नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 28 December 2013

माझी चित्रकला...

आज कामाला माझ्या घरच्या दोन्ही बायका येणार नाहीयेत ! केर, लादी, धुणी, भांडी हे सर्व गपगुमान आटपायचं सोडून माझा हा उद्योग चालू आहे ! चित्रकलेचा ! गेला तासभर मी घरात वेगवेगळ्या ठिकाणी माझी ही चित्रकलेची वही फिरवतेय ! फोटो काढायला ! कारण कुठेच प्रकाश बरोबर पडत नाहीये ! चित्रावर 'कास्ट' येतेच आहे ! आणि मी त्यावर काहीही उपाययोजना करू शकत नाहीये ! :(
असो…
करा बाबा तुम्ही सहन हे सगळं ! माझी चित्रकला आणि चित्राचे फोटो !
:)


Wednesday, 25 December 2013

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता… :)

हा एक मराठी मुलगा. आम्ही भेटलो तेव्हा आमच्या खूप छान गप्पा झाल्या होत्या. एकूणच रापलेला बोलका चेहरा. खडतर आयुष्य चेहेऱ्यावर उतरलेले. जखमेच्या खुणा, काळा रंग, गुलाबी जांभळे ओठ. मला वाटतं ह्या चेहेऱ्यात खरं तर अजून बरंच काही आहे जे मला नाही कागदावर उतरवता आलेलं. ह्याचे मी आधी एकदा पेन्सिल स्केच केले होते. आणि गेल्या पंधरा दिवसांत जलरंग हाताशी घेऊन दोन प्रयत्न केले होते. अयशस्वी. आजही मी त्याला फक्त १० % न्याय देऊ शकले आहे.
:)


Saturday, 14 December 2013

जुने सवंगडी...

तुम्ही शब्दांच्या शोधात येत असाल आणि तुम्हाला सध्या इथे रंग सापडत असतील. तुम्ही मग चित्रावर एक नजर टाकता आणि निघून जाता. तुम्ही भेट देण्यात मात्र खंड पडत नाही, ह्याची मला जाणीव आहे. परंतु का कोण जाणे सध्या शब्दांनी नव्हे तर रंगांनी मला आधार दिला आहे. कॉलेजचे दिवस सरले आणि रंग, कुंचला ह्यांच्याशी असलेले नाते हळूहळू धुसर होत गेले. ऑफिसमध्ये कुठल्या कामासाठी एखाद्या चित्राची गरज पडली, एखाद्या स्क्रिप्टसाठी स्टोरीबोर्ड करावयाचा असला तर एखाद्या चित्रकाराला स्क्रिप्ट समजावून देऊन त्याच्याकडून मनासारखे काम करून घेणे चालू झाले. कारण अंगावर तीच जबाबदारी आहे. मी बसून चित्र काढणे गृहीत नाही. परंतु, काही दिवसांपासून मन सारखं ओढ घेत होतं ते कागद, रंग आणि कुंचला ह्यांच्याचकडे. जुने सवंगडी दारावर थाप मारत होते जणू. तेव्हा सध्या मी त्यांच्या स्वागतात गुंतलेली आहे. रोज ऑफिसमधून परत आले की त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसते. कधी गप्पा रंगतात तर कधी फसतात. पण हरकत नाही.
मैत्री जेव्हा सगळेच बांध, ओलांडून पुढे जाते तेव्हाच तर ती रंगते.
हो ना ?


Saturday, 23 November 2013

कोण जाणे…असं काही करता येतं ?

असं कुठे माहित असतं...
आपण जगतोय ती शोकांतिका जगतोय ?
असं कुठे माहित असतं...
मंचावर चालू असलेला खेळ आता प्रवाहात सापडलाय…
फेरे फिरतायत… 
नातीगोती…सखेसोबती…
खेळ माझा…
मात्र शेवट त्यांना हवा तसाच हवा…
त्यांच्या हे ध्यानी का येत नाही…मला शोकांतिका आवडत नाहीत…मला शोकांतिकेचं भय वाटतं…
आता असं माझ्यापुढे किती आयुष्य उरलं ?
माझी का धडपड एकटेपणाच्या आयुष्याला सुखाची एक तोकडी झालर जोडण्याची ?
काल एक पाल भिंतीवर चुकचुकताना दिसली.
विषाचा भडीमार मी तिच्यावर केला…
ती तडफडली…
काळ्या रात्रीत ती कधीतरी मरून गेली. 
कोणाला फरक पडला ?
कोणाचं काय थांबलं ?
तिच्या बहिणी…
तिची लेक…
त्यांचं काय गेलं ?
आता मला असं का वाटतंय…
देवाने…अल्लाने…येशु ख्रिस्ताने…
ते प्रतिक माझ्यापुढे मारून ठेवलं होतं ?
माझ्या हातात काही नाही.
विषाचा एकेक डोस दिवसागणिक माझ्यावर होतो आहे.
माझ्या शेवटाच्या तारखा पडताहेत…
माझी ती शेवटची तडफड चालू आहे.
का ध्यास सुखांतिकेचा ?
का हट्ट शोकांतिकेचा ?

कोण जाणे…असं काही करता येतं ?
आपल्याच शोकांतिकेसाठी आपल्याला धाय मोकलून रडता येतं ?

Sunday, 17 November 2013

एक मोती…

सूर्यास्ताच्या दरम्यान आम्ही दोघी समुद्र किनारी पुन्हा एकदा उभ्या होतो. तिचा हात हातात धरून चालताना माझ्या हातावर पडत असलेला दबाव मला जाणवत होता. संधिवातामुळे लंगडत चालणे तिचे. माझ्या विश्वासाने. समुद्र तोच होता. किती दशकांपूर्वीचा. लाट त्याच होत्या. सफेद पाणी देखील तेच होते. मात्र समुद्राच्या हृदयात आता मळमळ होती. त्याने कितीही कष्ट करून ती बाहेर फेकण्याचा प्रयत्न करावा. नशीब त्याला काहीच बाहेर फेकू देत नव्हता. वयोपरोत्वे माणसाचे अनुभवविश्व उंचावते आणि शरीर मातीच्या ओढीने वाकते. तशीच ती चालत होती. ओल्या वाळूतून. तिथे तिचा वाकडा झालेला पाय तिला रोवता येत होता. कोरड्या वाळूचा काय भरवसा ? कोरडे मन कधी कुणाचा आधार होते ? ओले मन, जगण्याचा कोंब, इर्षा उगवू देते. होय ना ?

