नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 10 July 2010

तू माझा!

दोन तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी कोर्टात खेटा घालण्याचे दिवस आले होते. सकाळी साडेचार वाजता मुंबईहून निघायचे आणि साडे दहाला कोर्टात खुर्ची पकडायची.
त्या दिवशी देखील असेच झाले.
आमच्या दाव्यावरचा वादविवाद सुरु व्ह्यायला अवकाश होता. मी वाट पहात बसले होते. हिंदी सिनेमामध्ये आपण जसे बघतो तसे काही चित्र नव्हते. साक्षीदाराला उभं रहाण्यासाठी लाकडी जाळीची फळी मात्र कोपऱ्यात उभी होती. त्या पलीकडे होता एक सात ते आठ वर्षांचा काळसर पण पांढरीशुभ्र दंतपंक्ती असलेला मुलगा.
"बाळा, तू कोणाकडे रहातोस?" न्यायाधीशांनी विचारले.
"मावशीकडे."
दोन वकील, न्यायाधीश, तो मुलगा आणि आम्ही वीस पंचवीस प्रेक्षक. त्या मुलाच्या आठ वर्षांच्या आयुष्याचे नाट्य आमच्यासमोर येत होते.

जन्माला त्या वेळी मुंबईतील लालबाग येथील कुठल्याश्या चाळीत तो त्याच्या आईबाबांबरोबर रहात होता. १०X१० ची एक खोली. तीन चार वर्षांपूर्वी आईबाबा अकस्मात देवाघरी गेले होते. त्याच्या पुढचे त्याचे दिवस तो कधी मावशीकडे तर कधी काकांकडे काढत होता. काका आणि मावशी कोकणातले.

आज कोर्टाला प्रश्न पडला होता तो त्याच्यावर ह्या अख्ख्या जगात कोणाचं जास्ती प्रेम आहे. काकांचं की मावशीचं.

"तू मावशीकडे असलास की तुझे काका तुला भेटायला येतात का?"
"मावशीकडे तू शाळेत जातोस का?"
"काका येताना तुझ्यासाठी काही भेटवस्तू आणतात का?"
"तुला कोणाकडे रहायला अधिक आवडतं?

प्रेक्षक वर्गात त्याच्या प्रत्येक उत्तरावर चेहेऱ्यावरचे भाव बदलणाऱ्या दोन व्यक्ती होत्या. काका आणि मावशी. कधी कपाळावर आठी तर कधी चेहऱ्यावर हसू.
"बाळा, तू कोणाला घाबरू नकोस. खरखरं काय ते आम्हांला सांग."

न्यायदेवता त्या दिवशी मुंबईतल्या १० X १० च्या खोलीत बसली होती.

No comments: