२७ एप्रिल ११
बुधवार.२५ तारखेला कोर्टाने सामान्य नागरिकाचे ऐकले व तसा निर्णय दिला. म्हणून काय सुटकेचा एक श्वास घेता आला ?
"अनघा, आपण आज म्हाडाच्या ऑफिसला जाऊ."
"हो ? का ते ?" मी फलटणकरांना विचारले. मी ऑफिसमध्ये काम करीत होते.
"दुपारी मी येतो. आपण जाऊ तिथे." शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची होती बहुधा.
दुपारी फलटणकर एक पत्र घेऊन आले. तयार पत्र. म्हाडाने व बिल्डरने कोर्टाच्या मतांचे व आदेशाचे बाहेर जाऊन कोणतीही वेडीवाकडी कारवाई आमच्या विरुद्ध करू नये म्हणून कोर्टाच्या आदेशाची प्रत व आम्ही पर्यायी जागेची निश्चिती केलेली असून ती जागा १ मे २०११ पासून आमच्या ताब्यात मिळू शकते ह्या मजकुराचे पत्र.
"पण, त्या म्हाडाच्या वकिलीणबाई होत्या ना तिथेच ! एव्हढा आरडाओरडा करीत ? मग आता कशाला आपण पुन्हां जाऊन तेच ते सांगायचं त्यांना ?"
"सही कर आणि निघ."
मी सही केली. आम्हीं निघालो म्हाडाच्या ऑफिसला.
तिवारींच्या खोलीत. तिवारींसमोर.
फलटणकरांनी त्यांच्या समोर आम्हीं आणलेले पत्र धरले. तिवारींनी एक ओझरती नजर टाकली त्यावर.
"इसकी कोई जरुरत नाही. ये क्यों दे रहे हैं आप हमको."
"कोर्ट कि ऑर्डर निकली हैं. और हमने एक घर देखा हैं. पैसा देकर निश्चित भी करके रखा हैं. हमको वो एक तारीख से मिल रहा हैं....तो ये सब हमे आपको बताना चाहिये न...इसलिये ये लेटर..." फलटणकर.
"हा तो मालूम हैं ये सब हमको...लेटर देने कि क्या जरुरत....ये लेटर बिल्डर को जाके दे दिजीये...."
"वो भी कर रहे हैं हम...." फलटणकर.
"हा...तो वो किजीये....हमें जरुरत नही हैं इस लेटर कि...."
तिवारी पत्र घ्यायला तयार होईनात. फलटणकर शांत होते. आम्हीं तिथून बाहेर पडलो.
"अनघा, हे पत्र म्हाडाकडे पोचलंच पाहिजे."
"पण ते घेत नाहीयेत ना....आणि ते पोचायलाच पाहिजे असं का वाटतंय तुम्हांला ?"
"काहीतरी गडबड आहे....दगाफटका होईल असं वाटतंय मला...."
"म्हणजे ?" माझे हातपाय थरथरू लागतात....श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो....
"थांब...तू जा ऑफिसला...मी बघतो काय करायचं ते..."
अर्ध्या तासात फलटणकरांचा मला फोन येतो. "म्हाडाला ते पत्र पोचल्याची पोच मिळाली."
"मिळाली ? कशी ? घेतलं त्यांनी आपलं पत्र ?"
२८ एप्रिल.
गुरुवार.
तेच पत्र म्हाडा व बिल्डरला रजिस्टर एडीने पाठवून दिले.
२९ एप्रिल.
शुक्रवार.
शांतता.
...वादळापुर्वीची ?
३० एप्रिल
शनिवार.
"तू जी जागा निश्चित केली आहेस त्या जागेचा पत्ता व त्या घरमालकाचे नाव मला एसेमेस कर." फलटणकरांचा सकाळीच फोन आला.
"काय झालं ?"
"झालं काही नाही...पाठव एसेमेस"
थोड्याच वेळात फलटणकरांनी त्या जागेचा भाडेकरार तयार केला व बिल्डरला इंटरनेटद्वारा पाठवून दिला.
शनिवारी माझ्या डोक्यावर भरमसाठ कामे असतात. वाणी, बॅंका, हे बिल ते बिल...वगैरे वगैरे. ती कामे करीत मी फिरत होते.
