देव आपली काळजी नेहेमीच घेतो.
त्या त्या वेळी नाही कळत.
आपण प्रत्येक वेळी हट्ट करतो, रडतो....
पण तो त्याला जे त्यावेळी योग्य वाटतं तेव्हढंच देतो.
आपण मग असमाधानी होतो.
त्रास करून घेऊन स्वतःची शक्ती आणि वेळ वाया घालवतो.
परंतु पुढे चालून आल्यावर, मागे वळून बघितलं की मात्र हेच जाणवतं की तोच बरोबर होता. आपल्या त्या मागणीत आपलं भलं कधीच नव्हतं!
बरोबरच आहे.
तो वर बसलाय नं! त्याला aerial view दिसतो!
आपल्याला फक्त समोरचं तेव्हढच, छोटं छोटं चित्रं दिसतं; परंतु त्याला मात्र दूरदूरचं!
google earth च्याही वरून!
Friday, 30 April 2010
Thursday, 29 April 2010
माझा TG म्हणजे Target Audience...
माझ्या जाहिरातक्षेत्रात मी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या भाषेत बोलते...
म्हणजे भाषेची शैली रोज वेगवेगळी असते.
कधी मी शाळकरी मुलांना त्यांची उंची कशी वाढेल हे सांगते तर कधी तरुण मुलींना त्या गोऱ्या कश्या होतील हे पटवून देत असते...आणि कधी उतारवयातील माणसांना त्यांनी त्यांच्या पैश्यांची गुंतवणूक कशी करावी हे सांगत असते.
मग जर हे विविध भाषाशैलीच कौशल्य माझ्यात आहे तर मग खऱ्याखुऱ्या आयुष्यात वेगवेगळ्या नात्यात मला हे कौशल्य का नाही वापरता येत?
म्हणजे आईला आवडेल अशी भाषाशैली तिच्याशी, लेकीला पटेल असे तिच्याशी आणि मैत्रिणींना भावून जाईल अशी शैली त्यांच्याशी!

माझं प्रवासवर्णन..
माझं पुस्तक किती पानांचं असेल?
५०, ६०, ७५, ८० की १००?
कदाचित वाचता वाचता अचानक पुढे पानंच नसतील....
मग मी नीट लिहितेय का हे माझं आयुष्याचं पुस्तक?
एक एक पान...खरडतेय? कि लिहितेय?
काही खुणा ठेवतेय?
प्रत्येकाला जन्म घेताना एक काम दिलेलं असतं.
मी जन्म घेताना मला जे काम दिलं गेलं असेल ते मी सुरु तरी केलंय का?
की आजपर्यंत मी नुसतीच लांबण लावलीय?
मुद्याला अजून हातच घातलेला नाही?

Wednesday, 28 April 2010
डोस विषाचा
असंभव, कुंकू, अग्निहोत्र, अवघाची संसार, कुलवधू, अनुबंध....
सगळी संध्याकाळ ह्या मालिकांचा म्हणजेच त्या त्या कुटुंबाच्या समस्यांचा पाठपुरावा करण्यात घालवणे म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा अपमान करण्यासारखेच आहे.
एकंदर ह्या मालिका थोड्या फार बघून माझ्या एक लक्षात आले की गेला बाजार ह्या मालिकांमध्ये एखाददुसरे चांगले, सभ्य व्यक्तिमत्व असते आणि दुष्ट माणसांचे पेवच फुटलेले असते. मग त्या बिचाऱ्या चांगल्या माणसाचे एकंदर आयुष्य कसे खूपच खडतर आहे हे आपण रोज बघायचे. ह्या सगळ्यातून होते काय की चांगले वागले तर आयुष्यात खूपच त्रास आहे, यश मिळवण्यात खूपच कालावधी जाऊ शकतो आणि वाईट वागलो तर पटापट यश मिळते अशी एक समजूत होऊ शकते.
उगाच झगडत बसण्यापेक्षा वाईट मार्गातून जर यश म्हणजेच पैसा पटकन मिळत असेल तर कश्याला डोक्याला ताप करून घ्या? नाही का?
रोज हातोडीने खिळा ठोकून एखादी चित्राची चौकट भिंतीत पक्की घुसवावी तसंच ही संकल्पना आम जनतेच्या मनात बिंबवायचे काम ह्या मालिका रोज करत असतात.
माझी बहिण म्हणते तेच खरं. ह्या मालिकांमुळे हल्ली कौटुंबिक कलहाचे प्रमाण वाढीस लागलेय!
कपट कारस्थान हा दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक होऊ बघतोय.
ह्या मालिकांसारखाच.

