नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 30 May 2010

रंग

आंबट गोड जांभळं आणि त्याला चोळलेलं मीठ. झग्याच्या दोन्ही खिशात जांभळं खचाखच भरली आणि खेळायला धूम ठोकली.

"लगोरी, चोर पोलीस, लंगडी, रंग रंग, डबा आईसपैस? काय खेळायचं ग आज?"
माझ्या इमारतीला खेळायला ना जागा ना माझ्या वयाच्या मुली. त्यामुळे शाळेतून घरी येताच बॅग कोपऱ्यात टाकावी आणि समोरच्या इमारतीतल्या मैत्रिणीला हाका मारायला सुरुवात करावी. तिथे आम्ही होतो देखील साधारण सारख्या वयाच्या, बारा पंधरा जणी. चोर पोलीस खेळताना चोराची भूमिका मिळाली तर जास्त मजा. जीवावर उदार होऊन असं लपावं की पोलिसाला पत्ताच लागू नये! खरंच जर आमच्या गल्लीत चोर असते तर त्यांनी आमच्याकडून लपण्याच्या जागांचा धडाच घेतला असता! इमारतीतल्या वरच्या मजल्यावरील राहिवाशांना एकच चिंता, 'आपल्या दुसऱ्या मजल्यावरील घराच्या सज्ज्यातून गृहप्रवेश इतका सोप्पा कसा काय!'
संध्याकाळी साडेपाच ते सात नुसता धुमाकूळ. तळमजल्यावरच्या एकाच मैत्रिणीच्या घरात रोज घुसखोरी करायची आणि हक्काने तिच्या आईकडे 'मावशी, तहान लागली' म्हणून पाण्याची मागणी करायची. त्यांच्या ओट्यावर आम्ही केलेली उष्ट्या पेल्यांची वेडीवाकडी रांग अजून देखील नजरेसमोर आहे.

सात वाजले आणि हात खिशात गेला. बाहेर आला तोच मुळी जांभळा होऊन. "काय ग? हे काय?"
दोन्ही तळहात माझे जांभळे होते. जांभळ्या शाईत ठसे घेण्यासाठी हात बुडवावेत तसे. पाण्याखाली धरले तर हे रंगकाम तर नक्की जाईल पण तेच रंगकाम पांढऱ्या झग्यावर झालं असणार त्याचं काय? आई एक तागा आणून त्याचे आम्हां तीन बहिणींसाठी तीन झगे शिवायची! एकाचे हात फुग्याचे तर एकाचे सरळ. एकाचा गळा गोल तर एकाचा चौकोनी. तेव्हढेच प्रत्येक झग्याचे निराळेपण. आणि हाच झगा माझ्या धाकट्या बहिणीच्या देखील अंगावर जाऊ शकेल असा तो टिकवण्याची माझी मुळी जबाबदारीच होती! सात वाजून गेल्यामुळे अंधार पडला होता आणि अंगणात माझ्या बेजबाबदारपणाची टक्केवारी कळण्याचा काही मार्ग नव्हता. म्हणजे फक्त खिसे रंगले होते की पूर्णच वाट लागली होती हे घरी जाऊनच कळणार होतं.
घरात शिरल्यावर उजेडात पांढऱ्यावर जांभळे रंगकाम अधिकच उठून दिसू लागले.
आईईईईईईईइ! बहिणीने आरोळी ठोकली. त्यातले समाधान फक्त मलाच कळणार होते! झगा तिच्या अंगावर चढण्याच्या लायकीचा बिलकुल उरलेला नव्हता!
अश्या प्रकारचा हा काही पहिलाच प्रसंग नव्हता! रंगांमध्ये वैविध्य मात्र होतं!
गोड रायवळ आंब्यापासून भगवा, आंबट आवळ्याचा पिवळट पांढरा, बोरांपासून काळपट लाल आणि आंबटगोड जांभळाचा जांभळा!
खूपखूप वर्षांपूर्वी गुहांमधील भिंतीवरच्या चित्रांमधील रंग हे असेच वनस्पतीपासून केले जात असत हे नंतर कॉलेजमध्ये कलेच्या इतिहासाचा अभ्यास करताना बालपणीच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे बरोबर लक्षात राहिलं.

Friday 28 May 2010

सावली

त्या दिवशी न्यूयॉर्क विमानतळावर खिडकीतून मला आमच्या विमानाची लहानशी सावली दिसत तर होती. विमान धावलं...तिने देखील धावायला सुरुवात केली...
हात विमानाचे पसरलेले... तसेच सावलीने हात पसरले होते.
घाईघाईत तिने विमानाचा वेग देखील पकडला.
विमानाने जमीन सोडली...सावली त्याच्याबरोबर जलद धावू लागली...
पण मग त्याचं काहीतरी बिनसलं...
गरज नाही उरली त्याला तिची...
आकाशात त्याला एकट्यानेच भरारी घ्यायची होती...
सावलीची साथ त्याने सोडली..
सावली तर बिचारी हरवूनच गेली..
मला माझी सावली विमानात इथेतिथे दिसत होती...माझ्या हालचालींचा ताळमेळ पकडत होती.
फक्त एकाच अस्तित्वाला त्या वेळी सावलीची साथ नव्हती.
दुखः तरी झालं का त्या विमानाला?
सावलीची साथ सुटली, याचं?

मुंबईच्या विमानतळावर त्याला ती परत भेटली का?

की परदेशात मी मागे सोडून आलेल्या, माझ्या बहिणीसारखीच ती देखील तिथेच राहून गेली?

Thursday 27 May 2010

कातरवेळ

सूर्यास्त झाला की आमचं घर पूर्ण केशरी होऊन जायचं.
आजघर, माजघर केशरी रंगात बुडून गेलेलं असायचं. स्वैपाकघर मात्र ९० अंशात वळून बसल्यामुळे त्यावर सूर्याचा कमी आणि चंद्राचा जास्त परिणाम.
मग घरात बसून, न बघता मला कळून चुकायचं की सूर्यदेवाने समुद्रात डूबकी मारलीय.
वाटे जणू काही आपण एका स्वच्छ पाण्याच्या ग्लासात आहोत. वरून कोणीतरी मोसंबी पेयाचा अर्क ओतलाय आणि पाणी हळूहळू रंग बदलत पूर्ण केशरी होऊन गेलंय. आजूबाजूला सगळं कसं केशरी. टेबल, सोफा, अगदी बाबांची पुस्तकं देखील केशरी.

