नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 2 October 2010

आंबेघर

काळी रात्र होती. आणि त्या टेकडीवर अजून वीज चढली नव्हती. बरंच होतं. चांदण्यांना स्पर्धा नव्हती. काळी चंद्रकळा नेसावी आणि आसमंत चमकून उठावा. शंकराच्या डोक्यावरून धरणीकडे धाव घेणारी गंगा असाच खळखळ आवाज करत असेल काय? एक हात उंची असलेल्या आंब्याच्या रोपाला प्रश्न पडला. तसंच असावं. टेकडीवरचा धबधबा अवकाशात जाग राखून होता. चांदण्याच्या प्रकाशात चकाकणारं पाणी. जसा लखलखता रत्नहारच अवकाशातून ओघळावा. वाऱ्याची हलकीच झुळूक रोपाला डोलवत होती. रोपाची नजर राहून राहून थोड्याच अंतरावर असलेल्या त्या वेड्यावाकड्या सामुग्रीवर जात होती. कुदळ, फावडी, घमेली. आणि त्या बाजूला पडलेली रास. विटांची. का कोण जाणे पण त्या सरत्या रात्री रोपाच्या नाजूक देहातून भीतीची लहर गेली. त्या दिवशी भर दुपारी बरीच माणसे टेकडीवर येऊन गेली होती. आणि ही सर्व साधनसामुग्री पाठी सोडून गेली होती. रोपाचं वय कोवळं होतं. नुकतीच मान धरली होती. जनरीत माहिती नव्हती. कशाचीच ओळख नव्हती. काय होणार आता? मावळती चंद्रकोर काय देऊन जाईल? उगवता सूर्य काय घेऊन येईल? वाहत्या खळखळाटात तो सुस्कारा दाबून गेला.
"भय वाटतंय?" दूरवरून घनगंभीर आवाज आला. रोप दचकलं. कोण बोललं? मान उंचावून त्याने पलीकडे बघितलं. पण सगळंच तर जिथल्यातिथे होतं. मग?
"घाबरू नकोस गड्या!"
रोपाचा आवाज अति नाजूक. भीतीने तो हळूच उमटला. "कोण? कोण आहे?"
"अरे मी आहे. जरा समोर बघ पाहू. न घाबरता. तुझ्यासमोर जी रास पडली आहे, त्याच्या सर्वात वर शिखरावर मी आहे."
रोपाने मान अजूनच उंचावली. त्या नीट रचून ठेवलेल्या ढिगाऱ्याच्या माथ्यावर एक होतं खरं काही सर्वात वर. एकटं.
"बरोबर. मीच बोलते आहे तुझ्याशी. वीट. वीट म्हणतात मला."
अजून रोपाच्या तोंडून आवाज फुटत नव्हता.
"इथे आहे काय घाबरण्यासारखं? मला सखी समज."
धबधबा खाली झेपावतच होता.
"खरं तर कालपर्यंत तू एकटाच होतास. आज तर आम्ही आहोत तुझ्या सोबतीला. नाही का?"
वारा हलला. रोप शहारलं.
"पण तुम्ही कोण आहात? का आला आहात?"
"उद्यापासून इथे माणसे येतील. काम सुरु होईल."
"काम? कसलं काम?"
"अरे, इथे घर उभं रहाणार आहे. तुला काहीच माहित नाही?"
रोप फक्त डावीकडून उजवीकडे हललं.
त्या हालचालीने त्याची भीती आसमंतात शिरली. तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयावर जाऊन कोसळली. त्या धबधब्याला, त्या झुळूकीला आणि त्या प्रत्येक विटेला गलबलून आलं. रोप नाजूक होतं. त्याच्या भीतीचं भुयार उघडलं होतं. सगळ्यांना कळून चुकलं. तिथे घर वर येणार होतं. आणि भुईतून नुकतंच वर आलेलं हे इवलसं रोप थरारून गेलं होतं. त्याला नव्हतं कळत, त्याचं काय होणार होतं? काय त्या नवजन्मासाठी त्याला उखडून टाकलं जाणार होतं?
स्तबद्धता खाऊन टाकते. धबधबा देखील कसा नीरव होऊ शकतो? रोपाचं दुःखच तसं होतं. सुन्न करून टाकणारं.
