नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 29 December 2011

असे का बरे ?

परवा काही वेगळीच माहिती कानी आली. आता ती इथे टाकायची म्हटलं तर सर्वात आधी म्हणायला हवे की ही पोस्ट पूर्णत: ऐकीव माहितीवर आधारित आहे. चला...तसेच समजा. पण मला ही माहिती नवीन होती...बहुधा तुमच्यासाठी ती जुनीच असेल. खात्रीलायक मित्राने हे सांगितलं. आणि माझ्या माहितीत भर घातली.

मी फार काही कवितांची पुस्तकं वाचत असते असे अजिबात नाही. म्हणजे खरं तर अजिबात वाचत नाही असेच म्हणावयास हवे. फक्त तसे जागतिक स्तरावर एकदम कबूल करणे जरा जडच जाते ! तर, कविता असे म्हटले की सर्वात प्रथम माझ्या डोक्यात काय येते ? तर 'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे...घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे...' आणि बहुतेक ज्या काही कविता आठवतात त्या सर्व बालभारतीतल्या. कवितेचे रसग्रहण करावयाचे म्हटले की त्या कवितेच्या खोल गाभ्यात शिरावे व त्यातला 'स्वत:ला समजलेला अर्थ' मांडावा...हे असे कधी होई ? म्हणजे 'स्वत:ला' कळलेला अर्थ मांडण्याचे स्वातंत्र्य कधी बरं असे ? मराठीची प्रश्र्नपत्रिका सोडविताना, जेव्हा एखादी नवी कविता देऊन तिचे रसग्रहण करावयास सांगितले जाई त्यावेळी. आणि फक्त त्याच वेळी. इतर वेळी मात्र बालभारतीतील कवितेतील गर्भित अर्थ, मराठीच्या बाई समजावून सांगत व तो पाठ करून मी उत्तरे लिहित असे.
माझ्या बाबतीत, नेहेमीच मी 'गाणी' प्रथम ऐकते व त्यामुळे ती 'कविता' मला माहिती होते. म्हणजे जी काही चाल लावली गेली असेल, ज्या प्रकारचे संगीत दिले गेले असेल, त्या हिशोबात मी ठरवून टाकत असे...की हे प्रेमगीत आहे वा ह्यात विरह आहे. गंभीर व खोल अर्थांच्या कविता लिहिणारे आरती प्रभू मला माहित झाले ते मुळातच 'समईच्या शुभ्र कळ्या...' मधूनच. आणि त्यांची एकही कविता दहावीपर्यंतच्या माझ्या बालभारतीत नव्हती. त्यामुळे पुन्हां माझे ज्ञान हे तेव्हढेच. आणि त्यामुळे त्यांच्या गूढ कवितांचे रसग्रहण आमच्या मराठीच्या बाईंकडून शिकवून, समजून घेण्याचा कधीही प्रश्र्न उद्भवला नाही. आणि आम्हीं नेहेमीच परीक्षेत गुण मिळवण्यासाठी शिकतो...त्यापलीकडे जाऊन अभ्यास करण्याची आपल्यात पद्धत नाही. नाही का ?

'निवडुंग' चित्रपट. अतिशय सुंदर गाणी...अप्रतिम संगीत...मधुर...सुमधूर...पुन्हा पुन्हा ऐकत रहावी अशी गाणी.

'आठवणीतील गाणी' ही मराठी गाण्यांची साईट माझ्या मॅकवर कायम चालू असते. घरी...ऑफिसमध्ये. परवा देखील मी त्यावर 'भय इथले संपत नाही' ऐकत होते. कविता ग्रेस ह्यांची, स्वर लता मंगेशकरांचं आणि संगीत हृदयनाथ मंगेशकरांचं. तेव्हढ्यात माझा एक मित्र माझ्या टेबलापाशी आला.
"मला ना कवी ग्रेसांच्या कविता अजिबात कळत नाहीत." तो म्हणाला.
"अरे, पण त्यांनी स्वत: सांगितलंय...की त्यांच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही...तुला आणि मला त्यांच्या कविता नाही समजल्या तरीही....!" मी एकदम स्वत:ची पायरी ओळखून बोलून गेले.
मित्र हसला. हा माझा मित्र स्वत: कविता करतो. आणि कविवर्य कुसुमाग्रजांवरील नाशकात होणाऱ्या एका कार्यक्रमात त्याच्या स्वरचित कविता वाचण्यासाठी त्याला आमंत्रित देखील केले गेले आहे.
"तुला एक गंमत सांगू ?" तो म्हणाला.
गंमत सांगण्यास मित्राने सुरुवात केली. आणि त्या गंमतीचा शेवट मी चकित, चाट व विचारात पडण्यात झाला.
"अगं, नाशिकला मध्ये एक कार्यक्रम झाला. तिथे कवी ग्रेस, हृदयनाथ मंगेशकर अशी सर्व थोर मंडळी हजर होती..."
"अरे व्वा !"
"तिथे कवी ग्रेस काय म्हणाले माहितेय ?"
आता कवी ग्रेस काही बोलले...तर ते मला कळेलच अशी खात्री मला अजिबात देता येत नाही. ते काही सडेतोड व हृदयभेदकच बोलले असावे असे मला वाटले.
"ते म्हणाले...हे हृदयनाथ मंगेशकर ! आणि हे हृदयनाथ मंगेशकरांकडे हात असा फेकून ते म्हणाले...त्यांनी आरती प्रभूंची इतकी सुंदर कविता...लवलव करी पातं...आणि ह्यांनी ती कविता अर्चना जोगळेकरवर टाकून त्याच्या सगळ्या अर्थाची वाट लावून टाकली...अरे, ती कविता जरा ऐका...त्यात कवीला काय म्हणायचंय ते समजून घ्या...ती पूर्ण कविता ही प्राणपाखरूचे शरीरातून बाहेर पडण्याचे जे अखेरचे प्रयत्न आहेत...ते शेवटचे जे क्षण आहेत...ती जी धडपड आहे त्या क्षणांचे ते वर्णन आहे...! आणि काय केलंय ह्यांनी त्याचं गाणं ? काय लावलीय चाल...? त्या अप्रतिम कवितेचा अर्थच ह्यांनी बदलून टाकलाय !" मित्र अगदी हावभाव करीत वर्णन करीत होता. म्हणजे माझ्या डोळ्यांसमोर मी कायम टीव्हीवरच दर्शन घेतलेले कवी ग्रेस व हृदयनाथ मंगेशकर साक्षात उभे राहिले.
"आई गं ! मग ? अरे, मग मंगेशकर काय म्हणाले ?" मी.
"काहीही नाही...हृदयनाथ मंगेशकर शांत बसून होते...!"
"आईशप्पत !"
"आता बोल !"
"मी काय बोलू ?! बोडकं ? अरे, ह्या मंगेशकरांनीच माझे कान सुधारलेत रे !"
"म्हणजे ?" मित्र विचारू लागला.
"सारेगम' कार्यक्रमाच्या वेळी टीव्हीवर हृदयनाथ मंगेशकर येत ना ? त्या कार्यक्रमातून त्यांनी माझे कान सुधारले ! म्हणजे एखाद्या गाण्यात, एखाद्या शब्दावरच जोर का दिला गेला आहे....तिथे अशीच तान का घेतली गेली...हे सर्व त्या त्या कवितेवर व कवितेच्या अर्थावर कसे अवलंबून असते हे मला ज्ञात झाले "
खरं सांगायचं झालं तर माझे कान सुधारल्यावर मला मिळालेला आनंद अवर्णनीयच होता. मी एकदम खूषच झाले होते. म्हणजे एखाद्या चित्रामधून चित्रकाराला काय सांगावयाचे आहे हे जर मला समजून गेले तर जसा आकाशाला गवसणी घातल्यागत मला आनंद मिळे...तसेच काहीसे माझे झाले...गाणे समजून घेण्याचा मला निदान प्रयत्न करता येऊ लागला होता. अर्थात माझ्या क्षमतेला अनुसरून.
असे असता, आज मित्र जे सांगत होता तो म्हणजे माझ्यासाठी फार मोठा धक्का होता. हे म्हणजे फारच झाले...माझा कान सुधारणारे हे माझे कान गुरू...हृदयनाथ मंगेशकर...ह्यांनी असे का बरे केले असावे ?

मी लगेच मॅककडे वळले. 'आठवणीतील गाणी' ही साईट माझी मैत्रीण अलका चालवते. आणि त्यासाठी ती जीवतोड मेहेनत घेत असते. ह्या साईटचे सर्वात महत्त्वाचे गुण कोणते ? तर तिथे ज्यावेळी तुम्हीं एखादे गाणे ऐकता त्याच वेळी ती कविता वाचू शकता. त्यामुळे होते काय...की आपल्याला त्या कवितेचा मतितार्थ, त्या चालीमागचा भाव एकाच वेळी लक्षात घेता येतो. तसा प्रयत्न करता येतो. कवितेचे रसग्रहण करण्यास त्या गाण्याची मदत होते...व अपरिमित आनंद आपण घेऊ शकतो. ती साईट मी मॅकवर आणली. डाव्या बाजूला...'गीतकार.' आरती प्रभू...आरती प्रभू.....? मिळाले...त्या नावावर क्लिक केलं. दहाबारा कवितांची यादी डोळ्यासमोर आली...हे काय...आहे ना इथे....'लवलव करी पातं' !

लगेच दुसरा टॅब...त्यावर आपलं...यु टयूब. तिथे थोडा शोध...आलं आलं...Lav lav kari paat !
करा क्लिक...ती काय...दिसतेय ना...अर्चना जोगळेकर ! मग पुढील चार मिनिटे...एकाच वेळी ती कविता....डोक्यात मित्राने सांगितलेला त्यातील गर्भित अर्थ...आणि डोळ्यांसमोर...जोगळेकर बाई...बाईंचे ते नृत्य...लवलव करणारे शरीर...ती कविता...गाय उभी दाव्याची...तटतट करी चोळी...सर्व अर्थच बदलून जात होते...आणि काही कुठे ताळमेळ लागत नव्हता...कॅमेरा काही वेगळेच दाखवत होता...आणि शब्दांतून आरती प्रभू सांगत होते काही अनोखेच...ती आत्म्याची शेवटची धडपड...विशाल आकाशात मुक्त संचार करण्याची ती त्याची ओढ...आणि डोळ्यांना दिसत होते...रवींद्र मंकणी...त्यांची नजर...बाईंचे मुक्त मुक्त नखरे...हरकती...सुटं- सुटं झालं मन...धरू कसं पाऱ्याला...तिचं बागडणं...खट्याळ खट्याळ अर्चनाबाई...मधेच वाऱ्यावर डोलणारं गवताचं पातं...पारूबाई साठीची...मंकणींच्या आईचा क्लोजअप शॉट...अगं आई गं...सगळंच असंग. सारंच विजोड.

मला माझ्या गुरूवर्यांचे काही कळलेच नाही !
इथे ऑफिसात येताजाता, इथेतिथे, ज्यालात्याला दोन शब्द आम्हीं फार वेळा ऐकवित असतो...क्रिएटिव्ह फ्रीडम ! ह्या क्रिएटिव्ह फ्रीडमचे एक बरे असते. त्याचा वापर करावयाचा म्हटलं की मग कल्पनांना मुक्त भरारी करता येते...कसलेही बंधन रहात नाही ! आणि समोरच्याला त्यातले कळले नाही...की लगेच आपल्याला म्हणता येते....अरे ! तुझी कुवतच नाही रे बाबा हे समजून घेण्याची ! मंगेशकरांनी तेच 'क्रिएटिव्ह फ्रीडम' वापरले होते काय ? कवीने काही भावना मनात धरून कविता लिहिली होती...चित्रपट दिग्दर्शकाला गाणं हवं होतं...उडतं खेळतं...खट्याळ...गीतकाराने तेच ते स्वातंत्र्य वापरलं...आणि मग आम्हांला मिळालं...लवलव करी पातं...मोहक...दिलखेचक.

गेली किती वर्षं  मी हे गाणं ऐकते...कित्येकदा मी हे गाणं गुणगुणते...पण कधी कळलं नाही...हीच ती कविता...ज्यात कवीने माझ्या आत्म्याचे कोंडणे, त्याची ती घुसमट...त्याच्या शब्दांत किती चपखल पकडली होती !

मी अज्ञानी. गुरूवर आंधळे प्रेम करणारी.
मग माझ्या सर्वज्ञानी कानगुरूंनी असे का बरे केले असावे ?! काय खरेच हे त्यांचे 'क्रिएटिव्ह फ्रीडम' होते ? आणि मग ह्यावर आरती प्रभू काय म्हणाले असते ? त्यांचे प्राणपाखरू मुक्त झाले ते १९७६ साली. 'निवडुंग' चित्रपटाचे साल आहे १९८९.
हम्म्म्म...
अनंतात विलीन झाल्याकारणाने, तिथेच बसून आरती प्रभूंनी, दिग्दर्शकाच्या व संगीतकाराच्या व्यवहारिक गरजांना समजून उमजून, त्यांच्या 'क्रिएटिव्ह फ्रीडम'ला मनापासून दाद दिली असेल काय ?

आज आता इथे भूतलावर माझ्या हातात रहाते ती त्यांची कविता.
हे इतक्या वर्षांचे उडत्या चालीचे कोंदण, जे त्या कवितेला घट्ट पकडून बसले आहे...ते आता मी कसे दूर करू ?
ती काय कर्णाची कवचकुंडले थोडीच...घेतले धारदार शस्त्र हातात आणि कापून वेगळी केली ?

चवचव गेली सारी...जोर नाही वाऱ्याला...
सुटं - सुटं झालं मन...धरू कसं पाऱ्याला.

Tuesday, 27 December 2011

मिजास...?

मी जन्माला आले तेव्हां मला दोन पाय होते. मग त्या पायांना डोकं फुटलं, आणि सायकलीचे वेध लागले. धावत्या रस्त्यांवर बिनबोभाट सायकल पळवता येऊ लागली. वा वा वा...म्हणजे अगदी कानात वारं...डोक्यात वारं. त्याच त्या डोक्यात शिरलेल्या वाऱ्याने एक दिवस इस्पितळात पोचवलं ते अगदी कॉलर बोनला चीर पाडूनच. डोंबिवलीत. इतिहासातून धडे घेतले तर तो माणूस कसला ? सायकलची हौस फिटली. खिशात पैसे आतबाहेर करू लागले आणि मग स्कूटर...दुचाकी विकत घेतली. मग एकदा तिने इस्पितळात पोचवलं ! आता हा अपघात नक्की का आणि कसा झाला ह्याचे कारण पडद्याआड राहिले आहे. आणि हा पडदा उघडण्याची सूतराम शक्यता नाही. का बरं ? कारण असं आहे की डोक्याला मार लागला व अपघाताचा तो क्षण विस्मृतीच्या भरभक्कम पडद्याआड गेला. तरीही चूक माझी होतीच. डोक्यावर हेल्मेट मी फक्त अडकवलं होतं. त्याचा पट्टा लावण्याची तसदी मी घेतली नव्हती. म्हणजे हवालदाराला वाटावं, बाईंनी नियमांना धरून शिरस्त्राण चढवलेलं आहे...पण माझ्या स्वत:च्या डोक्याला सरंक्षण शून्य. त्यामुळे चूक माझीच होती व कोणाही दुसऱ्या वाहनचालकाची नव्हती असे खात्रीपूर्वक म्हणता येईल.