आणि मग तो रंग नाहीसा होत जाई. जसा आला तसाच.
हळूहळू कातरवेळ घरभर पसरत जाई.
आईबाबा कामावरून नक्की परत येतील ना ही भीती सर्पासारखी मनात सरकायला सुरुवात होई. गॅलरीतून ते घराकडे परतताना दिसेपर्यंत. आणि मग आलेले बाबा हे आपले बाबाच आहेत की दुसराच कोणी बाबांचं रूप घेऊन घरात शिरकाव करतोय ही भीती. बाबांकडे बारकाईने, ते वाचनात गुंतले असता लपूनछपून बघितलं तरी हे भूत बिछान्यावर पडेपर्यंत डोक्यात घुमत राही.

जसा सूर्यास्त रोजचा तसा हा भुताचा खेळ रोजचा...

Wednesday 26 May 2010

हिरवा कोंब

मंगळूर विमानतळावर अपघात झाला. विमान आतल्या माणसांसकट जळून गेलं.
जळलेली शरीरे, जळलेलं सामान, जळलेले अवशेष...जाळताना आग लहानथोर नाही बघत.

दोनतीन वर्षांपुर्वी बाली, इंडोनेशिया मधील बतूर ज्वालामुखीच्या माथ्यावर पोचलो तेंव्हा लाव्हारसाने जाळलेल्या, निसर्गाच्या काळ्या आठवणी बघितल्या होत्या. सरळसोट उभी काळी खोडं, वरून खालपर्यंत पसरलेला काळा डोंगर.
तिथेही आगीनेच रुद्र रूप धारण करून तांडव नृत्य केलं होतं.
इथेही खेळ आगीचाच होता.
परंतु निसर्गाच्या त्या थैमानात, निर्माण दडलेला होता.
ह्या दुर्घटनेत मात्र अंत आणि अंतच.

भाजलेल्या पृथ्वीने तिथे हिरवा रंग धरला होता.
आगीचा इतिहास ते चित्र सांगत होतं तरी देखील त्याचा रंग हिरवागारच होता.
जागोजागी झाडांनी पुन्हा जीव धरला होता. डोंगर पुन्हा हिरवा झाला होता. पोपटी, गडद हिरवा तर कुठे मंद हिरवा. खाली निळी नदी वहात होती. दूर उंच उंच डोंगर ढगात शिरले होते. हिरवंगार जीवन परत एकदा सुरु झालं होतं.

मानवी चूक नाश करून जाते, निर्माण नाही.

का माणसासाठी नसतो तो हिरवा कोंब?

Monday 24 May 2010

गोंधळ


घड्याळाचे काटे...
सकाळी तसेच.
आणि
रात्रीही तसेच.

मग आत्ताच सूर्य मावळलाय की नुकताच तो उजाडलाय?

गुरुर्देवो नमः

लहान मुलांना शाळेत नापास करायचे नाही...हा आता नियम झालाय म्हणे..

त्यावेळी लेक माझी तिसरीत होती. तिचा आणि माझा हा एक अनुभव..

तिने काढलेले चित्र घेऊन एकदा ती घरी आली. मी बघितलं, तर त्या कागदावर दहा मध्ये तिला तिच्या शिक्षकांनी दोन गुण दिले होते. म्हणजे बाईसाहेबांना, गुरुवर्यांनी चित्रकलेत नापास केलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघी ते चित्र घेऊन त्यांच्यापुढे उभ्या राहिलो. त्यांनी तिच्याकडे बघितलं आणि म्हटले,"अगं, तुला एव्हढा मोठा कागद दिला होता न? मग त्यावर एकदम कोपऱ्यात एव्हढीशी बोट का काढून ठेवलीस तू?"
कोमेजलेला चेहरा करून बसलेली माझी लेक त्यांच्यासमोर काहीच बोलेना.
तिला बाजूला नेऊन मी विचारलं,"काय झालं पिल्लू?"
"अगं आई, पण मी नेहेमी बोट छोटीशीच बघितलेय नं? समुद्रात तर ती नेहेमीच दूर असते आणि मग ती छोटीच तर दिसते!"
काय चुकलं तिचं? काही नाही. तिच्या त्या पूज्य शिक्षकांना हे पटलं का? नाही!
मग काय? तिला न्याय तर द्यायलाच हवा होता.
"तुझ्या ह्या सरांना नं बाळा, चित्रकलेतलं काहीही कळत नाही! दे तो कागद माझ्याकडे."
त्या कागदावर दहात नऊ गुण मी दिले आणि सरळ त्यावर 'व्हेरी गुड' असा शेरा देखिल देऊन टाकला!
खुश झालं माझं पिल्लू!

तिची विचार करण्याची शक्ती, मी अशी कोणाला मारू बरी देईन!

Sunday 23 May 2010

आवाज की दुनिया के दोस्तों...

आजूबाजूला होणारे सगळेच आवाज आपण ऐकतो असे नाही, परंतु काही आवाज मात्र आयुष्यभर आपल्या कानात घर करून राहतात. आशा भोसले, लता मंगेशकर, किशोर कुमार ह्या 'सार्वजनिक' आवाजाबद्दल नाही बोलत मी. जे आवाज फक्त आपण ऐकलेले असतात आणि जे फक्त आपल्याच डोक्यात घुमत असतात, ते आवाज.

मला आठवतं, बाबांच्या घरी, दादरला, बाहेरच्या खोलीत झोपलं तर, रात्रीच्या निरव शांततेत ऐकू येत असे, थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राची गाज. आतल्या खोलीत झोपलं तर त्याच शांततेत ऐकू येई, दूरदूरवरून, विलक्षण गतीत जाणाऱ्या आगगाडीचा भोंगा आणि तीची ती रुळावरून जाताना होणारी धडधड.

