नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 25 January 2013

एक गरज...व्यक्ती की विचार ?

मी सध्या वाचते आहे नेल्सन मंडेला यांचं....Conversations with Myself.
पुस्तक हातात घेण्याआधी पेन्सिल हातात घ्यावी लागते. या पुस्तकामध्ये लक्षात ठेवण्यासारखे, आपल्याला विचार करावयास उद्युक्त करणारे व एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेतून बघावयास शिकवणारे बरेच काही आहे. असे मात्र होऊ नये....अख्खे पुस्तक अधोरेखित. मंडेलांबरोबर आपणही तुरुंगात असतो, वेगवेगळ्या व्यक्तीबरोबर विविध विषयांवर संवाद करीत असतो. साऊथ आफ्रिकेमधील क्रांती, ही फार जुनी अजिबात नसली तरीही मी वाचलेली नव्हती. शाळेतील अभ्यासक्रमांच्या पुस्तकांनंतरचा हा इतिहास असल्याकारणाने तसेही कानावर देखील पडलेला नव्हता. शालेय पुस्तकामधून निदान नावे तरी डोळ्यासमोरून जातात. बाकी त्या नावांना जोडलेला इतिहास आत नाही शिरला तरीही.

डोके म्हणजे एक कुंडी आहे. त्यातील मातीत काही रुजवायाचे असेल तर ते आत शिरवावं लागतं. नाहीतर बीज तर पडलं...परंतु त्याला आवश्यक अशी निगराणी झाली नाही म्हणून ते सुकून गेलं...एक विचार मृत्यू पावला असंच काहीसं होईल.

परवा एक नाटक बघितलं. 'शिवाजी अन्डरग्राउंड भीमनगर मोहल्ला'. कधी कुठे मिळालं तर नक्की बघा. आणि नसेल मिळत, म्हणजे कुठे दूर रात्री उशिरा वगैरे लागलं असेल तर अगदी धावाधाव, दगदग वगैरे करून बघा. 'शिवाजी अन्डरग्राउंड भीमनगर मोहल्ला' हा एक विचार आहे. ज्याची सद्य परिस्थितीत आपल्याला गरज आहे.  'जुने ते सोने' हे आपल्या नेत्यांविषयी बोलताना वाटते. सरदार वल्लभभाई पटेल, शिवाजी महाराज हे नेते आपण पुस्तकांतून वाचले. आपल्या समोर येत आहेत ते मात्र वेगळ्या जडणघडणीतील नेते. त्यांचे विचार, दूरदृष्टीशून्य त्यांचे निर्णय, बेजबाबदार व्यक्तव्ये ह्यामुळे आपल्याला जे अनुभव नित्य दिनी येतात ते उद्विग्न, निराश व हतबल करणारे असतात. इतिहास हा मला वाटतं आपल्यासाठी फार पुस्तकी झाला. म्हणजे सन, घटना पाठ केल्या आणि पास झालो...बस इतकंच. परंतु, शिवाजी महाराज हा एक विचार आहे, ही एक दूरदृष्टी आहे हे आपल्याला लहान वयामुळे असेल पण नाही जाणवलं. त्यामुळे दुसरा शिवाजी येणं ही एक इच्छा, स्वप्न आणि समोरच्याची जबाबदारी झाली. हे नाटक रोजच्या चूलमूल, नवरा बायको, प्रियकर प्रेयसी अशा त्रिकोणांमध्ये न शिरता क्षितिजे विस्तारून टाकून पुढे  नेणारे आहे. नवी पिढी नवे विचार करणारी आहे. नाटकाच्या माध्यमातून आपल्यासमोर जो शिवाजी येतो तो फक्त किल्ले, युद्धे, राज्याभिषेक, साल इतका मर्यादित रहात नाहीत. तर त्यांची धोरणे, त्यांनी वेळोवेळी हिंदू मुस्लिम ह्या धगधगत्या विषयावर मांडलेले विचार, आजही ते तितकेच प्रभावी दिसू लागतात. शिवाजी हिंदू नाही. शिवाजी मुसलमान नाही. शिवाजी हा एक विचार आहे. जो तुम्ही आम्ही उचलावयाचा आहे. समजून घेण्याचा आहे. रोजच्या कृतीत आणावयाचा आहे. आपल्याला आपले विचार तपासून घ्यायला लावतं हे नाटक. त्यातील तीन पिढ्या, त्यातली चिमुरडी, तिला पडलेले प्रश्न आणि तिला दिली गेलेली उत्तरे. काही नाही तर...देशाचा एखादा नागरिक घडवण्याची जबाबदारी जन्माला घातलीच असेल तर म्हणून तरी हे नाटक नक्की बघा. नाटकाच्या पहिल्या भागापेक्षा त्याचा दुसरा भाग...त्यातील घसघशीत पोवाडे...अक्षरश: डोळ्यात पाणी, हृदयात आग आणि गच्च आवळलेल्या मुठी...अशी अवस्था करून सोडतो.
आपल्यातील शिवाजी समजून घेण्यासाठी, व त्याला मुक्त करण्यासाठी हे नाटक बघा.

