नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 26 April 2012

एका आजीची गोष्ट...

काही कामासाठी गुगल करता करता एक छोटुशी सुंदर फिल्म समोर आली. अनिमेशन फिल्म.

एका आजींना स्वर्गात गेलं तरीही, आपल्या माणसांच्या आठवणी तर छळतच रहातात...आणि मग त्यांच्या संपर्कात रहाण्यासाठी आजी सुंदर कल्पना लढवतात...

पुन्हापुन्हा बघत रहावी अशी ही एका आजीची गोष्ट...
अप्रतिम...

Thursday, 12 April 2012

आत्मचरित्र

मध्यंतरी जयवंत दळवी यांचे 'आत्मचरित्राऐवजी' हे पुस्तक वाचले. त्यामधील पहिल्याच लेखात ते म्हणतात..."असे म्हटले जाते की, प्रत्येक मनुष्य आपल्या नावावर किमान एक पुस्तक लिहू शकतो ! आणि ते म्हणजे त्याचे स्वत:चे आत्मचरित्र ! असे सर्रास म्हटले जाते. त्यामुळे असा समज होतो की आत्मचरित्र लिहिणे फार सोपे आहे आणि त्याच कल्पनेने बरेचसे लोक आत्मचरित्र लिहितातही ! स्वत:संबंधी जे जे आठवते ते लिहायचे अशी आत्मचरित्र लिहिण्यामागची त्यांची कल्पना असते. पण सरळ पृष्ठभागावर येणाऱ्या आठवणी म्हणजे खरेखुरे आत्मचरित्र नव्हे ! पृष्ठभागाखालचा भाग आत्मचरित्रात आणणे कठीण असते ! स्वत:चे बाह्यांग नव्हे, तर अंतरंग खरवडत जाणे ही कठीण गोष्ट आहे !"

परवा उमा कुलकर्णी यांचं 'केतकरवहिनी' वाचून झालं. मुंबईत मालाडला रहाणाऱ्या एका मुलीचे हे आत्मचरित्र. विवाह कोकणातील दुर्गम ठिकाणी झाल्यानंतरचे तिचे आयुष्य, संसारातील व समाजातील कायद्याच्या लढाया. हे सर्व वाचताना कळते ते एकच....मी अन्याय सहन करणार नाही व त्याविरुद्ध लढा देईन.' हे एकच तत्त्व उराशी बाळगून पानापानावर केतकरवहिनी घडत जातात. आणि आपल्याला देखील पुन्हा एकदा जाणीव करून देतात...'मी अन्याय सहन करणार नाही व त्याविरुद्ध लढा देईन.' हे तत्त्व आयुष्य जगण्यासाठीचे कारण बनू शकतं.

मात्र हा त्यांचा लढा वाचत असताना मला खोल खोल गर्तेत ढकलून देतात त्या बजूवहिनी. तीन परिच्छेदांत त्यांची कथा आपल्याला केतकरवहिनी सांगून जातात. परंतु, बजूवहिनींना मी आता माझ्या आयुष्यात विसरू शकणार नाही हे मला पक्के माहित आहे. रोज, दर क्षणाला कुठे ना कुठे तरी एका स्त्रीच्या आयुष्यात थैमान घातले जात असते...देशोदेशी. ह्या सत्यकथा अवाक करतात. मी पुस्तकातील ते पान जेव्हा वाचलं त्यावेळी अक्षरश: कोणीतरी ढकलून मला भिंतीपाशी न्यावं....श्वास घुसमटेस्तोवर दाबून धरावं...एकही खिडकी नसलेल्या काळोखी खोलीत बंद करावं...असंच वाटलं. आता मरेस्तोवर मी कधीही त्या खोलीतून बाहेर येऊ शकणार नाही...बजूवहिनींबरोबर मीही त्याच खोली त्यांचा हात हातात घट्ट धरून बसून राहीन...असंच काहीसं.

केतकरवहिनी सांगतात...'या बजूवहिनींशी माझे पहिल्यापासूनच जवळचे स्नेहसंबंध जुळले होते. त्या आमच्या लांबच्या नात्यातल्या सोवळ्या बाई होत्या. विनापाश बालविधवा म्हटल्यावर अडीनडीला त्यांना बोलावून घेण्यात येई. आईंशी (केतकरवहिनींच्या सासूबाई) त्यांच्या खूप गप्पा चालत.
त्यांना गाणी ऐकायला फार आवडे. माझ्याकडून त्या गाणी म्हणवून घेत. तशीच त्यांना गोष्टींची भारी आवड. मासिकामध्ये छापून आलेल्या कथा ऐकायला त्यांना फार आवडायचा. मीही दुपारी रिकाम्या वेळी वाचून दाखवत असे. त्या स्वभावाने इतक्या हळव्या होत्या की कथेतील एखादा भावनापूर्ण प्रसंग ऐकता-ऐकता त्यांचे डोळे पाण्यानं भरून जात. त्यांचा तो संवेदनाशील स्वभाव अनेकदा माझ्याही डोळ्यांत पाणी उभं करत असे.
त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगामुळे त्यांचा स्वभाव एव्हढा हळवा बनला होता.
त्या अगदी न कळत्या वयात असताना त्यांचा नवरा गेला होता. त्यांना त्याचा चेहराही आठवत नव्हता. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्यांना सोवळं करण्यात आलं. अशा सोवळ्या बालविधवांना त्या काळी घरच्याच माणसांकडून वाईट प्रकारे वापरलं जायचं.
बजूवहिनींच्या बाबतीतही हेच घडलं होतं. दिवस राहिले. पोट पाडण्यासाठी ठाऊक असलेले सगळे गावठी उपाय केले गेले. पण कशालाही दाद न देता तो चिवट गर्भ वाढत राहिला. असेच नऊ महिने भरले आणि कळा सुरू झाल्या.
गावातली सुईण आली. तिनं तिच्या पद्धतीने अट घातली,"हे कुणाचं पाप ? नाव सांगितलंस तरच सुटका करेन !"
कोंडीत सापडलेल्या बजूवहिनींना निरुपायाने सासऱ्यांचं नाव सांगावं लागलं.
सुईणीने सुटका केली. मुलगा झाला. रडलादेखील !
त्यानंतर अशा परिस्थितीत नेहेमी जे केलं जायचं, तेच केलं. बाळाला बाजल्याच्या खुराखाली ठेवून बाळंतीणीला बाजल्यावर बसायला सांगितलं!


