नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 6 December 2011

म्हाडा आणि मी

२१ ऑक्टोबर २०१०. 
मी दिवस उरकला होता. ऑफिसमधून घरी परतले होते. शिरल्याशिरल्या डाव्या हाताला चपला बुटांचे कपाट आहे. त्यावर एक बसकी टोपली आहे. आलेला पत्रव्यवहार रोज हा त्या टोपलीत जाऊन पडावा असा घराचा एक शिरस्ता आहे. त्या दिवशी असाच एक लिफाफा टोपलीत बसला होता. मी व्यवस्थित कात्रीने कोपऱ्यावर कापला व आतील कागद बाहेर काढले. हे पत्र काही वेगळे होते. न कळणारे. कायद्याची भाषा बोलणारे. काही वर्षांपूर्वी एक केस दमाने चालवली. परंतु, त्याचा अर्थ असा अजिबात होत नाही की आता ह्यापुढे दारी येणारा प्रत्येक कायद्याचा कागद मला कळू लागेल. गोंधळून जाणे ह्यापलीकडे काहीही होत नाही. वर छापलेलं नाव कळत होतं. सुरज डेव्हलपर्स.
अॅडव्होकेट फलटणकरांना दूरध्वनी लावला. जमेल तसे कागद वाचून दाखवले.
ती नोटीस होती. घर रिकामे करून बिल्डरच्या ताब्यात देण्याची.

माझ्या घरापासून काही मिनिटांच्या अंतरावर आईबाबांचे घर आहे. १९६० साली त्यांनी ते पागडीवर घेतले होते. घर मालक श्री. कवळी ह्यांच्याकडून. २००० साली कवळींनी, इमारत जुनी झाल्याकारणाने ती बिल्डरच्या ताब्यात देऊन त्यावर नव्या ढंगाची इमारत बांधण्याचा घाट घातला. इमारत उंच नेली तर आमच्या समोर समुद्र आहे. म्हणजे इमारतीने मान उंच करून समोर नजर टाकावी तर तिला दिसेल अरबी समुद्र. खाली गळ्यात एखादा गोफ असावा तशी अर्धवर्तुळाकार फिरणारी वाडी देखील कवळींनी बिल्डरला विकली.
एकेक करून मालकाने वाडी व आमची इमारत रिकामी करावयास घेतली. काहीजण तातडीने निघून गेले. तर काही बरीच वर्षे होते. करता करता दहा वर्षे उलटली होती. बरीच माणसे निधन पावली. इमारतीची मान अधिकाधिक उंच करता यावी, म्हणजेच अधिकाधिक FSI मिळावा ह्याकरीता बिल्डर काम सुरु करत नव्हता. भाडेकरुंना तो इतरत्र घरे देत होता. त्या त्या घरांची भाडी तो भरत होता. 
२०१० साल उजाडले. आम्ही मात्र तिथून निघालो नव्हतो. आईचे सामान अजूनही त्या घरात होते. 
बिल्डरकडे आमची मागणी एकच होती. आमच्या ऐंशी वर्षाच्या आईला, तिच्या घराच्या जवळपासच जागा मिळावी. तिला तिच्या सवयीच्या परिसरापासून ह्या वयात दूर राहावे लागू नये.

माणसाला त्याचे स्वत:चे हक्काचे घर असावे. त्यातून आईने मोठ्या हिंमतीने संसार केलेला. मग तिला उचलून दूर कुठे नेऊन ठेवावे चूक होते.
तिने त्या घरी एकटे रहावेच कशाला ? आजी नाहीतरी मुलींकडेच तर रहातात. मग करायचे काय त्यांना ह्याच परिसरात घर ? हा मुद्दा बिल्डरचा.
दूर घर घेऊन तिला तिथे रहाताच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणे काय योग्य होते ? तिने ठरवावे तिला कधी, किती दिवस आणि कोणत्या मुलीकडे रहावयाचे आहे. परंतु, स्वत:चे घर दूर असल्याकारणाने, आता जबरदस्तीने कुठल्या ना कुठल्या मुलीकडे रहाणे तिला भाग का बरे पडावे ? तिच्या स्वाभिमानाला मी काय म्हणून ठेच पोहोचवावी ? हा माझा मुद्दा. बिल्डर घरे दाखवत होता. मी त्याच्या माणसांबरोबर गल्ल्यागल्ल्या इमारतीइमारती फिरत होते. परंतु, एकही जागा ती जिथे रहात होती त्या परिसरात वा ऐशी वर्षाची बाई राहू शकेल अशी नव्हती. ह्या सर्वात कालावधी उलटून जात होता. २००० ते २०१० इतकी वर्षे फक्त वाढीव क्षेत्र मिळावे ह्याकरता बिल्डरने वाया घालवली होती. परंतु, आता उलटून जाणारा वेळ हा एका भाडेकरू कारणे होता. दुखणे हे होते. बिल्डरसाठी.

