नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 15 January 2013

ताई...माई...अक्का...

काहीतरी जबरदस्त चुकतंय !

वसंत ढोबळे...
आणि विलेपार्ले येथील पदपथावरील विक्रेते...
ढोबळे यांची बदली रोखण्यासाठी स्थानिक रहिवाश्यांचे आंदोलन वगैरे...

मी मुंबईतील नागरिकांची विचारधारा बरोबर पकडण्यात कमी पडते आहे की काय असा मला हल्ली बऱ्याच वेळा प्रश्न पडतो...
मी मुंबईत जन्मले...मुंबईत वाढले...आणि ज्या काही देशीपरदेशी वाऱ्या केल्या त्या फक्त, इतर देशांविषयी देखील जाणून घेण्याची इच्छा आणि अधूनमधून आर्थिक स्थिती बरी असते म्हणून.
ह्याचा अर्थ मी एक मुंबईकर आहे...मी माझे आयुष्य मुंबईतील लोकांबरोबरच काढले आहे.
मग तरीही....तरीही काही प्रश्नांची उत्तरे मला का मिळत नाहीत ?

काही वर्षे उलटली ह्या घटनेला. तो विजयादशमीचा आदला दिवस होता. माझ्या हाती दुचाकी होती. पहाटे उठून, शुचिर्भूत वगैरे होऊन दाराला टपोरे भगवे, हिरवे तोरण लावण्याची आपली परंपरा मला भारी आवडते. म्हणजे मी चांगली चारपाच तोरणे घेऊन, माझ्या दारी, आईच्या घराच्या दारी, चारचाकीच्या गळ्यात...अडकवते. त्याच हेतूने मी त्या दिवशी, दादर फूलबाजाराच्या दिशेने माझी दुचाकी काढली होती. तिथे पोचण्याचा रस्ता हा एकमार्गी आहे. म्हणजे बाजाराच्या दिशेने आपण आपले वाहन नेऊ शकतो...पण दादर स्थानकाकडे पाठ करून आपण कबुतरखान्याकडे येऊ शकत नाही. मी ज्यावेळी बाजाराच्या दिशेने निघाले त्यावेळी तो रस्ता गर्दीने फुलला होता. बाहेर गाडी पार्क करण्याची परवानगी नाही आणि रस्ता एकमार्गी आहे...त्यामुळे मी माझी दुचाकी आत नेऊ लागले. दोन्ही रस्ते फुलं आणि तोरणं घेऊन बसलेल्या विविध विक्रेत्यांनी बजबजले होते. विक्रेते आणि अर्थात ग्राहक. मी हळूहळू त्यातून मार्ग काढीत होते. अचानक माझ्या डाव्या हाताला खरेदी करणाऱ्या एक मध्यमवयीन महिला खेकसल्या. "ए बाई ! कुठे निघालीस ? दिसत नाही का गर्दी किती आहे ते !"
माझे वागणे जर बरोबर असेल तर तशीही मी माझा मुद्दा मांडल्याशिवाय गप्प बसत नाही. आता समोरच्या माणसाने माझा मुद्दा पटवूनच घ्यावा अशी मी जबरदस्ती तर नाही करू शकत. कारण शेवटी हे ज्याच्या त्याच्या बुद्धिबाहुल्यावर अवलंबून आहे.
"मलाही तोरण घ्यायचंय...म्हणून मी आत बाजारात चाललेय !"
"गर्दी दिसत नाही का तुझ्या डोळ्यांना ?"
"दिसतेय ना....चार चार डोळ्यांनी दिसतेय. पण ही सर्व गर्दी रस्त्यावर बेकायदेशीर बसलेल्या विक्रेत्यांमुळे आणि त्यांच्याकडून खरेदी करणाऱ्या लोकांमुळे झालीय...हेही मला दिसतंय...आणि मी काही 'नो एन्ट्री' असलेल्या रस्त्यात घुसत नाहीये ! उलट तुम्ही...त्या रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्याकडून का बरं तोरण घेताय ? आत जा ना बाजारात ! तिथे पण मिळतील फुलं आणि तोरणं !"
हे माझे उद्गार ऐकल्याबरोब्बर बाई ज्याच्याकडून फुलं घेत होत्या तो विक्रेता माझ्या अंगावर खेकसू लागला...व त्याच्याबरोबर दुसरे विक्रेते आवाज चढवू लागले.
सर्व विक्रेत्यांमध्ये एकी होती.
आणि आम्हा नागरिकांत ?
"ए बाई ! निघ ना आता...!" बाई ओरडल्या.

