नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 31 December 2010

हे की ते?

गंमतच!
"Ana, we all think you are non-emotional!"

माझ्या सुरेखश्या नावाची हे अशी वाट लावतात ही वेगळीच गोष्ट! पण हे non-emotional म्हणजे एकदम भारीच! म्हणजे आम्हांला शाळेत शिशूवर्ग, बालवर्गात निकालपत्र म्हणून एक छानसा हिरवट रंगाचा, बाईंच्या हस्ताक्षरातील कागद मिळत असे. अगदी आता कधी कुठे रद्दीत दडलेला हाताशी लागला तर हृदयाची धरावा आणि डबडबलेल्या डोळ्यांनी वाचावा असा काहीसा...
हळवी भाबडी अनघा...
सगळा तो हिरवा कागद फिरलाच नजरेसमोर...आणि ह्या इथे वातानुकुलीत माझ्या छोट्याश्या चौकानात येऊन माझ्यासमोर अवतरला...

शिकवलं बाबा ह्या आयुष्याने...बरंच काही...अगदी ह्या प्रोफेशनल आयुष्यात जगायलाच शिकवलं!

Thursday 30 December 2010

शूssssssss....

...म्हणजे कसं छानशी रात्र आहे....चांदण्यांची...मंद मंद वारा आहे...समोर संथ संथ जलाशय आहे...अगदी चंदेरी....आणि पौर्णिमा हवी की कोरीव चंद्रकोर? असं वाटतंय कि ती अशी हसरी कोर असते ना तशीच हवी काळ्याभोर रेशमी आकाशात. आणि जुन्या कृष्णधवल मराठी सिनेमातलं आकाश...म्हणजे एखादा करडासा तरंगता ढग, त्या रुपेरी कोरीच्या सोबतीला....आहे की नाही सुंदरशी वातावरण निर्मिती?
आणि आहेतच आपल्यासाठी आपले सुधीर फडके, अरुण दाते, सुरेश वाडकर, आशा भोसले...अगदी मस्त मस्त!

Powered by eSnips.com

कट्टी

कट्टी.
म्हणजे तू वागलेलं मला आवडलं नाही. म्हणून कट्टी. अबोला.

किशोरवयात, कॉलेजमधून घरी यायला उशिरा होतो म्हणून वडिलधाऱ्यांचा अबोला. वागणं चुकीचं आहे म्हणून अबोला. त्याच वयात; घातलेले कपडे नाही आवडले, त्याच्याशी का बोललीस, ह्याच्याबरोबर का हसलीस, इतकी का हसलीस म्हणून जिवलगाचा अबोला. महिना महिना. म्हणजे घरी कोणी बोलत नाहीच. बाहेर जिवलग बोलत नाही. गडबड. गोंधळ. वय तर चुकांचंच. मग अधिक चुका. वाढत्या चुकांनुसार वडिलधाऱ्यांचा वाढता अबोला. म्हणजे एक गरगर फिरणारा गुंता.
चुका म्हणून अबोला आणि अबोला म्हणून चुका.

मग दिनदर्शीका पालटत जाते. दशकं ओलांडतात. काहीही कष्ट घेता, साल दरसाल वय वाढतं. भूमिका बदलतात. मग ते न्यायाधीशाचे अदृश्य सिंहासन आपसूक दाखल होतं. आपण नकळत विराजमान. वाढत्या वयाची मुलं चुका करतात. आधुनिक युगाच्या अत्याधुनिक चुका. मग आता आपण काय करणार न्याय? अबोला? आता काय, आपण धरायचा अबोला? वडिलधारे कायम बरोबरच असतात, अशी काळ्या दगडावरची रेघ आपल्या हृदयावर मारून घेतली तर संपलेच की! मग आपल्या वडील माणसांनी केलेल्या चुका, आपल्या हातून परत होऊ नयेत अशी काळजी आपण कुठल्या जोरावर घेणार? कारण ते चुकू शकतात हेच आपल्याला मान्य नाही. त्या उलट, आपले आईवडील हे कोणी देव नव्हेत तर माणसेच आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या समजुतीनुसार चुका केलेल्या आहेत. माझी जबाबदारी एकच की त्याच चुका मी माझ्या मुलांच्या बाबतीत करणार नाही. अर्थात म्हणजे मी माझ्या नवीन काही चुका करेन हे त्यात आलंच! कारण मी देखील माणूस आहे. आणि हे मला पूर्ण माहित आहे.

हे जर मान्य केले तर मग माझ्या पुढील पिढीशी, ते चुकीचे वागत आहेत म्हणून मी अबोला धरून काय होणार आहे? काय समस्या सुटणार आहेत? नकळत धागा गरगर फिरवला जाईल. गुंता वाढत जाईल. आणि मग तो दुरावा आयुष्याला पुरून उरेल. गुंत्याला टोकं दोन. पण दोन्ही गुंत्यात फसलेली.
चुका +अबोला=अढी=दुरावा. हा दुरावा जीवघेणा. परवडणारा.

माणूस म्हणून प्रत्येक वयाच्या वेगळ्या चुका.
जोडप्यातील चुका. चुका दोघेही करणार. कधी तो. तर कधी ती. एक जोडीदार चुका करणार. आणि दुसरा तत्परतेने अविचारी सिंहासनात जाऊन बसणार. न्यायासानावर. अविचारी सिंहासन. आंधळे सिंहासन. न्याय देण्याचा तो हक्क चालवताना, त्या चुकांना नक्की कोण कारणीभूत आहे ह्याचा शोध कोण घेणार? आसनस्थ होताच आंधळेपण का येतं? म्हणजे अगदी धृतराष्ट्रच. ठार आंधळा.
त्या चुका करण्यास जोडीदाराला आपणच अनावधानाने का होईना पण प्रवृत्त केले आहे काय? म्हणजेच "तू माझा न्याय करणार आहेस...परंतु ज्या चुकांसाठी तू हे न्यायदान मांडले आहेस, त्या चुकांना तूच कारणीभूत नाहीस काय? ज्यावेळी तू एक बोट माझ्याकडे रोखणार, त्याच वेळी तीन बोटे तुझ्याचकडे रोखलेली आहेत...हे तुझ्या ध्यानात आले काय? की 'मी' शंभर टक्के बरोबरच आहे...आणि स्वत:च्या चुकांना १०० टक्के तुझा तूच/ तुझी तूच जबाबदार आहेस..."
टाळी वाजवताना दोन हात लागतात. एका हाताने फक्त कानाखाली वाजते....हे कधी पूर्ण पटणार? आणि जर हे नाही शिरले डोक्यात, तर मग जो आपण न्याय देऊ तो किती प्रमाणात निरपेक्ष असेल? त्यातून प्रश्र्न पुरुष आणि स्त्री यांमधील. पुरुषी अहंकार अध्याहृत. मग न्यायाची सुनावणी. सुनावणी नंतर अंमलबजावणी. न्याय मी देणारच. तुला पटो वा ना पटो. तो तुला बंधनकारक. मी लाख चुका करेन आणि त्या बदल्यात तुला एक चूक देखील अक्षम्य. भारतीय न्यायपद्धतीत जर गुन्हा कबूल असेल तर त्याला शिक्षेचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. परंतु ह्या कौटुंबिक न्यायदालनात, येशू ख्रिस्ताला सुळी चढवण्यासारखेच. किंबहुना त्याहून भयानक. कारण ही शिक्षा चोरून. चार भिंतींच्या आत....वेशीवर टांगला आणि ठोकले खिळे! हे म्हणजे मेंदूत खिळामारी आणि मेंदूची कुरतोड.

कट्टी तर कट्टी.
बारंबट्टी.
बारा महिने बोलू नको.
लिंबाचा पाला तोडू नको,
आमच्या घरी येऊ नको!

Wednesday 29 December 2010

पाटी

पाटी कोरी आहे. सोळाव्या वर्षी आयुष्याच्या पाटीवर काही लिहायला घेतलं होतं.
परंतु पाटी उघड्यावर राहिली आणि अकस्मात आलेल्या जोरदार वादळत सगळी पाटी धुवून निघाली. अगदी कोरी झाली. ह्या घटनेला आता वर्ष होत आलं.
वर्षाच्या सुरुवातीला श्री गणेशाय नम: म्हटलं तर आहे.
पण कधी कधी डोकं रिकामं तर कधी मन रिकामं...आणि मग पाटी रिकामी.
आज पुन्हा पाटी हातात घेतली तर हे असं....
प्रयत्न जारी आहेत....कारण रिकामी पाटी बघितली की मन अजूनच रिकामं. अगदी भकास बिकास...