माझ्या हातात असलेली नोटीस काय म्हणत होती ?
'पुढील दहा दिवसांत आम्हीं जी कोणती जागा देऊ ती जागा घ्या व घर रिकामे करा. अन्यथा, तुम्हांला म्हाडा कडून घराबाहेर काढण्यात येईल.'
ह्या नोटिशी पाठोपाठ मुंबईतील एकजात सर्व सिटी सिव्हील कोर्ट ते हायकोर्ट, या सर्व ठिकाणी आमच्या विरोधात 'क्यावेट' (caveat) दाखल केले गेले असल्याचे कागदपत्र एक दिवसाआड दारी येऊन पडू लागले.

२६ ऑक्टोबरपासून कोर्टाला ३ आठवडे दिवाळीची सुट्टी लागत होती. त्यामुळे आम्हांला कोर्टाकडे ह्या विरुद्ध दाद मागणे कठीण जावे. म्हाडा जबरदस्तीने बाहेर काढेल ह्या भीतीने आम्हीं घर रिकामे करावे.
असा बिल्डरचा कावा.
कोल्हा.

क्रमश:

12 comments:

हेरंब said...

पुढे? मोठ्या पोस्ट्स टाक ना. गेल्यावेळेसारखीच तुफान लढाई होणार आहे हे दिसतंच आहे :)

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

नेमक्या याच कारणासाठी माझादेखील वाद सुरू आहे. तू जे जे लिहिलं आहेस, त्या सर्वांतून मीदेखील जाते आहे. त्यामुळे तुला काय वाटत असेल, हे समजू शकते.

Suhas Diwakar Zele said...

आयला... हे भलतंच प्रकरण दिसतंय :(

Unique Poet ! said...

पुनश्च हरिओम... म्हणायचे का ? :)

वर्षभरापुर्वीचीच केस दिसतेय... अजुन चालू असेल का...? अर्थात कोणत्याही बाजूने तडजोड झाली नसेल तर... !

Anagha said...

हेरंबा, लिहितेय लिहितेय...अरे, सगळं इतकं गुंतागुंतीचं आहे ना....घडामोडींचं ...ते जरा नीट क्रमवार लावावे लागतेय ना...म्हणून जरा वेळ लागतोय... :)

Anagha said...

कांचन, मला आशा आहे की तुझा लढा लवकर संपेल व तू जिंकशील.... :)

Anagha said...

सुहास, म्हाडा आणि बिल्डर...म्हणजे प्रकरण तसं लढाईचच ! :)

Anagha said...

समीर, विषय तुझा आहे....कदाचित त्यामुळे तुला वाचताना त्यातील खाचाखोचा अधिक समजत असतील...हो ना ? :)

Shriraj said...

ते म्हणतात ना "युद्धस्य कथा रम्या"... तसंच काहीसं मला वाटतंय.

Anagha said...

श्रीराज, :)

Anonymous said...

आज वाचतेय माहितीये ह्या पोस्ट्स.... भाग १,२ ,३ ... संपू देत म्हटलं लिहून...
तूला पिडलं असतं नाहीतर की लिही लवकर म्हणून... यावेळेस स्वत: वाचायची थांबले...

आज एका दमात सगळे भाग वाचून काढते!!!

Anagha said...

मला वाटलेलंच की तन्वी कुठे हरवली...? :)