जिथे जिथे धंदा मिळणार आहे तिथे तिथे हे विक्रेते आपल्या गाड्या, टोपल्या घेऊन बसणार आहेत. त्यांची बायकापोरं, घरदार सोडून ते मुंबईत दाखल झालेले आहेत...फक्त पैसे कमावण्यासाठी. त्यातील 'व्यावसिक समाधानासाठी' निश्चितच नाही. पटतंय ?
मग जर हे आपल्याला पक्के माहित आहे तर, रस्त्यावर आपला धंदा उघडून बसलेल्या विक्रेत्यांकडून आपण मुळात खरेदीच का करतो ?
आपण दिलेल्या त्या पैश्यांच्याच जोरावर ते आपल्या रस्त्यांवर फैलावत चालले नाही आहेत काय ?
त्यातली दुसरी गोष्ट अशी, की आपण त्यांचा व्यवसाय चालवायला मदत केल्याने, कायदेशीररित्या जे दुकान उघडून बसले आहेत, त्यांच्या धंद्यावर आपण कुऱ्हाड मारीत नाही काय ?
त्याहून पुढे जाऊन विचार करून बघा, मुंबईत अशा प्रकारे रस्त्यावर देखील व्यवसाय मांडता येतो असा समज आपण आपल्याच कर्माने पसरवल्याकारणाने रोजच्या घटकेला अधिकाधिक माणसे मुंबईच्या विविध रस्त्यांवर आपापला माल घेऊन विक्रीला बसताना आपल्याला आढळत नाहीत काय ? 
अशी कोणती बाब आहे, ज्यामुळे आपण दोन पावले चालून, रीतसर दुकानांत खरेदी करीत नाही ?
आपणच आपल्याच कर्माने गुन्हेगारी पसरण्यास मदत करीत आहोत हे आपल्या ध्यानात येत नाही काय ?
आणि मग विलेपार्ल्याच्या, दादरच्या, वांद्राच्या, डोंबिवलीच्या त्या नागरिकांनी संगनमताने 'रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्याकडून खरेदी करणे' का थांबवू नये ?
त्यांच्यावर आपणच 'बहिष्कार' घातला तर येणारी मिळकत कमी झाल्याने ते आपोआप तेथून हलणार नाहीत काय ?
वा असे काही आहे की 'आपण कसे उत्तम 'बार्गेन'...घासाघीस...करू शकतो...व कशी एखादी वस्तू आपण आपल्या शेजाऱ्यापेक्षा कमी किंमतीत आणू शकतो' ही प्रौढी मारण्याची आपल्याला चटक लागली आहे ?
हेच जर आपण सर्वांनी ठरवून केले तर आपल्याला कशाला हवेत....कोणी अधिकारी....आपलेच पदपथ आपल्यासाठी मोकळे करून देण्यासाठी ?

अजून एक प्रश्न...आपले पुढारी, नागरिकांसाठी असे का नाही एखादे आवाहन करीत...'आपल्या पदपथांवर, रस्त्यांवर जे ठाण मारून बसले आहेत, अशा फेरीवाल्यांकडून ह्यापुढे कसलीही खरेदी करू नका....' ?

विचार करायला हवा...
ताई...माई...अक्का...
आपल्या व आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण आता तरी निदान हा विचार करायलाच हवा !

13 comments:

Abhishek said...

सामान्य माणूस, त्याला सामान्यपणा-चीच जाणीव असते गर्दी च्या असामान्यतेची नाही... काळाच्या ओघात माणूस जे शिकला आहे तेच तो गिरवतोय... ह्याची जाणीव असणे हाच साक्षात्कार, आणि तो सगळ्यांना नाही होत असा इतिहास...