कालचक्र अजून थोडं पुढे सरकलं. मुलगी शिकली प्रगती झाली...ह्यातील 'प्रगती' पैश्यात मोजावयाची म्हटली तर मी चारचाकी विकत घेतली. मग विकत घेतली तर काय झालं...माज आला का ? असा विचार येऊ शकतो...मनात...दुसऱ्याच्या...रस्त्यावर चालणाऱ्याच्या वा रस्त्यावर दुचाकी चालवणाऱ्याच्या. पण तसा काही माज आला नाही...कारण चार चाकीपर्यंतचा प्रवास मुळातच दोन पायांपासून केलेला आहे. आणि आमचे पूर्वज हे नेहेमीच देवाने दिलेल्या पायांवरच विसंबून रहात आलेले होते. आईबाबा कायम तरतर चालत रेल्वे स्थानकावर जात असत व मुंबईच्या जीवनरेषेत धक्काबुक्की करत प्रवेश मिळवत असत. त्यामुळे चार चाकी घेतली म्हणून डोक्यात हवा जाण्याचा तसा प्रश्र्न नव्हता. रस्त्यावरील नियम हे फक्त समोरच्यासाठीच बनवलेले आहेत व माझा त्या नियमांशी काडीमात्र संबंध नाही असे मला पायी चालताना देखील वाटले नाही व आता गाडी चालवताना देखील वाटत नाही. त्यामुळे झेब्राच्या अंगावरील पट्टे व लालहिरवा रंग ह्यांबद्दल माझ्या मनात भरपूर आदर आहे. व त्यामुळे त्यांचा मान राखणे हे माझ्या हातून आपोआप घडते. त्यांचा मान राखणे ह्यात माझी अब्रू जाते व माझा मान कमी होतो असे मला अजिबात वाटत नाही. कारण ह्याच रस्त्यांवर माझी वृद्ध आई पायी चालत असते व नियम तोडून भरधाव धावणाऱ्या वाहनांची तिला अतिशय भीती वाटते हे माझ्या कायम ध्यानी असते.

बरं मग ? त्याचं आता काय ? आम्हीं काय करू त्याचं...?

नमनाला घडाभर तेल.

परवा रात्रीचे आठ साडेआठ झाले होते. मी काही कामानिमित्त ऑफिसला जात होते. ऑफिसपाशी पोचतच आले होते...गाडी चालवत. नाक्यावर एक सिग्नल आहे. तो पाळला...पार केला. पुढे आलं की पुन्हा एक उजवे वळण आहे. त्या वळणासाठी देखील एक सिग्नल आहे...ज्यावेळी नाक्यावरील सिग्नल गाड्यांसाठी चालू होतो त्याचवेळी हे उजवे वळण देखील चालू होते. म्हणजे मग आपण ते वळण घेऊन माझ्या ऑफिसच्या इमारतीत शिरू शकतो. त्या दिवशी देखील तसेच झाले. मी धिम्या गतीत उजव्या बाजूला चाक वळवले. गाडीची चारही चाके त्या दिशेने वळली. समोरून दुचाकी येताना मला दिसत होती. धट्टाकट्टा कुटुंबप्रमुख दुचाकी चालवत होता. पुढे पाय कुशीत घेऊन घरातलं छोटं पिल्लू बापावर विसंबून बसलं होतं. व मागे पुरुषाची अर्धांगिनी पातळ नेसून भारतीय बायका जशा दुचाकीवर बसतात तशीच बसली होती. दोन्ही पाय एका बाजूला, नवऱ्याच्या कमरेला विळखा. विश्वासाचा. सिग्नल माझ्यासाठी हिरवा होता. त्यांच्यासाठी अर्थात लाल. मी पुढे आले. साहेब थांबले नाहीत. त्यांच्यासाठी आदर दर्शवून मी माझी चारचाकी थांबवावी असे त्यांचे स्पष्ट मत दिसत होते. त्या मताचा मी मान ठेवला नाही. मी दोन चाके अजून पुढे आले. आता साहेबांचा धीर सुटला. हॅण्डल वेडेवाकडे झाले. दुचाकी रस्त्यावर घसरली. कुटुंब खाली पडलं. साहेबांनी हॅण्डल तसं हातातून सोडलं नव्हतं. तेही त्याबरोबर थोडे घसरले. पिल्लू दुचाकीवरच बसून राहिलं. दुचाकी रस्त्यात आडवी. अर्धांगिनी मागच्या मागे भुईवर. साहेब जागचे उठले. तिरीमिरीत. उभे होते तिथूनच माझ्या अंगावर किंचाळले. "क्या मॅडम, दिखता नही क्या?" 
मी थांबले. काच खाली केली. 
"कोणाला दिसत नाहीये भाऊ ? सिग्नल माझ्यासाठी हिरवा होता. आणि तुमच्यासाठी लाल."
"मग काय झालं ?" आता रस्त्यावर गर्दी जमा होण्यास सुरुवात झालेली होती. दुचाकी उचलण्यासाठी साहेबांना मदत करत होती. पिल्लू उभं राहिलं होतं. त्याला रडू फुटलं होतं. बाई, खडबडून उभ्या रहात होत्या. पातळ सांभाळत.
"मग काही नाही...तुम्हांला तुमच्या बायकापोराच्या जीवाची पर्वा नाही...बेधडक सिग्नल तोडून तुम्हीं निघालात....मग मी कशासाठी थांबू...मी काही नियम तोडत नव्हते....नाही का ?" बाई झपाट्यात साहेबांजवळ पोचल्या. 
"तुमच्या पिल्लाच्या व अर्धांगिनीच्या जीवावर तुम्हीं उठलात की हो भाऊ...नाही का? आणि पोराला चांगलं शिकवताय की...सिग्नल पाळायचा नाही...उद्या देव करो काही वाईट न होवो...पण कधी काही झालंच...तर भाऊ जबाबदार कोण...? तुम्हीच नव्हं का ? सिग्नल न पाळायला तुम्हींच तर शिकवलंत त्याला...."
भाऊंची मी केसच घेतली. भाऊ गप्प झाले. माझी नजर त्या पिल्लावर लागली होती. मी गाडीतून नाही उतरले. साहेबांना चार गोष्टी शिकवण्याची गरज तर होती...पण त्या पिल्लाचा काय दोष होता ? बापावर विश्वास टाकला...ही काय त्याची चुकी होती ?
"पिल्लू घाबरलं की हो भाऊ तुमचं...सांभाळा जरा...वहिनींना आणि पोराला...तुमच्यावर विसंबून बिनधास्त बसतात की तुमच्या मागेपुढे !"

गाडी चालू केली मी...ऑफिसच्या दिशेने...
"अनघा, त्यांनी मरायचच ठरवलं असेल तर निदान आपल्या गाडीखाली येऊ नये एव्हढीच काळजी आपण घ्यायला हवी..." माझा मित्र मला म्हणाला. "आणि म्हणून आपण ब्रेक मारायचे."
"अरे, पण हे असं मुद्दाम पुढे यायचं...सिग्नल तोडून...! माझी गाडी ब्रेक मारून ऐन वेळी थांबवण्याची सक्ती त्याने माझ्यावर का बरे करावी ? आणि ते मी ऐकेनच हा असा विश्वास माझ्यावर का बरे त्याने टाकावा...? नाही थांबवत जा मी गाडी...तू सांभाळ ना यार...तुझा जीव...नाही का ? तुला नाही पडलीय तुझ्या स्वत:च्या जीवाची आणि तुझ्या बायकापोरांची तर मी कशाला काळजी करू...तुमची ?" चिडचिड. वैतागवैताग. "बिचारी ती त्याची बायको ! आणि बिचारं ते पोरगं !"
"हम्म्म्म"

माझे वाहन मला ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे माझा आहे. मी कधी दोन पायाने चालेन, तर कधी दुचाकी चालवेन वा कधी मी चार चाकी चालवेन. आगगाडी नक्की नाही चालवणार कारण ती चालवण्याचे मी शिक्षण घेतलेले नाही...व त्यामुळे त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स माझ्याकडे नाही.

मी एक नागरिक आहे.
व ज्यावेळी मी रस्त्यावर असते, मग मी गाडी चालवत असेन, वा मी चालत असेन...जे काही असेल त्या अवस्थेला काही नियम आहेत.
जसे पादचाऱ्यासाठी नियम तसेच वाहनचालकासाठी.
मी गाडी चालवत असेन तर झेब्रा पट्टे माझे नाहीत. झेबऱ्यावर मी स्वार होऊ शकत नाही.
नियमबाह्य काही वागायची माझी इच्छा नाही. सवय नाही. हे नियम हा माझ्या रक्ताचाच एक भाग आहेत.
लाल रंग ?
रक्ताळलेला. धोका.
हिरवा रंग ? निसर्गाचा. माझा.

मुद्दा क्रमांक २.
माझ्या जिवाची जबाबदारी कोणाची ?
माझी स्वत:ची की समोरच्या माणसाची ?
म्हणजे जरी शेवटी दोरी यमराजाच्या हातीच असली तरी मुद्दाम मी त्याच्या हाती ती का घुसडावी ?
समोरचा वाहनचालक नेहेमीच बेगुमान गाडी चालवत असतो का ?
की कधीतरी, तो नियमांना धरून चालवत असतो परंतु, मी मात्र माझ्या आयुष्याची जबाबदारी त्याच्या पायांवर टाकलेली असते ? त्याच्या ब्रेक दाबण्याच्या कौशल्यावर व त्याच्या मर्जीवर  ?
कारण काय तर...
ह्या दुनियेत माझ्यासाठी एकही नियम नाही !
मी माझ्या मर्जीचा बाप आहे...
आणि ही दुनिया माझ्या बापाची आहे...!

कधी आपण स्वत:चे आयुष्य स्वत: जपायला शिकणार ?
दुसरा चूक करतो व आपण नाहक मरतो...
पण नेहेमीच हे असंच घडतं असं काहीही नाही...
बरेचदा, आपण आपल्याच चुकीने इतिहासजमा होतो.

आणि अर्थात शेवटी, आयुष्याची कथा संपल्यावर, झाडाला लटकून अश्रू ढाळण्यात काय तथ्य ?

मला आता उगाच, मुंबई गोवा हमरस्त्यावरील वाहनविषयक पाट्या मी लिहितेय असं वाटू लागलंय...
'नियम माझ्यासाठी...नियम तुमच्यासाठी !'
'नियम खड्डयात...तर आपण ढगात...!'
वगैरे वगैरे...

Sunday, 25 December 2011

Slipping through my fingers...

ते छोटसं बाळ...त्या केसांच्या झिपऱ्या...दोन दोन शेंड्या...शाळेचा गणवेश...आईला सोडून दोन तास शाळेत जावं लागणार म्हणून गोबऱ्या गालांवर ओघळणारे ते चमचमणारे अश्रू...शाळेच्या दरवाजाकडे टक लावून माझी वाट बघणारे ते टपोरे डोळे...मी दिसल्यादिसल्या माझ्याकडे धावत सुटणारी चिमुकली पावले...दोन अक्षरी इंग्लिश स्पेलिंग दिवसभर घोटणारं आणि येत नाही म्हणून कावरंबावरं झालेलं ते बाळं मन...एव्हढ्या मोठ्या कागदावर छोटीशी नाव काढली म्हणून तिला नापास करणाऱ्या तिच्या चित्रकलेच्या सरांशी मी जाऊन भांडले की खुष होणारी ती माझी लेक...जीवतोड मेहेनत करून महाराष्ट्र जिल्ह्यात बॅडमिंटन खेळात सिडींग मिळवणारी माझी लेक...खांद्याच्या दुखापतीमुळे बॅडमिंटन सोडून द्यावे लागल्याचे दु:ख पेलणारी माझी लेक...अनेकदा स्वत: वेडेपणा करून देखील तावातावाने माझ्याशीच भांडणारी माझी लेक...परदेशात जाऊन अभ्यास करणारी माझी लेक...आजोबांसारखाच अभ्यासाचा हव्यास असलेली माझी लेक..."आई, माणसे वाईट नसतात...परिस्थिती वाईट असते"...हे असे सहजगत्या मला सांगणारी माझी लेक...आयुष्याचे टक्केटोणपे माझ्याबरोबर खाणारी माझी लेक...

कन्यादान शब्द चुकीचा वाटतो....कन्या आहे ती माझी...तिचे दान का बरे मी करावे असेच वाटत रहाते...
मुलगी झाली तेंव्हा मलाच काय, सगळ्याच आयांना माहित असतं...हे आपलं कुकुलं बाळ एक दिवस मोठं होणार...आणि उडून जाणार.
मुलं देखील मोठी होतात आणि पंखांत बळ आलं की बाहेरच्या जगात उडून जातात..परंतु, मुलगी दुसऱ्या घरी जाणं हे काही वेगळंच.

किती वेळा बघितला तरी मन न भरणारा 'ममा मिया' आज आम्ही दोघींनी पुन्हां बघितला....

...मेरील स्ट्रीपची लेक लग्नाला उभं रहायला निघाली...नट्टापट्टा करायला तिच्यासमोर बसली...आणि डोळे वाहू लागले...कितव्यांदा कोण जाणे. बाबा आईला नेहेमी सांगत असत...मुलींना हवे ते खायला घाल...काय माहित सासरी आवडीचं खायला मिळेल की नाही...मुलींशी बोल...गप्पा मार....आईला कधी तिच्या नोकरीत गप्पा मारायला वेळ मिळाला नाही...आणि अर्थात तसा तिच्या स्वभावही नव्हता.
पण हे मेरील स्ट्रीपचे तिच्या मुलीशी असलेले नाते अगदी पार मला इथे मुंबईत पटते...आणि मी तिच्याचसारखी तिच्याचबरोबर माझ्या पोरीच्या बालपणात पोचते...
मीच कशाला...माझी लेक आणि मी...आम्हीं दोघी पोचतो...उड्या मारत...हसत खेळत...

...मन आईचे...देशात काय आणि परदेशात काय...सगळीकडे सारखेच...डोळ्यात पाणी आणणारे...