वाऱ्याने सुस्कारा सोडला. इतका की दूरवर पडलेला एक कागद जमीन सोडून तरंगू लागला. छातीत भरलेला प्राणवायू जेव्हा संपला तेव्हा कागद त्या विटेपासून खाली थोड्या उंचीवर दुसऱ्या ढिगाऱ्यावर जाऊन टेकला होता. सखीची सुन्न नजर कागदावर पडली. कागद मोठा होता. हातभार लांबीचा. चांदण्यात दिसत होतं. त्यावरचा आलेख. सखी काही नवशिकी नव्हती. दुनियेतील रितीरिवाज जाणित होती. नजर बारीक केली. तिला कळून चुकलं, ते तिथे होणाऱ्या घराचंच चित्र होतं. वारा खिन्न होऊन पडलाच होता. कागदही हलण्याची चिन्ह नव्हतीच. आता मात्र सखी तो आलेख बारकाईने पाहू लागली. आणि हलकेच तीला हसू आलं. असं काय होतं त्यात?
तो हलका आवाज सगळ्यांच्याच कानी पोचला. रोपाने खाली घातलेली मान वर केली आणि तिच्याकडे नजर टाकली. चेहेऱ्यावर अविश्वास. का सखी आपल्या भीतीला हसली?
विटेने रोपाकडे नजर टाकली. तीला जाणवले. असे अवेळी हसणे कोणालाच नव्हते आवडले.
तरी ते हसू नाहीसं व्हायला तयार नव्हतं. वारा रागावला. त्याने हवेत हात फेकले. आणि कागद पुन्हा भिरभिरला. आता येऊन पडला तो रोपाच्या पायाशी.
वारा पुन्हा गुढघ्यात डोकं खुपसुन कोपऱ्यात जाऊन बसला. तो जग फिरला होता. अनेक पावसाळे बघितले होते. ही मानवाची जात पारखली होती. ते क्रूर आहेत. मोठे मोठे वृक्ष त्यांच्या कचाट्यातून सुटत नाहीत, हे अनुभवी वारा जाणत होता. मग ह्या इवल्याश्या रोपाची काय कथा?
"अरे, त्या कागदाकडे नजर तरी टाका!" वीट म्हणाली.
रोपाने मान फिरवली. त्याच्या आकलनशक्तीच्या ते बाहेरचे होते. .
"नजर नको फिरवू. कागदाकडे बघ. मी तुला समजावून सांगते. बघू काय सांगतोय तो कागद आपल्याला."
रोपाने हताश नजर कागदावर टाकली.
"अरे तो आलेख आहे. जे घर होणार आहे त्याचा."
"मग?"
"आता नीट बघ. काय दिसतंय तुला?" वऱ्यालाची देखील उत्सुकता आता जागृत झाली. तो उठून रोपाच्या दिशेने चालू लागला. पण मग काय झाले? कागदाने भूमी सोडली आणि कुठे भलतीच दिशा पकडली. वीट आता मात्र वैतागली."अरे तू आहे तिथेच बस पाहू! निघाला भिरभिरायला! आणि तो कागद घेऊन ये जा पाहू. दे आपल्या रोपाला परत!" दमटावणीच्या सुराने घाबरून वारा थोडा भिरभिरला आणि त्याने कागद पुन्हा रोपाच्या पायाशी आणून उतरवला. एखादं हेलीकोप्टर हलकेच उतरवावं तसं.
"आता मी काय सांगते आहे ते ऐका. दिसतोय का रे तुला आलेख नीट?"
रोपाने डावीकडून उजवीकडे मान वेळावली. वारा पुढे सरसावला आणि त्याने उलटा पडलेला कागद रोपाला सरळ करून दिला.
"लक्ष देऊन बघ. त्या आलेखात तुला घर आहे ते दिसतंय?" पळभरच्या एकाग्रतेनंतर रोपाला आधीचं धूसर चित्र स्पष्ट दिसू लागलं. त्याने वरखाली मान हलवली.
"छान. आता त्याच्यापाठी तुला काय दिसतंय?"
तिरपी मान करत रोपाने कागदाकडे बघितले. आणि अजिबात हालचाल न करता वाऱ्याने देखील त्यात मान डोकावली.
"काय आहे?"
"काय असावं?"
रोप जरी बाल होतं तरी मंद नव्हतं. "आंब्याचं मोठं झाड आहे काय?"
"अरे असं विचारतोस काय? तो तूच आहेस नाही काय? आणि जरा निरखून बघ. घराकडे बघ त्या. दिसलं का तुला? अरे, त्या घराने तुला तोडून नाही टाकलेलं. उलट तुला त्याने कुशीत घेतलं आहे. बघ जरा. घर कसं तुझ्याभोवती वळसा देऊन गेलंय? आणि तू बघ जरा त्या चित्रात किती बहरला आहेस? सुरेख आंबे देखील लटकत आहेत. नाही का?"
रोपाचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच नव्हता बसत. घर असं असू शकतं? मला कुशीत घेऊन बसू शकतं?
आता मात्र वाऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो नाचू लागला कागदाला पाठीवर घेऊन!