तृप्ती said...

Anagha, people are too busy to think about their actions and it's consequences.

Shriraj said...

Anagha tuzi post patli...

Pan Mla kutuhal vattay te Abhishek chya comment baddal... mhanje tyanni kahi tari bhari lihilay...

rajiv said...

आताशा, आम्हाला सगळ्या गोष्टी तयार हव्या असतात(तयार म्हणजे.... तत्काळ वापरण्यायोग्य), स्वत:ला तोशीस न लागता. अगदी रस्ते, पदपथ पण मोकळे हवेत आणि हे काम पण ढोबळे साहेबांनी करावे. आम्ही मात्र मनाला येईल तिथे रस्ता ओलांडणार...सर्व वस्तू मनात येईल तिथे पदपथांवरून खरेदी करीत हिंडणार. आमची सगळी कामे त्यांनी( आम्ही सोडून कुणीही) करावीत. मग काय फेरीवाले आहेतच. ते तरी काय...गुळाला मुंग्या, माशा लागतात त्याप्रमाणे होणाऱ्या कमाईला फेरीवाले चिकटलेले. त्यामुळे कसे सगळे सोप्पे झालेय. फेरीवाले कायम हजर सेवेला. मनात येईल ते मनात येईल तिथे खरेदी करावे. मग त्या वस्तू कमअस्सल असल्या तरी बेहेत्तर. त्याच्या प्रतीचे उत्तरदायित्व कोणावर याची फिकीर कशाला करायची ? आम्ही जर ही खरेदी त्यांच्याकडे केली नाही तर बिचारे देशोधडीला लागणार. मग मुंबई रिकामी होणार. इथल्या जागांना भाव उरणार नाही...मग आम्ही कसे जगणार. कारण मग आम्हाला हात पाय हलवून दुकानामधून खरेदी करावी लागणार...तंगडतोड करावी लागणार. छ्या...हे म्हणजे जरा अतीच होईल हं अनघा !!

Anagha said...

अभिषेक, मी तुमची प्रतिक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि जे मला उमगलंय त्या जोरावर मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे...तुम्ही जी प्रतिक्रिया दिली आहे त्यावर बरेच काही विचार मनात येत आहेत.
आपण समाजात वावरताना बरेच भलेबुरे अनुभव घेत असतो. त्यावर विचार करण्याची क्षमता आहे ( असा माझा समज/गैरसमज आहे. :) ) त्यामुळे ते समोरच्यापर्यंत पोचवणे ही देखील एक जबाबदारी आहे असे वाटते. कारण त्यातून विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. आपले कुठे चुकत असेल तर ते देखील नजरेत आणून दिले जाते.
सद्य परिस्थिती इतिहासापेक्षा थोडी वेगळी आहे. प्रत्येक पिढी ही वेगवेगळ्या अनुभवांना सामोरी जात असते. व आपापल्या परीने त्यावर उत्तर शोधत असते. मात्र समाज हा एकेक नागरिकाने घडलेला असतो. व त्यामुळे त्यातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असते, आपण नक्की काय करीत आहोत व त्याचा पुढे जाऊन काय परिणाम होणार आहे.
अर्धवट विचारांवर मी माझी प्रतिक्रिया थांबवतेय...ह्याची जाणीव आहे मला.

Anagha said...

तृप्ती, खरंय. पण समजा उद्या मी, जाणते अजाणतेपणे, समाजाला घातक असे काही वागले आणि हे तुला जाणवले तर तू मला जसे सांगू शकतेस...तसेच जर मला काही जाणवले तर ते समोरच्यापर्यंत पोचवणे ही एक जबाबदारी आहे. हो ना ?

Anagha said...

श्रीराज, कळतं पण वळत नाही असं नाहीये ना रे ? :) :)

Anagha said...

राजीव, सर्वजण मिळून प्रयत्न करुया...यश आज ना उद्या येइलच. :)

Abhishek said...

