कोरस मध्येच बोलायचं.
म्हणजे अगदी हळू आवाजात सुरुवात करायची. आणि मग सगळ्यांनी आवाज, एकाच पट्टीत वाढवत न्यायचा. अगदी टिपेला. मग त्याच क्रमाने परत खाली खोलवर उतरवायचा. हे किती जणांनी करायचे? मोजदाद नाही. कोण हे आवाज करतंय, माहीतच नाही. कुठे बसलेत? कोण जाणे. दूरदूर, कधी टिपेला जाणारा तर कधी वातावरणात विरून जाणारा मंद ध्वनी.कर्नाटकातील कुर्ग मधील जंगल. गर्द झाडी. मोजून चार दिवसाचं आमचं तिथे वास्तव्य.
खोडाला चिकटलेल्या सूक्ष्म, पोपटी मलमली पासून वेगवेगळ्या आकाराची आणि विविध पोत असलेली झुडूपे, रोपे, झाडे, वल्लरी, वृक्ष...
आकार...बोटाच्या पेरापासून, तळहात, कोपरापर्यंत, बोटांपासून खांद्यांपर्यंत... म्हणजे जी काही दोनचार झाडे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात बघतो त्याच्या पलीकडचे वृक्ष. अॅलीस इन वंडरलॅड सारखी अजब प्रकारची गजब झाडे. नावं माहित नाहीत...गावं माहित नाहीत..तरी देखील परकी नाहीत.
आकाशाचा थांगपत्ता ह्या सगळ्या वृक्षवल्लरीत लागण्याचा अजिबात संभव नाही. त्यामुळे आकाश भरून आले आहे की काय म्हणून वर बघण्याची गरजच नाही. वरती काय ते भरून येईल आणि मग ओतून येईल!
काही दिवसांपूर्वी एक मैत्रीण सांगत होती, तिच्या अगदी घराबाहेर जंगल आहे. मी नाव घेईन तो किडा ती मला आणून देऊ शकते. आता नाव घ्यायला मला थोडी किड्यांची माहिती आहे? एक रातकिडा सोडल्यास माझे ज्ञान शून्य. मग मी त्या कोरस मध्ये गाणाऱ्या किड्यांना नाव देऊन टाकलं. पाणकिडा! कारण तो म्हणे पावसाच्या मोसमात अशी कुठे अज्ञानात बसून गानसमाधी लावतो. एकटादुकटा नाही. लवाजमा घेऊनच.
त्या सुरांच्या तालावर, गर्द झाडांच्या सान्निध्यात जर पद्मासन घालून ओम म्हणत ध्यान लावलं, तर समाधी नक्कीच लागून जावी...पार अनंतात.
खूप वर्षांपूर्वी एकदा वसंत देसाईंनी आम्हां लहान मुलांना शिवाजी पार्क वर जमा केलं होतं...आणि काही गाणी म्हणवून घेतली होती...कोरसमध्ये. संपूर्ण मैदान फुलून गेलं होतं. बालदिनाच्या दिवशी. आणि मग आमच्यावर विमानातून पुष्पवृष्टी केली गेली.
आम्ही लावलेला कोरस, ह्या पाणकिड्यांइतका तालात होता की नाही मला आता शंकाच येतेय!
ह्या रागदारीवर देखील होते फुटलेल्या आकाशातून वृष्टी!
जलधारांची! कोरस अधिक जोशात. अधिक ताळमेळात.
टिपेला पोचणारा...हळुवार विरून जाणारा...
पुन्हा चढत जाणारा...टिपेला पोचणारा...
हळुवार विरून जाणारा...
मिले सूर मेरा तुम्हारा...
1 comment:
the landscape is superb !!
Post a Comment