भाजी शिजायला पातेल्यात पाणी टाकलं आणि पेल्यातील उरलेलं पाणी मोरीत फेकून दिलं.
ओट्याला लागून असलेल्या आधुनिक धर्तीच्या मोरीत जाऊन पाणी पडलं आणि त्या सपकन झालेल्या आवाजाने, जवळजवळ पंधरा वीस वर्षांपुर्वीच्या, डोंबिवलीतील इमारतीच्या तळमजल्याच्या पहिल्या पायरीवर नेऊन ठेवलं. दोन हातात पाण्याने पूर्ण भरलेल्या दोन बालदया. दुसऱ्या मजल्यावरील घरातील ओट्यावर असतील नसतील तेव्हढी सगळी भांडी मांडून आरास. खालून बालदया भरून आणायच्या आणि भांड्यांची रिकामी आरास पाण्याने भरायची. पाच दिवस पाण्याचा थेंबही न आला की मग कधी समोरच्या इमारतीतून काठीला प्लास्टिकची पिशवी अडकवून पाण्याची एखादी भरलेली बाटली मैत्रीखातर येत असे. मग राखून राखून मोरीत साठलेल्या भांड्यांना पाण्याचा हात लावावा. जपून जपून पाणी प्यावं. डॉक्टर सांगतात, रोज तीन लिटर पाणी प्यावं...पण ते रोज दोन मजले पाणी भरून आणायला लागलं की एक एक घोट कसा मोजून मापून घशाखाली उतरायला लागतो. घरात तान्हं बाळ...मग काय पाण्याशिवाय दिवस काढणार?
म्हणतात भूतकाळ विसरून जावा.
हे पाण्याचे हाल विस्मृतीत गेल्याने आपोआप हातून पाण्याचा नाश होतो त्याचे काय?
वाटलं, त्यापेक्षा असं हातात जेव्हा गरजेपेक्षा जास्ती पाणी येतं तेंव्हा काही नाही तर चार पावलं चालून खिडकीतील झाडांना तरी घालावं. नाहीतर बाथरूम मध्ये एखाद्या बालदीत साठवावं आणि बाहेरून आल्यावर ते पाय धुवायला म्हणून तरी वापरावं....तेव्हा परत नळाचं तोंड उघडून धो धो पाणी सोडण्यापेक्षा!
काढलेले हाल तरी निदान विसरू नयेत नाही का?
एव्हढी पाच मिनिटांची डोंबिवलीची सफर डोळे उघडून गेली.
4 comments:
घरी नेट बघणं शक्य नाही आणि ऑफिसमध्ये वेळ नाही अशी अवस्था होती गेले कित्येक आठवडे. आज सगळे उध्योग सोडून अधाश्यासारखे ब्लॉग वाचते आहे. काय लिहिती आहेस अग तू ... प्रत्येक पोस्ट मागचीपेक्षा सरस. काय प्रतिक्रिया लिहू मी? तू लिहित रहा नेहेमी अशीच !
गौरी, मला तुझी खूप आठवण येत होती हं! आता कसं छान वाटलं! :)
अगदी खरं गं. तीन मजले उतरून तळातून कळशी व बादली घेऊन वर्षोनवर्षे पाणी भरलेले. आयुष्यभराचा धडा शिकलेयं तेव्हांच.
अनघे, पोस्ट अप्रतिमच.
डोंबिवली-कल्याणमधलं हे चित्र होतं तसंच आहे! मी बघतो ना... अगदी रोज.
Post a Comment