"आई, म्हाडाची माणसं आलीयत. त्यांनी तुला जागेवर बोलावलंय. " घरून लेकीचा फोन आला.
मी फलटणकरांना फोन लावला. त्यांच्या कानावर हे घातलं.
फलटणकरांनी तिवारींच्या हाताखालचे अधिकारी, श्री.राठोड ह्यांना फोन लावला. त्यांच्यात घडलेला संवाद हा असा....
"काय झालं...जागेवर का आलायत तुम्ही ?"
"व्हिझीट द्यायला आलोय. मॅडमना बोलावून घेतलंय इथे."
"तुम्हीं कुठलीही पूर्वसूचना न देता आलेला आहात. मी मुंबईबाहेर आहे...मॅडम देखील बाहेर आहेत...हे असं अचानक येण्यामागचा हेतू काय ?"
"काही नाही हो....व्हिझीट द्यायला आलोय फक्त."
फलटणकर मला फोन करतात.
"अनघा, ते व्हीझीटला आलेत."
"मग मी जाऊ का तिथे ? माझी कामं आटपत आलीयत..."
"बघ...जमलं तर जा..."
का कोण जाणे, माझी गाडी आईच्या गल्लीत वळते. गल्लीच्या पार दुसऱ्या टोकाला आईचं घर आहे. पण, गल्लीत शिरता शिरताच मला काहीतरी गडबड असल्याची जाणीव होऊ लागते....स्टीयरिंग व्हीलवरचा माझा हात थरथरू लागतो. जन्माला आल्यापासुनची ही माझी गल्ली...काही तरी विपरीत घडणार असण्याची धोक्याची घंटा ती माझ्यासाठी वाजवू लागते...
पोलिसांच्या गाड्या, म्हाडाचे टेम्पो....पोलीस....महिला पोलीस....गर्दी....आमची गल्ली भरून गेलेली.
मी माझी गाडी बाजूला लावली. उतरले आणि पुढे गेले.
अनोळखी....असंख्य अनोळखी माणसे...चारपाच गाड्या...अनोळखी चेहेरे...भीतीदायक चेहेरे...बाबा ज्या दिवशी गेले त्या दिवशी आमची गल्ली भरून गेली होती....सगळ्या आप्तांनी...गर्दी तशीच होती...मात्र असंख्य अनोळखी चेहेऱ्यांनी भरलेली. बेदरकार चेहरे.
मी इमारतीच्या आवारात शिरते. सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळतात. इमारतीच्या दरवाजातून तिवारी बाहेर पडतात. मागे राठोड. चार पाच पोलीस इन्स्पेक्टर, साध्या गणवेशातील पोलीस. खाकी साडीतील महिला पोलीस. बिल्डरचे अधिकारी...त्यातील एखाददुसरा चेहेरा ओळखीचा.
"काय झालं ?" मी राठोडना विचारते. तिवारी माझ्या उजव्या बाजूने पुढे निघून जातात.
"सीलबंद केलंय आम्हीं तुमचं घर..."
"सीलबंद केलंय ? म्हणजे ?"
"आम्हीं आलो तेव्हा घर बंद असल्याकारणाने, आमची नोटीस तुमच्या दाराला चिकटवलेय आणि घर सीलबंद करून टाकलेलं आहे."
"पण असं का केलंत तुम्हीं ? कोर्टाची ऑर्डर माहितेय ना तुम्हांला ? आणि घर बंद होतं म्हणजे ? आमचं पाणी, वीज तोडलेलं असताना...आणि अर्धी बिल्डींग पाडलेली असताना... रहाणार कशी आहे माझी आई इथे ? " मी फलटणकरांना फोन लावता लावता राठोडांना विचारते.
"ओ ! त्या कोर्टाच्या गोष्टी नका सांगू हो आम्हांला ! आणि तो फोन ठेवा बाजूला ! आमच्याशी बोलताना फोनवर बोलायचं काम नाही !"
"म्हणजे ? तुम्हांला कायद्याच्या बाबी सांगायच्या नाहीत ? मग कसल्या गोष्टी सांगू तुम्हांला ? आणि काय म्हणून मी आमच्या वकिलांना फोन लावायचा नाही...?"
