नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 8 December 2011

म्हाडा आणि मी...भाग ४

 
जानेवारी महिना बिल्डरने आमच्या मार्गात अडथळे उभे करण्यात घालवला. व आम्ही अडथळ्यांचे पुरावे गोळा करत गेलो.
वाममार्गे जायचे तू ठरवलेस. आमचे पाणी बंद. वीज बंद. दारात दगड. काचा फुटक्या. स्वत:च्या वकिलातर्फे मला धमकावणीवजा निरोप.
ह्याने हरणारी मी नाही. उलट तू सामान्य नागरिकाची शक्ती ओळखत नाहीस...आणि त्याची सबळ जाणीव, तुला कायदेशीररित्या करून देणे हे सुजाण नागरिक म्हणून मी माझे कर्तव्य समजते.

१ फेब्रुवारी.
वकील नारायण व अॅडव्होकेट फलटणकर ह्यांनी विचारविनिमय करून कागदपत्र तयार केले होते. त्या दिवशी ते सर्व कागद, कोर्टात रीतसर दाखल केले गेले. इथे आमच्या रस्त्यातील दगड दूर झाले.
फुटक्या काचा तशाच राहिल्या. घर अंधारलेलंच राहिलं.

काही दिवस असेच गेले.
"दादरला एक जागा बघितली आहे. मॅडम, तुम्ही बघून घ्याल काय ?" बिल्डरच्या माणसाचा फोन आला.
"ठीक. कधी आणि कुठे ?"
आईच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर. मी चालत गेले तर अर्धा तास. आईने चालायचं म्हटलं तर पंचेचाळीस मिनिटं. मला त्या बिल्डींगच्या दारापाशी बिल्डरचा माणूस, सचिन भेटला. आता मात्र मी फलटणकरांना देखील बरोबर घेतलेलं होतं. पायऱ्या तुटलेली इमारत. चिंचोळे प्रवेशद्वार.
"हे खूप दूर आहे. मी तुम्हांला आधी देखील सांगितले आहे. आईला माझ्या शक्य नाही इतक्या दूर एकटीने रहाणे."
"अहो, चांगला रंग लावून घेतला आहे. लिफ्ट आहे, काय प्रॉब्लेम काय आहे ? आम्ही ह्या घरमालकाचे पैसे देखील दिले आहेत."
"त्याला मी काय करणार ? तुम्हांला प्रॉब्लेम समजून घ्यायचाच नाही आहे तर मी आता आणि काय बोलणार ?"
मी तिथून निघाले. ऑफिसला पोचायला उशीर झालेला होता. पाच लेटमार्क, सुट्टीचा एक दिवस वजा.

१२ मार्च.
मी ऑफिसमधून घरी परतले. घरात माझ्यासाठी वाट बघत होती, म्हाडाची नोटीस. सक्त ताकीद. ताबडतोब घर खाली केले जावे. दुसऱ्या दिवशी त्याला प्रत्युत्तर म्हणून हरकत पत्र मी पाठवून दिले. अतिशय विचारपूर्वक फलटणकर पत्र तयार करून देत असत. मी ऑफिसमध्ये बसून माझ्या हस्ताक्षरात लिहून काढत असे. तीन प्रती निघत. म्हाडासाठी एक, बिल्डरसाठी एक व एक आमच्यासाठी. न चुकता सर्व पत्रव्यवहार, व्यवस्थित रजिस्टर एडीने.

१६ मार्च.
मी ऑफिसमध्ये होते. फोन वाजला. मोबाईल सांगत होता...'माझं घर'. मी फोन उचलला.
"आई, आपल्या दारावर आत्ताच म्हाडाच्या माणसांनी येऊन काहीतरी मोठेमोठे पांढरे कागद चिकटवलेत ! का म्हणून त्यांनी माझ्या दारावर हे असं केलं....? मी नाही ठेवणार हे कागद असे माझ्या घरावर....हे सगळं थांबव तू आई...!!! ताबडतोब !" माझी लेक.
आईच्या घरापासून पाच मिनिटांवर असलेल्या माझ्या घरी म्हाडा येऊन पोचले होते. माझ्या मालकीच्या घरावर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी येऊन सात आठ कागद चिकटवले होते. आता घरातील माणसांवर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न चालू झालेला होता. मी घरी पोहोचेपर्यंत लेकीने पाणी घेऊन कागद खरवडून काढले होते...आणि तरीही काही पांढरे तुकडे शिल्लक होतेच. तिच्या लाडक्या घरावर झालेले हे अत्याचार सहन न होऊन लेक निघून गेली होती....कोण जाणे कुठे. मी आले त्यावेळी आमचे वॉचमन मला खालीच भेटले. "
"मॅडम, आज दोन तीन म्हाडाचे अधिकारी इथे आले होते...तुम्हांला काहीबाही बोलत होते...."
"काय म्हणाले ?"
"म्हणे सुशिक्षित असून देखील ही माणसे अशी वागतात...!"
"गोसावी....हे सगळं मला त्रास देण्यासाठी चालू आहे...दुसरं काहीही नाही...."
"हो. ते कळतं मॅडम..पण फारच मोठ्यामोठ्याने आरडाओरडा करत होते."

