नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 28 June 2012

टूर'की'...

पाळंमुळं आत खोलवर नेणं व खंबीर ताठ मानेनं उभं रहाणं सहजसाध्य नसतच. दिवसरात्र, ऊनपावसात नाजूक मुळांमध्ये शक्ती येईस्तोवर अख्खा पिंपळ कितीदा तरी गदागद झेलपाटत रहातो. मात्र त्या प्रत्येक वादळानंतर त्याची मुळं अधिकच भुईत खोल आत मार्ग काढत रहातात. आणि मग वारा किती का अकस्मात घुसावा, पिंपळ जमीन सोडत नाही. आपली शक्तीस्थानं, आपली खंबीर मुळं कधी आकाशाकडे उघडी पाडत नाही. ज्यावेळी तो कोलमडून पडलेला दिसून येतो, त्यावेळी तो स्वेच्छेने मृत्यूला आधीन झालेला असतो. कारण जीवनाचे गणित तर बरोबरच व्हावयास हवे. कोणी अनंतात विलीन व्हावे तेव्हाच कोणी पहिला टाहो फोडावा.
काय पिंपळ थकत नसेल ? येणाऱ्या वाऱ्याला आपले एकेक पान आदराने त्यानेच वहावे. सतत सतर्क राहून.

हे असेच काहीसे मला वाटत होते. म्हणजे मी कोणी थोर नव्हे. मी पिंपळ नव्हे. परंतु, मेहेनत फार झाली होती. जीवाचा फार आटापिटा झाला होता. लेकीचे शिक्षण सध्या तरी झाले आहे असे ती म्हणाली होती. "आई, आता आधी नोकरी आणि नंतर पी.एच.डी."
ऑफिसात अहोरात्र कष्ट झाले होते त्यामुळे सुट्टी मिळणे फारसे कठीण दिसत नव्हते. "चल तर मग...आपण कुठेतरी फिरायला जाऊ." मी लेकीला म्हटले.
"चालेल. पण मग लगेच जाऊन यायला हवं. मला नोकरी शोधायचीय. आणि ती मिळाली की मग तर नाहीच जाता यायचं लगेच."
म्हणजे अगदी पुढल्या दहा दिवसांत ठरवायला हवं आणि तयारी देखील व्हायला हवी.
पहिला संपर्क 'थॉमस कुक'. म्हटलं बघू तरी इतक्या कमी वेळात कुठे जाता येईल आणि नक्की किती खर्च होईल. एक अंदाज काढणे गरजेचेच. मी जे काही तिथे सांगितले त्याप्रमाणे संध्याकाळपर्यंत मला मेल आले. २/३ जागा शक्य होत्या. मॉरीशस, केनया, ग्रीस...
"नाही गं आई...! मला काही प्राणीबिणी बघायचे नाहीयेत !" केनया बाद !
"मॉरीशस ? ह्म्मम्म्म्म...I don't know Mama !" आईबरोबर नाही वाटतं जात कोणी मॉरीशसला ! बाद.
"ग्रीस नको गं आई ! काहीतरी वेगळंच करुया आपण !"
"प्राग, टर्की ?"
"Ya..that would be nice !"

सकाळी पुन्हा थॉमस कुक. ग्रीस दहा दिवसांत कठीण आहे. केनया आणि मॉरीशस शक्य आहे. कारण तिथे 'विझा ऑन अरायव्हल' आहे. मग म्हटलं "ठीक आहे. मला एकूण खर्च आणि कार्यक्रम पाठवून तर द्या. बघते मी. ग्रीस, केनया आणि मॉरीशसचा पाठवा. टर्की आहे का शक्य?"
"पुढल्या दहा दिवसांत कठीण आहे. आणि आमच्या ग्रुप ट्रिप्स निघतायत त्या अगदी लगेच आहेत. पण तोपर्यंत तुमचा दोघींचा विझा वगैरे नाही येणार."
संध्याकाळी लेकीच्या कानावर हे घातलं.
"पण आई, आपण कशाला त्यांच्या ग्रुप बरोबर जायचं ? आपण दोघीच जाऊया ना ! चीन नाही का केलं आपण दोघी दोघींनी ? तस्संच !"
"नक्की टर्कीच करायचं ना गं ?" पुन्हा एकदा विचारून घेतलं.
"हो हो!" मान जोरात डूलली.
पुन्हा थॉमस कुक. "Is Turkey safe ?"
"Ya ! Ofcourse !"
दुसरा दिवस. ऑफिसच्या ट्रॅव्हल डेस्कला फोन लावला. विझा ? चार दिवसांत मिळेल विझा. एक यादी...जरुरी कागदपत्रांची. घराचा पत्ता, त्याचा पुरावा...फोन बिल, सोसायटी बिल इत्यादी इत्यादी...पासपोर्ट, ३ वर्षांचे इन्कम टॅक्स कागद, ऑफिसकडून सुट्टी मंजुरी पत्र. बॉसची केबिन गाठली. मेहेनत फळाला आली. हसतमुखाने परवानगी मिळाली ! तातडीने टेबल गाठलं. मॅकवरून ऑफिसचं मेल उघडलं. सुट्टीचा अर्ज सोडला.
संध्याकाळी थॉमस कुकच्या टर्की कार्यक्रमाचे प्रिंट आउट घेऊनच घरी परतले. म्हटलं एक रेफरन्स पॉइंट असावा समोर. नाहीतर कळणार कसं...कायकाय बघायला आहे ते टर्कीत ?! सहा रात्री आणि सात दिवस. इस्तान्बुल, अंकारा, कपाडोकीया, कुसादासी, इझमीर...वगैरे वगैरे.
"हे काही खरं नाही. फारच आहे ! चल आपण आधी नकाशा बघुया. आणि मग 'लोनली प्लानेट' काय म्हणतंय ते बघुया."
पृथ्वीवर टर्की मध्येच चपखल बसलेला आढळला. कंठमणी जसा. एका बाजूला भूमध्यसमुद्र तर दुसरा किनारा 'काळ्या समुद्राचा.' एशिया आणि युरोप दोन्ही शेजारी. हे म्हणजे एकदम आमच्या सोसायटीसारखी वसाहत. मिश्र. मराठी, गुजराती, पारशी...!
"वर्धनशी बोलतेस का जरा ? त्याला पण विचारून बघ न कायकाय करायला हवंय ते!" वर्धन, माझा भाचा. 'लोनली प्लानेट' मासिकाचा संपादक. लेकीचं वर्धनशी बोलणं झाल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याच्याकडून टर्कीवर माहितीपूर्ण पीडीएफ फाईल मेलवर दाखल झाली. पुन्हा प्रिंट आउट्स. संध्याकाळी दोघी बसलो त्यात डोकं घालून. समोर जाल सुरू. लोनली प्लानेट, गुगल मॅप, बुकिंग डॉट कॉम, एक्स्पेडिया...
क्रमश:
(पृथ्वीचा नकाशा जालावरून साभार) 