मला एखादी गोष्ट कोणी वेगळ्या कोनामधून दाखवली, त्यावर वेगळ्या कोनातून उजेड टाकला की आनंद होतो. माझ्या डोक्याला खाद्य मिळतं. आणि सर्वप्रथम म्हणजे, माझ्यामध्ये काही बदल आवश्यक आहेत हे मला मान्य आहे.
मी म्हणजे देवाने पृथ्वीला बहाल केलेली भेटवस्तू नव्हे.

मंडेला यांच्या संवादामधून ज्या छोट्या छोट्या बोधकथा येतात त्या वाचून मला इसापनीतीची आठवण झाली आणि त्या इसापनीतीचं आपल्या आयुष्यातील महत्त्व जाणवलं. त्यांनी सांगितलेली एक बोधकथा. मी आधी कधी ती वाचलेली नव्हती. तुम्ही वाचली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लेखक व संपादक रिचर्ड स्टेंगलबरोबर झालेल्या एका संवादामध्ये मंडेला ही बोधकथा सांगतात...
"महत्त्वाची बाब अशी होती की 'शांति'चे महत्त्व लोकांना कळावे...त्यावर त्यांनी विचार करावा. मी शक्ती (बळ ) आणि शांति ह्यात तुलना करीत होतो. व त्यातून 'शांति', 'बळा'पेक्षा वरचढ आहे हे पटवून देत होतो. त्यासाठी वारा व सूर्य ह्यांतील युक्तिवाद मी सांगितला होता. सूर्य म्हणतो,"मी तुझ्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. त्यावर वारा म्हणतो," नाही. मी तुझ्यापेक्षा शक्तिशाली आहे." ह्या वादावर उत्तर शोधण्यासाठी जमिनीवर चालणाऱ्या एका प्रवाशावर प्रयोग करण्याचे ते ठरतात. त्या प्रवाश्याने आपल्या अंगाभोवती एक घोंगडं पांघरलेलं आहे. सूर्य व वाऱ्याने ठरविले, जो कोणी प्रवाश्याच्या अंगावरून ते घोंगडं दूर करण्यात यशस्वी होईल तो अधिक बलवान. प्रारंभ वाऱ्याने केला. त्याने सर्वशक्तीनिशी फुंकर मारावयास सुरवात केली. जसजसा वारा जोरदार वाहू लागला, प्रवाश्याने आपलं घोंगडं आपल्या अंगाभोवती अधिकाधिक लपेटून घेतलं. वाऱ्याने आपल्या मुखातून अधिकच वेगाने शक्तीचा मारा केला. प्रवाश्याने आपले सर्वांग घोंगडीने झाकून घेतलं. वाऱ्याने प्रयत्नाची पराकाष्ठा केली परंतु, प्रवाश्याने घोंगडं शरीरापासून दूर सारलं नाही. त्याने ते अधिकच कवटाळून घेतलं. वारा थकला. भागला. आता सूर्य सरसावला. त्याने आपली किरणे हळुवार बाहेर काढली. मंद. मंद. आणि हळूहळू त्याने आपली किरणे तीव्र करावयास सुरवात केली. प्रवाश्याला आता आपल्या घोंगडीची गरज भासेनाशी झाली. घोंगडं तर उबेसाठी होती. त्याने घोंगडं सैल केलं. सूर्य आता अधिकाधिक प्रखर झाला आणि प्रवाशाने अखेरीस आपल्या शरीरापासून घोंगडं दूर सारलं. म्हणजेच हळूवार पद्धतीने प्रवाशाच्या शरीरापासून घोंगडं दूर करणे शक्य झाले. त्याच्यावर हल्ला करून नाही. ही बोधकथा आपल्याला सांगते...शांततेच्या मार्गातूनच आपण दुराग्राही माणसांचे मतपरिवर्तन करू शकणार आहोत...आणि तीच पद्धती आपण अवलंबवयास हवी." 