Friday 24 December 2010

योग

सकाळचे साडे पाच. भला मोठा हल. सूर्याची किरण अजून न पोचलेला. म्हणजे तसा अंधारलेलाच. डाव्या हाताला खिडक्यांची रांग. रोजची ठरलेली जागा. अगदी समर्थ व्यायाम मंदिराचा जिना चढताना त्यावरच सर्व लक्ष. जशी काही ती जागा नाही मिळाली तर आसनं नीट होणारच नाहीत! स्वच्छ पंचा अंथरलेला. आणि केली त्यावर आसने सुरु.
पद्मासन...वज्रासन....आणि इतर.
"हं. डावा पाय दुमड. उजवा पाय डाव्या बाजूला टाक आणि वळ. उजवा हात मागे ने. पाठी कमरेवर ठेव."
झालं. इकडचा पाय तिकडे आणि तिकडचा हात इथे. सर्वांगासन झालं. हलासन झालं. भुजंगासन झालं. चक्रासनातले, मस्त हात वर ताणून शरीर मागे फेकून हात भुईला लावून पण झाले. आणि शीर्षासन सुद्धा झालं.
"अहो, सरोज मॅम. ती मुलगी मुद्दाम कठीण कठीण आसनं करून दाखवते. आम्हांला जळवायाला. तिला सांगा चार पोरं काढ आमच्यासारखी, मग बघुया किती काय अंग वळतंय ते."
दुर्लक्ष...दुर्लक्ष...आपण आपलं ठेवावं आपल्या कुटील आसनांवर लक्ष.
"सरोज मॅम, माझं शवासन घेता का आज?"
"हं. हो आडवी. तुझं शवासन चांगलं झालं असं कधी म्हणता येईल? तर जेव्हां मी तुझा पायाचा अंगठा उचलायला गेले तर तो मला जड वाटेल...आणि तुला हलकं वाटेल....शरीराची जाणीव विसरून जाशील....हं, चल....हा तुझा पायाचा अंगठा....हा पाय....सोडून द्यायचा आहे.....हा हात सोडून द्यायचा आहे.........सगळं शरीर विसरून जायचं आहे.....हे डोकं....सोडून द्यायचं आहे..........
जाग आली तेव्हा समोरचं घड्याळ सांगत होतं की चांगली पंचवीस मिनिटं उलटून गेलेली आहेत. म्हणजे तेव्हढी एक मस्त डुलकी लागून गेलेली आहे. उठले. पंचा घडी केला. टाकला झोळीत. सरोज मॅम कुठे आहेत बरं? "मॅम, मी निघते." "हं. चांगलं झालं न शवासन?" "अं? हो हो!"
वर्षभरात मुंबईत इथे तिथे सदाशिव निंबाळकरसरांबरोबर प्रात्यक्षिकं देऊन झाली. त्यांच्या पुस्तकांत फोटो येऊन झालं.
त्यावर वीस वर्ष उलटवून देखील झाली!
मग आता काय राहिलं काय? सर्वात कठीण आसन!
शवासन! पाय पसरून झोपा...हात विसरा...पाय विसरा...आधी ते डोकं विसरा...म्हणजे शरीर आणि डोकं...डोकं विरहित शरीर...नाही जमलं हे...आजतागायत! डोक्याचा रथ कायम भरधाव. म्हणजे श्रीकृष्ण वाचतोय गीता...अगदी मुक्तीबिक्तीसाठी...आत्मा वेगळं, शरीर वेगळं टाइप. आणि डोकं लागलंय रोजच्या रस्त्याला... आज काय बरं कपडे घालायचे....किती वाजलेत कोण जाणे...उशीर होतोय की काय...मस्टर मिळेल ना.... हेच...तेच ते आमचे रोजचे सामान्य, अतिसामान्य विचार! ...म्हणजे कसं आत्मा तरंगायला हवा...आणि शरीर जड व्हायला हवं...पण...पण मला कसं कळणार ते?...कोणी उचलायला गेलं तर कळेल ना....की शरीर जड झालंय की नाही! म्हणजे जेव्हां आत्मा बाजूला खुर्चीत जाऊन बसेल....आणि शरीराकडे बघेल...कोणीतरी शरीर उचलू पाहिल...आणि ते त्याला जड वाटेल...मग बाजूला बसलेल्या आत्म्याला कळेल की हा! आज कुठे जमलं बुवा हे शवासन! कित्ती वर्ष प्रयत्न करावे लागले!!!
पण हे तर जरा काही वेगळंच वाटतंय नाही का? म्हणजे...संधी फोडला तर शव+ आसन....
छॅ! सक्काळी सक्काळी! कैच्या कै!

Wednesday 22 December 2010

आवराआवर

खिडकीतून हलकाच प्रकाश टेबलावर. निळा प्रकाश. काच निळी म्हणून प्रकाश निळा. वरून खालपर्यंत आलेला केशरी जाडजूड पडदा. म्हणजे सूर्याने जो काही प्रकाश पाडायचा तो बाकी राहिलेल्या आयतातून. टेबलावर पसारा. म्हणजे कागद, फायली, फोन वगैरे, वगैरे. जसा डोक्यात विचारांचा पसारा? तसाच. टेबलावर पसरलेला पसारा. ना डोक्यातील विचारांना शिस्त...ना ह्या टेबलाला काही आवडनिवड. काही शोभेच्या वस्तूही त्यातच. म्हणजे आता त्या वस्तूंचे पसाऱ्यातच रुपांतर झाले म्हणायचे. दोन अर्धे अर्धे कॉफी मग्स. एकत्र ठेवले की एक वर्तुळ पूर्ण. बाहेरून दोन्ही काळे. आतून एक हिरवागार तर दुसरा भगवा. म्हणजे जणू बाहेरून माणूस काळा कुळकुळीत असला तरी आतून रंगीन असू शकतो असाच काहीसा संदेश देणारे. रस्त्यात विकत घेतले. स्वस्तात. त्यावेळी असंच काहीसं वाटत होतं. बाहेरून अंधारलेलं पण तरीही आत धुगधुगी. म्हणून घेतले विकत. वापर शून्य. म्हणजे आत मगात डोकावलं तर आत काय वाट्टेल ते. पेन्सिल, शार्पनर, पिना, टाचण्या, टिश्यू पेपर...काहीही. बाजूला तीन गणपती. तीन का? सहज. तीन मिळाले म्हणून तीन. कधी एकमेकांकडे तोंड करून बसलेले तर कधी एकटे एकटे. त्या बाजूला हा मॅक. २१ इंची. त्याच्याही अंगावर पसाराच. फायली, फोल्डर्स इत्यादी इत्यादी. रोज नव्या फायली. रोज नवी फोल्डर्स. म्हणजे आधीचा कचरा तसाच आणि त्यावर रोज नवा नवा. इंटरनेट दिवसभर चालूच. घरच्यासारखं नाही. इथे फुकट. म्हणून मॅकला त्याची साथ दिवसाच्या शेवटपर्यंत. मग त्यात हा मेलबॉक्स. भरलेला. ८०० पत्रांनी. हे एक बरं. नाही उघडली सर्व पत्र, तरीही रहातात ती आपली शांत बसून. आणि कचरा लपून. तसं घरी पडलेल्या पत्रांचं नाही होत. पोस्टमन आणून टाकतो. आणि ती उघडायलाच लागतात. आणि मग फाडून फेकून द्यायची. पण उघडायची नक्की. त्यात कधी तुझं पत्र नसतं. ह्या जागतिक मेलबॉक्स मध्ये मात्र आहेत. तुझी जुनी पत्र आहेत. कचऱ्यात न टाकलेली. आज मेलबॉक्स थोडा रिकामा केला. 'A' पासून सुरुवात केली. मग 'R' ला कचरा काढणं थांबवलं. म्हणजे स्वैंपाकघरापासून सुरुवात केली आणि बेडरुमच्या दारात थांबवलं. माहित होतं त्यापुढे आता तुझी पत्र येणार. नजरेसमोर. ती काही प्रेमपत्र नव्हेत. आल्यागेल्या, काही कामाची तर पत्र. म्हणजे हे कर, ते कर अशी. तू असं केलंस, मग मला राग आला वगैरे. प्रियबिय काही नाही. आणि 'तुझाच' तर नाहीच नाही. असू दे. तरी ती तुझी पत्र. आता तू नाहीसच म्हटल्यावर जपायलाच हवी. तू गेल्यावर तुझ्या डायरीत मिळाले तुझे सर्व पासवर्डस. बाकी काही नाही मिळालं पण हे मिळालं. पासवर्डस. म्हटलं हे चांगलंच आहे. म्हणजे तुझ्या अनेक चांगल्या सवयीमधील ही एक चांगलीच सवय आहे. मग मी देखील लिहून ठेवले. माझे सर्व पासवर्डस. आपल्या लेकीला माहित असावे म्हणून ते वर्ड डॉक्यूमेंट तिला मेल केलं. पण ती चिडली. असे पासवर्डस कधी मेल करतात का म्हणाली. म्हणजे चुकलंच. तसं तर माझं नेहेमीच चुकतं. सगळंच चुकलंय. नाही का? म्हणून तू गेलास. निघून. काय मिळवलंस हे सर्व करून तुझं तुलाच माहित. बाहेर नोकरी करायची, निर्णय तुझा. मरायचा...निर्णय तुझा. मरणाची तऱ्हां? तोही निर्णय तुझाच. मी जबाबदाऱ्या चांगल्या पार पाडते ह्याची तू दिलेली ही सर्वात मोठी पावती. म्हणजे कसं, आता सांभाळ तूच. जबाबदाऱ्या! जबाबदाऱ्यांचा पसारा. एकावर एक अस्ताव्यस्त पसरलेल्या. जुन्या न संपता त्यावर नवीन येऊन पडलेल्या. लादल्या गेलेल्या. कधी आवरला जाणार हा पसारा, कोण जाणे. ते काही तुझं कपाट नव्हे. जिथलं तिथे. जास्ती ओढवून घ्यायचंच नाही. नीटनेटकं. हे आता माझं आयुष्य. तेव्हा हा माझा पसारा. जबाबदाऱ्यांचा का होईना. पण आवरेन तो. हळूहळू. तू झटकलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडेन. बघंच तू. आणि आटपाआटपीतील शेवटचं काम म्हणजे हा मेलबॉक्स रिकामा करणं असेल. रिकामं टेबल, रिकामा मेलबॉक्स. जबाबदाऱ्यांची निरवानिरव.
आणि...आणि मग काय?
रहाता राहिलं, रितं आयुष्य.


पिढी दर पिढी...

"ते तू त्या दिवशी मला गोष्ट सांगत होतीस न...?"
"कुठली?"
"ती कोण ती बाई....तिला तेव्हां अभ्यास करायचा होता...आणि बायकांना त्या वेळी allow नव्हतं..."
"हा हा!...अगं त्या न्यायमूर्ती रानडेंच्या पत्नी!"
"हा..मग त्यांनी आणि त्यांच्याच सारख्या इतर बायकांनी इतका त्रास करून घेऊन आपल्याला शिक्षण घेणं इतकं सोप्पं करून दिलं...की आता ते कधीतरी खूप कठीण होतं हे सगळं गोष्टीच्या पुस्तकात वाचलं किंवा तू सांगितलंस की कळतं. मग आता आम्ही नीट शिकायचं नाही किंवा शिकलो तर त्याचा समाजाला आणि स्वत:च्या पायावर उभा रहायला जर वापर केला नाही तर मग काय उपयोग?"
"अगं, तू रमाबाई रानड्यांचे कष्ट लक्षात ठेवलेस हे खूपच मोठी गोष्ट!"
"आणि एक तर त्या ज्या बायकांनी इतके त्रास काढले ही बेसिक गोष्ट मिळवायला, त्यांचे आत्मे आम्हांला haunt च करतील ना....!"
"अ?"
"मग काय तर? ते आत्मे म्हणतील आम्ही एव्हढं केलं तुमच्यासाठी आणि तुम्हांला इतकं easily मिळतंय म्हणून त्याचं महत्वच कळत नाहीये!"
"हेहे!"
"आणि दुसरं म्हणजे..."
"काय?"
"दुसरं म्हणजे...मी माझ्या नवऱ्याशी equality वरून भांडूच शकणार नाही! ...मी जर पैसे कमवले नाहीत तर तो मला म्हणेल ना की आधी पैसे कमवून दाखव! मग बोल equality च्या गोष्टी!"
"ह्म्म्म. म्हणजे दोन्ही गोष्टी तुझ्या लक्षात आल्या तर. एक म्हणजे शिक्षणाचं महत्व आणि पैसे कमवण्याचं महत्व!"
"हा!"
"बाई गं, हे तुझ्या वेळीच ध्यानात आलंय बरं का...मला जरा उशिराच कळलंय!"
"हेहे! मी आहेच मुळी तुझ्यापेक्षा हुश्शार!"

