आजचा दिवस अविस्मरणीय होता.
काय केलं मी असं ?
काय केलं मी असं ?
मुंबईत सध्या जगप्रसिद्ध शिल्पकार अनीश कपूर ह्यांचे प्रदर्शन चालू आहे. वांद्र्यातील मेहबूब स्टुडियोमध्ये. ब्रिटीश शिल्पकार. मूळ मुंबईतील. नाव बऱ्याच वेळा वर्तमानपत्रात वाचले होते. गेले काही दिवस ऑफिसमधील मित्रांकडून भरपूर ऐकत होते. हे एक आम्हीं बरे करतो. शहरात काही बघण्यासारखे आले की एकमेकांच्या कानी जरूर घालतो.
स्टुडियो ३. बाहेरील उंचचउंच लाल चित्रित भिंती...त्यांवर नाव अनिष कपूर. वातावरण निर्मितीला सुरुवात. म्हणजे सगळं भव्य आणि अहं शून्य.
आपण फारच सुंदर चित्र काढतो असा एक बालवयातील भ्रम, जे. जे. तील पहिल्या वर्षातच तसा दूर झालेला होता. आसपासचे रथी महारथी बघून. परंतु तेव्हापासूनच जहांगीर आर्ट गॅलेरीला भेट देण्याची एक सवय जडून गेली. तेथील सगळीच चित्रे आपल्या बुद्धीक्षेत्रात येत नाहीत हे ही मग कळून चुकले. अनुभवाने एक धडा मात्र घेतला गेला...सगळं आपल्याला कळलंच पाहिजे हा हट्ट न करणे...ह्यातच आपले हित आहे. आणि मगच ही कला आपल्याला आनंद देऊ शकेल.
तर असं चित्रपटात बघतो ना आपण, उंच पर्वत आणि पायथ्याशी एक लपलेलं भुयार...तसंच काहीसं. आत कोण लपलंय काय माहित. आत शिरले. नेहेमी शुटिंग्सच्या दरम्यान मोठे स्टुडियो बघत असतो. त्यासाठी उभे केलेले सेट्स बघत असतो. त्या धर्तीचं आकाशात पोचलेलं छत आणि त्याखाली वेगवेगळ्या आकाराची चकाकती शिल्पे. बहिर्वक्र आणि अंतर्वक्र वळणे घेणारी स्टीलची शिल्पे. गुळगुळीत आणि आजूबाजूची प्रत्येक हालचाल आपल्यात शोषून घेणारी. आणि त्याचे प्रतिबिंब मात्र काही वेगळेच दाखवणारी. जसं घटना असते एकच परंतु त्या घटनेशी निगडीत असलेला प्रत्येक माणूस त्यातून घेतो वेगवेगळा अर्थ...आपापल्या स्वभावधर्मानुसार. तसंच काहीसं. सगळं वातावरण गूढ. आकार गूढ. आपण ह्या पृथ्वीवरचे नाहीच. आपण जसे काही आहोत कुठे वेगळ्याच ग्रहावर....ना जमीन...ना आकाश...खूप 'सररियलॅस्टीक'. चित्रांपेक्षा शिल्प नेहेमीच काही वेगळा अनुभव देऊन जातात. कारण शिल्पे आपल्या समोर अवतरलेली असतात. आणि अनीश कपूरची शिल्पे जशी काळाच्या खूप पुढे....खरं तर स्वत: काळाच्या मर्यादा तोडून आपल्याला देखील ती बंधने तोडून टाकण्यास भाग पाडणारी.
मी अशी आहे हा खरंतर एक भ्रमच. मी 'घन' आहे...की मी एक 'द्रव' आहे...कारण माझे प्रतिबिंब तर वितळलेले...त्या विस्तीर्ण हॉलमध्ये वावरणारे मानवी आकार वेगवेगळे. हालचाली संथ...परंतु त्यांची प्रतिबिंबे मात्र कधी हलकी चाल तर कधी झपाट्याने बदलणारी...विचित्र....
तिथे एक प्रचंड मोठा पैलू असलेला हिरा....परंतु आत वळलेला...अंतर्वक्र. जसे एखादे प्रचंड मोठे खोल ताट, कडा नसलेले, भितींला चिकटवले आणि मग त्यांवर चिकटवले त्रिकोणी, पंचकोनी स्टीलचे तुकडे. तर काय होईल? मी त्यासमोर उभी राहिले...आणि मी विखुरले...तुकडे...शतश: तुकडे झाले माझे....अजब. थोडं इथे तिथे सरकावं...समोर माझे सर्व तुकडे सरकावे. तेव्हढ्यात माझ्या बाजूला आला एक गोरा. परदेशी...आणि त्याची मैत्रीण. आता झालं असं की त्याने घातलेला एक सुंदरसा शर्ट. रंग पिवळा आणि त्यांवर बारीक पाने फुले, नक्षी...हिरवी, लाल. मी बाजूला झाले. ते पुढे सरसावले. आणि काय सांगू? तो त्या उलट्या हिऱ्यासमोर उभा राहिला आणि जो काही सुंदर विखुरला की एकदम कमाल! म्हणजे त्या समोरील हिऱ्यात त्याच्या शर्टाचे झाले सूर्यफुलाचे शेत....आणि त्या पिवळ्या तुकड्यांतुकड्यातील सूर्यफुलाला असंख्य डोकी...माझ्या साध्यासुध्या लाल कुरत्याने नाही दाखवली मला ही कमाल!
