समजा, एक रिकामा पेटारा आपल्याला प्रत्येकाला देण्यात आला आहे.
रिकामा आहे, आपल्याला स्वतःला भरायचा आहे. छोट्या छोट्या डब्यांनी. डब्या कुलुपबंद किंवा फक्त झाकण लावलेल्या...हव्या तेंव्हा उघडता येणाऱ्या...किंवा कधीच उघडता न येणाऱ्या.
काही डब्यांत फुलपाखरं, तर काही डब्यांत सर्प. काही डब्यांत हिरेमाणके तर काही डब्यांत कोळसे. आता पेटाऱ्यात रिकामी जागा कमीच उरलीय. परंतु डब्या अजून खूप आहेत. अधिकाधिक येतच आहेत. कधी तुम्ही खास आणल्यात तर काही भेटवस्तू आहेत. भेट नेहमीच तुम्हाला आवडते असे नसते...पण मग ती नाकारता देखील येत नाही.
हा पँडोराचा पेटारा नाही. उघडला की साप, फुलपाखरे सर्वच मोकाट सोडणारा.
कारण हा तुमचा खास पेटारा आहे. अजूनही किल्यांचा छल्ला तुमच्या कमरेला आहे.
फक्त ज्या डब्या कधीच उघडल्या जाऊ नयेत त्यावर तुम्ही काही नाव टाकले आहे ना? की आत सगळाच पसारा आहे? वेड्यावाकड्या, कोंबलेल्या डब्या? एकावरही काही नाव नाही, निशाणी नाही. आपल्याला माहित आहे की जेंव्हा आपण घडवंची नीट रचून ठेवतो तेंव्हा त्यावर अधिक सामान आपण ठेवू शकतो. पण जर कशीही कोंबाकोंबी केलेली असेल तर जागा पुरणे अशक्य. आणि पुरत नाही म्हणून मोठा पेटारा आता कोणी आणून देणार नाही.
मग आता?
वाटतं, अजून वेळ गेलेली नाही. निदान नवीन डब्यांवर तरी नाव घालावीत. नाहीतर एक वेळ अशी येईल की अख्खा पेटारा उपडा करून रिकामा करावा लागेल. साप, पाली, मुंग्या, सरडे जसे बाहेर निघतील तशीच फुलपाखरे देखील उडून जातील. जळून खाक झालेले कोळसे जसे घरंगळतील तसेच हिरे देखील निसटून जातील.
मग स्मृतिभ्रंश निश्चित.
1 comment:
अनघा , तुझाही पेटारा उघडून बघायला हवाय ! त्यातील सर्वात मोट्ठ्ठी डब्बी आपण सध्या उघडलेली दिसतेय!
एकपेक्षा एक, सरस अशा गोष्टी त्यातून बाहेर पडतायत ! तुझ्या पेटारयातील हि डब्बीच कायम भरलेली व उघडी राहू देत!
Post a Comment