'ममा मिया'तील मायलेकी...
http://www.youtube.com/watch?v=BbPsVknvg0Y&feature=related


Sunday, 18 December 2011

म्हाडा आणि मी...भाग १०

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७
भाग ८
भाग ९

३० नोव्हेंबर
आम्हीं कोर्टात पोचलो तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते. का कोण जाणे पण कोर्टाचे दालन आज गच्च भरले होते. आम्हीं थोडा वेळ आमचे वकील नारायण ह्यांसाठी बाहेर थांबलो. आज नारायण नाही येऊ शकले. त्यांची मदतनीस मनीषा हजर होती. तेवीस चोवीस वर्षाची मनीषा. चुणचुणीत. बाहेर बिल्डरचे वकील, वर्मा, घोटाळत होते. मी विसरलेले नाही. मी काहीही विसरलेले नाही. कोर्ट रूम आजही तीच होती. तशीच भरलेली होती. 'भाडेकरू आणि म्हाडा किंवा बिल्डरच्या केसेसमध्ये कायम भाडेकरू हरतो...व नुकसानभरपाई म्हणून भाडेकरूला उलटे पैसे भरायला लागतात...people are misleading you...lawyers do that...just to earn money...' वर्मा मला त्या दिवशी सांगत होते...ह्याच आदरणीय कोर्टाच्या दालनात बसून हेच वर्मा मला मित्र म्हणून आपुलकीचा सल्ला देऊ करत होते...आज काय परिस्थिती होती...? जेष्ठ नागरिकाच्या सोयीची जागा देणे कायद्याने बिल्डरला भाग पाडले होते...नुकासानभरपाई मला भरायला लावली नव्हती...आणि कोर्टाने म्हाडाच्या अधिकाऱ्यांना कोर्टात येणे भाग पाडले होते...कोण जिंकले होते....? बेजुमान शक्ती की सामान्य भारतीय नागरिक ? वर्मा समोर येताच एका क्षणात माझ्या मनात हे सर्व झळकून गेले. माझी मान ताठ होती...वर्मांनी नजर चुकवली...मान खाली घातली...व दालनात शिरले...त्यांनी माझ्या नजरेला नजर नाही दिली....आणि मला त्यांचे त्या क्षणाचे विचार स्पष्ट वाचता आले....वर्मा हरले होते...आज अरेरावी हरली होती.
मनीषाबाई येताच तिघेही आत शिरलो. मी तेव्हढ्या वेळात दाराबाहेरून आत बघितले होते. पुढील खुर्च्यांवर राठोड व तिवारी बसलेले दिसत होते. राठोड काही कागदपत्र चाळत होते. (मला खरं विचाराल तर हे आदरार्थी संबोधन मला कठीण जातंय....म्हणजे खोटेपणा वाटतो...जे खरे तर माझे क्षेत्र नव्हे...पण इलाज नाही.) त्यांच्या हातात कागदांची थप्पीच होती. त्यांना काही सापडले ते त्यांनी शेजारीच बसलेल्या तिवारींना दाखवले. मी विचारात पडते...आता काय बरं ह्यांनी अभ्यासाला घेतलंय ? फलटणकर व मनीषाबाई सरळ आत शिरतात व खुर्च्यांवर स्थानापन्न होतात. मी तिथेच तिसऱ्या खुर्चीवर बसते.
"आलेत आज...ते...तिवारी आणि राठोड...तिथे पुढे बसलेत...." मी फलटणकरांना हळूच म्हणते.
फलटणकर फक्त मान डोलावतात. आता काय होणार...मी मलाच मनातल्या मनात विचारते. पर्समध्ये बाबांचा फोटो असतो...तो आपोआप माझ्या हातात येऊन बसतो. न्यायाधीश आमच्याकडे नजर टाकतात. मनीषाबाई पुढे होतात. न्यायाधीश म्हाडाच्या वकिलीण बाईंना विचारतात. "सगळे पक्षकार हजर आहेत का ?"
"आलेत...हे काय...म्हाडाचे अधिकारी आलेत...आणि बिल्डरचे वकील देखील आहेत..." वकिलीणबाई हात पुढे करत म्हणतात. राठोड व तिवारी पुढे येतात. वकिलीण बाई मागे वळून बघतात...आजूबाजूला बघतात...मी देखील दालनात नजर फिरवते...वर्मा दालनाच्या कुठल्याही कोपऱ्यात दिसून येत नाहीत. बिल्डरचे उद्दाम वकील वर्मा आज गायब आहेत. आत्ता तर होते...पण आत्ता गायब आहेत.

"या...पुढे या....उभे रहा तिथे चौकटीत." न्यायाधीश आज्ञा देतात. आज्ञेचे पालन होते.
"काय नावं काय तुमची ?" न्यायाधीश विचारतात.
राठोड पुढे होतात..."मी राठोड."
"तिवारी..." तिवारी चौकटीत शिरतात.
न्यायाधीश उजवा हात पुढे करतात व राठोडांना विचारतात..."काय तोंडात काय आहे तुमच्या ? काय भरलंय तोंडात ? हे असलं भरलेलं तोंड घेऊन कोर्टात काय खाताय तुम्हीं ? जा....रिकामं करा ते तोंड आधी !" न्यायाधीशांचा सूर रागीट वाटला.
"काय नाही साहेब ! काही नाही तोंडात !" भ्यायलेले राठोड आ वासतात व रिकामा जबडा कोर्टाला दाखवतात.
पुढील खुर्च्यांवर नेहेमीच काळे कोट घालून बरेच वकील बसलेले असतात. आज तशी गर्दीच होती...माझे लक्ष होते...यातील एका वकिलाच्या तोंडावर हसू फुटले होते.
राठोड ततपप...
"मग ? माफी मागा कोर्टाची...जे काही केलंत त्या दिवशी त्याबद्दल आज कोर्टात माफी मागा..."
"पण साहेब...आम्हीं आधीच लेखी दिलेलं आहे...आम्हीं कोर्टाचा अवमान केलेला नाही..." तिवारी.
"तुम्हांला कोर्टाची माफी मागायची आहे काय ? तुमच्या हातून जे काही घडले त्याबद्दल ...? नसेल तर मी निकाल सांगायला सुरवात करतो !!" न्यायाधीश.
"तसे नाही साहेब...मी..आम्हीं...म्हणजे....आम्हांला मान्य आहे !! " तिवारी बोलतात. राठोड मान डोलावतात. एक क्षण शांतता.
"तोंडाने बोला....माफी तोंडाने मागा...बोला..." न्यायाधीश आज्ञा देतात. आत्तापर्यंत फलटणकर व मनीषाबाई जागेवरून उठून पार पुढे गेलेले आहेत. मी त्यांच्या थोडी मागे उभी आहे.
"आम्हीं माफी मागतो साहेब....आमच्याकडून चूक झाली असेल तर..."
"असेल तर म्हणजे...कोर्टाची observations आहेत...ती लक्षात घ्या...."
"हो हो साहेब...आम्हीं माफी मागतो."
आता न्यायाधीश मनीषाबाईं व फलटणकरांकडे बघतात...
"साहेब, हे अधिकारी, पुन्हां बाहेर जाऊन सामान्य नागरिकांना असाच त्रास देणार असतील तर काय उपयोग ?" मनीषाबाई म्हणतात...
"हे असले वागणे पुन्हां होता कामा नये...ही ताकीद आहे तुम्हांला..." न्यायाधीश म्हणतात... मनीषाबाईंना विचारतात..."तुम्हांला ही माफी मान्य असेल तर मग तुम्हीं 'कोर्टाचा अवमान' हा जो अर्ज दाखल केला आहे तो मागे घेऊ शकाल." मनीषाबाई फलटणकरांकडे बघतात. मीही त्यांच्याकडे बघते. फलटणकर विचारांत गढलेले दिसतात. "काय करायचं ?...माफी मान्य करायची का ?" मनीषाबाई.
"ठीक...कर मान्य...मान्य आहे साहेब आम्हांला...." फलटणकर न्यायाधीशांना सांगतात.
"ठीक..." न्यायाधीश बाजूलाच बसलेल्या टंकलेखिकेला निकाल सांगू लागतात...एकाग्रचित्ताने फलटणकर ऐकू लागतात. मीही कान टवकारते...मला देखील थोडेफार कळते.

"श्री.तिवारी व श्री.राठोड यांनी झालेल्या घटनांबद्दल बिनशर्त माफी मागितली. ती तक्रारदाराच्या वकिलांनी स्वीकारली असल्याने, संबधित 'नोटीस ऑफ मोशन' तक्रारदाराने मागे घेतली आहे. तसेच आता मूळ दाव्यातील वाद विषय संपुष्टात आला असल्याने हा दावा काढून घेण्याबाबत योग्य तो अर्ज तक्रारदाराने पुढील तारखेस दाखल करावा."

थोड्याच वेळात आम्हीं बाहेर पडतो.
"नक्की काय झालं ?" मी विचारते. मला उगाच विक्रम वेताळाच्या गोष्टींची आठवण येते...कोर्टाबाहेर पडल्यापडल्या प्रश्र्न सुरू.
"आज आपण म्हाडाच्या माफीनाम्याला मान्यता दिली...व त्यामुळे 'कोर्टाची त्यांनी अवज्ञा केली'...असा गुन्हा त्यांच्या नावे दाखल झाला नाही."
"म्हणजे कायद्याचा मान राखून, आपण म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर दया दाखवली...असाच ह्याचा अर्थ होतो ना ? आज म्हाडाच्या अधिकाऱ्यांना, कोर्ट त्यांची पायरी दाखवत होतं...न्यायाधीशांचे बोलणे...त्यांच्या आवाजाचा टोन...सगळं तसंच होतं...घाबरून कसं सताड तोंड उघडलं त्या राठोडने..." मला हसायला येतं.
"असं तू म्हणू शकतेस..."
फलटणकर काही माझ्याबरोबर हसत नाहीत....ते कुठल्यातरी विचारात गढल्यासारखे मला वाटतात...माझ्या मनात बरेच प्रश्र्न उभे राहिलेले असतात...
"पण आपण माफी का मान्य केली ते सांगा ना ? असं काय म्हणून आपण त्यांना फक्त माफीवर सोडायचं ?"
"एक लक्षात घे, या सगळ्या प्रकारात कोर्टाच्या हे लक्षात आलेले जाणवत होते की या अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकाराचा जास्त वापर, जास्त घाईने केला. कायद्याचे काही प्रमाणात उल्लंघनही केले होते व थोडेफार दुर्लक्ष पण केले. परंतु, तांत्रिकदृष्ट्या कोर्टाने म्हाडाला दिलेल्या आदेशाचे...काय होता कोर्टाने म्हाडाला दिलेला आदेश ?...योग्य कायदेशीर प्रक्रियेशिवाय तक्रारदारास जागेतून काढून टाकू नये...बरोबर ? म्हाडाचे अधिकारी जे वागले त्यात स्पष्ट उल्लंघन नसल्याने, त्यात कोर्टाचा हेतुतः अवमान केला गेला असण्याची शक्यता क्षीण आहे. व त्यामुळे `कंटेम्ट नोटीस ऑफ मोशन' डिसमिस होऊ शकत होती. परंतु, तक्रारदारावर बळजबरी तर झालेली आहे. म्हाडा अधिकाऱ्यांना त्याची स्पष्ट जाणीव करून देण्याच्या उद्देशानेच कोर्टाने त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास फर्मावले व त्यांना त्यांच्या लेखी जबाबाप्रमाणे, भर कोर्टात स्वत:च्या तोंडाने प्रत्यक्ष माफी मागण्यास सांगितले. आणि कोर्टाने सर्वांसमक्ष त्या अधिकाऱ्यांना हे करावयास भाग पाडल्याने, आपण मा. कोर्टाचा कल लक्षात घेणे, त्या अधिकाऱ्यांनी मागितलेली माफी मान्य करणे हे आपल्या सुसंस्कृतपणाचे व आपल्याच कायद्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या असलेल्या नितांत विश्वासाचे व भरवश्याचे द्योतक आहे....पटतंय का तुला हे....?"
"हो...म्हणजे त्या दोघांची जी काही तोंड झाली होती ना आज ती आठवून हे मला नक्की पटतंय...कारण त्या दिवशी तुम्हीं फक्त ऐकली त्यांची अरेरावी...त्यांची भाषा...मी प्रत्यक्ष अनुभवलीय...त्यामुळे त्या विरोधात आज जे त्यांचे हसे झाले...ते बघून मला फार आनंद झाला ! म्हणजे म्हाडाच्या अधिकाऱ्यांपेक्षा आमचा कायदा हा श्रेष्ठ आहे...आणि कायदा हा आमचा व आमच्यासाठी आहे हे पटले....! ते वर्मा तर गायबच झाले ! आले होते ते खरं तर...बघितलं होतं का तुम्हीं ?....पण ज्या वेळी हे अधिकारी तिथे त्या साक्षीदाराच्या चौकटीत ततपप करत उभे होते ना...त्यावेळी वर्मा गायब होते ! म्हणजे बाबांच्या पद्धतीत, अगदी कायद्याच्या मदतीने आपण हे सगळं केलं ! हे त्यांच्या वर्क रेकॉर्डवर येईल का ? आलं तर अधिकच छान होईल ! "
"आज जे झालं त्याची मिनिट्स ऑफ दि मिटींग्स सारखी एक कॉपी आपल्याला मिळेल...."
"कधी ?"
"मिळेल....चार पाच दिवसांत..."
"त्याचं काय ?"
"त्याचं काही नाही....सांगतोय की आजच्या निकालाची एक कॉपी मिळेल आपल्याला."
"त्यात काय असेल...? आज जे झालं ते आपल्यासाठी चांगलंच झालं ना ? म्हणजे आपण जिंकलोय ना ?" मला हेही विचारावंच लागतं....खात्री करून घेण्यासाठी...काहीही गृहीत धरण्याची आता माझी ताकदच उरलेली नसते.
मी वेताळच आहे...माझे प्रश्र्न नेहेमी तयारच असतात....
आणि विक्रमाची उत्तरे देखील तयार असावीत...नेहेमी सारखीच...
"अगं, हो...जिंकलोय आपण...बाकी वैयक्तिक नफा-नुकसानीचा हिशोब...योग्य वेळ येताच मांडून वसूल करूच आपण !!"
आर्य चाणक्य बोलले ! आणि मला हसू आलं !
....................................................................................................................................................................

आज आमच्या हातात कोर्टाचा रोजनामा आला...त्यातील मजकूर असा...श्री. अनिल राठोड व श्री. राकेश तिवारी हे म्हाडाचे अधिकारी कोर्टात हजर आहेत. त्यांनी कोर्टासमोर बिनशर्त माफी मागितली. यावर तक्रारदाराच्या वकिलांनी 'कंटेम्ट नोटीस ऑफ मोशन' आता पुढे चालू ठेवण्याचे नाही असे सांगितले, ते कोर्टाने मान्य केले आहे.  तक्रारदाराच्या वकिलांच्या सांगण्यावरून व संमतीवरून, 'कंटेम्ट नोटीस ऑफ मोशन' निकाली काढण्यात येत आहे.
....................................................................................................................................................................

अॅडव्होकेट फलटणकरांनी मदत केली आणि म्हणूनच आम्हीं हा लढा जिंकू शकलो. हे सर्व शब्दांत उतरवून इथे टाकणे देखील त्यांच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. शेवटी कायद्याच्या गोष्टी आहेत त्या मला नीटच उतरवायच्या होता. कुठेही चुकीची माहिती द्यावयाची नव्हती...त्यामुळे त्यांचे पुन्हा एकदा आभार...डोंगराएव्हढ्या कामात वेळ काढून माझे हे लिखाण तपासून दिल्याबद्दल...
:) 
....................................................................................................................................................................