हीच धडधड मला परत ऐकू आली ती डोंबिवलीच्या घरात.
लग्न झाल्यावर काही वर्ष आम्ही तिथे रहात होतो.
त्या तिथल्या काळ्या, एकट्या रात्री, मला गादीवर पडल्या पडल्या तोच आगगाडीचा आवाज ऐकू येई. मग काही वेळ शांतता...आणि मग ती शांतता भेदून टाकणारा रिक्षाचा आवाज. तो आवाज बरोब्बर आमच्या इमारती खाली थांबत असे. पुढच्याच क्षणी यायचा आमचं गेट उघडल्याचा आवाज. मग कोणीतरी जिना चढत असल्याचा आवाज..आणि नंतर ती शांतता भेदून टाकणारा आमच्या दारावरच्या घंटीचा तो आवाज. मुंबईहून निघणारी शेवटची आगगाडी पकडून अडीचच्या सुमारास माझा नवरा घरी परतलेला असे.

एखादी रेकॉर्ड लावल्यावर कशी एकामागून एक गाणी लागतात...आणि मग सवयीने, एक गाणं संपायच्या आत पुढचं गाणं आपल्या डोक्यात आधीच सुरू होतं...त्याचप्रमाणे हे सगळे आवाज एकदा सुरु झाले की एका मागोमाग एक माझ्या मेंदूत वाजू लागतात...क्रम अजिबात न चुकवता.

...असेच बाहेर ऐकू न येणारे परंतु जोडीदाराच्या मनातले आवाज ऐकण्याची कला अवगत झाली तर जीवनाची लढाई निम्मी जिंकता येईल काय?

Friday 21 May 2010

कावळा

त्या दिवशी समोरच्या कडूलिंबाच्या फांदीवर एक कावळा बसला होता.
काय नजाकत होती हो! लांबसडक, नाजूक, करडा, काळा आणि चकचकीत. उन्हात बसला होता. त्यामुळे तो अधिकच चमकत होता. असं वाचलंय की, गोऱ्या त्वचेपेक्षा काळी त्वचा अधिक निरोगी असते! इथेतिथे मान वेळावून कावळ्यांची नेहमीचीच हरकत तोही करतच होता. परंतु त्याची ती अदा काही वेगळीच होती! वाटलं व्यायामबियाम करतो की काय हा! हेवी वेट्स वगैरे! मी जाडजूड, गुबगुबीत कावळे बघितलेत. पण हा, बहुतेक तो 'ती'च होता, कावळ्यांच्या जमातीतला बिपाशा बासू होता!

कावळ्यावरून आठवलं.
परवा एका मित्राने माझ्या 'अति' सामान्यज्ञानात थोडी भर घातली.
म्हणे ह्या वर्षी भरपूर पाऊस पडणार आहे. हे हवामानखात्याचं अनुमान नाही!
ह्या वर्षी कावळ्यांनी त्यांची घरटी झाडांच्या आतील फांदींवर बांधलीयत!
जर पाऊस कमी होणार असेल तर कावळे आपली घरटी वर उघड्यावर बांधतात!
आत गर्द फांद्यांमध्ये घर उभारल्यामुळे, 'कावळ्याचं घर गेलं वाहून' अशी इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही!

अनुभवावरून फक्त प्राणी आणि पक्षीच तेव्हढे शिकतात!

Thursday 20 May 2010

विरोधाभास..

सध्या शहरात रंगीबेरंगी टोप्या दिसतायत.
तांबड्या, पिवळ्या,जांभळ्या, केशरी...विविध रंगाच्या.
एक क्षण नुसती बाहेर नजर टाकली तरी ह्या खुललेल्या टोप्या आपली वाटच बघत असतात.
तिसऱ्या मजल्यावरून माझ्या खिडकीबाहेर मी जेंव्हा नजर टाकते, तेंव्हा मला अशीच एक केशरी टोपी दिसते...गुलमोहोराची...
वरून दिसणाऱ्या कौलारू छपरांमधून वर डोकावणारी.
आपण मोठ्या गर्वाने उभारलेल्या उंच उंच करड्या इमारती देखील मला दिसतात.
त्यांच्याच बाजूला दिसतात छोटीछोटी लालबुंद कौलारू छप्परं आणि त्यातून मधूनच डोकावणाऱ्या निसर्गाच्या ह्या रंगीबेरंगी टोप्या...

पांढऱ्या टोप्यांपेक्षा सरळ, सुंदर, आणि निर्मळ...

Monday 17 May 2010

औषधी नाळ...

मुंबईतल्या माणसांची नाळ, मुंबईशी कायमच जोडलेली असते असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
आमच्या घराखाली असलेल्या 'अशोक वडापाव'चे कमीतकमी वीस वडापाव तरी, तू परत कधी दुबईला येशील तेंव्हा घेऊन ये असे तिथल्या आमच्या मित्राने एकदा मला सांगितले.

हल्ली नवीन लागलेल्या शोधानुसार आईची नाळ ही त्या बाळाच्या आईवडिलांना शक्य असल्यास, जपून ठेवली जाते. त्या बाळाच्या पुढील आयुष्यात, दुर्दैवाने काही विकार जडलेच तर त्याला त्यातून बरे करण्यास, ती नाळ हे अतिशय उत्तम औषध ठरू शकते.

आपल्याला आपल्या जिवलग मुंबईपासून जर काही कारणामुळे दूर जावे लागलेच, तर मग ह्या मुंबईतल्या छोट्याछोट्या गोष्टी, ( अशोकचा वडापाव, पोलीस कँटीनचा खिमा, सिटीलाइटचे ओले बोंबील, बडे मियांची तंदुरी आणि असेच विविध प्रकार...) आईच्या नाळेचेच काम करीत असतात. मग तो जडलेला आजार हा 'होमसिक', 'गल्लीसिक', 'शाळासिक', 'मैदानसिक' किंवा अजून काहीही असू शकतो.

हे मात्र खरे की, त्या दिवशी अशोकचे ते वीस चमचमीत वडापाव, दुबई विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या माझ्या नवऱ्याच्या आणि त्त्याच्या मित्रांच्या हातात दिल्यावर, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मला त्या नाळेचीच आठवण करून गेला.

स्त्री

स्त्री नाजूक असते.
स्त्रीची सहनशक्ती अफाट असते.
दोन पूर्ण विरोधी विधाने.
मग नक्की स्त्री कशी असते?
हे आजतागायत कोणाला कळलंय?
नाही.

