नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 28 July 2013

मला सुचलेली, मी लिहिलेली जाहिरात…

सध्या मला सुचलेली, मी लिहिलेली जाहिरात टीव्हीवर दाखवली जात आहे. तुम्ही कदाचित बघितली देखील असेल. इथे टाकतेय म्हणजे तुम्हाला कळेल ना की हे माझं पिल्लू आहे !

आणि काय माहित तुम्ही टीव्ही बघता की नाही ?! कदाचित टीव्ही बघत असालही पण जाहिराती सुरु झाल्या की नेमके टीव्ही समोरून उठून जात असाल ! काही भरवसा नाही तुमचा !  :)
त्याही पुढे जाऊन…तुम्ही सगळे कुठे कुठे जगभर आहात ! म्हणजे आम्ही भारतात आमच्या टीव्हीवर जे बघत असतो ते काही तुम्ही बघत नाही !
 
गेल्या वर्षी तयार होऊन देखील ऑन एअर येईस्तोवर बरेच महिने गेले. शेवटी शेवटी तर ऑफिसमधल्या मित्रमैत्रिणींनी मला चिडवायला सुरवात केली होती…" ते तू 'नही नही' गाणं कशाला टाकलंस ? म्हणून तुझी फिल्म पण त्या 'नही नही झोन'मध्ये गेलीय !"
:) :)



Thursday 25 July 2013

ताईस,

ताई,
मी तुला ओळखते तेच मुळी मांच्या गावच्या घराशेजारी रहाणारी आणि मांची नेहेमीच काळजी घेणारी म्हणून.
मां…माझ्या गत नवऱ्याने जिला आईपेक्षा देखील वरचे स्थान दिले होते. त्याच्या कुमारवयापासूनच. गावी तू तिच्या उतारवयात, तिच्या सोबत होतीस म्हणून तुझी ओळख मला तुझ्याबद्दल ओलावा देऊन गेली होती. तूही मला शरदची बायको म्हणून ओळखतेस…वा ओळखत होतीस. कधीतरी तुझ्या हातची भाजीभाकरी खाल्ल्याचे देखील थोडेफार आठवते.

त्या दिवशी तुम्हा सगळ्या गावातल्या लोकांना अरुण गेल्याचं कळवण्यात आलं. आणि तुम्ही गावावरून पोचेस्तोवर पुढे काही होऊ शकत नाही हेही मला कोणी सांगितलं. भर पावसात माणगावावरून निघून आता तुम्ही किती वाजता डोंबिवलीला पोचाल ह्याबाबत वेगवेगळे अंदाज काढले गेले. ज्यावेळी तुमच्या गाड्या पनवेलला पोहोचल्या असं तुम्ही कळवलं त्यावेळी इस्पितळातून अरुणला घेऊन शववाहिका त्याच्या घराच्या दिशेने निघाली. गावोगावी पोचलेल्या मोबाईलच्या सुविधा.

त्याला घरी आणल्यावर त्याच्या कन्येने आणि बायकोने केलेला आक्रोश मी तुम्हाला काय सांगणार ? तो तर होणारच होता. मला त्याबद्दल बोलायचे देखील नाही. मला तू आणि गावावरून आलेल्या त्या कोणा माणसाने जे केलं त्याबद्दल मात्र बोलायचं आहे.

"हे करायलाच हवं. आता ती पुन्हा कधी नटणार नाही. हिरव्या बांगड्या घालणार नाही. तिला पुन्हा नटलेली बघायची ही बाईच्या नवऱ्याची इच्छा असते. हे करायलाच लागतं." तुम्ही येण्याअगोदर एक बाई हे सांगून गेल्या. अरुणच्या कन्येला. ती परोपरीने सगळ्यांना विनवण्या करत होती. "नका ना आईला असं काही करू. करायलाच हवं का हे सगळं ?"…
"तू तरी सांग ना सगळ्यांना." ती मला म्हणाली आणि मी बधिर झाले.
"Mau, this is beyond my capacity."

हे परक्या भाषेतलं वाक्य माझ्यासाठी परक्या अनघाच्या तोंडून निघालं.
आज हे वाक्य; माझ्या मृत्यूचा दरवाजा अजून थोडा उघडतं.
आज ते वाक्य; तीळतीळाने मला त्या दरवाजाकडे ढकलत रहातं.
आज ते वाक्य; मला शतकानुशतके मागे ढकलतं.
माझ्या छातीवर मणामणाचं ओझं ठेवत जातं.
वाटतं…
मी कधीच चितेवर चढले आहे…
माझ्या छातीवर कैक गोण्या ठेवल्या गेल्या आहेत.
रोज त्या माझ्याच अश्रूंनी भिजत जातात. अधिकाधिक भारी होतात.
माझी लाकडं आता कोरडी होणार तरी कधी ?
माझी चिता आता पेटणार तरी कशी…?