Thursday, 15 December 2011

म्हाडा आणि मी...भाग ९

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७
भाग ८

२० ऑक्टोबर.
एक तारीख दिवाळीआधी. 
एक तारीख दिवाळीनंतर. 
आम्हीं दर तारखेला न चुकता हजर.
म्हाडाचे अधिकारी ? गैरहजर. त्यांच्या वकील बाई ? हजर.
त्यांनी पुन्हां एकदा त्यांचे म्हणणे मांडले. "त्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हजर रहाणे आवश्यक नाही...त्यांनी त्यांचे म्हणणे आधी दिलेल्या लेखी जबाबात मांडलेच आहे. कोर्टाचा कोणताही अवमान त्यांनी केला नसल्याने त्या अधिकाऱ्यांनी हजर असण्याचा आग्रह कोर्टाने धरू नये..." वगैरे वगैरे. मला गंमत वाटली. कोर्टात बोलावले गेले हे त्यांना अपमानकारक वाटले ह्याचा मला आनंद झाला. मी उगाच खोटं कशाला बोलू ? कायद्याच्या गोष्टी आम्हांला सांगू नका...असे म्हणणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांना कोर्टाने बोलावले...व ते टाळण्याचा त्यांनी प्रयत्न करावा ह्यातच गंमत नाही काय ? म्हणजेच त्यांना कोर्टात येणे हे त्रासदायक वाटत आहे...कायदा आपल्याला लागू होत नाही असेच तर त्यांचे म्हणणे होते नव्हे काय ? हा सामान्य नागरिकाचा विजय नव्हे काय ? निदान मला तरी तसा तो वाटला.
वकिलीणबाईंच्या त्या विनंतीवर, आमचे वकील काही बोलण्यापूर्वीच न्यायाधीशांनी त्या अधिकाऱ्यांना हजर राहणे अत्यावश्यक आहे असे सांगितले. एक आठवड्यानंतरची तारीख देऊ केली...त्या सुमारास वकिलीणबाई रजेवर जाणार असल्याकारणाने १५ दिवसांनंतरची तारीख बाईंनी मागितली. 
आम्ही शांत होतो. कोर्टाला सहकार्य देणे आमचे कर्तव्य. तारखेला आम्ही होकार दिला.

"हे अधिकारी आले का नाहीत ?" बाहेर पडल्यावर मी फलटणकरांना विचारते.
"हम्म्म्म..." फलटणकर मौन पाळतात.

परत १५ दिवसांनी आम्हीं कोर्टात.
आज ?
अधिकारी गैरहजर. आणि बाई ? त्या देखील गायब.
कोर्टाने बाईंच्या मदतनीसांना पाचारण केले. त्या देखील एक बाईच होत्या. 
"मॅडम आजारी आहेत. आम्हांला कृपया पुढची तारीख द्या." मदतनीस बाई म्हणाल्या. आज कोर्टात नारायण नव्हते. मग फलटणकर पुढे सरसावले. साक्षीदाराच्या चौकटीत ते उभे राहिले. कोर्टाकडे बोलण्यासाठी परवानगी मागितली. कोर्टाने परवानगी दिली.
"वकीलबाई व म्हाडाचे हे अधिकारी सतत चालढकल करीत आहेत व हा देखील कोर्टाचा एक अवमानच आहे. तरी त्यांची ही मागणी कोर्टाने मान्य करू नये. व त्या वकीलबाई व ते अधिकारी कितीही नाही म्हणत असले तरी त्यांचे कायद्याचे उल्लंघन करणे व मा. कोर्टाच्या सूचनांचे पालन न करणे हा कोर्टाचा अवमान नव्हें काय ?"
कोर्टाने ४ दिवसांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांस हजर करण्यास मदतनीस बाईंना सांगितले. ही शेवटची तारीख देत आहे. अन्यथा, 'म्हाडाच्या अधिकाऱ्यांचे वागणे हा कोर्टाचा अवमान होता' असा ते निकाल देतील हे देखील त्यांनी सांगितले.
आम्हीं तिथून निघालो.

"म्हणजे आज काय झाले ?" बाहेर पडताच माझा प्रश्र्न तयार असतो.
"म्हणजे आज कोर्टाने म्हाडाला शेवटची ताकीद दिली."
"पण ते येत का नाहीयेत ? आणि त्या दिवशी देखील ते आले नाहीत तर ?"
"कारण सरळ आहे...कोर्टात येण्याचे टाळण्याचा ते प्रयत्न करीत आहेत !" फलटणकर म्हणतात.
"म्हणजे आपण त्यांना दाखवूनच दिले नव्हे काय....की भारतीय कायदा हा म्हाडापेक्षा वरचढ आहे...? कारण त्यांनी कितीही टाळायचा प्रयत्न केला तरीही कोर्टात हजर रहाणे त्यांना सक्तीचेच आहे ? आणि असं ते किती दिवस टाळू शकतील ? आणि जर कोर्टाचा त्यांनी अवमान केला आहे असा कोर्टाने निकाल दिला तर ?"
"ह्म्म्म...तर....बघू....बघू काय होतं ते...."

धीर धरणे मला देखील जमावयास हवे.

क्रमश:

Tuesday, 13 December 2011

म्हाडा आणि मी...भाग ८

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७

३ मे रोजी,  म्हाडा, म्हाडाचे दोन अधिकारी व बिल्डर यांच्या विरोधात आम्हीं सिटी सिव्हील कोर्टात तक्रार अर्ज दाखल केले. मूळ दावा ज्या कोर्टात चालू होता त्याच कोर्टात...व सदर तक्रार अर्ज दाखल केल्याची 'नोटीस ऑफ मोशन' त्यांना देण्यात आली.  हा तक्रार अर्ज मुख्यतः म्हाडा व त्याच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध होता. 'Contempt of Court' म्हणजे 'कोर्टाचा अवमान'. जरी हे सर्व, बिल्डरचे हित लक्षात घेऊन म्हाडाच्या दोन अधिकाऱ्यांनी केले होते, तरीही बिल्डरला कोर्टाने जी सूचना दिलेली होती...'भाडेकरूच्या पसंतीची जागा देण्यात यावी', त्या सूचनांचे पालन बिल्डरने केले होते. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या बिल्डरने न्यायालयाच्या आदेशाबाहेर जाऊन कोणतेही कृत्य केले नव्हते. तरी देखील मूळ दाव्यातील सर्व संबंधितांना तक्रार अर्ज पाठवणे गरजेचे होते. ह्या सर्व प्रती रजिस्टर पोस्टाने पाठवल्या.
'नोटीस ऑफ मोशन' म्हणजे काय ?
माझ्या साध्या शब्दांत सांगावयाचे झाले तर 'नोटीस ऑफ मोशन' म्हणजे चालू असलेल्या दाव्यात कोर्टाने नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर तातडीचे मुद्दे वा बाबी कोर्टाच्या नजरेस आणून देण्याच्या प्रयत्नांची 'पूर्वसूचना'. आणि ज्यांच्या विरोधात आपली तक्रार आहे त्यांना ती सुचना पाठवणे गरजेचे. (ज्या आम्ही रजिस्टर पोस्टाने पाठवल्या.)

आम्हीं जो अर्ज केला त्यात नक्की काय होते ?
त्यात सर्व कथानक होते...
१) आम्हीं आमच्या सोयीची जागा बघितली.
२) तिच्याबद्दल म्हाडाला व बिल्डरला कळवले ( पुरावा: पत्र जे तिवारी घ्यावयास नाकारत होते व तरीही तिथे हार न मानता, शिताफीने फलटणकरांनी ते म्हाडा ऑफिसला पोचते केले होते व त्यावर म्हाडाचा शिक्का व सही घेतली होती. तसेच रजिस्टर एडिने देखील हे पत्र पाठवल्याकारणाने पोस्टाची पोच होतीच. )
३) हे पत्र मिळाले असता देखील, म्हाडाने पर्यायी जागेची व्यवस्था न करता, शनिवारी, आमचे सामान आत असताना आमचे घर सील केले ( पुरावा: फोटो, व म्हाडाने दरवाजावर लावलेली नोटीस. )
४) आम्हांला आमच्या घराचा व त्यातील चीजवस्तूंचा उपभोग घेण्यापासून वंचित केले व ३ दिवस रस्त्यावर रहाण्यास भाग पाडले ( पर्यायी जागेत हलविल्याशिवाय ताबा काढून घेण्यात येऊ नये...असे म्हाडाचे अधिनियम सांगतात. ) 
५) म्हाडाचे अधिकारी, श्री. राठोड, ह्यांनी कायद्यासंबंधी अवमानकारक उद्गार काढले व अरेरावी केली.

दरम्यान कोर्टाला उन्हाळी सुट्टी लागली.

जूनच्या पहिल्या आठवड्यात कोर्ट पुन्हा कामावर रुजू झाले. 
जुलैमध्ये बिल्डरने त्यांचा जबाब दाखल केला. तो काय होता ? 'कोर्टाच्या निरीक्षणांनुसार ( observations ) भाडेकरूच्या पसंतीची पर्यायी जागा देऊन त्यामध्ये स्थलांतरण केलेले आहे. सबब आम्हीं कोणत्याही प्रकारे कोर्टाचा अवमान केलेला नाही. व भाडेकरूने देखील अर्जामध्ये आमचे विरोधी, तक्रार नोंदवलेली नाही.'
म्हाडाने जबाब देण्यासाठी वेळ मागून घेतला. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्याचे दरम्यान लेखी जबाब त्यांनी दाखल केला. तो काय होता ?
म्हाडाच्या वकिलीणबाईंचे म्हणणे असे होते...'तक्रारदाराच्या विनंतीनुसार ( म्हणजे आम्हीं ) व कोर्टाच्या सूचनेनुसार बिल्डरने तक्रारदाराच्या पसंतीची पर्यायी जागा दिली असल्याने वादाचा मूळ विषयच शिल्लक राहिला नाही. (हे त्या बाई कोर्टात वारंवार सांगत असल्याचे मी माझ्या कानांनी ऐकले ! ) तसेच कोर्टाने म्हाडाविरुद्ध कोणताही मनाई हुकूम वा आज्ञादेश दिला नसल्याने म्हाडा व त्याच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाचा कोणत्याही प्रकारे अवमान केलेला नाही.' बाईंचे असे देखील म्हणणे होते की, 'आम्हीं भाडेकरूला घराबाहेर काढलेले नाही. घर बंदच होते व त्यात विशेष सामान देखील नव्हते. आम्हीं म्हाडाच्या नियमांना धरूनच कार्यवाही केलेली असून कलम ९५-अ ला आधीन राहून केलेली आहे.  घराला जे सील लावले ते भाडेकरूला पूर्वसूचना देऊनच करण्यात आले."

वकिलीणबाईंनी त्यांचे म्हणणे मांडले. त्यानंतर आम्हीं आमचे म्हणणे मांडले. मी सामान्य नागरिकाच्या भाषेत व नारायण ह्यांनी वकिली भाषेत.
म्हणजे, मी माझे गाऱ्हाणे मांडले...म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी मला दिलेली अपमानकारक वागणूक कोर्टासमोर मांडली. तावातावाने. "६०/७० अनोळखी माणसांसमोर मला व भारतीय संविधानासंबंधी अपशब्द वापरले ! माझ्या वकिलांशी देखील मला बोलू दिले नाही !"...हे आणि असेच बरेच काही...पाच ते दहा मिनिटे !

आमचे वकील नारायण ठासून म्हणाले,"आमच्या अशिलाने म्हाडाला व बिल्डरला पर्यायी जागेची व्यवस्था स्वतःच केल्याचे लेखी पत्र म्हाडाने कारवाई करण्यापूर्वीच ३ दिवस प्रत्यक्ष दिले होते. व त्याची पोचही त्यांनी दिलेली आहे. पर्यायी जागेचा ताबा हा म्हाडाच्या कारवाई नंतर बिल्डरने दिला आहे. त्याच्या ताबा पावतीमध्ये तसे त्यांनी लिहिले असून त्याबद्दल त्यांनी कोणताही वाद वा विरोध केलेला नाही. म्हणजेच कारवाई करताना, म्हाडाच्या नियमांस व कोर्टाच्या सूचनांना अनुसरून म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी 'घर सील करणे' ही केलेली कारवाई म्हणजेच 'आमचे अशिलाचे पर्यायी जागेत स्थलांतर न करताच त्याला घरातून हुसकवून लावणे होय'. हा प्रकार हा अधिकारांचा गैरवापर असून, कायद्याच्या नियमांचे व कोर्टाच्या सूचनांचे उल्लंघन ठरते. व याच कारणांस्तव त्या अधिकाऱ्यांचे हे वागणे हा कोर्टाचा अवमान ठरतो. याची माननीय कोर्टाने नोंद घावी "

न्यायाधीश दोन्ही बाजूंचे म्हणणे एकाग्रचित्ताने ऐकून घेतात. काही नोंदी करितात. आणि पुढील तारीख देतात...
"संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील तारखेस हजर राहावे." न्यायाधीश म्हणतात.
त्यावर वकिलीणबाई विचारतात,"त्याची आवश्यकता आहे काय ?"
"ह्या अधिकाऱ्यांचे यावर प्रत्यक्ष म्हणणे काय आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे." न्यायाधीश म्हणाले.

मी कोर्टात जाते. थोडं फार जे समजतं ते समजून घेते. परंतु, म्हाडाच्या वकिलीणबाईंचे तावातावाने बोलणे माझ्या समजुतीच्या पलीकडचे ठरते. त्या पेशाबद्दल माझ्या मनात अनेक प्रश्र्न उभे रहातात. वाटते...सामान्य नागरिकाला, म्हाडाचे हे अधिकारी विनाकारण इतका मनस्ताप देत असताना देखील ह्या म्हाडाच्या वकिलीणबाई हे असे कसे काय बोलू शकतात ? हे असले प्रसंग त्यांच्या स्वत:च्या बाबतीत घडले तरी देखील त्यांचे मत हे असेच राहील काय ? मी ह्या खेळात अजूनही मुरलेली नाही, हेच हे असे माझे सरळ व बरेचसे बावळट विचार दर्शवून देतात...मी तरीही फलटणकरांसमोर हे बोलून दाखवते. त्यावर फलटणकर हसून म्हणतात..."त्या बाई हे असेच म्हणणार ना...त्या म्हाडाच्या वकील आहेत...त्यांना हे पटो वा न पटो...त्याचा इथे काडीचाही संबंध नाही. त्यावर मी म्हणते, "पण जर हे त्यांना मनातून पटलेच नसते तर त्या इतक्या तावातावाने कोर्टात बोलल्या नसत्या...नाही का ?"

असो...पुढील तारखेची वाट बघावी...कारण त्यादिवशी 'कायद्याच्या गोष्टी आम्हांला सांगू नका'...असे उद्दाम बोलणाऱ्या तिवारी व राठोड ह्यांना मा. न्यायाधीशांनी कोर्टात येण्याचे फर्मावले आहे...

"आता काय होईल ?" मी फलटणकरांना विचारते.
"बघू..." ते उत्तरतात.

क्रमश:

Sunday, 11 December 2011

म्हाडा आणि मी...भाग ७

भाग १ 
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६

जवळजवळ ४५ मिनिटे. फलटणकर आले त्यावेळी मी तिथेच त्याच दगडावर शांतपणे बसून होते.
"चल, वर जाऊया. बघू काय नोटीस लावली आहे."
आम्हीं वर गेलो. आमचा दरवाजा कागदांनी भरून गेलेला होता. किती हे दु:ख ? माझ्या बाबांसाठी, त्यांच्या घराचे काय हे चित्र ? लाल सील आणि पांढरे A४ आकाराचे वेगवेगळे कागद. कुठे माझे बाबा आणि कुठे ही क्षुद्र विचारांची माणसे...त्यांना कायद्याचे महत्त्व आज आता मी नाही दाखवून देणार तर कोण दाखवणार ? बाबांच्याच पद्धतीला अनुसरूनच मी हा लढा देणार. डोळ्यांनी बघितलेली काही दृश्ये...त्यांच्या बारकाव्यांसहित आपल्या पार डोक्यात घुसून रहातात. आणि मग ही दृश्ये, ह्या इमेजेस, आपल्यातील धग कायम जिवंत ठेवतात. जसे आगीत तेल. तीच दृश्ये आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती देणारी ठरतात...मी नाही विसरत तो दरवाजा.



