नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 12 June 2010

क्षण भाग्याचा...


मस्तकापासून पायापर्यंत फक्त पांढरा रंग. पांढरा शुभ्र सदरा, बरोब्बर त्याच सफेदीचा पायजमा, तसेच पांढरे केस आणि स्वछ निर्मळ मन दाखवणारा वयस्क चेहरा. त्यांच्या बॉस्कियानातील प्रशस्त दिवाणखान्यामध्ये, आमच्या समोर गुलजारजी बसले होते. कवितांचे कागद हातात घेऊन. मी आणि माझी डॉक्युमेंटरी दिग्दर्शक मैत्रीण त्यांच्यासमोर बसलो होतो. आमच्या कुठल्याही हालचालींमुळे त्यांची विचारधारा थोडी देखील तुटू नये इतक्या स्तब्धतेने.
त्यांच्या हस्ताक्षरातील त्यांच्या कविता, आमच्या कागदावर लिहून घेण्यासाठी आम्ही तिथे पोचलो होतो.
सर्व प्रथम त्यांना यायला उशिरा झाल्याबद्दल त्यांनी आमची माफी मागितली! हे म्हणजे देवाने दर्शन द्यायचे आणि मग स्वतःला दर्शन देण्यासाठी उशीर झाल्याबद्दल माफी मागण्यासारखंच होतं!
मला खूप वर्षांपासून आपोआप पाठ झालेला 'श्लोक' आठवत होता!
'जंगल जंगल पता चला है, चड्डी पहनके फुल खिला है!'

काही दिवस असेच असतात! आपण जन्माला नक्की का आलोय ह्या वारंवार पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देणारे.

" इन में से देखो आपको कौनसी कविता पसंद आती है...वो मैं आपको आपके कागज पे लिख कर दे दूंगा."
त्या नंतरचा एक तास त्यांच्या आवाजात त्यांच्या कविता ऐकण्याचा होता...
पडणारा पाऊस...सायकलीच्या चाकांतून उडणारं पाणी...गाडीच्या काचेवरून ओघळणाऱ्या थेंबांची रेखा....
प्रत्येक ओळीला एक चित्र जोडलेलं...

हॉलमध्ये फक्त आम्ही होतो आणि गुलजारजींनी उच्चारलेला प्रत्येक शब्द हा फक्त आमच्यासाठी होता...ते कवितेचं एकेक कडवं संथ स्वरात उच्चारणं... कडवं संपल्यावर समोर बसलेल्या आपल्या दोन श्रोत्यांच्या चेहेऱ्याकडे, नुकत्याच चालायला लागलेल्या बालकाच्या निरागसतेने बघणं....आणि मग तितक्याच तन्मयतेने माझ्या मैत्रिणीच्या हिंदीतील कविता ऐकणं...

ही निरागसता आणि हे नाविन्य कुठून येतं?

रंगांचा ब्रश पाण्यात गिरक्या घ्यायला लागल्यावर, पाणी स्वतःचा रंग विसरून तेच रंग ओढून घेतं...
आकाशात सूर्य, किरणं फेकू लागल्यावर रोज नवनवीन रंगछटांची गोधडी, आकाश पांघरतं...

मग कल्पकतेचे ते रंगीबेरंगी इंद्रधनुष्य, प्रयत्नपूर्वक सताड उघडलेल्या माझ्या डोक्याच्या खिडकीतून आत का नाही शिरलं?

8 comments:

rajiv said...

क्षण हा भाग्याचा ...
मोतीच जसा शिंपल्यातला !
अनुभव त्या उत्तुंग निरागसतेचा ...
दिलास तु मज पामराला !!

Guru Thakur said...

शब्दांच तो अथांग सागार
शब्दांच्या फुलवी लाटा
अज्ञाताच्या नेती गावा
शब्दातील त्याच्या वाटा..

Sakura said...

wow! no shabd! Gulzaar saab-the great!
paN ek vicharu? asha documentaries kuthe pahayla miLu shakteel?

सौरभ said...

last two para... very innocent writeup... lucky you two, that you met Shri. Gulzar and hear him personally...

Raindrop said...

tujhya mule mala pan labhla ha kshan bhagyacha :)
thank u!!!!

Anagha said...

Vandu, ha kaay Thanks Giving program aahe kaay? :)

Yogini said...

wow..
kasali grt ahes 2..
malacha bharee watatyala lagalay .. :)

Anagha said...

योगिनी, अगं मला एकदम कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं...आणि अजूनही मनात तीच भावना आहे ! :)

धन्यवाद गं ! :)