नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 29 January 2012

त्सुनामी

कितीतरी विचार मनात येत रहातात. कल्पना उसळत रहातात.
बंद खिडकी बाहेर बघितलं तर वारा वहात असतो. झावळ्या गरगरत असतात, आणि झाडे बसल्या जागी डुलत असतात.
पण स्मशान शांतता पसरलेली असते. जसं टीव्ही लावावा आणि त्यावर त्सुनामीने केलेला हाहाकार उघड्या डोळ्यांनी पहावा...आवाज बंद करून. मग सगळ्यालाच एक अमानवी रूप येतं. मनाबाहेर उलथापालथ. खोल मनात मात्र उसनी शांतता.
खिडकी बंद करून घेतली की एक बरं होतं. मनात चालू असलेलं मंथन बाहेर जाणवत नाही. आणि बाहेर चाललेली घडामोड थंड नजरेने न्याहाळता येते.
खिडकी कधी उघडूच नये.
बाहेरचं जग बाहेर आणि आतील समुद्र आत.

नाहीतरी, उसळलेला समुद्र कोणाला झेपत नाही.
तो हाहाकार माजवूनच विश्रांत होतो.

एकटीने घर चालवणे कुठे कधी सोपे वाटले होते. किंवा खरे तर संसार उभा करताना त्याची जबाबदारी एकटीवरच पडणार आहे हे कधी स्वप्नात देखील नव्हते वाटले. पण बायकांच्या संसाराच्या कल्पना आणि पुरुषांच्या कल्पना ह्यात जमीनअस्मानाची तफावत. संसार तर दोघे एकच चालवायला घेतात पण त्यांच्या मूळ संकल्पनाच उत्तर-दक्षिणेच्या. सगळंच कठीण. 
वाण्याचं बिल...फोनचं बिल...बँकांची कामे...कॉलेजची फी..आजारपणे...प्रेझेन्टेशन्स...मिटींग्स...डेडलाइन्स...प्रमोशन... इन्क्रिमेंट...सापशिडी.
हातातून सुटलेले फासे...गडगडणारे फासे...अस्थिर फासे.

चालायचंच...
हे सगळं असं घडलं नसतं तर देवाला तरी एक अजून उत्कंठापूर्ण सत्यकथा लिहिण्याचा आनंद कसा काय मिळाला असता...?
कंटाळवाणी, रटाळ कथा लिहिण्यात काय मोठे ?
कलाकृती अशी हवी...जी रोज काही नवे चित्र दाखवेल....नित्य त्यातून काही नवे दृश्य दिसेल.
असे काही हातून घडवण्यातील संतोष, हर्ष, आणि शेवटी...झपाटणारा उन्माद...त्या उन्मादातून जन्म घेणाऱ्या त्याच्या नवनवीन कथा...त्याची न थकणारी लेखणी.

माझं क्षीण कल्पक मन, देवाच्या विलक्षण कल्पक मनाला अखेर सलामच ठोकतं...

Monday, 23 January 2012

तोंडाला येईल ते...

विद्याला राग आला होता. राग माणसांचा येतो. नशिबाचा नाही. तिचे नशीब नेहेमीच तिच्या बाजूने उभे राहिले होते. माणसे नाही उभी राहिली तरीही. विद्वान वडील, सरळसाध्या हुशार बहिणी, बुद्धिमान लेक आणि या ना त्या कारणाने तिला स्वत:च्या पायावर उभी रहाण्यास मदतच करणारा नवरा. तिचे नशीब नशीब बलवंत आहे ह्याचे हे पुरावे होते. त्यामुळे आज ती चिडली होती ती कोणा माणसावर.

