खिडकीतून हलकाच प्रकाश टेबलावर. निळा प्रकाश. काच निळी म्हणून प्रकाश निळा. वरून खालपर्यंत आलेला केशरी जाडजूड पडदा. म्हणजे सूर्याने जो काही प्रकाश पाडायचा तो बाकी राहिलेल्या आयतातून. टेबलावर पसारा. म्हणजे कागद, फायली, फोन वगैरे, वगैरे. जसा डोक्यात विचारांचा पसारा? तसाच. टेबलावर पसरलेला पसारा. ना डोक्यातील विचारांना शिस्त...ना ह्या टेबलाला काही आवडनिवड. काही शोभेच्या वस्तूही त्यातच. म्हणजे आता त्या वस्तूंचे पसाऱ्यातच रुपांतर झाले म्हणायचे. दोन अर्धे अर्धे कॉफी मग्स. एकत्र ठेवले की एक वर्तुळ पूर्ण. बाहेरून दोन्ही काळे. आतून एक हिरवागार तर दुसरा भगवा. म्हणजे जणू बाहेरून माणूस काळा कुळकुळीत असला तरी आतून रंगीन असू शकतो असाच काहीसा संदेश देणारे. रस्त्यात विकत घेतले. स्वस्तात. त्यावेळी असंच काहीसं वाटत होतं. बाहेरून अंधारलेलं पण तरीही आत धुगधुगी. म्हणून घेतले विकत. वापर शून्य. म्हणजे आत मगात डोकावलं तर आत काय वाट्टेल ते. पेन्सिल, शार्पनर, पिना, टाचण्या, टिश्यू पेपर...काहीही. बाजूला तीन गणपती. तीन का? सहज. तीन मिळाले म्हणून तीन. कधी एकमेकांकडे तोंड करून बसलेले तर कधी एकटे एकटे. त्या बाजूला हा मॅक. २१ इंची. त्याच्याही अंगावर पसाराच. फायली, फोल्डर्स इत्यादी इत्यादी. रोज नव्या फायली. रोज नवी फोल्डर्स. म्हणजे आधीचा कचरा तसाच आणि त्यावर रोज नवा नवा. इंटरनेट दिवसभर चालूच. घरच्यासारखं नाही. इथे फुकट. म्हणून मॅकला त्याची साथ दिवसाच्या शेवटपर्यंत. मग त्यात हा मेलबॉक्स. भरलेला. ८०० पत्रांनी. हे एक बरं. नाही उघडली सर्व पत्र, तरीही रहातात ती आपली शांत बसून. आणि कचरा लपून. तसं घरी पडलेल्या पत्रांचं नाही होत. पोस्टमन आणून टाकतो. आणि ती उघडायलाच लागतात. आणि मग फाडून फेकून द्यायची. पण उघडायची नक्की. त्यात कधी तुझं पत्र नसतं. ह्या जागतिक मेलबॉक्स मध्ये मात्र आहेत. तुझी जुनी पत्र आहेत. कचऱ्यात न टाकलेली. आज मेलबॉक्स थोडा रिकामा केला. 'A' पासून सुरुवात केली. मग 'R' ला कचरा काढणं थांबवलं. म्हणजे स्वैंपाकघरापासून सुरुवात केली आणि बेडरुमच्या दारात थांबवलं. माहित होतं त्यापुढे आता तुझी पत्र येणार. नजरेसमोर. ती काही प्रेमपत्र नव्हेत. आल्यागेल्या, काही कामाची तर पत्र. म्हणजे हे कर, ते कर अशी. तू असं केलंस, मग मला राग आला वगैरे. प्रियबिय काही नाही. आणि 'तुझाच' तर नाहीच नाही. असू दे. तरी ती तुझी पत्र. आता तू नाहीसच म्हटल्यावर जपायलाच हवी. तू गेल्यावर तुझ्या डायरीत मिळाले तुझे सर्व पासवर्डस. बाकी काही नाही मिळालं पण हे मिळालं. पासवर्डस. म्हटलं हे चांगलंच आहे. म्हणजे तुझ्या अनेक चांगल्या सवयीमधील