'ट्रॅवल अँड लिविंग' वरची नायजेला. आणि टीव्ही समोर भारावून बसलेली माझी मोठ्या मोठ्या डोळ्यांची लेक. ही अतिशय सुंदर दिसणारी, सुंदर केसांची बाई कापत काय होती तर कोंबडी आणि चिरत काय होती तर कांदा! त्यात एव्हढं भारावून बघण्यासारखं काय होतं?!
दुसऱ्या दिवशी....
"अगं, इथे ये. स्टूल घेऊन बस. मी मासे करतेय. जरा बघ मी कसे करते ते!"
"आई!"
" का? अगं, मी पण छानच करते ना स्वयंपाक?"
"हो....पण!"
"अरे! हवं तर मी पण करते न तश्याच हालचाली! माझे केस काही लांब नाहीयेत.. पण मान वेळावून वेळावून तुला दाखवते ना कसे मासे कापायचे, कसे साफ करायचे ते!"
"बरं ग बाई! ओरडू नकोस!"
बाईसाहेब स्टूल घेऊन बसल्या.
नायजेलाचा शो अर्ध्या तासाचा असतो. माझा लांबला. कष्टांनी जमवलेला एकुलता एक प्रेक्षक, शो अर्धवट ठेऊन उठून गेला.
जेवण झाल्यावर...
"अगं, नायजेलाचा शो बघून तुला जेवण करावसं वाटतं आणि माझा शो बघून तशी तुला स्फूर्ती का मिळत नाही?"
"आई, मी नाहीतरी लग्न झाल्यावर दर रविवारी जेवायला तुझ्याचकडे येणार नं?"
घ्या! आता ही माझ्या स्वयंपाकातील नैपुण्याची तारीफ होती की माझा 'फूड शो' फ्लॉप झाला होता?!
Friday 30 July 2010
ती
'गोरी' शब्दाला 'पान' शब्द नाही जोडला तर राहिलेला रंग तिचा असं म्हणता येईल.
नैसर्गिकरीत्या सुंदर केस... जेंव्हा इतर मुली मेथी वाटून लाव नाहीतर अंड्याचा बलक फासत असायच्या तेंव्हा हिचे मोकळे केस हवेवर वहात असायचे. मुंबईतील वाडीत रहायची. झोपडपट्टीत रहाणे आणि वाडीत रहाणे, जमीनअस्मानी फरक. तीन भावांची एकुलती एक लाडकी बहिण. जन्मल्यानंतर काही वर्षांतच ज्या दम्याने हात पकडला तो आजतागायत नाही सुटला. शाळेत जायची. अभ्यासाची गोडी नव्हती आणि आईबाबा लहानपणीच गेले. भावांबरोबर बहिणीचेही शिक्षण संपले.
आजूबाजूच्या इमारतींमध्ये ती घरकामाला लागली. तिथे देखील मने जिंकली. ती घरचीच झाली. सगळ्यांच घरांमध्ये नाही रुळली. लाडावल्यांना जेव्हढं शक्य असतं तेव्हढी ही रुळली. तिला कधीही कुठलेही काम सांगावे नाही लागले. स्वतःच्या घरात आपण साफसफाई करतो, लहानांच्या खाण्यापिण्याची चिंता करतो. कोणी न सांगता हे करतोच. तिनेही सगळयाच घरात केले.
प्रेमात पडली ती नेमकी दारू मुबलक पिणाऱ्या माणसाच्या. लग्न झालं. मग अधूनमधून गल्लीत वेगवेगळ्या जागी, वेगवेगळ्या वेळी गालावरून ओघळणारे अश्रू पुसताना दिसली. आणि रात्री जेंव्हा जग गुडूप व्हायच्या मार्गावर असायचं तेंव्हा जवळच्या समुद्राच्या दिशेने नवऱ्याबरोबर खुशीत चालताना देखील दिसली. तिच्या पुढेमागे भावांची देखील लग्न झाली आणि आपापल्या नवऱ्यांबरोबर वहिन्या देखील हिच्यावर प्रेम करू लागल्या.
पुढच्या कालावधीत सहा वेळा गरोदर राहून देखील अर्धवट महिन्यांमध्ये जसं काही कोणी कंस येऊन तिच्या सहा बाळांना अवकाशात भिरकावून दिले. सातव्यांदा गरोदर राहिल्यावर प्रथितयश डॉक्टरांच्या मदतीने त्या बाळाने दिवस बघितला. बापाचे सुख मुलाला सहा वर्ष लाभले. नवऱ्याशिवाय पुढचे आयुष्य सुरु झाले. तोपर्यंत भाचरं जन्माला आलीच होती. आत्यावर प्रेम करायला ती देखील शिकली.
वाडीतील वाईट मुलांच्या संगतीपासून मुलाला वाचवणे आणि धुणीभांडी, केरलादी करून जेव्हढे जमतील तेव्हढे पैसे गाठीशी लावणे असा दिनक्रम चालू होता.
एक दिवस पोट खूप दुखतंय म्हणून सरकारी इस्पितळात तिला भरती केलं गेलं. कोपऱ्यात बिछान्यात ३/४ दिवस पडून होती.
"तुझी दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली आहेत." कोणा नर्सने सांगितलं.
"मग काय करायचं?"
"आठवड्यातील ३ दिवस डायलिसिस करून घ्यावे लागेल. नाहीतर भाऊ किंवा बहिण मूत्रपिंड देऊ शकत असतील तर..."
भावांना, वहिनींना बोलावणे गेले. भाऊ येऊन भेटून गेले. बायकांनी नकार दिला म्हणून भावांनी नकार दिला.
ह्या गोष्टीचा शेवट त्याने काय लिहिला आहे... माहित नाही...
तो काही गोष्टी का जन्माला घालतो... माहित नाही...
काही गोष्टी तो करुण का करतो... माहित नाही.
तेंव्हा ही गोष्ट अशीच अधुरी...