कैक वर्षांपूर्वी आम्ही दोघी ह्याच किनाऱ्यावर चाललो होतो. माझा हात तेव्हाही तिच्या हातात होता. तिचा हात तेव्हा खंबीर होता आणि माझा चिमुकला बावरलेला हात. आयुष्यात पहिल्यांदा समुद्र मी तिच्याबरोबर बघितला होता. ती लाट आपल्या पायाशी येते, गुदगुल्या करते आणि निघून जाते. आपल्याला तिच्या बरोबर नेत नाही हे तिने माझा हात घट्ट धरून ठेवला होता म्हणून मला कळले. पायाखालची वाळू सरकण्याचा अनुभव आयुष्यात असंख्य वेळा घेतला. मात्र वाळू जरी सरकली तरी पाय रोवून मी उभी राहू शकले ते नक्कीच तिने नाळेतून दिलेले बाळकडू होते.

"आमचं दोघांचं लग्न ठरल्यावर आम्ही संध्याकाळी ह्याच समुद्रावर येत असू." आई म्हणाली.
मी मनात आईचा हात धरून दुडूदुडू वाळूत उड्या मारत होते. आणि आई, बाबांबरोबर त्याच किनाऱ्यावर मनाशी स्वप्ने घेऊन चालत होती. मला हसू आलं. 
"भाईमामा ओरडले नाही वाटतं कधी तुला ?" मी विचारलं.
"लग्न ठरल्यावर येत होतो अगं !" बिचारी उगा गांगरली ! आणि तसेही हुशार आणि रुबाबदार बाबांशी असलेल्या आपल्या मैत्रीचा माझ्या भाईमामांना अभिमान होता ! ते कसले आईला रागावतायत !
"अजून जाऊया का आई पुढे ?" मी तिला विचारलं.
"नको. आता बसुया तिथे. बरं वाटलं आज." थोड्या अंतरावर असलेल्या दगडी कठड्याकडे नजर टाकून ती म्हणाली.

"काल तुझ्या आईबरोबर मी समुद्रावर गेले होते ! खूप छान वाटलं हं मला !" आतल्या खोलीत मला ऐकू आलं. आई माझ्या लेकीला अगदी आवर्जून सांगत होती.

घराच्या मागच्या बाजूला पाच मिनिटांच्या अंतरावर असलेला समुद्र. रात्री सर्व सुस्तावलं की अजून कानी गाज पडते. कित्येक वर्षांनी मी तिच्याबरोबर समुद्रावर एखादा तास काढला.

ते क्षण ओल्या वाळूचे होते.
शिंपल्यात एखादा वाळूचा कण शिरावा...सर्वत्र पसरलेला काळोख त्या कणाने नाहीसा करावा…काळवंडून गेलेले मन उजळून टाकावे, किल्मिष नाहीसे व्हावे आणि त्या रेणूचा टपोरा मोती होऊन जावा…
...असे मला वाटले.

Thursday, 31 October 2013

Must watch....

प्रत्येकाने/प्रत्येकीने बघायलाच हवी आणि आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर 'शेअर' करायलाच हवी अशी short film...

That day after every day






 

Sunday, 20 October 2013

मॅरो डोनेशन...

डोळे थोडे उघडे ठेवायलाच हवेत. सत्तावीस इंची संगणक वा टीव्ही म्हणजे जग नव्हे. चोवीस तास त्याच्याकडे बघत राहिल्याने जगाकडे बघण्याची दृष्टी नासते. कारण आपण शेवटी जे तिथे मांडले आहे तेच बघायला बांधील रहातो. आपले आकाश विस्तारू शकत नाही. त्यातून आपल्या 'मिडीया'वाल्यांना एकूणच आपला देश पाताळात चालला आहे असेच दर्शवायचे असते. अर्थात लोकसत्ताचे 'सर्वकार्येषु सर्वदा' सारख्या सदराचा अपवाद धरावयास हवा. तरीही एकूण सगळ्यांचा सूर नकारात्मक असतो. रोजचे वर्तमानपत्र वाचून जर आपण त्यांच्या दृष्टीतून आपल्या देशाकडे बघावयास लागलो तर आयुष्य संपवण्यापलीकडे काहीही उपाय रहाणार नाही.

आज आयआयटी, पवई येथे जायला मिळाले. मित्राचे त्यासाठी आभार मानायलाच हवेत. सचिनने बोलावले होते ते आज तिथे मॅरो डोनेशन ह्याविषयी माहिती देण्यात येणार होती त्याकरिता. तिथे काही जगप्रसिद्ध डॉक्टर उपस्थित होते. काही व्हिडीओ दाखवले गेले. चर्चा झाली. श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. 

त्यावेळी तिथे दिलेली लिफलेट्स मी स्कॅन करून टाकली आहेत. माझ्या अज्ञानाला वेठीस धरून मी त्यांचे भाषांतर करण्यापेक्षा तेच जर वाचलेत तर तुम्हाला अधिक नीट माहिती मिळू शकेल असं मला वाटतं.














लिंक: http://www.mdrindia.org/

इयत्ता पाचवीत असताना जेव्हा मला आपल्याला जे फळ्यावर दिसते त्यापेक्षा शेजारीच बसलेल्या जुईला अधिक दिसते हे कळले तेव्हा मी एक क्लुप्ती काढली होती. दोन्ही हातांचे आंगठे आणि त्याच्या बाजूची दोन बोटे मी डोळ्यांसमोर जुळवे व बारीक अशी एक चौकट  तयार करीत असे. त्यातून बघितले असता, नजर एकत्रित आल्याकारणाने, मला त्या चौकटीसमोरचे सुस्पष्ट दिसत असे. मात्र त्यावेळी आपल्याला कमी दिसते आहे हे कळले. बाबांनी मला डोळ्यांच्या डॉक्टरकडे नेले. आता ह्यात सर्वात आधी 'आपल्याला मुळातच कमी दिसते' हे मान्य करणे आले. व त्यानंतरच चष्मा हा उपाय माझ्या डोळ्यांवर अडकवण्यात आला.

आपले हे जे जग आपण २४ X ७ आखून घेतले आहे ते आपल्याला संकुचित करून टाकीत आहे हे मान्य करणे आले.

आजचा माझा दिवस कारणी लागला. मॅरो डोनेशन संदर्भात असलेली वयोमानाची अट लक्षात घेता मी डोनेशन करू शकणार नाही हे लक्षात आलं. ही माहिती माझ्या कानी, समोर निदान काही वर्षे आधी यायला हवी होती. मात्र तरीही माझ्या कार्यक्षेत्राला धरून मी 'मॅरो डोनेशन' संदर्भात काम नक्कीच करू शकते. त्या दृष्टीने माझा मेंदू लगेच चालू लागला हे मात्र नक्की.

हेही नसे थोडके...
:)

Saturday, 19 October 2013

निवड

रामाने रावणाचा वध केला.
सीतेची सुटका झाली.
रावणाची दहा डोकी धरतीवर पडून राहिली.
किडे पडले. 
मांस संपून गेले.
त्यानंतर झाले काय… 
ते किडे गाभण राहिले.
त्यातून असंख्य किडे जन्माला आले.
वळवळत जगू लागले.
रावणाचे अंश असे पृथ्वीवर अस्ताव्यस्त पसरले.