Tuesday, 27 April 2010
प्रायश्चित्त मुलीचे..
रविवारी एक आयुष्य संपलं.
५२ वर्षांपूर्वी सातव्या महिन्यात जन्माला आलेली मुलगी.
थोड्याच वर्षांत दमा. बुद्धी ठीक परंतु शिक्षणाचे महत्व आईवडिलांना न समजल्यामुळे फक्त दहावी पर्यंत शिक्षण.
वडील आयुष्याची लढाई आपल्या लांड्या आणि लबाड्या करून जिंकण्यात मश्गुल.
पुढे काही वर्षांनी स्तनाचा कर्करोग. एका स्तनाला मुकल्यावर लग्नाची शक्यता शून्य.
काही वर्षांमध्ये दुसऱ्या स्तनामध्ये विंचवाचा शिरकाव. आणि मग त्याचा तुकडा.
हे सर्व भोगताना तक्रार शून्य. "नशीब माझ्या कुठल्याही बहिणीला हे नाही झालं..त्यांना मुलं आहेत. माझं काय ठीक आहे." असे देवाचे आभारच मानणं!
भोग एव्हडेच नाहीत.. काही वर्षांमध्ये भास व्हायला लागले की तिला कोणी मारायला येतं.
एका जागी बसून नाही देत. जेवायला सुद्धा नाही. झोपून देत नाहीत. हल्ला करतात. दिसत नाहीत ती लोकं. बघ बघ ह्या नखांच्या खुणा बघ.
हातावर खरंच खूणा.
तिच्या आईने देखील मुलीच्या ह्या विधानांना पाठिंबाच द्यावा.
धाकट्या बहिणीने उपचार म्हणून तिला रेकी करावी.
मानसोपचारतज्ञ काय माहित काय उपचार करत होते..कधी फरक तर नाही दिसला.
आणि मग मृत्युला कारण घश्याचा कर्करोग ठरावा.
खिन्न आणि सुन्न करून टाकणारा हा एक जीवनप्रवास.
हे सगळं जेव्हा नजरेसमोर आलं तेंव्हा वीज पडावी तसा एक विचार डोक्यावर येऊन आदळला.
तिचा आत्मा अतिशय सरळ, साधा. कधीही हेवेदावे नाहीत, मत्सर नाही.
परंतु घरात वडिलांच्या लबाड्या दिसत असणारच. ढोंग कळत असणारच. वर्तमानपत्र वाचून विविध विषयांवर चर्चा देखील करता येणारी ती. स्वतःच्या घरात चालणारे हे प्रकार कसे सहन करू शकली असेल?
की असे झाले- 'माझे वडील लबाड्या करतायत. लोकांना फसवातायत. मग त्याची शिक्षा तर होणारच'.
तिच्या स्वभाव काय तर माझ्या माणसांना काहीही त्रास नको. जे काही व्हायचं ते मलाच होवो.
मग आता देखील तिच्या मनाने असे घेतले का की माझ्या बाबांच्या चुकांची शिक्षा त्यांना नको. लोकं मलाच शिक्षा करू देत.
म्हणून हे तिचे भास सुरु झाले का? लोकं मारतात, रोज हल्ले करतात. जेवू देखील देत नाहीत. झोपू देत नाहीत, एका जागी बसू देत नाहीत.
हा असा तिच्या स्वच्छ मनाने तिच्या नकळत खेळ चालू केला का?
माझं हताश मन मला हेच खरं आहे असंच सांगतंय..

Monday, 26 April 2010
तह की युद्ध?
कसे कळणार की जे काही घडत असतं तो एक नशिबाचा भाग असतो की त्या परिस्थितीशी झगडायची त्या वेळी गरज असते?
म्हणजे परिस्थिती आहे तशी स्विकारायची कधी आणि परिस्थितीशी झगडायचे कधी?

