बाहेर सज्ज्यात उभं राहावं. आकाशाकडे बघावं. चारी दिशांकडे नजर टाकावी.
कशी आहे हवा? वारा बागडतोय नाही का? मग द्या ते हातातलं, कागदी पॅराशुट सोडून.
मात्र सोडून देताना त्यावर आपले डोळे बसवायला विसरू नका!
बघा, निघाले ते तरंगत.
नेहेमी सज्ज्यात उभं राहून तेचतेच चित्र बघायचं. तोच तो रस्ता. तीच ती गल्ली. तीच झाडं आणि तीच ती माणसं.
त्यापेक्षा हे झकास!
पॅराशुटवर बसावं. तरंगत निघावं.
सांभाळा! ती नारळाची झावळी! जवळ न जाणे उत्तम. उगाच आपले पॅराशुट अडकायचे... मग गच्छंतीच म्हणायची.
किती हलकं वाटतंय नाही का?
झुळूक आली? फिरलं पॅराशुट? बदलली दिशा? तरंगत तरंगत गेलं बघा अजून वर.
कुठे जायचं... माहित नाही. कधी पोचायचं ठरवलं नाही...
दूरदूर देशी. पऱ्यांच्या राजवाड्यात. राक्षसांच्या साम्राज्यात.
उन्हाळ्याच्या सुट्टीत वह्यांच्या पानांची अशी पॅराशुटं बनवावी. आणि मग त्या पॅराशुटवर बसून कल्पनेची विमाने उंच उंच उडवावी! आकाशात मनसोक्त विहार करावा. उडणाऱ्या पाखरांच्या नजरेतून खाली बघावं. तर कधी ढगांवर विराजमान व्हावं.
कशी बनवायची ही पॅराशुटं विचारताय?
शाळेच्या वहीचा कागद फाडावा. वही गेल्या वर्षीचीच घ्या. नाहीतर ओरडा खाल! नेहेमीच तो कागद आयताकृती असतो. त्याला चौरस बनवा. त्याच्या चारी टोकांना चार भोके पाडा. पांढऱ्या सुतळीचे चार समान लांबीचे तुकडे घ्या. चारी भोकातून ते दोर ओवून ते कागदाच्या मागे एकत्र आणा. शीतपेयाचं एखादं झाकण घ्या. रस्त्यांवर ही झाकणं, मुबलक पडलेली मिळतात! त्याला मधोमध भोक पाडून त्यातून हे चारी दोरे ओवून घट्ट गाठ मारून टाका. आणि... आणि आता वर गच्चीवर जा आणि द्या सोडून! नाचऱ्या वाऱ्याच्या संगतीला. हवेत तरंगणाऱ्या पानांच्या सोबतीला. बघा तरंगतं की नाही आपलं पॅराशुट!
वारा आपल्या ताब्यात नाही...आणि कल्पनांचे वारू आपण ताब्यात ठेवायचे नाही!
4 comments:
लय मस्ताड मज्जा एकदम... :) हे मी करुन बघणाऱ्ये :D
blog वरील प्रतिक्रिया वाचून मन भरून येतय !
सौरभ, मला एकदम आपण गच्चीत उभे राहून ही पॅराशुटं उडवतोय असंच वाटलं!! मज्जा!
अनघा... काय गं... पुन्हा सगळे डोळ्यासमोर उभे केलेस.... कागदी पॅराशुट, विमाने आणि ते पतंग... माझ्या जुन्या घरच्या गच्चीमध्ये जाऊन पोचले बघ मन... आज कामामध्ये लक्ष्य लागणे नाही... :( आणि कामातून मोकळा वेळ मिळाला तरी तुझा ब्लोग वाचणे सुद्धा नाही... :P
अर्थात काम झाल्यावर वाचायचा... :) बालपणीच्या आठवणी जाग्या करायला... :)
Post a Comment