सूडाला मृत्यू नाही.
सूड अमर आहे.
तो पुनर्जन्म घेतो.
असंख्य रावण मोकाट सुटले.
रामावरचा सूड घेत नाचू लागले.
राम पुण्यवान होता.
त्याला सद्गती मिळाली.
त्याचा आत्मा मुक्त झाला.
मग आता पुन्हा राम जन्माला येणार कुठून ?
असंख्य रावणाचे वध करणार कोण ?

सीता…
अशोकवन…
भकास अश्रू.
लक्ष्मीबाई…
पाठंगुळीस नारायण…
उसळती आग.
सीतेचा धावा,
लक्ष्मीचा लढा.
कोमल सीता,
सौदामिनी लक्ष्मी.
निवड माझी
मी सीता ?
की
मी लक्ष्मी ?

Monday, 14 October 2013

अरेरे !

आपल्या मातेकडे संपूर्ण दुर्लक्ष करावयाचे.
आणि तिच्यावर अत्याचार झाले की म्हणावयाचे 'हिच्या पोटी मी जन्म घेतला ह्याची मला शरम येते.'
काय म्हणावयाचे ह्या वागण्याला ? 
ह्या  विचारधारेला ?
बेजबाबदार ?
आचरटपणा ?
की बालिशपणा ?
हे विधान मी माझ्या घरात बसून केले तर ते निदान जगाच्या नजरेआड तरी राहिले असते. परंतु, तसे न करता जालावर टाकावे ? ह्या कृतीकडे बालिश म्हणून दुर्लक्ष काय म्हणून करावे ? जालावरच जाऊन मी ह्या कृतीचा तीव्र निषेध काय म्हणून करू नये ?

दिल्लीतील पाशवी बलात्कार व त्यानंतर मुंबईतील बलात्कार. ह्या दोन बातम्या अमेरिकेत बसून तू वाचल्यास. तू सुन्न झालीस आणि मानसिक धक्यातून तू जालावर लिहिलेस…
'ह्या देशाची मी नागरिक असल्याची शरम वाटते.'

तो देश फक्त तुझा नाही. माझा देखील आहे. कोणत्याही फोटोफ्रेममध्ये वा मूर्तीत बसलेल्या देवापेक्षा वा फक्त देवच कशाला, माझ्या प्रत्यक्ष आईवडीलांपेक्षा देखील जिला मी माझे आयुष्य वाहिले आहे अशा माझ्या भारतमातेविषयी हे असे कोणी विधान करावे ? मी ते काय म्हणून सहन करावे ?

आता तुझी ही भावना आणि माझे जाज्वल्य देशप्रेम हे दोन्ही बाजूला ठेवू.
खडे सत्य बोलू. माझ्या वाचनात आलेले तुझ्या समोर ठेवते.
आधारसामुग्री (data) दाखवते, जे देश दुसऱ्या देशातील स्त्रियांना कशा प्रकारची वागणूक मिळते ह्याविषयी बोलतात त्या देशांमध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार हे इतर देशांपेक्षा अधिक असतात. उदाहरणार्थ, अमेरिकेमधील लैंगिक गुन्हेगारीचे प्रमाण हे २७.३, युनायटेड किंगडममध्ये २८.८, फ्रांन्समध्ये १६.२. इतर प्रगत राष्ट्रामध्ये स्विडनचे प्रमाण ६३ आहे. ह्या तुलनेमध्ये सर्वात कमी प्रमाण हे लेबेनॉनमध्ये दिसून येते. ०.५. ह्या तुलनात्मक अभ्यासामध्ये भारतातील बलात्काराचे प्रमाण हे १.८ आहे.

तुझ्या विधानान्तर्गत एक तुलना लपलेली आहे. ह्या देशाची नागरिक होण्याची शरम वाटते असे म्हणताना अमेरिकेत तुझे असलेले वास्तव्य बघता; त्या देशाचे नागरिकत्व बहुधा तुला अभिमानाचे वाटत असावे. कुठल्या ना कुठल्या देशाचे नागरिकत्व असणे हे गरजेचे. आज भारताला बलात्कारी देश म्हणून बोंबाबोंब करताना पृथ्वीवरील इतर देशांकडे देखील नजर टाकावीच लागेल. एखाद्या भारतीयाने विश्वविक्रम केला की माझा देश म्हणून छाती पुढे काढून मिरवायाचे व अशी घृणास्पद घटना घडली की मला शरम येते की मी भारताची नागरिक आहे…असे विधान करावयाचे…ह्याला दुटप्पीपणा म्हणू नये काय ? काही चांगले घडले तर मान ताठ करून चालणे व ज्यावेळी आपला परदेशी मित्र आपल्या मातृभूमीला बलात्कारी म्हणत आहे तेव्हा आपणही त्यात सामील व्हावे व जालावर घोषित करून टाकावे…मला लाज वाटते मी भारताची नागरिक आहे…हा कुठला न्याय ?

मला हे लिहायलाच हवं होतं. ती गरज होती. माझा देश उघड्यावर पडलेला नाही. त्याचे नागरिकत्व घेणे वा असणे ही कोणावरही जबरदस्ती नक्कीच नाही. उलट अशी जबरदस्ती होऊ नये. कुठलही नातं बळजबरीने नाही तग धरू शकत. आपण कुठे आणि कोणाच्या पोटी जन्म घेऊ ह्यावर आपला ताबा नक्कीच नसतो. मात्र आपण ज्या भूमीवर जन्म घेतला त्या देशाला अभिमान वाटावा असे आपण नक्कीच काही करू शकतो. ते आपल्या हातात नक्कीच असते. मात्र दुसऱ्या देशात राहावयाचे, तेथील सुखसोयींचा उपभोग घ्यावयाचा आणि मग जगभरातील लोकांना नाहक माझ्या मातृभूमीची मला कशी लाज वाटते असे सांगणे हा मात्र गुन्हा आहे. अक्षम्य गुन्हा.

