नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 26 May 2012

पिंपळपान

हात हळूहळू रिकामे होत चालले आहेत...
जाणवते...
कळते...
दोन हातात...दोन हात धरले होते...निदान तसा भास तरी झाला होता. पारा पकडल्याचा.
त्या प्रवासात हलकेच हातात दोन चिमुकले हात आले...
दोनाचे सहा हात झाले होते.
आज मात्र बघितले तर हात रिकामेच.
सगळेच भास.
हातात हात होते त्यावेळी दिसत नव्हत्या...जाणवल्या नव्हत्या...
रिकाम्या हातावरच्या रेघा आजच्या घडीला मात्र खोल खोल दिसू लागल्या.
रेघांचे जंजाळ.
जसे सुकलेले पिंपळाचे पान.
त्यावर रंग भरावे, चित्र काढावे...
इतके देखील त्राण नाही उरले.
माझे रिकामे हात.
जसे शुष्क पिंपळ पान.
त्यावर कधीतरी पावसाचे थेंब पडावे...
ओल्या ओझ्याखाली क्षीण पानाने दबून जावे.
मातीत झिरपून जावे.

Monday 21 May 2012

रुदन

शरीर जेव्हा मरतं...
चार दिवस कुठे पडून राहिलं...
थेरं त्याची सुरू होतात... 
भसाभसा कुजतं... 
सहस्त्र किडे पोसतं
मृत्यूची खबर होते
आक्रोश होतो 
हंबरडे फुटतात
जिवंत शरीरे गोळा होतात
मृत शरीराची यात्रा काढतात.

जेव्हा हे हृदय मरतं...
निपचित बापडं पडून रहातं
ना दुर्गंधी
ना किडे
ना ब्र
ना बोंबाबोंब
ना खबरबात
ना चार टिपं


अखेर...
ही दुनिया दिखाव्याची

Tuesday 15 May 2012

बाबा...आणि बाबांची पुस्तके

गेल्या वर्षाच्या प्रारंभी बाबांचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते. पद्मगंधा प्रकाशनातर्फे. त्यावेळी 'प्रहार'मध्ये श्री. राम जगताप ह्यांनी पुस्तकावरील परीक्षण लिहिले होते. आज हेरंबने त्यांचा ब्लॉग नजरेस आणून दिला. तिथे त्यांनी तो लेख प्रसिद्ध केला आहे.

ह्या वर्षी बाबांचे हिंदू धर्मावरील पुस्तक प्रकाशित झाले आहे. अगदी तीन दिवसांपूर्वीच. माझ्या हातात प्रत आली की तुम्हां सर्वांना दाखवेनच.

श्री. जगतापांच्या लेखात माझा उल्लेख आहे. तो अजाणतेपोटी झाला आहे असे म्हणता येईल. खरं तर बाबांची पुस्तके छापून आणण्यामागे माझ्या आईची श्रद्धा आणि प्रेम आहे. मी फक्त 'ह्यांना फोन कर, त्यांच्याशी बोल...' हे काम करते ! आणि हो ! मात्र एकदा लेकीच्या परीक्षेसाठी सुट्टी घेतली होती. त्या कालावधीत बाबांच्या लिखाणाचे विषयावार वर्गीकरण मी केले होते. आणि त्यामुळे प्रकाशकाकडे ते लिखाण सुपूर्त करणे थोडे सोपे झाले असे म्हणता येईल. इतकेच काय ते मी केले.
बाकी दिव्याखाली अंधारच आहे. :)

आणि हो ! हेरंबा, तुझे आभार. :)

Friday 11 May 2012

माझी रमा

चोवीस वर्षांपूर्वी तिला गुंडाळून माझ्या डाव्या हाताला आणून ठेवलं गेलं त्यावेळी माझं धाबं दणाणलं होतं.
हलक्या गुलाबी मऊ कापडात गुंडाळून, त्याच रंगाचं टोपरं गुंडाळलेलं माझं बाळ. हातपाय आत गुडूप. वरती डोकं. ते देखील तळहाताएव्हढंच. टोपऱ्यात झाकलेलं. दोन डोळे, एक नाक, ओठ...झालं...एव्हढंच काय ते दृष्टीस. डोळ्यांची उघडझाप. कापडाच्या आत हालचाल चालू आहे हे वर कापडाला मधूनच येणाऱ्या उंचवट्यांवरून कळत होतं. आता काय करायचं ? हा असा सुरवंट बाजूला घेऊन झोपायचं कसं ? आपला हात त्यावर चुकून पडला तर ? बाळ घुसमटलं तर ?
एक जीव आपण वाढवू शकतो असे स्वप्नात देखील वाटत नव्हते. आणि ह्याची खात्री नसताना आपण ह्या जीवाला जगात आणायचे धाडस केलेच कसे हा प्रश्र्न तो जीव बाजूला आल्यावर पडला.