ही एक चांगलीच सवय आहे. मग मी देखील लिहून ठेवले. माझे सर्व पासवर्डस. आपल्या लेकीला माहित असावे म्हणून ते वर्ड डॉक्यूमेंट तिला मेल केलं. पण ती चिडली. असे पासवर्डस कधी मेल करतात का म्हणाली. म्हणजे चुकलंच. तसं तर माझं नेहेमीच चुकतं. सगळंच चुकलंय. नाही का? म्हणून तू गेलास. निघून. काय मिळवलंस हे सर्व करून तुझं तुलाच माहित. बाहेर नोकरी करायची, निर्णय तुझा. मरायचा...निर्णय तुझा. मरणाची तऱ्हां? तोही निर्णय तुझाच. मी जबाबदाऱ्या चांगल्या पार पाडते ह्याची तू दिलेली ही सर्वात मोठी पावती. म्हणजे कसं, आता सांभाळ तूच. जबाबदाऱ्या! जबाबदाऱ्यांचा पसारा. एकावर एक अस्ताव्यस्त पसरलेल्या. जुन्या न संपता त्यावर नवीन येऊन पडलेल्या. लादल्या गेलेल्या. कधी आवरला जाणार हा पसारा, कोण जाणे. ते काही तुझं कपाट नव्हे. जिथलं तिथे. जास्ती ओढवून घ्यायचंच नाही. नीटनेटकं. हे आता माझं आयुष्य. तेव्हा हा माझा पसारा. जबाबदाऱ्यांचा का होईना. पण आवरेन तो. हळूहळू. तू झटकलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडेन. बघंच तू. आणि आटपाआटपीतील शेवटचं काम म्हणजे हा मेलबॉक्स रिकामा करणं असेल. रिकामं टेबल, रिकामा मेलबॉक्स. जबाबदाऱ्यांची निरवानिरव.
आणि...आणि मग काय?रहाता राहिलं, रितं आयुष्य.
25 comments:
नि:शब्द...
काळाने खपली धरायचा प्रयत्न केला तरीही पुन्हा पुन्हा हिरवी होणारी ही जखम... बयो, घुसमट्त राहू नकोस... निर्विकारही होऊ नकोस कधी... त्या काळ्या काळ्या वर्तुळाच्या आत धुगधुगी आहे हे क्षणभरही विसरू नकोस... जप स्वत:ला कारण लेकीला तू हवी आहेस...
No Words !
नाही काही सुचत नाही! कमेंट द्यायला!
सॉरी यार !
काय प्रतिक्रिया देऊ? निःशब्द !!
रिकामं टेबल, रिकामा मेलबॉक्स आणि रिकामी प्रतिक्रिया.. :( :( :(
तू हे असे काही लिहायला घेतलेस की काय प्रतिक्रिया द्यावी तेच समजत नाही... :( तुझ्या ह्या आवराआवरीला 'आवरा' असेही म्हणू नाही शकत ना... :) शेवटी काय 'एकला चलो रे!!!'
तू लिहिताना मुलीची परवानगी घेतेस म्हणालीस पण ती तुझे पोस्ट वाचते का??? (मला पडलेला अजून एक प्रश्न..)
:) दीपक, माफी. निरुत्तर करायची काही इच्छा नव्हती. पण नियमित वाचतोस आणि नेहेमीच प्रतिक्रिया देतोस ह्याबद्दल खूप आभार. :)
रिकामं टेबल, रिकामा मेलबॉक्स आणि रिकामी प्रतिक्रिया.. :( :( :(
हेरंब, मला हसूच आलं हे वाचून! आभार रे. :)
रोहन, हो, ज्या ज्या गोष्टीत लेकीचा उल्लेख आहे तेते मी तिला विचारल्याशिवाय लिहित नाही. मॅडम खूप वाचतात पण ब्लॉग वाचत नाहीत हे एका अर्थी बरंच आहे. मात्र तिच्याशी प्रामाणिक रहाण्याची माझी सवय मी कधी मोडत नाही. :)
खरंच नि:शब्द!
