नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 11 December 2010

-, -, मी मराठी

आज लोकसत्ता उघडला आणि माझं मन कसं अभिमानाने भरून आलं.

पहिल्या पानावर तर हल्ली संपूर्ण जाहिराती भरलेल्या असतात. त्यामुळे काल नक्की काय घडलंय हे वृत्तपत्र माध्यमातून मला जाणून घ्यावयाचे असेल तर नुसतं ते हातात धरून काम भागत नाही तर पहिलं पान उलटणे भाग असते. त्यातील ती पूर्वीची गंमत नाही उरली. म्हणजे कसं दरवाज्याच्या फटीतून ताजं टवटवीत वर्तमानपत्र सरपटत आत येत असे. मग त्याला हातात घेताना आधी मान तिरपी करून त्याकडे नजर टाकली तरी क्षणात काल दिवसाभरात अख्ख्या भारतवर्षात कोणती लक्षवेधी घटना घडून गेली आहे, ते समजून येत असे. आता नाही होत तसं. ती इस्त्रीची घडी मोडा, ते पान उलटा कि मग येत ते जग माझ्या भेटीस.
असो. जग वेगात पुढे जात आहे. त्याची ती गती जर मला पकडायची असेल तर पुढचं पान तत्परतेने उलटणे भाग आहे.

तर आज आपण एकदम जाऊ पान क्रमांक दहावर. सर्वात वर बघा. काय आहे बातमी?

'मराठी माणसाने शोधला 'सोहो' धुमकेतू'. 'आकाशमित्र मंडळा'चे सचिव शिशिर देशमुख सूर्यावर आदळणाऱ्या धूमकेतूचा शोध लावणारे पहिलेच भारतीय.

माझ्या अभिमानाला आहेत तीन पायऱ्या.
पहिली, माणसाने लावला 'सूर्यावर आदळणाऱ्या धूमकेतूचा शोध'.
दुसरी, एका भारतीयाने लावला 'सूर्यावर आदळणाऱ्या धूमकेतूचा शोध'.
आणि सर्वात शेवटी, एका मराठी माणसाने लावला 'सूर्यावर आदळणाऱ्या धूमकेतूचा शोध'.
ह्या पायऱ्या मी कोणत्या प्रकारे चढते हे महत्वाचे. खरं तर सर्वात वरची पायरी हवी ती माणसाने लावलेल्या शोधाची. त्याखालची, भारतीयाने तो शोध लावला ह्याची. आणि त्यानंतर मला अभिमान वाटतो की तो शोध लावला एका मराठी माणसाने.

रोज घराबाहेर पडलं की मन कसं उद्विग्न होऊन जातं. जागोजागी फडकी लटकलेली असतात. वेगवेगळी मराठी आडनावं आणि त्या आडनावांचे मालक ह्यांच्या छायाचित्रांनी. त्याचे ते चेहेरे कोणत्या कामाच्या जोरावर इतके अभिमानी दिसतात हे माझ्यासारख्या सामान्य माणसापर्यंत कधी नाही पोचत. त्यांची नावे आणि फोटो ज्या ध्वनिवेगाने पोचतात त्या वेगाने त्यांची कामे मला नाही दिसत. हा दृष्टीदोष कदाचित माझाच असू शकेल. पण आहे ते असे आहे. असाही एक प्रश्न मला नेहेमी भेडसावत असतो...ज्यावेळी मुद्रणशास्त्र इतके पुढे गेले नव्हते त्यावेळी टिळक, आंबेडकर, गोखले, कर्वे आणि फुले ही आडनावे आणि हे चेहेरे माझ्या मनात कसे घट्ट स्थान मिळवून गेले?

पण आज मात्र कोणा एका मराठी माणसाचे छायाचित्र आणि त्याचे नाव बघून मला गर्व वाटला. अभिमान वाटला. मराठी असण्याचा.

तीच गोष्ट पान क्रमांक दोनवरची 'थ्री चियर्स टु सचिन.' तेंडुलकर हे मराठी आडनाव गेली कित्येक वर्ष आपली कॉलर ताठ करत आहेच. परंतु ह्या वेळी त्याच्या तत्वनिष्ठेची बाब पुन्हा एकदा आपल्यासमोर आली. 'दारुच्या जाहिरातीची करोडोंची ऑफर धुडकावली'. "वीसच काय २०० कोटी रुपये कोणी देऊ केले तरी आपण दारू आणि सिगारेटच्या जाहिराती कधीच करणार नाही." आठवले तेंडुलकरकाका. साधे सुधे, नम्र वृत्तीचे. आकाशात त्यांच्या ह्या जगज्वेता पुत्राच्या वक्तव्याने पुन्हां एकदा ताठ झालेली मान मला दिसून गेली. त्यांचे हसू डोळ्यांसमोर आले. कविमनाचे, माझ्या बहिणींशी कॅरम खेळणारे तेंडुलकरकाका.