३० एप्रिलला म्हाडाने आमच्या दरवाजावर लावलेली नोटीस:
'आज, दि. ३० एप्रिल रोजी, म्हाडा कलम ९५-अ अंतर्गत, पोलीस बंदोबस्तात निष्कासन (eviction) आयोजिले असता, आपली खोली कुलूपबंद होती. निष्कासनाबाबत यापूर्वी संबंधित रहिवाश्यास लेखी सूचना दिली होती. ही खोली आज पोलिसांसमक्ष सीलबंद करण्यात येत आहे. यानंतरची कारवाई २ मे रोजी स.११ वा करण्यात येईल तरी त्यावेळी हजर राहावे. अन्यथा त्यामधील सामान पोलिसांसमक्ष जप्त करून निष्कासनाची (eviction) कारवाई पूर्ण करण्यात येईल याची नोंद घ्यावी.'
३० एप्रिल शनिवार. १ मे रविवार. 'मुद्दाम शनिवार बघायचा, म्हणजे दोन दिवस आपल्याला मिळतील...ह्या दोन दिवसांत, कोर्टात जावयास, म्हाडा विरुद्ध स्टे ऑर्डर मिळवण्यास नागरिकाला वेळ मिळू नये' हा म्हाडाचा कावा न कळण्याइतकी मी आता दुधखुळी राहिलेली नाही.

तिथून आम्हीं म्हाडाच्या ऑफिसमध्ये दाखल झालो. फक्त फलटणकर आत गेले. मी गाडीत बसून राहिले. राठोड ह्यांच्या बरोबर झालेली तप्त वादावादी ही अशी...
"आम्हीं आमच्या सोयीची जागा बघितली आहे हे कळवणारे लेखी पत्र आम्हीं तुम्हांला दिले होते...जागा १ तारखेपासून मिळणार आहे हे तुम्हांला सांगितले होते....मग हे असले उद्योग करण्याची तुम्हांला काय गरज पडली ?"
"तुम्हीं कुठे जागा बघितलीत ते आम्हांला कुठे कळवलंत ?"
"त्याच्याशी तुमचा संबंधच काय आहे ? आम्हीं आमच्या सोयीची झोपडी बघू...तुम्हांला काय त्याचं ? तुम्हीं, पर्यायी जागा न देता घरातून बाहेर काढून त्या घराचा उपभोग घेण्यापासून प्रतिबंध करीत आहात हे कायद्यात बसत नाही. आणि तुमचे म्हाडाचे अधिनियम वाचा एकदा नीट...हे वागणे बेताल आहे....कोर्टाने २५ तारखेला दिलेल्या आदेशामधील सुचनांची पायमल्ली करणारे हे वागणे आहे. अधिकारांचा गैरवापर आहे....म्हाडाच्या अधिनियमांस धरून नाही"
"तुम्हीं बिल्डरला कळवलंत का ?"
"कळवलं का ? रजिस्टर एडिने पत्र पाठवलंय...कालच. सकाळी भाडेकरार तयार करून मी त्यांना मेल केलाय. आम्ही स्वतः आमची पर्यायी जागा शोधून, त्याची माहिती तुम्हांला लेखी दिली असता, बिल्डरला त्या जागेचे भाडेकरार करण्यास न सांगता, उलट त्याचेशीच हातमिळवणी करून आम्हांला घराबाहेर काढता हे काही बरोबर नाही. तरी त्याला बोलावून घ्या व आम्ही शोधलेल्या जागेचा करार करून त्या जागेचा ताबा आम्हांस देण्यास सांगा तरच आम्हीं आमचे घर रिकामे करू...नाहीतर तुम्हीं तुमचे काम करा....व आम्हीं कोर्टाच्या निदर्शनास ही गैरवर्तणूक आणून देऊ. तुम्हांला आमचं सामान जप्तच करायचंय ना....मग घरातल्या प्रत्येक वस्तूची यादी करावी लागेल...एकेक सुई आणि एकेक बटण....!"
"थांबा, मी बोलावतो त्यांच्या माणसाला." राठोड.
दहा मिनिटांत बिल्डरचे अधिकारी, म्हाडा ऑफिसमध्ये हजर.
"तुम्हीं कधी पाठवलात आम्हांला भाडेकरार ?"
"सकाळीच मेल केलेलं  आहे...तुम्हीं मेल उघडून बघितलं नाहीत त्याला मी काय करणार ?"
"पण त्यात तुम्हीं कोणाची जागा घेत आहात, त्या जागेचा पत्ता काय हे लिहिलेलंच नाहीत !"
"ते कशाला लिहू मी ? त्याच्याशी तुमचा संबंधच काय ? तुमचा संबंध भाड्याशी आहे ना....मग तेव्ह्ढं बघा ना फक्त....मी तुम्हांला त्या मालकाचं नाव आणि पत्ता देणार....आणि मग आम्हांला त्रास देण्यासाठी, तुम्हीं जाऊन त्यांच्याबरोबर झालेला आमचा करार मोडणार....हवंय कशाला हे....तुम्हीं ते भाडं बघा फक्त...नसत्या गोष्टींत दखल देऊ नका....!"
मग फलटणकरांनी तोंडी त्यांना भाडे, डिपॉझीट , इतर अटी व शर्ती सांगितल्या. त्या बिल्डरने मान्य केल्या. त्यानंतरच फलटणकर तिथून बाहेर आले.

"अनघा, आपण त्यांना ह्या जागेच्या मालकाचे नाव दिले नाही, त्यांचा पत्ता दिला नाही म्हणून हा उद्योग केलेला आहे त्यांनी. आपण त्यांचे नाव ह्यांना दिले असते म्हणजे त्यांच्याशी झालेला आपला करार ह्यांनी मोडला असता....आणि मग आपल्याला रस्त्यावर आणायला हे मोकळे.....आणि बिल्डरने ती जी जागा बघून ठेवली आहे तिथे जबरदस्तीने त्यांनी आपल्याला घुसडले असते....हा त्यांचा डाव आहे...आज हे झालंय...ह्याची आपण गंभीर दखल घ्यायचीय...घ्यायचीय ना ?"
"घ्यायचीय ? विचारता कसलं मला...? तुम्हीं सांगा मला पुढे काय करायचं आणि कुठे जायचं....आपण सोडतो काय ह्या अशा माणसांना....? त्यांना काय वाटलं बायकाच आहेत म्हणून काय हे वाट्टेल ते करतील काय ? हे पार शेवटपर्यंत न्यायचं आपण...आत्ता घ्यायचंय का मिडीयाला बरोबर ? सांगा तुम्हीं मला !"
मला माहित असतं...माझं डोकं गरम आहे...
"नाही !...आत्ता नाही मिडीयाला घ्यायचं ह्यात...कायदा आहे...आणि तो आपल्याबरोबर आहे...त्याच्याच मदतीने करणार आहोत आपण हे सगळं...सांगतो...हे आपण काय आणि कसं करायचं..."
आम्हीं तिथून निघालो. संध्याकाळी बिल्डरचा एक माणूस माझ्या घरी आला. मी त्याच्याकडे आम्हीं बघितलेल्या जागेच्या मालकाचे नाव व पत्ता दिला. शनिवार रविवार ह्या दोन दिवसांत आम्हीं शोधलेली जागा, पर्यायी जागा म्हणून देण्याचा, पुढील ३ वर्षांसाठी, करार कागद तयार झाला.

२ मे.
सोमवार.
ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट.
मी, फलटणकर, त्या घराचे मालक, बिल्डरचे अधिकारी असे सर्व तिथे जमा झालो होतो. इथे भाडेकरार रजिस्टर केला गेला.
बिल्डरने पुढील ३ वर्षांचे आगावू भाडे चेक्स घरमालकाच्या स्वाधीन केले. माझ्या हातात किल्ली आली.
"अनघा, बिल्डरचे अधिकारी घराची किल्ली मागतायत....दे त्यांना. बघून येऊ दे त्यांना जागा."
थोड्या वेळाने फलटणकरांना फोन आला..."जागा चांगली आहे...."
फलटणकर हसले...
जबरदस्तीने त्यांना हव्या त्या जागेत आम्हांला ढकलून देण्याचा म्हाडा व बिल्डरचा एक डाव धुळीस मिळाला होता.

३ मे.
मंगळवार.
म्हाडाचे अधिकारी बाराच्या सुमारास आले. सील उघडले. आम्हीं आमच्या सोयीच्या जागी...म्हणजे आईच्या घरापासून पाच दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या घरी, आईचे सामान हलवणे सुरू केले. कामाला वेळ लागणार होता. तेव्हढ्या वेळात मी व फलटणकरांनी कोर्ट गाठले. म्हाडाविरुद्ध व त्यांचे दोन अधिकारी, श्री. तिवारी व श्री. राठोड, ह्यांचेविरुद्ध 'कोर्टाचा अवमान' वैयक्तिक रित्या केल्याचा तक्रार अर्ज दाखल केला.

दिवस मावळला त्यावेळी एक लढाई संपली होती. आईचे सामान तिच्या नव्या जागी हलवले गेले होते. आईला तिच्या योग्य व सोयीची जागा मिळाली होती.
भारतीय कायद्याने, एका जेष्ठ नागरिकाला स्वाभिमान जपण्यास हातभार लावला होता. 'उतारवयात रहाता येण्यासारखे, घर नाही.' असे स्वाभिमानाला ठेच पोचेल असे काही आईच्या आयुष्यात घडले नाही.

मावळत्या सूर्याला साक्षीला धरून, दुसऱ्या लढाईसाठी आम्हीं रणशिंग फुंकले होते.
क्रमश:

Friday, 9 December 2011

म्हाडा आणि मी...भाग ६

२७ एप्रिल ११
बुधवार.
२५ तारखेला कोर्टाने सामान्य नागरिकाचे ऐकले व तसा निर्णय दिला. म्हणून काय सुटकेचा एक श्वास घेता आला ?

"अनघा, आपण आज म्हाडाच्या ऑफिसला जाऊ."
"हो ? का ते ?" मी फलटणकरांना विचारले. मी ऑफिसमध्ये काम करीत होते.
"दुपारी मी येतो. आपण जाऊ तिथे." शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची होती बहुधा.
दुपारी फलटणकर एक पत्र घेऊन आले. तयार पत्र. म्हाडाने व बिल्डरने कोर्टाच्या मतांचे व आदेशाचे बाहेर जाऊन कोणतीही वेडीवाकडी कारवाई आमच्या विरुद्ध करू नये म्हणून कोर्टाच्या आदेशाची प्रत व आम्ही पर्यायी जागेची निश्चिती केलेली असून ती जागा १ मे २०११ पासून आमच्या ताब्यात मिळू शकते ह्या मजकुराचे पत्र.
"पण, त्या म्हाडाच्या वकिलीणबाई  होत्या ना तिथेच ! एव्हढा आरडाओरडा करीत ? मग आता कशाला आपण पुन्हां जाऊन तेच ते सांगायचं त्यांना ?"
"सही कर आणि निघ."
मी सही केली. आम्हीं निघालो म्हाडाच्या ऑफिसला.

तिवारींच्या खोलीत. तिवारींसमोर.
फलटणकरांनी त्यांच्या समोर आम्हीं आणलेले पत्र धरले. तिवारींनी एक ओझरती नजर टाकली त्यावर.
"इसकी कोई जरुरत नाही. ये क्यों दे रहे हैं आप हमको."
"कोर्ट कि ऑर्डर निकली हैं. और हमने एक घर देखा हैं. पैसा देकर निश्चित भी करके रखा हैं. हमको वो एक तारीख से मिल रहा हैं....तो ये सब हमे आपको बताना चाहिये न...इसलिये ये लेटर..." फलटणकर.
"हा तो मालूम हैं ये सब हमको...लेटर देने कि क्या जरुरत....ये लेटर बिल्डर को जाके दे दिजीये...."
"वो भी कर रहे हैं हम...." फलटणकर.
"हा...तो वो किजीये....हमें जरुरत नही हैं इस लेटर कि...."
तिवारी पत्र घ्यायला तयार होईनात. फलटणकर शांत होते. आम्हीं तिथून बाहेर पडलो.
"अनघा, हे पत्र म्हाडाकडे पोचलंच पाहिजे."
"पण ते घेत नाहीयेत ना....आणि ते पोचायलाच पाहिजे असं का वाटतंय तुम्हांला ?"
"काहीतरी गडबड आहे....दगाफटका होईल असं वाटतंय मला...."
"म्हणजे ?" माझे हातपाय थरथरू लागतात....श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो....
"थांब...तू जा ऑफिसला...मी बघतो काय करायचं ते..."
अर्ध्या तासात फलटणकरांचा मला फोन येतो. "म्हाडाला ते पत्र पोचल्याची पोच मिळाली."
"मिळाली ? कशी ? घेतलं त्यांनी आपलं पत्र ?"
"त्या पत्रावर म्हाडाचा शिक्का व तिथल्या अधिकाऱ्यांची सही हवी होती...आणि ते मिळालंय आपल्याला." फलटणकर इतकंच सांगतात.

२८ एप्रिल.
गुरुवार.
तेच पत्र म्हाडा व बिल्डरला रजिस्टर एडीने पाठवून दिले.

२९ एप्रिल.
शुक्रवार.
शांतता.
...वादळापुर्वीची ?

३० एप्रिल
शनिवार.
"तू जी जागा निश्चित केली आहेस त्या जागेचा पत्ता व त्या घरमालकाचे नाव मला एसेमेस कर." फलटणकरांचा सकाळीच फोन आला.
"काय झालं ?"
"झालं काही नाही...पाठव एसेमेस"
थोड्याच वेळात फलटणकरांनी त्या जागेचा भाडेकरार तयार केला व बिल्डरला इंटरनेटद्वारा पाठवून दिला.

शनिवारी माझ्या डोक्यावर भरमसाठ कामे असतात. वाणी, बॅंका, हे बिल ते बिल...वगैरे वगैरे. ती कामे करीत मी फिरत होते.
"आई, म्हाडाची माणसं आलीयत. त्यांनी तुला जागेवर बोलावलंय. " घरून लेकीचा फोन आला.
मी फलटणकरांना फोन लावला. त्यांच्या कानावर हे घातलं.
फलटणकरांनी तिवारींच्या हाताखालचे अधिकारी, श्री.राठोड ह्यांना फोन लावला. त्यांच्यात घडलेला संवाद हा असा....
"काय झालं...जागेवर का आलायत तुम्ही ?"
"व्हिझीट द्यायला आलोय. मॅडमना बोलावून घेतलंय इथे."
"तुम्हीं कुठलीही पूर्वसूचना न देता आलेला आहात. मी मुंबईबाहेर आहे...मॅडम देखील बाहेर आहेत...हे असं अचानक येण्यामागचा हेतू काय ?"
"काही नाही हो....व्हिझीट द्यायला आलोय फक्त."
फलटणकर मला फोन करतात.
"अनघा, ते व्हीझीटला आलेत."
"मग मी जाऊ का तिथे ? माझी कामं आटपत आलीयत..."
"बघ...जमलं तर जा..."

