भिंतीपर्यंत पोचायला आमच्या गाडीला तास दीड तास लागणार होता. आम्ही बरोबर इंग्लिश बोलता येणारी चिनी तरुणी गाईड म्हणून घेतली होती. नाव केट. इथे सर्वजण दोनदा बारसं करतात. एकदा चिनी नाव कानात सांगतात आणि थोडं मोठं झाल्यावर एक इंग्लिश नाव ठेवून घेतात. चिनी ललना खूपच तरतरीत आणि हुशार वाटतात. पुरुषवर्ग मात्र स्त्रीवर्गापुढे एव्हढी काही छाप पाडू नाही शकला. रंग गोरा, खांद्याखाली येणारे सरळसोट केस, ताठ शरीरयष्टी, छोटे छोटे माश्यांसारखे डोळे आणि तुरुतुरु चाल. कान टवकारून, अगदी एकाग्रचित्ताने ऐकलं की केट काय सांगू पहातेय ते कळण्याइतपत केटचे परक्या भाषेवर प्रभुत्व. रस्ता कापत असता गूढ भिंतीबद्दल थोडीफार माहिती मिळवण्याचा आमचा प्रयत्न.
"बाहेरून होणाऱ्या मंगोलियन आक्रमणांना रोखण्यासाठी ही भिंत बांधायला सुरुवात झाली. पाचव्या शतकाच्यादेखील आधीपासून. नंतर पुढील कालावधीत वेगवेगळ्या सम्राटांनी आपापल्या कालावधीत ती वाढवत नेली. प्रत्येकाने आपापल्या गरजेनुसार आणि आपापले वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात ती कधी तोडली, तिचा रस्ता बदलला आणि पुढे नेली. पूर्वेला ती उगवते आणि पश्चिमेला जाऊन मावळते."
केटच्या माहितीप्रमाणे ही जगातील सर्वात मोठी मर्त्यभूमी आहे. ८,८५१.८ किलोमीटर लांबीची मर्त्यभूमी. अंदाजे एक लक्ष मनुष्यहानी ह्या जगातील पहिल्या आश्चर्याच्या निर्मितीत झाली.
वेदनेने पिळवटलेल्या, रक्तात लडबडलेल्या अनेक सत्यकथांमधील ही एक.
दुरदुरच्या छोट्या छोट्या गावांतून ही ग्रेट वॉल बांधण्यासाठी पुरुषांना जबरदस्ती उचललं गेलं. म्हातारेकोतारे, तरुण, धष्टपुष्ट....गावागावांतील प्रत्येक पुरुषाला ह्या बांधकामावर नेमलं गेलं. दयामाया शून्य. सम्राटांसाठी ही भिंत म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न.
एका छोट्या गावात, आपल्या तरुण पत्नीबरोबर आनंदात आपले आयुष्य घालवणाऱ्या अश्याच एका तरुणाला सैनिकांनी पत्नीपासून खेचून दूर केलं. खडतर कामाला जुंपलं. वर्षे ओलांडली. तो घरी परतला नाही. चिनी 'सावित्री' पतीच्या शोधात गाव सोडून निघाली. उन्हातान्हात फिरत मजल दरमजल करत ती भिंतीपाशी पोचली. तिच्या त्या अविरत कष्टांचे तिला उत्तर मिळाले. तो तरुण युवक ते कष्टप्रद आयुष्य फार झेलू शकला नव्हता. तिला त्याच्या प्रेतापुढे उभं करण्यात आलं. त्याच्या शरीराशी तिची ओळख थोडीच होती. घरातून निघालेला तिचा धष्टपुष्ट पती आता काहीच शिल्लक उरलेला नव्हता. त्याच्या गालावरून तिने हात फिरवला. स्पर्शाची ओळख पटली. तिथून ती निघाली. भरकटली. नियतीने दिलेला हा धक्का तिच्या सहनशक्ती बाहेरचा होता. दिवसेंदिवस महिनोंमहिने ती फक्त चालत राहिली. एका कड्याच्या तोंडाशी पोचली तेंव्हा समोर अथांग समुद्र होता. तिने चालणे थांबवले नाही. डोक्यावरचे छप्पर कधीच उडाले होते. आता फक्त पायाखालची जमीन संपली.
