नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 7 May 2010

इसाप ह्यावर काय म्हणतो?

एका ठराविक वेळेला दोन चिमण्या आमच्या खिडकीत गोड चिवचिवाट करून माझं लक्ष रोज वेधून घेत असत. घटनाक्रम बघता आज मला वाटलं की मी आमच्या झाडांना पाणी घातलं की पानांवरून ओघळणारे थेंब प्यायला हे जोडपं येत असावं. म्हटलं चला ह्यांच्यासाठी देखील आपण वाडगा भरून पाणी ठेवावं. रातराणीच्या कुंडीत मी भांडं ठेवलं आणि पलंगावर बस्तान ठोकलं. वाटलं आता त्यांची ती पाणी पिण्याची मनमोहक धावपळ मला मनसोक्त बघायला मिळेल! आणि त्यांचा तो चिवचिवाट ऐकून मगच आपण घर सोडावं. नाहीतरी कितीही धावपळ केली तरी लेटमार्क चुकत नाहीच!
पण कसलं काय!
त्यांनी सरळ सरळ मी ठेवलेल्या पाण्याकडे दुर्लक्ष केलं आणि थेंब थेंब पाणी टिपणंच चालू ठेवलं!

का त्यांनी विचार केला, आज आपल्यासाठी आयतं पाणी ठेवलं गेलंय, पण काय माहित उद्या असेल की नाही! मग उद्या काय? आपण आपल्या कष्टांवर भरवसा करावा की मोहात पडून फक्त एकाच दिवसाच्या सुखाचा विचार करावा? आणि आपल्या कष्टांच्या सवयीत खंड पाडावा ?

मला लहानपणी वाचलेली इसापनीती आठवली.
आणि ह्या गोष्टीचं तात्पर्य शोधत मी घर सोडलं.

4 comments:

rajiv said...

इसाप म्हणतो : - संचित सुखiपेक्षा , रोज मिळवलेले सुख मोठे, ज्या मुळे जगण्याला कारण मिळते .

संकेत आपटे said...

छान. :-)

Anagha said...

संकेत, अगदी आवर्जून एव्हढं जुनं पण वाचलंस?! आभार रे! :)

संकेत आपटे said...

मी पहिल्यापासून वाचायला सुरुवात केली आहे. माझी ती सवयच आहे. कोणत्याही ब्लॉगवरचे काही लेख आवडले तर तो ब्लॉग मी सुरुवातीपासून वाचतो. :-)