पहाटे जेंव्हा गवंडी आणि त्यांचा साहेब तिथे दाखल झाले तेंव्हा ह्या रात्रीच्या गंमतीचा त्यांना काय पत्ता? साहेब तरुण होते. तिशीच्या आसपासचे. हसतमुख. ते रोपाजवळ आले. आणि त्यांनी हलकेच त्याच्या मस्तकावरून हात फिरवला. गवड्यांना हाळी देऊन सांगितले," बाबांनो, ह्याला जपायचे बरं का? हाच उद्या ह्या घराची शोभा असणार आहे. त्याला त्याचा मान देऊनच तर मी हे घर रेखाटलं आहे. वेळावलेलं. आंब्याला कुशीत घेऊन सुखावलेलं."

दूरवर वीट, माणसाच्या निर्मितीवर कधी नव्हे ती खुष झाली होती. आणि तिच्या त्या हसण्याला धबधबा आणि वाऱ्याची साथ होती. रोपाला वाऱ्याच्या गुदगुल्या हसवून सोडत होत्या.

का हे गुपित साहेबांना कळलं? ते का हलकेच हसत तिथून निघून गेले?

ही गोष्ट घडली त्याला आता झाली सात आठ वर्ष. पेण गावात एका टेकडीवर धबधब्याशेजारी हे लालबुंद घर आंब्याला कुशीत घेऊन विसावलं आहे. लाडावलेलं हे आंब्याचं झाड मे महिना लागायची खोटी, दीड वीत लांबीच्या मधुर आंब्यांची नुसती उधळण करतं. आंबे बरसातात असंच म्हणा ना!

कधी रात्रीच्या नीरव शांततेत कान देऊन ऐकलंत तर येतील तुम्हांला ह्या चौकडीच्या गप्पा ऐकू!
आंबा, घर, वारा आणि धबधबा!


19 comments:

सौरभ said...

>> आणि त्या टेकडीवर अजून वीज पोचली नव्हती. बरंच होतं. चांदण्यांना स्पर्धा नव्हती...
कातील कातील कातील... पहिल्याच ओळींनी गारद केलं... कसं कुठुन सुचतं??? अशक्य!!! वेड!!! अरेरे... प्रतिक्रिया द्यायला सगळेच शब्द थिटे पडावेत... वाहव्वा... कमाल... बहोत खुब...
i say it again n again... u r a special gifted writer...
असेच लिखाण सदैव होत राहो...

Anagha said...

सौरभ, पण पूर्ण वाचली की नाहीस गोष्ट??!!

Pankaj - भटकंती Unlimited said...

हे आंबेघर गावाचे वर्णन आहे का? तिथे असेच शिवमंदिर आहे. धबधबा, टेकडी, झुलता पूल असे आहे. भटकंतीदरम्यान मी अनेकदा पाहिलंय ते. भोर-केंजळगड रस्त्यावर...

पण मी गोष्ट सगळी वाचली. छान.

THEPROPHET said...

