नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 25 January 2013

एक गरज...व्यक्ती की विचार ?

मी सध्या वाचते आहे नेल्सन मंडेला यांचं....Conversations with Myself.
पुस्तक हातात घेण्याआधी पेन्सिल हातात घ्यावी लागते. या पुस्तकामध्ये लक्षात ठेवण्यासारखे, आपल्याला विचार करावयास उद्युक्त करणारे व एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेतून बघावयास शिकवणारे बरेच काही आहे. असे मात्र होऊ नये....अख्खे पुस्तक अधोरेखित. मंडेलांबरोबर आपणही तुरुंगात असतो, वेगवेगळ्या व्यक्तीबरोबर विविध विषयांवर संवाद करीत असतो. साऊथ आफ्रिकेमधील क्रांती, ही फार जुनी अजिबात नसली तरीही मी वाचलेली नव्हती. शाळेतील अभ्यासक्रमांच्या पुस्तकांनंतरचा हा इतिहास असल्याकारणाने तसेही कानावर देखील पडलेला नव्हता. शालेय पुस्तकामधून निदान नावे तरी डोळ्यासमोरून जातात. बाकी त्या नावांना जोडलेला इतिहास आत नाही शिरला तरीही.

डोके म्हणजे एक कुंडी आहे. त्यातील मातीत काही रुजवायाचे असेल तर ते आत शिरवावं लागतं. नाहीतर बीज तर पडलं...परंतु त्याला आवश्यक अशी निगराणी झाली नाही म्हणून ते सुकून गेलं...एक विचार मृत्यू पावला असंच काहीसं होईल.

परवा एक नाटक बघितलं. 'शिवाजी अन्डरग्राउंड भीमनगर मोहल्ला'. कधी कुठे मिळालं तर नक्की बघा. आणि नसेल मिळत, म्हणजे कुठे दूर रात्री उशिरा वगैरे लागलं असेल तर अगदी धावाधाव, दगदग वगैरे करून बघा. 'शिवाजी अन्डरग्राउंड भीमनगर मोहल्ला' हा एक विचार आहे. ज्याची सद्य परिस्थितीत आपल्याला गरज आहे.  'जुने ते सोने' हे आपल्या नेत्यांविषयी बोलताना वाटते. सरदार वल्लभभाई पटेल, शिवाजी महाराज हे नेते आपण पुस्तकांतून वाचले. आपल्या समोर येत आहेत ते मात्र वेगळ्या जडणघडणीतील नेते. त्यांचे विचार, दूरदृष्टीशून्य त्यांचे निर्णय, बेजबाबदार व्यक्तव्ये ह्यामुळे आपल्याला जे अनुभव नित्य दिनी येतात ते उद्विग्न, निराश व हतबल करणारे असतात. इतिहास हा मला वाटतं आपल्यासाठी फार पुस्तकी झाला. म्हणजे सन, घटना पाठ केल्या आणि पास झालो...बस इतकंच. परंतु, शिवाजी महाराज हा एक विचार आहे, ही एक दूरदृष्टी आहे हे आपल्याला लहान वयामुळे असेल पण नाही जाणवलं. त्यामुळे दुसरा शिवाजी येणं ही एक इच्छा, स्वप्न आणि समोरच्याची जबाबदारी झाली. हे नाटक रोजच्या चूलमूल, नवरा बायको, प्रियकर प्रेयसी अशा त्रिकोणांमध्ये न शिरता क्षितिजे विस्तारून टाकून पुढे  नेणारे आहे. नवी पिढी नवे विचार करणारी आहे. नाटकाच्या माध्यमातून आपल्यासमोर जो शिवाजी येतो तो फक्त किल्ले, युद्धे, राज्याभिषेक, साल इतका मर्यादित रहात नाहीत. तर त्यांची धोरणे, त्यांनी वेळोवेळी हिंदू मुस्लिम ह्या धगधगत्या विषयावर मांडलेले विचार, आजही ते तितकेच प्रभावी दिसू लागतात. शिवाजी हिंदू नाही. शिवाजी मुसलमान नाही. शिवाजी हा एक विचार आहे. जो तुम्ही आम्ही उचलावयाचा आहे. समजून घेण्याचा आहे. रोजच्या कृतीत आणावयाचा आहे. आपल्याला आपले विचार तपासून घ्यायला लावतं हे नाटक. त्यातील तीन पिढ्या, त्यातली चिमुरडी, तिला पडलेले प्रश्न आणि तिला दिली गेलेली उत्तरे. काही नाही तर...देशाचा एखादा नागरिक घडवण्याची जबाबदारी जन्माला घातलीच असेल तर म्हणून तरी हे नाटक नक्की बघा. नाटकाच्या पहिल्या भागापेक्षा त्याचा दुसरा भाग...त्यातील घसघशीत पोवाडे...अक्षरश: डोळ्यात पाणी, हृदयात आग आणि गच्च आवळलेल्या मुठी...अशी अवस्था करून सोडतो.
आपल्यातील शिवाजी समजून घेण्यासाठी, व त्याला मुक्त करण्यासाठी हे नाटक बघा.

मला एखादी गोष्ट कोणी वेगळ्या कोनामधून दाखवली, त्यावर वेगळ्या कोनातून उजेड टाकला की आनंद होतो. माझ्या डोक्याला खाद्य मिळतं. आणि सर्वप्रथम म्हणजे, माझ्यामध्ये काही बदल आवश्यक आहेत हे मला मान्य आहे.
मी म्हणजे देवाने पृथ्वीला बहाल केलेली भेटवस्तू नव्हे.

मंडेला यांच्या संवादामधून ज्या छोट्या छोट्या बोधकथा येतात त्या वाचून मला इसापनीतीची आठवण झाली आणि त्या इसापनीतीचं आपल्या आयुष्यातील महत्त्व जाणवलं. त्यांनी सांगितलेली एक बोधकथा. मी आधी कधी ती वाचलेली नव्हती. तुम्ही वाचली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लेखक व संपादक रिचर्ड स्टेंगलबरोबर झालेल्या एका संवादामध्ये मंडेला ही बोधकथा सांगतात...
"महत्त्वाची बाब अशी होती की 'शांति'चे महत्त्व लोकांना कळावे...त्यावर त्यांनी विचार करावा. मी शक्ती (बळ ) आणि शांति ह्यात तुलना करीत होतो. व त्यातून 'शांति', 'बळा'पेक्षा वरचढ आहे हे पटवून देत होतो. त्यासाठी वारा व सूर्य ह्यांतील युक्तिवाद मी सांगितला होता. सूर्य म्हणतो,"मी तुझ्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. त्यावर वारा म्हणतो," नाही. मी तुझ्यापेक्षा शक्तिशाली आहे." ह्या वादावर उत्तर शोधण्यासाठी जमिनीवर चालणाऱ्या एका प्रवाशावर प्रयोग करण्याचे ते ठरतात. त्या प्रवाश्याने आपल्या अंगाभोवती एक घोंगडं पांघरलेलं आहे. सूर्य व वाऱ्याने ठरविले, जो कोणी प्रवाश्याच्या अंगावरून ते घोंगडं दूर करण्यात यशस्वी होईल तो अधिक बलवान. प्रारंभ वाऱ्याने केला. त्याने सर्वशक्तीनिशी फुंकर मारावयास सुरवात केली. जसजसा वारा जोरदार वाहू लागला, प्रवाश्याने आपलं घोंगडं आपल्या अंगाभोवती अधिकाधिक लपेटून घेतलं. वाऱ्याने आपल्या मुखातून अधिकच वेगाने शक्तीचा मारा केला. प्रवाश्याने आपले सर्वांग घोंगडीने झाकून घेतलं. वाऱ्याने प्रयत्नाची पराकाष्ठा केली परंतु, प्रवाश्याने घोंगडं शरीरापासून दूर सारलं नाही. त्याने ते अधिकच कवटाळून घेतलं. वारा थकला. भागला. आता सूर्य सरसावला. त्याने आपली किरणे हळुवार बाहेर काढली. मंद. मंद. आणि हळूहळू त्याने आपली किरणे तीव्र करावयास सुरवात केली. प्रवाश्याला आता आपल्या घोंगडीची गरज भासेनाशी झाली. घोंगडं तर उबेसाठी होती. त्याने घोंगडं सैल केलं. सूर्य आता अधिकाधिक प्रखर झाला आणि प्रवाशाने अखेरीस आपल्या शरीरापासून घोंगडं दूर सारलं. म्हणजेच हळूवार पद्धतीने प्रवाशाच्या शरीरापासून घोंगडं दूर करणे शक्य झाले. त्याच्यावर हल्ला करून नाही. ही बोधकथा आपल्याला सांगते...शांततेच्या मार्गातूनच आपण दुराग्राही माणसांचे मतपरिवर्तन करू शकणार आहोत...आणि तीच पद्धती आपण अवलंबवयास हवी." 