Thursday 29 July 2010
बाहुल्या
कार्यालयाच्या अत्याधुनिक परिसरात शिरलं की सभोवताली बाहुल्या दिसू लागतात. त्या जगाला ना चेहरा. ना रंग. तेथील इमारत आजुबाजूच्या हालचालींबद्दल बेदरकार. तिथल्या मेणाच्या बाहुल्या स्वतःभोवती अभेद्य वलय घेऊन वावरणाऱ्या. Hi , hellooo म्हणतील. मिठ्या मारतील...वलयाला सुईएव्हढं देखिल छिद्र पडणार नाही.
ह्या अश्या वेगळ्या कॉर्पोरेट विश्वातील, निळ्या गणवेषातील बाहुल्या. पुरुष बाहुल्या. असंख्य बाहुल्या. दिसतात कचरा काढताना. एखादी लहानशी फरशी आणि त्यावरचे कोणाचे लाल ओंगळवाणे नक्षीकाम पुसताना.
इथला दिवस एखाद्या अनोळखी ग्रहावरच्या अनोळखी वेगाने फिरतो.
इथे swipe कार्डाला ओळखतात. प्रत्येकाला एक कार्ड. गाडीला वेगळं कार्ड.
गाडी तळघरात लावायची असेल तर ओळखपत्र दाखवा. वेस उघडण्यात येईल.
स्वागताला एक निळी बाहुली. नावगाव नसलेली.
आज अश्याच एका निळ्या बाहुलीशी नजरभेट झाली.
मी हसले.
बाहुली चमकली.
तिच्या हालचाली बदलल्या.
रोज तिच्या समोर गाड्या येतात. गाड्यांत बसून मेणाच्या बाहुल्या येतात. आज तिच्या विश्वातील बाहुल्यांचं जग हललं.
असंख्यातील एक मेणाची बाहुली हसली.
समोरचा माणूस आहे हे त्या एका नजरानजरेतून कळलं.
तळघराकडे जाणारं रोजचं काळोखं बोळ, आज थोडं उजळलं.

दोहड
इंदुरी गोधडी.
मऊ, मांजरीसारखी.
उबदार, बाबांसारखी.
उलटी घ्या. सुलटी घ्या.
ती उब नाही जायची.
जेव्हा कधी...
आसमंतात थंडी असेल.
गर्दीत उब नसेल...
असं का कोणी नाही...
ज्याची उब नाही जायची...
अगं,
पेटारा उघड.
आठवणींची दोहड उलगड.
उष्ण अश्रूंची लड ओघळून जाईल.
बघ,
ती दोहड सावरून घेईल.
मऊ, मांजरीसारखी.
उबदार, बाबांसारखी.
उलटी घ्या. सुलटी घ्या.
ती उब नाही जायची.
जेव्हा कधी...
आसमंतात थंडी असेल.
गर्दीत उब नसेल...
असं का कोणी नाही...
ज्याची उब नाही जायची...
अगं,
पेटारा उघड.
आठवणींची दोहड उलगड.
उष्ण अश्रूंची लड ओघळून जाईल.
बघ,
ती दोहड सावरून घेईल.
Wednesday 28 July 2010
ध्वनिप्रदुषण
गल्लीतील ध्वनिप्रदुषणाविरुद्ध बाबा, तुम्ही आवाज उठवलात.
त्या आवाजाने तुम्हांला त्रास व्हायचा.
तुमचे वाचन आणि लिखाण तुम्हांला नाही करता यायचे.
आज त्याची आठवण झाली.
मी माझ्या गाडीत आज जाणूनबुजून ध्वनिप्रदुषण करून घेतलं.
रेडिओ लावला.
प्रचंड मोठ्या आवाजात.
मला माझा मेंदू काम करायला नको होता.
मी त्याला एका अश्या खोलीत बंद केलं जिथे तो बधीर होईल.
चालता देखील नाही येणार त्याला.
आज मी त्याला अपंग केलं.
ध्वनिप्रदुषणाला आज मी पाठिंबा दिला.

Tuesday 27 July 2010
सखे,
सोनारा, शून्य नंबरी काळे मणी...
मधोमध सोन्याची वाटी, त्यात लाल माणिक...
दोन अलीकडे, दोन पलीकडे... इवलाले मोती...
गळ्याशीच चपखल बसायला हवं...
रोज मला मिरवायला हवं.
वापरलं मिरवलं.
पण...
सोंडवाल्याने मला नाही सांगितलं.
त्याने त्याचं गणित बदललं.
वर्षभरात त्याने ते कडीकुलुपात नेलं.
जाऊ दे...
नाहीतरी डिझाईन जुनंच झालेलं...
आता मात्र सख्यांनो,
मला नका विचारू,
नवीन डिझाईनचं नाव नका काढू.
ते जे काळं मंगळसूत्र असतं...
ते कसंही खुलूनंच दिसतं...
त्याच्याशिवाय गं, ओकबोकं वाटतं.

