रविवारी एक आयुष्य संपलं.
५२ वर्षांपूर्वी सातव्या महिन्यात जन्माला आलेली मुलगी.
थोड्याच वर्षांत दमा. बुद्धी ठीक परंतु शिक्षणाचे महत्व आईवडिलांना न समजल्यामुळे फक्त दहावी पर्यंत शिक्षण.
वडील आयुष्याची लढाई आपल्या लांड्या आणि लबाड्या करून जिंकण्यात मश्गुल.
पुढे काही वर्षांनी स्तनाचा कर्करोग. एका स्तनाला मुकल्यावर लग्नाची शक्यता शून्य.
काही वर्षांमध्ये दुसऱ्या स्तनामध्ये विंचवाचा शिरकाव. आणि मग त्याचा तुकडा.
हे सर्व भोगताना तक्रार शून्य. "नशीब माझ्या कुठल्याही बहिणीला हे नाही झालं..त्यांना मुलं आहेत. माझं काय ठीक आहे." असे देवाचे आभारच मानणं!
भोग एव्हडेच नाहीत.. काही वर्षांमध्ये भास व्हायला लागले की तिला कोणी मारायला येतं.
एका जागी बसून नाही देत. जेवायला सुद्धा नाही. झोपून देत नाहीत. हल्ला करतात. दिसत नाहीत ती लोकं. बघ बघ ह्या नखांच्या खुणा बघ.
हातावर खरंच खूणा.
तिच्या आईने देखील मुलीच्या ह्या विधानांना पाठिंबाच द्यावा.
धाकट्या बहिणीने उपचार म्हणून तिला रेकी करावी.
मानसोपचारतज्ञ काय माहित काय उपचार करत होते..कधी फरक तर नाही दिसला.
आणि मग मृत्युला कारण घश्याचा कर्करोग ठरावा.
खिन्न आणि सुन्न करून टाकणारा हा एक जीवनप्रवास.
हे सगळं जेव्हा नजरेसमोर आलं तेंव्हा वीज पडावी तसा एक विचार डोक्यावर येऊन आदळला.
तिचा आत्मा अतिशय सरळ, साधा. कधीही हेवेदावे नाहीत, मत्सर नाही.
परंतु घरात वडिलांच्या लबाड्या दिसत असणारच. ढोंग कळत असणारच. वर्तमानपत्र वाचून विविध विषयांवर चर्चा देखील करता येणारी ती. स्वतःच्या घरात चालणारे हे प्रकार कसे सहन करू शकली असेल?
की असे झाले- 'माझे वडील लबाड्या करतायत. लोकांना फसवातायत. मग त्याची शिक्षा तर होणारच'.
तिच्या स्वभाव काय तर माझ्या माणसांना काहीही त्रास नको. जे काही व्हायचं ते मलाच होवो.
मग आता देखील तिच्या मनाने असे घेतले का की माझ्या बाबांच्या चुकांची शिक्षा त्यांना नको. लोकं मलाच शिक्षा करू देत.
म्हणून हे तिचे भास सुरु झाले का? लोकं मारतात, रोज हल्ले करतात. जेवू देखील देत नाहीत. झोपू देत नाहीत, एका जागी बसू देत नाहीत.
हा असा तिच्या स्वच्छ मनाने तिच्या नकळत खेळ चालू केला का?
माझं हताश मन मला हेच खरं आहे असंच सांगतंय..
6 comments:
बापरे.. भयंकर !!! काय आहे हे?
हेरंब, डोळ्यांसमोर घडलेली शोकांतिका आहे ही.
हेरंब, तुझं इथे स्वागत आहे.
खरंच भयंकर आहे. असं शत्रूच्याही बाबतीत घडू नये.
कधी कधी वाटतं, की देव काही कथा अति मालमसाला भरून लिहितो.
:(
Post a Comment