नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 30 July 2010

नायजेला!

'ट्रॅवल अँड लिविंग' वरची नायजेला. आणि टीव्ही समोर भारावून बसलेली माझी मोठ्या मोठ्या डोळ्यांची लेक. ही अतिशय सुंदर दिसणारी, सुंदर केसांची बाई कापत काय होती तर कोंबडी आणि चिरत काय होती तर कांदा! त्यात एव्हढं भारावून बघण्यासारखं काय होतं?!
दुसऱ्या दिवशी....
"अगं, इथे ये. स्टूल घेऊन बस. मी मासे करतेय. जरा बघ मी कसे करते ते!"
"आई!"
" का? अगं, मी पण छानच करते ना स्वयंपाक?"
"हो....पण!"
"अरे! हवं तर मी पण करते न तश्याच हालचाली! माझे केस काही लांब नाहीयेत.. पण मान वेळावून वेळावून तुला दाखवते ना कसे मासे कापायचे, कसे साफ करायचे ते!"
"बरं ग बाई! ओरडू नकोस!"
बाईसाहेब स्टूल घेऊन बसल्या.
नायजेलाचा शो अर्ध्या तासाचा असतो. माझा लांबला. कष्टांनी जमवलेला एकुलता एक प्रेक्षक, शो अर्धवट ठेऊन उठून गेला.

जेवण झाल्यावर...
"अगं, नायजेलाचा शो बघून तुला जेवण करावसं वाटतं आणि माझा शो बघून तशी तुला स्फूर्ती का मिळत नाही?"
"आई, मी नाहीतरी लग्न झाल्यावर दर रविवारी जेवायला तुझ्याचकडे येणार नं?"

घ्या! आता ही माझ्या स्वयंपाकातील नैपुण्याची तारीफ होती की माझा 'फूड शो' फ्लॉप झाला होता?!

ती

'गोरी' शब्दाला 'पान' शब्द नाही जोडला तर राहिलेला रंग तिचा असं म्हणता येईल.
नैसर्गिकरीत्या सुंदर केस... जेंव्हा इतर मुली मेथी वाटून लाव नाहीतर अंड्याचा बलक फासत असायच्या तेंव्हा हिचे मोकळे केस हवेवर वहात असायचे. मुंबईतील वाडीत रहायची. झोपडपट्टीत रहाणे आणि वाडीत रहाणे, जमीनअस्मानी फरक. तीन भावांची एकुलती एक लाडकी बहिण. जन्मल्यानंतर काही वर्षांतच ज्या दम्याने हात पकडला तो आजतागायत नाही सुटला. शाळेत जायची. अभ्यासाची गोडी नव्हती आणि आईबाबा लहानपणीच गेले. भावांबरोबर बहिणीचेही शिक्षण संपले.
आजूबाजूच्या इमारतींमध्ये ती घरकामाला लागली. तिथे देखील मने जिंकली. ती घरचीच झाली. सगळ्यांच घरांमध्ये नाही रुळली. लाडावल्यांना जेव्हढं शक्य असतं तेव्हढी ही रुळली. तिला कधीही कुठलेही काम सांगावे नाही लागले. स्वतःच्या घरात आपण साफसफाई करतो, लहानांच्या खाण्यापिण्याची चिंता करतो. कोणी न सांगता हे करतोच. तिनेही सगळयाच घरात केले.

प्रेमात पडली ती नेमकी दारू मुबलक पिणाऱ्या माणसाच्या. लग्न झालं. मग अधूनमधून गल्लीत वेगवेगळ्या जागी, वेगवेगळ्या वेळी गालावरून ओघळणारे अश्रू पुसताना दिसली. आणि रात्री जेंव्हा जग गुडूप व्हायच्या मार्गावर असायचं तेंव्हा जवळच्या समुद्राच्या दिशेने नवऱ्याबरोबर खुशीत चालताना देखील दिसली. तिच्या पुढेमागे भावांची देखील लग्न झाली आणि आपापल्या नवऱ्यांबरोबर वहिन्या देखील हिच्यावर प्रेम करू लागल्या.

पुढच्या कालावधीत सहा वेळा गरोदर राहून देखील अर्धवट महिन्यांमध्ये जसं काही कोणी कंस येऊन तिच्या सहा बाळांना अवकाशात भिरकावून दिले. सातव्यांदा गरोदर राहिल्यावर प्रथितयश डॉक्टरांच्या मदतीने त्या बाळाने दिवस बघितला. बापाचे सुख मुलाला सहा वर्ष लाभले. नवऱ्याशिवाय पुढचे आयुष्य सुरु झाले. तोपर्यंत भाचरं जन्माला आलीच होती. आत्यावर प्रेम करायला ती देखील शिकली.

वाडीतील वाईट मुलांच्या संगतीपासून मुलाला वाचवणे आणि धुणीभांडी, केरलादी करून जेव्हढे जमतील तेव्हढे पैसे गाठीशी लावणे असा दिनक्रम चालू होता.

एक दिवस पोट खूप दुखतंय म्हणून सरकारी इस्पितळात तिला भरती केलं गेलं. कोपऱ्यात बिछान्यात ३/४ दिवस पडून होती.
"तुझी दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली आहेत." कोणा नर्सने सांगितलं.
"मग काय करायचं?"
"आठवड्यातील ३ दिवस डायलिसिस करून घ्यावे लागेल. नाहीतर भाऊ किंवा बहिण मूत्रपिंड देऊ शकत असतील तर..."
भावांना, वहिनींना बोलावणे गेले. भाऊ येऊन भेटून गेले. बायकांनी नकार दिला म्हणून भावांनी नकार दिला.