Saturday, 24 April 2010
फार पूर्वी नाही...
ह्या वर्षी पंडिता रमाबाईंच्या आत्मचरित्र लिखिताला १०० वर्षे पूर्ण झाली.
आज त्या विषयी लोकसत्तातील एक लेख वाचनात आला.
त्यातील रमाबाईंच्या आठवणी वाचल्या आणि एक वीस वर्षांपूर्वींचा प्रसंग आठवला.
सासरच्या घरात एक दिवस मी वर्तमानपत्र वाचत बसले होते.
अकस्मात घरातील वडिलधाऱ्या बाई तरातरा आल्या आणि माझ्या हातातील पेपर हिसकावून म्हणाल्या," ह्या घरात बाई माणूस पेपर वाचत नाही!"
मी दचकून त्यांच्या तोंडाकडे बघत राहिले आणि माझ्या नजरेसमोर माझ्या विद्वान बाबांचं पुस्तकांनी गच्च भरलेलं घर गोल गोल फिरू लागलं!

तुझं आपलं हे रोजचच झालंय!
आपण थोडे जरी काही निर्माण केले की लगेच कौतुकाची अपेक्षा करतो...
अगदी कौतुक नाही तरी लोकांनी बघावे अशी आपली इच्छा नक्कीच असते.
मग ते एखादे चित्र असेल, कविता असेल किंवा अगदी साधं आंबट वरण असेल!
विचारतो की नाही आपण समोरच्याला,"कसं झालंय? झकास?"
पण मग देव रोज उठून इतक्या प्रचंड प्रमाणात निर्मिती करत असतो तर मग त्याचं रोज कोण कौतुक करतं ?
त्याची पाठ कोण थोपटतं?
आपण तर ढुंकूनही बघत नाही त्याच्या निर्मितीकडे!
असं होतं! रोज उठून तुम्ही चांगलंच काहीतरी बनवायला लागलात की!

Friday, 23 April 2010
आनंदाचे मोजमाप
काही दिवसांपूर्वी एका संशोधनाविषयी लिखाण वाचनात आलं.
संशोधन होतं ते 'माणूस भौतिक गोष्टीची खरेदी आणि कुटुंबियांबरोबर केलेल्या सहली ह्यातील कोणत्या गोष्टीने जास्ती सुखी होतो' ह्याविषयी.
म्हणजे बघा पैसे हातात आले की आपण एकतर त्यामधून काही खरेदी करतो....किंवा त्या पैशंामधे आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर वा कुटुंबियांसमवेत सहलीला जातो.
संशोधकांच्या मते, जर माणसाच्या आनंदाला पट्टी लावली तर 'भौतिक गोष्टीच्या मालकीमधून मिळालेल्या आनंदापेक्षा; सहलींमधून जो आनंद मिळतो तो कितीतरी पटीने अधिक असतो. त्यात मत्सर नसतो.'
म्हणजे असं समजा की मी आज ५२" टीवी घेतला आणि मोठ्या अभिमानाने शेजारणीला सांगायला गेले आणि मग जर तिने मला तिच्या ७२" प्लाझ्माच्या नवीन खरेदीविषयी सांगितले कि झालं न फुस!
त्या ऐवजी जर मी माझ्या सहली विषयीचे आनंददायी अनुभव तिला सांगितले आणि तिने तशाच प्रकारचे तिच्या सहलीचे अनुभव सांगितले तर कसा आनंदीआनंदच नाही का?
म्हणजे 'अगं, काय गंमत आली महितेय का..अश्या प्रकारे सुरु झालेले संभाषण, अगं, खरंच आमच्या ह्यांनी देखील ना तिथे तश्शीच गंमत केली....' अशाच आनंददायी शब्दांवर ते संभाषण संपू शकते...
उगाच मत्सराचा लवलेशही मनात न घेता...
जरी स्थळे वेगवेगळी असली तरी देखील.
आता जळणाराच स्वभाव असेल तर नाही आपण काही करू शकत..
पण जे काही त्यांनी संशोधन केलं त्यात त्यांना हा असा निकाल मिळाला!
तेंव्हा बुवा, पुढच्यावेळी जेव्हा कधी बोनस हातात येईल ना, तेंव्हा विजय सेल्स न गाठता माळ्यावरची धुळीने माखलेली haversack खाली घ्या!