>>अशक्य!!! वेड!!! अरेरे... प्रतिक्रिया द्यायला सगळेच शब्द थिटे पडावेत... वाहव्वा... कमाल... बहोत खुब...
ही रजनी संप्रदायीची प्रतिक्रिया जशीच्या तशी
आणि
>>क्या बात! क्या बात! क्या बात!
ही मिथुनीकडून स्पेशल...
निव्वळ अप्रतिम!!!

Raindrop said...

I am sorry anagha, I tried to read it. many times in fact. It looks and sounds extremely beautiful but after I read read 3 sentences, I forget what the first one said and it makes one feel. Gave up after a point as I don't understand the language intricacies. Reading everyday posts is a different thing than the literary ones :)

sorrieeeee....

Anagha said...

Vandu, I knew this is going to be tough for you...but am so happy to read that you tried thrice! And I love you for that! Okay! Now my dear friend, just remember my small house in Pen! And then you will get all the meanings! Doesn't it have the curve? And this curve is for the beautiful mango tree, right?

Anagha said...

पंकज, अरे हे घर आहे आंबेघर, पेण मध्ये. एका टेकडीवर. वेगवेगळ्या कलाकार मंडळींनी ती टेकडी घेतलीय आणि त्यावर तिथल्या निसर्गाला बरोबर घेऊन घरं बांधलीयत! मी सोमवारी फोटो टाकेन. आणि धन्यवाद! :)

Anagha said...

विद्याधर, मला खूप आनंद झाला बाबा तुला ही माझी गोष्ट आवडली म्हणून! मनापासून आभार! :D

Anagha said...

आणि विद्याधर आणि सौरभ, तुमच्यामुळे माझ्या ब्लॉगला रजनीकांत आणि मिथुन संप्रदायींचे पवित्र पाय लागतात, त्याबद्दल धन्यवाद हो!! मला म्हणजे दोघांची अदाकारीच दिसली तुमच्या प्रतिक्रिया वाचताना! :D

सौरभ said...

बास का... पुर्ण गोष्ट वाचली की राव आपण...
(रजनि आणि मिथुनी दोन्ही सांप्रदायांतर्फे तुम्हासी कलाभुषण पुरस्कार देण्याची मी जोरदार शिफारस करत आहे होsss...)

Anagha said...

सौरभ, अरे वा! मला मिथुन आणि रजनीकांत सांप्रदायातर्फे पुरस्कार!! पण मग मला तो पुरस्कार घ्यायला काही कोलांट्या उड्या किंवा तत्सम काही आविर्भाव आणि डायलॉग यांची तयारी करायला हवी नाही का? मग निदान मी नवीन ROBOT तरी बघून येतेच आज! कसें? :D :D

Shriraj said...

अनघा कथेची लांबी पाहून मी अगोदर ठरवलेलं लंच टाईमला वाचेन; पण नाही राहावलं!! नितांत सुंदर झालेय गोष्ट. आम्हा मोठ्या मुलांची जितकी करमणूक झाली तितकीच लहान मुलांची ही होऊ शकते ही गोष्ट वाचून. छान! खरंच छान!!

Anagha said...

तरी मी विचार करतच होते श्रीराज कुठे हरवला? :)

संकेत आपटे said...

खूप छान. सुंदर. अप्रतिम. शब्द खरंच अपुरे आहेत हो. You really are a gifted writer. शारदादेवीचा वास आहे तुमच्या शब्दांत. :-)

Anagha said...

संकेत, धन्यवाद! :D

रोहन... said...

हुकाव्लेली पोस्ट नजरेस आणून दिल्या बद्दल धन्यवाद... :) तुझी कथा आवडली. प्रत्यक्ष पाहून आल्यावर तर जास्तच... :D

Pankaj - भटकंती Unlimited said...

मला जायचंय :-(

Anagha said...

आता पाऊस लागला नं पंकज, की नक्की पुन्हां एकदा ठरवूया. मस्त सगळं हिरवंगार झालेला असेल तेव्हा. आणि समोरचा धबधबा पण गप्पा मारायला लागेल ! :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

आज पुन्हा वाचली. सगळे पीसेस फिट्ट बसून चित्राचा कॅन्व्हास जुळलाय आता.