ही (आणि बऱ्याच) पोस्ट हाच साक्षात्कार आहे :)
समोरच्या पर्यंत पोहोचवता आणि ते पोचत, त्यामुळेच restiscrime वाचल जात, अर्थात!
उत्क्रांत होण हा जीवनाचा स्वभाव असावा, पण ती वाढ मुळात एका टोकाने होते आणि विस्तार होत जातो. शेवटी पोषण हे त्या मुळाकडूनच होत... समोरच्या पर्यंत पोचोवण्याच्या जबाबदारी ला अजून विस्तार मिळेलच हा आशावाद

अभिषेक
खूप पैलू, पदर, छटा आहेत... योगायोगाने काळ राजा आहे... विरुद्ध आपल कर्तुत्व आहे... आणि हीच गम्मत आहे

Unknown said...

valid comments. We are so accustomed to our daily routines, and slow degradation does not occur to us.

Then there comes such a post which makes a lot of sense, and yet we wonder why I didn't think of that.

Anyhow, Another question, Recently Have you changed any settings for RSS feed? Somehow only first paragraph is delivered to me via RSS feed.

Anagha said...

अभिषेक, धन्यवाद. :)
आपण आपलं काम करीत राहायचं...आणि समाजात जबाबदारीने वावरायचं...बस...इतकं साधं सरळ आहे हे. नाही का ? :)

Anagha said...

हर्षल, प्रतिक्रियेबद्दल आभार आणि इतक्या उशिरा उत्तर देतेय त्या बद्दल माफी. :)

ते सेटिंग तसंच असायला हवंय ना? म्हणजे पहिला परिच्छेद तुम्हाला दिसला, मग तुम्ही तो पुढे वाचायला घेतलात की इथे....आपल्या ब्लॉगवर येऊन पोचाल ना ?! नाहीतर मग फिरकणारच नाही तुम्ही ! हे असं आपलं मला वाटतंय ! :) :)

Abhishek said...

आईनस्टाईन चा सापेक्षता सिद्धांत म्हणतो की एखादी वस्तू (इथे व्यक्ती) कृष्णविवरात ओढला जात असेल तर त्याला, तो कायम सरळ रेषेत चालला आहे, असच वाटत राहत... पण प्रत्यक्षात तो वर्तुळात फिरत असून आत ओढला जात असतो, अस बाहेरून पाहिलं की दिसत... सांगायचा मुद्दा हा की जवळ जवळ प्रत्येकाला वाटत असत की मी जबाबदारीनेच वागत आहे, पण प्रत्यक्षात त्याचे परिणाम सापेक्षता नियमानुसार वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे असू शकतात, आणि कर्त्याचा त्या प्रत्येक परिणामांवर कंट्रोल असेलच असे नाही. मला तर वाटत कि संकट आणि कृष्णविवर ही एकाच असावीत, त्यामुळे संकटात निर्णय प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असावा आणि सापेक्ष चुका होत असाव्यात, 'विनाशकाले विपरीत बुद्धी' मग आपोआपच आणि नकळतच पण नियमाला धरून होत असावं... इथे जबाबदारी आणि सरळ रेषा हे साम्य आहे, जे की परिस्थिती नुसार सापेक्ष असावं...
अर्थात सापेक्षतेच्या अनेक कसोट्या लावून जेव्हा सर्वमान्य थेअरी लावली जाते, त्याचा परिणाम पण सर्वमान्य अपेक्षित असू शकतो... माणूस म्हणून आपल्या कुठल्या क्वालिटीज अशा परिस्थितीत काय प्रतिक्रिया देतात हा पण संशोधनाचा मुद्दा आहे...
सामान्य आयुष्यात पण आईनस्टाईन ची जनरल थेअरी ऑफ रिलेटीविटी इतकी लागू होते, हे मला नेहमीच आश्चर्यात टाकत... परत... मी पण सरळ(च) रेषेतच बघतोय... अस मला वाटतं! :)

अभिषेक
ही कुंडलिनी कुंडलिनी काय आहे.... बये जागृत हो... मी शोधतोय