Thursday, 22 April 2010
Generation Gap
खिडकीच्या तावदानावर बसून बराच वेळ कर्कश ओरडणाऱ्या कावळ्याकडे मी आणि माझ्या लेकीने बघितले.
मी म्हटले," का हा असा ओरडतोय?"
लेक म्हणाली," काही नाही. नेहमीप्रमाणे बाबा मला लेक्चर देतोय आणि नेहमीप्रमाणेच आजही मला त्याची भाषा समजत नाहीये!"
Generation Gap?

पिल्लू बघतंय...पिल्लू शिकतंय..
लाल सिग्नल पडला म्हणून मी माझी गाडी झीब्रा पट्यांच्या मागे थांबवली.
एक गृहस्थ स्कूटर वरून माझ्यामागून येऊन पुढे निघून गेले.
साहेब पुढे एक लहान मुलगी आणि पाठी एक छोटा मुलगा अश्या दोन आयुष्याची जबाबदारी स्वतःच्या मजबूत खांद्यावर घेऊन चालले होते.
लाल सिग्नल काही त्यांना थांबवू शकला नाही.
कोणाचं वाईट चिंतू नये असे म्हणतात, पण तरी देखील एक मनात आलं.
ही मुले आज ना उद्या मोठी होतील आणि वयापरत्वे आपापली वाहने चालवू लागतील.
मग पहिल्या दिवसापासूनच त्याच्या समोर हे लाल, हिरवा आणि पिवळा रंग उघडझाप करतील. परंतु जर त्या रंगांचं गांभीर्य त्यांनी लक्षात घेतले नाही आणि मग त्यांचे बरे वाईट झाले तर त्या अपघाताची जबाबदारी कोणाची?
या त्यांच्या वडिलांची नाही काय? त्यांनी स्वतः तर ह्या रंगांची भाषा कधी समजून घेतलेली दिसत नाही तर ते मुलांना काय समजावून सांगणार?
तितक्यात माझा हिरवा बाण आला आणि मी माझे विचार झटकून वाहन सुरु केले तेंव्हा ती दोन छोटी मुले आणि त्यांचे बाबा दूर दूर पोचले होते.

Wednesday, 21 April 2010
'माझं तुझं'
आपल्याला न ही मोठी माणसं बऱ्याचदा चुकीचच शिकवतात!
'माझं तुझं करू नये.' आठवतंय न हे ऐकलेलं?
मग आता त्याचीच सवय झालीय न मनाला!
म्हणजे बघा, गाडी चालवत असताना सिग्नलपाशी झीब्रा क्रोसिंग ही कसं माझंच वाटतं आणि तो लाल सिग्नलही कसा माझाच वाटतो.
मस्त रस्ताही माझाच कचऱ्याचा डबा वाटतो.
आणि तोंडातली पानाची लाल पिंक भिंतीवर थुंकताना रस्त्यावरची ती भिंतही माझीच असते!
आणि अगदी छोट्यात छोटी गोष्ट म्हणजे ऑफिस मध्ये हातातला कॉफीचा रिकामा मग मागे सोडताना शेजारच्या सहकाऱ्याचं टेबल देखील कसं माझंच वाटतं!
असं झालंय बघा माझं!
मग म्हणायचं हे अतिक्रमण होतंय!
कोणाची चुकी आहे ह्यात?
चुकीची शिकवण!
दुसरं काय?!

Tuesday, 20 April 2010
सर्पमित्र
गेल्या वर्षी पेपरमध्ये एक दुखःद बातमी वाचली होती. एका सर्पमित्राचे निधन सर्प दंशाने झाल्याची. तो साप त्यांनी घरीच पाळला होता.
आम्ही देखील असाच एक साप घरी पाळला होता. अगदी त्याच्या आवडीनिवडी, खाण्यापिण्याच्या वेळा देखील सांभाळल्या होत्या.
फक्त एक गोंधळ झाला...प्राण्यांमध्ये कसं साप, साप म्हणूनच पुढे येतो मांजर म्हणून नाही. माणसाचं मात्र तसं नसतं.
जेंव्हा तो दंश करायला जातो तेंव्हा कुठे आपल्या लक्षात येतं की अरे हा तर साप आहे..माणूस नाही!
म्हणून मला वाटतं एकच काळजी आपण घ्यायला हवी.
मित्र म्हणून आपण ज्याला जवळ करतोय त्याची जात समजून घ्यायला हवी. वेळीच.
म्हणून सखे, तुला सांगते, जपून. सर्पमैत्री आपल्याला परवडणारी नाही!

