नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 3 December 2010

बोट

शाळेत फाउंटन पेन वापरत असू. निळ्या शाईचं. कंपास पेटीत रोज अशी दोन पेनं भरलेली असत. एक संपलं की दुसरं. लिखाण भरपूर होत असे. वर्गात मास्तर जे सांगतील ते उतरवून घेणे आणि घरी गृहपाठ करणे. किती कागद त्यात भरीस जात त्याला ना काही सुमार. अर्थपूर्ण लिखाण होई असे काही नाही परंतु, कागद भरले जात. वर्षाकाठी ढीगभर वह्या संपवल्या जात. मग हे पेन हातात धरूनधरून नववीपर्यंत उजव्या हाताच्या मधल्या बोटाचे हाड सुजले. एक टेकडीच वर येऊ लागली. हे माझं मधलं बोटं.

बाबा दिवसाकाठी १० ताव लिखाण करत असत. वैचारिक. कधी कुठल्या दिवाळी मासिकासाठी तर कधी त्यांच्या त्रैमासिकासाठी. बघितलं तर बाबांचं मधलं बोट देखील माझ्या बोटासारखंच, टेकडीवालं. बाबा आणि माझ्यातलं साम्य, हा माझ्यासाठी एकूणच भांडणाचा विषय. मी बाबांसारखीच दिसते ह्या विषयावर मी आजही तावातावाने भांडण करू शकते. लहानपणी हातपाय आपटून विषयाला जोर देत असे, आता मात्र मुद्द्यांना महत्व देईन. तर बाबांचं मधलं बोट. ती बाबांची टेकडी निळीशार असायची. लेखक बाबाचं ते निळं बोट ही जणू त्यांची ओळखच. एखादा लेख एकदा लिहून त्यांचे समाधान कधीच होत नसे. तो पुन्हा पुन्हा वाचणे आणि कठीण विषय, वाचकाला समजेल अश्या सोप्प्या भाषेत तो पुन्हा पुन्हा लिहून काढणे. मग नित्यनेमाने त्यांचं पेन आपल्या खुणा त्यांच्या बोटावर सोडूनच थांबे. शाई खुणा. जसा सावळ्या आभाळात पंख पसरून निळा भारद्वाज.

काल सकाळी नेहेमीप्रमाणे गाडी हाकत कार्यालयात येत होते. एका गल्लीत उजवीकडे वळायचे होते. ह्या गल्लीचं तोंड निमुळतं आहे. थोड्याफार फरकाने ते घुसमटलेलंच असतं. त्या अनुभवातून मी उजव्या बाजूने गाडी पुढे आणली. डाव्या बाजूच्या गाडीच्या चालकाच्या हे फारच मनाविरुद्ध झालं. त्याने त्याच्या गाडीची काच खाली करून माझ्या डाव्या काचेवर टकटक केली. माझे लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात. मी लक्ष देण्याचे काहीच कारण नव्हते. मी गाडी अजून थोडी पुढे नेली. परंतु त्या गल्लीतून दुसरीच गाडी रंगमंचावर उतरली आणि मग मला माघार घ्यावी लागली. मी मागे गेले. संधी साधून उजव्या बाजूचा माणूस गल्लीत प्रथम शिरला आणि माझ्या गाडीच्या पुढे आला. माझ्यासाठी ही काही स्वाभिमानाची हानी नव्हती. परंतु त्याच्यासाठी त्या दिवसाचा तो फारच मोठा विजय होता. त्याने पुन्हा त्याची काच खाली घेतली. चाक डाव्या हातात पकडून उजवा हात बाहेर काढला. आणि मोठ्याच विजयाच्या उन्मादात मला मधले बोट दाखवले. ह्याचा अर्थ न कळण्याइतकी मी दुधखुळी नक्कीच नाही.
"XXXX you"
कळलं मला. आता बुध्दाचे तत्वज्ञान माझ्या कामी आले. 'तू मला दिलेस. परंतु जर ते मी घेतलेच नाही तर ते शेवटी तुझ्याचकडे तर राहिले.' माझी गाडी शांतपणे पुढे हाकली. आणि दुसऱ्या मिनिटाला आमच्या कार्यालयाची इमारत आली आणि रंगमंचावरून मी निर्गमन केले.

मधले बोट.
बाबांचे निळेनिळे. मऊ फुगीर टेकडीवाले. विद्वत्तेने उंचावलेले.

त्या माणसाचे मधले बोट?
असभ्यता त्या बोटाच्या शीरापासून तळापर्यंत ठासून भरलेली.
तीच असभ्यता ओसंडून, आकाशात मर्कट उड्या मारणारी.

एक मधलं बोट असभ्यता दर्शक.

एक मधलं बोट विद्वत्तेचे प्रतिक.