Tuesday 21 December 2010

SMS

आजची सकाळ कशी छान आहे...कॉफी एकदम मस्त झालीय...लोकसत्त्तातील अग्रलेख किती सकारात्मक आहे...रेडिओवर किती गाणी छान लागली आहेत...कुंडीतल्या लिलीला किती सुंदर फुलं आली आहेत...कधी नव्हे ते आरसा देखील किती गोड बोलतोय...
म्हणजे कसं, एक नाजुकशी सर येऊन जावी...ढगांतून...सूर्याचे किरण नजाकतीत झेपावे...इंद्रधनुष्य उभारावं...त्यावर हलकेच बसावं...पुढेपुढे सरकावं...अगदी एक्सलेटरवर बसल्यागत...

आणि अकस्मात...
अकस्मात,
टिंग टिंग...
टिंग टिंग...
कोण ते? कुठे ते?
बघा...उचला...मोबाइल उचला....उघडा उघडा...इनबॉक्स उघडा....असा धीर सोडू नका हो! काय? कोणी पाठवलाय भल्या सकाळी तुम्हांला प्रेमभरा एसेमेस? अहो अहो...सांभाळा स्वत:ला...फेकू नका हो मोबाईल! काय झालं? कोणाचा एसेमेस?
हम्म्म्म...सकाळी सकाळी...सत्य! एक कटू सत्य!

रोज सकाळी माझी बँक, बॅलन्सचं सत्य मला एसेमेस द्वारा आणि मग मेलद्वारा सांगत असते.
म्हणजे जसं...
तोच तो खेळ...एक तारखेला जोडायला घ्यावे ते सुरेख इंद्रधनुष्य....
आणि मध्यंतरावरच त्याचा तुकडा पडावा!

कधी...
कधीतरी, असे होईल काय?
सोनेरी आकाशात एकच इंद्रधनुष्य नसेल...
असावे....त्यालाच जोडून दुसरे....त्यालाच जोडून तिसरे...आणि हे असेच पुढे पुढे...

जशी सप्तरंगी लाट....खाली जाईल तेव्हां मला माहित असेल...
खात्रीच असेल तिच्या पुन्हां उभारण्याची....
मग ओहोटीची भीती, कधीच नसेल....
रिकाम्या आकाशाचे स्वप्न, कधीच ना दिसेल...

हम्म्म्म...

Monday 20 December 2010

सिंड्रेला

अँ अँ ssss मला ना आईने कडेवर घेतलंय. मी ना मघापासून आईला सांगतेय आणि ह्या माझ्या आईला काहीच कळत नाहीये!! मी बाळ आहे ना अजून! पण म्हणून काय झालं? आई आहे ना ती माझी? मग तिला कळायला नको मी काय बोलतेय ते!!?? अँ अँ SSSSSS मी का रडतेय? अहो, जरा माझ्या पायाकडे बघा? दिसतोय ना तुम्हांला माझा पाय? हा नाही! मागचा बघा! कुठेय माझा शू?! पुढच्या पायात आहे? आहे ना? मग? मागचा शू कुठेय?? तेच तर मघापासून सांगतेय ना हिला! मघाशीच पडलाय! मी कित्ती तिला पाय मारून सांगितलं! पोटात कित्ती लाथा मारल्या! पण ह्या बाईला ना काही कळतच नाही! आणि ती...आईबरोबर आहे न ती...ती माझी मावशी! तिला तर काहीच कळत नाही! दोघी ना नुसत्या बडबड करत बसतात! मगाशी ना...मी पाय हलवत होते...तिला मी सांगत होते मला खाली ठेव म्हणून! मला त्या दुकानात धावायचं होत ना! इकडे तिकडे! ही बाई ना सारखी मला कडेवरच घेऊन ठेवते! मग मला काहीच करता येत नाही ना! मी अशी धावते ना सगळीकडे? आणि मी ना सगळ्यांशी बोलते...गप्पा पण मारते...पण ही माझी आई ना, काहीच ऐकत नाही माझं! वेडी नुस्ती! म्हणून मी तिला पोटाला पाय मारत होते! तर मग माझा एक शू पडला ना! मी बघत होते त्याच्याकडे! आणि तो पण बघत होता माझ्याकडे! तो पण रडायला लागला मग! माझ्याकडे बघून! पण हिला काहीच कळत नाही! मी कसं उचलून घेणार त्याला? ही मला खाली ठेवेल तर नाsss! म्हणून ह्या दोन बायकांना सांगत होते मी! अँ अँsssss खाली बघा...तिच्या पायात आहेत चपला! मावशीच्या पायात बघा? आहेत! मग माझ्याच पायात का एकंच शूsss? बाबा असता तर त्याला कळलं असतं...मी कशाला ओरडतेय ती!! पण माहित नाही! तो असता तर आई बाबा आणि ही मावशी... गप्पा मारत बसले असते! वेडे नुस्ते! सारखे हसत असतात! तरी नशीब, माझी दुसरी मावशी नाहीये आत्ता आमच्याबरोबर! म्हणजे ना...हे सगळे ना माझ्याच मागे मागे असतात! माझे आई बाबाच नाही नुसते माझे वेडे! माझे आजोबा...माझी आजी...सगळं घर माझ्यामागे धावतं!!! हसताय काय! आता तुम्ही नका आणि हसू!! माझा शू पडलाय न? माझ्या एकाsssच पायात शू आहे! कधी कळणार ह्या बाईला? तसंच नेतायत ह्या मला घरी! वेड्या नुस्त्या!! अँssss

"अगं! अगं, हिचा एक शू कुठे गेला?"
"अय्याsss! कुठे पडला?"
"अगं, तसंच आणलं आपण तिला? कधीपासून फिरवतोय हिला आपण असं?"
"बावळटच आहोत ना आपण! म्हणून ओरडत होती कि काय ही?"

"अय्याssss!! एक दिवस मी तुमच्या बरोबर आले नाही तर काय हा गोंधळ! कशं ग माझं बाळ! पल्ला तुझा शू? आईला आणि ह्या तुझ्या मावशीला ना काsssही कळत नाही!"

व्वा! उगाच बोलतेय हां ही माझी दुसरी मावशी! ती तर अजूनच वेंधळी!
आले! माझे आजी आजोबा पण आले! आता हे सगळे मिळून न...माझे ना लाड करत बसतील!
पण माझा शूऊऊऊऊऊऊऊऊऊऊ? शूऊऊऊऊऊऊऊऊऊऊ कुठेय माझा?

Saturday 18 December 2010

दुभंगलेली...

असा कसा एखादा रस्ता असू शकतो जसा एखादा कथासंग्रह. रात्री उघडावा तर करुण रंगीबेरंगी. मिणमिणता. आणि दिवसा लख्ख सूर्यप्रकाशात लाखोंची उलाढाल करणारा. विचित्र हे रूप. म्हणजे कोणी प्रतिभावंत लेखकाने कहाण्या लिहाव्या...मिश्र व्यक्तिचित्र रंगवावीत आणि सरळ एकत्र छापून टाकावी. लेखक गोंधळलेला आणि वाचक भरकटलेला. एक पान रडवेल...तर दुसरं मेंदूला झिणझिण्या आणेल...तर तिसरं किळस येऊन पुस्तक भिरकवायला भाग पाडेल.

ही गल्ली जर बोलायला लागली तर काय बोलेल? तिला स्वत:ला तिचं कोणतं रूप आवडत असेल? दिवसाचं कि रात्रीचं? कुठलं खरं? का असं वाटतं कि ते रात्रीचंच तिचं रूप खरंखुरं? आणि सकाळचं लख्ख प्रकाशातलं ढोंगी? जसं चकचकीत वेष्टनातील म्हणून एखादं चॉकलेट उघडावं आणि त्यातून वळवळणारे किडे हातावर चढावे?

सूर्य इथे भसकन येतो. मग बायका आया बनतात...जेवण करू लागतात...धुणीभांडी करतात. नागड्या उघड्या शेंबड्या मुलांबरोबर हसताना, ओरडताना दिसतात. कधी त्या लेकीच्या वेण्या घालत असतात...तर कधी लेकाला धपाटे घालत अंघोळ घालत असतात. लांबलचक गाडीतून बाजूच्या उंचच उंच इमारतीत शिरणाऱ्या बायका हेच तर घरी करून आलेल्या असतात.

चंद्र वेडा आहे. तो कधी चोरून येतो तर कधी सगळ्यांवर चंदेरी उजेड टाकतो. मग सकाळच्या आया रस्त्यावर उभ्या रहातात. प्रामाणिकपणे धंदा करतात. लांबलचक पुरषी गाड्या आता तिथेही थांबू लागतात. एखादी रस्त्यावर वाट बघत असते...गिऱ्हाइक अजून का आलं नाही...सकाळी पोरांना आता काय खायला घालू ह्याची तिची चिंता, बंद काचेतून थंड हवेत देखील मनाला भिडते. जशी कधी एकदा तो पगार खात्यात जमा होईल अशी मला चातकासारखी आस असते.

त्यादिवशी तिथून जाताना एक सहकारी म्हणाला," आता ही गल्ली अजून develop होईल. अजून मोठ्या मोठ्या कंपन्या येतील. आणि मग ह्या बायका आपोआपच इथून नाहीश्या होतील!" मला का हताश वाटलं? का मनात आलं...आता ह्या, त्यांचं हे ऑफिस कुठे थाटतील? कुठून त्यांच्या हातात आता ते गांधीजींचा फोटो असलेले हिरवे तुकडे येतील?

एकदा नजरानजर झाली. अनोळखी माणसाशी नजरानजर झाली तरी एक स्मित चेहेऱ्यावर झळकावं असा हा नवीन कॉरपोरेट नियम. मग तिच्याशी झालेली नजरभेट आणि हलकंच स्मित माझ्या चेहेऱ्यावर. पण ती लागण तिच्या चेहेरयावर नाही उमटली. आणि मग मला अपराधी करून गेली. कधीकधी असं वाटतं ना कि केलं ते चूक की बरोबर? तसं.

त्या दिवशी उजव्या हाताला मी बघितलं ते काय होतं? सात आठ जणींनी काळोखात फेर धरला होता. आपल्यातच मश्गुल टाळ्या वाजवत गोल गोल फिरत होत्या. आम्ही नाही का नवरात्रीत भोंडला खेळत...तश्याच. काय होते ते? काय गाणे होते ते? ऐलमा पैलमा...गणेश देवा...माझा खेळ मांडिला करीन तुझी सेवा...?

त्या आणि मी. गाडीची बंद काच...आणि थंड हवा. हा भकास दुरावा. जात तर एकच. स्त्री जात.

मधुर भांडारकर+गुलजार+डेविड धवन+हिचकॉक+स्पीलबर्ग = हनुमान गल्ली, लोअर परेल.