ह्या दोन्ही बातम्या जशा मला सुन्न करतात तशीच जगाच्या पाठीवर असंख्य स्त्रियांवर होणारे पाशवी अत्याचार जेव्हा माझ्या वाचनात येतात तेव्हा मी एक माणूस म्हणून सुन्न होते. माणूस म्हणून जन्माला आल्याची घृणा मनात दाटते. आज भारतीय स्त्रिया धीर एकवटायला शिकल्या आहेत, बलात्कार झाला ह्याचा अर्थ आपले आयुष्यच संपून गेले, आता समाजात तोंड दाखवायला जागा उरली नाही वगैरे गैरसमजातून हळूहळू बाहेर पडत आहेत. पोलिस स्टेशनावर पोचत आहेत. घडलेल्या गुन्ह्यांची नोंद होऊ लागली आहे. मग अगदी छेडछाडीची देखील. हे बळ आम्ही भारतीय स्त्रियांनी नक्कीच मिळवले आहे. आमचे ओझे पेलण्यास आम्ही समर्थ आहोत. आमच्यावर बलात्कार झाले म्हणून परदेशात बसून ज्या माणसांची मान 'अरेरे, मी भारतात जन्म घेतला' असे विचार मनात येऊन खाली जाते, अशा दुतोंडी, स्वार्थी परदेशस्थ स्वदेशीयांची भारताला गरज काय ?

शरमच जर वाटायला हवी आहे तर ती घडलेल्या घटनेची वाटायला हवी !
मी ह्याबाबत काही करू शकत नाही वा करू शकणार नाही ह्याबाबत स्वत:ची शरम वाटायला हवी !
आज ह्या प्रयासात आपला म्हणावा असा कुठलाच देश आपल्याकडे उरला नाही ह्याची शरम वाटावयास हवी !
अरेरे !

Friday, 11 October 2013

'सकाळ'च्या तनिष्कामध्ये हजेरी !

आपल्याबद्दल, लिखाणाबद्दल काही लिहून आलंय असं कोणी सांगितलं तर मनातील पहिली प्रतिक्रिया काय असते ? भीती. 'कोण जाणे काय लिहिलं असेल ?! बरं लिहिलंय की वाईट ?' इत्यादी ! म्हणजे आधी भीती नंतर चिंता ! मग जे काही लिहून आलंय ते नजरेसमोर आलं की धीर एकवटून वाचणे ! आणि मग एकंदर बरंच लिहून आलेलं दिसलं तर हुश्श !

खरं तर असं होता कामा नये ! आपण कोणाला खुष करायला तर लिहित नाही ! सर्वसामान्य आयुष्य जगत असताना जे जे प्रसंग समोर येतात त्यातून जाताना आपण नक्की कसे सामोरे जातो, हे मागे वळून बघितले तर आपलीच ओळख आपल्याला होऊ लागते. आणि स्वत:शी खरं बोलता आलं नाही, सोंगं आणावी लागली तर जगणे अवजड होईल ! समोरच्याला सोडा, इथे स्वत:ला आपण ओळखू शकलो तरी खूप झाले ! त्यामुळे घडले तसे, त्यात्या वेळी वा नंतर मनात झालेल्या उलाढाली ह्या स्वच्छ, सुलभ मराठीत लिहिण्याचा प्रयत्न असतो. जेणे करून वाचणाऱ्याला त्या प्रसंगामध्ये स्वत:ला उभं करता यावं. मग हातून मूर्खपणा झाला असला तरी तो तसाच उभा करणे हेही आलेच ! नसते सोंग आणा कशाला ?!
नाही का ?

…तर झालं असं की तुम्हा सर्वांसारखीच पुण्याची माझी एक मैत्रीण. तिने मध्यंतरी सांगितलं की 'सकाळ'च्या तनिष्का सदरामध्ये तुझ्या ब्लॉगवर लिहून आलंय… ब्लॉगचं नाव नाही दिलेलं पण लिखाणातून ओळख पटतेय.
धाबं दणाणलं. काय आलं असेल ? तिला विचारलं. ती म्हणाली चांगलंच आलंय ! मग ऑनलाईन तनिश्काचा शोध वगैरे. नाही लागला. मग पुन्हा तिच्याकडे वळले ! तिला थोडा त्रास देणे आता भाग होतं ! नाही मिळत म्हटलं… स्कॅन करून पाठव बाई तूच आता !

काल खरं तर दिवे मालवून गादीवर पडले होते. पण का कोण जाणे झोप लागेना. झोप न लागणे म्हणजे नाहक आयुष्याची चिंता वगैरे माझ्या डोक्यात शिरू लागते. म्हणून म्हटलं बघू… फेसबुकवर कोणी चकाट्या पिटत असेल तर आपण देखील थोड्या पिटू ! म्हणून विश्वाचे द्वार उघडले ! 
तेव्हा द्वाराबाहेर मैत्रिणीचे मेल विसावले होते ! मेल थोडी फुगीर होती. त्यात दोन जेपेग्स ज्या बसल्या होत्या !  
धाबं !
डाउनलोड होत होत्या तेव्हा मनात आलं…
बारा महिने तेरा काळ जाहिरातक्षेत्रात असते खरी…ग्लॅमर अवतीभवती फिरत असतं…ते खरं तर आपल्या स्वभावाविरुद्ध…लेक तर म्हणतच असते…'तुला तत्व धरून जगायचं तर असतं…पण जे फिल्ड तू निवडलंयस ते तर खोटं…किंवा मुलामा चढवलेलं…तरी तू कशी काय रमू शकतेस कोण जाणे ?!'

माझ्या लिखाणातील खरेपणा हा माझा आहे…समोरच्याला भावला असेल का…कुठे लागट लिहिलं असलं तर ? टीका झेपवून घेता यायला हवी !

वाचा आता तुम्हीच !
ब्लॉगच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नसल्याकारणाने 'रेस्टइजक्राईम' बद्दलचं लिखाण मी सोयीसाठी वेगळ्या रंगात केलं आहे.
केतकी, धन्यवाद गं !  :)


Wednesday, 9 October 2013

माझा गणपती

गेल्या वर्षी म्हटल्याप्रमाणे आम गणपतींचं दर्शन घ्यायला मी जात नाही. कारण एखाद्या ठिकाणी आपण उपस्थित राहिलो, तेथील भक्त गणतीमध्ये आपण एक आकडा वाढवला तर त्याचा अर्थ त्या गणपतीचे भक्त ज्या विचारांनी उत्सव साजरा करितात त्याला आपला पाठींबा आहे असा होतो. मी नसत्या फंदात पडत नाही. ह्याचा अर्थ असा अजिबात होत नाही की 'मी' न गेल्याने सार्वजनिक मंडळांना काही फरक पडतो. पण प्रश्न मला रात्री शांत झोप लागण्याचा असतो. आणि मला झोपायला फार म्हणजे फारच आवडतं. इतकं की लहानपणी मी झोपून कित्येक तासांनी उठले की मला पत्ता नसायचा…तोच दिवस आहे की रात्र उलटून गेली आहे आणि दुसरा दिवस उजाडला आहे ! तर मला शांत झोपायला आवडतं आणि दिवसभर उगाच चुकीच्या गोष्टी करून गादीवर पडलं की डोक्यात भुंगा शिरतो. 
म्हणून माझ्या स्वत:च्या मन:शांतीसाठी, चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या उत्सवांच्या फंदात मी पडत नाही.