त्याच्या कृश तरुण बायकोच्या हाडांभोवती एक लुगडं गुंडाळलं गेलं.
ताई, तुम्ही येऊन जे करणार होतात त्याची ती पूर्व तयारी होती. कुठल्या चित्रपटाचे जर हे दृश्य असते तर त्याला गूढ संगीत दिले गेले असते. वेळ झाली. बाहेर पाऊस होता. काळोख माजला होता. काळोखाचे माझ्यावर फार उपकार झाले त्या रात्री. सूर्य माजला असता तर धर्म रखवालदारांचा माज भगभगीत दिसला असता. 
इमारतीसमोर अरुणला ठेवलं गेलं. काही वेळापूर्वी कोणी वर छप्पर घातलं होतं. गळक्या आभाळापासून आडोसा ?
की होऊ घातलेल्या चेटकी कारवायांना आडोसा ?
मला तेव्हा वाटले… 
आम्ही खोल काळोख्या उंदराच्या बिळात आहोत. आम्ही काळे करडे उंदीर आहोत. भयाण रात्र आहे. आम्ही माणुसकीत खोल खोल दात खुपसले आहेत. माणुसकी सगळ्याच उंदरांच्या तोडांतून ओघळते आहे. किळसवाणे. सगळेच. आमचे लालभडक डोळे सुखात लुकलुकत आहेत. बिळाबाहेर ओल आहे. बिळामध्ये ओल आहे.
आम्हा उंदरांच्या हृदयात मात्र कोरडे पाषाण ठासून भरले आहेत.
मी उभी होते. माझ्या बाजूला अरुणची बायको होती. हाताची हाडं पदर गळ्याभोवती घट्ट दाबून घेत होती. तू तिच्या पलीकडे उभी होतीस. आल्यापासून तू एक आक्रोश मांडला होतास. काळोख भेदत तो आवाज एक भयाण वातावरण निर्मिती करीत होता. वहिनी तुला सांगत होत्या…शांत रहायला. पण मला वाटतं त्या संपूर्ण काळनाटकाचे मुख्य पात्र तू होतीस. एकच गोष्ट तू पुन्हा पुन्हा करत होतीस. सुलभाच्या पदराआड झाकलेल्या मानेला तू हात घालत होतीस. का कोण जाणे मी तिला घट्ट मिठीत धरून ठेवलं होतं. तिचं दु:ख माझ्या ओळखीचं होतं. गेले सहा महिने जीव तोडून हेच ते दु:ख तिच्यापासून मी दूर बांधून ठेवलं होतं.

अचानक तुझ्याबरोबर गावावरून आलेला तो मध्यमवयीन माणूस कुठूनसा डोकावला. "खाली बस आणि आटपून घे ते !" तुझ्या कानात अधिकारवाणीने त्याने सांगितले. हो हो करत तू तिच्या गळ्याला हात लावलास. कोण जाणे का मी तिथून तिरमिरीत वर गेले. मी बधिर होते. माझी घुसमट झाली. मला आक्रोश करायचा होता. एकही आवाज न काढता मी बिछान्यावर बसून आक्रोश केला. असा आक्रोश जो धो धो वाहत्या ओढ्याला अकस्मात एखादा अजस्त्र दगड आडवा यावा आणि ओढा लुप्त व्हावा…तसा आक्रोश मी केला आणि तसाच तो छातीत ढकलून दिला. पुन्हा दाराशी आले. भिंतीला टेकून ठेवलेली छत्री उन्मळून पडल्यागत जमिनीवर पडली होती. तिला घेतले आणि तशीच खाली आले.

ताई,
तोपर्यंत तू दावा साधला होतास.
तिच्या गळ्याभोवती पदर अधिकच आवळला गेला होता.
हृदयाच्या घुसमटी पुढे शरीराच्या घुसमटीचं कुठे काय ?

लहानपणी माझ्या एका मैत्रिणीचे बाबा वारले. तिच्या आईने तिचे मंगळसूत्र कधीच उतरवले नाही. कदाचित त्या बळावर तिने आपल्या तीन मुलांना हिंमतीने वाढवले.
बाबा गेले त्यावेळी आईने तिच्या गळ्यातले मंगळसूत्र काढून माझ्या हातात ठेवले. म्हणाली कपाटात ठेवून दे. त्या मंगळसूत्राची झळ अजून मला माझ्या हातावर जाणवते.
माझ्या कपाटाच्या आत ठेवलेले माझे मंगळसूत्र माझ्या नजरेस अधूनमधून पडतं. हृदय जड होतं.
तुझं लग्न कधी झालं की नाही ? कधी हा प्रश्न मला पडला नव्हता त्यामुळे त्याचं उत्तर मला माहित नाही.
त्या दिवशी देखील तुझ्या गळ्याचा शोध मी घेतला नाही.
आता मला तुला एकदा तरी भेटायचं आहे. दुसऱ्या एखाद्या बाईच्या मनपाखरूचे तडफडणे; एखादी बाई धर्माच्या नावाखाली पचवू तरी कशी शकते हे मला जाणून घ्यायचे आहे.