21 comments:

Raindrop said...

ek madhla bot tula daakhavtana tya manasala he ka nahi zanavla ke to 3 bot swataha la ani angtha tyachyach co-passenger la dakhavtoy???

and as far as babancha bot is concerned...i am sure his writings must have inspired o many.

the difference thankfully is still in the favour of 'good bot' coz his one finger is directed at affects one one person but vidvatecha one finger is directed at many and affects millions by one single article.

सौरभ said...

>> जसा सावळ्या आभाळात पंख पसरून निळा भारद्वाज.

कमाल कमाल कमाल... मला १% तरी असं लिहता येऊ दे...

पण त्या माकडाच्या वाकुल्या वाचुन डोक्यात झिणझिण्या आल्या. मेंदू ठसठसला... X-(

Anagha said...

सौरभ, हे मुंबईच्या रस्त्यावरचे ड्रायव्हिंग, रोज आयुष्याचे धडे देत असतं. :)

सौरभ said...

ह्यात धडा देण्यासारखं किंवा मिळण्यासारखं काही नाहीये. it is the fall of our moral values and culture...

Anagha said...

माझ्यासाठी मी एका मूर्खाच्या नादाला न लागण्याचा धडा परत एकदा गिरवला. :)

भानस said...

दुर्दैवाने त्या बोटाचा फक्त तितकाच उपयोग असल्याचे आजकाल सर्वत्र दिसून येऊ लागलेय. इथे तर विचारूच नकोस... मेदूच सडके त्यांचे...

बाकी, हे मस्तच गं... तू द्यायचा प्रयत्न केलास पण मी घेतलेच नाही ना... का फक्त आपणच आपली काढलेली समजूत... मन दुखतेच गं...शिवाय इथे परतफेडही होऊच शकत नाही...

हेरंब said...

>> जसा सावळ्या आभाळात पंख पसरून निळा भारद्वाज.

मलाही हे जाम जाम आवडलं..

बाकी बोटाचं म्हणशील तर चारचाकीवाल्या लोकांची (समस्त नव्हे) ती वैश्विक बो(टी)लीभाषा आहे त्यामुळे बुध्दाचं तत्वज्ञान वापरण्याखेरीज इलाज नाही.. !!

Deepak Parulekar said...

अप्रतिम! खरंच छान !!
कसं जमतं रे तुला हे सगळं इतक्या प्रगल्भतेने मांडणं!
तु तुझ्या बाबांसारखीच आहे यावर माझंही दुमत नाही!

Anagha said...

नाही भाग्यश्री, मी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने जे त्याचे मरण त्याने स्वत:च्या डोळ्याने पाहिले तो माझाच विजय होता. तो माझ्या खिजगणतीतही नव्हता. मला इतक्या दुरूनही 'तो दुर्लक्षित झाल्याने झालेली त्याची तडफड जाणवली'. दुर्लक्षित आणि तेही एका स्त्रीकडून....त्याने त्याची लायकी दाखवली. आणि मी त्याला त्याची लायकीच दाखवली. :)

Anagha said...

दीपक, एकदम मोठीच प्रतिक्रिया दिलीस की!! आभार! :)

Anagha said...

आभार हेरंब! :)

THEPROPHET said...

कायकायएकएकलोकअसतात!!!
मी ह्या पुढे, छान अप्रतिम वगैरे लिहित बसणार नाहीये...
फक्त एक‌ '+१' एव्हढंच लिहिणार.. :)
+१

BinaryBandya™ said...

जसा सावळ्या आभाळात पंख पसरून निळा भारद्वाज.

apratim ...

आजकाल fashion आलीये मधले बोट दाखवण्याची अन फ-वर्गीय शिव्या देण्याची ...
चांगल्या गोष्टी सोडून काहीही copy करतात ...

Anagha said...
This comment has been removed by the author.
Anagha said...

विद्याधर, आभार! :D

Anagha said...

आभार वंदू, :)

Anagha said...

बायनरी बंड्या, ते बाबांचं बोट बघितलं तर रोज ती निळी शाई काही वेगवेगळे आकार धारण करी. ते डोळ्यासमोर आलं आणि मग ही उपमा डोक्यात आली.:)

Anonymous said...

>>>>> जसा सावळ्या आभाळात पंख पसरून निळा भारद्वाज.

कमाल कमाल कमाल... मला १% तरी असं लिहता येऊ दे...

+१००

अप्रतिम पोस्ट...

Anagha said...

तन्वी, आभार गं. :)

रोहन... said...

जसा सावळ्या आभाळात पंख पसरून निळा भारद्वाज. अहाहा!!! आमच्या जुन्या घराकडे सकाळी सकाळी एक जोडी दिसायची.. :)

तू मस्त लिहितेस... आणि हे अजून मस्त मस्त व्हायला लागलाय लिखाण... तू आता कथा किंवा ललित लिहायला घे...

छोटू छोटू नाही... तर मोठे मोठे एकदम.. हवंतर भागात येऊ दे... :)

Anagha said...

सुधारणा होते आहे असं मलाही वाटतंय रोहन...ह्याचा अर्थ अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. :)