो. आहोत त्याच जागी कचरा टाकून पुढे निघून जाणे ही चुकीची सवय/मानसिकता आपल्याला लागलेली आहे. प्रत्येकाने असेच केल्याने शेवटी आपल्या परिसराचा उकिरडा झालेला दिसून येतो. मोठमोठ्या डिग्र्या घेतल्या म्हणजे माणसे शिकली हा एक गैरसमज आहे. जो माझा हल्लीच दूर झाला आहे. शिकली सवरलेली माणसे समाजाला बाधक अशी कामे करताना रस्तोरस्ती दिसून येतात. संहिता/अदिती यांनी मांडलेल्या विचारांत  बरेचदा निसर्गामुळे होणाऱ्या कचऱ्याचा उल्लेख दिसतो आहे. (वाऱ्याने कागद उडणार...वगैरे. ) हल्ली सगळ्यांच्याच हातातून वारा फारच सामान उडवू लागला आहे. त्यावर ताबा मिळवायला हवा. आता ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. हा मुंबईतील वारा आहे त्यामुळे त्यांना तो आवरता यायलाच हवा. बरोबर आहे का त्यांचं म्हणणं ?

३) लोकांनी केलेल्या कचर्‍यासाठी आपण स्वतःलाच का बडवून घ्यायचं?
लोकांनी कचऱ्यासाठी स्वत:ला बडवून घेणे गरजेचे आहे कारण ही 'लोकं' म्हणजेच समाज. आणि कचरा हा त्यांच्यामुळे होताना दिसतो. (आता सध्या आपण 'वारा' बाजूला ठेवू.) हल्ली 'पैसे' हीच भाषा आपल्याला कळते. त्यामुळे 'दंड' हा आर्थिकरूपी असला तर बरे होईल. हा तुमचा मुद्दा बरोबर.
पुन्हा...मंडळे म्हणजे अनेक नागरिक. सगळीच कामे पैश्यातून व्हावीत व आपली मूळ सवय बदलली जाऊ नये हे चुकीचे. माझे शहर हे 'माझे' आहे. त्यामुळे ते स्वच्छ ठेवणे ही माझी जबाबदारी आहे ही भावना प्रत्येकाची व्हायला हवी. आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तर आपल्या माणसांमध्ये ही भावना रुजवायलाच हवी. मनात आले...आणला गणपती...केली सजावट...आणि टाकला समुद्रात हे सर्वच फार घातक आहे.

संहिता/अदिती ह्यांच्या मुद्द्यांवर विचार करीत असता कचरा आणि गर्दी यांचे व्यवस्थापन व नियोजन याविषयी काही कल्पना डोक्यात आल्या.
१) 'विशेष सोयी'साठी शुल्क भरून आपण ती सोय मिळवतो. उदा. रेल्वे स्थानकावर/विमानतळावर जाण्यासाठी तिकीट घेऊन आत जातो. तसेच विसर्जनस्थळी तिकीट घेऊन आत प्रवेश असावा. प्रवेश फक्त विसर्जनासाठी असावा व तो देखील शुल्क भरून. प्रत्येक मंडळाला ठराविक प्रमाणात माणसे, संबंधित शुल्क भरूनच आत नेण्यास परवानगी दिली जावी.
२) मूर्तीच्या उंचीच्या प्रमाणात विसर्जन शुल्क आकारण्यात यावे. १ ते २ फूट उंचीपर्यंत नि:शुल्क अनुमती असावी.
३) प्रत्येक गणपतीबरोबर केवळ तिकीटधारकांनाच प्रवेश द्यावा व इच्छुक प्रेक्षकांसाठी बाहेर मोठ्या पडद्यांवर विनातिकीट विसर्जन दाखवण्यात यावे.
४) ह्यापुढे नवनवीन मंडळांना गणपती बसवण्यासाठीची परवानगी नाकारली जावी. इथे 'एक गाव एक गणपती' ही कल्पना उपयुक्त ठरू शकेल. कदाचित मुंबईत 'एक वॉर्ड एक गणपती' असे का करू नये ? ह्यातून अनेक मोठ्या स्पर्धा, मनोरंजनाचे खेळ घेता येऊ शकतात.
५) प्रत्येक मंडळाने स्वत:च्या २० कार्यकर्त्यांची संख्यानोंदणी महानगरपालिकेत आधी करावी. व त्यांना वेगळे कपडे घालून विसर्जनस्थळी संध्याकाळी ५ पासून हजर ठेवणे आवश्यक केले जावे. कार्यकर्त्यांची संख्या मूर्तीच्या उंचीशी निगडीत असावी. तितके कार्यकर्ते हजर झाले तरच मंडळास विसर्जनास परवानगी दिली जावी. 