मधु इथे अन चंद्र तिथे!
आत्मा आणि शरीर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
म्हणूनच जरी त्या एकाच नाण्याच्या बाजू असल्या तरी देखील त्यांची तोंडे दोन दिशांना आहेत!

Give Me Sunshine,Give Me Some Rain....
आज गाणं ऐकलं -
मला सूर्यप्रकाश द्या.....
मला पाऊस द्या......
मग माझ्या मनात आलं -
'बाहेर कधी सूर्य आहे तर कधी पाऊस..
पण माझी खिडकी तर बंद आहे...
कड्याकुलुपे लावून बंद आहे...
फक्त आजपर्यंत कड्या खूप वरती होत्या...
माझा हात पोचत नव्हता...
आता मी मोठी झालेय...
कुलूप आता मला उघडता येतंय..
माझ्या वाट्याचा सूर्यप्रकाश मला अंगावर घेता येतोय...
आणि माझ्या वाट्याच्या पावसात मला चिंब भिजता येतंय!'

बेगमी
बेगमी खूप महत्वाची.
बेगमी म्हणजे तुम्ही केलेली धान्याची साठवण. जी तुम्ही पुढील काळात, पुन्हा साठवणीचा काळ येईपर्यंत वापरू शकता.
मग अगदी रोजच्या वापरासाठी असेल किंवा दुष्काळामध्ये जेव्हा धान्याची वानवा असेल तेंव्हा त्याचा तुम्हांला उपयोग होऊ शकेल.
वाटतं आपल्या नात्यांमध्ये अशीच आपण आठवणींची बेगमी करावी.
ह्या सुंदर आठवणीच आयुष्यभर आपल्या सोबत राहतात, एखाद्या कठीण प्रसंगातून आपल्याला तरून जाण्यास मदत करतात.
समजा मी माझ्या आयुष्यातल्या सुंदर आठवणी जपल्याच नाहीत किंवा तू मला आपल्या नात्यामध्ये सुंदर आठवणी दिल्याच नाहीस, तर पुढील आयुष्यात तुझं माझं नातं तुटण्यासारख्या काही घटना घडल्या म्हणजेच जर दुष्काळ आला, तर कुठच्या बेगमीच्या आधारावर मी पुढे जगू ?

माझ्या हाती यमराजाचा फास
मला वाटतं, मी रोज कमीतकमी ४ लोकांना जीवनदान देते. म्हणजे बघा, मी रस्त्यावर गाडी चालवत असते. म्हणजे गाडी चालवण्यासाठी जो रस्ता नियोजित केलेला आहे त्या रस्त्यावरच मी माझी चार चाकी चालवत असते.
पण मग मधेच रस्त्यावर इथून तिथून ३/४ लोकं चालत येतात आणि म्हणून मी माझी गाडी हळू तरी करते किंवा थांबवते. मग ती माणसे त्यांचं पुढील आयुष्य जगायला मोकळी होतात.
समजा मी उद्या माझी गाडी घेऊन पादचाऱ्यांसाठी नियोजित केलेल्या रस्त्यावर गेले तर किती हंगामा होईल नाही का? माझ्या गाडीवर दगडफेक होईल, कदाचित माझी गाडी माझ्यासकट जाळूनही टाकली जाईल.
पण मग जर गाडी फूटपाथवर जाऊ शकत नाही तर माणसे भर रस्त्यावर, वाहने येजा करीत असताना, कशी काय चालू शकतात?
म्हणून मला तरी वाटतंय कि मी जीवनदान दिल्यामुळे कमीतकमी ४ लोकं रोज त्यांचे उर्वरित आयुष्य पुढे जगू शकतात!