का कोण जाणे, माझी गाडी आईच्या गल्लीत वळते. गल्लीच्या पार दुसऱ्या टोकाला आईचं घर आहे. पण, गल्लीत शिरता शिरताच मला काहीतरी गडबड असल्याची जाणीव होऊ लागते....स्टीयरिंग व्हीलवरचा माझा हात थरथरू लागतो. जन्माला आल्यापासुनची ही माझी गल्ली...काही तरी विपरीत घडणार असण्याची धोक्याची घंटा ती माझ्यासाठी वाजवू लागते...
पोलिसांच्या गाड्या, म्हाडाचे टेम्पो....पोलीस....महिला पोलीस....गर्दी....आमची गल्ली भरून गेलेली.
मी माझी गाडी बाजूला लावली. उतरले आणि पुढे गेले.
अनोळखी....असंख्य अनोळखी माणसे...चारपाच गाड्या...अनोळखी चेहेरे...भीतीदायक चेहेरे...बाबा ज्या दिवशी गेले त्या दिवशी आमची गल्ली भरून गेली होती....सगळ्या आप्तांनी...गर्दी तशीच होती...मात्र असंख्य अनोळखी चेहेऱ्यांनी भरलेली. बेदरकार चेहरे.
मी इमारतीच्या आवारात शिरते. सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळतात. इमारतीच्या दरवाजातून तिवारी बाहेर पडतात. मागे राठोड. चार पाच पोलीस इन्स्पेक्टर, साध्या गणवेशातील पोलीस. खाकी साडीतील महिला पोलीस. बिल्डरचे अधिकारी...त्यातील एखाददुसरा चेहेरा ओळखीचा.
"काय झालं ?" मी राठोडना विचारते. तिवारी माझ्या उजव्या बाजूने पुढे निघून जातात.
"सीलबंद केलंय आम्हीं तुमचं घर..."
"सीलबंद केलंय ? म्हणजे ?"
"आम्हीं आलो तेव्हा घर बंद असल्याकारणाने, आमची नोटीस तुमच्या दाराला चिकटवलेय आणि घर सीलबंद करून टाकलेलं आहे."
"पण असं का केलंत तुम्हीं ? कोर्टाची ऑर्डर माहितेय ना तुम्हांला ? आणि घर बंद होतं म्हणजे ? आमचं पाणी, वीज तोडलेलं असताना...आणि अर्धी बिल्डींग पाडलेली असताना... रहाणार कशी आहे माझी आई इथे ? " मी फलटणकरांना फोन लावता लावता राठोडांना विचारते.
"ओ ! त्या कोर्टाच्या गोष्टी नका सांगू हो आम्हांला ! आणि तो फोन ठेवा बाजूला ! आमच्याशी बोलताना फोनवर बोलायचं काम नाही !"
"म्हणजे ? तुम्हांला कायद्याच्या बाबी सांगायच्या नाहीत ? मग कसल्या गोष्टी सांगू तुम्हांला ? आणि काय म्हणून मी आमच्या वकिलांना फोन लावायचा नाही...?"
"आमच्याशी बोलताना वकिलाला फोन लावायचा नाही ! बस्स !" उद्धट स्वरात राठोड.
सगळी गर्दी आता आमच्या आसपास एकवटलेली असते. माझ्या बाजूला पोलीस इन्स्पेक्टर. "साहेब, हे काय आहे ?" मी त्यांना विचारते.
"आम्हांला काहीही माहित नाही मॅडम. आम्हांला ऑर्डर दिली, आम्हीं आलो."
तिवारी दृष्टीआड.
"सोमवारी आम्हीं इथे येऊ. सील उघडू. सामान बाहेर काढू...आणि जी बिल्डरने जागा बघितली आहे तिथे तुमचं सामान नेऊन टाकू !" राठोड.
"हे असं कसं करू शकता तुम्हीं ? कोर्टाची ऑर्डरच आहे मुळी की योग्य कायदेशीर प्रक्रियेशिवाय आमच्या घराचा ताबा तुम्हीं नाही घेऊ शकत...!"
"बाई, आम्हीं काय करू शकतो ते कळेलच तुम्हांला आता..."
राठोड नाहीसे. गर्दी विरळ.
मी तिथेच एका दगडावर बसते. फलटणकरांना फोन लावते.
"मी ठाण्याहून निघालोय अनघा. येतोय तिथे. तू थांब तिथेच."

मी खालीच दगडावर बसून रहाते. डोकं गरम झालेलं आहे. श्वास घेणं अवघड...
...माझा तमाशा...म्हाडाने आज माझा तमाशा केला...माझ्याच गल्लीत...माझ्याच घराखाली...हे घर विश्वास पाटलांचं आहे...म्हाडाच्या लक्षात आलेलं नाही पण हे घर विश्वास पाटलांचं आहे....विश्वास पाटलांच्या घराला म्हाडाने सील लावलं....ह्या असल्या धमकावणीला पाटील भीक घालत नाहीत...मी विश्वास पाटलांची मुलगी आहे...मी ही अशी हार मानत नाही...म्हाडा...तुम्हीं...हे करायला नको होतं...
क्रमश:

Thursday, 8 December 2011

म्हाडा आणि मी...भाग ५


२१ एप्रिल
ऑफिसचे कामकाज आटोपून घरी आले तेंव्हा आजही म्हाडाची नोटीस माझी वाट बघत होती. म्हाडाच्या नियम क्रमांक ९५ अ अंतर्गत सात दिवसांची नोटीस दिली होती. ७ दिवसांत घर रिकामे करा अन्यथा जबरदस्तीने घर रिकामे करून दुसऱ्या जागेत हलवले जाईल अशी ही तंबी.
"९५ अ ?"
"९५ अ ह्या नियमाखाली 'ज्या इमारतीमधील ७०% भाडेकरूंनी विकासासाठी संमती दिलेली आहे व म्हाडाने 'ना हरकत पत्र' दिले आहे, अशा इमारतीमधील ताबा न सोडणाऱ्या ताबेदारांना, पूर्व सुचना देऊन, सामानासहित, पर्यायी जागेत स्थलांतरित करण्याचे अधिकार म्हाडाकडे आहेत." मी विचारलेल्या प्रश्र्नाला फलटणकर उत्तर देतात.

बिल्डरचा ब्रोकर हा शेवटी बिल्डरचा ब्रोकर. तो बिल्डर जे सांगेल तेच ऐकणार. त्यामुळे मी आधीच आमच्या परिसरात काम करणारे व माझ्या ओळखीतील दोन ब्रोकर्सना सांगून ठेवले होते. त्यातील एकाने दाखवलेली जागा सोयीची होती, शेजार चांगला होता, फक्त ती जागा जुलै महिन्यात रिकामी होणार होती.
"अनघा, तुझ्या त्या ब्रोकर्सना सांग...तातडीने आईच्या योग्य जागा शोधायला." फलटणकर मला फोनवर म्हणाले.
"अहो, पण मी शोधतेच आहे ! रोज उठून इथे फिरतेय मी आमच्या गल्ल्यांत ! काय करू आता आणखी ?"
"घाई कर अनघा....बस इतकंच !"
"बरं." बिल्डर्सच्या ब्रोकरबरोबर पार तासाच्या अंतरावर व आमच्या ब्रोकर्सबरोबर आसपासच्या गल्ल्यांत मी फिरत होते. कुठे चौथ्या मजल्यावर घर...लिफ्ट नाही...तर कुठे दूर कोसावर. शेवटी एक शोध लागला. आईच्या घरापासून दहा मिनिटांवर, चवथा मजला, लिफ्ट व मदतशील वॉचमन. ऐशी वर्षाची आई. संधिवात.
"एक चांगली जागा मिळतेय. पण मग ते गृहस्थ लगेच पैसे मागतायत. काय करू ? " मी फलटणकरांना फोन लावला.
"आगावू भाडे दे आणि जागा निश्चित कर." फलटणकर म्हणाले. मी रोख दहा हजार त्या घरमालकाला दिले. 

२५ एप्रिल.
मी. अॅडव्होकेट फलटणकर. आणि वकील नारायण. कोर्टात हजर होतो. कोर्टास आम्ही म्हाडाच्या सदर नोटीसची आणि १८ एप्रिलच्या म्हाडाच्या निर्णयाची माहिती देत होतो. म्हाडातर्फे त्यांच्या जेष्ठ वकिलबाई व बिल्डरचे वकील दस्तुरखुद्द वर्मा हजर होते.
बाई बोलू लागल्या. उजळ रंगाच्या वकिलबाई.
"जज्जसाहेब, इतर सर्व भाडेकरू जागा सोडून कधीच गेले आहेत. बिल्डरने त्यांना जागा दिल्या आहेत. बिल्डर त्या त्या घरांचे भाडे भरतोय. ह्या एका भाडेकरूमुळे सर्व काम थोपले आहे. आम्हांला बिल्डरने विनंती केली म्हणून आम्ही इतर भाडेकरूंच्या हितासाठी म्हणून प्रयत्न करीत आहोत......"
"आम्ही कधीही म्हटले नाही की आम्हांला तेथून हलायचेच नाही. आमचे फक्त इतकेच म्हणणे आहे की इथे ऐशी वर्षाच्या जेष्ठ नागरिकाचा प्रश्र्न आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीची योग्य जागा देण्यात यावी...." आमचे वकील नारायण.
वादविवाद सुरु झाला होता. म्हाडाच्या बाई म्हाडाची बाजू आवेशाने मांडीत होत्या. वकील वर्मा, पुढे सरसावले होते. दालनाच्या उजव्या हाताला मोठ्या खिडक्या. त्यातून येणारा प्रकाश. जुन्या पिवळ्या भिंती. वर उंचावर छत. काही लाकडी बाकडी. काही खुर्च्या. समोर जज्जसाहेबांच्या डाव्या हाताला बसलेल्या टायपिस्ट बाई. सतत टायपिंगचा कानी पडणारा आवाज. खर्रकन त्यांनी मशीनची पाटी सरकावी व त्याचा आवाज न्यायदालनात घुमून जावा. कोर्ट भरून गेलेलं आहे. काळ्या कपड्यांतील वकील...व माझ्यासारखे अनेक सामान्य नागरिक. मी आता अजून नाही एका जागी बसू शकत. मी पुढे येते. पुढे. अजून पुढे. माझ्या डाव्या हाताला साक्षीदाराला उभे रहाण्यासाठी लाकडी चौकट. मी त्याच्याच अलीकडे आता जाऊन उभी रहाते.
"आम्ही ह्यांना चिक्कार जागा दाखवल्या. हे मुद्दाम आमची अडवणूक करण्यासाठी हे करत आहेत. फक्त त्रास देण्यासाठी हे सर्व चालले आहे." वर्मा.
"आमच्या सोयीची जागा आम्ही शोधली आहे. तिथे आम्ही बयाणा देऊन ती जागा निश्चित देखील केलेली आहे. फक्त ती जागा आम्हांला एका आठवड्याने म्हणजे एक मे पासून मिळू शकत आहे." नारायण.
"आम्हीं पूर्वीच ह्यांच्यासाठी जागा बुक केली आहे...आणि डिसेंबरपासून वर्षभराचे भाडे देखील भरले आहे...आता आम्हीं का दुसऱ्या जागेचे पैसे भरायचे ? व का आम्ही आमचे नुकसान करून घ्यायचे ? अजिबात करणार नाही आम्ही असे..." वर्मांचा आवाज चढत होता.
"साहेब, आम्हांला या जागेविषयी फेब्रुवारीमध्ये सांगितले...मग ते डिसेंबरपासून कशासाठी व कोणासाठी त्या जागेचे पैसे भरतायत ? ती जागा बिल्डरने दुसऱ्या कोणासाठी तरी भाड्याने घेतली असावी व आता तो माणूस तयार नाही  म्हणून आम्हांला तिथे शिफ्ट होण्याची जबरदस्ती करत आहेत." शांत स्वरात नारायण.
मला आता हे सर्व सहन होण्याच्या पलीकडे गेलेले आहे. माझ्या आईचा तिथे होत असलेला उल्लेख...वर्मांचा चढा आवाज...सगळंच...मी पुन्हापुन्हा फलटणकरांकडे नजर टाकते. ते एकाग्र चित्ताने सर्व ऐकत आहेत. आमची नजरानजर होते...ते फक्त मला मान डोलावतात...
मी जज्जसाहेबांकडे नजर लावते...थोडं वाकून त्यांना विनंती करते...मला बोलू देण्याची विनंती...जज्जसाहेब मान डोलावून परवानगी देतात. मी एक निमुळती पायरी चढून चौकटीत शिरते. हातात बाबांचा फोटो दडवून ठेवलेला आहे. बाबा माझ्याबरोबर आहेत.
"साहेब, ज्या बाईबद्दल ही सर्व बोलणी चालली आहेत ती माझी आई आहे. ऐशी वर्षाची आहे ती. तिला संधिवात आहे. ती ठीकपणे नीट नाही चालू शकत. जिने नाही चढू शकणार. गेली पन्नास वर्षे ती ज्या परिसरात राहिली आहे तिथे त्याच परिसरात तिला जागा दिली जावी इतकीच फक्त आम्हीं मागणी करत आहोत. " मी स्पष्ट स्वरात माझे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करते.
"म्हणजे कुठे द्यावी आम्ही जागा ? नरीमन पॉइंट ? की ब्रिज कॅन्डी ? ह्यांच्या मागण्याच अफाट आहेत !" संतापलेले वर्मा आता तीव्र स्वरात.
"चालता येत नाही म्हणजे काय ? आता जी जागा बिल्डरने बघितली आहे तिला लिफ्ट आहे....मग काय प्रॉब्लेम काय आहे ह्यांना ? फक्त त्रास देण्यासाठी चालू आहेत हे ह्यांचे प्रकार !" तावातावाने वकीलबाई.
"माझ्या आईचा हात संधिवातामुळे थोडा वाकडा झाला आहे. तिला एकटीला नाही तो दरवाजा उघडता येणार...जिन्याच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत..." माझा संताप संताप होतो...आजारपण चव्हाट्यावर...एखाद्या दु:खद गोष्टीचं भांडवल केल्यागत...ही बाई मला हे भाग पाडतेय....माझे डोळे आता पाण्याने भरू लागतात....मला नाही कळत...मला ह्या वकिलबाईंचा संताप आलाय की माझी अगतिकता सहन होत नाहीये...
नारायण, जज्जसाहेबांकडे फक्त नजर टाकतात.
जज्जसाहेब निर्णय ऐकवू लागतात.
मला काहीही ऐकू येत नसते. मी फलटणकरांकडे नजर टाकते. ते फक्त मला खुणेने सांगतात...तिथून बाहेर ये. मी बाहेर येते. ते फक्त मला सांगतात...शांत हो...मी बाकावर ठेवलेली माझी बॅग उचलते व दालनाबाहेर पडू लागते....वाकून जज्जसाहेबांना मानवंदना देण्याची न विसरता.
बाहेर बाकावर जाऊन बसते. अजून डोळ्यातून पाणी येतच आहे...अजून मला कळत नाही...हे पाणी का येतंय...अजून मला कळलेलं नाही...जज्जसाहेब नक्की काय बोलले आहेत....त्यांनी काय निकाल दिला आहे...ते जे बोलले त्याचा अर्थ काय आहे...
अचानक माझ्या बाजूला कोणी एक मध्यमवयीन माणूस उभा रहातो...."आता कशाला रडताय...तुम्हीं जिंकला आहात...जज्जसाहेबांनी तुमचं ऐकलंय..."
"हो का ?' मी त्यांना विचारते. 
दहा मिनिटे अशीच जातात. फलटणकर व नारायण बाहेर येतात. मी बाबांचा फोटो माझ्या पर्समध्ये पुन्हां ठेवून देते. नारायण माझ्याकडे बघून फक्त एक स्मित हास्य करतात.
आम्हीं तिथून निघतो...
खाली रस्त्याला लागल्यावर मी फलटणकरांना विचारते..."काय झालं नक्की ? काय म्हणाले जज्जसाहेब ?"
"काही नाही...न्यायाधीशांना आपलं म्हणणं पटलेलं आहे. त्यांनी बिल्डरला सुचना दिल्या आहेत...की ह्या वृद्ध बाईंच्या सोयीची जागा त्यांना देण्यात यावी."
"पण म्हणजे ते काय म्हणाले ?"
"भाडेकरूचे कुटुंबात एक वृद्ध स्त्री असल्याने व ही गोष्ट म्हाडा व बिल्डर यांस मान्य असल्याने, बिल्डरने भाडेकरूच्या सोयीची जागा, केवळ बिल्डरने आगाऊ पैसे भरले आहेत, या मुद्द्यावर नाकारणे हे अयोग्य आहे. बांधकामाची परवानगी मिळूनदेखील ४ वर्षे कोणतीही हालचाल न करणाऱ्या बिल्डरने, ही बाब केवळ 'प्रेस्टीज इश्यू' करता कामा नये. कोर्टाच्या मतांचे व सूचनांचे बिल्डरने पालन करावे व योग्य कायदेशीर प्रक्रियेशिवाय घराचा ताबा काढून घेऊ नये "
"म्हणजे हे आपल्या बाजूने झालं न ? मग आता आपण तर जागा बघितलीय ना ? तिथे राहू शकेल ना आई आता ?"
"हो...बघू आता पुढे काय होतं ते..."
...मी गप्प बसते.