सवय
"लागली सवय?
लवकर लागली म्हणायची!
मग ती सवय, वाईटच असणार.
कारण वाईट सवयच लवकर लागते म्हणतात."
"हो.
तुझी सवय लागली.
तुझ्याशी गप्पा मारायची सवय लागली.
तुझी वाट बघायची सवय लागली."
"सांगितलं नं!
सवय लागणेच वाईट.
आणि वाईट सवयच लवकर लागते म्हणतात!"
"ठीक आहे.
मोडेन मी ही सवय.
व्यसनांच्या आहारी जाण्याची माझी सवय तर नाहीच आहे.
आणि जगण्याचा आव आणण्याची तर माझी पक्की सवय आहे!"

Monday 26 July 2010
सोनचाफा
"ताई, तुमच्यामुळे सगळं आयुष्य सांभाळू शकलो मी. मुलगी शिकली. इंजिनियर झाली. नोकरीला लागली. आता काही चिंता नाही. आम्ही दोघं कधी जेवलो, कधी उपाशीपोटी झोपलो. पण सगळ्याचं मुलीने चीज केलं. आता आम्ही रोज जेवतो. कधी गोडधोड करून खातो. हे सगळं तुमच्यामुळेच झालं ताई."
फुटपाथावर बसणारा, एका डोळ्याने अधू असलेला फुलवाला. माझ्या मैत्रिणीचे आभार मानत होता. बोलता बोलता मोगऱ्याचा गजरा तयार झाला. सोनचाफ्याच्या पुड्या बांधल्या गेल्या. दहा रुपयांना तीन फुले. आम्ही तीन पुड्या घेतल्या. त्याचे तीस रुपये आणि गजऱ्याचे मला वाटतं पाच रुपये.
"केव्हढी आहे तुमची मुलगी काका?" मी विचारलं.
"चोवीस असेल ताई."
अर्थशास्त्र मला कळत नाही पण, अंदाजे त्यांची मुलगी जेंव्हा शाळेत शिकत असेल त्यावेळी चाफ्याचा भाव पाच रुपयांना तीन असावा.
चाफ्याची तीन फुले...
एका घरात सुवासिक संध्याकाळ.
आणि दुसऱ्या घरात चवीला खीर.
फुलं, मौनातून मौलिक कामे साधतात.

Sunday 25 July 2010
चल सवंगड्या...
बाहेर सज्ज्यात उभं राहावं. आकाशाकडे बघावं. चारी दिशांकडे नजर टाकावी.
कशी आहे हवा? वारा बागडतोय नाही का? मग द्या ते हातातलं, कागदी पॅराशुट सोडून.
मात्र सोडून देताना त्यावर आपले डोळे बसवायला विसरू नका!
बघा, निघाले ते तरंगत.
नेहेमी सज्ज्यात उभं राहून तेचतेच चित्र बघायचं. तोच तो रस्ता. तीच ती गल्ली. तीच झाडं आणि तीच ती माणसं.
त्यापेक्षा हे झकास!
पॅराशुटवर बसावं. तरंगत निघावं.
सांभाळा! ती नारळाची झावळी! जवळ न जाणे उत्तम. उगाच आपले पॅराशुट अडकायचे... मग गच्छंतीच म्हणायची.
किती हलकं वाटतंय नाही का?
झुळूक आली? फिरलं पॅराशुट? बदलली दिशा? तरंगत तरंगत गेलं बघा अजून वर.
कुठे जायचं... माहित नाही. कधी पोचायचं ठरवलं नाही...
दूरदूर देशी. पऱ्यांच्या राजवाड्यात. राक्षसांच्या साम्राज्यात.
उन्हाळ्याच्या सुट्टीत वह्यांच्या पानांची अशी पॅराशुटं बनवावी. आणि मग त्या पॅराशुटवर बसून कल्पनेची विमाने उंच उंच उडवावी! आकाशात मनसोक्त विहार करावा. उडणाऱ्या पाखरांच्या नजरेतून खाली बघावं. तर कधी ढगांवर विराजमान व्हावं.
कशी बनवायची ही पॅराशुटं विचारताय?
शाळेच्या वहीचा कागद फाडावा. वही गेल्या वर्षीचीच घ्या. नाहीतर ओरडा खाल! नेहेमीच तो कागद आयताकृती असतो. त्याला चौरस बनवा. त्याच्या चारी टोकांना चार भोके पाडा. पांढऱ्या सुतळीचे चार समान लांबीचे तुकडे घ्या. चारी भोकातून ते दोर ओवून ते कागदाच्या मागे एकत्र आणा. शीतपेयाचं एखादं झाकण घ्या. रस्त्यांवर ही झाकणं, मुबलक पडलेली मिळतात! त्याला मधोमध भोक पाडून त्यातून हे चारी दोरे ओवून घट्ट गाठ मारून टाका. आणि... आणि आता वर गच्चीवर जा आणि द्या सोडून! नाचऱ्या वाऱ्याच्या संगतीला. हवेत तरंगणाऱ्या पानांच्या सोबतीला. बघा तरंगतं की नाही आपलं पॅराशुट!
वारा आपल्या ताब्यात नाही...आणि कल्पनांचे वारू आपण ताब्यात ठेवायचे नाही!