या व अशा प्रकारच्या उपायांनी वेड्या गर्दीला आळा घालून, स्वच्छता राखून, शिस्तीने गणपतीचे व गैरशिस्तीचे विसर्जन पार पडणे शक्य होईल असे मला वाटते.   

आता ह्या सर्व चर्चेतून माझ्या मनात येते...'माझ्या गावाची स्वच्छता ही जबाबदारी दुसऱ्या कोणाची नसून ती माझी आहे असे प्रत्येक नागरिकाला वाटायला हवे' हा 'चर्चेचा विषय' होऊ शकतो इथेच आपल्या समाजाच्या मानसिकतेची हार आहे. तो चर्चेचा कमी आणि प्रत्यक्ष कृतीचा अधिक असा व्हावयास हवा.
नाही का ?
( मला एका मित्राने विचारलं...तुला वेळ कुठून मिळतो जाऊन साफसफाई करायला ?" म्हटलं साधं गणित आहे..."तुम्ही दर्शनासाठी, विसर्जनासाठी वेळ काढता...आणि मी साफसफाईसाठी." )

Monday, 1 October 2012

अकलेचा उकिरडा

आपण ज्या घरात रहातो, त्याबद्दल आपल्याला प्रेम असतं. आपलेपणा असतो व त्यामुळे आपलं घर नीटनेटकं दिसावं ह्यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. व घर स्वच्छ ठेवणे हे आर्थिक कुवतीवर अवलंबून नसते हे नक्की.

काल सकाळी गिरगाव चौपाटीला आम्ही सात वाजता पोचलो त्यावेळी चौपाटीच्या आवाक्याबाहेर गर्दी होती. मी, सुहास आणि अर्चना. 

समुद्र बराच आत आहे व मुंबईची ही चौपाटी बरीच मोठी आहे. जेव्हा कधी तिथून जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळी मला ही चौपाटी तरी निदान स्वच्छ दिसली आहे. पिवळसर वाळू, काळपट निळा समुद्र. पाण्यावर तरंगती एखादी बोट. किनाऱ्यावर एखादे सुकत घातलेले जाळे. जाळ्याच्या चौकटीतून दिसणारे आकाशाचे तुकडे. अनेक कावळे, एखादी घार. स्पेन, इस्तान्बुल मधील समुद्र निळा. आमचा काळपट करडा. 
आपली शिकवण सांगते, आपल्या आईची शेजारच्याच्या आईशी तुलना करू नये. मात्र आपली सुंदर आई, आपल्याच हाताने विद्रूप करावी आणि मग तरीही शेजारच्याने प्रेमाने राखलेल्या आईशी आपल्या आईची तुलनाच होऊ नये, ही काही अतिरेकी मागणी वाटते.

मुंबईवर कोणाचेही प्रेम नाही. निदान आपल्या नेत्यांना तर तिची काडीची पडलेली नाही. त्यात बिहारी येतात की मद्रासी, त्यांना काहीही फरक पडत नाही. फक्त स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी केलेली ही नाटके आहेत. ह्या वक्तव्याचा पुरावा...कालची गिरगाव चौपाटी.

काल समुद्र कोणी घाण करून ठेवला होता ? तिथे नक्की भय्ये होते...त्यांच्या बायका होत्या...कित्येक गुजराती कुटुंबीय फिरत होते. मुबलक हिंदी कानावर पडत होते. तुकतुकीत गुजराती बायका, त्यांचे नवरे, तीन चार गोरी मुले इथेतिथे. तमे गमे....कानावर पडत होते.
मात्र...नक्कीच तिथे लाखो लोक मराठीच होते. 
आणि तिथे पडलेला कचरा म्हणजे मराठी माणसाच्या मुंबईवरच्या कथित प्रेमाची लक्तरे होता.

तीन शाळकरी मुले. हातात कसले कसले आकाराचे प्लास्टिकचे पेपर. त्यांचा व त्या कागदाचा संबंध संपलेला तत्क्षणी त्यांनी ते कागद जिथे उभे होते तिथेच टाकून दिले आणि आपल्या रस्त्याला लागले. मी एक फुट अंतरावर एक मोठे पोतं घेऊन उभी होते. पोतं नक्कीच इतकं भरलं  होतं, की ते स्वत:च्या पायांवर उभं राहू शकत होतं. मी त्या मुलांकडे त्वरेने पोचले.
"ए मुला, हे बघ कचऱ्याचं पोतं. ह्यात टाक ना कचरा." मी.
"ए जा...टाक त्यात !" काम सरकवणे.
तिघांमधील दोघे तिथून निघून गेले.
ज्याच्यावर सोपवले गेले होते तो खाली वाकला आणि सगळे कागद हातात घेतले. माझ्या हातातील पोत्यात कागद विसावले.
"आता कसा....वाटतोस...शाळेत जात असावास असा !" मी.
तो चुणचुणीत दिसणारा काळसर मुलगा शरमेने हलकेच हसला. खाली मान घालून आपल्या मित्रांच्या रस्त्याला लागला.
पुढाऱ्यांच्या तावडीत सापडलेली कोवळी मने.