हे आणि अशा प्रकारचे विचार आपल्याला मंडेलांनी स्व:शी केलेल्या संवादामध्ये आढळतात. माझ्या आयुष्यात हे पुस्तक नक्की काय काम करते ? माझ्या डोक्यात ते विचार पेरते.
"आपला दृष्टीकोन जेव्हा आपल्याला समोरच्या माणसाला पटवून द्यावयाचा असतो. त्यावेळी आपण आक्रमक होऊन काही साध्य होत नाही. कारण त्यामुळे समोरचा देखील त्यावर उलटा भांडू लागतो. परंतु, आपण जर मृदू भूमिका घेतली तर आपण आपल्या ध्येयाच्या जवळ पोहोचू शकतो." (माझे आयुष्य हे सामान्य आयुष्य आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्यातील अनुभवांना पुस्तकातील विचार जोडू पहाते. आपल्या नेत्यांची संसदेमधील हाणामारी आपण रोज आपल्या टीव्हीवर बघतोच.)

"...मी तुरुंगातील अधिकाऱ्यांच्या दुष्टप्रवृत्तीविरुद्ध जरी लढत होतो तरीही मी त्यांच्याशी नाते कायम ठेवून होतो....त्याचे कारण म्हणजे त्या नात्यामुळेच मी इतर कैद्यांचे प्रश्न, वा इतर प्रश्न घेऊन त्यांच्याशी बोलू शकत होतो."
आज माझ्या गल्ल्या ह्या कचऱ्याने फुललेल्या असतात, व 'मी त्याची तक्रार घेऊन महानगरपालिकेकडे गेले की तेथून बाहेर पडताना मनस्तापापलीकडे काहीही होत नाही' असा विचार करून मी पुन्हा कधीही त्या अधिकऱ्यांसमोर न जाणे, त्यांचे तोंडही परत न बघणे हे चुकीचे नव्हे काय ?  त्यात समाजाचे नुकसान नाही काय ?
आणि त्याही पुढे जाऊन मंडेला ज्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते, ज्या तक्रारी घेऊन ते त्यांचे दरवाजे ठोठावत होते, त्या तक्रारी शारीरिक व मानसिक छळाच्या होत्या. आपल्याला तुरुंगात टाकले, ह्याचा अर्थ जो बदल मी घडवून आणू इच्छितो तो आता आणू शकत नाही, हा असा निराशाजनक विचार कुठेही आढळत नाही. त्याउलट माझा स्वत:वर विश्वास आहे. त्यामुळे परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे आणि तो बदल घडवण्यासाठी मी प्रयत्न करण्याचे कधीही सोडणार नाही, हा आत्मविश्वास त्यात दिसतो.

स्वत: तुरुंगात असताना,  दुसऱ्या तुरुंगात असलेल्या आपल्या पत्नीला पत्र लिहिताना मंडेला लिहितात, "तुरुंगात असताना तुझ्या हे लक्षात येईल की स्वत:ला ओळखण्यासाठी, स्वत:च्या मनाचा शोध घेण्यासाठी तुरुंग ही एक उत्तम जागा आहे. स्वत:तील वाईट प्रवृत्ती जाणून घेऊन त्यावर मात करणे, व चांगल्या प्रवृत्ती वाढीस नेणे; रोजचे ध्यान, पंधरा मिनीटांचे ध्यान, ह्यासाठी फार चांगले आहे. तुला सुरवातीला आयुष्यातील नकारात्मक गोष्टी जाणून घेणे कठीण जाईल परंतु, दहाव्या प्रयत्नाला नक्की यश लाभेल. एखादा संत हा निराश न होता सातत्याने प्रयत्न करीत असलेला एक पापी असतो, हे तू कधीही विसरू नकोस."

तुरुंगातील रखवालदारांबद्दल स्टेंगल मंडेलांना विचारतात,"तुरुंगातील रखवालदार तुमच्या राजकीय चर्चेत देखील भाग घेताना दिसतात...हे कसे काय ? काय ते त्यांची मते मांडतात ?"
मंडेला त्यावर म्हणतात,"ते प्रश्न विचारतात. जेव्हा माझा त्यात संबंध असतो तेव्हा मी कधीही रखवालदारांशी राजकीय चर्चेला सुरुवात करीत नाही. मी त्यांचे म्हणणे ऐकतो. ज्यावेळी एखादा मनुष्य काही विचारणा करीत असतो, त्यावेळी जर तू त्याला प्रतिसाद दिलास तर तुझ्या सांगण्याचा त्याच्यावर चांगला परिणाम होऊ शकतो."
महासागरामधील बरेच शिंपले मी वेचले. त्यातील काही...
"तू बुद्धी वापरून जर वाद घातलास तर शत्रू देखील तुझ्याविषयी मनात आदर बाळगतो."
"...परंतु, ज्यावेळी माझे व तुझे मतभेद पराकोटीस पोचतात, त्यावेळी जर ते वाद तत्वासंबंधी आणि विचारासंबंधी असतील आणि त्यात वैयक्तिक तिरस्काराची भावना नसेल, तर मला आनंद होईल. आणि तसे झाल्यास युद्धाअखेर, काहीही निकाल असला तरीही, मी अभिमानाने तुझ्याबरोबर हस्तांदोलन करू शकेन. कारण मी न्यायी व लायक माणसाशी लढलो असेन, ज्याच्या अंगी मान, सन्मान व सभ्यता आहे."

आपल्या देशातील सध्याच्या परिस्थितीवर त्यांची जवळजवळ सगळीच विधाने प्रकाश पाडून जातात. आणि मग आपल्याकडील नेतागिरी सर्वच बाबींत दरिद्री ठरते.

आपल्या मुलीला ते लिहितात,"ज्यावेळी एखादया प्रणालीचा (system) विचार केला असता, व्यक्तिगत सज्जनपणा हा गैरलागू असतो. तुम्ही, झेनि, माकी,... (मंडेलांच्या कन्या, त्यांच्याबरोबर काम करणारी तरुण मंडळी) आणि इतर तरुण मंडळी...हे सर्व एक समान कल्पना, विचार घेऊन एकत्र येता व समान योजनेचा पाठपुरावा करता, त्यावेळी गोष्ट वेगळी असते. त्यावेळी जुनी प्रणाली बाजूला सारली जाईल, आणि नवीन प्रणालीचा उदय होईल. संपूर्ण प्रणाली बदलायला हवी. तेव्हाच फक्त चांगल्या माणसांना त्यांच्या देशासाठी, देशवासीयांसाठी काम करण्याची संधी मिळेल...."

कालच्या सर्व वर्तमानपत्रामध्ये एक बातमी समान होती...
२९ दिवसांत ८० हजार सुचना.
दिल्ली बलात्काराच्या घटनेनंतर केंद्र सरकारने २३ डिसेंबर रोजी वर्मा समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. 'हा अहवाल माझ्या नावाने ओळखला जाणार असला तरी त्यातील शिफारसी देशातून आणि परदेशातून आलेल्या नागरिकांच्या सूचनांच्या आधारे बनवण्यात आला आहे. आम्हांला २९ दिवसांत ८० हजार सुचना मिळाल्या. या सर्व अभ्यासूनच आम्ही अंतिम अहवाल तयार केला. महिला अत्याचार रोखण्यासाठी आपली मते पाठवणाऱ्यामध्ये तरुण वर्गाचा मोठा सहभाग होता, याचे कौतुक करीत असता वर्मा म्हणाले, 'आमच्यासारख्या जुन्या पिढीलाही ज्या गोष्टीची जाणीव नाही, त्या गोष्टी तरुण वर्गाने आम्हाला शिकवल्या.'

मंडेलांनी स्वत:शी मांडलेल्या संवादामधून...मला काही उत्तरे मिळतात...काही नवीन प्रश्न जागे होतात.
प्रश्न उभे रहाणे हे चांगलेच...त्यातूनच बदल घडून येऊ शकतात. नाहीतर एखाद्या एकाच जागी साचलेल्या पाण्याचे गढूळ डबकेच तयार होते. त्यातून फक्त डेंगू जन्माला येऊ शकतो. आणि काय ?

एक आशा पुन्हा जन्म घेते.
खोल रसातळाला बुडू लागलेल्या जहाजातून कोणी एक चिमुकला जीव, पुन्हा एकदा पाण्यावर यावा...घुसमटता श्वास त्याने परत घ्यावा...असे काहीसे वाटते....जाणवते...एकेक पान मी उलटत जाते तसतसे.


Sunday, 20 January 2013

माझा वाचनप्रवास

वेगवेगळे चित्रपट, नाटकं बघणे, एखादी संध्याकाळ संगीत ऐकत व्यतीत करणे वा पुस्तक वाचणे ह्या गोष्टी फक्त छंद म्हणून आपण करीत असतो असे आता वाटत नाही.
ह्या वयाला पोचल्यावर.