Saturday 24 July 2010
Flashback...
भाजी शिजायला पातेल्यात पाणी टाकलं आणि पेल्यातील उरलेलं पाणी मोरीत फेकून दिलं.
ओट्याला लागून असलेल्या आधुनिक धर्तीच्या मोरीत जाऊन पाणी पडलं आणि त्या सपकन झालेल्या आवाजाने, जवळजवळ पंधरा वीस वर्षांपुर्वीच्या, डोंबिवलीतील इमारतीच्या तळमजल्याच्या पहिल्या पायरीवर नेऊन ठेवलं. दोन हातात पाण्याने पूर्ण भरलेल्या दोन बालदया. दुसऱ्या मजल्यावरील घरातील ओट्यावर असतील नसतील तेव्हढी सगळी भांडी मांडून आरास. खालून बालदया भरून आणायच्या आणि भांड्यांची रिकामी आरास पाण्याने भरायची. पाच दिवस पाण्याचा थेंबही न आला की मग कधी समोरच्या इमारतीतून काठीला प्लास्टिकची पिशवी अडकवून पाण्याची एखादी भरलेली बाटली मैत्रीखातर येत असे. मग राखून राखून मोरीत साठलेल्या भांड्यांना पाण्याचा हात लावावा. जपून जपून पाणी प्यावं. डॉक्टर सांगतात, रोज तीन लिटर पाणी प्यावं...पण ते रोज दोन मजले पाणी भरून आणायला लागलं की एक एक घोट कसा मोजून मापून घशाखाली उतरायला लागतो. घरात तान्हं बाळ...मग काय पाण्याशिवाय दिवस काढणार?
म्हणतात भूतकाळ विसरून जावा.
हे पाण्याचे हाल विस्मृतीत गेल्याने आपोआप हातून पाण्याचा नाश होतो त्याचे काय?
वाटलं, त्यापेक्षा असं हातात जेव्हा गरजेपेक्षा जास्ती पाणी येतं तेंव्हा काही नाही तर चार पावलं चालून खिडकीतील झाडांना तरी घालावं. नाहीतर बाथरूम मध्ये एखाद्या बालदीत साठवावं आणि बाहेरून आल्यावर ते पाय धुवायला म्हणून तरी वापरावं....तेव्हा परत नळाचं तोंड उघडून धो धो पाणी सोडण्यापेक्षा!
काढलेले हाल तरी निदान विसरू नयेत नाही का?
एव्हढी पाच मिनिटांची डोंबिवलीची सफर डोळे उघडून गेली.

Friday 23 July 2010
अजून एक...
ऐंशी नव्वद वर्षांची वृद्धा. काही माणसे नजाकतीने म्हातारी होतात. तशीच ही एक मजली, गेल्या वर्षापर्यंत वावर असलेली इमारत. वय झालं, तर उलट तिचे आवाज वाढले. लहान मुले वाढली. हसण्याचा, ओरडण्याचा आवाज वाढला. तेव्हढीच त्या उतारवयाला सोबत. परंतु एका वर्षापूर्वी कोणा बिल्डरने तिला फाशी सुनावली. मग एकेक करून सगळे सोडून गेले. थोरांबरोबर लहानगे देखील गेले. दाराशी स्कूलबस थांबेनाशी झाली. तिचा भोंगा वाजेनासा झाला. भाजीवाला दार ओलांडून पुढे जाऊ लागला. दारातला कडूनिंब साथीला खंबीर उभा. परसातली विहीर जाणार कुठे? तीही पोटचं पाणी देखील न डुचंमळता साथीला उभी.
कालचक्राप्रमाणे पाऊस लागलाय. सकाळी पाणी पडलं. समोर डबकं जमलं. कागदी बोट कोण सोडणार...वृध्येने निश्वास सोडला. माडीवरच्या लाकडी खिडकीतून खाली पाण्याकडे नजर लावली.
पाऊस का थांबलाय....चिन्ह तर होती. आता रस्ते तुंबले, लोकल बंद पडली... उशिरा येणारं..घोर लावणारं कोणीच नाही उरलं.
उसासा सोडला...आणि पाऊस सुरु झाला. वृद्धेची नजर पुन्हा डबक्यात शिरली.
आणि एका लांबलचक वर्षानंतर विटलेल्या चेहेऱ्यावर हसू आलं. थेंब झरझर डबक्यात डुबकी मारत होते आणि पाण्यातील वृध्द इमारतीचं प्रतिबिंब थरारत होतं. एकाच तालात. गोलगोल. वेगवेगळी चक्र घेत. एका क्षणाची देखील विश्रांती न घेता.
"चला वर्षभराने का होईना आयुष्यात हालचाल झाली." म्हाताऱ्या इमारतीचं हसू विरलं देखील नसेल आणि दाराशी सर्व हत्यारांसहित दहा पंधरा माणसांची टोळी लॉरीतून उतरली आणि काही तासांतच तीक्ष्ण हत्याराचा पहिला घाव म्हातारीच्या मस्तकावर पडला.