माझा आजचा दिवस अजूनही संपलेला नसतो....ऑफिसमध्ये काम अर्ध्यावर टाकून मी हळूच बाहेर निसटलेले असते...पुन्हां जाऊन अर्धवट ठेवलेले काम पुरे करणे गरजेचे असते.
नोकरी सांभाळणे महत्त्वाचे.

क्रमश:

म्हाडा आणि मी...भाग ४

 
जानेवारी महिना बिल्डरने आमच्या मार्गात अडथळे उभे करण्यात घालवला. व आम्ही अडथळ्यांचे पुरावे गोळा करत गेलो.
वाममार्गे जायचे तू ठरवलेस. आमचे पाणी बंद. वीज बंद. दारात दगड. काचा फुटक्या. स्वत:च्या वकिलातर्फे मला धमकावणीवजा निरोप.
ह्याने हरणारी मी नाही. उलट तू सामान्य नागरिकाची शक्ती ओळखत नाहीस...आणि त्याची सबळ जाणीव, तुला कायदेशीररित्या करून देणे हे सुजाण नागरिक म्हणून मी माझे कर्तव्य समजते.

१ फेब्रुवारी.
वकील नारायण व अॅडव्होकेट फलटणकर ह्यांनी विचारविनिमय करून कागदपत्र तयार केले होते. त्या दिवशी ते सर्व कागद, कोर्टात रीतसर दाखल केले गेले. इथे आमच्या रस्त्यातील दगड दूर झाले.
फुटक्या काचा तशाच राहिल्या. घर अंधारलेलंच राहिलं.

काही दिवस असेच गेले.
"दादरला एक जागा बघितली आहे. मॅडम, तुम्ही बघून घ्याल काय ?" बिल्डरच्या माणसाचा फोन आला.
"ठीक. कधी आणि कुठे ?"
आईच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर. मी चालत गेले तर अर्धा तास. आईने चालायचं म्हटलं तर पंचेचाळीस मिनिटं. मला त्या बिल्डींगच्या दारापाशी बिल्डरचा माणूस, सचिन भेटला. आता मात्र मी फलटणकरांना देखील बरोबर घेतलेलं होतं. पायऱ्या तुटलेली इमारत. चिंचोळे प्रवेशद्वार.
"हे खूप दूर आहे. मी तुम्हांला आधी देखील सांगितले आहे. आईला माझ्या शक्य नाही इतक्या दूर एकटीने रहाणे."
"अहो, चांगला रंग लावून घेतला आहे. लिफ्ट आहे, काय प्रॉब्लेम काय आहे ? आम्ही ह्या घरमालकाचे पैसे देखील दिले आहेत."
"त्याला मी काय करणार ? तुम्हांला प्रॉब्लेम समजून घ्यायचाच नाही आहे तर मी आता आणि काय बोलणार ?"
मी तिथून निघाले. ऑफिसला पोचायला उशीर झालेला होता. पाच लेटमार्क, सुट्टीचा एक दिवस वजा.

१२ मार्च.
मी ऑफिसमधून घरी परतले. घरात माझ्यासाठी वाट बघत होती, म्हाडाची नोटीस. सक्त ताकीद. ताबडतोब घर खाली केले जावे. दुसऱ्या दिवशी त्याला प्रत्युत्तर म्हणून हरकत पत्र मी पाठवून दिले. अतिशय विचारपूर्वक फलटणकर पत्र तयार करून देत असत. मी ऑफिसमध्ये बसून माझ्या हस्ताक्षरात लिहून काढत असे. तीन प्रती निघत. म्हाडासाठी एक, बिल्डरसाठी एक व एक आमच्यासाठी. न चुकता सर्व पत्रव्यवहार, व्यवस्थित रजिस्टर एडीने.

१६ मार्च.
मी ऑफिसमध्ये होते. फोन वाजला. मोबाईल सांगत होता...'माझं घर'. मी फोन उचलला.
"आई, आपल्या दारावर आत्ताच म्हाडाच्या माणसांनी येऊन काहीतरी मोठेमोठे पांढरे कागद चिकटवलेत ! का म्हणून त्यांनी माझ्या दारावर हे असं केलं....? मी नाही ठेवणार हे कागद असे माझ्या घरावर....हे सगळं थांबव तू आई...!!! ताबडतोब !" माझी लेक.
आईच्या घरापासून पाच मिनिटांवर असलेल्या माझ्या घरी म्हाडा येऊन पोचले होते. माझ्या मालकीच्या घरावर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी येऊन सात आठ कागद चिकटवले होते. आता घरातील माणसांवर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न चालू झालेला होता. मी घरी पोहोचेपर्यंत लेकीने पाणी घेऊन कागद खरवडून काढले होते...आणि तरीही काही पांढरे तुकडे शिल्लक होतेच. तिच्या लाडक्या घरावर झालेले हे अत्याचार सहन न होऊन लेक निघून गेली होती....कोण जाणे कुठे. मी आले त्यावेळी आमचे वॉचमन मला खालीच भेटले. "
"मॅडम, आज दोन तीन म्हाडाचे अधिकारी इथे आले होते...तुम्हांला काहीबाही बोलत होते...."
"काय म्हणाले ?"
"म्हणे सुशिक्षित असून देखील ही माणसे अशी वागतात...!"
"गोसावी....हे सगळं मला त्रास देण्यासाठी चालू आहे...दुसरं काहीही नाही...."
"हो. ते कळतं मॅडम..पण फारच मोठ्यामोठ्याने आरडाओरडा करत होते."

माझी लेक दुखावली. हे म्हाडाने फार वाईट केलं.
आता हे असंच नाही संपणार....
माझा निश्चय अधिक बळावला.

दुसऱ्या दिवशी फलटणकरांनी मला पत्र मेल केलं. मी लिहून काढलं. रजिस्टर एडिने पाठवून दिलं...
निषेध लेखी नोंदवला गेला.

काही दिवस उलटले आणि म्हाडाकडून उत्तर आले.
'प्रत्यक्ष सुनावणीस ५ एप्रिल ही तुम्हांला तारीख देण्यात आलेली आहे. त्यावेळी म्हाडाच्या ऑफिसमध्ये यावे. वेळ दुपारचे ३.'

५ एप्रिल उजाडला. अॅडव्होकेट फलटणकर व मी, आम्ही पावणे तीनला म्हाडा ऑफिसला पोचलो. तिथे आमच्या आधीच म्हाडा अधिकारी श्री. तिवारी ह्यांच्या खोलीत सुरज डेव्हलपर्सचे वकील वर्मा व त्यांचे चार अधिकारी हजर होते. म्हाडाचे एक लेखनिक माझ्या डाव्या बाजूला कागद व पेन घेऊन बसलेले होते. बैठकीची नोंद लिहून घेण्यास. एक तिवारी व वर्मा, सोडल्यास एकजात मराठी माणूस...सर्व म्हाडा व बिल्डरचे नोकरदार. अॅडव्होकेट फलटणकरांनी बैठकीच्या सुरुवातीलाच वकील वर्मा व बिल्डरची माणसे ह्या बैठकीला हजर असण्याबाबत विरोध दर्शवला. श्री. तिवारी. काळसर पोट सुटलेला, निबर माणूस. नाकावरील चष्म्यातून दिसणारे बारीकसे डोळे. पोट पुढे काढून चालण्याची ढब. समोरच्यापेक्षा आपल्याला अधिक कळतं...किंवा समोरच्याला अजिबातच काही कळत नाही असा एक भाव कायम चेहेऱ्यावर भाव पसरलेला.
"उससे क्या होता है...ऐसा कुछ नही...वो वकील है...आप अपना घर खाली नही कर रहे है....उससे उनको तकलीफ हो रही है...इसलिये वो आये है....आपको objection है तो वैसा हम minutes of the meeting मे लिख देते है...कोई प्रोब्लेम नही है..." लेखनिकाकडे नजर टाकून..."लिख लो आप...उनका objection है ऐसा लिख दो..."
"तुम्ही जे आम्हांला ह्या मिटिंगला येण्यासाठीचे पत्र पाठवलंत त्यात खाली CC to builder असे कुठेही लिहिलेले नव्हते...नाहीतर आम्हीही आमच्या वकिलांना घेऊन आलो असतो  ह्या मिटींगला...नाही का ?"
"क्या अब येही लेके बैठना है...या आगे बात करें ?" तिवारी.
तुला मराठी नाही येत का...मग तर मी तुझ्याशी मराठीतच बोलणार...मी देखील हट्टाला पोचते. तिवारी हिंदीत...फलटणकर समजूतदार व चाणाक्ष अॅडव्होकेटसारखे हिंदीत...व मी माथेफिरू बाईसारखी शुद्ध मराठीत...अशी ती बैठक सुरु झाली.
"देखिये तिवारी साब, अब सिर्फ ये tenant बाकी रह गये है...और उनके कारण काम आगे हो नही पा रहा है....सबका इसमे नुकसान हो रहा है....ये बात ध्यान में लेनी चाहिये..." वर्मा.
"मला वाटतं आमच्यामुळे फक्त काही महिने गेले आहेत...त्या आधी दहा वर्षांपूर्वी सर्वांच्या स्वाक्षऱ्या होऊन देखील काम सुरु केले नाही त्याचं काय ? त्यावेळी बिल्डरने ३ वर्षांत नवीन घराचा ताबा देऊ असे सांगितले होते !" मी संधी सोडत नाही.
"देखो...अब ये सब बातें पुरानी हैं...अब काम चालू हो रहा है...तो आपको वो देखना चाहिये....अब आप क्यों काम रुकवा रही हैं ?" तिवारीला मराठी कळतं. लेखनिक बाजूला मिनिटे टिपून घेण्याच्या प्रयत्नात. वर्मा व तिथे उपस्थित एकजात सर्व मान डोलावत.

पाऊण तास बैठक चालली.
तिवारीने आपण अतिशय सुंदररित्या भाडेकरू व बिल्डर ह्यांत मिळवणी केली आहे अशी एक हवा त्या खोलीत केली. फसवी. ढोंगी. तोंडदेखलेपणाने त्याने वर्मा व बिल्डरच्या माणसांना सांगितले..."आप देखो, उनको जैसे चाहिये वैसे पास में किधर तो जगह दे दो..." "और आप को थोडा थोडा कॉपरेट करना चाहिये...देखो, हम म्हाडावाले आपकी मदद करना चाहते है..." हे आम्हांला. यावर, "आम्ही ह्यांच्यासाठी एक जागा बघून ठेवली आहे...त्यांना ती दाखवली देखील आहे...आता दुसरी जागा बघणे आम्हांला शक्य नाही...कारण आम्ही ह्या जागेचे डिसेंबरपासून पैसे भरले आहेत...फार तर आता त्यांनी तिथे जावे व नंतर पुढच्या वर्षी आम्ही त्यांना दुसरी जागा देऊ. म्हाडानेच उलट त्यांना त्या जागी जावयास सांगावे." वर्मा.

म्हाडाने बैठकी अखेरीस काय निर्णय ऐकवला ?
"जो अब बिल्डर बोल रहें है वहाँ आप अपना सामान शिफ्ट कर दो...बाद में वो बोल रहें है...तो जहां आपको चाहिये वहा जगह वो दे देंगे...आप को उनपे विश्वास दिखाना चाहिये.... आपकी हम मदद ही कर रहें है...पर आप कॉपरेट करो...नही तो कोई सोलुशन नही निकलेगा......" खुर्चीत कधी मागे रेलून कधी पुढे येऊन...उजवा हात टेबलावर पुढेमागे करत...वारंवार वर्माकडे नजर टाकीत...तिवारी.

पुढल्या पाचव्या मिनिटाला आम्ही तेथून निघालो. ढोंगी तिवारीमुळे मी संतापून. फलटणकर विचारात गुंतून.

५ एप्रिलला झालेली सुनावणी लेखी माझ्या हाती पडली तारीख १८ एप्रिल.

'तुमचे सोयीच्या पर्यायी जागेची मागणी ही अयोग्य असून बिल्डर जी जागा देऊ करीत आहे, ती जागा म्हाडाने नजरेखालून घातली आहे व ती रहाण्यास पूर्णत: योग्य व सोयीची आहे. तेव्हा त्वरित तुमचे सामान हलवून घर रिकामे करावे.'