Friday 17 December 2010

क्षणार्ध

ठाकुर्ली स्टेशन. फारसं न गजबजलेलं. सकाळी दहाची वेळ तर तशी रिकामीच म्हणायची. आणि त्यातून शनिवार. प्लॅफॉर्मवर पोचले तर एक ट्रेन उभीच होती. जशी काही माझीच वाट पहात. मी चढले आणि तिने तिचं बुड हलवलं. आत शिरावं. नशीब असेल तर जागा मिळून जाईल असा विचार करत मी दोन पावलं पुढे सरकले आणि प्रचंड कोलाहल झाला. मुंबईच्या ह्या रोजच्या गाड्या. जसा काही यमाचा फास. बारा गाठींचा. एखादी गाठ गळा लागली की कारभार आटोपलाच म्हणायचं. मागे वळून बघितलं तर एक आई आणि तिचं छोटंसं बाळ आत शिरले होते. आई जशी बालिका बधू आणि बाळ जेमतेम चार पाच महिन्यांचं. आईच्या खांद्यावर मोठी भरलेली बॅग. कडेवर बाळ.

कोलाहल उठला होता त्यातून एकच भयावह प्रसंग घडून गेलेला कळत होता. ती मुलगी बाळाला कडेवर घेऊन चालत्या गाडीत शिरली होती. शिरली कसली दारातल्या बायकांनी तिला आत खेचूनच घेतली होती. क्षणार्धात दोन जीव वाचले होते. आणि म्हणून सगळ्या बायकांनी तिची अक्कल अभ्यासाला घेतली होती. मुलगी थरथरत होती. सर्वांगातून. बाळाने भोकाड पसरलं होतं. ते काही न कळून पण डब्यातील लोकं आईकडे बघून जोरजोरात बोलत आहेत हेच बघून असावं. त्या आरडाओरड्यात बाजूच्या पुरुषांच्या डब्याचा देखील सहभाग.
ती उभी होती तिथेच मटकन बसली. डोळ्यातील पाणी हळूहळू वरवर चढत होतं. मग पूर गालावर वाहू लागला.
"पण मी त्याला सांगत होते...नको पकडूया ही गाडी म्हणून..."
"मग काय झालं?"
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कोणीच एकमेकांना परकं नसतं.
"तो म्हणाला मिळून जाईल."
"अगं, नवऱ्याला अक्कल नाही पण तुला कळत नाही?"
आता मुलगी आणि बाळ दोघेही रडायला लागले होते. ती हमसाहमशी आणि बाळ जोरदार भोकाड.
"जाऊ द्या हो. आहेत ना सुखरूप... उगाच आणि नका घाबरवू." सल्ला दिला गेला आणि मानला देखील गेला. हळूहळू आई आणि बाळ शांत झाले.

डबा आपापल्या गप्पांत पुन्हा रंगला. मला घाटकोपर पार झाल्यावर चवथं का होईना पण आसन मिळून गेलं. बसल्या जागेवरून मायलेकी दिसत होत्या. अजूनही दारात बसलेल्या. आता बऱ्याच सावरलेल्या. स्टेशनं आली गेली. डब्यात आवकजावक झाली. एकूण डबा भरलेलाच राहिला.

दादर जवळ येऊ लागलं. मी उठले. तीही लेकीला कडेवर घेऊन दारात मागेच उभी राहिली. मी पुढे झाले. दोघींचे चेहेरे वादळाच्या खुणा सोडून गेलेले. आम्हीं दोघी उतरलो.

पुरुषांच्या गर्दीतून तिचा नवरा पुढे आला. तिने त्याच्याकडे बघितलं. माझी नजर तिच्यावर खिळलेली. तिचे डोळे त्याच्याकडे लागलेले. आणि त्याचे? ना त्याने घेतली तिच्याकडून ती जड बॅग ना त्याने घेतलं तिच्या खांद्यावर रडून निरागस झोपून गेलेलं त्याचं बाळ. ना त्याला दिसला तिचा केविलवाणा रडवेला चेहेरा.

तिची काही अपेक्षेने त्याच्याकडे लागलेली नजर वळली आणि आणि आमची दोघींची क्षणभर नजरभेट झाली. केविलवाणं हसली ती...तेव्हां का कोण जाणे पण माझ्या हृदयात काळ्या ढगांची दाटी झाली आणि डोळ्यांत पाणी जमा होऊ लागले...

Thursday 16 December 2010

स्त्री स्वातंत्र्य

"बँकेत आलंय बरं का माझं पेन्शन."
मला खरं तर कळलं नाही की हे मला का सांगण्यात आलंय. आणि म्हणून बहुधा एक प्रश्र्नचिन्ह माझ्या चेहेऱ्यावर उमटलं असावं.
"नाही, तू तो मी दिलेला 'जिवंत असल्याचा दाखला' पाठवला होतास ना माझ्या ऑफिसकडे."
"हं हं.' पुटपुटले.

हा संवाद मायलेकींमधला. म्हटलं तर काही विशेष नाही आणि म्हटलं तर खूप खास आहे. त्यात भारतातील स्त्रियांचा एक प्रवास आहे.

वयाच्या १९व्या वर्षापासून आधी भावाला मदत म्हणून आणि मग स्वत:च्या संसाराच्या गाडीचे एक चाक म्हणून, नोकरी केली. मुलींना वाढवलं. शिकवलं. आणि स्वत:च्या धडपडीतून आर्थिकदृष्ट्या खंबीर होण्याचं बाळकडू नकळत आपल्या तीन मुलींना पाजलं.

आज ज्यावेळी सोन्याचा चढता भाव बघून माझ्या पोटात गोळा येतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी ही श्याहत्तर वर्षांची बाई जाऊन नातीसाठी आणि आपल्या दोन मुलींसाठी सोनं खरेदी करते.
"बँकेत नुसतं पडून राहिलंय पेन्शन. म्हणून मग सोनं घेतलं!"
हिची कॉलेजला जाणारी नात, आई विसरून गेली कि जेव्हां आजीसमोर उभी रहाते, "आजी, पैसे दे ना! आई विसरलीय" त्यावेळी ही ज्या अभिमानाने पैसे नातीच्या हातावर ठेवते, त्यावेळी तिने तेच बाळकडू नातीला पाजलेले असते. आणि नातीला देखील आजीकडून पैसे घ्यायला काय मजा वाटते! नात मागेल तितके पैसे ही तिच्या हातावर ठेवते! आजी खूष आणि नात खूष!
बाजारात जाऊन गगनाला भिडलेले कांदे, भाजी, मासे ही खरेदी करून येते आणि मग पुटपुटत बसते,"केव्हढं महागलंय सगळं!" तेव्हा मला खरं तर माहित असतं कि काही गरज नाहीये की तिने जाऊन ही छाती दडपवून टाकणारी खरेदी करावी. पण तिला त्यात स्वावलंबनाचा, निर्णय घेण्याच्या शक्तीचा, जो आनंद मिळतो त्यास तोड नाही.

कोणा एका स्त्रीने स्वकमाईने...तर कोणा दुसरीने, नवऱ्याने दर महिना दिलेल्या पैश्यांतून बचत करत करत...स्वाभिमानाचा हा भक्कम किल्ला उभारलेला असतो.

भारतीय स्त्री स्वातंत्र्याचा हा एक पैलू. जसा एखादा हिरा.
त्याचा पैलू क्षणात चमकून उठणारा.
आणि आशेचा तो तेजस्वी किरण झपाट्याने क्षितीजापर्यंत झेपावणारा.
कोणा दुसऱ्या स्त्रीला अंधारात निश्चित मार्ग दाखवणारा.

Monday 13 December 2010

तपस्या

आमच्या कर्मभूमीतील वॉशरुममधील अगदी ताजी ताजी घटना.

तसं बघायला गेलात तर अगदी मुंबईच्याच भाषेत सांगायचं तर इथे बहुतांशी मुली 'हॉट'च आहेत.
आमच्या ऑफिसमधील एक मुलगी. बायकांच्या वयाबद्दल तसं काही नक्की सांगता येत नाही. अंदाजे २८/२९ असावं. मी वॉशरुममध्ये शिरले तेव्हां बाई बेसिनला एकटं सोडून दाराकडे नुकत्या वळल्या होत्या. माझ्या कानांनी आवाज आधी टिपला आणि डोळे नंतर पोचले. गंगा वाहात होती आणि ही 'शंकरी' निघाली होती.
"Please close the tap, Shanti."
"याsss" एक खोल आवाज काढत 'हॉट' शांती वळली. 'कोल्ड' गंगा बंद झाली. घटना फारशी काही न आवडल्यामुळे माझ्याकडे दुर्लक्ष करत शांती निघून गेली.

पुढे?
पुढे काही नाही हो!
एव्हढंच वाटलं कि अगदी परदेशात MBA केलं म्हणजे माणूस सुशिक्षित होत नाही.
कितीही पैसे घाला. डॉक्टर, इंजिनीयर घडवा. पण म्हणून काही माणूस, सुशिक्षित म्हणण्याच्या लायकीचा होत नाही!

गंगा काहींच्या हाताशी असते! कधी धोधो वाहती, कधी कायम आटलेली. सगळ्यांसाठी ती वाहती रहावी म्हणून ती ताब्यात ठेवणे गरजेचे.

मग मनी प्रश्न असे उभे रहातात की...
आमची शांती, घरची गंगा देखील अशीच वाहती ठेवून आली आहे काय?
आमचे चौहान साहेब, त्यांच्या पॉश केम्स कॉर्नरवरील बंगल्यातील शवरची वाहती गंगा थोपवून आले काय?
आमचे टॉल, डार्क हडसम आशुतोष, सकाळी जेव्हां जिममधून निघाले तेव्हां त्यांनी तेथील वॉशरुममधील गंगा नक्की बंद केली काय?

ना काही सर्टीफिकेट...
फायलीत अडकलेलं.
ना एक हुद्दा...
विझिटिंग कार्डावर छापलेला.


'सुशिक्षित'...
एक गुण.
by default न मिळणारा.
अंगात बाणवून घेतलेला....
तपस्येने.

Saturday 11 December 2010

त्रिमिती स्वप्न

आजचा दिवस अविस्मरणीय होता.

काय केलं मी असं ?

मुंबईत सध्या जगप्रसिद्ध शिल्पकार अनीश कपूर ह्यांचे प्रदर्शन चालू आहे. वांद्र्यातील मेहबूब स्टुडियोमध्ये. ब्रिटीश शिल्पकार. मूळ मुंबईतील. नाव बऱ्याच वेळा वर्तमानपत्रात वाचले होते. गेले काही दिवस ऑफिसमधील मित्रांकडून भरपूर ऐकत होते. हे एक आम्हीं बरे करतो. शहरात काही बघण्यासारखे आले की एकमेकांच्या कानी जरूर घालतो.