काळा रंग, शेंबडं नाक. एक फुट उंची. अंगावर विचित्र चमकणारा पिवळा फ्रॉक. तिने खाली वाकून एक चिमुकली चांदी उचलली. नाकासमोर धरली. मुंबईतील फुटपाथांवर घराचा डोलारा उभारलेली बरीच माणसे समुद्रावरच पसरलेली दिसत होती.
मी तिच्याकडे गेले.
"इधर आ." चिमुरडी माझ्यापाठी आली.
"डाल अब इसमें !" मी पोतं तिच्यापुढे पसरलं. तिने हात उंचावून चांदी आत टाकली.
"कचरा ऐसे इसमे डालने का. रास्ते पे फेकने का नही !" मी हसले.
तिचा चेहेरा फुलला. काळा रंग उन्हात तळपला.

दोन मध्यमवयीन बायका. मध्यम उंची. माझ्या बाजूने जाताजाता खाली वाकल्या, एका क्षणात खाली पडलेला जितका कचरा उचलता येईल तितका उचलला आणि आमच्या पोत्यात सोडला. चेहेऱ्यावर हलकाच आनंद घेऊन गेल्या.

एक गोरा अचानक समोर आला. गप्पा मारू लागला. हातात भला थोरला कॅमेरा. आणि त्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून तो माझ्याकडे बघत होता. त्याच्या मागे एक भारतीय...मुंबईकर वाटणारा माणूस. मी हे का करतेय...मला हे खटकतं का...वगैरे वगैरे. घरात परका पाहुणा यावा...आणि माझं घर अस्ताव्यस्त असावं...मान शरमेने झुकावी असं वाटलं. "माझ्या देशावर माझं प्रेम आहे...माझ्याकडे...माझ्या ह्या शहराकडे तुला दाखवायला खूप काही चांगलं आहे...मात्र त्याचबरोबर वाईट देखील आहे. मला त्याची जाणीव आहे....सुधारतोय आम्ही...मी फक्त माझा खारीचा वाटा उचलते....इतकंच."

जेव्हा चुकीची जाणीव होते त्याचवेळी माणूस सुधरू शकतो....तीच जर मेली असली तर सुधारणार तरी काय ?
वाटतं गणपती विसर्जनाच्या दिवशी आपण ही जी नैसर्गिक संपत्तीची हानी करतो, त्याची दखल खरं तर जागतिक पातळीवर घेतली जावी. कारण अरबी समुद्र माझ्या देशाच्या नशिबाने आम्हांला मिळाला आहे. परंतु, ती संपत्ती पूर्ण मानवजातीची आहे. हा समुद्र म्हणजे माझ्या घरचा कचऱ्याचा डबा नाही.

"अहो, पुढल्या वर्षी मी तुमच्याकडून तुमची झाडू घेणार आहे. त्याने कचरा काढणे हे अधिक संयुक्तिक आहे. कारण त्यात कमी वेळात अधिक काम होते !" मी महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगाराला म्हटले.
"ते तुम्हांला जमणार नाही ताई." तो म्हणाला.
"का नाही ? घरी मी काढते की कचरा !" मी
"ते वेगळं ! आणि हे वेगळं !" तो म्हणाला.
"ते बरोबर ! पण मी शिकेन ना तुमच्याकडून ! आणि मी बघितलं तुम्हीं कसा कचरा काढता ते ! असा हलकेच झाडू फिरवायचा वाळूत. फार जोर लावायचा नाही. कारण जोर लावला तर खालची वाळू पण गोळा होते. आणि आपल्याला फक्त वरचा कचरा हलवायचाय ! बरोबर ?" मी.
"हो ! बरोबर !"
"मग ठरलं तर ! पुढल्या वर्षी मी माझा एक झाडूच घेऊन येणार !"
तो हसला.

आम्ही तीन पोती कचरा गोळा केला. तो नेऊन महानगरपालिकेच्या कचराडब्यात ओतला. अंदाजे १५ फुट बाय १५ फुट इतक्या आकाराचे ३ चौरस साफ केले.