चार दिवसांपूर्वी तिच्या जवळच्या एका कुटुंबात मृत्यू हजेरी लावून गेला होता. मृत्यू, तसाही शहरात गळ टाकून बसलेला असतो. नेमके त्याच्या गळाला कोण लागेल हे जसे त्या माश्याला माहित नसते तसेच ते त्याला देखील माहित नसावे. त्या घरातील म्हातारी बाईचे कृश शरीर त्या दिवशी त्याला सापडले होते. कृश शरीर व स्वत:चे अस्तित्त्व विसरलेला आत्मा. त्या वयोवृद्ध बाईंना हल्ली आपल्या आसपास काय घडत आहे हे कळण्यापलीकडे गेले होते. भूक लागत असे व बाकी शरीरधर्म चालू होते. अशक्त शरीराला स्वत: हालचाल करून कूस बदलता येणे शक्य नव्हते. त्यामुळे शरीरात किडे पडू लागले होते. घरातील माणसे मग काय करत होती ह्यावर तसे बोलण्यासारखे काही नव्हतेच. त्यांना इतर उद्योग होते इतकेच म्हणता येईल. 

आज विद्या व तिची लेक त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी गेल्या होत्या. ज्यावेळी घरातील एक माणूस वारलेला असतो त्यावेळी पाठी राहिलेल्या माणसांच्या आयुष्यात कोणाची आई, कोणाची मावशी आणि कोणाची सासू गेलेली असते. विद्याची ती मानलेली सासू होती. वयाच्या सतराव्या वर्षी, कॉलेजच्या दिवसांत, तिची त्यांची ओळख करून देण्यात आली होती. तिचा त्यावेळचा मित्र, स्वत:च्या आईपेक्षा देखील अधिक त्यांना मानत होता. व आपण कोणाबरोबर फिरतोय हे दाखवण्यासाठी तो विद्याला घेऊन त्यांच्या घरी पोचला होता. म्हणजेच तसे म्हटले तर विद्याचा तो दाखवण्याचा कार्यक्रम होता. त्यावेळी त्या पन्नाशीच्या आसपास पोचल्या होत्या. गव्हाळ रंग, अंगावर नऊवारी पातळ, आणि घरातील सर्व हालचाल त्यांच्या बोटाच्या इशाऱ्यावर चालवण्याइतकी हिंमतवान बाई. विद्याला त्यांनी जवळ बसवले, न्याहाळले व आपल्या आवडीची पावती आपल्या मानलेल्या लेकाला देऊन टाकली. बाई तशा प्रेमळ.

तब्बल चार दिवस उलटून गेल्यावर त्या घरी दोघी पोचल्या होत्या. गाडी चालवत. नोकरीच्या दगदगीत आणखी काही वेगळं करणं तिला तर शक्य नव्हतंच. आणि अंतिम दर्शन घेतल्याने नक्की काय साधतं हे तिला अद्याप तरी कळलं नव्हतं. उलट अंतिम दर्शनात जे बघावं लागतं ते नाहक कायम हृदयात जाऊन बसतं हे तिने तिच्या नवऱ्याचं अंतिम दर्शन ज्यावेळी घेतलं त्याचवेळी कळलं होतं. दोन वर्षांपूर्वी. ते न टाळता येण्यासारखं. असो. विद्याच्या सगळ्याच वागण्याला काहीनाकाही कारण होतंच. तसेही तिचे काही विधवा म्हणून रहाण्याचे वय नव्हतेच. परंतु, तिने आता देवाशी भांडण करणे सोडून दिले होते. त्याला आपल्यापेक्षा नक्कीच अधिक कळते व तो नेहेमी आपले भलेच चिंतीत असतो हे मानून टाकले की जगणे तसे सुकर होऊ शकते. हे इतकेच तत्वज्ञान म्हणजे तिच्यापुरती तिची गीता, रामरक्षा, मनाचे श्लोक वगैरे वगैरे होते. घर चालवायचे म्हणजे पैसे कमवायला हवेत हे शेवटी सत्य होते. दर महिन्याच्या शेवटी मोबाईल वाजला की ती आशेने त्याच्याकडे बघे....पगाराचा एसेमेस.

