नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 13 December 2011

म्हाडा आणि मी...भाग ८

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७

३ मे रोजी,  म्हाडा, म्हाडाचे दोन अधिकारी व बिल्डर यांच्या विरोधात आम्हीं सिटी सिव्हील कोर्टात तक्रार अर्ज दाखल केले. मूळ दावा ज्या कोर्टात चालू होता त्याच कोर्टात...व सदर तक्रार अर्ज दाखल केल्याची 'नोटीस ऑफ मोशन' त्यांना देण्यात आली.  हा तक्रार अर्ज मुख्यतः म्हाडा व त्याच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध होता. 'Contempt of Court' म्हणजे 'कोर्टाचा अवमान'. जरी हे सर्व, बिल्डरचे हित लक्षात घेऊन म्हाडाच्या दोन अधिकाऱ्यांनी केले होते, तरीही बिल्डरला कोर्टाने जी सूचना दिलेली होती...'भाडेकरूच्या पसंतीची जागा देण्यात यावी', त्या सूचनांचे पालन बिल्डरने केले होते. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या बिल्डरने न्यायालयाच्या आदेशाबाहेर जाऊन कोणतेही कृत्य केले नव्हते. तरी देखील मूळ दाव्यातील सर्व संबंधितांना तक्रार अर्ज पाठवणे गरजेचे होते. ह्या सर्व प्रती रजिस्टर पोस्टाने पाठवल्या.
'नोटीस ऑफ मोशन' म्हणजे काय ?
माझ्या साध्या शब्दांत सांगावयाचे झाले तर 'नोटीस ऑफ मोशन' म्हणजे चालू असलेल्या दाव्यात कोर्टाने नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर तातडीचे मुद्दे वा बाबी कोर्टाच्या नजरेस आणून देण्याच्या प्रयत्नांची 'पूर्वसूचना'. आणि ज्यांच्या विरोधात आपली तक्रार आहे त्यांना ती सुचना पाठवणे गरजेचे. (ज्या आम्ही रजिस्टर पोस्टाने पाठवल्या.)

आम्हीं जो अर्ज केला त्यात नक्की काय होते ?
त्यात सर्व कथानक होते...
१) आम्हीं आमच्या सोयीची जागा बघितली.
२) तिच्याबद्दल म्हाडाला व बिल्डरला कळवले ( पुरावा: पत्र जे तिवारी घ्यावयास नाकारत होते व तरीही तिथे हार न मानता, शिताफीने फलटणकरांनी ते म्हाडा ऑफिसला पोचते केले होते व त्यावर म्हाडाचा शिक्का व सही घेतली होती. तसेच रजिस्टर एडिने देखील हे पत्र पाठवल्याकारणाने पोस्टाची पोच होतीच. )
३) हे पत्र मिळाले असता देखील, म्हाडाने पर्यायी जागेची व्यवस्था न करता, शनिवारी, आमचे सामान आत असताना आमचे घर सील केले ( पुरावा: फोटो, व म्हाडाने दरवाजावर लावलेली नोटीस. )
४) आम्हांला आमच्या घराचा व त्यातील चीजवस्तूंचा उपभोग घेण्यापासून वंचित केले व ३ दिवस रस्त्यावर रहाण्यास भाग पाडले ( पर्यायी जागेत हलविल्याशिवाय ताबा काढून घेण्यात येऊ नये...असे म्हाडाचे अधिनियम सांगतात. ) 
५) म्हाडाचे अधिकारी, श्री. राठोड, ह्यांनी कायद्यासंबंधी अवमानकारक उद्गार काढले व अरेरावी केली.

दरम्यान कोर्टाला उन्हाळी सुट्टी लागली.

