काल गप्पा मारता मारता एक छोटुशी घटना माझ्या लेकीने मला सांगितली आणि माझ्या मेहनतीचं फळ मिळाल्याची माझी भावना झाली.
आठ दहा दिवसांपूर्वी, तिच्या मित्रमैत्रिणीबरोबर ती बाहेर गेली होती. सूर्यास्त होऊन बराच वेळ झाला होता. काळोख पडला होता. ह्या पिढीला 'सातच्या आत घरात' हे वळण लावणे कठीणच! एका मित्राची गाडी घेऊन मंडळी लांब ड्राईव्हला निघाली होती. शेवटच्या मिनिटाला बेत ठरला होता आणि घरी परतायला सगळ्यांनाच उशीर होणार होता. मग आपापल्या घरी फोन करून आईवडिलांना, आपल्याला घरी परतायला उशीर का होणार आहे ह्याची कारणे देण्यात मुलांनी आपली कल्पकता दाखवायला सुरुवात केली.
माझ्या लेकीने देखील मला फोन केला. ती रात्री घरी परत आली आणि माझ्यासाठी घटना इथवर संपली.
परंतु त्यातली गंमत पुढेच होती. तिने मला काल सांगितले ते हे असे - आई, मी तुला त्या दिवशी फोन केला आणि उशीर होणार असल्याचं कळवलं. मग थोड्या वेळाने माझा एक मित्र मला म्हणाला,"आम्ही सगळ्यांनी आपापल्या घरी फोन केले पण फक्त तूच तुझ्या आईला खरंखरं सांगितलस नं ? आपण drive ला जात आहोत आणि म्हणून तुला घरी पोचायला उशीर होणार आहे, हे खरेच तू सांगितलेस..बाकी सगळ्यांनी तर थापाच मारल्या...ओरडा मिळू नये म्हणून." आई, त्याच्या ह्या बोलण्यावर मी फक्त हसले.
तिने मला हे सांगितले आणि आमच्या नात्यातली घट्ट वीण तिलाही कळल्याचे मला जाणवले. ती मला खरं आणि फक्त खरंच सांगू इच्छीते, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
ह्या माझ्या समाधानात तीही मनापासून सहभागी होती.
आणि दुसरं काय हवं?
3 comments:
अभिमान वाटतो ! सुतापेक्षा वीणच महत्वाची असते!
जुळता धागे विश्वासाचे
वीण सुबकशी येते विणता
गाठ निसटता विश्वासाची
विण उसवते होतो गुंता..
जरी न दिसली तरी निगुतीने
विश्वासाची गाठ जपावी
आणि विणावे वस्त्र रेशमी
आयुष्याचे हसता हसता
खूप छान गुरु! धन्यवाद!
:)
Post a Comment