दोघी तिथे पोचल्या तेव्हा संध्याकाळ उलटून गेली होती. रविवारचा दिवस होता. जेवणखाण, घरचे सगळे आवरून दोघी निघाल्या होत्या. बाईंचे घर दूर. दोन तासांच्या अंतरावर. नवरा गेल्यानंतर विद्या जबाबदाऱ्या सांभाळत होती. व तसेही मुद्दाम कोणी त्या घरातून ह्या दोघींची चौकशी करण्यासाठी येण्याची अपेक्षा विद्याने देखील ठेवलेली नव्हती. गेल्या दोन वर्षांत, ती त्यांना फोन करून त्यांची चौकशी करत नाही म्हणून तशी नाराजगी त्यांचीच होती. वयाने ते सर्व मोठे म्हणजे त्यांचा मान मोठा.

आत बेडरूममध्ये ती येऊन बसली. तिची लेक व त्या घरातील छोटी मुले ह्यांच्या गप्पा गोष्टी सुरु झाल्या. आधी घरातील बायकांशी बोलणे झाले. त्या उठून गेल्यावर बाईंच्या तीन लेकांपैकी एक लेक विद्याच्या बाजूला खुर्चीवर येऊन बसला.
"चांगलं मेंटेन केलयंस स्वत:ला !"
"म्हणजे ?" हे ती मोठ्याने ज्यावेळी बोलली त्यावेळी मनात ती काही वेगळेच बोलत होती.
"नाही म्हणजे जशी आधी होती तशीच आहेस." अच्छा...म्हणजे माझा नवरा गेला तरी मी होते तशीच राहिलेय का....? ना केस पांढरे झाले...ना डोळे खोल गेले ना भोवती काळी वर्तुळे आली...आणि ना चेहेरा खपाटीला गेला...
"तुझी लेक मात्र फार बारीक झालीय गं..." हे पुढचं वाक्य....हो का ? म्हणजे हिचा नवरा गेला तरी ही होती तशीच गुटगुटीत आणि हिची ती बिचारी पोर बघा....बाप गेला आणि ही पार उतरून गेली...अरेरे...
"पण तिचं वजन अगदी व्यवस्थित आहे. आणि ती अगदी लहान होती तेव्हा असलेले गोबरे गाल आता अजून कसे रहातील शिल्लक ?" हे विद्या मोठ्याने म्हणाली. खरंच बारीक झालीय की काय ही ? पण मी हिला सारखं चांगलचुंगलं खायला घालत असते ना...घरचा वजनाचा काटा तर असं काही म्हणाला नाही. एक चिंता विद्याच्या मनात फटकारा मारून गेलीच.
"तरी..." तुमची आई गेली म्हणून मी तुम्हांला भेटायला आलेय....त्यात मी स्वत:ला कसं मेंटेन केलंय ह्याचा संबंधच काय ? हे असलं सगळं मनात बोलावं आणि डोक्याला त्रास करून घ्यावा. हा विद्याचा स्वभाव. त्यामुळे पुढे ती काहीही बोलली नाही.
"चल...निघूया आपण." बाहेर बसलेल्या लेकीला ती म्हणाली.

दोघी तिथून निघाल्या तेव्हा चांगलाच काळोख झाला होता. नवरा गेला त्यामुळे आता खंगून जाणे ही आपली जबाबदारीच का बनते हे तिला तरीही कळले नाही. म्हणजे ह्यांच्या ताब्यात असते तर बहुतेक मला सतीच बनवून आगीत ढकलले असते. तेच तर कारण नव्हते का...तरुण तरुण, लहान लहान मुलींना पतीदेव स्वर्गवासी झाले की आगीत ढकलून देण्यामागे...उगाच तरण्याताठ्या बायका पुरुषप्रधान समाजाने सांभाळाव्याच का मुळात ? नसती जबाबदारी व डोळ्यांना फुका त्रास...!

तिरमिरीत विद्याने गाडी चालू केली.
अंधारलेल्या रस्त्यात अंधारलेल्या समाजाला बाजूला सारून.
रविवार नंतर सोमवार येतो हे विद्याला माहित होतं. सोमवारी ऑफिस असते. विद्याचा नवरा जिवंत आहे की नाही ह्याच्याशी ऑफिसमधल्या लोकांचा काडीचाही संबंध नव्हता. आपण हिला जो पगार देतो त्या प्रतीचे काम हिच्याकडून नक्की करून मिळते आहे की नाही ह्या बाबीला तिथे अधिक महत्त्व होते.
आणि आता आयुष्यात सगळे टक्केटोणपे खालेल्या विद्याला तेच सर्वात बरे वाटे.
खणखणीत व्यवहार.
जगण्याला आधार.