परंतु एक स्त्री म्हणून आमच्या फायद्याचे काय असते ह्यावर फक्त मी बोलू शकते.

माझा इतक्या वर्षांचा अनुभव सांगतो, की स्त्रीने नाजूक असलेलंच बरं.
का विचारताय?

ज्या स्त्रिया नाजूक असतात, किंवा आपण नाजूक आहोत असे दर्शवतात, त्यांच्या आजूबाजूची माणसे (इथे मला 'त्या त्या' स्त्रीचे 'ते ते' पतीदेव अपेक्षित आहेत) त्यांची काळजी घेताना दिसतात.
परंतु ह्याच्या उलट, ज्या स्त्रियांची सहनशक्ती अफाट असते, त्यांना त्यांची काळजी घेण्यासाठी हक्काची माणसे कमीच भेटतात. मग प्रश्न त्यांच्या तब्येतीचा असो वा त्यांच्या भावनिक गरजेचा असो. जेंव्हा त्या स्त्रीच्या तोंडून ' हे आता मला सहन होत नाहीये' असे उद्गार बाहेर पडतात, तेंव्हा बहुतेक वेळा त्यांच्या डोक्यावरून पाणी गेलेले असते!

इथे ह्या दोन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये बसणाऱ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या मैत्रिणींच्या, भावना दुखवायचा माझा कुठलाही हेतू नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.

Sunday 16 May 2010

शहरी डोंगर

जर तुमच्या डोळ्यांना पट्टी बांधून आमच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या छोट्याश्या घरी आणलं, आणि खिडकीपाशी बसवून जर ती डोळ्यांवरची पट्टी काढली, तर नक्की तुमचा पहिला प्रश्न, ' मै कहाँ हूँ," हाच असेल. कारण समोर दिसणारी गर्द हिरवी झाडी तुम्हांला विश्वास ठेवू देणार नाही की तुम्ही मुंबईच्या मध्यभागी, दादर मध्ये आहात. आणि त्यातून तो जर मे महिना असेल तर ती कोकिळेची आर्त हाक तुमच्या गोंधळात भरच घालेल. कुठूनतरी चिमण्यांची किलबिल ऐकू येईल, तर कावळ्याची कावकाव तर सदाचीच. त्या दाट झाडीतून मानेला ताण देत वर बघितलंत तर छोटे छोटे निळे तुकडे, वर असलेल्या आकाशाची जाणीव करून देतील...

मी बघितलंय, जेव्हा आपण शहरापासून दूरदूर जाऊ लागतो तेंव्हा वर पसरलेलं आकाश, कधी कधी अकस्मात येणाऱ्या डोंगरामागे नाहीसं होतं..तुकड्यांमध्ये दिसू लागतं. परंतु त्या डोंगराची स्वत:ची एक गंमत असते. स्वतःचे एक व्यक्तिमत्व असते. कधी त्याचा आकार एखाद्या हत्तीसारखा असतो तर कधी मान जिराफासारखी. त्यांचे रंग दिवसाच्या वेळांप्रमाणे बदलतात ती तर वेगळीच गंमत! कधी एखादा डोंगर हिरवागार असतो, तर कधी एखाद्या डोंगराला जांभळा रंग आवडतो..

हे माझं, खिडकीच्या लाकडी फ्रेममध्ये बरोब्बर बसलेलं, हिरव्या आणि निळ्या रंगामधील चित्रं मात्र नाहीसं होईल...उंच उंच कुरूप सिमेंटच्या डोंगराआड. वर्षभरात ते निळे तुकडे, नाहीसे होतील. परत कधीच न दिसण्यासाठी. फोटो काढून, कम्पुटरवर घेऊन ह्या चित्रांवर फोटोशॉप नाही करता येत.

आणि मग त्या सिमेंटच्या रुक्ष डोंगरावर कशाला माझ्या चिमण्या, कावळे, कोकीळ रहातील? दुबई मधल्या फक्त तपकिरी, करड्या आणि खुज्या डोंगरावर कधी नाही बघितली कोकिळा...न तिथे साधी चिमणी दिसली...

ह्या पुढचे उन्हाळे कुहूकुहू साद ऐकल्याशिवायच काढावे लागणार वाटतं...

Saturday 15 May 2010

ब्ला, ब्ला, ब्ला आणि ब्ला, ब्ला, ब्ला ब्ला!

त्या दिवशी ती मिटिंग दिवसभर चालू होती. दिवसभर कसली, दुपारच्या जेवणानंतर जी मिटिंग सुरु झाली होती ती सूर्यास्त कधीच होऊन गेला होता.. आणि आता दुसरा दिवस उजाडायची वेळ जवळच आलेली होती..जवळजवळ पंधराजण हजर होतो. विषय होता नवीन कामासंदर्भात. प्रत्येकजण बोलत होता. काहीजणांसाठी मुद्दा महत्वाचा होता तर काहीजणांचा प्रवास दुसऱ्या प्रदेशात कधीच सुरु झाला होता. वाटलं, आपण म्हणतो नं "पगार किती आणि बोलतोस किती?" त्या तत्त्वाने सगळं कसं बरोबरच होतं. पगार जास्त तसं बोलणं जास्त....आणि मी ..... कमी बोलत होते!! हा विचार मनात आला आणि मग त्या मिटींगमध्ये मला हसू आलं. माझ्या बाजूलाच बसलेल्या माझ्या ऑफिसमधल्या सहकारी मित्राला काहीही न सांगता माझ्या त्या अवेळी हसण्याचा अर्थ कळून गेला. आणि मग त्याच्याही कंटाळलेल्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

Friday 14 May 2010

एक कोडं...

चाफा जगतो झुबक्यात...
तर पारिजातकाचा शेवटच्या क्षणी कोसळताना पडतो सडाच...

मग माणूसच का असा....
जिवंत असताना आणि मरताना देखिल एकटाच ?