कसं आणि कधी कळलं ह्या सचिनला... 'मी सर्वप्रथम माणूस आहे'.
त्यानंतर 'मी भारतीय आहे'.
आणि मग 'मी मराठी आहे'.

आम्हीं मंद बुद्धी.
पायऱ्या चुकवून वेड्यावाकड्या उड्या मारायची, आमची मेली जन्माचीच खोड!


18 comments:

हेरंब said...

अगदी अगदी !! आज सचिनची ती बातमी वाचून सचिनचा पंखा असल्याबद्दल मी (पुन्हा एकदा)स्वतःचीच पाठ थोपटून घेतली !!

Anagha said...

:)

सौरभ said...

राईट्ट... एकदम योग्य क्रम आहे ह्या पायऱ्यांचा.. सचिनबद्दलची बातमी वाचली पण त्या धुमकेतु संदर्भात कुठेही बातमी सापडली नाही. माध्यमांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे ह्याबाबत पुनर्विचार करणे गरजेचे आहे.

Anonymous said...

सचिन मला आवडतो निर्विवाद पण माझं ते दैवत वगैरे नाही... दैवताच्या एक पायरी आधिच्या स्टेजला असावे मी बहूतेक :)

पण आज मलाही ती बातमी ऐकून त्याचे कौतूक वाटले होते :)

पोस्ट लय भारी.. नेहेमीप्रमाणेच :)

Suhas Diwakar Zele said...

खरय..आणि हेरंबला अनुमोदन :)

Anagha said...

अगदी खरं सौरभ, दहाव्या पानावर उजव्या हाताला कोपऱ्यात दडलेयत शिशिर देशमुख.

Anagha said...

तन्वी, दैवते अशी दैवत्वाला जागली कि बरे वाटते. नाही का? :) धन्यवाद गं.

Anagha said...

सुहास, आभार. :)

panda said...

अनघा, मलाही आज "लोकसत्ता" वाचताना अगदी हेच विचार आले....फरक इतकाच की "सचिन" समवेत "कमांडर दिलीप दोंदे" यांच्या सफरीबद्दल वाचले. बाकी online लोकसत्ता वर "धुमकेतू" ची बातमी मिळाली नाही. सौरभ च्या मताला दुजोरा....."माध्यमांनी कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे ह्याबाबत पुनर्विचार करणे गरजेचे आहे."

पोस्ट छान झालीये....नेहमीप्रमाणे.....(हे सांगण्याची गरज नसावी). शिशिर देशमुख यांच्याबद्दल update केल्याबद्दल धन्यवाद!!!!

Anagha said...

पांडा, खरोखर कमांडर दिलीप दोंदे म्हणजे एक कमालीचं व्यक्तिमत्व आहे!!! आणि हे वर्तमानपत्रवाले ना! दिवसेंदिवस बिघडतच चाललेत! आणि आभार पांडा, प्रतिक्रियेबद्दल. :)

संकेत आपटे said...

पोस्ट नेहमीप्रमाणेच छान. :-) आणि सचिनबद्दलची बातमी वाचून अभिमानाने ऊर भरून आला. जियो सचिन... :-)

हेरंब said...

अरे हो.. आणि ते शिशिर देशमुख (आमच्या) डोंबिवलीचे आहेत बरं ;) हेहे

THEPROPHET said...

तन्वीताई +१

आणि अजून एक मार्क +१ ;)

Anagha said...

चला! हेरंब, म्हणजे अभिमान वाटायला तुला आमच्यापेक्षा अजून एक कारण! ;)

Anagha said...

:D आभार, विद्याधर! :)

Shriraj said...

अगदी बरोब्बर लिहिलयस बघ!!! बरं झालं तूच हा विषय मांडलास... जरा जास्त लोकांपर्यंत पोहोचेल!!
खरंच!! हल्ली बर्याचदा लोक शेवटची पायरी पहिली घेताना दिसतायत

BinaryBandya™ said...

सचिनबद्दल असे काही वाचले की बरे वाटते ...

पायऱ्या चुकवून वेड्यावाकड्या उड्या मारायची, आमची मेली जन्माचीच खोड!

खरे आहे ...

Anagha said...

:) आभार बायनरी बंड्या.