असो.
तर गेल्या वर्षीपासून मला एक अतिशय सुंदर गणपती सापडला आहे. आमच्या ऑफिस समोरच्या रुस्तम चाळीतला गणपती. हा नवसाचा गणपती आहे. दोन तीन दशकांचे वय ह्या गणपतीचे आहे. चाळीतील लहान मुले त्याची सजावट करतात. चाळीतला चित्रकार एका ठराविक भिंतीवर गणपतीचे सुंदर, रेखीव चित्र काढतो. त्याच्या पुढे टेबल टाकून मुले एखादी कल्पना घेऊन भन्नाट सजावट करतात. विसर्जनाच्या दिवशी नारळाच्या पाण्याने भिंत पुसून काढली जाते. 
बस. 
इतकं सहज. इतकं सुंदर
ना ढोल ताशा ! ना भक्तीचा तमाशा ! 

मला त्या चित्रातील गणपतीच्या अस्तित्वाविषयी तिळमात्र देखील शंका नाही. बाकीचे राजेबिजे, जेव्हा विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी समुद्राला त्सुनामी येऊन गेल्याचं भग्न रूप देतात तेव्हा हा गणपती शांत चित्ताने लाकडी कठड्याला लटकणाऱ्या डालडाच्या डब्यातल्या तुळशीच्या हिरव्या रोपाच्या शीराशीरांतून वहात असतो !
















आत्ताच बातमी वाचली !!!!!
'लोकसत्ता गणेश मूर्ती स्पर्धे'तील 'पर्यावरणस्नेही' सजावटीचे विशेष पारितोषिक लोअर परळ येथील रुस्तम रहिवाशी गणेशोत्सव मंडळाला मिळाले.
खूष ! एकदम खुष !

Tuesday, 8 October 2013

ढेप

रोजच्या आयुष्यात पानंफुलं, इंद्रधनुष्य, फुलपाखरं वगैरे लिहिणं फार कठीण. खरं तर मागे वळून पाहिलं असता स्वत:ची ओळख स्वत:ला पटत नाही. अर्थात ह्या सर्व त्यात्या वयातील गोष्टी असतात. निदान सोळाव्या वर्षात तरी मला जग सुंदर दिसू शकलं हे माझं भाग्यच म्हणायचं. परंतु, सध्या लिहायला सुरवात केल्यावर मला मार्गावर दवबिंदू दिसत नाहीत. सामान्य माणसाने सामान्य जगण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या वाट्यास कुठले दवबिंदू ?

तत्वांना धरून जगायचं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या मित्र मंडळींचा रोष ओढवून घेणे.

मजल्यावर तीन लिफ्ट्स. आमचा मजला तिसरा. फारफार तर पन्नास सेकंद तिष्ठत उभं राहावं लागतं. अशाच एके दिवशी आम्ही दोघी वाट  बघत उभ्या होतो. मुंबईतील लोकलमधील लोकं रोज चेहेरा दिसतो म्हणून नाही का नजरभेट झाली की हसून निदान मान तरी डोलावत ? मला तिचं नाव नाही माहित…चेहेरा मात्र खात्रीदायक ओळखीचा. मनातील चढउतार चेहेऱ्यावर दिसावेत त्याप्रमाणे लिफ्टच्या डोक्यावरील दिवा आतील हालचाल दर्शवित होता. एक लिफ्ट उघडली. दोनतीन माणसे बाहेर पडली.
माझी बिननावाची मैत्रीण चापल्याने आत शिरली. तिने बटण दाबून धरलं. लिफ्ट आ वासून स्तब्ध.
"Come!" मला तिने इशारा केला.
"But that one is going up." मी म्हटलं.
"That's okay ! We will take it down !" आत्मविश्वासाने ती उद्गारली. एकदा मिळालेल्या आदेशानुसार वर निघालेल्या लिफ्टला अधोमार्गावर नेणे तसे फारसे कठीण कुठे ? फक्त एक लाल बटण दाबावे. आणि तिला खाली जाण्याचा आदेश द्यावा.
"But…people must be waiting upstairs."
"That doesn't matter!"
"No…I can't do that."
वरच्या मजल्यावरची माणसं काही माझी मित्र नव्हती. पण मित्र असण्याचा संबंध आलाच कुठे ?
तिने खांदे उडवले. कुठून मी या बाईला विचारलं असं काहीसं. तिच्यासाठी बाब फार शुल्लक होती. दार बंद करून घेतले. वर आकडा दोन पेटला. लिफ्ट मान खाली घालून निघाली. तिच्या हातात तसेही काही नसतेच.

एखाद्या लहानश्या गोष्टीत आपण आपला स्वार्थ बाजूला ठेवू शकत नाही. मग आयुष्यात कधी एखादा मोठा लाभ समोर आला तर आपण कसे घट्ट उभे रहाणार ?

नाही म्हणणे कठीण असते काय ? वाल्याच्या बायकापोरांनी वाल्याला नकार नव्हता का दिला ? दुसऱ्याच्या ताटातले आपल्या ताटात ओढून घेणे ही एक वृत्ती नव्हे काय ? कधी छोट्या तर कधी मोठ्या प्रसंगातून ती बाहेर डोकावते. आपल्या डोक्यात हे असले कृमी अंडी घालीत तर नाहीत ना ह्यावर आपण लक्ष ठेवले पाहिजे. नाहीतर डोके भ्रष्ट व्हायला फार काळ नाही लागायचा.  आपण जगात एकटेच आहोत व ह्या जगाचा जन्मच मुळात माझ्यासाठी झालेला आहे असा भ्रम करून घेण्याचे आपण बंद करावयास हवे.
आपली कृती, ही येणाऱ्या पुढल्या क्षणाची जबाबदारी पेलत असते.
Trying to see a bigger picture….असं काहीसं.

तत्त्व म्हणजे गुळाची ढेप...
आपण…

Saturday, 28 September 2013

हार

नव्याकोऱ्या गाडीला ठोकलं जाणं तरी ठीक आहे.

गाडी ऑफिसखाली एका जागी स्थिर उभी असताना रात्री दीड वाजता एका टँकरने ठोकली. गाजावाजा झाला. सिक्युरिटीने मला खाली बोलावलं. अवाक. हतबल. वगैरे.

त्यानंतर पुढले दोन महिने ऑफिसच्या इमारतीच्या एचआर खात्याशी व टँकरच्या चालकाशी बैठकी झाल्या. त्याच्यावर मी दया दाखवावी अशी त्या चालकाची मागणी होती. आणि ती दया त्याच्या मालकाने त्याच्यावर दाखवावी असा माझा मुद्दा होता. गाडीच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च त्याच्या मालकाने द्यावयाचे नाकारले. मग विमा. त्यातून गाडीची दुरुस्ती झाली. एक महिना उलटून गेला परंतु, विमाच्या वरच्या खर्चाची भरपाई ना त्या मालकाकडून झाली ना चालकाकडून. इमारतीच्या एचआर खात्याने मला तारखा द्यायला सुरवात केली.