स्टुडियो ३. बाहेरील उंचचउंच लाल चित्रित भिंती...त्यांवर नाव अनिष कपूर. वातावरण निर्मितीला सुरुवात. म्हणजे सगळं भव्य आणि अहं शून्य.

आपण फारच सुंदर चित्र काढतो असा एक बालवयातील भ्रम, जे. जे. तील पहिल्या वर्षातच तसा दूर झालेला होता. आसपासचे रथी महारथी बघून. परंतु तेव्हापासूनच जहांगीर आर्ट गॅलेरीला भेट देण्याची एक सवय जडून गेली. तेथील सगळीच चित्रे आपल्या बुद्धीक्षेत्रात येत नाहीत हे ही मग कळून चुकले. अनुभवाने एक धडा मात्र घेतला गेला...सगळं आपल्याला कळलंच पाहिजे हा हट्ट न करणे...ह्यातच आपले हित आहे. आणि मगच ही कला आपल्याला आनंद देऊ शकेल.

तर असं चित्रपटात बघतो ना आपण, उंच पर्वत आणि पायथ्याशी एक लपलेलं भुयार...तसंच काहीसं. आत कोण लपलंय काय माहित. आत शिरले. नेहेमी शुटिंग्सच्या दरम्यान मोठे स्टुडियो बघत असतो. त्यासाठी उभे केलेले सेट्स बघत असतो. त्या धर्तीचं आकाशात पोचलेलं छत आणि त्याखाली वेगवेगळ्या आकाराची चकाकती शिल्पे. बहिर्वक्र आणि अंतर्वक्र वळणे घेणारी स्टीलची शिल्पे. गुळगुळीत आणि आजूबाजूची प्रत्येक हालचाल आपल्यात शोषून घेणारी. आणि त्याचे प्रतिबिंब मात्र काही वेगळेच दाखवणारी. जसं घटना असते एकच परंतु त्या घटनेशी निगडीत असलेला प्रत्येक माणूस त्यातून घेतो वेगवेगळा अर्थ...आपापल्या स्वभावधर्मानुसार. तसंच काहीसं. सगळं वातावरण गूढ. आकार गूढ. आपण ह्या पृथ्वीवरचे नाहीच. आपण जसे काही आहोत कुठे वेगळ्याच ग्रहावर....ना जमीन...ना आकाश...खूप 'सररियलॅस्टीक'. चित्रांपेक्षा शिल्प नेहेमीच काही वेगळा अनुभव देऊन जातात. कारण शिल्पे आपल्या समोर अवतरलेली असतात. आणि अनीश कपूरची शिल्पे जशी काळाच्या खूप पुढे....खरं तर स्वत: काळाच्या मर्यादा तोडून आपल्याला देखील ती बंधने तोडून टाकण्यास भाग पाडणारी.

मी अशी आहे हा खरंतर एक भ्रमच. मी 'घन' आहे...की मी एक 'द्रव' आहे...कारण माझे प्रतिबिंब तर वितळलेले...त्या विस्तीर्ण हॉलमध्ये वावरणारे मानवी आकार वेगवेगळे. हालचाली संथ...परंतु त्यांची प्रतिबिंबे मात्र कधी हलकी चाल तर कधी झपाट्याने बदलणारी...विचित्र....

तिथे एक प्रचंड मोठा पैलू असलेला हिरा....परंतु आत वळलेला...अंतर्वक्र. जसे एखादे प्रचंड मोठे खोल ताट, कडा नसलेले, भितींला चिकटवले आणि मग त्यांवर चिकटवले त्रिकोणी, पंचकोनी स्टीलचे तुकडे. तर काय होईल? मी त्यासमोर उभी राहिले...आणि मी विखुरले...तुकडे...शतश: तुकडे झाले माझे....अजब. थोडं इथे तिथे सरकावं...समोर माझे सर्व तुकडे सरकावे. तेव्हढ्यात माझ्या बाजूला आला एक गोरा. परदेशी...आणि त्याची मैत्रीण. आता झालं असं की त्याने घातलेला एक सुंदरसा शर्ट. रंग पिवळा आणि त्यांवर बारीक पाने फुले, नक्षी...हिरवी, लाल. मी बाजूला झाले. ते पुढे सरसावले. आणि काय सांगू? तो त्या उलट्या हिऱ्यासमोर उभा राहिला आणि जो काही सुंदर विखुरला की एकदम कमाल! म्हणजे त्या समोरील हिऱ्यात त्याच्या शर्टाचे झाले सूर्यफुलाचे शेत....आणि त्या पिवळ्या तुकड्यांतुकड्यातील सूर्यफुलाला असंख्य डोकी...माझ्या साध्यासुध्या लाल कुरत्याने नाही दाखवली मला ही कमाल!

सर्वच futuristic...अनाकलनीय होत आहे ना आज...हम्म्म्म...

फेब्रुवारी २०११ पर्यंत आहेत ही शिल्पे मुंबईत...मेहेबुब स्टुडियोत. प्रत्येकाने हा अनुभव स्वत: घ्यावा...असं मला वाटतं. गुगल करावे आणि फोटो बघावे...की 'याची डोळा बघावे'...निर्णय तुमचा.

जगातील प्रत्येक गोष्ट मला उमगलीच पाहिजे हा हट्ट सोडून...

अनाकलनीय गोष्टींतून...अनाकलनीय आनंद मिळवण्यासाठी....

-, -, मी मराठी

आज लोकसत्ता उघडला आणि माझं मन कसं अभिमानाने भरून आलं.

पहिल्या पानावर तर हल्ली संपूर्ण जाहिराती भरलेल्या असतात. त्यामुळे काल नक्की काय घडलंय हे वृत्तपत्र माध्यमातून मला जाणून घ्यावयाचे असेल तर नुसतं ते हातात धरून काम भागत नाही तर पहिलं पान उलटणे भाग असते. त्यातील ती पूर्वीची गंमत नाही उरली. म्हणजे कसं दरवाज्याच्या फटीतून ताजं टवटवीत वर्तमानपत्र सरपटत आत येत असे. मग त्याला हातात घेताना आधी मान तिरपी करून त्याकडे नजर टाकली तरी क्षणात काल दिवसाभरात अख्ख्या भारतवर्षात कोणती लक्षवेधी घटना घडून गेली आहे, ते समजून येत असे. आता नाही होत तसं. ती इस्त्रीची घडी मोडा, ते पान उलटा कि मग येत ते जग माझ्या भेटीस.
असो. जग वेगात पुढे जात आहे. त्याची ती गती जर मला पकडायची असेल तर पुढचं पान तत्परतेने उलटणे भाग आहे.

तर आज आपण एकदम जाऊ पान क्रमांक दहावर. सर्वात वर बघा. काय आहे बातमी?

'मराठी माणसाने शोधला 'सोहो' धुमकेतू'. 'आकाशमित्र मंडळा'चे सचिव शिशिर देशमुख सूर्यावर आदळणाऱ्या धूमकेतूचा शोध लावणारे पहिलेच भारतीय.

माझ्या अभिमानाला आहेत तीन पायऱ्या.
पहिली, माणसाने लावला 'सूर्यावर आदळणाऱ्या धूमकेतूचा शोध'.
दुसरी, एका भारतीयाने लावला 'सूर्यावर आदळणाऱ्या धूमकेतूचा शोध'.
आणि सर्वात शेवटी, एका मराठी माणसाने लावला 'सूर्यावर आदळणाऱ्या धूमकेतूचा शोध'.
ह्या पायऱ्या मी कोणत्या प्रकारे चढते हे महत्वाचे. खरं तर सर्वात वरची पायरी हवी ती माणसाने लावलेल्या शोधाची. त्याखालची, भारतीयाने तो शोध लावला ह्याची. आणि त्यानंतर मला अभिमान वाटतो की तो शोध लावला एका मराठी माणसाने.

रोज घराबाहेर पडलं की मन कसं उद्विग्न होऊन जातं. जागोजागी फडकी लटकलेली असतात. वेगवेगळी मराठी आडनावं आणि त्या आडनावांचे मालक ह्यांच्या छायाचित्रांनी. त्याचे ते चेहेरे कोणत्या कामाच्या जोरावर इतके अभिमानी दिसतात हे माझ्यासारख्या सामान्य माणसापर्यंत कधी नाही पोचत. त्यांची नावे आणि फोटो ज्या ध्वनिवेगाने पोचतात त्या वेगाने त्यांची कामे मला नाही दिसत. हा दृष्टीदोष कदाचित माझाच असू शकेल. पण आहे ते असे आहे. असाही एक प्रश्न मला नेहेमी भेडसावत असतो...ज्यावेळी मुद्रणशास्त्र इतके पुढे गेले नव्हते त्यावेळी टिळक, आंबेडकर, गोखले, कर्वे आणि फुले ही आडनावे आणि हे चेहेरे माझ्या मनात कसे घट्ट स्थान मिळवून गेले?

पण आज मात्र कोणा एका मराठी माणसाचे छायाचित्र आणि त्याचे नाव बघून मला गर्व वाटला. अभिमान वाटला. मराठी असण्याचा.

तीच गोष्ट पान क्रमांक दोनवरची 'थ्री चियर्स टु सचिन.' तेंडुलकर हे मराठी आडनाव गेली कित्येक वर्ष आपली कॉलर ताठ करत आहेच. परंतु ह्या वेळी त्याच्या तत्वनिष्ठेची बाब पुन्हा एकदा आपल्यासमोर आली. 'दारुच्या जाहिरातीची करोडोंची ऑफर धुडकावली'. "वीसच काय २०० कोटी रुपये कोणी देऊ केले तरी आपण दारू आणि सिगारेटच्या जाहिराती कधीच करणार नाही." आठवले तेंडुलकरकाका. साधे सुधे, नम्र वृत्तीचे. आकाशात त्यांच्या ह्या जगज्वेता पुत्राच्या वक्तव्याने पुन्हां एकदा ताठ झालेली मान मला दिसून गेली. त्यांचे हसू डोळ्यांसमोर आले. कविमनाचे, माझ्या बहिणींशी कॅरम खेळणारे तेंडुलकरकाका.

कसं आणि कधी कळलं ह्या सचिनला... 'मी सर्वप्रथम माणूस आहे'.
त्यानंतर 'मी भारतीय आहे'.
आणि मग 'मी मराठी आहे'.

आम्हीं मंद बुद्धी.
पायऱ्या चुकवून वेड्यावाकड्या उड्या मारायची, आमची मेली जन्माचीच खोड!


