Saturday, 19 June 2010
नाना 'कळा'
"गणपतीच्या दिवसात नाना तिथे येऊन राहतो. त्यावेळी मी तुला त्याच्याकडे घेऊन जाऊ शकतो. चालेल का बघ."
"धावेल, धावेल!" आमच्या कॉलेजमधल्या गुरुजींनी, नाना पाटेकरच्या 'गणपती परंपरे' विषयी मला सांगितलं तेव्हा माझं उत्तर हे असं होतं.
मग सरांना गाडीत बसवून पोचलो एका दुपारी नानाच्या दारात. रोज नाना गणपतीची फुलांची सजावट कशी करतो हे जर मी तुम्हांला सांगायला निघाले तर म्हणाल की मी त्यात काय नवीन सांगतेय! दर गणपतीत, वर्तमानपत्रांत गणपतीला नटवताना नाना पाटेकरचे आपण खूप फोटो बघतोच. तेंव्हा ते जाऊच दे!
तर आमचे जे जे चे सर आणि नाना ह्यांची कॉलेजची मैत्री. जिवाभावाची. त्याचा मला फायदा. पहिल्या दिवशी सरांनी माझी ओळख करून दिली. मी माझं काम सांगायला सुरुवात केली. "मी जे तुम्हांला पेपर देईन त्यावर आणि मी जे पेन देईन त्याने, मला तुम्ही केलेली एखादी चित्रकृती हवी आहे."
"ठीक. कागद घेऊन उद्या ये. कट नीब्स घेऊन ये. आणि कवी ग्रेस यांची एखादी कविता. मी तुला एक स्केच देईन, एक ग्रेस यांची कविता लिहून देईन आणि एक मी स्वतः केलेली कविता देईन." हे म्हणजे प्राजक्ताच्या झाडाखाली उभं राहिल्यासारखं झालं. एक फूल मिळणार नाही! घ्यायचं तर सडाच घ्या!
दुसऱ्या दिवशी मी त्यांच्यासमोर हजर. सर्व सामुग्रीसाहित. आणि बरोबर माझी टीम. डिरेक्टर, फोटोग्राफर आणि कॅमेरामन.
नानाने आमचा कागद हातात घेऊन पेन उचललं की त्याचे फोटो काढायचे, त्याचे फुटेज कव्हर करायचे हा बेत. त्या घरातील बाहेर पडवीत उजेड आणि आतल्या खोलीत तसा अंधारच. माझ्या टीमने माझ्यामागे भुणभुण सुरु केली. जरा त्यांना विचार न बाहेर पडवीत बसतील का म्हणून. "मी इथे ह्याच खोलीत बसणार. तुम्हांला फोटो काढायचा तर काढा!" सणसणीत उत्तर मिळालं.
मग त्यांनी माझ्याकडून सगळं सामान घेतलं. सुंदर पोत असलेले कागद आणि पेन. आणि मग पुढे जे घडलं तो एक चमत्कार होता.
"जरा तो पाट दे." मांडीवर पाट घेतला. बरेचसे कागद घेतले. चमत्कार सांगून होत नाहीत म्हणून त्यांना चमत्कार म्हणतात. बरेचदा ते क्षणभंगुर असतात. दिसतात, नाहीसे होतात. चष्मा नाकावर, हातात पेन आणि नानाचा हात. जशी काही हातात तलवार होती आणि कापाकाप करायची होती! पिवळट पांढऱ्या कागदावर काळं कुळकुळीत पेन सपासप चालू लागलं. इतक्या वेगात की एक रेघ सुरु झाली कधी आणि संपली कधी हे त्या रेघेला सुद्धा कळू नये. अशी तलवार चालवली जावी की स्वतःचे दोन तुकडे झाल्याचे गवताच्या पातीला समजूच नये. आणि मग जमिनीवर गवताचा खच. जसा त्या दिवशी होता काळ्या बाणांचा खच. नटसम्राटाची त्या वेळी भूमिका होती धनुर्धारी अर्जुनाची. चष्म्यातून एकदाही नजर वर झाली नाही. बाजूला बसलेल्या मित्राशी मधून मधून प्रश्नोत्तरं चालू. माझी नजर त्या कागदावर. पापणी लववायचा अवकाश, बाण, अधिक बाण आणि अजून बाण. रणांगणावर नुसता खच. हळूहळू कागदावरची पांढरी जागा कमी होऊ लागली आणि काळे बाण वाढू लागले. बरोबर दहाव्या मिनिटाला खाली सही रुबाबात पेश झाली. ही जी आत्ता कत्तल झाली त्याची त्या सहीने जबाबदारी उचलली. एक 'ना' सुलटा आणि एक 'ना' उलटा. सहीतून व्यक्तिमत्व कळतं म्हणतात.