"आई, आज माझी शेवटची परीक्षा."
M.A.
लेकीचा शेवटचा पेपर. त्या तिच्या शेवटच्या प्रश्र्नपत्रिकेमागे माझ्या असंख्य प्रश्र्नपत्रिका. अनेक परीक्षा.

तिचा हातात आलेला इवलासा हात...त्यात तिने धरलेली पेन्सिल...गादीवर पसरलेली चारपाच पुस्तके...एखादी वही....इतिहास, भूगोल...गणित...इंग्लिश...रात्रभर बसून तिच्या परीक्षेआधी तिला सरावासाठी तयार करून दिलेल्या प्रश्र्नपत्रिका. एकेका वर्षाबरोबर वाढता पसारा. खोलीतला तावांचा उडता खेळ...वेगवेगळे रंगीत मार्कर्स...भराभर उंचावणारा पुस्तकांचा डोंगर. नकळत कधीतरी इतिहास, भूगोल खिडकीतून बाहेर पडले...आणि दरवाजातून फ्रॉइड आत शिरला...आणि मग मला त्या पुस्तकांतील काही कळेनासे झाले.

अस्ताव्यस्त पसरलेले खेळ उचलणे वेगळे आणि ही अशी ज्ञानाने फुगलेली पुस्तके आवरणे वेगळे.

"आई, हे तुझं पसारा आवरणं थांबव पाहू ! मग मला काहीही मिळेनासं होतं ! मी आवरेन एकदाच काय ते ! परीक्षा झाली की !"

कधीकधी असेही वाटतेच...खेळण्यांचा पसारा होता ते घर गोजिरवाणं दिसत असे...आणि आज ग्रंथांच्या पसाऱ्यात घर बुद्धिवान दिसू लागलं आहे.
घर आपलं आनंदीच.

पहाटे पाच वाजता, दुचाकीवर बसून दोघी अंधेरीच्या दिशेने निघायचो. पावसापाण्यात. उन्हातान्हात. दिवसातून दोनदा. वयाच्या पाचव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळणाऱ्या लेकीसाठी, गुरूच्या शोधात आम्हीं मायलेकी शेवटी अंधेरीला पोहोचलो होतो. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. पहाटे लेकीचं शारीरिक शिक्षण व 'स्ट्रोक प्रॅक्टिस' असे. दुपारी 'गेम प्रॅक्टिस'. आठवतं...एकदा साडेपाचच्या सुमारास काळोखातून सखोल रस्ता कापत असता एक खड्डा नजरेतून निसटला. आणि दोघी अंधारात भुईसपाट झालो.
जीवनात हारजीत अटळ असते. आपण सर्व ताकदीनिशी सतत लढावयाचे असते...एका खेळाने हे एक जीवनोपयोगी तत्व आम्हां दोघींना शिकवले.

'सिंगल पेरेन्ट' म्हणून मिरवावे लागेल असे कधी वाटले नव्हते...आणि असे काही करायची हौस देखील नव्हती. देवाने ते करायला मला भाग पाडले.

लेकीची ज्युनियर शाळेतील अॅडमिशन घ्यायला देखील एकटीनेच जायचं होतं...आणि तिला तिच्या M.A. शेवटच्या पेपरसाठी सोडायला देखील एकटंच जायचं होतं. मग आयुष्यात नवरा नक्की आणला कशाला होता...हा असला प्रश्र्न, चोवीस वर्ष सतत बरोबर राहिला. आपल्याला मुलं होऊ शकतात ह्याचा त्याला फक्त पुरावा हवा होता काय असेही वाटू लागते...
असो...गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये असे म्हणतात.

आज सगळ्या अडीअडचणींना दूर लोटून, लेकीचं शिक्षण पुरं करू शकले...तिला स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभं रहाण्यास मदत करू शकले...हे मला स्वत:ला दिलासा देणारं.

'उंच माझा झोका'तली ती चिमुरडी रमा...तिचे ते काळी पाटी हातात धरून अबकडई गिरवणे...
माझी ही रमा...जे मागेल ते शिक्षण, ज्या कुठल्या देशात म्हणेल तेथे...मी तिला देऊ शकले...हे धडे माझे...
मला 'जगणे' शिकवणारे.