Friday, 20 January 2012

बालक

एक लहानगं मुल. बाळसेदार.
नुकतंच चालू लागलेलं. दुडूदुडू.
चिमुकला, घरात फिरत असे.
बाहेर पडण्याला मर्यादा होत्या. बंदोबस्त केला गेला होता.
वाटेत अडसर होता. बांध होता.
तो, कितीदा निघे. माघारी फिरे.
मनाई होती. जगाला तो दिसू नये ही भावना होती.
लपवून दडवून ठेवलेला जणू हिरा तो.
गेले किती दिवस...किती महिने...
असे कित्येक, जन्मत होते.
परंतु, ती जणू कंस.
आत कोंडून घाली.
श्वास दाबून टाकी.
मात्र आज काय झाले ?
द्वार कसे उघडे पडले ?
बांध कुठे नाहीसा झाला ?

आज ती गाफील होती.
आणि तो मोकाट होता.

ती एकटी.
तिचा अश्रू एकटा.
गालावरून घरंगळला...
अर्ध्या वाटेत सुकून गेला.

Thursday, 19 January 2012

ना घर ना घाट

नेहेमीचा मुंबईतील दिवस. चढत्या भाजणीचा. येथील सूर्य हा मुळातच त्याचे डोळे उघडले की ट्रेडमिलवर चढतो. सुसाट वेग ट्रेडमिलला देऊन टाकतो. स्वत: धावू लागतो आणि त्यामागे सर्व मुंबईकर. लटकत, फरफटत. नेहा आज नेहेमीपेक्षा लवकरच घराबाहेर पडली होती. सगळ्यांनी ऑफिसमध्येच भेटायचे व तेथूनच पुढे मिटींगला निघायचे असे कालच ठरले होते. पावणेदहापर्यंत सर्वजण जमा झाले. लगोलग मोठमोठ्या गाड्या बाहेर पडल्या. रस्त्यावर पळू लागल्या. अगदी पळू नाही म्हणता येणार...पण मॅराथॉन शर्यतीत जसे नवशिके सुरुवात अगदी वेगात व जोशात करतात आणि पुढील पंधराव्या मिनिटाला, जमिनीला पाय टेकल्यागत संथ चालू लागतात तसेच काहीसे ह्या लांबसडक गाड्यांचे झाले. मिटिंग साडेदहाची होती. ऑफिसपासून वीस ते पंचवीस मिनिटांच्या अंतरावर होती. त्यामुळे तसेही काही काळजीचे कारण नव्हते. नेहा, तिच्या बॉससमवेत काळ्या स्कोडामध्ये मागे बसली होती. बॉसची ऐसपैस गाडी. एक सहकारी पुढे वाहकाच्या शेजारी. अशी ही चारांची वातानुकूलित गाडी, त्यांच्या मोठ्या मोहिमेवर निघाली होती. आठवड्याचा मध्य दिवस. कामे भरास आलेली. तसंही बॉसबाई असल्या की नेहाला बोलायचे फारसे नसेच. बॉस वक्ता व नेहा श्रोता. ऐकता ऐकता नेहा गाडीबाहेर डोकावीत होती. बाहेरील प्रत्येक माणूस मनात काहीनाकाही बेत रचून रस्त्याला लागलेला दिसत होता. वेगवेगळ्या दिशेने माणसे धावत होती. पळत होती. वयोमानाला कधी शोभतील असे कपडे तर कधी थोडा विसंगत असा पेहेराव. परंतु, सर्व चेहेऱ्यावर भाव मात्र एकाच प्रकारचे. रस्ता, पदपथ हे दोन्ही हलते असले तरीही एकूण सगळेच साचेबंद. जणू काल ह्यावेळी इथे हीच हालचाल झालेली असावी. व उद्याही ह्याच वेळी जणू हे असेच घडेल. नेमून दिलेल्या भूमिका. ठरवून दिलेली कामे. श्वासाचा एकच ताल आसपासच्या सर्व जीवित गोष्टींनी पकडलेला.