Wednesday 21 July 2010
कवाडं
रातराणी फुललेय. फांदीफांदीवर झुबक्याने. अस्ताव्यस्त पसरलेल्या झुडूपाने आपल्या सगळ्या अत्तराच्या कुप्या उघड्या टाकल्या आहेत. छोट्या छोट्या कुप्या. चिंचोळ्या चार चिमुकल्या पाकळ्या, मधोमध खोलवर दरी आणि त्यातून येणारा मादक, स्वर्गीय गंध. दरीच्या काठावर उभं राहून खोल एकटक बघत राहिलं तर तो गंध साद घालणारा. दरीत लोळण घेतली तर काय मी त्या अंतरंगात पोचेन? राणीच्या अंतरंगात? तिच्या महालात?
खेळ चार दिवसांचा. मग ह्या कुप्या निखळतील. नवीन कुप्या उघडतील. गंध तोच. वेडावणारा.
राणीचं अबाधित साम्राज्य...काळाचं गणित नसलेलं...वार्धक्य नसलेलं...
कवाडं उघडायचा अवकाश.
घमघमाट घरात घुसला. मला हसू आलं.
"राणी, ये. तुला मी कशी बाहेर ठेवेन? दाता बाहेर...अन् भिक्षुक घरात?"

Monday 19 July 2010
सहज जाता जाता...
गळ्यात एखादी काळी पोत असावी अशी एक काळी वायर खिडकी बाहेर लटकलेली बरेच दिवस दिसतेय. हल्ली एक मजेशीर चित्र दिसून येतं. पाऊस पडून गेल्यावर त्या काळ्या पोतीला लक्ष लक्ष सुंदर चकाकते हिरे लगडून बसतात. आणि मग तो साधा काळा दोरखंड, लाख मोलाचा होऊन जातो. हळूहळू एक एक हिरा तिथून सुटतो आणि धरतीच्या कुशीत उडी मारून जातो.
त्या दिवशी त्यावर असा एकच हिरा लटकत राहिला होता. वाहत्या वाऱ्याशी खेळत. हेलकावे घेत.
ते त्याचे हिंदोळे माझ्या कानी हलकेच पियानोचे सूर घेऊन आले.
तिथून नजर खाली वळवली तर क्षणाचा उशीर काय खेळ दाखवून जातो ते दृष्टीक्षेपात आलं. त्या हिऱ्याने वेळीच उडी मारली तर मातीत विरून जाण्याची संधी होती आणि एका क्षणाचा उशीर, मग खाली सिमेंटवर आपटून कपाळमोक्षच नशिबी. त्याने अॉलिम्पिकच्या तयारीने शर्यतीत उतरलेल्या खेळाडूप्रमाणे खिडकीत ठेवलेल्या कुंडीत झेप घेतली आणि एका क्षणात तो थेंब लाल मातीत विरून गेला.
मरण, असं कामी आलं.

Friday 16 July 2010
स्थिरचित्रण
चला, आज आपण स्थिरचित्रण करू.
बघा, काय ठेवलंय तुमच्यापुढे?
त्या वस्तूकडे तुम्ही, आज निरखून बघा.
त्यावर पडलेला प्रकाश अनुभवा.
चालू असलेला छायाप्रकाशाचा खेळ पहा.
समोर असलेली वस्तू करडी, गडद आहे म्हणता?
मग बरोबर.
खिडकीतून आलेला प्रकाश, त्यावर विशेष नाही खेळणार.
ती तीव्र काटकोनी देखील आहे म्हणता?
नजरेला बोचरी आहे?
मग, तुम्ही त्याचे बदलते रूप पकडा.
त्या करड्या रंगाची आपलीच एक गंमत आहे.
ती गंमत अनुभवा.
चला. सुरु करा.
तुम्हांला कितीदा सांगितलं?
दुखः समोर ठेवून त्याकडे बघायला शिका!

