नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 8 December 2010

बोध...

गेल्या महिन्या दोन महिन्यात काही मराठी पुस्तके वाचनात आली.

रारंगढांग- प्रभाकर पेंढारकर
शाळा- मिलिंद बोकील
सोन्याच्या धुराचे ठसके- डॉ. उज्ज्वला दळवी

पहिल्या पुस्तकातील हिमालयातील गर्विष्ठ रारंगढांग (ढांग-पर्वत), एकइंजिनीयरच्या भूमिकेतील खडतर तत्वनिष्ठ जीवन, मी देखील प्रभाकर पेंढारकरांबरोबर जगले. प्राण गेला तरी बेहेतर ही माझ्या सैनिकांचीच मानसिकता प्रत्येक नागरिकाने आपल्या कामात कशी मनोमन बाळगायला हवी हे अगदी सुंदर शब्दांत, उपदेशकाच्या भूमिकेत न शिरता, त्यांनी मला दाखवून दिले. अतिसुंदर. प्रत्येकाने वाचायलाच हवे.

'शाळा' हा पूर्णपणे एका किशोरवयीन मुलाच्या दृष्टीने सांगितलेला अनुभव. तरल, अगदी मुकुंदच्या मनात शिरून त्याचा आनंद आणि त्याचे दु:ख आपण देखील अनुभवतो. मला वाटतं, प्रत्येक शाळा ज्या परिसरात आहे, त्या परिसरातील मुलांची मानसिकता, त्या शाळेचे एकूण रूप ठरवत असावी. मग काय मुंबईच्या मध्यवर्ती जागेत उभ्या असलेल्या 'बालमोहन विद्यामंदिर' मधली मुलं देखील ह्याच भाषेत आपल्या शाळेतील मुलींबद्दल विचार करत असतील? आम्हीं जेव्हा मोठ्या होत होतो, तेव्हा हे वर्गबंधू आमच्याकडे बघून असा विचार करत होते?...पुस्तक आवडले.

आता 'सोन्याच्या धुराचे ठसके'. डोक्यातच गेलं हे पुस्तक माझ्या! तुम्हांला तुमच्या वाचकाने सौदीतील मागासलेल्या गावापासून प्रगत गावापर्यंत केलेला प्रवास तुमच्याबरोबर करून हवाय ना? मग सांगा ना आधी मला की तुम्ही तिथे काय विचार करून पोचला आहात? तुम्हीं डॉक्टर, तुमचे पती डॉक्टर. मग अगदी सेवाभाव मनी धरून चालला आहात काय तिथे? मग २६ वर्षांपूर्वी ह्या माझ्या देशात तर ह्या सेवाभावनेची कित्ती गरज असेल! आत्ता देखील आहे! मग उठून तिथे का जायचे आणि मग तो देश मागासलेला म्हणून तिथे होणारे अपमान का सहन करायचे? असं नाही की माझ्या देशात माझे अपमान होत नाहीत! पण मग ते माझ्या घरात झालेले अपमान आहेत! परक्यांच्या दारात जायचे...त्यांनी केलेला अपमान सोसायचा आणि मग सगळंच कसं हलकंफुलकं म्हणून वाचकासमोर ठेवायचं....बरं, तुमची फसवणूक झाली असती तर तुम्हीं उठून पुन्हा तुमच्या मुलांना घेऊन जाणार नाही त्याच अवमान करणाऱ्या देशात! अगदी शेवटच्या पानापर्यंत हा मूळ प्रश्र्नच अनुत्तरीत! नाही पटलं हे! ही मी नव्हेच!

आता वाचते आहे, Mitch Albon ह्या लेखकाचे 'Tuesdays with Morrie'. कल्पना खूप आवडली. 'काही महिन्यांवर मृत्यू येऊन ठेपला आहे. मग तो अगदी गळ्यापर्यंत पोचेस्तोवरचा प्रवास मला मस्त जगायचा आहे. आणि माझा तो प्रवास मला जगाबरोबर वाटून घ्यावयाचा आहे.' एकेक विचार सुंदररित्या मांडले आहेत. अगदी मनाला भिडतील आणि ती विचारधारा पटेल असे. सरळ, सुंदर आणि सोप्प्या भाषेत...बघू, एका सातासमुद्रापलीकडील परक्या माणसाचा मृत्यू मला जीवनाकडे बघण्याचा कुठला नवा चष्मा देऊन जातो...


21 comments:

सौरभ said...

शाळा पुस्तक वाचायचं आहे मलापण. पुष्कळ ऐकुन आहे त्याबद्दल...

हेरंब said...