अजून थोडे दिवस गेले.
त्यावर अजून थोडे दिवस उलटले.
तसंही हे वर्ष घसरगुंडीवर बसल्यासारखं घसरलंय.
साधारण दोन महिने पार घसरले.

मी एचआरच्या अमितला दूरध्वनी लावला.
"काय झालं माझ्या पैश्यांचं ?"
"मिळणार तुम्हांला मॅडम."
"मिळणार हे तुम्ही मला गेले दोन महिने सांगताय."
"बघतो मी…त्याच्या मालकाला सांगितलंय…देईल म्हणालाय तो…"
"नवीन काहीतरी सांगा राव तुम्ही मला !"
"तसं नाही मॅडम…"
"बॉस ! तसं नाही तर कसं ? तुम्हाला काय वाटलं काय हे सगळं म्हणजे ? काय टाईमपास चाललाय माझा ? तुम्हाला स्वत:ला तुमच्या शब्दाचा मान नाही ! फुकटच्या तारखा सांगताय च्यायला  तुम्ही गेले कित्येक दिवस !"
"मॅडम, थोडा संयम बाळगायला हवा तुम्ही."
"संयम च्यायला गेला तुमचा चुलीत ! आज जर नाही माझे पैसे दिलेत ना तुम्ही तर आज संध्याकाळी त्या टँकरची वाट लावली नाही ना तर नावाची अनघा नाही मी ! दगड धोंडे मारून तोडफोड करून टाकेन मी ! च्यायला ! कोणाला सांगता तुम्ही संयम ठेवायला ?! मला ?! तुमची गाडी अशी कोणी फोडली असती म्हणजे ठेवला असता काय तुम्ही तुमचा तो संयम ! डोक्यात जाऊ नका राव तुम्ही ! गपगुमान माझे पैसे त्याच्याकडून मिळवून द्या ! नाहीतर फोडून टाकेन आज रात्री त्याचा टँकर !"
"मॅडम, मला पंधरा मिनिटं द्या…मी परत फोन करतो तुम्हाला."

पंधरा मिनिटात चेक माझ्या ऑफिसच्या रिसेप्शनला ठेवला गेला.

गाडी फोडल्याच्या दु:खापेक्षाही आता माझं दु:ख आयुष्यभर डोक्याला मुंग्या आणणारं होतं.
मी दोन महिने सामोपचाराने घेत होते…मला तारखा दिल्या गेल्या. 
मी अर्ध्या मिनिटासाठी मानसिक संतुलन जाऊ दिलं… ताडताड बोलले…जे माझ्या बाबांनी, गुरुवर्यांनी कधी शिकवलं नाही अशा भाषेत बोलले…
…पुढल्या क्षणी मला माझे पैसे मिळाले.

कितीही काहीही झाले तरी लढा हा सनदशीर मार्गानेच द्यावयाचा ही माझ्या बाबांची शिकवण आहे. लढा देण्याजोगे लहानमोठे प्रसंग आयुष्यात समोर उभे ठाकणार आहेतच. परंतु हे लढे अरेरावी, दंगेधोपे, जाळपोळ ह्या मार्गाने सोडावयाचे नाहीत. आपण आपल्या तत्वांचा मार्ग सोडला तर आपण आणि गुंड ह्यात फरक तो काय ?
सद्य परिस्थितीत सामान्य नागरिकाच्या सहनशीलतेचा झालेला अंत; माझ्या शब्दांमधून कर्कश बाहेर पडला. आणि मी त्या अंताचा एक पुरावा बनले. 
ही माझी हार आहे.
माझ्या विचारांची हार आहे.
माझ्या वैचारिक घसरणीला…अध:पतनाला माझी मीच जबाबदार आहे.

Thursday, 12 September 2013

जुईची फुलं...

"लगेच परवा कुठून आणणार मी हिच्यासाठी कपडे ?"
ती म्हणाली तेव्हा आम्ही दोघी एका शूटसाठी एकत्र आलो होतो. ती तिच्या मोबाईलवर आलेला एक एसेमेस वाचत चिडक्या स्वरात हे बोलत होती. मी काही न कळून तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. आणि तिने तिच्या त्राग्यामागचे कारण सांगायला सुरवात केली.
"I am a working woman…ज्या बायका घरीच असतात त्यांचं ठीक आहे… त्यांना शक्य आहे हे असं एका दिवसात मुलांसाठी कपडे तयार करणं…दही हंडी आहे आणि माझ्या लेकीच्या शाळेत ती साजरी होणार आहे. आणि त्यासाठी तिला कृष्णाचे कपडे घालून यायला सांगितलंय ! आता एका दिवसात कुठून आणू मी कपडे ?!"
"तसेही कृष्णाचे कपडे फार काही कठीण नाहीत ! कमीच कपडे असायचे त्याच्या अंगावर !" मी.
"तरीही…ते मोराचं पीस कुठून आणणार मी ?"
"मी खरं सांगू ? मला वाटतं हे असं आपल्या मुलांना तयार करण्यात ना फार मजा असते !"

आपण जे बोलतो त्याला बहुतेक वेळा आपले अनुभव, आठवणी जोडलेल्या असतात. 
जुईच्या कोमल फुलाचा जणू नाजूक देठ.

लेक कधी मायकल जॅक्सन तर कधी ओनिडाचा डेव्हिल तर कधी टपोरे काळे ठिपके अंगावर मिरवणारा डाल्मेशन. अडीच फूट उंचीचा, कुरळ्या केसांचा मायकल जॅक्सन, रंगमंचावर चांगला दीड मिनिटांचा मून डान्स करून बक्षीस घेऊन आला होता. ओनिडाच्या डेव्हिलची डोक्यावरची छोटीशी शिंग, तिच्या लाडक्या बाबाने रंगवून दिलेला चेहरा…दिवस अगदी संस्मरणीय. आणि ज्युनियर केजीमध्ये वर्गातल्या नाटकातलं ते डाल्मेशनचं पिल्लू…शेपटी हलवणारं. घरून निघतानाच आम्ही भूभू बनून निघालो होतो. वर्गशिक्षिकेने बघताच क्षणी नाकाच्या टोकावर एक काळाभोर टिळा लावला आणि क्षणात माझं पिल्लू, डाल्मेशनचं पिल्लू झालं !

