नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 10 December 2010

निपज

"सॉरी विजया."
प्रसूतीगृहात डॉक्टरीणबाई नुकत्याच बाळंत झालेल्या विजयाला म्हणाल्या तेंव्हा तिच्या छातीत धस्स झालं. दोन बाळांची ती आई होती. आणि ती बाळं तर धष्टपुष्ट होती. मग आताच काय झालं? माझ्या बाळात काय शारीरिक व्यंग आलं? तिसरं बाळ म्हणून काही झालं का? हात, पाय, डोकं, हृदय...काय ठीक नाही माझ्या बाळाचं?
"अगं, तुला पुन्हां मुलगीच झाली!"
"काही व्यंग तर नाही?"
"चल, नाही ग! एकदम ठीक आहे. पण मुलगीच झाली!"

विजयाला अजून आठवतं. सख्ख्या बहिणीने मारलेला टोमणा.
"तू जळतेस माझ्यावर. मला मुलगा आहे. आणि तुला मुलीच!"

घराणं पुढे चालायला हवं. मुलगी परक्याचं धन.
घराणं पुत्र पुढे नेतो. वंशाचा दिवा तो पुढे नेतो. अग्नी, पुत्र देतो.

मानव वंश पुढे न्यावयाचा आहे....कि जोशी, शर्मा, देसाई, मेहेता, राजा, पुढे न्यावयाचे आहेत?

मुलगा आणि मुलगी...

नाजूक धरतीकडे झेपावणारी धार. मग जलाशय...त्याचं डबकं, मग नाला आणि नंतर फक्त प्रलय.

वृक्ष, वंश पुढे नेतात.
मधमाश्या, वंश पुढे नेतात.
मुंग्या, वंश पुढे नेतात.
नर वा मादी...
निसर्ग भरारतो. निसर्ग उभारतो.

मी निसर्ग जन्माला घातला.
मी रोप लावलं.
रोप काय नर? रोप काय मादी?

दिवे लावणार की दिवा लावणार?
काळाची गणितं.

"अहो, अपूर्वा नाव ठेऊया. पूर्वी कधीही न झालेली...अपूर्वा."

सत्यकथेवर आधारित

19 comments:

सौरभ said...

पुन्हा मुलगी झाली म्हणुन सॉरी म्हणणारी, डॉक्टरीण...
टोमणा मारणारी, बहिण...
अजिब आहे... बाकी समाज आंधळा आहे...

Anagha said...

...आणि कथा सत्य आहे. :)

आनंद पत्रे said...

सौरभ + १

सारिका said...

नमस्कार अनघाताई..

तुमची लिखाण शैली अप्रतिम आहे..वाईट वाटलं वाचुन..कि ही कथा सत्य आहे..

Anagha said...

वाटतं...समाज आंधळा असता तर ऑपरेशन करता आलं असतं....हे आंधळेपणाचं सोंग आहे! आपल्या समाजाने घेतलेलं... आनंद, आभार. :)

Anagha said...

आणि स्वागत आनंद. :)

Anagha said...

सारिका, आभार. आहे खरी ही सत्यकथा...आणि फार जुनी नाही. मात्र ही अपूर्वा अगदी आईबाबांना आणि तिच्या दोन मोठ्या बहिणींना अभिमान वाटावा अशीच आहे! :)

Deepak Parulekar said...

कबीरा कहे, ये जग अंधा!
अंधी जैसी गाय, बछडा खासों मर गया!
झुठी जाम जताए !

हेरंब said...

विशेषतः अशा पोस्टच्या खाली 'सत्यकथेवर आधारित' असं वाचलं की तर ते जास्तच टोचतं :((

Anagha said...

खरं आहे हेरंब....पण आहे खरी ही सत्यकथा....मुंबईसारख्या शहरातील.

THEPROPHET said...

अगदी थोडक्या शब्दांट केव्ह्ढं लिहून ठेवलंयत...

Anagha said...

आभार, विद्याधर.

Shriraj said...

काही लोकांचा हा समाज खरच निरर्थक वाटतो... senseless!!!

... आणि वाईट याचं वाटत कि असे महाभाग अजून हि अस्तित्वात आहेत!!!

Anagha said...

आहेत आहेत. श्रीराज, त्या दिवशी मी एक लेख वाचला...मुंबईबद्दलचा. तो होता इथल्या 'वाढती श्रीमंती आणि वाढती गरिबी' ह्याविषयी. Schizophrenic म्हटले होते त्यात मुंबईला. परंतु, मला हे, एकूण सगळ्या देशाच्या विचारधारणेबद्दलच वाटतंय.

तृप्ती said...

काही दिवसांपुर्वी मी अगदी विरुद्ध केस लिहिली होती (http://saangatyeaika.blogspot.com/2010/10/blog-post_27.html) . माझ्या ब्लॉगची जाहिरात करण्याचा हेतु नाही पण असे विचारी लोक आहेत आणि चित्र अगदीच निराशाजनक नाही हे सांगण्यासाठी ही कमेंट.

Anagha said...

तृप्ती, तुझ्या 'बबनची दुसरी गोष्ट' ह्या लेखातील तुझी ही शेवटची वाक्ये-'आपण अनेकदा सुसंस्कृतपणाची जोड माणसाच्या शिक्षणाशी, पुस्तकी ज्ञानाशी लावतो. पण मग एवढा समजुतदारपणा कुठल्या शाळेत शिकला असेल हा अंगठे बहाद्दर ? विचारांची इतकी परीपक्वता कुठली पुस्तकं वाचून आली असेल त्याला? अनाकलनीयच !!!'
पूर्ण पटणारी. चित्र निराशाजनक नक्कीच नाही. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा झाला कि मुंबईसारख्या शहरात राहून एक शिकलेली बाई दुसऱ्या बाईला काय ऐकवते आणि त्या विरोधात तुझ्या लेखातील बबनसारखा न शिकलेला एक पुरुष आपल्या कृतीतून कसा सकारात्मक संदेश देतो.
भारताच्या सध्याच्या परिस्थितीत सरमिसळ आहे. आशा आहे कि पुढील कालावधीत ते पूर्णपणे सकारात्मक दिसू लागेल. आणि आपलाही त्यात खारीचा का होईना, वाटा असेल. :)

तृप्ती said...

:)

बाकी, थोड्या दिवसांपुर्वीच तुमचा ब्लॉग हाती लागला आहे. तेव्हा तुम्ही १०० वर्षांपुर्वी लिहिलेल्या लेखांना सुद्धा माझ्या कमेंट्स येतील आता :)

Anagha said...

तृप्ती, येऊ देत येऊ देत! मला आनंदच होईल तुझ्या प्रतिक्रिया वाचताना. अगदी १०० वर्षांपूर्वीच्या पोस्टवरील सुद्धा! ;)

Shriraj said...

:D Trupti's Last Comment +1