Friday 10 December 2010

निपज

"सॉरी विजया."
प्रसूतीगृहात डॉक्टरीणबाई नुकत्याच बाळंत झालेल्या विजयाला म्हणाल्या तेंव्हा तिच्या छातीत धस्स झालं. दोन बाळांची ती आई होती. आणि ती बाळं तर धष्टपुष्ट होती. मग आताच काय झालं? माझ्या बाळात काय शारीरिक व्यंग आलं? तिसरं बाळ म्हणून काही झालं का? हात, पाय, डोकं, हृदय...काय ठीक नाही माझ्या बाळाचं?
"अगं, तुला पुन्हां मुलगीच झाली!"
"काही व्यंग तर नाही?"
"चल, नाही ग! एकदम ठीक आहे. पण मुलगीच झाली!"

विजयाला अजून आठवतं. सख्ख्या बहिणीने मारलेला टोमणा.
"तू जळतेस माझ्यावर. मला मुलगा आहे. आणि तुला मुलीच!"

घराणं पुढे चालायला हवं. मुलगी परक्याचं धन.
घराणं पुत्र पुढे नेतो. वंशाचा दिवा तो पुढे नेतो. अग्नी, पुत्र देतो.

मानव वंश पुढे न्यावयाचा आहे....कि जोशी, शर्मा, देसाई, मेहेता, राजा, पुढे न्यावयाचे आहेत?

मुलगा आणि मुलगी...

नाजूक धरतीकडे झेपावणारी धार. मग जलाशय...त्याचं डबकं, मग नाला आणि नंतर फक्त प्रलय.

वृक्ष, वंश पुढे नेतात.
मधमाश्या, वंश पुढे नेतात.
मुंग्या, वंश पुढे नेतात.
नर वा मादी...
निसर्ग भरारतो. निसर्ग उभारतो.

मी निसर्ग जन्माला घातला.
मी रोप लावलं.
रोप काय नर? रोप काय मादी?

दिवे लावणार की दिवा लावणार?
काळाची गणितं.

"अहो, अपूर्वा नाव ठेऊया. पूर्वी कधीही न झालेली...अपूर्वा."

सत्यकथेवर आधारित

Wednesday 8 December 2010

पाऊसवाला नाना

आवाज आणि स्वच्छ स्पष्ट विचार ह्यांचे मिलाप म्हणजे नाना पाटेकर. मी एका कामानिमित्त त्यांना भेटले होते. आणि त्या अनुभवावर एक पोस्ट देखील लिहिली होती. आज त्यांचा एक व्हिडीओ बघितला आणि असं वाटलं की तो बघण्यातील माझ्या आनंदात तुम्हांला तर सामील करून घ्यायलाच हवं. ही एक सवय लागली आहे बहुतेक आता मला. सुखदु:खाला तुम्हां सर्वांबरोबर सामोरं जाण्याची. ती सवय बरी की वाईट हे तुम्हीच ठरवा. :)

पाटेकर ज्या सिनेमाबद्दल इथे बोलले आहेत ती एक अतिशय सुंदर संगीतिका आहे. 'थोडासा रुमानी हो जाये'. चित्रा आणि अमोल पालेकर जोडीने दिग्दर्शित केलेली. त्यातील संवाद आणि गाणी सुंदर. लिहिली आहेत कमलेश पांडे ह्यांनी. जाहिरातक्षेत्रातील हे एक बडे नाव. अप्रतिम हा एकंच शब्द. युट्यूबवर आहे हा अख्खा चित्रपट. दहा भागात. नक्की बघा...वेळात वेळ काढून!

आता ऐका...
काय आवाज आहे!




टाळ्या टाळ्या आणि टाळ्या!



बोध...

गेल्या महिन्या दोन महिन्यात काही मराठी पुस्तके वाचनात आली.

रारंगढांग- प्रभाकर पेंढारकर
शाळा- मिलिंद बोकील
सोन्याच्या धुराचे ठसके- डॉ. उज्ज्वला दळवी

पहिल्या पुस्तकातील हिमालयातील गर्विष्ठ रारंगढांग (ढांग-पर्वत), एकइंजिनीयरच्या भूमिकेतील खडतर तत्वनिष्ठ जीवन, मी देखील प्रभाकर पेंढारकरांबरोबर जगले. प्राण गेला तरी बेहेतर ही माझ्या सैनिकांचीच मानसिकता प्रत्येक नागरिकाने आपल्या कामात कशी मनोमन बाळगायला हवी हे अगदी सुंदर शब्दांत, उपदेशकाच्या भूमिकेत न शिरता, त्यांनी मला दाखवून दिले. अतिसुंदर. प्रत्येकाने वाचायलाच हवे.

'शाळा' हा पूर्णपणे एका किशोरवयीन मुलाच्या दृष्टीने सांगितलेला अनुभव. तरल, अगदी मुकुंदच्या मनात शिरून त्याचा आनंद आणि त्याचे दु:ख आपण देखील अनुभवतो. मला वाटतं, प्रत्येक शाळा ज्या परिसरात आहे, त्या परिसरातील मुलांची मानसिकता, त्या शाळेचे एकूण रूप ठरवत असावी. मग काय मुंबईच्या मध्यवर्ती जागेत उभ्या असलेल्या 'बालमोहन विद्यामंदिर' मधली मुलं देखील ह्याच भाषेत आपल्या शाळेतील मुलींबद्दल विचार करत असतील? आम्हीं जेव्हा मोठ्या होत होतो, तेव्हा हे वर्गबंधू आमच्याकडे बघून असा विचार करत होते?...पुस्तक आवडले.

आता 'सोन्याच्या धुराचे ठसके'. डोक्यातच गेलं हे पुस्तक माझ्या! तुम्हांला तुमच्या वाचकाने सौदीतील मागासलेल्या गावापासून प्रगत गावापर्यंत केलेला प्रवास तुमच्याबरोबर करून हवाय ना? मग सांगा ना आधी मला की तुम्ही तिथे काय विचार करून पोचला आहात? तुम्हीं डॉक्टर, तुमचे पती डॉक्टर. मग अगदी सेवाभाव मनी धरून चालला आहात काय तिथे? मग २६ वर्षांपूर्वी ह्या माझ्या देशात तर ह्या सेवाभावनेची कित्ती गरज असेल! आत्ता देखील आहे! मग उठून तिथे का जायचे आणि मग तो देश मागासलेला म्हणून तिथे होणारे अपमान का सहन करायचे? असं नाही की माझ्या देशात माझे अपमान होत नाहीत! पण मग ते माझ्या घरात झालेले अपमान आहेत! परक्यांच्या दारात जायचे...त्यांनी केलेला अपमान सोसायचा आणि मग सगळंच कसं हलकंफुलकं म्हणून वाचकासमोर ठेवायचं....बरं, तुमची फसवणूक झाली असती तर तुम्हीं उठून पुन्हा तुमच्या मुलांना घेऊन जाणार नाही त्याच अवमान करणाऱ्या देशात! अगदी शेवटच्या पानापर्यंत हा मूळ प्रश्र्नच अनुत्तरीत! नाही पटलं हे! ही मी नव्हेच!

आता वाचते आहे, Mitch Albon ह्या लेखकाचे 'Tuesdays with Morrie'. कल्पना खूप आवडली. 'काही महिन्यांवर मृत्यू येऊन ठेपला आहे. मग तो अगदी गळ्यापर्यंत पोचेस्तोवरचा प्रवास मला मस्त जगायचा आहे. आणि माझा तो प्रवास मला जगाबरोबर वाटून घ्यावयाचा आहे.' एकेक विचार सुंदररित्या मांडले आहेत. अगदी मनाला भिडतील आणि ती विचारधारा पटेल असे. सरळ, सुंदर आणि सोप्प्या भाषेत...बघू, एका सातासमुद्रापलीकडील परक्या माणसाचा मृत्यू मला जीवनाकडे बघण्याचा कुठला नवा चष्मा देऊन जातो...


Tuesday 7 December 2010

लालचुट्टूक

"लिपस्टिक लावून आलीयस तू कॉलेजला?"
सरांचा सूर नाराजीचा होता. शिक्षकांच्या खोलीत सतरा वर्षांची मी, समोर उभी.
"नाही सर!"
त्यांनी भुवया उंचावल्या.
"ते ना, काय केलं माहितेय का मी?"
"काय केलंस? लाल लाल लिपस्टिक फासलयस ना?"
"नाही सर! ते ना, ओठ ना, असे घट्ट बंद करायचे आणि ना त्यावर जीभ फिरवत रहायची! खूप वेळ!"
"मग हे असं होतं का? आणि तुला कोणी सांगितलं हे?"
"ते मीच शोधलंय सर! बाबा देत नाहीत ना लिपस्टिक आणायला घरात!"
"व्वा! ध्यान दिसतंय पण ते! अजिबात बरं दिसत नाहीये! बाबा ओरडतात ते बरोबरच आहे! लहान आहेस अजून तू हे उद्योग करायला!"
"बरं सर. पण ना, हे ते असं लिपस्टिकसारखं पुसून पण नाही टाकता येणारेय मला!" जाडजूड चष्म्याआड असले म्हणून काय झालं? डोळ्यात पाणी येतंच!
"ठीक आहे. जा आता वर्गात."

"आई, हे बघ ह्यातलं कुठलं बरं दिसतंय?"
पालथ्या हातावर सहा सात वेगवेगळ्या रंगांच्या जाड्या रेघा ओढून तो हात माझ्यापुढे धरण्यात आला होता. हात लेकीचा.
"हे ते ब्राऊन काही आवडत नाहीये हं मला! म्हातारी झालीयस का?"
"आई, मी अजिबात लाल लाल लिपस्टिक लावणार नाहीये!"

कम्मालेय! कित्ती वेळ जायचा माझा ते ओठ बंद करून लालचुट्टूक ओठ मिळवायला!
काही वर्षांपूर्वीचीच तर गोष्ट!
Generation gap I tell you!
:p



Monday 6 December 2010

माज

पापलेटच लाल कालवण, तळलेल्या सुरमयीच्या चमचमीत तुकड्या, कुरकुरीत बोंबील, आंबट सोलकढी. त्याचे मित्र जेवायला घरी येणार म्हणून हा बेत. जेवण तर छान झालं होतं.
मित्र जमले. गप्पा रंगल्या. बाटल्या रिकाम्या झाल्या. घड्याळ धूसर झालं.
चार वर्षांच्या लेकाचं तर जेवण झालं. पण भरलेल्या ग्लासांनी धारण केलेलं 'द्रौपदीच्या थाळी'चं चमकतं रूप, कधी आटोपणार ते नव्हतं उमगत.
'वाढू का आता?" तिने घड्याळ शिकून दशकं उलटली होती. छोटा काटा तीनावर पोचला होता. आणि मोठा बाराच्या पुढे. त्या खोलीत त्यावेळी चार विमानं झोकांड्या घेत होती.
"हं. वाढ." त्याने भरलेला ग्लास पोटात रिकामा करत तिला परवानगी दिली.
ताटं घेतली गेली. दर्शनी दिसणारी 'माणसं' जमिनीवर रांगेत जेवायला बसली.
मस्त. सॉलिड. जड जिभांनी घरच्या लक्ष्मीला दाद दिली.
दहा मिनिटांतच, बसल्या जागी पोटातल्या दारूने सुग्रास जेवण बाहेर फेकलं. दोघांना उलटी झाली. सगळेच तरंगणारे. ताटं जेमतेम रिकामी झाली. उठले. तोंड धुवून गप सोफ्यावर बसले.
काही दिवसांपूर्वी घटना तशीच घडली होती. मित्र वेगळे होते.