Monday, 19 April 2010
निराशा हा माझा धर्म नव्हे!
माझ्या जाहिरात क्षेत्रात रोज नवनवीन प्रकारची कामे येतात.
माझ्याकडे आलेले काम एक creative director म्हणून माझ्या पूर्ण क्षमतेनुसार मी चांगले करते आणि मग ते काम घेऊन आमची फलटण client कडे जाते.
बऱ्याचदा client स्वतःचेच घोडे दामटवतो आणि स्वतःला हवे तसे काम करून घेतो.
अश्यावेळी एक agency म्हणून आमची भूमिका काय?
एक म्हणजे, जे काम प्रसिद्ध झाले तर ते माझे आहे असे जर अभिमानाने सांगता येणार नसेल तर अश्या प्रकारचे काम घेऊन कधीही client समोर उभे राहू नये.
केवळ पैसे कमावण्यासाठी दुय्यम दर्ज्याचे काम पुढे करू नये.
मी ते काम ज्या brand साठी केले त्याच्यासाठी आणि कलात्मक दृष्टीकोनातून जर चांगलेच केले असेल तर ते विकत घेतले नाही हे त्या client चे दुर्दैव, माझे नव्हे!
निराश होऊन माझ्या कामाची प्रत खाली आणण्यात माझे काहीच भले नाही.
त्या कोळ्याकडे नेहेमी लक्ष ठेवायला हवे. तो नाही का कितीही वेळा पडला तरी देखील परत परत चढायचा प्रयत्न करीत असतो?
आपण आपले प्रयत्न पणाला लावावेत परंतु निकाल आपल्याच बाजूने लागेल
असा हट्ट करू नये.
काय पावन, पटतंय न्हवं का?

'ऊपरवाला'
समजा एक खोका आहे. चारी बाजूंनी बंद.
वरून एक झाकण आहे. आणि आत एक छोटुसा उंदीर आहे.
वरचं झाकण उघडून एक मुलगा रोज सकाळी एक चीजचा तुकडा त्या उंदरासाठी खोक्यात टाकतो.
त्या उंदारासाठी त्या दिवसाचे तेव्हढेच अन्न.
मग दिवसभर त्याने बाजूच्या भिंतींवर किती का डोके आपटले, वरच्या झाकणाला किती का धडका दिल्या तरी देखील त्या पेक्षा अधिक अन्न मिळण्याची शक्यता शून्य.
मग मला सांगा कि त्या उंदराने अधिक अन्नासाठी किती त्रास करून घ्यावा?
की आपल्याला जे मिळतंय त्यात सुखी रहावं?
म्हणजे आपल्याला जे मिळतंय कदाचित तेव्हढ्याच सुखावर आपला अधिकार असावा.
नाही का?
'उपरवाला जितना देनेवाला है उतनाही देगा.'
छप्पर फाडके 'खूप कमी वेळा' देगा!
कसे? :)

Friday, 16 April 2010
You made my day!
काल मी पेट्रोल पंपावर गाडी घेऊन गेले.
माझ्या गाडीच्या पुढे एक बाईकवाला होता.
मी गाडी लावेस्तोवर त्याचे पेट्रोल भरून झाले.
तेव्हढ्यात माझ्या लक्षात आले की मी जर गाडी थोडी मागे घेतली तर बाईकवाल्याला बाईक काढणे सोप्पे जाईल.
माझे पुढचे फक्त २ सेकंद गाडी मागे घेण्यात गेले.
आणि मग त्याने त्याचे वाहन सोप्प्या रीतीने काढले.
खरं तर एव्हढेच झाले.
पण मी reverse टाकून माझी गाडी त्याच्यासाठी मागे घेतली ह्याच्यासाठी त्याने माझ्याकडे हसून बघितले आणि आभाराची मान हलवली!
मला त्याची ती विनम्रता ह्या सध्याच्या धकाधकीच्या काळात अजिबात अपेक्षित नव्हती!
पण त्या माझ्या २ सेकंदाच्या कृतीने त्याला एक सकारात्मक ((possitive) भावना दिली
आणि त्याच्या त्या मान हलवून आभार मानण्याच्या कृतीने मला जगात अजूनहि आशेला जागा आहे ही खूपच छान जाणीव दिली!

