नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 29 January 2012

त्सुनामी

कितीतरी विचार मनात येत रहातात. कल्पना उसळत रहातात.
बंद खिडकी बाहेर बघितलं तर वारा वहात असतो. झावळ्या गरगरत असतात, आणि झाडे बसल्या जागी डुलत असतात.
पण स्मशान शांतता पसरलेली असते. जसं टीव्ही लावावा आणि त्यावर त्सुनामीने केलेला हाहाकार उघड्या डोळ्यांनी पहावा...आवाज बंद करून. मग सगळ्यालाच एक अमानवी रूप येतं. मनाबाहेर उलथापालथ. खोल मनात मात्र उसनी शांतता.
खिडकी बंद करून घेतली की एक बरं होतं. मनात चालू असलेलं मंथन बाहेर जाणवत नाही. आणि बाहेर चाललेली घडामोड थंड नजरेने न्याहाळता येते.
खिडकी कधी उघडूच नये.
बाहेरचं जग बाहेर आणि आतील समुद्र आत.

नाहीतरी, उसळलेला समुद्र कोणाला झेपत नाही.
तो हाहाकार माजवूनच विश्रांत होतो.

एकटीने घर चालवणे कुठे कधी सोपे वाटले होते. किंवा खरे तर संसार उभा करताना त्याची जबाबदारी एकटीवरच पडणार आहे हे कधी स्वप्नात देखील नव्हते वाटले. पण बायकांच्या संसाराच्या कल्पना आणि पुरुषांच्या कल्पना ह्यात जमीनअस्मानाची तफावत. संसार तर दोघे एकच चालवायला घेतात पण त्यांच्या मूळ संकल्पनाच उत्तर-दक्षिणेच्या. सगळंच कठीण. 
वाण्याचं बिल...फोनचं बिल...बँकांची कामे...कॉलेजची फी..आजारपणे...प्रेझेन्टेशन्स...मिटींग्स...डेडलाइन्स...प्रमोशन... इन्क्रिमेंट...सापशिडी.
हातातून सुटलेले फासे...गडगडणारे फासे...अस्थिर फासे.

चालायचंच...
हे सगळं असं घडलं नसतं तर देवाला तरी एक अजून उत्कंठापूर्ण सत्यकथा लिहिण्याचा आनंद कसा काय मिळाला असता...?
कंटाळवाणी, रटाळ कथा लिहिण्यात काय मोठे ?
कलाकृती अशी हवी...जी रोज काही नवे चित्र दाखवेल....नित्य त्यातून काही नवे दृश्य दिसेल.
असे काही हातून घडवण्यातील संतोष, हर्ष, आणि शेवटी...झपाटणारा उन्माद...त्या उन्मादातून जन्म घेणाऱ्या त्याच्या नवनवीन कथा...त्याची न थकणारी लेखणी.

माझं क्षीण कल्पक मन, देवाच्या विलक्षण कल्पक मनाला अखेर सलामच ठोकतं...

16 comments:

rajiv said...

समुद्रमंथनातून रत्ने हाताशी येतात असे म्हणतात ...हे खरेय !!
ह्या त्सुनामिशिवाय 'हि रत्नजडीत 'लेखणी' आमच्या नजरेस कशी पडली असती ..?
क्लेशकारक असले तरी एक वेगळाच विचार मनाला देऊन जातोय हा लेख >>"बायकांच्या संसाराच्या कल्पना आणि पुरुषांच्या कल्पना ह्यात जमीनअस्मानाची तफावत. संसार तर दोघे एकच चालवायला घेतात पण त्यांच्या मूळ संकल्पनाच उत्तर-दक्षिणेच्या."
"कलाकृती अशी हवी...जी रोज काही नवे चित्र दाखवेल.......त्या उन्मादातून जन्म घेणाऱ्या त्याच्या नवनवीन कथा...त्याची न थकणारी लेखणी."
सुंदर संकल्पना आहे ही ..!!

अनघा ...लिखते राहो ...त्या दैवी लेखणीने ....

रोहन... said...

काय लिहावे बरे??? शि बाबा... काही सुचेचना... हे असे काही लिहितात आणि मग आम्हाला विचार करत बसावे लागते.

Shriraj said...

तुझी लेखणी ही काही कमी कल्पक लिहित नाही हं, अनघे. तुझ्या डोक्यात येणाऱ्या कल्पना माझ्या डोक्यात नाही येत बुवा. ती 'कावळ्या'ची गोष्ट तर देवाच्या ही डोक्यात आली नसती.

BinaryBandya™ said...

अहा!!

Anagha said...

राजीव, आभार....मी काही लिहिले की त्यातही सौंदर्य शोधल्याबद्दल आभार...

Anagha said...

रोहणा, करच विचार...माझी मांजर बघ कशी खुष राहील मग ! :) :) :)

Anagha said...

श्रीराज, अरे ती कशी काय मला सुचली हे मला पडलेलं कोडंच आहे ! :) :)

Anagha said...

बंड्या... :) :)

सुप्रिया.... said...

"बायकांच्या संसाराच्या कल्पना आणि पुरुषांच्या कल्पना ह्यात जमीनअस्मानाची तफावत. संसार तर दोघे एकच चालवायला घेतात पण त्यांच्या मूळ संकल्पनाच उत्तर-दक्षिणेच्या"
कठीण आहे खर पण सत्य आहे....

देवासारखीच तुझीही लेखणी कल्पक आहे.....

हेरंब said...

एका शब्दात प्रतिक्रिया द्यायची तर रोहन + १ :)

भानस said...

मीही रोहन+ असेच म्हणते. :)

बाकी जीवनाच्या चित्राला कसा वेग हवाच. नवनवीन संकल्पना निर्माण व्हाव्यात, रुजाव्यात आणि पुर्‍याही व्हाव्यात.

Anagha said...

सुप्रिया, ह्या प्रेमासाठी मनापासून आभार गं. :)

Anagha said...

हेरंबा, म्हणजे तूही विचार करू लागलास तर. :)

Anagha said...

श्री, कोड्यात पडलेय हा मी ! :) :)

सौरभ said...

वाह वाह!!! कमाल हा... बाकी हवेच्या झुळकेने डबक्यात उठणाऱ्या तरंगांनी समुद्रातल्या त्सुनामीच्या लाटेला काय दाद द्यावी. थोरच...

Anagha said...

सौरभ ! :) :)