त्या दिवशी मी दुसऱ्या खोलीत बसले होते. सगळ्या तरुण मुली होत्या तिथे. त्यांना प्रश्न पडले होते…नवरा गेला म्हणून बायको आता कधीच नटू शकणार नाही ? तिच्या हातातला हिरवा चुडा फोडायलाच हवा ? तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र दुसऱ्या कोणी खेचून 'वाढवायला'च हवं ? तिला मग सतीच देऊन टाका. ही माणसं सती देण्याआधीचे सर्व विधी करतात…फक्त तिला जाळत नाहीत ! कारण तो कायद्याने गुन्हा ठरवला आहे ! हा कुठला धर्म ? हा कुठला न्याय ?
दबक्या आवाजातील कुमारिकांचे ते प्रश्न होते.
खोलीत एक भीती दबा धरून बसली होती. भिंतीवरच्या पालीसारखी.
आणि मी ?
ताई, मी अधांतरी होते. 
बधिर.
आयुष्य थांबून गेल्यासारखी.
आतल्या खोलीत हक्काने मंगळसूत्र घालणाऱ्या बायका. 
काही माझ्यापेक्षा वयाने सान.
तर काही माझ्यापेक्षा थोर.
बाहेर गॅलेरीत तरुण कुमारिका.
मी ना इथली.
ना मी तिथली.
शतकानुशतके बायकांवर टाकल्या गेलेल्या ओझ्याखाली फुका मी घुसमटलेली.
माझा नवरा गेला तेव्हा देवाने माझी आणि माझ्या मुलीची काळजी घेतली. ती अशुभ घटना दुबईत घडली. नाहीतर मला खात्री आहे की ही तुझ्यासारखीच कोणी दुसरी धर्मरक्षक बाई माझ्याही समोर चेटकिणीगत उभी राहिली असती ! माझा तमाशा केला असता !

"तू तरी कर ना काहीतरी…"
ही मला करण्यात आलेली विनंती होती ?
ही एक खात्रीलायक हक्काची मागणी ?
मी नक्की काहीतरी करेन….तिच्या आई सोबत घडून येणारी दुर्दैवी घटना मी थांबवेन…
ही आशा…?
आणि मी काय केले ?

माझ्या पायात फुका मणामणाचे ओझे.
डोक्यावर धर्माचा फुकटचा खविस.
पुरुषांनी जन्माला घातलेला.
बायकांनी जोपासलेला.
ताई, आज मी एक मागणी घालणार आहे. तुझ्याकडे नाही. कारण पुरुषांनी केलेले नियम शिरसावंद्य मानून पाळणारी तू बाई आहेस. तुला दुसऱ्या बाईच्या मनाची तशीही पर्वा नाही.
ती बाई, नवरा मेला म्हणून स्वत:च्या नावापुढे लागलेले त्याचे नाव जाळून टाकणार नाही ! हे जग एखाद्या एकट्या बाईसाठी किती धोकादायक असू शकते हे मी तुला सांगायची आवश्यकता मला वाटत नाही. परंतु, त्या काळ्या मंगळसूत्राबरोबर त्या समाजात वावरताना…नवऱ्याच्या अस्तित्वाचे कवच नसताना…ते मंगळसूत्र कदाचित तिला एक संरक्षण देऊ शकेल…हा विचार तर तुम्हा कोणाच्या मनात देखील येत नाही…!

आज माझे आवाहन पुरुषांसाठीचेच आहे.

…ज्यांना गावकी आहे…ज्यांच्या आयुष्यात त्यांची गावची माणसे फार मोठे स्थान राखून आहेत…सोयर असो वा सुतक…ज्यांचे कुठलेही कार्य ह्या धर्मरक्षकांशिवाय पुढे सरकत नाही…ज्यांची ही माणसे स्वत:ला; माणुसकीपेक्षा धर्माचे रक्षक मानतात…ज्या ज्या पुरुषांना आपल्या बायकांविषयी थोडी तरी आपुलकी आहे… त्या प्रत्येक पुरुषाने आत्ताच एक काळजी घ्यावी…आपल्या त्या धर्मरक्षक आप्तस्वकीयांना सांगून ठेवावं…
"मी मेल्यावर माझ्या बायकोला सती देता येत नाही म्हणून तिच्या मनाला असे सती देऊ नका….! तिच्या गळ्यातले मंगळसूत्र, तिच्या हातातील हिरव्या बांगड्या… ह्यांचे नक्की काय करायचे ह्याचा विचार तिला आणि फक्त तिलाच करू द्या. तो निर्णय तिने कधी घ्यायचा हा निर्णय देखील तिचाच हवा…आणि ही माझी शेवटची इच्छा असेल ! माझ्या नावावर ही नसती बिलं फाडू नका ! ती नटलेली मला शेवटचे जे काही बघायचे असेल ते मी आणि ती जिवंतपणी बघून घेऊ ! मी मेलो म्हणून माझ्या बायकोवरची सगळी सत्ता तुमच्या हातात आल्यागत तिचे हृदय जाळून टाकू नका !"

अनघा