रोजच तुमचा ब्लॉग वाचते... पण मूळच्या आळशीपणामुळे प्रतिक्रिया कधीतरीच दिलेली आहे.
पण या रोजच्या पोस्ट्समुळे कळणारी अनघा मला खूप आवडते - जशी आहे तशी. :)
त्या अंदाजाच्या आधारेच एक सांगते - माझी आजी म्हणायची (असं आई सांगते) की जो जेवढं सहन करू शकतो; त्याला त्याच प्रमाणात सुख-दु:ख, काळजी-जबाबदारी मिळते.
तेव्हा हे नक्की! आम्हाला आवडणार्या या अनघाची कदाचित खरी सहनशीलता/ताकद आम्हाला वाटते त्याहून खूप जास्त आहे... नाही? आयुष्य सुंदर कसं करायचं, खर तर अनुभवायचं - हे तर तूच शिकवतेस... त्याला रितं करायचं म्हणजे तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल. Just hold on there... and be yourself.
श्रद्धा.
श्रद्धा! तुझी आजी म्हणते ना तसं मला पण नेहेमीच वाटत आलंय...पण मग ह्यात लबाडी वाटते ना देवाची? म्हणजे ना मुद्दाम ताकद द्यायची आणि मग टाकत बसायचं वरून एक एक कठीण, जड दगड! :) मला तुझी प्रतिक्रिया किती आणि काय देऊन गेलीय हे मी नाही सांगू शकत! आणि मला आभार मानणं पण काही तरी विचित्र वाटतंय...म्हणजे काहीतरी वरवरच! :)
"S"aurabh is now going to "S"pam your mailbox now... तो पसारा आवरेपर्यंत मी येतोच आहे पुन्हा पसारा करायला. आणि दोन कॉफी मग आहेतच ना... त्यात मी बनवलेला स्पेशल आल्याचा "चहा" पिऊ. :)
सौरभ, दिवसभर मित्रांनी झोपा काढल्या कि मग गाडी अशी रुळावरून घसरते! मग उगाच नंतर तक्रार करू नये! :p
रितं आयुष्य...
प्रतिक्रिया काय द्यायची तेच सुचत नाही ..
:(
हम्म्म्म. बायनरी बंड्या! गाडी जरा घसरली! :(
माझ्या सिरीयस प्रतिक्रियेने तुला हसू आलं? :((
काहीही असो.. हसू आलं ना.. अशा मूडमध्ये तेच महत्वाचं :D .. चिल.. !!
:| :) :D
अनघा, तू मनात येईल ते लिहितेस, ते खूप चांगला करतेस... काळजी घे!!
We love you!!
:)
इतरांप्रमाणे मी हि नि:शब्द...इतकीच प्रतिक्रिया !!!
पंकज, माफी.
:(
vandu, :)
अनघा....जमेल तस सगळ वाचते फ़क्त आजकाल प्रतिक्रिया देणं एकंदरितच कमी/बंद झालंय...
तुला काय म्हणायचंय या पोस्टमध्ये ते नुस्तं कळत नाही तर भिडतंय आत कुठेतरी....मी तर इतकी अनुभवाने मोठीही नाहीये तुला काही सांगण्यासाठी पण काळजी घे इतकंच म्हणेन.....
तुला बरं वाटावं म्हणून नाही पण सहज वाटलं म्हणून सांगते पंधरा दिवसाच्या माझ्या पिल्लाला एका हातात घेऊन वाचलेली ही पोस्ट आहे...एक जीवन आकाराला आणायचंय त्यासाठी सगळ्या अनुभवींचे विचार वाचुन अंतर्मुख व्हायची हीच वेळ का त्याचा विचार करतेय...
अपर्णा, प्रतिक्रियेबद्दल आभार. :)
सगळेच वेगवेगळे अनुभव..प्रत्येकाचे वेगवेगळे. ...धडे देणारे...फक्त मी किती शिकले आणि किती शिकू शकेन हेच बघायचं...
"आवरा" ह्या शब्दाचा अर्थच बदलून टाकलास आज माझ्यासाठी! :-S
hmmmm :(
Post a Comment