तिच्याच तंद्रीत हरवलेल्या नेहाला, तिच्या बॉसची बडबड व बॉसच्या ड्रायव्हरची नाहक हॉर्न वाजविण्याची सवय...दोन्ही गोष्टी कानाला पीडाच देत होत्या. आणि कान हे डोक्याला चिकटलेले असतात. त्यामुळे तो कर्कश आवाज थेट डोक्यात जाऊन आदळत होता. ज्या इमारतीत मिटिंग होती ती इमारत रस्त्याच्या पलीकडे होती. तेव्हा थोडं पुढे जाऊन एक अर्धवर्तुळाकार वळण घेणे गरजेचे होते. बॉसच्या सूचनेचे पालन करीत तिच्या ड्रायव्हरने सफाईने हातातील चक्र फिरवले. चारी चाके आज्ञाधारक मुलांसारखी लयीत वळली.
"शिंदे, गाडी लेफ्ट में रखो. इधरही थोडा आगे है वो बिल्डींग." हिचं हिन्दी म्हणजे...नेहा मनातल्या मनात पुटपुटली.
गाडी आज्ञेसरशी डाव्या बाजूला सरकली. नेहा डाव्याच बाजूला बसलेली होती. त्यामुळे रुंद गाडी इतक्या तातडीने वळत असताना, डाव्या बाजूला कायकाय दूर पळत होतं ते तिला खिडकीतून दिसत होतं. काही सेकंदांत गाडी पूर्ण डाव्या बाजूला आलेली होती.
"शिंदे वो रही बिल्डींग. अंदर ले लो."
तितक्यात नेहाची नजर पडली ती रस्त्याच्या कडेला कचऱ्याची ढकलगाडी घेऊन जाणाऱ्या एका स्त्रीच्या पाठमोऱ्या आकृतीवर. अनवाणी पावलांच्या थोडे वर खोचलेले हिरव्या रंगाचे पातळ. काळसर रंग. सकाळच्या तिच्या सहकाऱ्यांनी कडेला जमवून ठेवलेला कचरा जमा करीत, रस्त्याच्या त्या टोकापासून ती इथवर आली असावी. नेमकी ज्या इमारतीत नेहाचा कंपू निघाला होता त्याच वळणाच्या तोंडाशी. नेहाने ड्रायव्हरकडे नजर टाकली. ड्रायव्हर 'अर्जुन' होता. त्याला फक्त बॉसने सांगितलेली दिशा दिसत होती. आजूबाजूचे दुसरे काहीही नाही. वळव म्हटले, गाडी वळली. त्या बाईच्या हाताशी ओसंडून वाहणाऱ्या कचऱ्याची ढकलगाडी दिसत होती. ड्रायव्हरच्या हाती आलिशान स्कोडा. दोन्ही गाड्या अर्थार्जनासाठी त्यांच्या हाती पडल्या होत्या. समाजातील आर्थिक स्तरांवर त्या स्त्रीच्या गाडीचे स्थान, सर्वात खाली. ड्रायव्हरच्या हातातील गाडीने, त्याचे स्थान पार वर नेऊन ठेवलेले. त्याने काय म्हणून तिच्यासाठी थांबावे ? खरं तर फक्त काही क्षणांचा प्रश्र्न होता. परंतु, त्या क्षणांवरच तर त्या समाजातील दोन व्यक्तींमधील एकाचे श्रेष्ठत्व अवलंबून होते. त्याची गाडी आलिशान. वातानुकूलित. ड्रायव्हरने सराईतपणे हातातील सुदर्शन चक्र फिरवले. चार चाके वळली. अकस्मात समोर आलेल्या ह्या गाडीला मार्ग देण्यास ढकलगाडी थांबणे तातडीचे होते. नाहीतर ढकलगाडीने काळ्या स्कोडावर आपल्या नखांची क्षते उमटवल्याशिवाय सोडलेच नसते. ढकलगाडीला तिचे वर्चस्व सिद्ध करावयास काही वेळ नसता लागला. आणि जखमा खरं तर स्कोडालाच झाल्या असत्या. बाईने ढकलगाडीला अंगाशी ओढून घेतले. नेहाने क्षणार्धात हे सर्व टिपले होते. स्कोडा काही सूत पुढे गेल्यावर नेहाने मागे वळून बघितले. आणि त्या बाईची व नेहाची नजरानजर झाली. बाईच्या नजरेत संताप होता. नेहाने तो स्वत:च्या अंगावर उगा झेलला. आत नजर वळवली. गाडीतील कोणालाही ह्या एका क्षणाच्या नाट्याची जाणीव देखील नव्हती. बॉसने सांगितले त्या जागी व त्या क्षणी ड्रायव्हरने वळण घेतले होते. स्कोडा वळली होती. प्रथम पुढे असलेली गरीब तीनचाकी ढकलगाडी, हिरमुसती मागे थांबली होती. तिने नमते घेतले होते. श्रीमंत चारचाकी स्कोडा गर्वात पुढे पळाली होती. 