बजूवहिनी. त्यांचं हे ३ परिच्छेदांतील चरित्र. केतकर वहिनीनी त्यांचा उल्लेख केला म्हणून माझ्यापर्यंत बजूवहिनी पोचल्या.

दळवी म्हणतात, "सरळ पृष्ठभागावर येणाऱ्या आठवणी म्हणजे खरेखुरे आत्मचरित्र नव्हे ! पृष्ठभागाखालचा भाग आत्मचरित्रात आणणे कठीण असते !"...आता लिहिता वाचता झालेल्या स्त्रिया, आत्मचरित्र लिहू लागल्या तर तो पृष्ठभागाखालचा भाग समाजाला झेपेल ?

स्त्रिया स्वत:चे अंतरंग खरवडत असता, पुरुषप्रधान समाजाचे बाह्यांग उघडे पडेल ते समाजाला झेपेल ?

Monday, 9 April 2012

धन्य ते भक्त ! धन्य तो देव !

मी देव मानते का ? देव आहे कुठेतरी आणि तो माझ्याकडे लक्ष ठेवून आहे अशी माझी समजूत वा श्रद्धा आहे. आयुष्यातून उठता उठता वाचल्याने त्याचे पुरावे देखील माझ्याकडे बरेच आहेत. फक्त देवाचे दिवस म्हणून उपवास बिपवास मी पाळत नाही. आणि त्याहीपुढे जाऊन त्याचे दिवस म्हणून त्यात्या दिवशी फक्त शाकाहार बिकाहार करणे असे मी आजतागायत कधीही केले नाही.

ही स्वत:बद्दलची माहिती जागतिक स्तरावर जाऊन देण्याइतके काय घडले ?

परवा घरी जाताजाता, रस्त्यात कानठळ्या बसणारा आवाज कानी आला. गाडीच्या बंद खिडकीतून अगदी आरपार. एक मिरवणूक चालली होती. प्रभादेवीच्या मुख्य रस्त्यावरून. मी गाडी पुढे काढली तर उजव्या हाताला काही माणसे, एक पालखी खांद्यावर धरून चालत होते. व त्यापुढे तरुण मंडळी नाचत होती. लाऊडस्पीकरवर आयटम सॉंग कर्कश वाजत होतं. तरुण तरुणी कंबर हलवत, छाती पुढे काढीत, एकमेकांच्या अंगाला अंग लढवत नृत्य करीत होते. ह्या गर्दीमुळे रस्त्यावरील कुठल्याही गाडीला वेग असा काही नव्हताच. मी खिडकीची काच खाली केली आणि एका चाळीशीच्या माणसाला शुक शुक केलं.
"अहो...ओ साहेब..."
साहेब खिडकीपाशी आले आणि थोडे खाली वाकले. "काय ?"
"पालखी चाललीय काय ?"
"हो हो....पालखी चाललीय..."
"कोणाची ?"
"साईबाबांची !" इतकं सुद्धा ह्या बाईला माहित असू नये ?
देवांच्या खास दिवसाबद्दलची माझी माहिती शून्य असल्याकारणाने माझे अज्ञान त्या गृहस्थांपुढे साफ उघडे पडले होते.
"हो काय ? छान छान. पण मग साईबाबांसाठी आयटमसॉंग ? त्यांना आवडतं काय ?"
हॅ
हॅ हॅ...करून दुर्दैवी साईबाबांचा तो भक्त  फिदीफिदी हसला. आणि मी पुढे गेले.

पापाचा घडा नक्की कधी भरतो ?
तो घडा नक्की असतो तरी किती मोठा ? त्याचा आवाका किती असतो ?
कलियुगात त्या घड्याला खाली मोठे छिद्र पडले आहे काय ?
त्यामुळे आता कधीही तो भरण्याची सुतराम शक्यता उरलेली नाही....
आणि त्यामुळे ह्या मूर्ख भक्तांच्या पापाचे घडे कधीही भरणार नाहीत.
आणि आमचे साईबाबा, गणपती आणि दुर्गा...हे असेच आयटम
सॉंगवर गल्लीगल्ली फिरत रहाणार !