हे आणि अशा प्रकारचे विचार आपल्याला मंडेलांनी स्व:शी केलेल्या संवादामध्ये आढळतात. माझ्या आयुष्यात हे पुस्तक नक्की काय काम करते ? माझ्या डोक्यात ते विचार पेरते.
"आपला दृष्टीकोन जेव्हा आपल्याला समोरच्या माणसाला पटवून द्यावयाचा असतो. त्यावेळी आपण आक्रमक होऊन काही साध्य होत नाही. कारण त्यामुळे समोरचा देखील त्यावर उलटा भांडू लागतो. परंतु, आपण जर मृदू भूमिका घेतली तर आपण आपल्या ध्येयाच्या जवळ पोहोचू शकतो." (माझे आयुष्य हे सामान्य आयुष्य आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्यातील अनुभवांना पुस्तकातील विचार जोडू पहाते. आपल्या नेत्यांची संसदेमधील हाणामारी आपण रोज आपल्या टीव्हीवर बघतोच.)

"...मी तुरुंगातील अधिकाऱ्यांच्या दुष्टप्रवृत्तीविरुद्ध जरी लढत होतो तरीही मी त्यांच्याशी नाते कायम ठेवून होतो....त्याचे कारण म्हणजे त्या नात्यामुळेच मी इतर कैद्यांचे प्रश्न, वा इतर प्रश्न घेऊन त्यांच्याशी बोलू शकत होतो."
आज माझ्या गल्ल्या ह्या कचऱ्याने फुललेल्या असतात, व 'मी त्याची तक्रार घेऊन महानगरपालिकेकडे गेले की तेथून बाहेर पडताना मनस्तापापलीकडे काहीही होत नाही' असा विचार करून मी पुन्हा कधीही त्या अधिकऱ्यांसमोर न जाणे, त्यांचे तोंडही परत न बघणे हे चुकीचे नव्हे काय ?  त्यात समाजाचे नुकसान नाही काय ?
आणि त्याही पुढे जाऊन मंडेला ज्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते, ज्या तक्रारी घेऊन ते त्यांचे दरवाजे ठोठावत होते, त्या तक्रारी शारीरिक व मानसिक छळाच्या होत्या. आपल्याला तुरुंगात टाकले, ह्याचा अर्थ जो बदल मी घडवून आणू इच्छितो तो आता आणू शकत नाही, हा असा निराशाजनक विचार कुठेही आढळत नाही. त्याउलट माझा स्वत:वर विश्वास आहे. त्यामुळे परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे आणि तो बदल घडवण्यासाठी मी प्रयत्न करण्याचे कधीही सोडणार नाही, हा आत्मविश्वास त्यात दिसतो.

स्वत: तुरुंगात असताना,  दुसऱ्या तुरुंगात असलेल्या आपल्या पत्नीला पत्र लिहिताना मंडेला लिहितात, "तुरुंगात असताना तुझ्या हे लक्षात येईल की स्वत:ला ओळखण्यासाठी, स्वत:च्या मनाचा शोध घेण्यासाठी तुरुंग ही एक उत्तम जागा आहे. स्वत:तील वाईट प्रवृत्ती जाणून घेऊन त्यावर मात करणे, व चांगल्या प्रवृत्ती वाढीस नेणे; रोजचे ध्यान, पंधरा मिनीटांचे ध्यान, ह्यासाठी फार चांगले आहे. तुला सुरवातीला आयुष्यातील नकारात्मक गोष्टी जाणून घेणे कठीण जाईल परंतु, दहाव्या प्रयत्नाला नक्की यश लाभेल. एखादा संत हा निराश न होता सातत्याने प्रयत्न करीत असलेला एक पापी असतो, हे तू कधीही विसरू नकोस."