तिन्ही फक्त ऐकली आहेत. वाचायचा योग आलेला नाही अजून.. विश लिस्टमधले आयटम्स वाढत चाललेत.. !

Gouri said...

Sorry for commenting in English ... accessing from net cafe.

Looking fwd to reading 'Rarangdhang'.

Felt the same about 'Shala' and 'Som\nyachya dhurache Thaske'.

Didn't like 'Tuesdays with Morrie' much ... found it 'chicken soup' - feel good but superficial. If I know I am going to die shortly I will behave in a different way I think.

Deepak Parulekar said...

शाळा अप्रतिमच आहे ! वाचताना नेहमी वाटतं की अरे ही तर आपलीच स्टोरीच आहे !
आम्ही सुद्धा मुलींकडे असेच बघायचो, ( शाळेतली ती खोड अजुनही गेली नाही म्हणा! ) प्रत्येकाने वाचावं असं !!

BinaryBandya™ said...

रारंग ढांग आणि शाळा दोन्हीही वाचलीत ...

"शाळा" पुस्तक म्हणजे माझे एकदम favorite ..

"त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.............. "

अतिशय आवडते पुस्तक ...
कदाचित त्या पुस्तकाबरोबर मीही नववी - दहावीचा वर्ग पुन्हा एकदा जगुन गेलो ...

Anagha said...

सौरभ, माहित नाही मिळतं का 'शाळा' आता बाजारात! :)

Anagha said...

हेरंबा, खरंच इथे राहून पण माझी अशीच असते मारुतीच्या शेपटासारखी यादी! :)

Anagha said...

गौरी, रारंगढांग मिळवून वाचच! मला खात्री आहे तुला नक्की आवडेल! :) 'Tuesdays with Morrie' बघू...कुठे घेऊन जातं... :)

BinaryBandya™ said...

"शाळा" मिळते बाजारात ...

Anagha said...

दीपक, हे तू 'शाळा'बद्दल बोलतोयस ना, ते मी माझ्या प्रत्येक मित्राकडून ऐकलंय!! सगळेच ते आयुष्य पुन्हा जगलेत! :)

Anagha said...

बायनरी बंड्या, सुंदर सुंदर आहे ना ते लिखाण?! मस्त! :)

देवदत्त said...

ह्यातील मी शाळाच वाचले आहे. एकदम मस्त पुस्तक.
वाचून झाल्यावर ह्याबाबतील लगेच सर्वांना सांगावेसे वाटले.
http://maajhianudini.blogspot.com/2009/12/blog-post_21.html

पण वेळेअभावी विस्तृत नाही लिहिता आले.

इतर आवडती पुस्तके, तिथे लिहिल्याप्रमाणे.
दुनियादारी, पार्टनर.

THEPROPHET said...

शाळा लई भारी आहे असं ऐकून आहे मीसुद्धा...बाकीच्यांचं ठाव नाही! बघू कधी योग येतो!!

Suhas Diwakar Zele said...

अनघा,शाळा कधी पासून घ्यायचा घ्यायचा म्हणतोय...वेळच नाही मिळाला. :(
तू आज आठवण करून दिलीस आता परत शाळेतला कीडा जागा झाला बघ...घेतोच लवकर.

Anagha said...

देवदत्त, वाचली मी तुमची 'शाळा' वरची पोस्ट. मला वाटतं, आपण काही चांगलं वाचलं, चांगलं बघितलं ना कि असं सांगून टाकावं! मग सगळे त्यातील आनंद घेऊ शकतात! नाही का? :)

Anagha said...

सुहास, मला तर आता वाटतंय 'आयडियल'मध्ये जाऊन 'शाळा'च्या दहा बारा कॉप्या घेऊनच टाकाव्या! तुम्हां सगळ्यांसाठी! :)

Anagha said...

विद्याधर, आता मायदेशी आलास की नक्की वाच! आणि रारंगढांग पण सोडू नकोस! तुला नक्की आवडेल! ! :)

Suhas Diwakar Zele said...

अनघा, उत्तम विचार..आवडला
हे हे हे ;)

Shriraj said...

आता मला खर्या अर्थाने माझ्या जगात आल्यासारखा वाटतंय :)

तुला आवडलेली पुस्तकं वाचायलाच हवेत :)

Anagha said...

श्रीराज, रारंगढांग वाचलंस ना?

Shriraj said...

नाही गं...गेला महिनाभर माझी नुसती धावपळ चालली होती... आता जाईन कधीतरी "Majestic" मध्ये :)

(तुझे अजून सगळे पोस्ट वाचलेले नाहीत... एक एक करून वाचायचेत)