Thursday 15 July 2010
आमची पिढी
बालीच्या रस्त्यावरून सकाळी सात वाजता टॅक्सीतून जाताना खरं तर वेगळं काही वाटलं नाही. आपल्या कोकणातल्या एखाद्या रस्त्यावरून आपण जातोय असंच वाटत होतं. नजर जिथे पोचेल तिथे हिरवीगार झाडी, धावणारी निळीशार नदी, पांढरा शुभ्र ओढा आणि ती लालचुटुक कौलारू घरं. त्या कौलारू घरांच्या चारी टोकांवरून, आभाळाकडे रोखलेल्या, इंडोनेशियनच वाटाव्या अशा लाकडी कलाकुसर आकृतींमधून मात्र फरक नजरेत भरत होता. धावत्या दुचाकीवर आपल्या वडिलांना पाठीमागून घट्ट विळखा घालून, पाठीवर दप्तर अडकवलेली छोटी बच्चे कंपनी आपल्या मुलांसारखीच अजूनही डुलक्या काढत होती. हे सगळं बघत असता एक वेगळीच गोष्ट नजरेत भरली. आमच्या टॅक्सीजवळून अशीच एक दुचाकी गेली आणि नजर पडली ती त्या मुलाच्या मागे अडकवलेल्या झाडूकडे. मग नीट बघितलं तर लक्षात आलं सगळीच मुलं झाडू घेऊन निघाली होती. "गुंतूर, ही मुलं कुठे निघालीयत?" आमच्या अगदी भारतीयच वाटावा अश्या वाहकाला विचारलं.
"कुठे म्हणजे? शाळेत."
"पण मग... झाडू?"
"आधी जाऊन वर्ग नको का साफ करायला? रोजच ही मुलं घरून झाडू घेऊन निघतात आणि शाळा सुरु होण्याआधी आपापले वर्ग झाडून घेतात!"
आता हे ऐकल्यावर फारच आश्चर्य दाखवून चालणारं नव्हतं. तरच 'तुमच्या देशात असं नाही का करत' हा नकोसा प्रश्न टाळता येण्यासारखा होता.
परवा जेंव्हा एका दिवसाचा कोकणचा फेरफटका मारला तेंव्हा ही आठवण वर डोकावली. बाली आणि माझं कोकण, ह्यातील साधर्म्य शोधणारी माझी त्यावेळची नजर मला आज सत्याला सामोरं जायला भाग पाडू लावत होती. अर्धवट भरलेल्या माझ्या नद्या, किनाऱ्याशी असलेला प्लास्टीकचा कचरा फारश्या थोपवून धरू शकणार नव्हत्या. थरच्या थर कचरा. दुरून नजरेला टोचणारा, बोचणारा.
काय करणार....ना आम्हांला कोणी सकाळी प्रथम आमचा वर्ग झाडायला शिकवलं...ना ते आम्ही कोणाला शिकवलं.
आम्ही फक्त सकाळी रांगेत उभे राहिलो आणि देवाची स्तुती केली...पण देवाच्या कार्याचा मान राखायला कोणी नाही शिकवलं.
मी गाडीत माझ्या शेजारी बसलेल्या बहिणीला म्हटलं...."आपली पिढी फुकट गेली."
प्रत्तुत्तर मिळालं. "आपल्या चार पिढ्या फुकट गेल्यात."

Wednesday 14 July 2010
वाफ
गरम गरम वाफाळलेली भाजी डब्यात भरली आणि टपरवेरच्या प्लास्टिक डब्याने गाल फुगवले.
त्याचा घनाकार बदलून गेला.
झाकण उघडलं. वाफेला वाट मिळाली. डब्याचा जीव 'भांड्यात' पडला.
वाफेला वाट मिळायला हवीच...नाहीतर अनर्थ व्हायचा.

Tuesday 13 July 2010
कॅनव्हास
जोरदार पाऊस आणि वाहनचालकाची भूमिका.
ह्या दोन गोष्टी एकत्र फारश्या सुखदायक नसतात. त्यातून शहराची त्वचा खडबडीत. देवी झाल्यासारखी. मुंगीला चकली वरून चालत जाताना असंच वाटत असेल काय...माझ्या मनात आलं.
वरळीच्या समुद्रकिनारी जावं...हा रोजचा जवळ वाहणारा समुद्र...परंतु त्याला एखादा संसर्ग्यजन्य रोग झाल्यासारखा रोज, दूरच बरा वाटणारा...समुद्रात शिरावंस वाटलं तर नेहमी एखादा परका समुद्र गाठावा...मग पावसाळ्यात ह्याचा संताप अंगावर घ्यावा...
घराची खिडकी... बाहेर पाऊस.
खिडकी उघडावी... गर्द झाडी जोरदार शॉवर खाली अंघोळ करताना मनसोक्त बघावं.
ऑफिसच्या निळ्या बंद खिडकीतून दिसणाऱ्या उंचउंच इमारती...काचेवर जमणारे थेंब, दिवस पावसाचे आहेत ह्याची आठवण करून देतं. बाकी हालचाल शून्य.
एका लांबसडक भिंतीवर लागलेली ही एकाच पावसाची असंख्य चित्र. मुंबईची.
आठवतो तो सहावीत असतानाचा चित्रकलेचा तास...
"आजचा विषय पाऊस.
काढा चित्र!"

Monday 12 July 2010
Sunday 11 July 2010
विचारचक्र...
एकटंच असतं. चार असती तर निदान एकमेकांना धरून तरी चालली असती! पण हे बिचारं एकटंच. सैरावैरा मग धावत असतं.
शोलेतल्या धर्मेंद्राच्या चाकासारखं.
पण नशीब म्हणायचं हे माझं चक्र धावतं...
दलदलीत फसलेल्या चक्राचं आणि त्याच्या वाहकाचं, इतिहासात काय झालं ह्याची मी काय नवीन आठवण करून देणार!