लालबागचा राजा...आणि त्याच्या विसर्जनासाठी आपली रात्र घालवणारा माझा एक मित्र.
"कस्सली गर्दी लोटली होती रे ! शनिवार रात्र होती ना...त्यामुळे जास्तच गर्दी झाली होती." तो आज ऑफिसमध्ये सांगत होता.
"तू होतास काय तिथे ?" मी.
"होतो म्हणजे ? अरे, अख्खी रात्र होतो तिथे !" लालबागच्या राजाच्या विसर्जनाला न जाणे ह्यात काहीतरी अवमानकारक असावं.
"हो काय ? आम्ही काल सकाळी गेलो होतो तिथे ! सकाळी होतास तू ?" मी.
"सकाळी ? सात वाजता विसर्जन झालं...मग गेलो आम्ही तिथून !" तो
"अच्छा. आम्ही सकाळी सात वाजता पोचलो. समुद्र साफ करायला. तू नव्हतास त्यात." मी.
"मी कशाला असणार त्याच्यात ? मी केला नव्हता कचरा !"
"हो. पण जी अलोट गर्दी लोटली होती, त्याचा तू एक भाग होतास...आणि अवाढव्य मूर्तीचा एक समर्थक असल्याकारणानेच इतकी अख्खी रात्र तिथे घालवलीस ना ?"
"माझा त्या कचऱ्याशी काहीही संबंध नाही. तो मी केला नाही ! मी कशाला उचलू मग ?!" तो.

विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्राच्या होणाऱ्या हानीशी गणपती विसर्जनाचा काडीचाही संबंध नाही...त्यामुळे अवाढव्य मूर्ती, थर्माकोल, चड्डया, पारले ग्लुकोजची व गुटख्याची वेष्टणे, पाण्याच्या बाटल्या, चहाचे प्लास्टिकचे कप, पादत्राणे, सॉक्स...ह्या सर्वांची जबाबदारी कुठल्याही गणेश मंडळाची नाही ! ती जबाबदारी गणपतीने स्वत: उचलावी ! कारण हे सर्व त्याच्यासाठी होते. जबाबदारी टाळून स्वत:चे अवयव अस्ताव्यस्त किनाऱ्यावर टाकून इतर कचऱ्यात भर टाकणे हे मुळात त्याला शोभतच नाही !

दुसऱ्या दिवशी जाऊन कचरा गोळा करणे हे काही दूरदृष्टीचे लक्षण नव्हे ! तर मुळात ही समस्या का उभी रहाते ह्याचा विचार करण्याची गरज आहे. परंतु, गरज आहे...पण आमच्या एकाही पुढाऱ्याची तशी इच्छा नाही ! त्यामुळे कार्यकर्ते आपल्या कामांच्या यादीत हे धरतच नाहीत. त्यांच्या मते आम्ही XXX ठेवणार आणि ते साफ करणे ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी आहे...आणि त्यासाठीचा पगार त्यांना मिळतो तेव्हा त्यांनी ते काम केलेच पाहिजे ! कचरा गोळा करताना बरीच तरुण मंडळी दिसत होती. कचरा करणारे आणि कचरा गोळा करणारे असे दोन स्तर तिथे वावरत होते. 
वेगवेगळ्या पक्षांच्या पुढाऱ्यांच्या नावाचे कपडे घालून फिरणारे कार्यकर्ते...कचरा करणाऱ्या गटात मोडत होते !

गिरगाव चौपाटी हे मुंबईचं एक तृतीयांश रूप आहे. त्यापुढे जाऊन ही चौपाटी हे माझ्या देशाचे एक शतांश रूप आहे.
हा देश माझा आहे.
हे गाव माझं आहे.
हे शहर माझं आहे.
ही चौपाटी माझी आहे.
हा रस्ता माझा आहे.
ही आगगाडी माझी आहे.
हा बसथांबा माझा आहे.
वगैरे वगैरे.
ही कुठल्याही एका पक्षाची खाजगी मालमत्ता नाही.
हा रस्ता, ही चौपाटी, हे शहर हा माझ्यासाठी उपलब्ध करून दिलेला एक अजस्त्र कचऱ्याचा डबा नव्हे.
तिथे मी कचरा टाकणे आणि दुसरा कचरा टाकून जात आहे ह्याकडे मी दुर्लक्ष करणे हे दोन्ही गुन्हेच आहेत.
आसपासचा परिसर हा साफ आणि स्वच्छ असावा हे सामान्य ज्ञान आहे.
हे मला शिकवायला एखादा पुढारी मला लागत नाही.
माझे घर कसे साफ ठेवावे हे मला एखाद्या पुढाऱ्याकडून शिकण्याची गरज नाही !
माझा नेता मीच आहे.
माझा पुढारी मीच आहे.
कारण मला डोके आहे.
स्वत:चे भले कशात आहे इतपत कळण्याची सारासार विचारबुद्धी माझ्यात आहे.
मी माझी अक्कल कोणत्याही पक्षाला विकलेली नाही.
आणि ती केळी खायला तरी नक्कीच गेलेली नाही.
तुमची ?
गणपती 'मागील सजावटीच्या पाया पडणाऱ्या' अनेक भक्तांमधील एक बाई.