हे सर्व क्षण माझे. तेच माझ्या लेकीचे. काही आम्हां तिघांचे. फक्त आमचे. असे क्षण वेचावे…त्यासाठी आयुष्य वेचावे. पुढले आयुष्य झेपावे…जगता यावे…त्याकरता हीच जुईची नाजूक फुले टिपावी.
आयुष्याची नौका मग कितीही उलटीपालटी झाली…विश्वास बसणार नाही कदाचित; पण ह्याच कोमल कळ्या तारून नेतात…जगवतात.

"I don't know…I had left my job…just wanted to be with my daughter…didn't want to miss out anything…मला आपलं वाटतं…करियर…आज नाही तर उद्या, पुन्हा त्या प्रवाहात शिरू शकतो. मागे नक्कीच पडतो…पण शर्यतीत भाग घेताना मध्येच आपल्या पायांना विळखा घालून एक गोड पिल्लू आलं तर मग कसली ती शर्यत आणि कसलं काय ? ते पिल्लू इतकं भराभर मोठं होत जातं की आजचा दिवस आणि कालचा दिवस ह्यात पण काही साम्य नसावं ! करियरच्या शर्यतीत हे सगळे क्षण बाजूला सारले तर ते मात्र पुन्हा कधीच मिळत नाहीत…करियर लागते पुन्हा हाताशी…असं आपलं मला वाटतं…!"

मला नोकरी सोडणं शक्य होतं ही महत्त्वाची बाब आहेच. ते नसतं तर मात्र फार कठीण होतं. जाहिरात विश्वाला घड्याळ नसतं. चोवीस तास सात दिवस. तेव्हा रहात होतो डोंबिवलीला. दोघांनी जाहिरातविश्वात काम करायचं मग तर बाळं, संसार विसरूनच जावं. रहाट गाडग्याला बांधून घ्यावं.

त्यापेक्षा हे बरं.
थोडी मागे का होईना; पायावर उभी आहे…
हातात जुईची फुलं आहेत.…
पायात त्यांचं बळ आहे.

वहावले.

Wednesday, 28 August 2013

का कोण जाणे...

आकाश स्वच्छ होतं. निळसर काळं. चंद्र गोल होता. वाटोळ्या दिव्यासारखा. दिवा आहे पण खांब नाही. असा. त्याच्या जवळचे आकाश उजळलेले. दूरचे ? अंधारलेले. काळोखी. त्या काळोखात एकही चांदणी नाही. का ? कोण जाणे. तो सगळा अवकाश त्या एकट्या चंद्राचा होता. कधीकधी आपल्याला नाही का वाटत ? एकटं असावं. गुमान बसावं. आतला आवाज ऐकावा. वगैरे वगैरे.
काल चंद्र दिसला. बऱ्याच महिन्यानंतर भेटला. असं होतं. साधी मान उंचावून वर करून बघण्याची तसदी घेतली नव्हती. त्याने एखाद दिवशी यायचंच नाकारलं असतं की मग धाबं दणाणलं असतं.
आयुष्यात वारंवार अमावस्या कोणाला हवी असते ?
चंद्राने रात्री उगवावं.
सूर्य येईस्तोवर दिवा चालू ठेवावा.
मग सूर्याने यावं.
प्रकाश, जीवन वगैरे द्यावं.
आम्ही जगावं.
घेत जावं.
देणं हे काम नेहेमी समोरच्याने करावं.
हे आमचं आयुष्याचं गृहीत आहे.
चंद्राच्या उपकाराचं मला ओझं झालं.
सूर्याचे उपकार कसे फेडू कळेनासं झालं.
उगाच मनात आलं…
दोघांना पोत्यात घालावं…
एक टेबल टेनिसचा चेंडू…
दुसरा फुटबॉलचा.
पाठीवर घ्यावं…
कुठे निघून जावं…
एकटं…
समुद्रात दोघांना भिरकावून द्यावं…
…मग आहेच…
रोजची अमावस्या. 

Sunday, 18 August 2013

थोड़ा है थोड़े कि जरुरत है...

मंडळी,
आपल्या छोट्या मित्रमैत्रिणींना गणवेष पाठवण्याचे ठरवले आणि तुम्ही सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. गणवेषांची खरेदी झाली, पोच झाली आणि तरी आपले पैसे उरले ! मग आपण काही वेगळेच करण्याचे ठरवले. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र दुष्काळाची बोंब सतत ऐकू येत होती. मग जरा आसपास चौकशी केली. शबरी सेवा समितीच्या श्री. करंदीकरांना भेटलो आणि एक वेगळंच काम हाती लागलं.

पाण्याची साठवण. ज्या भागात पाऊस पडतो अशा भागात जर टाक्या बांधल्या तर त्यात पडणारा थेंब झेलता येईल, साठवता येईल ही संकल्पना.

आपण बहुतेकजण शहरात रहातो त्यामुळे आपले अज्ञान अफाट आहे ह्याची जाण होतीच. मग श्री. करंदीकरांच्या मदतीने एक पाडा गाठला. आणि तुम्हा सर्वांचे उरलेले पैसे पाण्याची साठवण करण्याच्या कामी लावले. १०,००० लिटर पाणी साठवले जाऊ शकते. ज्यावेळी कधी टाकीतील पाणी संपेल त्यावेळी पाणी मागवावे लागले तरी टँकरमधून येणारे पाणी पाड्यातील लोकं ह्या टाकीमध्ये साठवू शकतात ही अशा प्रकारे टाकी बांधण्यामागची अजून एक जमेची बाब.



महत्त्वाचे म्हणजे ही टाकी पूर्णत: लाभार्थींच्या श्रमदानाने उभी राहिली आहे. आपण ह्यात फक्त सामान पुरवले आहे. 

ह्या वर्षाचे आपण अंगावर घेतलेले काम फक्कड पार पडले आहे. तेव्हा ह्यातून स्फूर्ती घेऊन आपण पुढल्या वर्षी कोणते काम हाती घ्यावे…ह्याबद्दल सर्वांनी विचार करा…आणि अर्थात आम्हाला तुमच्या कल्पना कळवा.
ह्या अनुभवातून जे काही शिकलो, तुमचा विश्वास संपादन केला…त्यातून अशीच काही कामे अजून पार पाडू शकलो तर जगण्याला थोडा अर्थ प्राप्त करून देऊ शकू…
असे वाटते.

 
कामाची सुरवात… 







टाकी बांधताना वापरले गेलेले साचे

उरलेले पैसे सुपूर्त

Sunday, 28 July 2013

मला सुचलेली, मी लिहिलेली जाहिरात…

सध्या मला सुचलेली, मी लिहिलेली जाहिरात टीव्हीवर दाखवली जात आहे. तुम्ही कदाचित बघितली देखील असेल. इथे टाकतेय म्हणजे तुम्हाला कळेल ना की हे माझं पिल्लू आहे !