Saturday 10 July 2010
नको ग तोलू...
"तुझं सुख अपार... दुखः गुंजेएव्हढं"
म्हटलं, खरं आहे बाई.
फक्त त्या सुखसागरात तरंगता येतं...
आणि ही चिमुकली गुंज...हृदयात घुसलीय...
अशी अडकलीय की ते बंद पडावं.
म्हटलं, खरं आहे बाई.
फक्त त्या सुखसागरात तरंगता येतं...
आणि ही चिमुकली गुंज...हृदयात घुसलीय...
अशी अडकलीय की ते बंद पडावं.
चढउतार
आयुष्याची घसरण बऱ्याचदा वेगातच होते नाही का?
आणि प्रगतीची चढण...कष्टांची...वेळखाऊ.
तू माझा!
दोन तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी कोर्टात खेटा घालण्याचे दिवस आले होते. सकाळी साडेचार वाजता मुंबईहून निघायचे आणि साडे दहाला कोर्टात खुर्ची पकडायची.
त्या दिवशी देखील असेच झाले.
आमच्या दाव्यावरचा वादविवाद सुरु व्ह्यायला अवकाश होता. मी वाट पहात बसले होते. हिंदी सिनेमामध्ये आपण जसे बघतो तसे काही चित्र नव्हते. साक्षीदाराला उभं रहाण्यासाठी लाकडी जाळीची फळी मात्र कोपऱ्यात उभी होती. त्या पलीकडे होता एक सात ते आठ वर्षांचा काळसर पण पांढरीशुभ्र दंतपंक्ती असलेला मुलगा.
"बाळा, तू कोणाकडे रहातोस?" न्यायाधीशांनी विचारले.
"मावशीकडे."
दोन वकील, न्यायाधीश, तो मुलगा आणि आम्ही वीस पंचवीस प्रेक्षक. त्या मुलाच्या आठ वर्षांच्या आयुष्याचे नाट्य आमच्यासमोर येत होते.
जन्माला त्या वेळी मुंबईतील लालबाग येथील कुठल्याश्या चाळीत तो त्याच्या आईबाबांबरोबर रहात होता. १०X१० ची एक खोली. तीन चार वर्षांपूर्वी आईबाबा अकस्मात देवाघरी गेले होते. त्याच्या पुढचे त्याचे दिवस तो कधी मावशीकडे तर कधी काकांकडे काढत होता. काका आणि मावशी कोकणातले.
आज कोर्टाला प्रश्न पडला होता तो त्याच्यावर ह्या अख्ख्या जगात कोणाचं जास्ती प्रेम आहे. काकांचं की मावशीचं.
"तू मावशीकडे असलास की तुझे काका तुला भेटायला येतात का?"
"मावशीकडे तू शाळेत जातोस का?"
"काका येताना तुझ्यासाठी काही भेटवस्तू आणतात का?"
"तुला कोणाकडे रहायला अधिक आवडतं?
प्रेक्षक वर्गात त्याच्या प्रत्येक उत्तरावर चेहेऱ्यावरचे भाव बदलणाऱ्या दोन व्यक्ती होत्या. काका आणि मावशी. कधी कपाळावर आठी तर कधी चेहऱ्यावर हसू.
"बाळा, तू कोणाला घाबरू नकोस. खरखरं काय ते आम्हांला सांग."
न्यायदेवता त्या दिवशी मुंबईतल्या १० X १० च्या खोलीत बसली होती.

Friday 9 July 2010
अजून वेळ गेलेली नाही...
समजा, एक रिकामा पेटारा आपल्याला प्रत्येकाला देण्यात आला आहे.
रिकामा आहे, आपल्याला स्वतःला भरायचा आहे. छोट्या छोट्या डब्यांनी. डब्या कुलुपबंद किंवा फक्त झाकण लावलेल्या...हव्या तेंव्हा उघडता येणाऱ्या...किंवा कधीच उघडता न येणाऱ्या.
काही डब्यांत फुलपाखरं, तर काही डब्यांत सर्प. काही डब्यांत हिरेमाणके तर काही डब्यांत कोळसे. आता पेटाऱ्यात रिकामी जागा कमीच उरलीय. परंतु डब्या अजून खूप आहेत. अधिकाधिक येतच आहेत. कधी तुम्ही खास आणल्यात तर काही भेटवस्तू आहेत. भेट नेहमीच तुम्हाला आवडते असे नसते...पण मग ती नाकारता देखील येत नाही.
हा पँडोराचा पेटारा नाही. उघडला की साप, फुलपाखरे सर्वच मोकाट सोडणारा.
कारण हा तुमचा खास पेटारा आहे. अजूनही किल्यांचा छल्ला तुमच्या कमरेला आहे.
फक्त ज्या डब्या कधीच उघडल्या जाऊ नयेत त्यावर तुम्ही काही नाव टाकले आहे ना? की आत सगळाच पसारा आहे? वेड्यावाकड्या, कोंबलेल्या डब्या? एकावरही काही नाव नाही, निशाणी नाही. आपल्याला माहित आहे की जेंव्हा आपण घडवंची नीट रचून ठेवतो तेंव्हा त्यावर अधिक सामान आपण ठेवू शकतो. पण जर कशीही कोंबाकोंबी केलेली असेल तर जागा पुरणे अशक्य. आणि पुरत नाही म्हणून मोठा पेटारा आता कोणी आणून देणार नाही.
मग आता?
वाटतं, अजून वेळ गेलेली नाही. निदान नवीन डब्यांवर तरी नाव घालावीत. नाहीतर एक वेळ अशी येईल की अख्खा पेटारा उपडा करून रिकामा करावा लागेल. साप, पाली, मुंग्या, सरडे जसे बाहेर निघतील तशीच फुलपाखरे देखील उडून जातील. जळून खाक झालेले कोळसे जसे घरंगळतील तसेच हिरे देखील निसटून जातील.
मग स्मृतिभ्रंश निश्चित.