जूनच्या पहिल्या आठवड्यात कोर्ट पुन्हा कामावर रुजू झाले. 
जुलैमध्ये बिल्डरने त्यांचा जबाब दाखल केला. तो काय होता ? 'कोर्टाच्या निरीक्षणांनुसार ( observations ) भाडेकरूच्या पसंतीची पर्यायी जागा देऊन त्यामध्ये स्थलांतरण केलेले आहे. सबब आम्हीं कोणत्याही प्रकारे कोर्टाचा अवमान केलेला नाही. व भाडेकरूने देखील अर्जामध्ये आमचे विरोधी, तक्रार नोंदवलेली नाही.'
म्हाडाने जबाब देण्यासाठी वेळ मागून घेतला. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्याचे दरम्यान लेखी जबाब त्यांनी दाखल केला. तो काय होता ?
म्हाडाच्या वकिलीणबाईंचे म्हणणे असे होते...'तक्रारदाराच्या विनंतीनुसार ( म्हणजे आम्हीं ) व कोर्टाच्या सूचनेनुसार बिल्डरने तक्रारदाराच्या पसंतीची पर्यायी जागा दिली असल्याने वादाचा मूळ विषयच शिल्लक राहिला नाही. (हे त्या बाई कोर्टात वारंवार सांगत असल्याचे मी माझ्या कानांनी ऐकले ! ) तसेच कोर्टाने म्हाडाविरुद्ध कोणताही मनाई हुकूम वा आज्ञादेश दिला नसल्याने म्हाडा व त्याच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाचा कोणत्याही प्रकारे अवमान केलेला नाही.' बाईंचे असे देखील म्हणणे होते की, 'आम्हीं भाडेकरूला घराबाहेर काढलेले नाही. घर बंदच होते व त्यात विशेष सामान देखील नव्हते. आम्हीं म्हाडाच्या नियमांना धरूनच कार्यवाही केलेली असून कलम ९५-अ ला आधीन राहून केलेली आहे.  घराला जे सील लावले ते भाडेकरूला पूर्वसूचना देऊनच करण्यात आले."

वकिलीणबाईंनी त्यांचे म्हणणे मांडले. त्यानंतर आम्हीं आमचे म्हणणे मांडले. मी सामान्य नागरिकाच्या भाषेत व नारायण ह्यांनी वकिली भाषेत.
म्हणजे, मी माझे गाऱ्हाणे मांडले...म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी मला दिलेली अपमानकारक वागणूक कोर्टासमोर मांडली. तावातावाने. "६०/७० अनोळखी माणसांसमोर मला व भारतीय संविधानासंबंधी अपशब्द वापरले ! माझ्या वकिलांशी देखील मला बोलू दिले नाही !"...हे आणि असेच बरेच काही...पाच ते दहा मिनिटे !

आमचे वकील नारायण ठासून म्हणाले,"आमच्या अशिलाने म्हाडाला व बिल्डरला पर्यायी जागेची व्यवस्था स्वतःच केल्याचे लेखी पत्र म्हाडाने कारवाई करण्यापूर्वीच ३ दिवस प्रत्यक्ष दिले होते. व त्याची पोचही त्यांनी दिलेली आहे. पर्यायी जागेचा ताबा हा म्हाडाच्या कारवाई नंतर बिल्डरने दिला आहे. त्याच्या ताबा पावतीमध्ये तसे त्यांनी लिहिले असून त्याबद्दल त्यांनी कोणताही वाद वा विरोध केलेला नाही. म्हणजेच कारवाई करताना, म्हाडाच्या नियमांस व कोर्टाच्या सूचनांना अनुसरून म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी 'घर सील करणे' ही केलेली कारवाई म्हणजेच 'आमचे अशिलाचे पर्यायी जागेत स्थलांतर न करताच त्याला घरातून हुसकवून लावणे होय'. हा प्रकार हा अधिकारांचा गैरवापर असून, कायद्याच्या नियमांचे व कोर्टाच्या सूचनांचे उल्लंघन ठरते. व याच कारणांस्तव त्या अधिकाऱ्यांचे हे वागणे हा कोर्टाचा अवमान ठरतो. याची माननीय कोर्टाने नोंद घावी "

न्यायाधीश दोन्ही बाजूंचे म्हणणे एकाग्रचित्ताने ऐकून घेतात. काही नोंदी करितात. आणि पुढील तारीख देतात...
"संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील तारखेस हजर राहावे." न्यायाधीश म्हणतात.
त्यावर वकिलीणबाई विचारतात,"त्याची आवश्यकता आहे काय ?"
"ह्या अधिकाऱ्यांचे यावर प्रत्यक्ष म्हणणे काय आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे." न्यायाधीश म्हणाले.

मी कोर्टात जाते. थोडं फार जे समजतं ते समजून घेते. परंतु, म्हाडाच्या वकिलीणबाईंचे तावातावाने बोलणे माझ्या समजुतीच्या पलीकडचे ठरते. त्या पेशाबद्दल माझ्या मनात अनेक प्रश्र्न उभे रहातात. वाटते...सामान्य नागरिकाला, म्हाडाचे हे अधिकारी विनाकारण इतका मनस्ताप देत असताना देखील ह्या म्हाडाच्या वकिलीणबाई हे असे कसे काय बोलू शकतात ? हे असले प्रसंग त्यांच्या स्वत:च्या बाबतीत घडले तरी देखील त्यांचे मत हे असेच राहील काय ? मी ह्या खेळात अजूनही मुरलेली नाही, हेच हे असे माझे सरळ व बरेचसे बावळट विचार दर्शवून देतात...मी तरीही फलटणकरांसमोर हे बोलून दाखवते. त्यावर फलटणकर हसून म्हणतात..."त्या बाई हे असेच म्हणणार ना...त्या म्हाडाच्या वकील आहेत...त्यांना हे पटो वा न पटो...त्याचा इथे काडीचाही संबंध नाही. त्यावर मी म्हणते, "पण जर हे त्यांना मनातून पटलेच नसते तर त्या इतक्या तावातावाने कोर्टात बोलल्या नसत्या...नाही का ?"