Things you should not take seriously!
एक लांब लांब रस्ता होता.
त्याच्या एका टोकाशी, एका मुलाने एका मुलीला विचारलं की तू माझ्याबरोबर ह्या रस्त्यावर चालशील का?
सोमरस पिता पिता हा लांबचा रस्ता आपण सहज काटू!
"पण मला सोमरस पिता येत नाही! आणि कोणी दुसऱ्याने प्यायलेला देखील मला आवडत नाही! "
"असं म्हणतेस? ठीक आहे मी नाही पिणार. पण तू माझ्याबरोबर चालच!"
ती मुलगी त्या वचनावर विश्वास ठेवून, त्याचा हात धरून चालू लागली.
काही दिवसांनी तो सोमरस पीत असता
तिने त्याच्या डोळ्यात पाहून विचारलं,'हे तू कधी थांबवणार ?"
तो म्हणाला," आज नाही. पण २ वर्षांनी नक्की!"
थोडी वर्ष गेली. तिने परत त्याला विचारलं," कधी?"
"आत्ता नाही. अजून थोड्या वर्षांनी."
थोडा अजून कालावधी गेला. रस्ता बराच कटला होता.
तिने पुन्हा त्याला विचारलं.
पण आता तो म्हणाला," तू खूपच हट्ट करतेयस! आणि म्हणून मी कधीच सोमरस पिण्याचे नाही सोडणार!"
पण मग १०-१५ वर्षांपूर्वी, हा प्रवास सुरु करण्याआधीच तर ते वचन दिलं गेलं होतं ना?
खरं तर त्या वचनावरच तर तो प्रवास एकत्र सुरु केला होता ना?
"वचन? Don't take it seriously!"

मी देव नाही!
आपण माणसे आहोत, देव नाही.
period!
आपण चुकतो.
पुन्हापुन्हा चुकतो!
फक्त आपण आपली झालेली चूक समजून घेतो का?
आणि आपण केलेल्या चुकांमुळे जर दुसऱ्याकडून एक अपराध होत असेल तर
ते समजून न घेताच स्वतःला देव मानून, न्यायासनावर बसून दुसऱ्यांचा न्यायनिवाडा करतो? त्यांना शिक्षा फर्मावतो?
स्वतःची चूक मान्य करता येणे हे आता मला प्रचंड मानसिक शक्तीचं काम वाटायला लागलय!
अहो सर्वांना जमताना दिसत नाहीये ते!
म्हणजे एकदम 'rare species' म्हणता येईल ह्या लोकांना!
आणि extinct देखील!

माझा आयुष्याचा मंत्र
मी एक स्वतःवर खूष असलेला आत्मा आहे.
म्हणजे बघा, मी एकदाही होर्न न वाजवा ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस जेंव्हा drive करते तेंव्हा मी स्वतःवर खूष होते.
मी फेरीवाल्यांकडून खरेदी न करता दुकानात जाऊन जेंव्हा खरेदी करते तेंव्हा मी स्वतःवर खूष होते.
मी एखाद्या brief वर छानपैकी काम करते तेंव्हाही मी स्वतःवर खूष होते.
आणि शिवाजी पार्कला निदान ४ फेऱ्या तरी मारल्या की देखील मी खूषच होते!
मस्त कॉफी केली की खूष आणि लेकीने छान नाश्ता केला की मी खूष!
पिंपळाला फुटलेलं गुलाबी पान बघितलं की खूष आणि कधीतरी दिसणारा तो छोटासा पक्षी आमच्या छोट्याश्या बागेत दिसला की मी खूष!
तुम्हाला मी सांगते, मी ना एक स्वतःवर खूष असलेला आत्मा आहे!

Thursday, 15 April 2010
आयुष्य - एक 'personalty development' course
आयुष्य म्हणजे एक 'personalty development' चा course आहे. म्हणजे बघा, आयुष्यात आपल्यासमोर वेगवेगळे प्रसंग येत असतात. बरे आणि वाईट. त्यातून आपण शिकत असतो, आपले धडे घेत असतो.
समजा एक प्रसंग घडला, जर आपण तो आपल्या development साठी वापरायचा म्हटला तर त्या प्रसंगातून आपण चांगलंच शिकून बाहेर पडू शकतो. आपण विचारांच्या दृष्टीने अधिक प्रौढ होऊ शकतो. अधिक खंबीर होऊ शकतो.
पण जर का आपण तो प्रसंग आपल्या अंगावर घेऊन, कोसळूनच गेलो, तर आपला विनाश अटळ. अगदी त्याच वेळी नाही तरी तो आपण आपल्या जवळ खेचून घेणार हे नक्की!
ह्याचा अर्थ जेंव्हा आपण जन्मतो तेंव्हा आपण या आयुष्याच्या शाळेत 'personalty development'शाखेत प्रवेश घेतो!
मग जेव्हा ही शाळा संपते तेंव्हा आपण हा course कशा प्रकारे केला हे आपण गेल्यावर समाजाचे किती आणि काय प्रमाणात नुकसान झाले ह्यावर ठरते.
असे अर्थात मला वाटते!