Thursday 8 July 2010
कोरस
कोरस मध्येच बोलायचं.
म्हणजे अगदी हळू आवाजात सुरुवात करायची. आणि मग सगळ्यांनी आवाज, एकाच पट्टीत वाढवत न्यायचा. अगदी टिपेला. मग त्याच क्रमाने परत खाली खोलवर उतरवायचा. हे किती जणांनी करायचे? मोजदाद नाही. कोण हे आवाज करतंय, माहीतच नाही. कुठे बसलेत? कोण जाणे. दूरदूर, कधी टिपेला जाणारा तर कधी वातावरणात विरून जाणारा मंद ध्वनी.कर्नाटकातील कुर्ग मधील जंगल. गर्द झाडी. मोजून चार दिवसाचं आमचं तिथे वास्तव्य.
खोडाला चिकटलेल्या सूक्ष्म, पोपटी मलमली पासून वेगवेगळ्या आकाराची आणि विविध पोत असलेली झुडूपे, रोपे, झाडे, वल्लरी, वृक्ष...
आकार...बोटाच्या पेरापासून, तळहात, कोपरापर्यंत, बोटांपासून खांद्यांपर्यंत... म्हणजे जी काही दोनचार झाडे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात बघतो त्याच्या पलीकडचे वृक्ष. अॅलीस इन वंडरलॅड सारखी अजब प्रकारची गजब झाडे. नावं माहित नाहीत...गावं माहित नाहीत..तरी देखील परकी नाहीत.
आकाशाचा थांगपत्ता ह्या सगळ्या वृक्षवल्लरीत लागण्याचा अजिबात संभव नाही. त्यामुळे आकाश भरून आले आहे की काय म्हणून वर बघण्याची गरजच नाही. वरती काय ते भरून येईल आणि मग ओतून येईल!
काही दिवसांपूर्वी एक मैत्रीण सांगत होती, तिच्या अगदी घराबाहेर जंगल आहे. मी नाव घेईन तो किडा ती मला आणून देऊ शकते. आता नाव घ्यायला मला थोडी किड्यांची माहिती आहे? एक रातकिडा सोडल्यास माझे ज्ञान शून्य. मग मी त्या कोरस मध्ये गाणाऱ्या किड्यांना नाव देऊन टाकलं. पाणकिडा! कारण तो म्हणे पावसाच्या मोसमात अशी कुठे अज्ञानात बसून गानसमाधी लावतो. एकटादुकटा नाही. लवाजमा घेऊनच.
त्या सुरांच्या तालावर, गर्द झाडांच्या सान्निध्यात जर पद्मासन घालून ओम म्हणत ध्यान लावलं, तर समाधी नक्कीच लागून जावी...पार अनंतात.
खूप वर्षांपूर्वी एकदा वसंत देसाईंनी आम्हां लहान मुलांना शिवाजी पार्क वर जमा केलं होतं...आणि काही गाणी म्हणवून घेतली होती...कोरसमध्ये. संपूर्ण मैदान फुलून गेलं होतं. बालदिनाच्या दिवशी. आणि मग आमच्यावर विमानातून पुष्पवृष्टी केली गेली.
आम्ही लावलेला कोरस, ह्या पाणकिड्यांइतका तालात होता की नाही मला आता शंकाच येतेय!
ह्या रागदारीवर देखील होते फुटलेल्या आकाशातून वृष्टी!
जलधारांची! कोरस अधिक जोशात. अधिक ताळमेळात.
टिपेला पोचणारा...हळुवार विरून जाणारा...
पुन्हा चढत जाणारा...टिपेला पोचणारा...
हळुवार विरून जाणारा...
मिले सूर मेरा तुम्हारा...
नाक
सरळ. बसकं. फताडं
तरतरीत. चाफेकळी. अपरं.
रडकं.
गळकं.
मुरडणारं.
उडवणारं.
मत मांडणारं.
खिजवणारं.
वर्तुळाकार.
अर्धवर्तुळाकार.
चकाकतं.
शेंबडं. शिंकरणारं.
नाकाबंदी झालेलं.
चोचीसारखं.
उग्र. नाजूक.
फुगरं. धर्मेंद्रासारखं.
दोन भिंगांची घसरगुंडी करणारं.
थरथरतं.
जिवंत.
धारधार.
बाबांचं.
शांतताप्रिय बाबा कापसाचे बोळे कानात घालत असत.
तासंतास पुस्तकांत मान खुपसून बसत.
दोन कापसाचे बोळे...
त्यांच्या सावळ्या नाकात चांगले नाही दिसले.
वस्तू तीच...इंद्रिय वेगळं.
मग तेच नाक हृदयात घुसून राहिलं.
पुढचं आयुष्य पोरकं.

Wednesday 7 July 2010
Subscribe to:
Posts (Atom)