तुरुंगातील रखवालदारांबद्दल स्टेंगल मंडेलांना विचारतात,"तुरुंगातील रखवालदार तुमच्या राजकीय चर्चेत देखील भाग घेताना दिसतात...हे कसे काय ? काय ते त्यांची मते मांडतात ?"
मंडेला त्यावर म्हणतात,"ते प्रश्न विचारतात. जेव्हा माझा त्यात संबंध असतो तेव्हा मी कधीही रखवालदारांशी राजकीय चर्चेला सुरुवात करीत नाही. मी त्यांचे म्हणणे ऐकतो. ज्यावेळी एखादा मनुष्य काही विचारणा करीत असतो, त्यावेळी जर तू त्याला प्रतिसाद दिलास तर तुझ्या सांगण्याचा त्याच्यावर चांगला परिणाम होऊ शकतो."
महासागरामधील बरेच शिंपले मी वेचले. त्यातील काही...
"तू बुद्धी वापरून जर वाद घातलास तर शत्रू देखील तुझ्याविषयी मनात आदर बाळगतो."
"...परंतु, ज्यावेळी माझे व तुझे मतभेद पराकोटीस पोचतात, त्यावेळी जर ते वाद तत्वासंबंधी आणि विचारासंबंधी असतील आणि त्यात वैयक्तिक तिरस्काराची भावना नसेल, तर मला आनंद होईल. आणि तसे झाल्यास युद्धाअखेर, काहीही निकाल असला तरीही, मी अभिमानाने तुझ्याबरोबर हस्तांदोलन करू शकेन. कारण मी न्यायी व लायक माणसाशी लढलो असेन, ज्याच्या अंगी मान, सन्मान व सभ्यता आहे."

आपल्या देशातील सध्याच्या परिस्थितीवर त्यांची जवळजवळ सगळीच विधाने प्रकाश पाडून जातात. आणि मग आपल्याकडील नेतागिरी सर्वच बाबींत दरिद्री ठरते.

आपल्या मुलीला ते लिहितात,"ज्यावेळी एखादया प्रणालीचा (system) विचार केला असता, व्यक्तिगत सज्जनपणा हा गैरलागू असतो. तुम्ही, झेनि, माकी,... (मंडेलांच्या कन्या, त्यांच्याबरोबर काम करणारी तरुण मंडळी) आणि इतर तरुण मंडळी...हे सर्व एक समान कल्पना, विचार घेऊन एकत्र येता व समान योजनेचा पाठपुरावा करता, त्यावेळी गोष्ट वेगळी असते. त्यावेळी जुनी प्रणाली बाजूला सारली जाईल, आणि नवीन प्रणालीचा उदय होईल. संपूर्ण प्रणाली बदलायला हवी. तेव्हाच फक्त चांगल्या माणसांना त्यांच्या देशासाठी, देशवासीयांसाठी काम करण्याची संधी मिळेल...."

कालच्या सर्व वर्तमानपत्रामध्ये एक बातमी समान होती...
२९ दिवसांत ८० हजार सुचना.
दिल्ली बलात्काराच्या घटनेनंतर केंद्र सरकारने २३ डिसेंबर रोजी वर्मा समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. 'हा अहवाल माझ्या नावाने ओळखला जाणार असला तरी त्यातील शिफारसी देशातून आणि परदेशातून आलेल्या नागरिकांच्या सूचनांच्या आधारे बनवण्यात आला आहे. आम्हांला २९ दिवसांत ८० हजार सुचना मिळाल्या. या सर्व अभ्यासूनच आम्ही अंतिम अहवाल तयार केला. महिला अत्याचार रोखण्यासाठी आपली मते पाठवणाऱ्यामध्ये तरुण वर्गाचा मोठा सहभाग होता, याचे कौतुक करीत असता वर्मा म्हणाले, 'आमच्यासारख्या जुन्या पिढीलाही ज्या गोष्टीची जाणीव नाही, त्या गोष्टी तरुण वर्गाने आम्हाला शिकवल्या.'