लहानपणी आम्हां मुलींना वाचनाचा नाद लागला ह्यामागे आमचे अभ्यासू वृत्तीचे बाबा होते. मात्र कोणतेही पुस्तक वा मासिक हे त्यांनी वाचून, तपासून झाल्यावरच आमच्या हातात पडे. म्हणजे अगदी गुरुनाथ नाईकांच्या रहस्यकथा देखील बाबा आधी वाचून घेत व त्यानंतर ते पुस्तक मला हातात घ्यावयास मिळे. त्यावेळी "बाबा तुम्ही लबाडी करताय! त्यात मी न वाचण्यासारखं खरं तर काहीच नाहीये ! पण तुम्हाला ते आधी वाचायचंय म्हणून तुम्ही मला देत नाही आहात !" हे आणि असे बरेच मुद्दे घेऊन मी बाबांशी भांडत असे. बाबा पलंगावर बसून पुस्तक वाचीत. आणि मी त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यात डोकावत राही. मुद्दाम. त्यामुळे तरी बाबा वैतागतील आणि मला पुस्तक देऊन टाकतील म्हणून. पण बाबा त्या रहस्यकथेत इतके रमून गेलेले असत की मी त्रास द्यायला मागे उभी आहे ह्याची त्यांना जरा सुद्धा जाणीव होत नसे. कधीतरी...अगदी कधीतरी...बाबांचं वाचून होण्याआगोदर, बाबुराव अर्नाळकर मला हातात सापडीत असत. बाबा अंघोळीला गेले, वा कचेरीत गेले की मी त्यावर झडप घालीत असे. त्यामुळे मेनका मासिक वा चंद्रकांत काकोडकर, भाऊ पाध्ये आमच्या घरी कुठेही मिळणे अशक्य. गुरुनाथ नाईकांबरोबर वेताळ, मॅन्ड्रेकनी तर माझं बालपण भारूनच टाकलं होतं. माझी मावसभावंड कुठून तरी कॉमिक्स मिळवित आणि मी ती हपापून वाचीत असे. अगदी रस्त्यावरून चालताना देखील. आणि त्यावेळी रस्ते इतके शेफारलेले नव्हते. त्यामुळे त्याच्या डाव्या कडेकडेने हातात पुस्तक धरून चालणे तसे काही फारसे धोक्याचे नसे.

आई सुद्धा तिच्या कचेरीच्या वाचनालयातून आमच्यासाठी गोष्टींची पुस्तकं आणीत असे. तिने आणलेल्या पुस्तकांमध्ये आठवण येते ती हॅन्स अॅण्डरसनच्या परीकथा...आंगठ्या एव्हढी थम्बलिना...बर्फाळ प्रदेशातील दोन छोट्या मुलांची कथा. आपल्या हरवलेल्या मित्राला शोधण्यासाठी जिवावर उदार होऊन निघालेली ती छोटीशी मुलगी. हृदय बर्फाचे होऊन गेलेला तिचा तो मित्र...अगदी डोळ्यांत पाणी वगैरे. भा. रा. भागवतांनी तर माझ्या पुस्तकविश्वात कमालच केली होती...फास्टर फेणे ! जादूचे गलबत...असेच काहीसे नाव होते...मुखपृष्ठावरील चित्र देखील स्पष्ट आठवते. काळेभोर आकाश...निळा निळा समुद्र...त्यावर तरंगणारे गूढ जहाज. चंद्रावर स्वारी. ना. धो. ताम्हणकर...गोट्या...चिंगी. साने गुरुजी...श्यामची आई. त्यांच्या अजून कितीतरी कथा आठवतात...त्यातील चित्रं आठवतात. एक गोबऱ्या गोबऱ्या गालांची फुलं विकणारी अनाथ मुलगी...तिला अचानक भेटणारी तिची आई. सज्जन माणसाच्या शोधात आकाशातून आलेली फुलांची माला....अहाहा. टारझन आणि त्याच्या शौर्यकथा ! गलिव्हर देखील तेव्हाच कधीतरी आयुष्यात आला. आणि त्याच्याबरोबर बुटक्यांच्या राज्यात मी फिरले. विं. दा. करंदीकर ! रात्री बिछाने घातल्यावर त्यावर बसून मी हेंगाड वेंगाड...आली आली भुताबाई...चार माणसे रोज खाई...ही त्यांची लांबसडक कविता फार नाटकं करून माझ्या दोन धाकट्या बहिणींना ऐकवीत असे. आणि त्या देखील न कंटाळता तीच तीच भुताबाईची कविता रोज मला म्हणायला लावीत असत. रोजचे नाटक.

जेवणाच्या टेबलावर बसून पुस्तक वाचणे हे सुद्धा मी बाबांकडूनच खरं तर शिकले होते. मी फक्त त्याचं अति केलं म्हणून मग मला ओरडा बसू लागला...आईकडून ! खुर्चीत पाय वर घ्यावयाचे...डाव्या हातात पुस्तक धरायचं आणि उजव्या हाताने जेवायचं. ताटातलं जेवण संपलेलं पत्ता नाही...आई काय विचारतेय...ऐकू येत नाही...अशी अवस्था.

आपल्या मुलीला चित्र काढून काही पैसे मिळणार नाहीत ह्याची खात्री असल्यामुळे असेल वा तिला तिचे स्वत:चे उत्त्पन्न मिळावे ह्या विचारामुळे असेल, बाबांनी मला टंकलेखनाच्या वर्गांना घातले होते. दादर स्थानकासमोर ते वर्ग भरीत असत. मी नियमित तिथे जाई. त्याची पहिली परीक्षा देखील मी दिली होती. मला वाटतं माझ्या टंकलेखनाला ४० पर्यंत गती आली होती. जाताजाता मग मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे सभासत्व घेतले. आणि मग वाचनासाठी बाबांवर अवलंबून रहाणे कमी झाले. मी कोणती पुस्तकं घेऊन घरी येते ह्यावर त्यांचे बारीक लक्ष असे ते वेगळंच. त्यावेळी ना. स. इनामदार ह्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या मोठ्या एकाग्रतेने मी वाचल्या होत्या. झुंज, राऊ, शहेनशाह ही नावं आता आठवतात. नंतरच्या कालावधीत एका मित्राची आर्थिक अडचण सोडवण्यासाठी त्याच्याकडील बरीच मराठी पुस्तके मी विकत घेतली होती. त्यात औरंगजेबावरील कादंबरी 'शहेनशाह' होती. मग कधीतरी बाबांनी रामायण महाभारताचे मोठे संच विकत आणले. त्यातून मी त्या महाकथांच्या खोलात शिरले. एकेक पान नवी कथा...एकेक पान नवे व्यक्तिमत्व.

आमचे कधी कपड्यांचे लाड झाले नाहीत. पण खाणे आणि पुस्तके ? मुबलक ! बाबांनी कपड्यांची हौस केली नाही. त्यांनी कधीही रंगीत कपडे अंगावर घातले नाहीत. कायम पांढराशुभ्र शर्ट आणि पांढरी विजार. चामड्याच्या भरभक्कम चपला. मुंबईच्या वेगवेगळ्या रस्त्यांवरील रद्दीवाल्यांशी त्यांची पक्की दोस्ती. तेही पाटलांना आवडतील अशी पुस्तके बरोबर ओळखून बाजूला काढून ठेवीत. बाबांनी आपल्याला बढती देण्यात येऊ नये अशी विनंती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याजवळ सुरवातीलाच करून ठेवली होती. कारण एकच. "मला बढती दिलीत तर मला इथे जास्तीचे तास बसून काम करायला लागेल. आणि ते मला जमणारे नाही. मला घरी जाऊन माझे वाचन व लिखाण करावयाचे असते. ते माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे."

मे महिन्याच्या सुट्टीत घराजवळील किर्ती महाविद्यालयामध्ये त्यावेळी लहान मुलांसाठी वाचनालय चालवले जात असे. भारी सुंदर उपक्रम होता तो. त्यावेळी तेथील वाचनालय ऐसपैस सभागृहात होते. आत शिरल्याशिरल्या समोर मोठ्या खिडक्या...त्यातून आत येणारा स्वच्छ सुर्यप्रकाश. वेगवेगळ्या कपाटांमध्ये दडलेला खजिना. आपण त्यातून अलगद फिरायचे...पुस्तके हातात घ्यावयाची...चाळावयची...कधी एखाद्या खिडकीजवळ बसून त्या पुस्तकात डुबकी मारायची...तर कधी त्या पुस्तकाला हातात घट्ट धरून घरी परतावयाचे. सकाळी जर त्याला आपण ताब्यात घेतले असेल तर दुपारपर्यंत त्याचा शेवट गाठावयाचा...आणि मग पुन्हा...कीर्ती महाविद्यालय....तेथील खिडक्या....आता फक्त ऊन उतरलेले....सूर्यकिरणे थोडी मवाळ....कपाटे अथक जागच्याजागी आपली वाट बघत उभी...एका दिवसात दोन पुस्तकांचा फडशा !