आता चिनी सरकार तिच्या नावाचं स्मारक उभारणार आहे म्हणे.
कधी मला कोणी म्हटलेले आठवते..'महाराष्ट्रातले किल्ले ही काही कलेची दालने नव्हेत. नजर टाकावी तिथे फक्त दगड आणि धोंडे. तेच जर राजस्थान गेलो तर तिथे कलाकुसर, चित्रकला दिसते. मुघलांनी तर अचंबे उभारले.'
पायथ्याशी उभं राहून वर भिंतीकडे नजर टाकली. मला बुटके, घामाने निथळलेले अथांग पसरलेले चिनी मजूर दिसू लागले. आणि त्यांना चाबकाने फटकारणारे त्यांचे थुलथुलीत वरिष्ठ अधिकारी. उंच उंच क्रूर पहाड आणि जड वजनाचे प्रचंड दगड. पाठीवर, डोक्यावर की हृदयावर त्यांनी घेतले?
'राजांनी संरक्षणासाठी किल्ले बांधले, ऐषोआरामासाठी नाही. कधी दुष्ट कथा नाही जन्माला घातल्या. आम्ही सुराज्य आणि स्वराज्य उभे केले.' हे ताठ मानेने दिलेलं तेव्हाचं माझं उत्तर त्या चिनी भिंतीच्या पायथ्याशी पुन्हा आठवलं.
ते जगातले आश्चर्य चढायला माझी लेक तयार नाही झाली. तिने माझी वाट बघत पायथ्याशी बसणं पत्करलं.
7 comments:
राजांनी देखील संरक्षणासाठी किल्ले बांधले परंतु अश्या क्रूर कथा नाही जन्माला घातल्या. आम्ही सुराज्य आणि स्वराज्य उभे केले.' हे ताठ मानेने दिलेलं माझं उत्तर त्या चिनी भिंतीच्या पायथ्याशी उभं राहिल्यावर पुन्हा आठवलं.
we too r proud of u for this answer.
राजांचा मराठी (महाराष्ट्रीय) सुसुसंकृतपणा व दुसर् यावर अत्याचार न करण्याची वृत्तीचा सार्थ अभिमान आपण प्रौढीने व्यक्त केलात याबद्दल अभिनंदन !
पण त्या चीनी स्त्रीची गोष्ट ऐकून हिकानीची आठवण झाली.
हिरकणी ची
good to have a pic :) i read it....something about photograhs...it makes u read more :)
अनघा, पोस्ट छानच आहे. वाचताना सहज मनात आलं की पुढे तुझ्या नातवंडांची मज्जाच होणार आहे...आजीकडून रोज नव-नवीन गोष्टी ऐकायला मिळणार त्यांना...
खरे आहे अनघा.. हे वाच..
