नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 5 December 2010

"मला नाही येत."

एके दिवशी,
"कांदा बारीक चीर गं."
"मला नाही येत."
एका वेगळ्या दिवशी,
"गूळ बारीक चिरून डब्यात भरून ठेव."
"तुमच्यासारखा मला नाही येत."
"हे असं बोलून नक्की काय होतंय हे कळतंय का तुला वैभवी?"
मी रोज स्वयंपाक करणाऱ्या आमच्या वैभवीला विचारलं.
"मला येत नाही. म्हणजे झाली ना मेंदूची सगळी दारं, कवाडं बंद. सगळ्या शिकण्याच्या गोष्टी असतात गं. जेंव्हा चालायला शिकलो, शंभर वेळा पडलो असू. पण जर म्हटलं असतं मला येत नाही आणि हार मानून टाकली असती, तर स्वत:च्या पायावर आपण उभे राहू शकलो असतो का?"

आठवते काही वर्षांपूर्वीची गोष्ट. तीन वर्षांच्या 'मातृत्वाच्या 'ब्रेक के बाद' जेव्हां पुन्हां जाहिरातक्षेत्रात नोकरी धरली त्यावेळी जग खूप बदललं होतं. कम्पुटरने विश्व व्यापलं होतं. फक्त ३ वर्षांपूर्वी कागद पेन्सिल युग होतं आणि आता वेगवेगळी अप्लीकेशन्स डोक्यावर बसलेली होती. फ्रिहँड, फोटोशॉप, इलस्ट्रेटर...मॅक. सगळे डोळे वटारून. आणि माझं धाबं दणाणंलेलं. ऑफिसमध्ये वेगवेगळे विभाग असतात. त्यातील क्रिएटिव्हमध्ये मी येते आणि आर्टवर्क करण्यासाठी वेगळा स्टुडियो असतो. ह्या सगळ्या प्रोग्रॅम्समध्ये त्यातील एकेक कलाकार असतात वाकबगार.
मग सुरुवातीची काही वर्षं जे काही अपमान सोसावे लागले ते विसरणे कठीण. कम्पुटर बुवांशी मैत्री जुळेस्तोवर. वरिष्ठांकडून ते अगदी कम्पुटर ऑपरेटरपर्यंत. डोकं आहे पण हात नाहीत अशी परिस्थिती. मग अर्थात पगारवाढ लांबली...बढती दुरावली. डोळे कायम डबडबलेले. चेहेरा कायम रडवा.

मग काय पाठ दाखवणार काय?
"मला नाही येत" असे म्हणणार काय?
चपात्या येत नव्हत्या. मग सवयीने भाकऱ्यादेखील जमून गेल्या.
साधी ट्रेन पकडता येत नव्हती. पण नंतर भर गर्दीच्या वेळी धक्काबुक्की करत डब्यात घुसता आलं
मराठी शाळेत शिक्षण. जे जे मध्ये इंग्रजीचा संबंध शून्य. सुरुवातीला वाटली भिती. मिटींग्समध्ये इंग्रजीतून बोलायला. पण मग काय, "मला नाही येत" असे म्हणणार काय?

तेच मुळी "मला नाही येत!"

कांदा बारीक चिरावा.
पापलेटच्या मस्त तुकड्या कराव्यात
फोटोशॉपमध्ये तुकडे जुळवावेत.
आणि इलस्ट्रेटरमध्ये लेआउटची झणझणीत फोडणी घालावी.
क्लायंटला त्या जगभर मानल्या गेलेल्या इंग्रजीतच प्रेझेंटेशन्स करावीत.
आणि आयडीया विकावी!

आहे काय आणि नाही काय?

17 comments:

Deepak Parulekar said...

मला नाही येतं.. या वाक्यातुन बाहेर पडायला माझाही बराच वेळ गेला. पण प्रयत्न करुन जमवलं सारं ! आता काय येत नाही याचा शोध घेतोय!

नेहमीप्रमाणेच छान आणि गुणी बाळं!

THEPROPHET said...

तुमच्यासारख्या सारख्या सारख्या छान छान पोस्टा पाडायला...
"मला नाही येत" !!! :D

Anagha said...

:) दीपक, धन्यवाद! रोज उठून अरे 'मला नाही येत, मला नाही येत'! मग मलाही आठवलं कि मी कधी बरं हा घोष लावलेला?! :)

Anagha said...

विद्याधर, चिडवू नको हा मला! :D

Raindrop said...

yenar kasa naahi...thamb baghuya....karun dakhvucyaat...ase mhananare loka kami astaat...am glad tu aahes :)

Anagha said...

वंदू, आपल्या ऑफिसने खूप आयुष्याचे धडे दिलेत मला! :)

सौरभ said...

विद्याधर +१

"मला नाही येत" << काम टाळण्यासाठी हा एक गुरुमंत्र आहे.

Anagha said...

हे बरिक पटलं हं मला सौरभ! पण कोणाच्या बाबतीत? आमच्या वैभवीच्या बाबतीत! माझ्या नाही!! :p

सौरभ said...

ते काय मला माहित नाही. पण हा मंत्र वापरण्याची एक खास पद्धत आहे. समोरच्याला भावनिक आव्हान देत अश्या पद्धतिने म्हणावं की त्याला/तिला तुमची सहानुभुती वाटावी आणि ते काम त्याने/तिनेच करावं. मी हे प्रयोग बऱ्याचदा केलेत. :P

Anagha said...

सौरभ!!!! :)

Gouri said...

त्या ‘मला नाही येत’ च्या मागे ‘येत कसं नाही?’ म्हणून हात धुवून लागायला फार मजा येते. :)

Anagha said...

That's nice Gauri!! खरोखर!! :)

हेरंब said...

बाकी काय असायचं ते असो पण (हापिसात नाही तरी निदान) घरी तरी हा अतिशय रामबाण उपाय, ब्रह्मास्त्र वगैरे वगैरे आहे ;)

Anagha said...

:D व्वा हेरंब बुवा! बरोबर, घरी बढती मिळून मिळून काय मिळणार!? :p

रोहन... said...

कांदा बारीक चिरावा.
पापलेटच्या मस्त तुकड्या कराव्यात... इतकेच धरतो... बाकी तू बघ... :D हेहे.. एकदा जेवायचे जमवायलाच हवे ना!!!

(च्यायला पोस्ट काय आणि मी कमेंट काय देतोय..)

Anagha said...

रोहन, मला आत्ता मस्त तळलेली पापलेटची तुकडी खावीशी वाटतेय!

अपर्णा said...

बर झालं ही पोस्ट वाचली..त्यामुळे तुला सगळं येतं हे कळलं...अगं म्हणजे ते कांदा चिरण, पापलेटची तुकडी याबद्दल म्हणतेय ग मी...आणि हो चपात्या पण....:)