प्रेमात पडल्यावर, लग्न झाल्यावर आणि लेक मोठी झाल्यावर...माझ्या स्वत:च्या आजवरच्या आयुष्याचे ३ टप्पे मला दिसून येतात. कुठलीही गोष्ट करायला घेतल्यावर भान हरपून करण्याचा स्वभाव असल्याने प्रेमात पडल्यावर वाचन कमी झाले. मिल्स अॅण्ड बुन्स फार वाचली गेली नाहीत ह्याला कारण पुन्हा बाबाच. एखाददुसरी जी काही वाचली, त्यातील 'टॉल, डार्क अॅण्ड हॅण्डसम' कुठे रोजच्या आयुष्यात आढळला नाही. त्यानंतर हातात पडलं ते शांता शेळके ह्यांचं चौघीजणी ! ह्या पुस्तकासाठी मात्र माझं भांडण बाबांशी नव्हे तर माझ्या धाकट्या बहिणीशी फार झाले. तिच्या आधी उठून ते पुस्तक ताब्यात घेणे, न्हाणीघर, संडासमध्ये जाताना देखील पुस्तक हातातून खाली न ठेवणे, घराबाहेर पडताना पुस्तक घेऊनच बाहेर पडणे हे सर्व प्रकार मी ह्या पुस्तकासाठी केले. जर हे करण्यात मी कुठे कमी पडले, तर माझी बहिण हमखास पुस्तक पळवून नेई. आणि मग तिच्याकडून परत मिळवण्यासाठी फार मोठा लढा द्यावा लागे. तेव्हाचा मित्र (नंतर नवरा...हे आधीच सांगून टाकलेलं बरं ! ) डोंबिवलीवरून येत असे व मी दादरवरून. एकमेकांना भेटण्यासाठी आम्ही आमच्या कॉलेजजवळचे व व्हीटी स्थानकासमोरचे एक बसस्थानक निवडले होते. तिथे मी 'चौघीजणी' घेऊन वाचत उभी राही आणि आपण कोणाची वाट पहात आहोत हेच विसरून जाई. तेव्हाही आपल्या गाड्या उशिरानेच धावत असल्याकारणाने मी नेहेमीच आधी पोचत असे. व तो चांगला तास दोन तास उशिरा येई. पण पुस्तकात रमल्याकारणाने तास उलटून गेला आहे ह्याचे मला भानच नसे. त्यामुळे माझ्या आयुष्यातील 'त्याचे' महत्त्व कमी होऊन 'चौघीजणी' चे महत्त्व फार वाढले आहे असा त्याचा समज झाला व त्याने माझ्या बसथांब्यावरील वाचनाला जोरदार विरोध दर्शवला. तसेही आपल्याला डोके आहे, विचारशक्ती व मत असू शकते ह्याची त्या वयात मला फारशी जाणीव नव्हती.

यानंतर लग्न. नोकरी दादरला आणि घर डोंबिवलीला. मग मी रेल्वे स्थानकापासून घरी पोचण्याच्या रस्त्यावर दुसरे वाचनालय शोधून काढले. आगगाडीत बसून पुस्तक वाचण्याची सवय जडवून घेतली. आता ह्यावर नवऱ्याची बंदी येण्याची तसे काही कारण नव्हते. त्या कालावधीत मी असे मोठे काय वाचले...तर फारसे काही आठवत नाही. स्वयंपाक करणे ही नवी जबाबदारी अंगावर पडल्याने बहुधा अर्धे लक्ष तेथेच असावे.

मग माझ्या लेकीचा जन्म झाला. आणि मी संसारात बुडून गेले. मातृत्वाच्या सुखावधीत वाचलेली पुस्तके म्हणजे बेन्जामिन स्पॉक ह्यांचे 'बेबी अॅण्ड चाईल्ड केअर' आणि डॉ. वागळे ह्यांचे 'बालसंगोपन.' बस इतकंच. त्यातील माहिती वाचून मी माझ्या लेकीवर बरेच प्रयोग करीत असे. आणि त्यातले एक दोन तर फार चुकीचे. म्हणजे तीन महिन्याच्या बाळाला उकडलेल्या अंड्याचे पिवळे तुम्ही देऊ शकता हे मी 'बालसंगोपन'मध्ये वाचले. व चिमुकल्या चमच्यात बोटाच्या अर्ध्या पेराइतके उकडलेले पिवळे घेऊन लेकीला चाटायला मी दिले. आता ह्यात माहिती अशी होती, की डॉक्टरांनी हे पिवळे एखाद्या फळाच्या रसात मिसळून द्या असे लिहिले होते. व मी नेमके तेच वाचले नव्हते. त्यामुळे चमच्यामध्ये फक्त पिवळा बलक मी घेतला व लेकीला चाटवला. एका क्षणात तिने भडाभडा सगळे आधीचे जे खाल्ले होते तेही उलटून टाकले. असाच एक चुकीचा प्रयोग म्हणजे गाजराचा रस बाळांसाठी फार पौष्टिक आहे असेही त्याच पुस्तकात लिहिले होते. व म्हणून मी एक दिवस मारे गाजरे किसली. त्यांचा रस बाटलीत भरला व तिला पाजला. आता हे अजिबात लक्षात आले नाही की तिला मी फक्त एखाददुसरा चमचा रस द्यावयाचा होता. मी बाटली तिच्या तोंडाला लावली आणि तिने ती रिकामी केली. जेमतेम आठ महिन्याची माझी लेक त्यापुढील पंधरा दिवस फार आजारी पडली. जी काही गुटगुटीत दिसू लागली होती, ती अगदी निम्मी झाली.
हे असे माझे पुस्तक वाचून केलेले प्रयोग. त्याची बळी माझी लेक. ती वर्षाची होईस्तोवर लिखाण केलं ते देखील तिच्या आयुष्यातील पहिलं वर्ष, ती मोठी झाल्यावर तिला वर्णून सांगता यावं म्हणून. 'Baby's record book' मध्ये.

बाबांना जेव्हा छातीत दुखतंय म्हणून मी हिंदुजामध्ये रात्री घेऊन गेले, त्यावेळी इसीजी वगैरे ठीक आला म्हणून तेथील डॉक्टरांनी आम्हाला परत घरी पाठवून दिलं. मग पहाटे बाबांना परत अस्वस्थ वाटू लागलं आणि अॅम्ब्युलन्स बोलवावी लागली. दोन माणसं स्ट्रेचर उचलू लागली. आणि बाबा त्यांच्या काळजीत पडले. "तुम्हाला जड पडतंय का हो ?" आईने बाबांच्या हातावर साखर ठेवली. आम्ही हिंदुजामध्ये पोचलो. बाबा तेथील बिछान्यावर लवंडले. दुपारपर्यंत सगळे डॉक्टर जमा झाले. मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले. "पाटील त्यांना पहिला झटका आला होता त्याच अवस्थेला आता पोचले आहेत. काही सांगता येत नाही." आणि तसेच झाले. बाबांना नाकातोंडात वेगवेगळ्या नळ्या लावल्या गेल्या. बोलणं अशक्य झालं. मी समोर उभी होते...मला बाबा काहीतरी खुणा करीत राहिले. कसे कोण जाणे, मी मागे वळले...आणि तिथल्या नर्सकडे धावले..."मला तुमची वही आणि पेन्सिल द्या ! प्लीज पटकन द्या !" मी त्यांनी दिलेला कागद आणि पेन घेऊन धावत बाबांकडे आले. "बाबा, ह्याच्यावर लिहा....काय हवंय तुम्हाला ? काय होतंय तुम्हाला ?" 
बाबांनी कागद धरला...आणि लिहिलं...
"मला पुस्तकं वाचायचीत"

आज आता मी वाळिंब्यांचे 'हिटलर' वाचते. 'आणीबाणी आणि आम्ही' हे मित्राकडून मागवून घेते. नेल्सन मंडेला ह्यांचे 'Conversations with Myself' हे मित्रमैत्रीणींकडून हक्काने वाढदिवसाची भेट म्हणून मागून घेते. आता का कोण जाणे कथाकादंबऱ्यामध्ये मन नाही रमत.
आज पुन्हा बाबा हवे होते....
मी काय वाचते आहे ह्यावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवणारे...
मी वाचावी अशीच पुस्तकं घरी घेऊन येणारे.
नेल्सन मंडेला वाचता वाचता काही अधोरेखित करून ठेवावसं वाटतं...पण त्यावेळी प्रश्न पडतोच...मी हे नक्की कशासाठी आणि कोणासाठी खूण करून ठेवते आहे ?
काय माझे बाबा त्यातून काही मला समजावून सांगणार आहेत ? त्यावर माझ्याशी चर्चा करणार आहेत ? मी खूण केलेली वाक्यं त्यांना देखील आवडतील काय ? मी त्यावर विचार करतेय हे बघून त्यांना माझा अभिमान वाटेल काय ?
बाबांनी सगळी पुस्तकं स्वत: आधी वाचायला घेतली...'सेन्सॉर' केली तरी आता माझी त्याला हरकत नाही.
आजही मी गपचूप त्यांच्या मागे उभी राहून त्या पुस्तकात डोकावेनच की ! आणि तसंही बाबा वाचनात इतके दंग होऊन जातात की त्यांना कळत सुद्धा नाही...किती वेळ उलटून गेला, मी त्यांच्या पुस्तकात डोकावते आहे...आणि त्यांचाच वेग पकडून वाचायचा प्रयत्न करते आहे...
नाहीतर माझं अर्धवट वाचून होईल...आणि बाबा पान उलटतील ना....?!