असो...पुढील तारखेची वाट बघावी...कारण त्यादिवशी 'कायद्याच्या गोष्टी आम्हांला सांगू नका'...असे उद्दाम बोलणाऱ्या तिवारी व राठोड ह्यांना मा. न्यायाधीशांनी कोर्टात येण्याचे फर्मावले आहे...

"आता काय होईल ?" मी फलटणकरांना विचारते.
"बघू..." ते उत्तरतात.

क्रमश:

14 comments:

Anonymous said...

माज आणि निर्लज्जपणा झळकत असेल ना वकिलीणबाईंच्या चेहर्‍यावर?

श्या...

Prof. Narendra Vichare said...

अनघा, वकिलीण बाईना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. त्या त्यांच्या पेशाशी आणि म्हाडाशी प्रमाणिक राहिल्या. ते त्यांचे कामच होते. त्याना त्याच बाबीचा पगार मिळतो.... वाईट वाटुन घेवु नकोस, मी किंवा फलटणकर साहेब जरी त्यांच्या जागी असते तरी मला किंवा त्यांना त्याच भूमिकेतून जावे लागले असते. कोर्टाच्या बाहेर त्यांच्या घरी किंवा देवळात जाऊन त्यांनी देवाकडे माफीही मागितली असेल.... परंतु त्याचवेळी म्हाडाचे अधिकारी मात्र "विकले" गेले होते, किंबहुना ते त्यांच्या पेशाशी व सरकारशी गद्दारी करीत होते असेच म्हणावे लागेल... त्यांना मात्र माफी नाही..... जोडे तयार आहेत...

Mandar Kulkarni said...

Santap yeto ashya lokancha.Pan hyanchyashi ladhayla tar hawech nahitar he kase thik hotil. kharch himmat aahe tuzyakade. Khup shikayala milat.

Anagha said...

:) आल्हाद, त्या त्यांचं काम अगदी पोटतिडीकेने करतात असंच म्हणायला हवं. आणि आपण आपलं काम तेव्हढाच आत्मविश्वासाने करायला हवंय. हो ना ?

Anagha said...

:) सर, तुम्ही किंवा फलटणकरांनी ह्या अशा प्रकारचा पेशाच स्वीकारला नसता....बघा विचार करून. जे काम करताना दर क्षणाला आपले इमान गहाण ठेवावे लागते असे काम तुम्ही स्वीकारले असते काय ? तत्वांसाठी खाडखाड भांडतांना मी ऐकलंय तुम्हांला सर. :)

Anagha said...

अगदी बरोबर बोललास तू मंदार. आणि ह्यात लढा छोटा वा मोठा नसतोच. कारण जेव्हा आपण करत असलेल्या चुकीच्या मार्गाला विरोधच होत नाही म्हटल्यावर समोरचा फोफावत जातो...म्हणजे आपणच त्याला खतपाणी घालतो. नाही का ?
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)

Shriraj said...

ह्या अशा लोकांमुळेच तर माणसा-माणसामध्ये संघर्ष होत असतो ना... प्रत्यकाने जर स्वतःला "मी तिथे असतो तर काय केले असते" असा प्रश्न विचारला तर जगातले अर्धेअधिक वाद मिटतील....

Prashant Ladi said...

Kharach Mhada madhe Khupach nirdhvaleli manse AHET. Samanya mansana Trass denya sathich te Tithe baslele astat.

हेरंब said...

OMG !! काय चाललंय काय हे ?? :((

Pankaj - भटकंती Unlimited said...

फलटणकर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर घेऊनच चालतात बहुतेक :-)
पण एक्दम सुसाट टर्निंग पॉइंट दिसतोय आता पुढल्या भागात.

Anagha said...

श्रीराज, खरंय... :)

Anagha said...

ह्म्म्म प्रशांत, निर्ढावलेली आहेत खरी ही माणसं...आपणच शेफारून ठेवलीयत ना पण !
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)

Anagha said...

हेरंबा, मला देखील लिहिताना असंच वाटतंय आता ! 'काय चाललंय तरी काय हे' ! :)

Anagha said...

पंकज, खूप आहे ना वाचायला ?! मला त्यातून जाताना कळत नव्हतं हा पण हे ! आता लिहायला घेतल्यावर कळतंय ! :)