आंबट गोड जांभळं आणि त्याला चोळलेलं मीठ. झग्याच्या दोन्ही खिशात जांभळं खचाखच भरली आणि खेळायला धूम ठोकली.
"लगोरी, चोर पोलीस, लंगडी, रंग रंग, डबा आईसपैस? काय खेळायचं ग आज?"
माझ्या इमारतीला खेळायला ना जागा ना माझ्या वयाच्या मुली. त्यामुळे शाळेतून घरी येताच बॅग कोपऱ्यात टाकावी आणि समोरच्या इमारतीतल्या मैत्रिणीला हाका मारायला सुरुवात करावी. तिथे आम्ही होतो देखील साधारण सारख्या वयाच्या, बारा पंधरा जणी. चोर पोलीस खेळताना चोराची भूमिका मिळाली तर जास्त मजा. जीवावर उदार होऊन असं लपावं की पोलिसाला पत्ताच लागू नये! खरंच जर आमच्या गल्लीत चोर असते तर त्यांनी आमच्याकडून लपण्याच्या जागांचा धडाच घेतला असता! इमारतीतल्या वरच्या मजल्यावरील राहिवाशांना एकच चिंता, 'आपल्या दुसऱ्या मजल्यावरील घराच्या सज्ज्यातून गृहप्रवेश इतका सोप्पा कसा काय!'
संध्याकाळी साडेपाच ते सात नुसता धुमाकूळ. तळमजल्यावरच्या एकाच मैत्रिणीच्या घरात रोज घुसखोरी करायची आणि हक्काने तिच्या आईकडे 'मावशी, तहान लागली' म्हणून पाण्याची मागणी करायची. त्यांच्या ओट्यावर आम्ही केलेली उष्ट्या पेल्यांची वेडीवाकडी रांग अजून देखील नजरेसमोर आहे.
सात वाजले आणि हात खिशात गेला. बाहेर आला तोच मुळी जांभळा होऊन. "काय ग? हे काय?"
दोन्ही तळहात माझे जांभळे होते. जांभळ्या शाईत ठसे घेण्यासाठी हात बुडवावेत तसे. पाण्याखाली धरले तर हे रंगकाम तर नक्की जाईल पण तेच रंगकाम पांढऱ्या झग्यावर झालं असणार त्याचं काय? आई एक तागा आणून त्याचे आम्हां तीन बहिणींसाठी तीन झगे शिवायची! एकाचे हात फुग्याचे तर एकाचे सरळ. एकाचा गळा गोल तर एकाचा चौकोनी. तेव्हढेच प्रत्येक झग्याचे निराळेपण. आणि हाच झगा माझ्या धाकट्या बहिणीच्या देखील अंगावर जाऊ शकेल असा तो टिकवण्याची माझी मुळी जबाबदारीच होती! सात वाजून गेल्यामुळे अंधार पडला होता आणि अंगणात माझ्या बेजबाबदारपणाची टक्केवारी कळण्याचा काही मार्ग नव्हता. म्हणजे फक्त खिसे रंगले होते की पूर्णच वाट लागली होती हे घरी जाऊनच कळणार होतं.
घरात शिरल्यावर उजेडात पांढऱ्यावर जांभळे रंगकाम अधिकच उठून दिसू लागले.
आईईईईईईईइ! बहिणीने आरोळी ठोकली. त्यातले समाधान फक्त मलाच कळणार होते! झगा तिच्या अंगावर चढण्याच्या लायकीचा बिलकुल उरलेला नव्हता!
अश्या प्रकारचा हा काही पहिलाच प्रसंग नव्हता! रंगांमध्ये वैविध्य मात्र होतं!
गोड रायवळ आंब्यापासून भगवा, आंबट आवळ्याचा पिवळट पांढरा, बोरांपासून काळपट लाल आणि आंबटगोड जांभळाचा जांभळा!
खूपखूप वर्षांपूर्वी गुहांमधील भिंतीवरच्या चित्रांमधील रंग हे असेच वनस्पतीपासून केले जात असत हे नंतर कॉलेजमध्ये कलेच्या इतिहासाचा अभ्यास करताना बालपणीच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे बरोबर लक्षात राहिलं.
3 comments:
too good anagha! प्रांजळपणा व लिखाण एकदम पसंत ! त्या रंगांबरोबर व्याक्तीमत्वातले रंग पण नैसर्गिक वाटले !
very good
धन्यवाद राजू.
आभार प्रशांत.
कोणीतरी आपण लिहिलेलं वाचतंय ही जाणीव चांगलीच असते.
:)
Post a Comment