Tuesday, 15 January 2013

ताई...माई...अक्का...

काहीतरी जबरदस्त चुकतंय !

वसंत ढोबळे...
आणि विलेपार्ले येथील पदपथावरील विक्रेते...
ढोबळे यांची बदली रोखण्यासाठी स्थानिक रहिवाश्यांचे आंदोलन वगैरे...

मी मुंबईतील नागरिकांची विचारधारा बरोबर पकडण्यात कमी पडते आहे की काय असा मला हल्ली बऱ्याच वेळा प्रश्न पडतो...
मी मुंबईत जन्मले...मुंबईत वाढले...आणि ज्या काही देशीपरदेशी वाऱ्या केल्या त्या फक्त, इतर देशांविषयी देखील जाणून घेण्याची इच्छा आणि अधूनमधून आर्थिक स्थिती बरी असते म्हणून.
ह्याचा अर्थ मी एक मुंबईकर आहे...मी माझे आयुष्य मुंबईतील लोकांबरोबरच काढले आहे.
मग तरीही....तरीही काही प्रश्नांची उत्तरे मला का मिळत नाहीत ?

काही वर्षे उलटली ह्या घटनेला. तो विजयादशमीचा आदला दिवस होता. माझ्या हाती दुचाकी होती. पहाटे उठून, शुचिर्भूत वगैरे होऊन दाराला टपोरे भगवे, हिरवे तोरण लावण्याची आपली परंपरा मला भारी आवडते. म्हणजे मी चांगली चारपाच तोरणे घेऊन, माझ्या दारी, आईच्या घराच्या दारी, चारचाकीच्या गळ्यात...अडकवते. त्याच हेतूने मी त्या दिवशी, दादर फूलबाजाराच्या दिशेने माझी दुचाकी काढली होती. तिथे पोचण्याचा रस्ता हा एकमार्गी आहे. म्हणजे बाजाराच्या दिशेने आपण आपले वाहन नेऊ शकतो...पण दादर स्थानकाकडे पाठ करून आपण कबुतरखान्याकडे येऊ शकत नाही. मी ज्यावेळी बाजाराच्या दिशेने निघाले त्यावेळी तो रस्ता गर्दीने फुलला होता. बाहेर गाडी पार्क करण्याची परवानगी नाही आणि रस्ता एकमार्गी आहे...त्यामुळे मी माझी दुचाकी आत नेऊ लागले. दोन्ही रस्ते फुलं आणि तोरणं घेऊन बसलेल्या विविध विक्रेत्यांनी बजबजले होते. विक्रेते आणि अर्थात ग्राहक. मी हळूहळू त्यातून मार्ग काढीत होते. अचानक माझ्या डाव्या हाताला खरेदी करणाऱ्या एक मध्यमवयीन महिला खेकसल्या. "ए बाई ! कुठे निघालीस ? दिसत नाही का गर्दी किती आहे ते !"
माझे वागणे जर बरोबर असेल तर तशीही मी माझा मुद्दा मांडल्याशिवाय गप्प बसत नाही. आता समोरच्या माणसाने माझा मुद्दा पटवूनच घ्यावा अशी मी जबरदस्ती तर नाही करू शकत. कारण शेवटी हे ज्याच्या त्याच्या बुद्धिबाहुल्यावर अवलंबून आहे.
"मलाही तोरण घ्यायचंय...म्हणून मी आत बाजारात चाललेय !"
"गर्दी दिसत नाही का तुझ्या डोळ्यांना ?"
"दिसतेय ना....चार चार डोळ्यांनी दिसतेय. पण ही सर्व गर्दी रस्त्यावर बेकायदेशीर बसलेल्या विक्रेत्यांमुळे आणि त्यांच्याकडून खरेदी करणाऱ्या लोकांमुळे झालीय...हेही मला दिसतंय...आणि मी काही 'नो एन्ट्री' असलेल्या रस्त्यात घुसत नाहीये ! उलट तुम्ही...त्या रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्याकडून का बरं तोरण घेताय ? आत जा ना बाजारात ! तिथे पण मिळतील फुलं आणि तोरणं !"
हे माझे उद्गार ऐकल्याबरोब्बर बाई ज्याच्याकडून फुलं घेत होत्या तो विक्रेता माझ्या अंगावर खेकसू लागला...व त्याच्याबरोबर दुसरे विक्रेते आवाज चढवू लागले.
सर्व विक्रेत्यांमध्ये एकी होती.
आणि आम्हा नागरिकांत ?
"ए बाई ! निघ ना आता...!" बाई ओरडल्या.

जिथे जिथे धंदा मिळणार आहे तिथे तिथे हे विक्रेते आपल्या गाड्या, टोपल्या घेऊन बसणार आहेत. त्यांची बायकापोरं, घरदार सोडून ते मुंबईत दाखल झालेले आहेत...फक्त पैसे कमावण्यासाठी. त्यातील 'व्यावसिक समाधानासाठी' निश्चितच नाही. पटतंय ?
मग जर हे आपल्याला पक्के माहित आहे तर, रस्त्यावर आपला धंदा उघडून बसलेल्या विक्रेत्यांकडून आपण मुळात खरेदीच का करतो ?
आपण दिलेल्या त्या पैश्यांच्याच जोरावर ते आपल्या रस्त्यांवर फैलावत चालले नाही आहेत काय ?
त्यातली दुसरी गोष्ट अशी, की आपण त्यांचा व्यवसाय चालवायला मदत केल्याने, कायदेशीररित्या जे दुकान उघडून बसले आहेत, त्यांच्या धंद्यावर आपण कुऱ्हाड मारीत नाही काय ?
त्याहून पुढे जाऊन विचार करून बघा, मुंबईत अशा प्रकारे रस्त्यावर देखील व्यवसाय मांडता येतो असा समज आपण आपल्याच कर्माने पसरवल्याकारणाने रोजच्या घटकेला अधिकाधिक माणसे मुंबईच्या विविध रस्त्यांवर आपापला माल घेऊन विक्रीला बसताना आपल्याला आढळत नाहीत काय ? 
अशी कोणती बाब आहे, ज्यामुळे आपण दोन पावले चालून, रीतसर दुकानांत खरेदी करीत नाही ?
आपणच आपल्याच कर्माने गुन्हेगारी पसरण्यास मदत करीत आहोत हे आपल्या ध्यानात येत नाही काय ?
आणि मग विलेपार्ल्याच्या, दादरच्या, वांद्राच्या, डोंबिवलीच्या त्या नागरिकांनी संगनमताने 'रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्याकडून खरेदी करणे' का थांबवू नये ?
त्यांच्यावर आपणच 'बहिष्कार' घातला तर येणारी मिळकत कमी झाल्याने ते आपोआप तेथून हलणार नाहीत काय ?
वा असे काही आहे की 'आपण कसे उत्तम 'बार्गेन'...घासाघीस...करू शकतो...व कशी एखादी वस्तू आपण आपल्या शेजाऱ्यापेक्षा कमी किंमतीत आणू शकतो' ही प्रौढी मारण्याची आपल्याला चटक लागली आहे ?
हेच जर आपण सर्वांनी ठरवून केले तर आपल्याला कशाला हवेत....कोणी अधिकारी....आपलेच पदपथ आपल्यासाठी मोकळे करून देण्यासाठी ?

अजून एक प्रश्न...आपले पुढारी, नागरिकांसाठी असे का नाही एखादे आवाहन करीत...'आपल्या पदपथांवर, रस्त्यांवर जे ठाण मारून बसले आहेत, अशा फेरीवाल्यांकडून ह्यापुढे कसलीही खरेदी करू नका....' ?

विचार करायला हवा...
ताई...माई...अक्का...
आपल्या व आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण आता तरी निदान हा विचार करायलाच हवा !

Monday, 14 January 2013

खारीचा वाटा

सतत काही ना काही घडत असतं. आणि त्यावर काहीही न करणे, त्यावर काही भाष्य न करणे, म्हणजे माझी विचार करण्याची शक्ती, मी स्वत:ला अमानवी औषधांचा नित्य डोस देऊन विचेतनावस्थेमध्ये ढकलली असा होतो.

मला रोजचे मरण मान्य नाही. मी एकदाच काय ते मरेन.

परवा एक छोटी मैत्रीण मला म्हणाली,"तुम्ही किती विचार करता !" ह्यावर देखील मी बसून विचार करते. पण मग मला कळेनासं होतं...आजूबाजूच्या परिस्थितीवर मी विचार करावयाचा नाही, त्यावर स्वत:ला जितके शक्य असेल तितके देखील करावयाचे नाही...मग नक्की मी काय करायचे तरी काय ? आणि 'इतका' विचार म्हणजे काय ? विचारशक्तीचे मापन कसे करावयाचे ? विचार करण्यावर बंधन घालणे म्हणजेच अर्धजीवित अवस्थेत स्वत:ला नेऊन सोडणे असे नव्हे काय ?

एकेक दिवस सरतो...समाजातील वेगवेगळ्या स्तरामधील माणसे भेटत जातात...त्यांच्याशी संवाद होतो...काही जण आपल्याला विचार करावयास भाग पाडतात...तर काही जण आपल्याला स्तिमित करतात.

