नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 25 June 2010

गोगलगाय

लहानपणी, पावसाळ्यात घरासमोरच्या लांबसडक भिंतीवर खुपश्या गोगलगाई दिसू लागत. त्यांच्या दिशा वेगवेगळ्या, मात्र गती एकसारखी. काळपट शेवाळी भिंतीवर त्या पिवळट गोगलगायी कितीही लपून रहायचा प्रयत्न करीत असल्या तरी देखील, मी त्यांना बरोबर उचलून दूर एका ठराविक जागेवर आणून ठेवत असे. एकेक करून भिंतीवरच्या एकजात सगळ्यांना उचलून...काही छोट्या तर काही मोठ्या. फुगीर, टपोऱ्या. अगदी मोजून. कधी वीस तर कधी तीस. जशी काही मी त्यांची सभाच भरवत असे. काही क्षण एका जागेवर स्तब्ध बसून त्या मुक्या गोगलगायी परत आपापल्या दिशेने हळूहळू चालायला सुरुवात करत असत.
मी त्यांची, त्यांनी मनाशी आखलेल्या प्रवासाची दिशाच बदलत असे...
त्यांनी अथक प्रयत्नानंतर जी काही मजल गाठली असेल ती पुसून टाकत असे...
माझ्या मनाला येईल ती दिशा रोज त्यांना देत असे...

आता मला त्यांची आठवण येते.
त्यांना जे मी दिशाहीन करून ठेवत असे ते आठवते.

गती माझीही संथ...
नियती मला उचलून ठेवत असते....
तिला हव्या त्या दिशेला तोंड करून....
मग मी त्या दिशेने चालू लागते....
ती मला परत उचलेस्तोवर...

3 comments:

rajiv said...

नियती व नशीब हे दोघे नवरा बायको !
त्यांचा संसार सुरळीत, तर आपले भले ..
नाहीतर चांगलेच चांगभले ....

सौरभ said...

वाह... दोन्ही गोष्टींचा संबंध फार छान मांडला आहे.

rajiv said...

.