छतापासून जमिनीवर टेकणाऱ्या खिडक्यांचा लांबसडक हॉल. नेहेमी स्वच्छ सुंदर नीटनेटका. आता पसरलेली उष्टी ताटं. अस्ताव्यस्त. त्यात त्या उलट्या. ओट्यावर झाकलेली भांडी. सिंकमध्ये उंच झेपावलेला खरकटा डोंगर. काय करायचं आता ह्याचं? कुठून सुरुवात करावी? तिने त्याच्याकडे बघितलं. तो त्या क्षणी तिचा कोणीच नव्हता. सोळाव्या वर्षी जेव्हा तिने त्याला म्हटलं, तुझी सर्व दु:ख माझी, त्यावेळी आपल्या सादेला प्रतिसाद काय आला आहे ते तपासायचं राहूनच गेलेलं.

आता स्वत:च्या पायावर जेमतेम उभं रहाता येणारे तिथून निघाले त्यावेळी ती बसून होती एकटक त्या तिच्या भरल्या घराकडे बघत. आता नेहेमीची केरलादी करणारी येईलच. मग काय तिला लावू हे आवरायला? का करावं आणि तिने हे? का पुसावी ही बरबटलेली लादी? केरलादी करण्याचा मी तिला पगार देते म्हणून? तिचा नवरा दारुड्या आहेच. तिच्या घरी तर ती हे नेहेमीच करते. मग? तिने ही माझ्या नवऱ्याची आणि त्या कोण त्याच्या मित्रांची घाण देखील उचलावी? तिने नाही म्हटलं माझ्या नवऱ्याला...तुझी सगळी दु:ख माझी म्हणून.
मांडीवर झोपून गेलेल्या निरागस लेकाला उचलून तिने बिछान्यात झोपवले आणि ताटं उचलायला घेतली. बाजूलाच नवरा स्वत:च्याच धुंदीत मस्त झाला होता....

अर्धा तास गेला. तिचं घर कसं पुन्हा चमकू लागलं.
बाई आली तेव्हा अगदी थोड्याच वेळापूर्वी झालेल्या आत्मसन्मानाची राख देखील तिथे नव्हती उरली.

"सरिता, किती त्रास करून करून घेणार आहेस ह्याचा?"
संध्याकाळ झालेली. आम्हीं दोघी समुद्रावर होतो. तिचा लेक खेळत होता. ती बसली होती दूर नजर लावून. मी काय करणार....घट्ट मिठी मारली तिच्या खांद्याला आणि जवळ ओढलं. तिला. तिचं दु:ख मात्र बसलं होतं....माज आल्यासारखं...फुगून.

Sunday 5 December 2010

"मला नाही येत."

एके दिवशी,
"कांदा बारीक चीर गं."
"मला नाही येत."
एका वेगळ्या दिवशी,
"गूळ बारीक चिरून डब्यात भरून ठेव."
"तुमच्यासारखा मला नाही येत."
"हे असं बोलून नक्की काय होतंय हे कळतंय का तुला वैभवी?"
मी रोज स्वयंपाक करणाऱ्या आमच्या वैभवीला विचारलं.
"मला येत नाही. म्हणजे झाली ना मेंदूची सगळी दारं, कवाडं बंद. सगळ्या शिकण्याच्या गोष्टी असतात गं. जेंव्हा चालायला शिकलो, शंभर वेळा पडलो असू. पण जर म्हटलं असतं मला येत नाही आणि हार मानून टाकली असती, तर स्वत:च्या पायावर आपण उभे राहू शकलो असतो का?"

आठवते काही वर्षांपूर्वीची गोष्ट. तीन वर्षांच्या 'मातृत्वाच्या 'ब्रेक के बाद' जेव्हां पुन्हां जाहिरातक्षेत्रात नोकरी धरली त्यावेळी जग खूप बदललं होतं. कम्पुटरने विश्व व्यापलं होतं. फक्त ३ वर्षांपूर्वी कागद पेन्सिल युग होतं आणि आता वेगवेगळी अप्लीकेशन्स डोक्यावर बसलेली होती. फ्रिहँड, फोटोशॉप, इलस्ट्रेटर...मॅक. सगळे डोळे वटारून. आणि माझं धाबं दणाणंलेलं. ऑफिसमध्ये वेगवेगळे विभाग असतात. त्यातील क्रिएटिव्हमध्ये मी येते आणि आर्टवर्क करण्यासाठी वेगळा स्टुडियो असतो. ह्या सगळ्या प्रोग्रॅम्समध्ये त्यातील एकेक कलाकार असतात वाकबगार.
मग सुरुवातीची काही वर्षं जे काही अपमान सोसावे लागले ते विसरणे कठीण. कम्पुटर बुवांशी मैत्री जुळेस्तोवर. वरिष्ठांकडून ते अगदी कम्पुटर ऑपरेटरपर्यंत. डोकं आहे पण हात नाहीत अशी परिस्थिती. मग अर्थात पगारवाढ लांबली...बढती दुरावली. डोळे कायम डबडबलेले. चेहेरा कायम रडवा.

मग काय पाठ दाखवणार काय?
"मला नाही येत" असे म्हणणार काय?
चपात्या येत नव्हत्या. मग सवयीने भाकऱ्यादेखील जमून गेल्या.
साधी ट्रेन पकडता येत नव्हती. पण नंतर भर गर्दीच्या वेळी धक्काबुक्की करत डब्यात घुसता आलं
मराठी शाळेत शिक्षण. जे जे मध्ये इंग्रजीचा संबंध शून्य. सुरुवातीला वाटली भिती. मिटींग्समध्ये इंग्रजीतून बोलायला. पण मग काय, "मला नाही येत" असे म्हणणार काय?

तेच मुळी "मला नाही येत!"

कांदा बारीक चिरावा.
पापलेटच्या मस्त तुकड्या कराव्यात
फोटोशॉपमध्ये तुकडे जुळवावेत.
आणि इलस्ट्रेटरमध्ये लेआउटची झणझणीत फोडणी घालावी.
क्लायंटला त्या जगभर मानल्या गेलेल्या इंग्रजीतच प्रेझेंटेशन्स करावीत.
आणि आयडीया विकावी!

आहे काय आणि नाही काय?

Saturday 4 December 2010

सिंधुताई सपकाळ

आज चित्रपट 'मी सिंधुताई सपकाळ' पाहिला.

आयुष्यातील दु:खाचे महत्व पुन्हा एकदा पटले.
एक दगड मार्गात आला. आणि तो मार्गच बंद झाला. आयुष्य नकोसे झाले. मग मानसशास्त्राच्या व्याख्येतील Survival Instinct, तीव्र जीवनेच्छा, प्रबळ झाली. फिनिक्स, आगीतून पुन्हा आकाशात झेपावला. त्याने पंख देखील असे पसरले की शेकडो स्त्रियांना साऊली मिळाली. माऊली मिळाली. अचंबित करणारे व स्त्रीत्वाचा अभिमान देणारे व्यक्तिमत्व तेजाळले.

त्यांची संपदा जोगळेकरने घेतलेली मुलाखत यूट्यूब वर ६/७ भागात उपलब्ध आहे त्यातील दोन भाग इथे टाकले आहेत. आवडले तर अर्थातच तिथे पुढील भाग पाहू शकाल.





Friday 3 December 2010

बोट

शाळेत फाउंटन पेन वापरत असू. निळ्या शाईचं. कंपास पेटीत रोज अशी दोन पेनं भरलेली असत. एक संपलं की दुसरं. लिखाण भरपूर होत असे. वर्गात मास्तर जे सांगतील ते उतरवून घेणे आणि घरी गृहपाठ करणे. किती कागद त्यात भरीस जात त्याला ना काही सुमार. अर्थपूर्ण लिखाण होई असे काही नाही परंतु, कागद भरले जात. वर्षाकाठी ढीगभर वह्या संपवल्या जात. मग हे पेन हातात धरूनधरून नववीपर्यंत उजव्या हाताच्या मधल्या बोटाचे हाड सुजले. एक टेकडीच वर येऊ लागली. हे माझं मधलं बोटं.

बाबा दिवसाकाठी १० ताव लिखाण करत असत. वैचारिक. कधी कुठल्या दिवाळी मासिकासाठी तर कधी त्यांच्या त्रैमासिकासाठी. बघितलं तर बाबांचं मधलं बोट देखील माझ्या बोटासारखंच, टेकडीवालं. बाबा आणि माझ्यातलं साम्य, हा माझ्यासाठी एकूणच भांडणाचा विषय. मी बाबांसारखीच दिसते ह्या विषयावर मी आजही तावातावाने भांडण करू शकते. लहानपणी हातपाय आपटून विषयाला जोर देत असे, आता मात्र मुद्द्यांना महत्व देईन. तर बाबांचं मधलं बोट. ती बाबांची टेकडी निळीशार असायची. लेखक बाबाचं ते निळं बोट ही जणू त्यांची ओळखच. एखादा लेख एकदा लिहून त्यांचे समाधान कधीच होत नसे. तो पुन्हा पुन्हा वाचणे आणि कठीण विषय, वाचकाला समजेल अश्या सोप्प्या भाषेत तो पुन्हा पुन्हा लिहून काढणे. मग नित्यनेमाने त्यांचं पेन आपल्या खुणा त्यांच्या बोटावर सोडूनच थांबे. शाई खुणा. जसा सावळ्या आभाळात पंख पसरून निळा भारद्वाज.