सिटीलाईट ते सायप्रस

मुंबईच्या किनाऱ्यावरच्या चिंबोऱ्या, सायप्रसच्या मातीत मिसळतील, असं त्या चिंबोऱ्यांना माझ्या ओट्यावर ठेवताना, मला वाटलं नव्हतं.
ते झालं असं.
"अगं, मस्त भरलेल्या दे हं," मी माझ्या कोळीण कम मैत्रिणीला सांगितलं.
" तुला कधी फसवलय का ग मी?"
तिने अगदी स्वतःच्या प्रामाणिकपणाचा माझ्याकडून हास्यरुपात दाखला घेतला. घरी पोचल्यावर त्या करड्या चिंबोऱ्या, मस्त केशरी होईस्तोवर भिंतीवरचं घड्याळ जास्तीच भरभर धावत होतं. त्या दिवशी दुबईचं विमान मला आणि माझ्या लेकीला पकडायचं होतं. त्या चिंबोर्यांसकट. तिथे नोकरी करत असलेल्या माझ्या मालवणी नवऱ्याला चिंबोऱ्या खायची तल्लफ आली होती.
सगळी कसरत करीत आम्ही दोघी आमच्या दुबईच्या घरी पोचलो, कालवणातला एकही थेंब न सांडवता, तेंव्हा त्या आळशी शहरात झोपाझोप झालेली होती.
सकाळ झाली, आम्हाला टाटाबायबाय करून नवरेबुवा हापिसला गेले. आणि आमची बॅग मी रिकामी करतेय न करतेय तेव्हढ्यात फोन करून त्याने आम्हांला सांगितले कि बॅगा भरा आपल्याला विमानतळावर जायचय. म्हटलं असं आमचं काय चुकलं की हा आम्हांला परत मुंबईला पोचवायला निघालाय? त्याच्या बोलण्यात एकच आधार होता तो म्हणजे माझेही कपडे भर असं साहेब म्हणाले!
आणि मग आम्हांला काही कळायच्या आत आम्ही सायप्रसच्या विमानतळावर होतो! हा तर जादूच्या गालिच्यावरचाच प्रवास होता!
आमच्यासाठी तिथे एक टुमदार घर त्याने तीन दिवसांसाठी भाड्याने घेतलं होतं.
हे होतं त्याचं सरप्राईज'! पण मीही काही कमी नाही! अगदी टिपिकल बायको सारख्या त्या सिटीलाईट मार्केट मधल्या चिंबोऱ्या मी सायप्रसच्या त्या ओट्यावर ठेवल्या! मग काय? त्यांची सगळी कवचकुंडलं तिथल्या कचराकुंडीत जायला फक्त अर्धा तास पुरला!

कोणाचं नशीब कोणाला कुठे घेऊन जाईल हे कधी सांगता आलंय?

Thursday 13 May 2010

वीण...

काल गप्पा मारता मारता एक छोटुशी घटना माझ्या लेकीने मला सांगितली आणि माझ्या मेहनतीचं फळ मिळाल्याची माझी भावना झाली.
आठ दहा दिवसांपूर्वी, तिच्या मित्रमैत्रिणीबरोबर ती बाहेर गेली होती. सूर्यास्त होऊन बराच वेळ झाला होता. काळोख पडला होता. ह्या पिढीला 'सातच्या आत घरात' हे वळण लावणे कठीणच! एका मित्राची गाडी घेऊन मंडळी लांब ड्राईव्हला निघाली होती. शेवटच्या मिनिटाला बेत ठरला होता आणि घरी परतायला सगळ्यांनाच उशीर होणार होता. मग आपापल्या घरी फोन करून आईवडिलांना, आपल्याला घरी परतायला उशीर का होणार आहे ह्याची कारणे देण्यात मुलांनी आपली कल्पकता दाखवायला सुरुवात केली.
माझ्या लेकीने देखील मला फोन केला. ती रात्री घरी परत आली आणि माझ्यासाठी घटना इथवर संपली.
परंतु त्यातली गंमत पुढेच होती. तिने मला काल सांगितले ते हे असे - आई, मी तुला त्या दिवशी फोन केला आणि उशीर होणार असल्याचं कळवलं. मग थोड्या वेळाने माझा एक मित्र मला म्हणाला,"आम्ही सगळ्यांनी आपापल्या घरी फोन केले पण फक्त तूच तुझ्या आईला खरंखरं सांगितलस नं ? आपण drive ला जात आहोत आणि म्हणून तुला घरी पोचायला उशीर होणार आहे, हे खरेच तू सांगितलेस..बाकी सगळ्यांनी तर थापाच मारल्या...ओरडा मिळू नये म्हणून." आई, त्याच्या ह्या बोलण्यावर मी फक्त हसले.
तिने मला हे सांगितले आणि आमच्या नात्यातली घट्ट वीण तिलाही कळल्याचे मला जाणवले. ती मला खरं आणि फक्त खरंच सांगू इच्छीते, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
ह्या माझ्या समाधानात तीही मनापासून सहभागी होती.
आणि दुसरं काय हवं?

Tuesday 11 May 2010

यादी

फार फार वर्षांपूर्वी ईजिप्त मध्ये, प्रवासाला निघण्याआधी सामानाची यादी करण्याची प्रथा होती हे मला कैरोत शिरल्याच्या दुसऱ्याच दिवशी कळलं!
त्या दिवशी आम्ही गेलो होतो ईजिप्तमधील सुप्रसिद्ध संग्रहालय बघायला.
तिथे पाऊल ठेवल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत आम्ही शेकडो, हजारो मम्या बघितल्या.
तुम्हांला वाटेल की प्राचीन काळी तिथे माणसे, माणसांची प्रेते गुंडाळत असतील. पण हा तुमचा समज साफ चुकीचा आहे. तिथे माणसांबरोबरच कुत्रा, मांजर, माकड, ससा, पोपट अश्या वेगवेगळ्या प्राणी आणि पक्ष्यांची प्रेते गुंडाळलेली आम्ही बघितली!
आपल्या संग्रहालयासारखी पेंढा भरलेली नव्हेत! तर ते सगळे प्राणी जिवंत असताना त्यांचा मालक किंवा मालकीण वारल्यामुळे आणि त्यांचे आपल्या प्राण्यांवर जीवापाड प्रेम असल्यामुळे त्यांना हे 'प्रेमिक मरण' देण्यात आले होते. रसायन लावून त्यांचे प्रेत त्यांच्या मालकाजवळ किंवा पायाशी ठेवण्यात आलेले होते. आणि आम्हांला अशीही माहिती दिली गेली की आपल्याबरोबर कोणाकोणाच्या मम्या केल्या जाव्यात ह्याची यादी, माणूस जिवंत असतानाच करून ठेवण्यात येत असे.
म्हणजे मी मेले की माझे पिऱ्यामिड कोठे बांधले जावे आणि माझ्याबरोबर विरंगुळ्यासाठी कोणकोणत्या प्राण्यांच्या आणि माणसांच्या मम्या बनवल्या जाव्यात ह्याची यादी मी आधीच करून देणे ईजिप्तमध्ये अपेक्षित होते.
आपण नाही का प्रवासाला निघण्यापूर्वी एक यादी करून ठेवत?
तसेच अनंतातील दूरच्या प्रवासाला निघण्याआधी आपण कायकाय आणि कोणाकोणाला बरोबर घेऊन जाणार आहोत ह्याची नीट यादीच करून ठेवली तर त्यात काय चुकले?