"आमच्याशी बोलताना वकिलाला फोन लावायचा नाही ! बस्स !" उद्धट स्वरात राठोड.
सगळी गर्दी आता आमच्या आसपास एकवटलेली असते. माझ्या बाजूला पोलीस इन्स्पेक्टर. "साहेब, हे काय आहे ?" मी त्यांना विचारते.
"आम्हांला काहीही माहित नाही मॅडम. आम्हांला ऑर्डर दिली, आम्हीं आलो."
तिवारी दृष्टीआड.
"सोमवारी आम्हीं इथे येऊ. सील उघडू. सामान बाहेर काढू...आणि जी बिल्डरने जागा बघितली आहे तिथे तुमचं सामान नेऊन टाकू !" राठोड.
"हे असं कसं करू शकता तुम्हीं ? कोर्टाची ऑर्डरच आहे मुळी की योग्य कायदेशीर प्रक्रियेशिवाय आमच्या घराचा ताबा तुम्हीं नाही घेऊ शकत...!"
"बाई, आम्हीं काय करू शकतो ते कळेलच तुम्हांला आता..."
राठोड नाहीसे. गर्दी विरळ.
मी तिथेच एका दगडावर बसते. फलटणकरांना फोन लावते.
"मी ठाण्याहून निघालोय अनघा. येतोय तिथे. तू थांब तिथेच."
मी खालीच दगडावर बसून रहाते. डोकं गरम झालेलं आहे. श्वास घेणं अवघड...
...माझा तमाशा...म्हाडाने आज माझा तमाशा केला...माझ्याच गल्लीत...माझ्याच घराखाली...हे घर विश्वास पाटलांचं आहे...म्हाडाच्या लक्षात आलेलं नाही पण हे घर विश्वास पाटलांचं आहे....विश्वास पाटलांच्या घराला म्हाडाने सील लावलं....ह्या असल्या धमकावणीला पाटील भीक घालत नाहीत...मी विश्वास पाटलांची मुलगी आहे...मी ही अशी हार मानत नाही...म्हाडा...तुम्हीं...हे करायला नको होतं...
क्रमश:
19 comments:
एका दमात ६ भाग वाचून काढले... :) हाणामारी.. च्यामारी..
साष्टांग दंडवत... :)
तुझा लढा बघून एक गोष्टा राहून राहून वाटते... तुझी इच्छाशक्ती आणि तुझ्या वडिलांची पुण्याई फार दांडगी आहे... की तू अशी घडलीस... तुला अॅड. फलटंकरांसारखे वकील मिळाले.
जिथे कोणती ही सामान्य व्यक्ति दबून गेली असती तिथे तुझा मुजोर सरकारी यंत्रणेविरुद्धचा हा लढा सर्वांसाठी एक प्रेरणासतोत्र आहे!
तायडे, वाकुन मुजरा यार...
त्रिवार मुजरा !
अनघा.
सहा ही भाग एका दमात वाचून काढले. तू आत्ता ज्या मन:स्थितीत आहेस, त्याची कल्पना आली. हे सगळं जरी होउन गेलेलं असलं, तरी अशा प्रसंगांचे ओरखडे किती खोल उठतात, ते माहीत आहे. त्यांना भिउन बरेचदा माणसं माघार घेतात, मान तुकवतात. तू तशी नाहीस हे तुझ्या लेखनावरून एव्हाना कळलं आहेच.
पुढे काय झालं याची उत्कंठा आहे, असं म्हणायचं धाडस नाही गं होत. कारण तुझ्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला या निबर मनाच्या माणसांनी दिलेला अनंत प्रकारचा त्रास, असाच त्याचा गोषवारा असणारे. त्यामुळे या प्रकरणाची अखेर काय झाली, आणि त्या सर्व चोरांच्या टोळीचे पराभूत चेहरे तुझ्या नजरेला कसे दिसले ते सांगणाऱ्या लेखाची वाट बघेन. (..असंच घडलंय नं?)