काल सकाळी नेहेमीप्रमाणे गाडी हाकत कार्यालयात येत होते. एका गल्लीत उजवीकडे वळायचे होते. ह्या गल्लीचं तोंड निमुळतं आहे. थोड्याफार फरकाने ते घुसमटलेलंच असतं. त्या अनुभवातून मी उजव्या बाजूने गाडी पुढे आणली. डाव्या बाजूच्या गाडीच्या चालकाच्या हे फारच मनाविरुद्ध झालं. त्याने त्याच्या गाडीची काच खाली करून माझ्या डाव्या काचेवर टकटक केली. माझे लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात. मी लक्ष देण्याचे काहीच कारण नव्हते. मी गाडी अजून थोडी पुढे नेली. परंतु त्या गल्लीतून दुसरीच गाडी रंगमंचावर उतरली आणि मग मला माघार घ्यावी लागली. मी मागे गेले. संधी साधून उजव्या बाजूचा माणूस गल्लीत प्रथम शिरला आणि माझ्या गाडीच्या पुढे आला. माझ्यासाठी ही काही स्वाभिमानाची हानी नव्हती. परंतु त्याच्यासाठी त्या दिवसाचा तो फारच मोठा विजय होता. त्याने पुन्हा त्याची काच खाली घेतली. चाक डाव्या हातात पकडून उजवा हात बाहेर काढला. आणि मोठ्याच विजयाच्या उन्मादात मला मधले बोट दाखवले. ह्याचा अर्थ न कळण्याइतकी मी दुधखुळी नक्कीच नाही.
"XXXX you"
कळलं मला. आता बुध्दाचे तत्वज्ञान माझ्या कामी आले. 'तू मला दिलेस. परंतु जर ते मी घेतलेच नाही तर ते शेवटी तुझ्याचकडे तर राहिले.' माझी गाडी शांतपणे पुढे हाकली. आणि दुसऱ्या मिनिटाला आमच्या कार्यालयाची इमारत आली आणि रंगमंचावरून मी निर्गमन केले.

मधले बोट.
बाबांचे निळेनिळे. मऊ फुगीर टेकडीवाले. विद्वत्तेने उंचावलेले.

त्या माणसाचे मधले बोट?
असभ्यता त्या बोटाच्या शीरापासून तळापर्यंत ठासून भरलेली.
तीच असभ्यता ओसंडून, आकाशात मर्कट उड्या मारणारी.

एक मधलं बोट असभ्यता दर्शक.

एक मधलं बोट विद्वत्तेचे प्रतिक.

Thursday 2 December 2010

वाटप

"मी डॉक्टर आहे. मुंबईत मी प्रॅक्टिस करते. मला इथे भांडी घासावी लागतात. नाही येणार मी परत इथे."
"मला नाही लागत भांडी घासायला. माझी लेक घासते नाहीतर खरकटी भांडी ती डिश वॉशरला लावते."

हा संवाद दोन वयस्क स्त्रियांमधील. अमेरिकेतील एका संगीत कार्यक्रमात त्यांची प्रथमच भेट झालेली होती. आयुष्यात पुन्हा भेटण्याचा योग काही येणार नव्हता. त्यामुळे मनीचे गूज सांगण्यात काही धोका नव्हता.

दोघींची वये बघता आयुष्यातील वादळे त्यांनी झेललेली असावीत. तशी ती कोणालाच टाळता येत नाहीत. थोड्या फार फरकाने कधी चक्रीवादळे असतात तर कधी एखादा वाऱ्याचा झपाटा. आज आता आपल्या मुलांकडे, नातवंडाचे दर्शन म्हणून वा केवळ विश्रांती म्हणून हे आईवडील परदेशात पोचलेले असतात. हा संवाद विचारात घेता नक्कीच त्या त्या महिलेच्या अनुभवातून ही वाक्ये त्या त्या महिलेने बोलली असावीत. त्यातील ज्या बाईला त्यांची मुलगी भांडी घासायला देत नाही त्यांना मी ओळखते. परंतु ज्यांच्या अंगावर हे काम पडते त्यांना नाही ओळखत. व आयुष्यात कधी ओळख होण्याची शक्यता शून्य. त्यामुळे त्या कोणाकडे रहात होत्या, सुनेकडे की मुलीकडे हे समजणे कठीण.

आता डॉक्टर बाईंच्या मनात डोकावू. तिथे काय घालमेल चालू आहे?
मी एव्हढी डॉक्टर आहे तरी उतारवयात मला भांडी घासायला लागतात.
माझी सून मुद्दाम माझा अवमान करण्यासाठी मला हे काम देते. (किंवा) माझी मुलगी स्वत: टीव्ही बघत बसते आणि जावईबापुंसमोर मला भांडी घासायला लावते!
मी आता म्हातारी झाले. आणि म्हणून मला ही कामे झेपत नाहीत.

भारतामध्ये अनादिकालापासून वर्णभेद केले गेले आहेत. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्यानुसार कामांचे वाटप झाले. आणि मग शूद्र, उच्चवर्णीय लोकांकडे मजुरीची कामे करू लागले. सुदैवी असतील तर त्याचे त्यांना श्रम मूल्य मिळू लागले. मात्र सध्या बऱ्याच प्रमाणात, निदान शहरात तरी, मुलींना त्यांचा शिक्षणाचा हक्क मिळाला आहे व लादले गेलेले जातीचे बंधन थोड्या प्रमाणात तरी शिथिल झाले आहे. इथे भारतातील शहरांबद्दल बोलले जात आहे हे लक्षात घ्यायला हवे. दुर्दैवाने हे चित्र काही माझ्या संपूर्ण देशाचे नाही. मग आता ह्या शिकल्यासवरलेल्या मुली घरकामाला कुठून येणार? देशाच्या ह्या प्रगतीविषयी आनंद मानायचा कि दु:ख हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून.

तसेच परदेशी, अमेरिकेसारख्या देशात तर रोजच्या ह्या धुणीभांडी, केरलादी करणाऱ्या बाया मिळणे म्हणजे तर अगदी दुरपास्तच. अगदी अफाट पसरलेल्या समुद्रात एखादी काडी. तिथे एखाद्या बलाढ्य कंपनीचा अध्यक्ष देखील कधी घरात भांडी घासताना किंवा कधी मुलांचे लंगोट बदलताना हातोहात सापडू शकतो. आणि त्यात तो कोणावर उपकार करत आहे अशी भावना शक्यतो नसते. अर्थात ideal situation मध्ये.

मग आपल्या डॉक्टर बाईंच्या प्रश्र्नाला उत्तर काय? त्यांच्या उच्च शिक्षणामुळे त्यांच्या विचारात काय प्रगल्भता येण्याची गरज आहे?
एक. मी डॉक्टर असले तरी देखील मला झेपत असल्याने, माझ्या मुलीला / सुनेला मदत म्हणून मी जर 'हे काम' केले तर त्यात कमीपणा काहीही नाही.
दोन. माझी सून / मुलगी मुद्दाम माझा अवमान करण्याकरता मला हे 'हीन दर्जाचे काम' देत आहे असे मानणे हे चुकीचे.
अर्थात बाई पूर्ण अनोळखी असल्याकारणाने काही गोष्टी येथे गृहीत धरलेल्या आहेत. उदाहरणार्थ, बाईंची मुलगी/ सून ही सज्जन माणसे आहेत. बाई इतर वेळी अतिशय मदतशील व हसतमुख आहेत.

७५ वर्षांची व आयुष्यभर स्वकमाईवर जगणारी एक भारतीय महिला अभिमानाने माझी लेक मला 'हे काम' देत नाही हे सांगताना, हे काम हीन दर्जाचेच आहे असे मानते.
'हिणकस काम' मला दिले जाते ही अतिशय क्लेशकारी गोष्ट आहे असे मानून दुसरी भारतीय महिला समवयीन बाईबरोबर दु:ख वाटून घेते.

आपली मानसिकता बदलायला हवी.
श्रमाचे मूल्य आपण कबूल करायला हवे.
श्रम करणाऱ्याचा स्वाभिमान राखला जायला हवा.
आपल्या, आपल्या मुलांच्या व आपल्या प्रगतीशील देशाच्या भवितव्यासाठी.
म्हणून हा उहापोह.

Wednesday 1 December 2010

कुक्कुक!

हे सगळे जालावरचे प्रकार ना अगदी गोंधळात टाकणारे असतात.

आम्ही लहानपणी नाव, गाव, फळ, फूल हा खेळ खेळायचो. म्हणजे प्रत्येकाने एक एक कागद घ्यायचा. शाळेच्या गेल्या वर्षीच्या वहीचा घेतलात तर बरं, कारण ह्याच वर्षीचा घेतलात तर मग कालांतराने सगळी वहीच रिकामी आणि खिळखिळी होते. तर असो. कागदावर विभाग पाडा. विभागाला एकेक नाव द्या. म्हणजे...नाव, गाव, फळ, रंग, वस्तू, प्राणी...इत्यादी इत्यादी. मग कोणतेही एक अक्षर मोठ्याने बोला. आणि मग त्या अक्षराला धरून त्या प्रत्येक विभागात शब्द टाका. म्हणजे 'क' घेतलात तर नाव- कमला, गाव- कोल्हापूर, फळ- केळं, फूल- केवडा वगैरे वगैरे. ज्याचं पहिलं लिहून होतं तो जिंकतो! आणि मग सगळ्यांचे कागद तपासले तर फक्त हे वेगवेगळे शब्द. म्हणजे अगदी बाराखडीचा तक्ता. मग तो तक्ता सुजाताचा असेल, रश्मीचा असेल, नाही तर असेल अनघाचा!

तर त्याचं आता काय?

त्याचं असं की मला ही जालावरची वेगवेगळी प्रोफाईल छायाचित्र बघून त्या तक्त्त्यांची रोज आठवण होते! त्या खेळाची उजळणी! म्हणजे बालपणी शब्दांची ओळख त्या खेळात होत होती. आणि आता त्या शब्दांची चित्र समोर येतात.

मग मी कधी एखाद्या फुलाशी गप्पा मारत असते, कधी एखाद्या बॉलीवूडच्या नायकाशी, कधी कावळ्याशी तर कधी मांजरीशी! अगदी घाबरवून टाकणारे वाघ आणि सिंह देखील असतात! जबडा वासून! एकदम एखाद्या जंगलात आल्यासारखंच! :( समोर ना सुजाता, ना रश्मी. मग मला कळतच नाही की ही पोस्ट वाचताना ह्याचा किंवा तिचा चेहेरा कसा होईल? कारण मी कधी पाहिलाच नाहीये त्याचा/तिचा चेहेरा!

हे म्हणजे क्लायन्टला एखादी स्क्रिप्ट फक्त मेल करून टाकणे! आणि त्याच्यासमोर बसून, त्याच्या चेहेऱ्यावर हलणाऱ्या रेषा बघत प्रेझेन्ट करणे नव्हे! अगदी स्क्रिप्टला साजेसा आविर्भाव करत. इथे निदान त्या माझ्या क्लायन्टला मी कधी ना कधी भेटलेले तरी असते! म्हणजे मला माहितेय की जालावर काहीही झालं तरी मला हावभाव बघायला नाहीच मिळणार आहेत! पण हे म्हणजे भारीच नाही का? मी आपली गप्पा मारतेय आणि माझ्या समोर कोण तर चिमणी, अस्वल, फूल किंवा कधी एखादं टेबल!

नसेलच पटलं ना तुम्हांला?!
श्यॅ!
:(
:p