समजा चार दिवस मी सकाळ संध्याकाळ शहरात टॅक्सीने प्रवास केला, तर मी एकूण आठ टॅक्सीचालकांना भेटले. मागे म्हटले तसे प्रत्येकवेळी मी चालकाला चार सुचना दिल्या. १...आपण उगाच भोंगा वाजवायचा नाही. २...आपण एकही सिग्नल तोडायचा नाही. ३...आपण झेब्रा पट्ट्यांवर गाडी उभी करावयाची नाही. ४...आपण खिडकीबाहेर थुंकावयाचे नाही. माझ्यासाठी हा मी करावयास घेतलेला प्रयोग होता. पहिल्या दिवशी मी जेव्हा टॅक्सीमध्ये बसले तेव्हा माझ्याकडून नकळत ह्या सुचना चालकाला दिल्या गेल्या होत्या. आणि जो काही परिणाम साधला गेला त्यातून मला माझ्या 'संवादा'तील शक्तीची जाणीव झाली. आणि मग हा प्रयोग मी चालू ठेवला आता मला माझी गाडी तंदुरुस्त होऊन परत मिळाली आहे. त्यामुळे एखाद्या नव्या चालकाशी संवाद साधण्याची माझी संधी हुकणार आहे. परंतु, ह्या गेल्या चार दिवसांत मला असा एकही चालक मिळाला नाही, १) ज्याने माझ्या सूचनांचे पालन केले नाही...२) वा त्याबद्दल तक्रार केली...३) वा माझे विचार पटत नाहीत म्हणून मला त्याच्या टॅक्सीमधून खाली उतरवले.
त्याउलट मला ऐकावयास मिळाले ते हे असे...
"मध्ये एकदा एक बाई माझ्या टॅक्सीमध्ये बसल्या. त्यांनी मला बसल्याबसल्या सांगितले....गाडी फास्ट चलाओ. मी म्हटले,"मॅडम सिग्नल जैसे होते हैं वैसे हम चलेंगे." पण त्या बाई मला म्हणाल्या, सिग्नलबिग्नल छोडो...जल्दी चलो. मग मी तीन/चार सिग्नल तोडले. आणि पुढे गेल्यावर मला पोलिसाने पकडले. मी पोलिसाला सांगितले, की माझ्या गिऱ्हाइकाने मला तसे सांगितले होते. तर पोलिसाने त्या बाईंना त्याबद्दल विचारले. आणि मग बाईंनी दंड भरला."
ह्यावर मी म्हटले," पर भाई मेरे, लायसन्स तो तेरा गया ना ? उस औरत का क्या बिगडा ?"
चालक म्हणाला," वो तो बात सही है...पर मैं आपको बता रहा हू के ऐसा होता हैं."
दुसऱ्या एका चालकाशी झालेला संवाद...
"ये बात तो एकदम सही कही आपने. ऐसा हि होगा....पर मैं एक बात सोचता हुं...इस शहर में मैं इतने सालों से टॅक्सी चला रहा हू...पर ऐसा मुझे कुछ बातानेवाली आप पहलेही हो. ऐसा क्यों ? कोई आज तक मुझे मेरी टॅक्सी नियम के अनुसार चलाने को बोला ही नही. जो भी आता हैं येही बोलता हैं ...भय्या, जल्दी चलो...लेट हुए हैं..."
"ऐसा हैं के जो विचार हम को बराबर लागते हैं वही विचार पकडके हमें चलना हैं...कोई गलत रास्ते पे जा रहा हैं या जाने के लिये हमें मजबूर कर रहा हैं तो चाॅइस आप के हाथ में है."
"हां...वो तो हैं...मैं तो टॅक्सी खडी करके बोल दे सकता हू...के भय्या ये हमसे नही होगा. नियम तो हम तोडेंगे नही....आप चाहिये तो दुसरी टॅक्सी पकड लिजिये."
"बिलकुल."
"आजकल क्या हो रहा हैं पता नही...पहले समझो मेरे बाजू में रहनेवाले का लडका किसी लडकी कि छेडछाड करते हुए मुझे दिखाई देता, तो मैं उसे एक चाटा मारता...क्योकि...जैसे मेरा बेटा है वैसे वो भी मेरा हि बेटा है....कुछ गलत काम कर रहा है तो मैं उसे रुका सकता था..पर अब ऐसा रहा नही...मैं ऐसा कुछ करने जाऊं तो खूनखराबा होगा...मेरे बाजूवाला मुझे पकडके मारपीट चालू कर देगा...वो सोचेगा नही...के ये जो बोल रहा है...मेरे बेटे को सिखा रहा है...वो सही है !...उस दिन क्या हुआ...मेरे बाजू में एक लड़का बाईक पे आके खडा रहा...मेरे पास सौ का छूटा माँग रहा था...जैसे ही मैंने छूटा निकाला उसने अपनी सौ की नोट मुह में पकड़ी थी...और मेरे हाथ से छूटा लेके एकदम बाईक से चल पडा...अब मैं क्या करता...बस...देखते रह गया...!"
"ये बाईकवाले तो मुझे मालूम हैं...नियम बिल्कुल नही मानते...कैसे भी बाईक चलाते हैं..." माझ्या ह्या विधानामागे मुंबईतील रस्त्यावर चालताना, व गाडी चालवताना आलेले अनुभव होते. मी स्वत: दुचाकी ह्याच रस्त्यांवर चालवली आहे...नियमांचा मान राखून.
"पर आज आपने बहोत सही बात कही...आज तक किसी नही कि थी...किसी को यहां टाईम नही....सोचने के लिये...और नियम तोडके ऐसे थाट करके चालते है जैसे हम नियम संभालनेवाले हि मूर्ख हो !"
"ऐसा हैं ना भय्या...समझो इनका गलत काम देखके हम भी गलत काम चालू करे...तो इसका मतलब तो ये हुआ ना...कि उनकी जीत हुई ?...और सही रास्ते पे चलनेवालों कि हार ?..मैं अब चार दिन से टॅक्सी कर रही हूँ..और हर एक ड्रायव्हर को मैंने वोही बोला जो आज आप को बोला...तो एक भी ड्रायव्हर ने तक्रार नही कि...उल्टा सब को मैं जो बोल रही थी...वो अच्छा और बराबर लगा ! तो क्या इसका मतलब ये हैं कि किसी को गलत काम करने में मजा नही आता...पर किसी को बदलाव लाना नही है...किसी को विश्वास नही है...के बदलाव उसे खुद से और खुद में लाना है...और वो खुद भी बदलाव ला सकता हैं...क्या आत्मविश्वास कि कमी है ?"
"बात तो सही है"
माझं घर आलं आणि माझा चार दिवसांचा टॅक्सी प्रवास संपला.

मी आठ चालकांशी संवाद साधला. प्रत्येकाला माझे विचार पटले. मी खाली उतरल्यावर देखील त्यांनी नियमांचा मान राखला तरच माझ्या बोलण्याला काही अर्थ आहे असे मी मानत नाही. कारण...गाडी शिकत असतानाच आपण हे नियम शिकतो. त्यामुळे खरं तर ते पाळायचे की नाही असा पर्याय असूच शकत नाही. किंवा, कोणाच्या सांगण्यावरून मी नियम तोडतो/तोडते असं कसं काय असू शकतं हेही माझ्या मनात येतंच. परंतु, जर कोणाच्या सांगण्यावरून गैर कृत्य होत असेल, तर कोणाच्या सांगण्यावरून चांगले काम का होऊ नये ?

आणि त्याहीपुढे जाऊन असं वाटतं, की आपण आपला प्रयत्न करत रहावे...कारण जर 'आपले कोणी ऐकत नाही...किंवा...त्यातून काहीही निष्पन्न होत नाही'...असा विचार करून आपण प्रयत्न करावयाचे थांबवले तर गैर व्यवहार वाढत आहेत म्हणून तक्रार करण्याचा आपला अधिकार आपण गमावून बसतो...
कारण हक्काची दुसरी बाजू ही शेवटी कर्तव्याची असते.

...आणि शेवटी, 'बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला शक्य असलेले प्रयत्न देखील आपण केले नाहीत' ही भावना घेऊन मरावे लागू नये...नाही का?

Friday, 11 January 2013

यात्रा की जत्रा ?

काही गोष्टी अनाकलनीय असतात. काही माणसांच्या विचारांना समजून घ्यावयाचे म्हटले तरी कठीण जाते. कारण आपण आपल्या अनुभवांतून आपले विचार तयार केलेले असतात. व जर ते विचार तत्वांवर आधारलेले असतील तर त्या विचारांची बोट कुठल्याही वादळात सापडून तिच्या चिंधड्या होऊ नयेत असा आपला प्रयत्न रहातो.

नमनाला घडीभर तेल !

