लाल सिग्नलला गाडी थांबवली आणि खिडकीतून बाहेर बघितलं तर गेला एक महिना गुलाबी दिसणारं पिंपळाचं झाड आता नाजूक पोपटी झालं होतं.
तेव्हढयात वाऱ्याची एक झुळूक आली आणि नेहेमीप्रमाणे पिंपळाने आपलं नृत्य सुरु केलं.
मला मात्र तिथे दिसू लागली मैदानात उभी असलेली छोटी छोटी मुलं. बाईंनी शिटी मारताच आपले चिमुकले हात हवेत उंचावून थरथरवायला सुरुवात करणारी चिमुकली मुलं.
दूरवरून बघितलं की त्या हातांची ती लयीतली थरथर मन मोहून टाकते.
मग कळला तो वारा आणि त्या पिंपळाचा सामुहिक नृत्याविष्कार.
पूर्णपणे एकमेकांच्या लयीला साथ देत.
त्याला दाद म्हणून मला तर हसू आलं.
खरं तर त्यांचा प्रेक्षकवर्ग अफाट होता.
पण वेळ कुणालाच नव्हता.
आपल्याला तर हिरवा सिग्नल जास्त मोहवून टाकतो; हिरवी पाने कमीच.
3 comments:
शब्दांतून चित्र उभे करण्याची हातोटी जबरदस्त आहे!
हे अप्रतिम आहे...भिड्णारं. खरंच त्या निसर्गाकडुन शिकावं...दाद मिळो न मिळो उत्तम कलाविष्कार सादर करत रहायचं.अथक अविरत.
धन्यवाद गुरू!
Post a Comment