सर्वच futuristic...अनाकलनीय होत आहे ना आज...हम्म्म्म...
फेब्रुवारी २०११ पर्यंत आहेत ही शिल्पे मुंबईत...मेहेबुब स्टुडियोत. प्रत्येकाने हा अनुभव स्वत: घ्यावा...असं मला वाटतं. गुगल करावे आणि फोटो बघावे...की 'याची डोळा बघावे'...निर्णय तुमचा.
जगातील प्रत्येक गोष्ट मला उमगलीच पाहिजे हा हट्ट सोडून...
अनाकलनीय गोष्टींतून...अनाकलनीय आनंद मिळवण्यासाठी....
जगातील प्रत्येक गोष्ट मला उमगलीच पाहिजे हा हट्ट सोडून...
अनाकलनीय गोष्टींतून...अनाकलनीय आनंद मिळवण्यासाठी....
21 comments:
सही ग.. !! मस्तच.. आणि अनाकलनीयबद्दल सहमत..
बाकी, सध्या तरी "गुगल करावे आणि फोटो बघावे" हाच पर्याय आहे आम्हाला :(
wow !
अनुश्री, शक्य असेल तर नक्की बघा हं. :)
हेरंब, शिकागोला त्याचं भव्य दिव्य असं एक शिल्प आहे....तिथे पोचू शकलास तर कदाचित इथल्याही पेक्षा काही वेगळाच अनुभव मिळून जाईल तुला. :)
हम्म्म... आपलं तर बोलणं झालंच आहे. :D
हो..सौरभ, मला वाटतं, आपण सर्वच आपल्याला समजलं पाहिजे असा स्वत:शी हट्ट केल्याकारणाने आयुष्यातील काही आनंदच हरवून बसतो कि काय? :)
अनाकलनीय गोष्टींतून...अनाकलनीय आनंद मिळवण्यासाठी.... +१
बाय द वे, मी सहसा न कळलेल्या गोष्टी कळल्या असं सांगून काहीतरी विचित्र एक्सप्लेन करतो..आणि कौतुकाच्या नजरा मिळवतो.. फक्त एक काळजी घ्यायची....
समोरच्यालाही आपल्यासारखंच कळत नाही ह्याची खात्री करून घ्यावी..
अनाकलनीयातला आनंद असाही मिळवता येतो ;)
(किती लिहिता हो...तीन दिवस काय नव्हतो तर तीन जड जड पोस्टा! :P)
हेहे!! विद्याधर, हे म्हणजे बाबा ओरडायचे तसं! "किती बडबडतेयस!" :p
"Cloud Gate"मुळे मला ते चांगलेच प्रसिद्ध आहेत ना!!! :)
बरोब्बर श्रीराज! :)
cloud gate..खरंच अप्रतीम..जगात ब-याच गोष्टी न कळणा-या असतात..
बरोबर सारिका...मात्र काही अनाकलनीय गोष्टी मनाला आनंद देऊन जातात. :) तुझं ब्लॉगवर स्वागत आहे सारिका. :)
धन्यवाद अनघाताई..
अनाकलनीय गोष्टींतून...अनाकलनीय आनंद मिळवण्यासाठी.... मी सध्या तुझ्या नजरेतून तो मिळवतेय. :) जालावर आनंद मिळाला पण समाधान नाही झाले.
शिकागोला कधी जाण्याचा योग आला ना भाग्यश्री, तर 'Cloud Gate' नक्की बघ. :)
करेक्ट... म्हणूनच चित्र बघताना आपलं अनुभवाला शरण जावं. डोक्याशी झगडू नये.
(माझ्या वाट्याला आलेलं थोडंसं शहाणपण) :)
- नीरजा
:) 'अनुभवाला शरण जावं'. छान आहे हं हे नीरजा!
'अनुभवाला शरण जावं '
: अनघा + 1
आभार राजीव. :)
ऐकले होते.. पण जायला जमले नाही.. जानेवारीच्या शेवटी जमवतो... :) मला तितकी नाही पण शामिकाला भारी आवड.. :)
मला वाटतं, आवडेल शमिकाला. :)
Post a Comment