हे माझे विचार ऐकल्यावर माझ्या लेकीने माझ्या ह्या प्रकारच्या अंतिम यादीत, स्वतःचे नाव टाकायला सक्त मनाई करून माझ्यावर तिच्या असलेल्या किंवा नसलेल्या प्रेमाचा दाखला, मला तिथेच दिला ही गोष्ट वेगळी!

दार उघड बयो, दार उघड...

काही छोटी कवाडं..
काही मोठ्या खिडक्या..
काही फाटकं...
काही दारं...
एक एक बंद होतंय..
कधी थोडी फट उरलेय..
तर काही घट्ट बंद...
हवा खेळायला जागा नाही...
श्वास घ्यायला फट नाही..
घुसमट जाणवतेय...


मग म्हणतील रक्तवाहिनीत गाठी झाल्या...
म्हणून श्वास बंद झाला...

Monday 10 May 2010

शोध चांदण्यांचा ...

"ती, ती चांदणी आहे नं, ती आपली आजी आहे."
माझ्याहून दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या माझ्या मावसबहीणीने जेव्हा मला हे सांगितले तेव्हा वयाच्या सातव्या वर्षी ते खरेच वाटले. सातआठ दिवसांपूर्वीच आमच्या आजीचं निधन झालेलं होतं. आकाश काळंभोर होतं आणि मुंबईत देखील त्यावेळी रात्री आकाशात चांदण्याचा सडा पडलेला असे.
त्यानंतर माझा चंद्राशी संबंध आला तो थोड्याश्या भीतीतून.
गणेशचतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे बघशील तर तुझ्यावर चोरीचा आळ येईल असे जेंव्हा मला सांगण्यात आले तेंव्हा. तेंव्हादेखील बुद्धी बालच होती आणि सांगणारी बहिण मोठीच होती.
नंतर एकदम दिल्लीत मोठ्या मामेबहीणीबरोबर आकाशातल्या त्या अनोळखी जगात शिरायचो तेंव्हा. उन्हाळ्याची सुट्टी, मामाच्या घराची मोकळी गच्ची, खाट, दूर दूर असलेल्या ग्रह्ताऱ्याविषयी चित्रांसहित माहिती देणारा एक जाडजूड ग्रंथ आणि त्यांचा अभ्यास असलेली माझी मोठी मामेबहीण!
रोज रात्री आम्ही मुक्तपणे त्या तारांगणात फिरत असू.
त्यानंतर माझ्या छोट्या लेकीला घेऊन मी जेव्हा नेहरू तारांगणात जायचे तेव्हा फक्त तिथेच हा खजिना दिसायचा. मुंबईच्या आकाशातून तोपर्यंत तो नाहीसाच झालेला होता.
आजीला तिथे वर का होईना पण अस्तित्वात बघून मला खूपच आधार वाटला होता. आता मात्र वर पसरलेल्या रिकाम्या काळ्या विवरात; कोणाला शोधायचा प्रश्र्नच उरलेला नाही..
चांदण्या वाढल्या...पण ते आकाश नाही राहिलं...

Friday 7 May 2010

दफन या दहन?

" आप दफन करोगे या दहन."
दुबईतल्या पोलीस इन्स्पेक्टरने तिला विचारलं.
वेळ दुपारची होती. आणि तिथे तिची हिंदी भाषा कळणारे कोणीच नव्हते.
फक्त अरबी भाषा बोलणारा तो इन्स्पेक्टर तिला कळावं म्हणून मोडक्यातुडक्या हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करत होता.
"दहन," ती उत्तरली.
"आप हिंदू ऐसे कैसे कर सकते हो? अपने इतने करीब के लोगों को ऐसे जला कैसे दे सकते हो?"
"क्योंकी, हम विश्वास रख़ते है आत्मा पर. हमें मालुम है की हमारा शरीर जल के राख बनकर मिटटी में घुलमिल जायेगा. जहाँ से वो आया है वही पर वापस जायेगा. पर हमारा आत्मा अमर है. और उसे अब इस शरीर की जरुरत नहीं है. दुसरे जन्म में वोही आत्मा दूसरा शरीर ढूंढ़ लेगा...वो जन्म मनुष्य का हो...या किसी जानवर का.."
स्वतः ला शांत ठेवत, त्याला कळेल अशा साध्या हिंदी भाषेत जेव्हा हे गीतेचं सार तिने सांगितलं; त्यावेळी त्याने खांदे उडवून फक्त मान हलवली.
त्याच्या धर्माच्या आणि आकलनशक्तीच्या बाहेरचं काहीतरी त्याला न कळणाऱ्या भाषेत सांगण्याचा ती प्रयत्न करीत होती.
तिला अजिबात न समजणाऱ्या अरबी भाषेतील फॉर्मवर त्याने सही द्यावी म्हणून.
दोन तास बसवून तिच्या हातात सही केलेला पेपर देऊन सांगितले की त्याने त्यांना शवागारात जाण्याची परवानगी दिलेली आहे.
आधीच बधीर झालेलं मन घेऊन जेव्हा ती त्या शवागारात पोचली तेव्हा तेथील पांढरा झगा घातलेल्या ऑफिसरने तिने आणलेला पेपर बघून फक्त म्हटले," हां, तो दफ़न करोगे ना?"
"नहीं. दहन." ती जेमतेम बोलू शकली.
"पर इस पेपर पे तो दफ़न लिखा है!"
ती मटकन खाली बसून त्याला पुन्हा पटवून द्यायचा प्रयत्न करू लागली की नाही ती तिच्या नवऱ्याला दफन नाही..दहनच करणार आहे.

