सकाळचे नऊ वाजलेत. काल रात्रीपासून मुंबईत पाऊस सुरु झालाय. कडूलिंबाच्या अगदी वरच्या एका फांदीवर मी बसलेय. स्वस्थ. भरपूर रिकामा वेळ घेऊन.
जरा मान वेळावून बघितलं तर आजूबाजूला सगळं कसं स्वच्छ झालंय. चकाचक. माझी देखील आज त्या नवीन पाण्याने अंघोळ झालीय. चोच मानेत खुपसली तर मस्त वास येतोय. सुकलेल्या मातीवर पहिल्या पावसाचे थेंब पडले कि कसा एक मादक वास आसमंतात भरून रहातो...तसाच आज माझ्या पिसांमधून येतोय. डोळे मिटून छातीत भरून घ्यावा असा...
पाय लांब केले आणि विचार आला, हे सगळं धुऊन पुसून साफ झालंय, मला ताजंतवानं वाटतंय आणि ह्यात मला कष्ट तर काहीच झाले नाहीत! मी आणि माझं हे कडूलिंबाचं घर, मी काहीही त्रास न घेता कसं धुवून पुसून स्वच्छ झालंय!
मान वळवली तर बाजूच्या इमारतीतील बाई खिडकीतून बाहेर बघत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भावच मला सांगून जात होते, बाहेरची हिरवी आणि स्वच्छ दुनिया तिला देखील मोहवून टाकत होती. अचानक ती हसली आणि मला दुरून तिच्या मनातले विचार अगदी छान वाचता आले! बाहेर पावसाने, ओल्या कापडाने एकेक पान, एकेक कौल, रस्त्यावरची एकेक फरशी, अगदी दक्ष गृहिणीच्या प्रेमाने लख्ख पुसून काढली होती. मी नक्की सांगते, तिच्याही मनात हाच विचार आला होता!
आपण जराही हातपाय न हलवता, आपलं घर स्वच्छ आणि ताजतवानं जर दिसायला लागलं तर त्यातला आनंद, फक्त एका स्त्रीलाच कळू शकतो.
आणि एका स्त्रीलाच कळू शकतं दुसऱ्या स्त्रीचं मन!
2 comments:
खरंय ग अनघा, एका स्त्रीलाच दुसऱ्या स्त्रीचं मन कळू शकतं.... आणि हातपाय न हलवता घर स्वच्छ व्हायला लागलं तर काय मज्जा... :)
धन्यवाद प्रीती! :)
Post a Comment