18 comments:

Nandan said...

प्रवासासाठी शुभेच्छा! मीही गेल्याच महिन्यात साधारण याच मार्गाने तुर्कस्थानचा प्रवास केला. एकदातरी नक्कीच भेट द्यावी असा देश आहे. शक्य असल्यास ट्रॉयलाही तुम्हांला जाता आल्यास पहा.

Anonymous said...

Anagha Tai,

Mukt vha, vyakta vha. Bharbharun jaga he kshan.

Pravasachya shubhechha!!! :)

Shradha

BinaryBandya™ said...

फोटो तर बघितलेच आता सुंदर वर्णन येउद्या. वाट पाहतोय ..

rajiv said...

" पिंपळ जमीन सोडत नाही. आपली शक्तीस्थानं, आपली खंबीर मुळं कधी आकाशाकडे उघडी पाडत नाही" - नेमके व संक्षिप्त 'सार' !!

आता मात्र उत्कंठा वाढतीय ....की प्रत्यक्ष प्रवासाला कधी सुरवात करायची आम्ही तुमच्याबरोबर.... की-बोर्ड,कम्प्युटर, जालाच्या व विजेच्या बिलाचा भरणा ..इ. सर्व गोष्टी जय्यत तयार करून ठेवल्या आहेत

अनघा said...

प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!!! मीना प्रभूंचं पुस्तक ही उपयोगी पडेल "तुर्कनामा".

Anagha said...

नंदन, तुर्कस्थान हा असा एका ट्रीपमध्ये होणारा देश नाही आहे...हो ना ? प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद. :) :)

Anagha said...

श्रद्धा, आभार ! :) :)

Anagha said...

बंड्या, लिहितेय लिहितेय... :)

Anagha said...

राजीव, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)

Anagha said...

अनघा, :) स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार. :)

Shriraj said...

तुर्की वृत्तांत का?! छान आहे. पुढचा भाग वाचायला घेतो.

रोहन... said...

मी तुझी टुर-की वाचायला सुरुवात केली आहे. पण तु सिक्किम वाचते आहेस ना? ;)

Pankaj - भटकंती Unlimited said...

आम्ही माणगाव, पारगाव च्या पुढे कधी गेलो नाही आणि तुमचं मस्तंय, मॉरिशस, प्राग.
शिवाय इथंही मॅकचं तुणतुणं वाजलं :-P

Anagha said...

पंकज, अरे तुणतुणं कसलं बोडक्याचं वाजवतेय मी ! मॅकने चांगलाच दगा दिलेला आहे मला ! माझी दोन वर्षांची कामं आणि फोटो नाहीसे केलेले आहेत ! :( :(
पण मग सारखं संगणक नाहीतर कम्प्युटर म्हणू का ??? तुझ्या पीसीला पीसीच म्हटलं असतंस ना ?? की दुसरं काही ? लाडाने रे ! :) :) :)

Anagha said...

श्रीराज, एक दिवस लागतोय बाबा एक भाग लिहायला ! माझ्या नेहेमीच्या साच्याच्या बाहेरचेच आहे हे ! :)

Anagha said...

रोहणा, सिक्कीम लिहा की राव पटापट ! :p :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

आयला दोन वर्षाचे काय, दोन तासांचे जरी फोटो उडाले तर मी जागचा उडेन.
तसं मी माझ्या पीसीला टोपणनाव दिलंय. कॅमेरा आणि गाड्यांनाही अशीच नावं आहेत.

सौरभ said...

:D :D चलोऽऽऽऽ