या प्रकरणात तू जे काही भोगलंयस त्याला तोड नाही.. हल्ली मी सोनी टीव्ही वर क्राईम स्टोरी पाहातो. आता माझ्या डोळ्या समोर अशीच क्राईम स्टोरी तरळतेय..... एकदा तुझ्या ह्या प्रकरणाचा "फायनल" सोक्ष मोक्ष लागू देत. मग बघच कसा बार उडवून देतो ते... तू फक्त तुला आवडेल त्या वर्तमान पत्राचे नाव मला सांग आणि पुढची जबाबदारी माझ्यावर सोपव... यांना नागडे केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही... वराती मागून... का होईना... परंतु तेव्हढाच आपला खारीचा वाटा...
सेनापती ! :)
परंतु "आर्य चाणक्य" यांचा आधी सल्ला घेऊ. नंतरच पुढची कार्यवाही...
काय माहित नाही रे धवल...एकेक घडत जातं आणि मी तोंड देत रहाते...त्या त्या वेळी प्रसंगांची तीव्रता मला पण जाणवत नाही की काय कोण जाणे...नंतर हे असं लिहायला बसते आणि सगळंच अंगावर यायला लागतं...मग जाणवतं की हे सगळं तुम्हां सर्वांना सांगायलाच हवं...कोणावरही हे असले प्रसंग येऊ नयेत पण दुर्दैवाने आलेच तर निदान कल्पना तरी असावी की काय आणि कुठे आपल्याला त्रास होऊ शकतो...हो ना ?
बाबांची पुण्याई मला खूप मोठमोठ्या प्रसंगांतून तारून नेते. आणि फलटणकरांसारखी माणसे सर्वांच्या पाठीशी उभी राहोत...व अशा हुशार माणसांची समाजातील आकडेवारी देखील वाढो. :)
धन्यवाद रे प्रतिक्रियेबद्दल.
विशाल, मुजरा फलटणकरांना... :)
मीरा, लवकर लवकर लिहिण्याचा प्रयत्न आहे....अजून बहुधा २ ते ३ भाग होतील.
मला प्रश्र्न पडतो, की माणसं जन्मात:च तर अशी असू शकत नाहीत...मग ही अशी बनली त्याला कारण काय ? समोरचा माणूस बिनतक्रार अन्याय सहन करतोय असे म्हटल्यावर, अन्याय करणाऱ्या माणसाचे मनोबल नक्कीच वाढत असेल...नाही का ? म्हणजे मग अन्याय सहन करून, आपण फक्त स्वत:चे नुकसान करत नाही...तर आपण समाजाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतो....नकळत. हो ना ?
आभार गं प्रतिक्रियेबद्दल.
सर, माझ्या आयुष्यात तुम्हांला फार मोठं स्थान आहे....बाबांनंतर 'बीज'चे माझे गुप्ते सर आणि तुम्हीं, हे दोन माझे मोठे आधार आहेत...माहित आहे ना हे तुम्हांला. :)
आणि सर, बघू, आर्य चाणक्य काय म्हणतात ते. :)
"..हे घर विश्वास पाटलांचं आहे...म्हाडाच्या लक्षात आलेलं नाही पण हे घर विश्वास पाटलांचं आहे....विश्वास पाटलांच्या घराला म्हाडाने सील लावलं....ह्या असल्या धमकावणीला पाटील भीक घालत नाहीत...मी विश्वास पाटलांची मुलगी आहे...मी ही अशी हार मानत नाही...म्हाडा...तुम्हीं...हे करायला नको होतं..."
बघा तुम्हीच प्रूफ दिलंत तुम्ही कोण आहात याचं... needless to say anything more now!
respect...
च्यायला त्या तिवारी आणि राठोडच्या.. सोलून काढलं पाहिजे चांगलं !! पटकन टाक पुढचा भाग !
आल्हाद... :)
हेरंबा, काय मस्त वाटतं ना कधीतरी कोणाला तरी शिव्या घातल्या की ! मी पण शिकलेय आता मस्तपैकी !!! :p :D :D
माते मानलं तुम्हा दोघांनाही.... _/\_
खरय आणि सडकून शिव्या घालता आल्या पाहिजेत... आणि त्याचा गिल्ट वगैरे काही यायला नकोय... निदान समोरच्याची लायकी दाखवता तरी आली पाहिजे!!!
आणि हो ते श्वास लागणं, जे लिहीतेयेस नं दर लेखात अक्षरश: मलाही तेच होतेय हे वाचताना!!!
तन्वे... :)
Post a Comment