तोंडी सुनावणी व लेखी अहवाल ह्यांत तफावत.
बिल्डर व म्हाडा युती...ह्याचा एक पुरावा.
क्रमश:

Wednesday, 7 December 2011

म्हाडा आणि मी...भाग ३

भाग १
भाग २  

...अशी आम्ही बिल्डरकडे काय मागणी केली होती ? गेली पन्नास वर्षे आई ज्या भागात रहात आहे, त्याच भागात तिला बदलीची जागा देण्यात यावी. दूर कुठेतरी तिला नेऊन ठेऊ नये इतकेच. सध्या आपण वर्तमानपत्रात अनेकदा वाचतो. मतांच्या हव्यासापोटी, मुंबईतील वाढत्या झोपडपट्टीवासियांना देखील जिथे झोपडी तिथेच कायमस्वरूपी जागा द्यावी असले आदेश काढले जातात. इथे आईचे घर पाडून दुसरी इमारत बांधण्यात येणार होती. त्या बांधकामाच्या काळात तात्पुरते निवास स्थळ म्हणून तिला देण्यात येणारी जागा त्याच परिसरात द्यावी इतकेच मागणे होते. आज बांधकाम होणार ह्या निर्णयाला दहा वर्षे उलटून गेलेली आहेत. घरमालकांनी अग्रीमेंट करीत असता त्यावर वेळेचे काहीही बंधन न टाकल्याने इमारत कधी तयार होणार, घराचा ताबा कधी मिळणार ह्या प्रश्नांना कोणतेही उत्तर कोणाकडेही नाही. आईचे आता वय झालेले आहे. तिने एकटे राहावे की मुलींकडे राहावे हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. ह्या उतारवयात दूर कोठे नव्या जागी बस्तान ठेवणे काय शक्य आहे ? म्हणजे 'आता मला रहाता येण्यासारखे घर नाही आणि म्हणून ह्या वयात मला मुलीकडे राहावे लागते' ही कमीपणाची भावना तिने काय म्हणून घ्यावी ?

दिवाळीची सुट्टी संपली. कोर्टचे कामकाज चालू झाले. तोपर्यंत बिल्डरला शांत बसावे लागले होते. नाईलाजास्तव.
कोर्ट भरले होते. तारीख होती. मी कोर्टात शिरले. बिल्डरने कोर्टात अर्ज दिला. आमच्या म्हाडा विरोधी दाव्यात स्वत:ला दाखल करून घेण्याबाबतचा. अजून कोर्ट बसायचे होते. जज्जसाहेब अजून यायचे होते.
माझ्या रांगेत दोन खुर्च्या सोडून एक साठीचे गृहस्थ बसले होते. हसतहसत. त्यांच्या सततच्या हसण्यामुळे व मान डोलावण्याच्या लकबीमुळे माझे लक्ष वेधले गेले.
"तुम्ही तुमचे हक्क पूर्ण वापरले आहेत इथे." रिकाम्या कालावधीत हे गृहस्थ माझ्याशी बोलू पहात होते.
"म्हणजे ?" मी गोंधळून विचारले.
"तुम्हांला चुकीचा सल्ला दिला जातोय...व तुम्ही चुकीच्या वाटेवरून चालला आहात..."
"आपण कोण ?" मी विचारले.
"वर्मा. मी सुरज डेव्हलपर्सचा वकील."
"हो का ? नमस्कार." मी हलकेच हसले. हात जोडून नमस्कार केला. "आम्हांला चुकीचा सल्ला मिळतोय व आम्हीं चुकीच्या रस्त्यावर चाललोय असे तुम्हांला का बरे वाटते ?"
"कारण माझा तेव्हढा अनुभव आहे. मी खूप वर्ष हीच कामे करतोय....you don't know anything...."
"That's true ...I really don't know anything."
"So now let me tell you some facts here...."
"Ya..please do that...."
"भाडेकरू आणि म्हाडा किंवा बिल्डरच्या केसेस मध्ये कायम भाडेकरू हरतो...व नुकसानभरपाई म्हणून भाडेकरूला उलटे पैसे भरायला लागतात..."
"हो ? अरे बापरे...! किती ते ?"
"ते तेव्हांच कळेल तुम्हांला...."
"पण साहेब, तुम्ही स्वत:ला वकील म्हणवता, व कोर्टाच्या भर दालनात बसून तुम्हीं न्याय अन्याय राहिला बाजूलाच...परंतु, नेहेमी भाडेकरूच हरतो व बिल्डरच जिंकतो...हे मला कसं काय बरं सांगू शकता ? हा भारतीय न्यायपद्धतीचा सरळसरळ अपमान नव्हे काय ?"
"See I am telling you as a friend...just trying to help you out....people are misleading you....lawyers do that you know...just to earn money...."
"yes ...of course....thanks a ton...."
दालनातून फलटणकर बाहेर पडताना मला बसल्या जागेवरून दिसत होते. ह्याचा अर्थ आजचे आमचे काम आटोपले होते. मी उठले. मी प्रथम माझा खंबीर हात पुढे केला. वर्मांनी त्यांचा हात पुढे केला. मी आत्मविश्वासाचे हस्तांदोलन केले.
"Nice meeting you sir."

कोर्टाचे दालन सोडताना व आत शिरताना समोर बसलेल्या जज्जसाहेबांना किंचित खाली वाकून मानवंदना द्यावयाची असते. आणि का कोण जाणे...मला हे करताना नेहेमीच अभिमान वाटतो...भारतीय न्यायव्यवस्थेचा अभिमान.
बाहेर पडल्यावर फलटणकरांनी मला सांगितले...आज बिल्डरने स्वत:चे नाव ह्या खटल्यात दाखल करून घेतले होते. म्हाडा व बिल्डर जोडगोळी. धोकादायक. सामान्य नागरिकासाठी.

डिसेंबरचा दुसरा आठवडा उजाडला.
ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या आधी 'पुढील तारखेपर्यंत तुमचेकडून घराचा ताबा काढून घेण्यात येऊ नये' असा कोर्टाने आदेश दिला होता. व तो आदेश उठवणे बिल्डरला आता निकडीचे झाले होते. पुढील तारीख आली. बिल्डर व म्हाडाच्या वादावर विचार करून पहिला आदेश रद्दबादल करण्याच्या प्रयत्नात कोर्टाने काय निर्णय दिला ?
'योग्य कायदेशीर प्रक्रियेशिवाय दावेदाराकडून घराचा ताबा काढण्यात येऊ नये.'
...मनाई हुकुम असा निघाला.

सापाच्या शेपटीवर पाय ठेवला गेला होता काय ?

वर्ष संपले. एकामागोमाग घडामोडींनी भरलेले वर्ष.
पुढील वर्ष चालू झाले. जानेवारीचा अकरावा दिवस लागला होता. आईची कामवाली माझ्या घरी आली. "ताई, वाटेवर सगळे मोठमोठे दगड टाकून ठेवलेत. मी कशी जाऊ ?"
दुसऱ्या मजल्यावरचे आमचे घर सोडून इमारत पाडायला सुरुवात झालेली होती. आई धाकट्या बहिणीकडे होती. आईची बाई मात्र रोज जात असे. केरलादी करून येत असे. आता मात्र तिथे जाणे अशक्य होते. दुसऱ्याच दिवशी फलटणकर तिथे गेले. इमारत बरीच पाडली होती. दगडांची रास रस्त्यात घालून ठेवली होती. तिथून आत जिन्यापर्यंत जाणे कठीण होते. बाई तेच सांगत होती. दहशत निर्माण करणे चालू झाले होते. फलटणकरांनी कॅमेरा बरोबर घेतला होता. इमारतीसमोरील मोकळी जागा, दरवाजा....दगड आणि धोंडे. सर्व फोटो त्यांनी काढून घेतले.

दहशत.
त्या भीतीने मी आता ते देतील त्या जागी सामान हलवेन, घर रिकामे करेन...ही बिल्डरची इच्छा.

"ताई, एक बेडरुममधली आणि दोन बाहेरच्या...काचा फोडून टाकल्यात...खिडक्यांच्या" बाई पुन्हा एक दिवस सांगत आली. घरात आईचं सामान होतं. गोदरेजचं कपाट होतं. काही मौल्यवान गोष्टी असण्याची शक्यता होती. मी माझ्या नेहेमीच्या सुताराला बरोबर घेतले. आईच्या घरी गेले. प्लायवूडने खिडक्या आतून बंद करून घेतल्या. घरभर अंधार झाला. पाणी आधीच तोडलेलं होतं. वीज कापली होती. आमच्या शेजारचं शिंदे मावशींचं घर पूर्ण रसातळाला गेलेलं होतं. फक्त आमचं घर व त्यासाठी खालचे मजले शिल्लक होते. 
मन आता एकूणच बधीर झालं आहे.
क्रमश:








Tuesday, 6 December 2011

म्हाडा आणि मी

२१ ऑक्टोबर २०१०. 
मी दिवस उरकला होता. ऑफिसमधून घरी परतले होते. शिरल्याशिरल्या डाव्या हाताला चपला बुटांचे कपाट आहे. त्यावर एक बसकी टोपली आहे. आलेला पत्रव्यवहार रोज हा त्या टोपलीत जाऊन पडावा असा घराचा एक शिरस्ता आहे. त्या दिवशी असाच एक लिफाफा टोपलीत बसला होता. मी व्यवस्थित कात्रीने कोपऱ्यावर कापला व आतील कागद बाहेर काढले. हे पत्र काही वेगळे होते. न कळणारे. कायद्याची भाषा बोलणारे. काही वर्षांपूर्वी एक केस दमाने चालवली. परंतु, त्याचा अर्थ असा अजिबात होत नाही की आता ह्यापुढे दारी येणारा प्रत्येक कायद्याचा कागद मला कळू लागेल. गोंधळून जाणे ह्यापलीकडे काहीही होत नाही. वर छापलेलं नाव कळत होतं. सुरज डेव्हलपर्स.
अॅडव्होकेट फलटणकरांना दूरध्वनी लावला. जमेल तसे कागद वाचून दाखवले.
ती नोटीस होती. घर रिकामे करून बिल्डरच्या ताब्यात देण्याची.

माझ्या घरापासून काही मिनिटांच्या अंतरावर आईबाबांचे घर आहे. १९६० साली त्यांनी ते पागडीवर घेतले होते. घर मालक श्री. कवळी ह्यांच्याकडून. २००० साली कवळींनी, इमारत जुनी झाल्याकारणाने ती बिल्डरच्या ताब्यात देऊन त्यावर नव्या ढंगाची इमारत बांधण्याचा घाट घातला. इमारत उंच नेली तर आमच्या समोर समुद्र आहे. म्हणजे इमारतीने मान उंच करून समोर नजर टाकावी तर तिला दिसेल अरबी समुद्र. खाली गळ्यात एखादा गोफ असावा तशी अर्धवर्तुळाकार फिरणारी वाडी देखील कवळींनी बिल्डरला विकली.
एकेक करून मालकाने वाडी व आमची इमारत रिकामी करावयास घेतली. काहीजण तातडीने निघून गेले. तर काही बरीच वर्षे होते. करता करता दहा वर्षे उलटली होती. बरीच माणसे निधन पावली. इमारतीची मान अधिकाधिक उंच करता यावी, म्हणजेच अधिकाधिक FSI मिळावा ह्याकरीता बिल्डर काम सुरु करत नव्हता. भाडेकरुंना तो इतरत्र घरे देत होता. त्या त्या घरांची भाडी तो भरत होता. 
२०१० साल उजाडले. आम्ही मात्र तिथून निघालो नव्हतो. आईचे सामान अजूनही त्या घरात होते. 
बिल्डरकडे आमची मागणी एकच होती. आमच्या ऐंशी वर्षाच्या आईला, तिच्या घराच्या जवळपासच जागा मिळावी. तिला तिच्या सवयीच्या परिसरापासून ह्या वयात दूर राहावे लागू नये.

माणसाला त्याचे स्वत:चे हक्काचे घर असावे. त्यातून आईने मोठ्या हिंमतीने संसार केलेला. मग तिला उचलून दूर कुठे नेऊन ठेवावे चूक होते.
तिने त्या घरी एकटे रहावेच कशाला ? आजी नाहीतरी मुलींकडेच तर रहातात. मग करायचे काय त्यांना ह्याच परिसरात घर ? हा मुद्दा बिल्डरचा.
दूर घर घेऊन तिला तिथे रहाताच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणे काय योग्य होते ? तिने ठरवावे तिला कधी, किती दिवस आणि कोणत्या मुलीकडे रहावयाचे आहे. परंतु, स्वत:चे घर दूर असल्याकारणाने, आता जबरदस्तीने कुठल्या ना कुठल्या मुलीकडे रहाणे तिला भाग का बरे पडावे ? तिच्या स्वाभिमानाला मी काय म्हणून ठेच पोहोचवावी ? हा माझा मुद्दा. बिल्डर घरे दाखवत होता. मी त्याच्या माणसांबरोबर गल्ल्यागल्ल्या इमारतीइमारती फिरत होते. परंतु, एकही जागा ती जिथे रहात होती त्या परिसरात वा ऐशी वर्षाची बाई राहू शकेल अशी नव्हती. ह्या सर्वात कालावधी उलटून जात होता. २००० ते २०१० इतकी वर्षे फक्त वाढीव क्षेत्र मिळावे ह्याकरता बिल्डरने वाया घालवली होती. परंतु, आता उलटून जाणारा वेळ हा एका भाडेकरू कारणे होता. दुखणे हे होते. बिल्डरसाठी.

माझ्या हातात असलेली नोटीस काय म्हणत होती ?
'पुढील दहा दिवसांत आम्हीं जी कोणती जागा देऊ ती जागा घ्या व घर रिकामे करा. अन्यथा, तुम्हांला म्हाडा कडून घराबाहेर काढण्यात येईल.'
ह्या नोटिशी पाठोपाठ मुंबईतील एकजात सर्व सिटी सिव्हील कोर्ट ते हायकोर्ट, या सर्व ठिकाणी आमच्या विरोधात 'क्यावेट' (caveat) दाखल केले गेले असल्याचे कागदपत्र एक दिवसाआड दारी येऊन पडू लागले.

२६ ऑक्टोबरपासून कोर्टाला ३ आठवडे दिवाळीची सुट्टी लागत होती. त्यामुळे आम्हांला कोर्टाकडे ह्या विरुद्ध दाद मागणे कठीण जावे. म्हाडा जबरदस्तीने बाहेर काढेल ह्या भीतीने आम्हीं घर रिकामे करावे.
असा बिल्डरचा कावा.
कोल्हा.

क्रमश:

Monday, 5 December 2011

संन्यासी

रिकामं आकाश.
ऐसपैस आकाश.
दूरवर कोणी नेम धरतं. धनुष्याला बाण लावतं. बाण सुटतो. सूर मारत पुढे पुढे येऊ लागतो. येण्याची काही बातमी नाही. काहीही चाहूल नाही. घुसतो बाण. आकाशात. खोल खोल. त्यावर ते आकाश मात्र निशब्दच रहातं. ते भीष्म. एकही शब्द नाही. बाण कधी एकटे. कधी दुकटे. वेडेवाकडे. आरपार. मारा. चहूदिशांनी. अहोरात्र. शरजाल. आकाशाच्या हृदयात घुसून पार आरपार. मग आकाश ? काय आकाश फाटतं ? काय त्याची लक्तरे लोंबू लागतात ? काय चिंधड्या होतात ? शरपंजर अवस्था ? 
आकाश विशाल. पोलादी. त्यावर ह्या अशक्त बाणांचा काय पाड ? येतात. जातात. आल्यासारसे जातात. फक्त काही क्षण. आणि त्यांच्या पाऊलखुणा देखील नाहीश्या होतात.
स्तब्ध आकाश.
स्तब्धतेतून गीता सांगून जाणारे आकाश.
जमिनीवर उभी मी. 
नजर वर जात रहाते.
खोल निळ्या रंगात मी शिरत रहाते.
कुठून तरी आसमंतात ओम घुमू लागतो.
संन्यासी आकाश अजून एक बाण झेलू लागते.

मौनातून माझ्याशी बोलणारे, स्पेनचे आकाश...










१०

११
१२
१३
१४