ह्या गोष्टीचा शेवट त्याने काय लिहिला आहे... माहित नाही...
तो काही गोष्टी का जन्माला घालतो... माहित नाही...
काही गोष्टी तो करुण का करतो... माहित नाही.

तेंव्हा ही गोष्ट अशीच अधुरी...

Thursday, 29 July 2010

बाहुल्या

कार्यालयाच्या अत्याधुनिक परिसरात शिरलं की सभोवताली बाहुल्या दिसू लागतात. त्या जगाला ना चेहरा. ना रंग. तेथील इमारत आजुबाजूच्या हालचालींबद्दल बेदरकार. तिथल्या मेणाच्या बाहुल्या स्वतःभोवती अभेद्य वलय घेऊन वावरणाऱ्या. Hi , hellooo म्हणतील. मिठ्या मारतील...वलयाला सुईएव्हढ देखिल छिद्र पडणार नाही.

ह्या अश्या वेगळ्या कॉर्पोरेट विश्वातील, निळ्या गणवेषातील बाहुल्या. पुरुष बाहुल्या. असंख्य बाहुल्या. दिसतात कचरा काढताना. एखादी लहानशी फरशी आणि त्यावरचे कोणाचे लाल ओंगळवाणे नक्षीकाम पुसताना.
इथला दिवस एखाद्या अनोळखी ग्रहावरच्या अनोळखी वेगाने फिरतो.
इथे swipe कार्डाला ओळखतात. प्रत्येकाला एक कार्ड. गाडीला वेगळं कार्ड.
गाडी तळघरात लावायची असेल तर ओळखपत्र दाखवा. वेस उघडण्यात येईल.
स्वागताला एक निळी बाहुली. नावगाव नसलेली.
आज अश्याच एका निळ्या बाहुलीशी नजरभेट झाली.
मी हसले.
बाहुली चमकली.
तिच्या हालचाली बदलल्या.
रोज तिच्या समोर गाड्या येतात. गाड्यांत बसून मेणाच्या बाहुल्या येतात. आज तिच्या विश्वातील बाहुल्यांचं जग हललं.
संख्यातील एक मेणाची बाहुली हसली.
समोरचा माणूस आहे हे त्या एका नजरानजरेतून कळलं.

तळघराकडे जाणारं रोजचं काळोखं बोळ, आज थोडं उजळलं.

दोहड

इंदुरी गोधडी.
मऊ, मांजरीसारखी.
उबदार, बाबांसारखी.

उलटी घ्या. सुलटी घ्या.
ती उब नाही जायची.

जेव्हा कधी...
आसमंतात थंडी असेल.
गर्दीत उब नसेल...

असं का कोणी नाही...
ज्याची उब नाही जायची...

अगं,
पेटारा उघड.
आठवणींची दोहड उलगड.

उष्ण अश्रूंची लड ओघळून जाईल.
बघ,
ती दोहड सावरून घेईल.

Wednesday, 28 July 2010

ध्वनिप्रदुषण

गल्लीतील ध्वनिप्रदुषणाविरुद्ध बाबा, तुम्ही आवाज उठवलात.
त्या आवाजाने तुम्हांला त्रास व्हायचा.
तुमचे वाचन आणि लिखाण तुम्हांला नाही करता यायचे.

आज त्याची आठवण झाली.
मी माझ्या गाडीत आज जाणूनबुजून ध्वनिप्रदुषण करून घेतलं.
रेडिओ लावला.
प्रचंड मोठ्या आवाजात.

मला माझा मेंदू काम करायला नको होता.
मी त्याला एका अश्या खोलीत बंद केलं जिथे तो बधीर होईल.
चालता देखील नाही येणार त्याला.
आज मी त्याला अपंग केलं.

ध्वनिप्रदुषणाला आज मी पाठिंबा दिला.

Tuesday, 27 July 2010

सखे,

सोनारा, शून्य नंबरी काळे मणी...
मधोमध सोन्याची वाटी, त्यात लाल माणिक...
दोन अलीकडे, दोन पलीकडे... इवलाले मोती...
गळ्याशीच चपखल बसायला हवं...
रोज मला मिरवायला हवं.

वापरलं मिरवलं.
पण...
सोंडवाल्याने मला नाही सांगितलं.
त्याने त्याचं गणित बदललं.
वर्षभरात त्याने ते कडीकुलुपात नेलं.

जाऊ दे...
नाहीतरी डिझाईन जुनंच झालेलं...

आता मात्र सख्यांनो,
मला नका विचारू,
नवीन डिझाईनचं नाव नका काढू.

ते जे काळं मंगळसूत्र असतं...
ते कसंही खुलूनंच दिसतं...
त्याच्याशिवाय गं, ओकबोकं वाटतं.

सवय

"लागली सवय?
लवकर लागली म्हणायची!
मग ती सवय, वाईटच असणार.
कारण वाईट सवयच लवकर लागते म्हणतात."

"हो.
तुझी सवय लागली.
तुझ्याशी गप्पा मारायची सवय लागली.
तुझी वाट बघायची सवय लागली."

"सांगितलं नं!
सवय लागणेच वाईट.
आणि वाईट सवयच लवकर लागते म्हणतात!"

"ठीक आहे.
मोडेन मी ही सवय.
व्यसनांच्या आहारी जाण्याची माझी सवय तर नाहीच आहे.
आणि जगण्याचा आव आणण्याची तर माझी पक्की सवय आहे!"