Tuesday, 13 April 2010
मी अपराधी..
मी एक bag घेऊन घरातून लग्न करून निघाले.
हॉल मधून निघालो तेव्हा रात्र झालेली होती..
दूरचा प्रवास. मुंबई ते डोंबिवली. लांबच लांब काळोखी रस्ता.
बाजूला नवीन नवरा.
झोप लागली तेंव्हा माझं डोकं खिडकीच्या तावदानावर आपटू नये म्हणून त्याने स्वतःचा हात तावदानावर ठेवलेला अजून आठवतं.
त्या दिवशी वयाच्या बाविसाव्या वर्षी मी स्वतःच्या सुखाची जबाबदारी नवऱ्यावर टाकली तेंव्हा हे सुख म्हणजे काय असते ते मला स्वतःला तरी कळले होते काय?
किंवा नवराच्या सुखाची जबाबदारी स्वतःवर घेतली तेंव्हा त्याचे सुख म्हणजे काय ते मला कळले होते काय?
नाही. नव्हते कळले.
मग पुढील काही वर्षांमध्ये माझी त्याच्याबद्दलच्या तक्रारींची यादी वाढली.
का?
कारण एकच.
लग्न करताना स्वतःचे सुख कशात आहे हे स्वतःच समजून न घेता त्या न कळलेल्या सुखाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणे हा मोठा अपराध नव्हे काय?
Am guilty.

Thursday, 1 April 2010
वेग तरण्याचा
मी मुंबईच्या रस्त्यावर रोज गाडी चालवते.
एकदा इतर गाड्यांशी शिवाशिवी खेळत असता एक विचार आला.
त्या रस्त्याचा, त्या वेळेचा एक ठराविक वेग असतो. तोच वेग मीही माझ्या गाडीला द्यावा हे एक गृहीत असते.
जर तसे नाही झाले तर इतर वाहने मला सांगू लागतात की बाई ग, तू एकतर आमचा वेग घे नाहीतर आमच्या रस्त्यातून दूर हो!
मग हेच आपल्या जीवनाच्या प्रत्येक मार्गावर आपल्या लक्षात नाही का येत?
माझे कामाचे क्षेत्र जाहिरातीचे. या माझ्या क्षेत्राचा स्वतःचा एक वेग. एकदम जलद!
तेच जेंव्हा मी कामानिमित्त महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाते, तेंव्हा त्यांचा कामाचा वेग उलट! अतिशय हळू!!
आता तुमच्या लक्षात येतोय माझा मुद्दा?
अहो, जसा मी रस्त्याचा वेग नाही पकडला तर रस्त्यावरची प्रत्येक गाडी माझ्याविरुद्ध उठाव करते आणि मला बाजूला सारते, तसेच महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये देखील मला त्यांचाच वेग घेऊन चालावे लागते!
माझा वेग घेऊन मी त्यांना नाही चालवू शकत!! मला सरळ तासंतास एका खुर्चीत बसवून ठेवतात ते!
म्हणजेच त्यांच्या मार्गातून बाजूलाच सरतात कि ते मला!
तेंव्हा मित्रा, या जगात निभाव लागायला हवा असेल तर या जगाचा वेग पकडायला हवा तुला! काय?

माझं आठवणीचं कपाट.
माझं एक मोठं पुस्तकाचं कपाट आहे. मी त्यात माझ्या आवडीची पुस्तकं ठेवते. जी पुस्तकं मला नेहमीच आनंद देऊन जातात तीच ठेवते.
खूप दिवसांपासून एक विचार मनात घोळतोय. जर माझं डोकं हे असचं एक प्रचंड मोठं आठवणींच कपाट असेल तर मग मी त्यात ज्यांचा मला फक्त त्रासच होतो अश्या आठवणी क्रमवार, दिवसावर आणि व्यक्तीवार का लावून ठेवते? का त्या रोज उठून चाळत बसते? चुकीचं नाही का हे? म्हणजे मला आता हे माझं मनाचं कपाट लवकरात लवकर साफ करायला हवं! त्रासदायक गोष्टी नष्ट करायला हव्यात! नाही तर चांगल्या सुंदर गोष्टींना, आठवणींना कशी जागा होणार या माझ्या कपाटात? काय वाटतं तुम्हाला?

Subscribe to:
Posts (Atom)