इसाप ह्यावर काय म्हणतो?

एका ठराविक वेळेला दोन चिमण्या आमच्या खिडकीत गोड चिवचिवाट करून माझं लक्ष रोज वेधून घेत असत. घटनाक्रम बघता आज मला वाटलं की मी आमच्या झाडांना पाणी घातलं की पानांवरून ओघळणारे थेंब प्यायला हे जोडपं येत असावं. म्हटलं चला ह्यांच्यासाठी देखील आपण वाडगा भरून पाणी ठेवावं. रातराणीच्या कुंडीत मी भांडं ठेवलं आणि पलंगावर बस्तान ठोकलं. वाटलं आता त्यांची ती पाणी पिण्याची मनमोहक धावपळ मला मनसोक्त बघायला मिळेल! आणि त्यांचा तो चिवचिवाट ऐकून मगच आपण घर सोडावं. नाहीतरी कितीही धावपळ केली तरी लेटमार्क चुकत नाहीच!
पण कसलं काय!
त्यांनी सरळ सरळ मी ठेवलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष केलं आणि थेंब थेंब पाणी टिपणंच चालू ठेवलं!

का त्यांनी विचार केला, आज आपल्यासाठी आयतं पाणी ठेवलं गेलंय, पण काय माहित उद्या असेल की नाही! मग उद्या काय? आपण आपल्या कष्टांवर भरवसा करावा की मोहात पडून फक्त एकाच दिवसाच्या सुखाचा विचार करावा? आणि आपल्या कष्टांच्या सवयीत खंड पाडावा ?

मला लहानपणी वाचलेली इसापनीती आठवली.
आणि ह्या गोष्टीचं तात्पर्य शोधत मी घर सोडलं.

Thursday 6 May 2010

ढवळाढवळ..

माझ्या गृहपाठाच्या वहीत बाई लाल शाईत करायच्या ती तेव्हा वाटायची ढवळाढवळ...
मला हवा तो फ्रॉक न घालू देता तिला आवडेल तेच पुढे करायची ती आईची ढवळाढवळ...
मी नको ते पुस्तक वाचतेय म्हणून हातातून ते खेचून घेतले गेले तेव्हा ती बाबांची ढवळाढवळ...
आणि मी कॉलेजमधून उशिरा घरी येते म्हणून ओरडायची, ती असायची आत्याची ढवळाढवळ...
नंतर नवरा लेक्चर द्यायचा तेव्हा तर वाटायचं माझं डोकं वरून उघडून मोठा डाव घेऊन तो करतोय माझ्या मेंदूत ढवळाढवळ...
आणि ऑफिसमध्ये नको तिथे नाक खुपसून द्यायलाच हवेत म्हणून इनपुट्स द्यायला लागले की ती असते इतरांची ढवळाढवळ...

खरं तर माझी स्वतःची एकच ढवळाढवळ असते जी मी रोज अगदी मन लावून करते..

अशी कुठची ढवळाढवळ म्हणून विचारताय?

रोज सकाळी मी माझा भला मोठा कॉफी मग घेते, त्यात कॉफी, साखर आणि गरम पाणी घालून जी काही मी जोरजोरात ढवळाढवळ करते नं, काय सांगू त्यातले सुख!
गुळगुळीत क्रीम तयार झालं कि त्यात गरमागरम दुध ओतावं आणि मग भाऊ, त्या 'ढवळाढवळ कॉफी' चा मस्तपैकी स्वाद घ्यावा!

मग कसं दिवसभरातली सगळ्यांची माझ्या आयुष्यातली ढवळाढवळ मी झेलू शकते!!

Wednesday 5 May 2010

पास की नापास?

बत्तीस वर्षांपूर्वी एक प्रश्र्नपत्रिका लिहायला घेतली.
पेपर नेहमीच एकट्याने सोडवायचा असतो...
मदतीला कोणीच नसते..
म्हणून मी लिहायला सुरुवात केली.
एक एक प्रश्र्न सोडवला.
काही प्रश्र्न सोप्पे होते.
काही कुटील.
काही उत्तरे साफ चुकली.
काही अचूक लिहिली.
घड्याळ पुढे सरकत होतं.
वॉर्निंग बेल मला ऐकू नाही आली.

तुला आली का ऐकू?

पण मग आता घाईघाईत वर्ग सोडून गेलाच आहेस तर
जरा त्या वर बसलेल्या परीक्षकाला विचार...
माझे टक्के किती?
तू मला दिलेली आणि त्याने मला दिलेली टक्केवारी जुळते का?

आणि तुझे विचारलेस की जरा मला प्रामाणिकपणे सांग..
अगदी त्याने तुला नापास केले असेल तर तेही सांग...
कारण मगच मला कळेल की मी तुझा पेपर बरोबरच तपासला होता!

विरोधाभास....

कोरा कॅनव्हास.
कोरा कागद.
कोरा अल्बम.
रिकामी कढई.
रिकामं कपाट.
रिकामी कुंडी.
रिकामा पेला.
रिकामा पलंग.

रिकामं घर.
घरात भरून राहिलेला शिळा वास.

माझे रिकामे हात.
आणि भरून आलेलं माझं मन..

Tuesday 4 May 2010

असा कसा हा...

झरा.
पळणारा.
धावणारा.
पसरणारा.
सरळ.
वेडावाकडा.
दगडावर आपटणारा.
लाल मातीत मिसळणारा.
सापाला घेऊन निसटणारा.
वाघाची तहान भागवणारा.
उंच झाडाला कवटाळणारा.
फुलावर हळुवार शिंतोडे उडवणारा.
उंचावरून कोसळणारा.

हसणारा.
खिदळणारा.
खवळणारा.
नाजूक नजाकतींचा.
निर्व्याज.
निष्पाप.