काल हमरस्त्यावरून गाडी गेली. पवईच्या दिशेने. मी काही गाडी चालवत नव्हते. आणि गाडी न चालवता नुसतंच बसायला मला भारी आवडतं. माझं शहर म्हणजे फक्त, डावंउजवं वळण न रहाता...निळेशार अथांग आभाळ, नक्षीदार जुनी लाकडी खिडकी, डबक्यात अंगावरून शिंतोडे उडवणारा कावळा, असं बरंच काही दिसू लागतं.

घाटकोपरच्या आसपास नजर पडली ती पिवळा गणवेष घालून निघालेल्या मंडळींवर. गाडी पुढे जाऊ लागली आणि पदयात्रेत सामील झालेल्यांचा चढता आकडा लक्षात आला. सगळे तरुण दिसत होते. यात्रेच्या मुखाशी एक छोटी पालखी होती. लाल कापडाने गुंडाळलेली. अध्येमध्ये वाऱ्यावर हलणारी जरी. मंडळी हसतमुखाने चालली होती. मी गाडीतील सहप्रवाश्याला सहज विचारलं...
"ही मंडळी कुठे निघाली असावीत ?"
"शिरडीला !"
"कशावरून ? तसं काही लिहिलेलं दिसत नाहीये कुठे."
"म्हणजे शिरडीला जात असावेत...पालखी घेऊन."
"हं...सगळ्यांनी सुट्टी घेतली असेल...नाही का...कामावरून ?"
"हो...अर्थात !"
"पण नक्की काय करायचं काय असं पालखी नेऊन ?"
"मी कधी गेलो नाही असा...पण दहा दिवस वगैरे लागत असावेत...आणि एकत्र गप्पा मारत...खेळीमेळीत लोकं जातात...हे चांगलंच नाही का?"
"कसं काय ? चांगलं कसं काय ? शिरडीच्या साईबाबांच्या रहाणीमानाच्या अगदी उलटा कारभार तिथे चालू असतो...आणि अशा ठिकाणी हे असं आपण जायचं ह्याचा अर्थ आपण गैर विचारसरणीला पाठींबा देत आहोत असा नाही का होत ?"
"तितका विचार करायचा का पण ? निदान तरुण लोकं एकत्र येतात...आठ दहा दिवस एकत्र प्रवास करतात...काही नवनवीन कल्पना निघतात..."
"अहो पण...जिथे आपण निघालो आहोत...तिथला कारभार ज्या संकल्पनेवर चालतो तो आपल्याला पटतो का ? आणि जर पटत नसेल...तर मी हे असं शक्ती आणि वेळ घालवून जावेच का तिथे ? हे माझ्या देशातील तरुणवर्गाची शक्ती आणि वेळ वाया घालवण्यासारखे नाही का ? आणि असं जथ्याने तिथे जाणे म्हणजे त्या गैर कारभाराला पाठिंबा दिल्यासारखेच नाही का ? अगदी असं एकत्र यायचंच आहे...त्यांच्याकडे वेळ आहे...तर त्यांनी निघावं आणि एखादी आदिवासी पाड्यातील शाळा गाठावी आणि जे काही दिवस त्यांच्याकडे आहेत ते दिवस तेथील मुलांबरोबर काढावेत ! त्यांना काही शिकवावं...पुस्तकं वाचून दाखवावीत....!" माझा आवाज आता जरा चढलाच. जसं काही माझे सहप्रवासीच जबाबदार होते, त्या तरुणवर्गाच्या पदयात्रेला.
"हा एव्हढा विचार कोणी करत नाही !"
"पण करायला हवा ना...?" क्षीण स्वरात मी प्रश्न विचारला.
 "हो...करायला हवा...पण हल्ली आपले राजकारणी देखील हा असा तरुणवर्ग गोळा करतात...आणि त्यांना तुमचा खर्च आम्ही करतो...तुम्ही जा देवदर्शनाला...अशी गाजरं दाखवतात..."
"सगळा दोष पुढाऱ्याचाच असतो का? आपल्याला स्वत:ला विचार करता येत नाही का ?"
पालखीयात्रा आता बरीच मागे राहिली होती.
"...कोण जाणे...ही मंडळी जाणार देखील असतील...अशीच एखादे काही भले काम करत...आणि सर्वात शेवटी ते देवदर्शन घेणार असतील....नाहीतर तो देव तरी कशाला देईल आशीर्वाद ? वेळ फुका घालवला तर ?...Benefit of doubt देऊया त्यांना...!" मी म्हटले.
"हो...तसेही असेल...." सहप्रवासी शांतपणे उद्गारले.

Thursday, 3 January 2013

गुलाबी कांचन...दानव...मुक्ती...जिवंत मरण...आणि बरेच

दुरून बघितले तर प्रश्न पडावा...नारळाच्या झाडाला काय गुलाबी फुले येतात ? जवळ जावे तर हे असे...अंगणातील वाढत्या नारळाच्या कुशीत शेजारीच बहरलेल्या नाजूक कांचनचे गुलाबी फूल अलवार विसावलेले. जसे, शेजारच्या मुलीवर कोणा मुलाचे प्रेम बसावे, व तिनेही मोठ्या विश्वासाने त्याच्या भरदार छातीवर मान टेकावी. 
नाजूक मन...हळव्या भावना.

गेल्या मे महिन्यात शेजारणीने माझ्या डवरलेल्या आंब्याच्या झाडावर एकही आंबा शिल्लक ठेवला नाही. त्यावर भांडण झाले...बाईने जमिनीवर पडलेला दगड उचलून आमच्या घरी काम करणाऱ्याच्या अंगावर उगारला...मी त्या कृतीचे फोटो काढले...सोसायटीकडे लेखी तक्रार वगैरे नोंदवली गेली...मिटिंगमध्ये ह्यावर चर्चेचे एक सोंग आणले गेले. वगैरे.
त्या बाईंचे परवा कळले ते वक्तव्य असे...
"आमच्या लेकाने एखाददुसरा आंबा काढून घेतला असेल...ह्या बाईने त्याचा केव्हढा मोठा इश्यू केला...!"
ह्यावर विचार केला असता...ह्या घटनेमुळे माझे नुकसान असे कितीसे झाले ? शेकडा दोन शेकडा आंबे चोरीला गेले. त्यामुळे मला, माझ्या लेकीला, माझ्या मित्रमैत्रिणींना त्या आंब्यांचा स्वाद घेता नाही आला...तसे बघायला गेले तर माझे नुकसान ते काय ते हे इतकेच.

मी लहान होते त्यावेळची गोष्ट. भातुकलीच्या खेळाची नुकतीच ओळख झाली होती. माझ्याहून पाच सहा वर्षांनी मोठ्या मामेबहिणीच्या इटुकल्या पिटुकल्या खेळातून. छोटी वाडगी, चिमुकली चूल..सर्व काही तांब्यापितळेचं. काही दिवसांनी तिला तिची खेळणी सापडेनाशी झाली. आजीकडे एक गडी कामाला होता, महादू. बहिणीने घरभर शोधले, तिला काही तिची भातुकली सापडेना. महादू तिला म्हणाला," ताई, इथे ह्या घरी शोधून तुम्हाला नाही काही मिळणार. धाकट्या पाटलीणीकडे शोधा...सगळी भांडी सापडतील !"
त्यातील काही भांडी कधीतरी मी माझ्या घरी घेऊन गेले होते. हे जे आपण करतो आहोत त्याला चोरी म्हणतात हे काही वयाच्या पाचव्या वर्षी कळले नाही. आणि माझ्या मामेबहिणीने तिच्या वा माझ्या आईबाबांकडे तक्रार देखील केली नाही. त्यामुळे ती तिची खेळणी माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडेच राहिली. मी म्हणजे एक लाडोबा प्रकरण होते, त्याचे हे उदाहरण. मात्र, आज देखील ह्या प्रसंगाची आठवण माझ्या मनात कुठेतरी कोरून बसली आहे. आणि चोरी असे म्हटले की ती आठवण वर डोकावते. लाल ओल्या मातीत दडून बसलेल्या लाल गांडूळासारखीच. मान काढून वर डोकावते, आणि पुन्हा दडून स्वस्थ बसून रहाते.

शाळेत, जुई आणि मी एका बाकावर बसत असू. सहसा आमच्यात भांडणं होत नसत. त्यामुळे अख्खा बाक हा आमचा दोघींचा असे. मात्र, कधी काळी भांडण झालेच तर अगदी पट्टी लावून, मोजूनमापून, बाकाची रुंदी काढली जाई. मधोमध खडूने रेघ ओढली जाई. हद्द. अर्धा बाक तिचा, अर्धा माझा. मग कधी माझ्या एखाद्या पेन्सिलीने घरंगळत जाऊन तिच्या हद्दीत लोळण घेतली तर शांत होऊ घातलेलं भांडण पुन्हा उफाळून वर येई...आणि पुढे चालू राही. विझत चाललेल्या आगीत एखादा चमचा तेल वगैरे.