मंडेलांनी स्वत:शी मांडलेल्या संवादामधून...मला काही उत्तरे मिळतात...काही नवीन प्रश्न जागे होतात.
प्रश्न उभे रहाणे हे चांगलेच...त्यातूनच बदल घडून येऊ शकतात. नाहीतर एखाद्या एकाच जागी साचलेल्या पाण्याचे गढूळ डबकेच तयार होते. त्यातून फक्त डेंगू जन्माला येऊ शकतो. आणि काय ?

एक आशा पुन्हा जन्म घेते.
खोल रसातळाला बुडू लागलेल्या जहाजातून कोणी एक चिमुकला जीव, पुन्हा एकदा पाण्यावर यावा...घुसमटता श्वास त्याने परत घ्यावा...असे काहीसे वाटते....जाणवते...एकेक पान मी उलटत जाते तसतसे.


9 comments:

Mahendra Kulkarni said...

नेल्सन मंडेला बद्दल एक खास अट्रॅक्शन होतं/ आहे. पण पुस्तक वाचायची कधी इच्छा झाली नव्हती. पण आता आणतो लायब्ररी मधून एकदा.

Vidya Bhutkar said...

Wowwww I have read books as a teenager and they might have made of me, what i am today. But when I read your review, I realise that I havent read any books in this age where I can read it and take it to my personal life and to my family. Thank you for bringing this thought forward. I have read book reviews, but your approach of 'what is there in it for me?' is what stands out. Very nice post.
-Vidya.

तृप्ती said...

अनघा, मला नक्की कळले नाही तुला काय म्हणायचेय.

Anagha said...

महेंद्र, नक्की वाचा आणि धन्यवाद :)

Anagha said...

विद्या, मला तर आता वाटू लागलंय की शिवाजी महाराजांना पण आत्मचरित्र लिहिण्यासाठीचा वेळ देवाने दिला असता तर बरं झालं असतं निदान त्यामुळे तरी आपण त्यांना ओळखून घेण्याचा प्रयत्न करून घेऊ शकलो असतो ! :)
आभार. :)

Anagha said...

तृप्ती, ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या त्यांचं आयुष्य जगताना प्रचंड लढ्यातून गेलेले आहेत. आणि ते सर्व त्यांनी लिहून ठेवल्याने आज आपण त्याबद्दल वाचू शकतो. त्यांनी फक्त घटना लिहिलेल्या नसतात तर त्या घटनेला अनुसरून त्यांचे विचार मांडलेले असतात. आणि आजही सध्याच्या आपल्या आयुष्यात वेगवेगळे लढे देण्यासाठी त्यांनी मांडलेले विचार आपल्याला एक दिशा सापडून देऊ शकतात. त्यांनी फक्त आपल्याला 'माझ्या आयुष्यात हे इतकं जगणं अशक्य करणारं घडलं हे सांगायला नाही लिहिलेली पुस्तकं, तर मी हे असा विचार केला आणि हा असा असा लढलो...कधी हरलो...तर कधी जिंकलो...हे सांगण्यासाठी पुस्तक लिहिण्याचा खटाटोप केला आहे...हो ना ?
आणि धन्यवाद. :)

Dhaval Ramtirthkar said...

मी आता 'व्होल्गा जेव्हा लाल होते' हे वाळिंबयाचं पुस्तक वाचतोय... लेनिन वर... पहिल्या १०० पानांनंतर पुस्तक आणि रशियातील क्रांती असा काही वेग घेऊ लागली आहे की लोकल मध्ये पुस्तक वाचत असताना प्रवास संपूच नये असं वाटतं. लेनिन ला ही १० वर्षे संघर्ष आणि वेळोवेळी पराभव सहन करावे लागले होते ज्यानंतर त्याची स्वप्ने प्रत्यक्षात येऊ लागली.

Shriraj said...

Vidya mhanali tasa mla tuza 'approach' bhavla... mla vatta apan asach vachla pahije

Yashodhan said...
This comment has been removed by the author.