"वस्तूतः दिल्ली व आग्रा येथील किल्ले हे राजवाडे आहेत. छावणीतल्या जनानखान्या भोवती रेशमी कनाती लावतात तशी ह्यांच्या भोवती देखणी तटबंदी आहे म्हणून त्यांना किल्ले म्हणायचे. त्यांची तटबंदी सूंदर लालसर दगडाची आहे. त्यांच्या कंगोऱ्याला किंवा महाद्वारावरील नक्षीलाही धक्का लागलेला नाही. कसा लागणार? त्या राजांची धर्मातीत व दुबळी स्वामीनिष्ठ प्रजा त्याभोवती छातीचा कोट करून उभी होती. ह्या किल्ल्यांच्या अंतर्भागात संगमरवरी महालांच्या रांगा आहेत. त्यांचे सौंदर्य अद्वितीय आहे. 'पृथ्वीवरील स्वर्ग तो हाच' असे त्यांचे वर्णन करण्यात आलेले आहे आणि असे काही ऐकले की उत्तर हिंदूस्तानातील लोक नि:श्वास सोडतात, तल्लीनतेने डोळे किलकिले करतात. त्यांच्या लक्ष्यातही येत नाही की हा स्वर्ग आपल्याच पुर्वजांच्या मुडद्यावर उभा आहे, या किल्ल्यांच्या अद्वितीय वैभवाचे अस्तित्व हे आपल्या नामुष्कीचे प्रतिक आहे. या महालांत पाउल टाकले की भासतात अत्तरांच्या फवाऱ्याचे सुगंध, मद्याच्या प्रवाहाचे दर्प आणि नर्तकींच्या नुपूरांचे झंकार. अधूनमधून कारस्थानाची कुबट घाणही प्रत्ययास येते. या किल्ल्यांनी प्रत्यक्षपणे मर्दुमकी कधी पाहिलेली नाही. येथे शस्त्राची चमक दिसली ति फ़क्त खुनी खंजीरांची, मसलती घडल्या त्या फ़क्त हिंदूंच्या नि:पाताच्या. या शाहीवैभवाला मोगलांच्या मर्दुमकीची प्रतिके मानता येणार नाही. शोभीवंत पण निरुपयोगी सोन्यारूप्याच्या तोफांप्रमाणेच यांचे ही फ़क्त कौतुक करायचे.
आग्र्याच्या किल्ल्यात कोणाची मर्दुमकी प्रकट झाली असेल तर ती श्री शिवछत्रपति महाराजांची. धन्य त्यांची की मोगल साम्राज्य वैभवाच्या कळसावर व सामर्थ्याच्या शिखरावर असताना आणि स्वतः एकाकी असताना त्यांनी शहेनशहाचा जाहीर निषेध केला. धन्य त्यांची की हे वैभव पाहून स्वदेशी परत आल्यावर त्यांनी मोगलांचे अनुकरण करून रंगमहल उठवले नाहीत, तर त्यांच्या प्रतिकारासाठी, त्यांच्याच मूलखातून गोळा केलेल्या लूटी मधून, स्वदेशाच्या स्वातंत्र्य-साधनेसाठी जागोजागी दुर्गम दुर्ग उभारले."
आपल्या रक्षणासाठी झगडलेल्या या किल्ल्यांची आजची अवस्था ढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, नामशेष इमारती, ओहोरलेली टाकी अशी असली तरी ती स्वदेश - स्वधर्म - स्वराज्य यांच्या रक्षणातून निर्माण झालेली आहे. दुर्ग - गड़ - किल्ले यांचा उपयोग मुख्यत: लढण्यासाठी असतो हेच विसरुन गेलेल्या सुंदर किल्ल्यांपेक्षा मला माझ्या महाराष्ट्रामधले ढासळलेले उध्वस्त गड्किल्ले भारुन टाकतात. त्यांचाच मला अभिमान वाटतो.
'सह्याद्री' ह्या ग्रंथातून साभार
किती दिवसांनी आलायस रोहन!! मला ही पोस्ट लिहिताना तुझीच आठवण येत होती! धन्यवाद हा लेख इथे पुर्नलेखित केल्याबद्दल. :)
उत्तरेतील गढ्या, किल्ले, महाल सुंदर राहिले ते त्यांच्या राजकर्त्यांच्या लाचारीमुळे. आले त्या आक्रमकांशी संधान साधले, बिनशर्त गुडघे टेकले आणि मांडलिकत्व पत्करले (काही महाराणा प्रतापसारखे अपवाद वगळता). आणि आपल्या मुलुखाचे किल्ले आपण लढवले. म्हणूनच उत्तर भारत आज स्वतःचा भौतिक भूगोल मिरवतो आणि आपण आपला इतिहास.
बाकी रोहनच्या कमेंटपुढे मी काय लिहायचे बाकी आहे म्हणा.
Post a Comment