भरलेले आंब्याचे झाड रिकामे केले गेले होते हे सत्य.
१२/१३ वर्षांचा शेजारणीचा लेक. तिच्या मते, तिच्या लेकाने एखाद-दुसरा आंबा माझ्या अंगणातून काढला होता. आपल्या मुलाचा बचाव करताना, तिने दुसऱ्या माणसावर चोरीचा आळ घातला...त्याच्यावर दगड उगारला...आकांडतांडव केले. ह्या सर्व घटनेला तिच्या बाजूलाच उभा असलेला तिचा लेक साक्षीदार होता.

मुलांना पुढ्यात वा बाजूला बसवून आईवडील, चालवित असलेले वाहन सिग्नल न पाळता जेव्हा भरधाव पळवीत असतात, तेव्हा ते 'आपण नियम पाळणे हे जरुरीचे, गरजेचे नाही.' हे आपल्या मुलांच्या मनात बिंबवीत असतात. उद्या पुढे ज्यावेळी त्या मुलाच्या/मुलीचा हातात वाहन येईल त्यावेळी त्याच्या/तिच्या चुकीने झालेल्या एखाद्या अपघातात जर त्याचे /तिचे निधन वा आयुष्यभराचे अपंगत्व आले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या पालकाच्या शिरावर आहे.

उद्या मोठे झाल्यावर मुलगा अफरातफर, बलात्कार अशा प्रकारच्या गुन्ह्यांत गुंतू लागला तर 'एखादी वस्तू माझी नसताना देखील ती बळजबरीने हिसकावून घेऊन त्यावर ताबा मिळवणे' ही वृत्ती बळावण्यामागे, लहानपणापासून नीट संस्कार न होणे हे प्रबळ कारण आहे.

अनेक लेख सध्या वाचनात येत आहेत. बरेच इंग्रजी भाषेतील. संशोधनात दिसून आले आहे ते असे, ८०% बलात्कार हे त्या स्त्रीच्या परिचयातील माणसांनी केलेले असतात. ज्यावेळी विधवा विवाहविषयक कायदा नव्हता त्यावेळी घरातील विधवेवरील अत्याचारांना सीमा नव्हती. घरातीलच, काका, मामा, सासरे, दीर, हेच गुन्हेगार असत. त्यावर बाहेर तोंड उघडणे अशक्यप्राय. स्त्रियांनी केशवपन करावे, त्यांनी अंगावर लाल वस्त्र परिधान करावे हे समाजाने त्यांच्यावर लादलेले नियम. तसे करून देखील त्यांच्यावरील अत्याचार काही कमी झाले नव्हते. ह्याचा अर्थ स्त्रियांनी अंगभर कपडे घालावेत. त्यामुळे त्यांच्यावर आक्रमणे होणार नाहीत असे म्हणणे चुकीचे ठरेल.

हद्द. ते तुझं. हे माझं.
हद्द. एक मर्यादा.

काल सकाळी मी घरातील महत्त्वाची परंतु मागे पडलेली कामे करण्यासाठी सुट्टी घेतली होती. सर्व गरजेचे कागदपत्र हातात घेऊन पायी निघाले होते. समोर कॉलेज आहे त्यामुळे देशाची भावी पिढी सतत समोर असते. पाच सहा तरुण मुलांचा घोळका कोपऱ्यावर उभा होता. त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. हसणे खिदळणे चालू होते. त्यांच्या बाजूने पुढे सरकता सरकता एक संवाद कानी पडला. तेव्हा मी मान फिरवून हे कोण बोलले म्हणून बघितले. नाकावर जाड भिंगाचा चष्मा, रंग काळा, उंची तशी कमी. "जा जा...घे तिला !" त्याचे उद्गार हे होते. समोर उभ्या असलेल्या मित्राला तो हा सल्ला देत होता. सगळे त्याचे मित्र त्यावर खिदळले. 'घे तिला' ह्याचा अर्थ 'तिची फिरकी घे' इतका माफक असावा अशी मी माझ्या मनाची भाबडी समजूत काढली. व त्या कधीही न बघितलेल्या मुलीचे भले चिंतून पुढे निघाले.

मर्यादांचे उल्लंघन.

एखादा चित्रपट, एखादे नाटक आपण ज्यावेळी बघायला जातो, त्यावेळी बऱ्याचदा एखादा अश्लील विनोद समोर पडद्यावर वा मंचावर केला जातो. अंधारलेले प्रेक्षकगृह खदखदुन हसते...पुरुष आणि स्त्रिया. कदाचित त्याच विनोदावर तीनचार मित्रांमध्ये तीच माणसे हसणार नाहीत. बिचकतील. परंतु, झुंडीमध्ये असताना आतील भावना बेधडक बाहेर येतात. गर्दीला चेहरा नसतो. आपल्याला मात्र आपले मन गर्दीत देखील हसू देत नाही. हे आपल्यावर झालेले संस्कार असतात. आपल्या आईवडिलांनी व आपल्या शाळेने केलेले.

'बलात्कार करणाऱ्या माणसाला फाशीची शिक्षा दिली जावी' ही एक मागणी आजच्या समाजाची.
ज्या दुर्दैवी स्त्रीवर बलात्कार होतो...त्या घटनेनंतर प्रत्येक क्षणाला ती मरणाला सामोरी जाते. मग ज्याने बलात्कार केला त्याला एका क्षणात का बरे मुक्तता मिळावी ?
फाशी वा कुठलेही मरण, ही वेदनेपासून वा दु:खापासून मुक्ती नव्हे काय ?
जेव्हा आपण धावत्या जगाची गती पकडायला निघतो तेव्हा आपले आपल्या गत माणसांचे दु:ख देखील बोथट होते.
मग फाशी दिलेल्या माणसाची सतत आठवण काय माझ्या मनात जागी रहाणार आहे ?
त्या ऐवजी शिक्षा ही 'रोजचे मरण' अशी का दिली जाऊ नये ?
कदाचित शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिक्षेसारखी. शिक्षा ताबडतोब फर्मावली जाणारी.
हातपाय तोडा आणि समाजात जगण्यास सोडून द्या.
त्या माणसाला ही जन्माची शिक्षा आणि वेदना.
समाजाला जळते जागते डोळ्यांसमोर उदाहरण.

'आई, तू मला शिकवलेस म्हणून कधी मला ट्रॅफिक पोलिसाने पकडले ना तर मी काही त्याला पैसे चारायला जात नाही. मी माझे लायसन्स जप्त होऊ देते. आणि नंतर दंड भरून ते ताब्यात घेते. पण माझी एकही मैत्रीण वा एकही मित्र असं करीत नाही ! ते सगळे त्या पोलिसाला पैसे देतात आणि जातात पुढे लायसन्स घेऊन !" माझी लेक मला सांगते. जन्माला येऊन मी समाजाचे काही भले नाही करू शकले परंतु, मी समाजाची हानी होईल असे तरी निदान नाही केले इतके माफक समाधान घेऊन मी मरू शकते. जन्माला येणे हे काही आपल्या हातात नाही. परंतु, आपण जन्माला घातलेल्या मुलाला माणूस बनवायचे की पशू हे तरी निदान आपल्या हातात आहे. हातात माती आली की कुंभार त्याचे सुंदरसे व उपयोगी असे मडके बनवतो...आपण हातात माती आली...त्याची मातीच केली असे नको व्ह्यायला. कुंभाराचे हे उदाहरण शतकानुशतके वापरून बोथट झाले असेलही परंतु, आता इथे ते चपखल बसते.

'आमच्या एकूण तीन पिढ्या चूक ठरलेल्या आहेत...व त्यामुळे हे भ्रष्ट्राचारी पुढाऱ्याचे पेव फुटले आहे' असे एकदा एका चर्चेत कोणी म्हटल्याचे आठवते. आता जे गुन्हे समोर येत आहेत त्यातील गुन्हेगारांची वये ही१७...१८...२२..२५ अशी सुद्धा आहेत.
ह्याचा अर्थ हे एक दुष्टचक्र सुरु झाले आहे. आमची पिढी चुकली...आमच्या मुलाबाळांवर आम्ही नीट संस्कार नाही करू शकलो...त्यामुळे आमची मुले जी पुढे जाऊन समाजाची नागरिक म्हणून रिंगणात उतरली ते पशू म्हणून...
आता त्यांनी जन्म घातलेले अजून काय असणार...पशूच नव्हे काय ?

खूप पूर्वी एक कथा वाचली होती...भयकथा.
त्यातील स्त्री असह्य प्रसववेदना देऊन एका बाळाला जन्म देते...ते बाळ मानवी नसते...अतिशय विद्रूप, भयानक...राक्षसी बाळ असते. मुखातून बाहेर येणारे धारदार पिवळे सुळे घेऊन जन्माला आलेले. तरीही ती स्त्री आपल्या बाळाला ममतेने हृदयाशी धरते. त्यावेळी त्याच सुळ्यांनी ते राक्षसी बाळ तिच्या दुधाने भरलेल्या स्तनांमध्ये, आपले सुळे रोवते...अशी काहीशी ती कथा.
त्यावेळी धक्का देऊन गेली होती.
आजतागायत त्या कथेचा विसर नाही पडला.

नाजूक असे आता काहीही नाही...
फक्त सहा इंची हिंस्त्र काटेरी राक्षसगण..

भय इथले संपत नाही.