हे सर्व म्हटले तर नाट्य व म्हटले तर मुंबईसारख्या शहरात रोज दिसणारा अहंभाव होता. आर्थिक स्तरांवरील खिन्न करणारी विषमता. त्यामुळे आलेली निराशा व एक बेगुमानता...ही अशी प्रत्येक क्षणाला मुंबईत कुठेनाकुठे तरी ठिणगी पाडत असते. कधी ओझरती तर कधी आग लावणारी. इथे मानापमान हातातील वाहनांवर ठरतो...कुत्र्याच्या वागण्यावरून अनेकवेळा त्याच्या मालकाच्या स्वभावधर्माची ओळख करून घेता येते...चालायचेच. गाडी थांबताच नेहाने इतका वेळ बाजूला पडलेली पर्स खांद्यावर अडकवली व दार उघडून ती जमिनीवर आली.

ती ना खालच्या स्तरातील ना वरच्या.
मध्यमवर्गीय नेहा.
ना घरकी ना घाटकी.
त्या नवनिर्मित इमारतीतील लिफ्ट अलगद समोर जमिनीला टेकली. दार उघडले. नेहा पुढे उभी होती. परंतु, आता नेहाने बाजूला होणे अपेक्षित होते. एकवार त्या कचरेवालीशी झालेली नजरभेट तिला आठवली. नेहा बाजूला सरकली. सर्वात प्रथम आत शिरण्यासाठी तिने बॉसला जागा करून दिली. तिसरा मजला आला. दरवाजा हळूहळू उघडला. नेहाने मान झटकली व कचरेवालीची जळजळीत नजर डोक्यात मागच्या कप्प्यात टाकून दिली. संगणकावर एखादी नको असलेली फाईल डेस्कटॉपवरून उचलून जणू कुठे आत गुहेत सरकवून टाकावी. डेस्कटॉप तेव्हढाच मोकळाढाकळा. दिखाव्याला रिकामा.
चला...ही मिटिंग चांगली होऊन जाऊ दे.
कंपनीला हा धंदा जर मिळाला तर वर्षाच्या शेवटी अप्रेजल चांगले होईल...
And that's what matters...
नेहा मनातल्यामनात मिटींगची उजळणी करू लागली.