निसर्गाच्या रंगीबेरंगी दुनियेत
नेहेमी पांढरा शुभ्रच दिसणारा.

तुम्ही असा कधी माणूस बघितलाय?

वेचावे असे की त्यावर जगता यावे...

चिमणी दाणे टिपते तश्या...
मी तुझ्या आठवणी टिपाव्या.
आणि चिमणीला दाणे घालावे तश्या...
तू मला आठवणी द्याव्या.

हिरवे नृत्य

लाल सिग्नलला गाडी थांबवली आणि खिडकीतून बाहेर बघितलं तर गेला एक महिना गुलाबी दिसणारं पिंपळाचं झाड आता नाजूक पोपटी झालं होतं.
तेव्हढयात वाऱ्याची एक झुळूक आली आणि नेहेमीप्रमाणे पिंपळाने आपलं नृत्य सुरु केलं.
मला मात्र तिथे दिसू लागली मैदानात उभी असलेली छोटी छोटी मुलं. बाईंनी शिटी मारताच आपले चिमुकले हात हवेत उंचावून थरथरवायला सुरुवात करणारी चिमुकली मुलं.
दूरवरून बघितलं की त्या हातांची ती लयीतली थरथर मन मोहून टाकते.
मग कळला तो वारा आणि त्या पिंपळाचा सामुहिक नृत्याविष्कार.
पूर्णपणे एकमेकांच्या लयीला साथ देत.
त्याला दाद म्हणून मला तर हसू आलं.
खरं तर त्यांचा प्रेक्षकवर्ग अफाट होता.
पण वेळ कुणालाच नव्हता.
आपल्याला तर हिरवा सिग्नल जास्त मोहवून टाकतो; हिरवी पाने कमीच.

Monday 3 May 2010

सन स्क्रीन लोशन, गोरे आणि आम्ही

एक गंमत!
दुबईतला निळाशार समुद्र, मी,माझा नवरा आणि आमची ७/८ वर्षांची लेक.
एक वाजला होता. दुपार कशी मस्त सुस्तावली होती.
आजुबाजूला वेगवेगळ्या आकाराचे, वयाचे आणि देशांचे पुरुष व बायका दुबईचं ऊन उघड्या अंगावर मोठ्या आनंदाने घेत होते.
मस्तपैकी डेक घेऊन त्यावर आपणही आपल्या भारतीय अंगभर पोशाखात पहुडावं असा माझा विचार तर समुद्रात बाबाबरोबर डुंबावं असा आमच्या लेकीचा विचार.
नवऱ्याने एक डेक सावलीत टाकला आणि मी त्यावर टॉवेल पसरून त्यावर मालकी हक्क प्रस्थापित केला. आता राहिलं होतं आमच्या तिघांच्या अंगाला सन स्क्रीन लोशन चोपडण! मी पोतडीतून बाटली काढली आणि लेकीच्या अंगाला चोपडली. नंतर नंबर नवऱ्याचा. त्याच्या हातापायाला क्रीम लावताना माझ्या लक्षात आलं कि कोणीतरी आपल्याकडे बघतंय. आता ह्या परक्या देशात मी नवऱ्याच्या अंगाला दिवसाढवळ्या हात लावतेय म्हणून एव्हढ कोण माझ्याकडे बघतंय असं वाटून मी वळून बघितलं. तर एक बिकिनी घातलेली गोरी गोरी बाई, ब्रिटीशच असावी, माझ्याकडे टक लावून बघत होती. मी हळूच ह्या दोघांना म्हटलं," अरे, हे आजूबाजूचे गोरे आपल्याला म्हणत असतील, कश्याला बोडक्याच लावताय ते सन स्क्रीन? आता कुठे आणखी काळे होणार आहात तुम्ही?!"
मी सांगते तुम्हांला, तिची बोलकी नजर काहीही न बोलता मला हेच सांगत होती हो!
मी आपलं हळूच हसून ट्यूब बंद केली आणि पोतडीत टाकून दिली!
काहीही न बोलता!!
आणि खो खो हसणाऱ्या माझ्या दोन काळ्या माणसांना सांगितलं," जा! किती डुंबायचं तितकं डुंबा!"

point of focus

हे असं माझ्याच आयुष्यात का होतं?

हा आपल्याला नेहमीच पडणारा प्रश्र्न आहे. हो ना?

ह्यात तुलना आहे. बरोबर?
म्हणजे तिच्या किंवा त्याच्या आयुष्यात नेहमी चांगलंच होतं आणि माझ्या आयुष्यात मात्र नेहमीच वाईट होतं. तिला पटकन बढती मिळते, त्याला नेहमीच सगळं विनाकष्ट मिळतं किंवा तिला ट्रेन मध्ये बसायला नेहमीच चांगली जागा मिळते. मग जर तुलना करायचीच आहे तर मग जशी आपण चांगल्या गोष्टींबद्दल करतो तशी वाईट गोष्टींबाबत का नाही कधी करत? म्हणजे जर डोळे उघडे ठेवून स्वतःच्या नशिबाची तुलना दुसऱ्या माणसांबरोबर करायला घेतली तर काय दिसतं?
कधी एखादी बाई भेटते जिचा नवरा वयाच्या तिसाव्या वर्षीच अपघातात गेलेला असतो, नंतर कष्टांनी वाढवलेल्या दोन तरुण मुलांनी आत्महत्या केलेली असते आणि आता वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी तिला तिसऱ्या श्रेणीचा कर्करोग झालेला असतो. कधी कोणी भेटतं; जिला वयाच्या पाचव्या वर्षीच आई सोडून गेलेली असते. एखादं छोटंसं दोन वर्षाचं गोंडस बाळ भेटतं जे अंगावर जागोजागी लावलेल्या ट्यूब सहित; झालेल्या असाध्य रोगाबरोबर झगडत असतं.
हे सगळं; आपला तुलना करायचा स्वभाव कायम ठेवून फक्त point of focus बदलून बघितलं; कि मग सुरुवातीला पडलेला तो प्रश्र्न आपली शब्द रचना थोडी बदलतो...

हे असं ह्यांच्याच आयुष्यात का होतं?