माझी लेक दुखावली. हे म्हाडाने फार वाईट केलं.
आता हे असंच नाही संपणार....
माझा निश्चय अधिक बळावला.

दुसऱ्या दिवशी फलटणकरांनी मला पत्र मेल केलं. मी लिहून काढलं. रजिस्टर एडिने पाठवून दिलं...
निषेध लेखी नोंदवला गेला.

काही दिवस उलटले आणि म्हाडाकडून उत्तर आले.
'प्रत्यक्ष सुनावणीस ५ एप्रिल ही तुम्हांला तारीख देण्यात आलेली आहे. त्यावेळी म्हाडाच्या ऑफिसमध्ये यावे. वेळ दुपारचे ३.'

५ एप्रिल उजाडला. अॅडव्होकेट फलटणकर व मी, आम्ही पावणे तीनला म्हाडा ऑफिसला पोचलो. तिथे आमच्या आधीच म्हाडा अधिकारी श्री. तिवारी ह्यांच्या खोलीत सुरज डेव्हलपर्सचे वकील वर्मा व त्यांचे चार अधिकारी हजर होते. म्हाडाचे एक लेखनिक माझ्या डाव्या बाजूला कागद व पेन घेऊन बसलेले होते. बैठकीची नोंद लिहून घेण्यास. एक तिवारी व वर्मा, सोडल्यास एकजात मराठी माणूस...सर्व म्हाडा व बिल्डरचे नोकरदार. अॅडव्होकेट फलटणकरांनी बैठकीच्या सुरुवातीलाच वकील वर्मा व बिल्डरची माणसे ह्या बैठकीला हजर असण्याबाबत विरोध दर्शवला. श्री. तिवारी. काळसर पोट सुटलेला, निबर माणूस. नाकावरील चष्म्यातून दिसणारे बारीकसे डोळे. पोट पुढे काढून चालण्याची ढब. समोरच्यापेक्षा आपल्याला अधिक कळतं...किंवा समोरच्याला अजिबातच काही कळत नाही असा एक भाव कायम चेहेऱ्यावर भाव पसरलेला.
"उससे क्या होता है...ऐसा कुछ नही...वो वकील है...आप अपना घर खाली नही कर रहे है....उससे उनको तकलीफ हो रही है...इसलिये वो आये है....आपको objection है तो वैसा हम minutes of the meeting मे लिख देते है...कोई प्रोब्लेम नही है..." लेखनिकाकडे नजर टाकून..."लिख लो आप...उनका objection है ऐसा लिख दो..."
"तुम्ही जे आम्हांला ह्या मिटिंगला येण्यासाठीचे पत्र पाठवलंत त्यात खाली CC to builder असे कुठेही लिहिलेले नव्हते...नाहीतर आम्हीही आमच्या वकिलांना घेऊन आलो असतो  ह्या मिटींगला...नाही का ?"
"क्या अब येही लेके बैठना है...या आगे बात करें ?" तिवारी.
तुला मराठी नाही येत का...मग तर मी तुझ्याशी मराठीतच बोलणार...मी देखील हट्टाला पोचते. तिवारी हिंदीत...फलटणकर समजूतदार व चाणाक्ष अॅडव्होकेटसारखे हिंदीत...व मी माथेफिरू बाईसारखी शुद्ध मराठीत...अशी ती बैठक सुरु झाली.
"देखिये तिवारी साब, अब सिर्फ ये tenant बाकी रह गये है...और उनके कारण काम आगे हो नही पा रहा है....सबका इसमे नुकसान हो रहा है....ये बात ध्यान में लेनी चाहिये..." वर्मा.
"मला वाटतं आमच्यामुळे फक्त काही महिने गेले आहेत...त्या आधी दहा वर्षांपूर्वी सर्वांच्या स्वाक्षऱ्या होऊन देखील काम सुरु केले नाही त्याचं काय ? त्यावेळी बिल्डरने ३ वर्षांत नवीन घराचा ताबा देऊ असे सांगितले होते !" मी संधी सोडत नाही.
"देखो...अब ये सब बातें पुरानी हैं...अब काम चालू हो रहा है...तो आपको वो देखना चाहिये....अब आप क्यों काम रुकवा रही हैं ?" तिवारीला मराठी कळतं. लेखनिक बाजूला मिनिटे टिपून घेण्याच्या प्रयत्नात. वर्मा व तिथे उपस्थित एकजात सर्व मान डोलावत.