माझ्या हातात कागद देण्यात आला. जेव्हा मी बघितलं तेंव्हा त्या काळ्या बाणांमधून एक वृध्द चेहरा हळूहळू पुढे आला. बापरे! जवळजवळ सत्तर वर्षांचा माझ्या डोळ्यात खोलवर बघणारा चेहरा. खडतर आयुष्य जगलेला. कुठे होता हा म्हातारा? खोलीत तर कुठेच नव्हता, ना पडवीत होता... हे स्मरणचित्र होतं? इतकं खरंखुरं? ते खोल डोळे.. डोळ्याची ती खोबणी...ती मिशी...आणि ते भव्य कपाळावरचे, एखाद्या विचारावंतासारखे अस्ताव्यस्त केस....हा म्हातारा माणूस नक्की कुठेतरी होता..त्याची ती माझ्याकडे लागलेली नजर मला ह्याचीच खात्री देत होती.
पुढच्या विसाव्या मिनिटाला घरी मी जेव्हा माझ्या चित्रकार नवऱ्यासमोर ते स्केच ठेवलं, त्यावेळी तो कितीतरी वेळ नुसता त्या म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यात डोळे घालून बसला होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
14 comments:
तुझा पहिलाच पोस्ट वाचला आणि मी चटकन "Follow" क्लिक केलं. फार छान लिहीतेस्. Keep it up
धन्यवाद श्रीराज.
आह्हा... सुरेख लिहलय...
सौरभ
(jumping on blog to blog randomly)
very good
अनघा,
तुझ्या ब्लॉग वरील तुझे लिखाण वाचले. कधी -हुदयातले, कधी भन्नाट धावणा-या मनातले तर कधी दुख-या जखमेतून उमटलेल्या चित्कारातले क्षण मला मागच्या काही घटनांची आठवण करून गेले. तुझ्या बाबांच्या साहित्य सम्पदेचीही आठवण झाली. शेवटी रक्तातले गुण लपून रहात नाहीत हेच खरे.
सौरभ, अशी मनःपूर्वक दाद दिल्याबद्दल धन्यवाद.
:)
विचारे सर,
तुम्ही इथे येऊन वाचलंत आणि तुम्हांला लिखाण आवडलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
अशीच भेट देत जा....आणि प्रतिक्रिया देत रहा.
:)
अनघा, व्हिडिओ मला अतिशय आवडला. संकल्पनेच्याच मी चक्क प्रेमात पडले. तुम्ही सगळ्य़ांनी केलेली मेहनत दिसून येतेच आहे. नेमके हे इतके सुंदर थेंबाचे कागदांवर ओघळणे पाहायला मी मायदेशात नव्हते याचे दु:ख झाले. बहोत बढिया!
एक सच्चा दिलाचा सच्चा माणूस... मला सुद्धा त्यांना भेटायची इच्छा आहे... :)
कधी झाले हे प्रदर्शन??? जून महिन्यात??? श्या... चुकवले ... पुन्हा कधी असे काही असले की आधी पोस्ट टाकत चला...
na na karte pyaar tumhi se kar baithe...
he Vandu! Finally you came to know this! ;)
सुंदर सुंदर !! मस्तच.. तू नाना पाटेकरला प्रत्यक्ष भेटली आहेस, त्याच्याशी बोलली आहेस !! मला हेवा वाटतोय तुझा.. का माहित्ये? हे वाच :)
http://www.harkatnay.com/2010/06/blog-post.html
हेरंब, वाचली तुझी पोस्ट! पटली! :)
Post a Comment