Tuesday, 17 January 2012

आढे

डोळे उघडले, नजर वर टाकली तर आढेच दिसते. म्हणजे आढ्याकडे मुद्दाम नजर लावून बसले होते असे काही नाही. गादीवर पडल्यापडल्या वर आणि दुसरे काय दिसणार ? निद्रेच्या पूर्ण आधीन होणे म्हणजे जसे काही एखाद्या हिरव्यागार दरीत तरंगत रहाणे. हलके नाजूक शुभ्र पीस आणि मंद मंद गार हवा. तरंगत जावे आणि मग जसजसा अंधार विरळ होऊन प्रकाश पसरत जावा तसतसे ते पीस हलकेच पुन्हां येऊन बिछान्यावर विसावे. बिछान्याच्या स्पर्शाने जाग यावी, डोळे उघडावे आणि सत्यात पुन्हा एकदा शिरावे. साच्यातला तो दिवस. त्यात नाविन्य ते काय ? मात्र आज मन उगाच थरथरले. जसे एखादे हरीण. समोर भयावह नसताना देखील कुठे झुडुपामागे त्याने अंग चोरून घ्यावे. कधीकधी एखाद्या विचाराचे मुख कुठून आले ते नजरेस पडत नाही. परंतु, त्या विचाराच्या सर्पमय लांबसडक शेपटीच्या टोकापाशी मात्र अगदी प्रकाशाच्या वेगाने, मन पोचून जाते. बावरते. मन हरीण. आणि विचार हे जसे विषारी सर्प. वळवळ. खळबळ. त्याच्या हालचालींवर बंधन शून्य.

गेले काही दिवस, हसत आले आणि हसत गेले. नवनव्या ओळखी. नवनवे मित्र. नवनवी नाती. मग त्यात कसली भीती ? मन का हरीण ?

भीती ? भीती ह्या इतक्या सुखाची. मन हरिणाला, रान इतके हिरवे असण्याची सवय नाही. हिरवीगार झाडे, कोवळी मऊ पाने, रंगीबेरंगी बोलकी फुले. हे सर्व भयावह. फसवं. दु:ख होतं ते खरं होतं. हिरवळ काल्पनिक आहे. सुखाच्या पाशात मी माझ्या दु:खाला विसरून जाईन. त्याचा माझ्याकडून अपमान होईल. आणि ते कदापी होऊ नये. दु:ख रागावले, दु:ख संतापले आणि त्याने पुन्हा फणा उगारला तर आता मी कुठे जाईन ? हे असे होता कामा नये. मला विसर पडता कामा नये. आज जी मी आहे तीच मुळी माझ्या दु:खाच्या जोरावर आहे. त्यात सुखाचा काय संबंध ? आयुष्यात कधीही सुख बघितले नाही असे तर नव्हेच. परंतु, त्यावेळी सुखदु:खाला एक तराजू होता. हसत असावं आणि त्याचवेळी दु:खं आपली हजेरी लावून जावं. म्हणजे सगळं कसं समतोल.

आज जागच मुळी ह्या जाणिवेने आली. कोणाचा अपमान करण्याचा हेतू कधीही नसतो. 'दु:ख हरलं. त्याचा नामशेष उरला नाही'.. ही अशी बेजबाबदार विधाने मी काय करणार ? त्याच्या शक्तीची कमाल मी ह्या उघड्या डोळ्यांनी बघितली. माझे हरीण मन कसे कोण जाणे परंतु, त्यात्या वेळी मजबूत खांब बनून उभे राहिले. मात्र, आज पुन्हां दु:खाने शेपटी फिरवू नये...फटकारू नये...असे काहीही होऊ नये. काय आज कुठे कोपऱ्यात दु:ख सुस्तावून बसून आहे ? एखाद्या संधीची वाट पहात आहे ?

मी डोळे पुन्हा मिटले. दु:खाला मनोमन नमन केले. डोळे उघडून, त्या आढ्याकडे नजरही न टाकता बिछान्यावरून खाली उतरले.

...आढे जसे निराशेचे खोल विवर.
घड्याळ जसे आयुष्याचे सत्य.
साडेसहाच्या पुढे काटा सरकला हेच सत्य होते.
आणि त्या सत्याआड, मस्टरवरील अजून एक लेटमार्क लपलेला होता.

Monday, 9 January 2012

कथा

मित्रमैत्रिणींनो, मी एक कथा लिहिली आहे...'मीमराठी लेखन स्पर्धेसाठी'.
लिहायचं आणि ते तुमच्यापासून लपवून कसं काय बुवा ठेवायचं...?!
म्हणून इथे लिंक देतेय ! :) :)
'खिडकी'