पाऊण तास बैठक चालली.
तिवारीने आपण अतिशय सुंदररित्या भाडेकरू व बिल्डर ह्यांत मिळवणी केली आहे अशी एक हवा त्या खोलीत केली. फसवी. ढोंगी. तोंडदेखलेपणाने त्याने वर्मा व बिल्डरच्या माणसांना सांगितले..."आप देखो, उनको जैसे चाहिये वैसे पास में किधर तो जगह दे दो..." "और आप को थोडा थोडा कॉपरेट करना चाहिये...देखो, हम म्हाडावाले आपकी मदद करना चाहते है..." हे आम्हांला. यावर, "आम्ही ह्यांच्यासाठी एक जागा बघून ठेवली आहे...त्यांना ती दाखवली देखील आहे...आता दुसरी जागा बघणे आम्हांला शक्य नाही...कारण आम्ही ह्या जागेचे डिसेंबरपासून पैसे भरले आहेत...फार तर आता त्यांनी तिथे जावे व नंतर पुढच्या वर्षी आम्ही त्यांना दुसरी जागा देऊ. म्हाडानेच उलट त्यांना त्या जागी जावयास सांगावे." वर्मा.

म्हाडाने बैठकी अखेरीस काय निर्णय ऐकवला ?
"जो अब बिल्डर बोल रहें है वहाँ आप अपना सामान शिफ्ट कर दो...बाद में वो बोल रहें है...तो जहां आपको चाहिये वहा जगह वो दे देंगे...आप को उनपे विश्वास दिखाना चाहिये.... आपकी हम मदद ही कर रहें है...पर आप कॉपरेट करो...नही तो कोई सोलुशन नही निकलेगा......" खुर्चीत कधी मागे रेलून कधी पुढे येऊन...उजवा हात टेबलावर पुढेमागे करत...वारंवार वर्माकडे नजर टाकीत...तिवारी.

पुढल्या पाचव्या मिनिटाला आम्ही तेथून निघालो. ढोंगी तिवारीमुळे मी संतापून. फलटणकर विचारात गुंतून.

५ एप्रिलला झालेली सुनावणी लेखी माझ्या हाती पडली तारीख १८ एप्रिल.

'तुमचे सोयीच्या पर्यायी जागेची मागणी ही अयोग्य असून बिल्डर जी जागा देऊ करीत आहे, ती जागा म्हाडाने नजरेखालून घातली आहे व ती रहाण्यास पूर्णत: योग्य व सोयीची आहे. तेव्हा त्वरित तुमचे सामान हलवून घर रिकामे करावे.'

तोंडी सुनावणी व लेखी अहवाल ह्यांत तफावत.
बिल्डर व म्हाडा युती...ह्याचा एक पुरावा.
क्रमश:

8 comments:

Aakash said...

तिवारीची तर ऐशी-तयशी!

Shriraj said...

तुझ्या मुलीच्या मनात आलेल्या भावना अगदी अगदी नैसर्गिक होत्या ... मी तुझा मुलगा असतो तर अगदी असाच react झालो असतो..

अनघा, आता उत्कंठा शिगेला पोहोचलेय गं... पुढे काय झालं

Prof. Narendra Vichare said...

अनघा, तुझ्या जागी मी असतो तर वेगळ्याच म्हणजे आमच्या " परळ style " ने react झालो असतो आणि पायावर धोंडा मारून घेतला असता..... तुझ्या समर्थनार्थ मान डोलावणाऱ्या त्या किरकोळ शरीर यष्टीच्या सदगृह्स्थाचे नाव विचारायचे तू विसरलीस हे त्यांच्या दृष्टीने उत्तमच झाले. आता अशा सदहृदय "नोकरदार" व्यक्तींचा उल्लेख करणे टाळशील तर बरे होईल. अन्यथा त्यांच्यावर कार्यालयीन कार्यवाही करण्यासही म्हाडाचे अधिकारी मागेपुढे पाहाणार नाहीत....

हेरंब said...

कशी पद्धतशीर मिलीभगत आहे चोरांची !!

Anagha said...

आकाश, :)

Anagha said...

मला कळतंय ते श्रीराज... :)

मी खरोखर प्रयत्न करतेय हा श्रीराज, पटापट लिहिण्याचा. :)

Anagha said...

सर, तुमची 'परळ स्टाइल' चांगली ओळखीची आहे माझ्या ! :) :)

Anagha said...

हेरंबा, आहे खरी ही धोकादायक युती !