आणि काय माहित तुम्ही टीव्ही बघता की नाही ?! कदाचित टीव्ही बघत असालही पण जाहिराती सुरु झाल्या की नेमके टीव्ही समोरून उठून जात असाल ! काही भरवसा नाही तुमचा !  :)
त्याही पुढे जाऊन…तुम्ही सगळे कुठे कुठे जगभर आहात ! म्हणजे आम्ही भारतात आमच्या टीव्हीवर जे बघत असतो ते काही तुम्ही बघत नाही !
 
गेल्या वर्षी तयार होऊन देखील ऑन एअर येईस्तोवर बरेच महिने गेले. शेवटी शेवटी तर ऑफिसमधल्या मित्रमैत्रिणींनी मला चिडवायला सुरवात केली होती…" ते तू 'नही नही' गाणं कशाला टाकलंस ? म्हणून तुझी फिल्म पण त्या 'नही नही झोन'मध्ये गेलीय !"
:) :)



Thursday, 25 July 2013

ताईस,

ताई,
मी तुला ओळखते तेच मुळी मांच्या गावच्या घराशेजारी रहाणारी आणि मांची नेहेमीच काळजी घेणारी म्हणून.
मां…माझ्या गत नवऱ्याने जिला आईपेक्षा देखील वरचे स्थान दिले होते. त्याच्या कुमारवयापासूनच. गावी तू तिच्या उतारवयात, तिच्या सोबत होतीस म्हणून तुझी ओळख मला तुझ्याबद्दल ओलावा देऊन गेली होती. तूही मला शरदची बायको म्हणून ओळखतेस…वा ओळखत होतीस. कधीतरी तुझ्या हातची भाजीभाकरी खाल्ल्याचे देखील थोडेफार आठवते.

त्या दिवशी तुम्हा सगळ्या गावातल्या लोकांना अरुण गेल्याचं कळवण्यात आलं. आणि तुम्ही गावावरून पोचेस्तोवर पुढे काही होऊ शकत नाही हेही मला कोणी सांगितलं. भर पावसात माणगावावरून निघून आता तुम्ही किती वाजता डोंबिवलीला पोचाल ह्याबाबत वेगवेगळे अंदाज काढले गेले. ज्यावेळी तुमच्या गाड्या पनवेलला पोहोचल्या असं तुम्ही कळवलं त्यावेळी इस्पितळातून अरुणला घेऊन शववाहिका त्याच्या घराच्या दिशेने निघाली. गावोगावी पोचलेल्या मोबाईलच्या सुविधा.

त्याला घरी आणल्यावर त्याच्या कन्येने आणि बायकोने केलेला आक्रोश मी तुम्हाला काय सांगणार ? तो तर होणारच होता. मला त्याबद्दल बोलायचे देखील नाही. मला तू आणि गावावरून आलेल्या त्या कोणा माणसाने जे केलं त्याबद्दल मात्र बोलायचं आहे.

"हे करायलाच हवं. आता ती पुन्हा कधी नटणार नाही. हिरव्या बांगड्या घालणार नाही. तिला पुन्हा नटलेली बघायची ही बाईच्या नवऱ्याची इच्छा असते. हे करायलाच लागतं." तुम्ही येण्याअगोदर एक बाई हे सांगून गेल्या. अरुणच्या कन्येला. ती परोपरीने सगळ्यांना विनवण्या करत होती. "नका ना आईला असं काही करू. करायलाच हवं का हे सगळं ?"…
"तू तरी सांग ना सगळ्यांना." ती मला म्हणाली आणि मी बधिर झाले.
"Mau, this is beyond my capacity."

हे परक्या भाषेतलं वाक्य माझ्यासाठी परक्या अनघाच्या तोंडून निघालं.
आज हे वाक्य; माझ्या मृत्यूचा दरवाजा अजून थोडा उघडतं.
आज ते वाक्य; तीळतीळाने मला त्या दरवाजाकडे ढकलत रहातं.
आज ते वाक्य; मला शतकानुशतके मागे ढकलतं.
माझ्या छातीवर मणामणाचं ओझं ठेवत जातं.
वाटतं…
मी कधीच चितेवर चढले आहे…
माझ्या छातीवर कैक गोण्या ठेवल्या गेल्या आहेत.
रोज त्या माझ्याच अश्रूंनी भिजत जातात. अधिकाधिक भारी होतात.
माझी लाकडं आता कोरडी होणार तरी कधी ?
माझी चिता आता पेटणार तरी कशी…?

त्याच्या कृश तरुण बायकोच्या हाडांभोवती एक लुगडं गुंडाळलं गेलं.
ताई, तुम्ही येऊन जे करणार होतात त्याची ती पूर्व तयारी होती. कुठल्या चित्रपटाचे जर हे दृश्य असते तर त्याला गूढ संगीत दिले गेले असते. वेळ झाली. बाहेर पाऊस होता. काळोख माजला होता. काळोखाचे माझ्यावर फार उपकार झाले त्या रात्री. सूर्य माजला असता तर धर्म रखवालदारांचा माज भगभगीत दिसला असता. 
इमारतीसमोर अरुणला ठेवलं गेलं. काही वेळापूर्वी कोणी वर छप्पर घातलं होतं. गळक्या आभाळापासून आडोसा ?
की होऊ घातलेल्या चेटकी कारवायांना आडोसा ?
मला तेव्हा वाटले… 
आम्ही खोल काळोख्या उंदराच्या बिळात आहोत. आम्ही काळे करडे उंदीर आहोत. भयाण रात्र आहे. आम्ही माणुसकीत खोल खोल दात खुपसले आहेत. माणुसकी सगळ्याच उंदरांच्या तोडांतून ओघळते आहे. किळसवाणे. सगळेच. आमचे लालभडक डोळे सुखात लुकलुकत आहेत. बिळाबाहेर ओल आहे. बिळामध्ये ओल आहे.
आम्हा उंदरांच्या हृदयात मात्र कोरडे पाषाण ठासून भरले आहेत.
मी उभी होते. माझ्या बाजूला अरुणची बायको होती. हाताची हाडं पदर गळ्याभोवती घट्ट दाबून घेत होती. तू तिच्या पलीकडे उभी होतीस. आल्यापासून तू एक आक्रोश मांडला होतास. काळोख भेदत तो आवाज एक भयाण वातावरण निर्मिती करीत होता. वहिनी तुला सांगत होत्या…शांत रहायला. पण मला वाटतं त्या संपूर्ण काळनाटकाचे मुख्य पात्र तू होतीस. एकच गोष्ट तू पुन्हा पुन्हा करत होतीस. सुलभाच्या पदराआड झाकलेल्या मानेला तू हात घालत होतीस. का कोण जाणे मी तिला घट्ट मिठीत धरून ठेवलं होतं. तिचं दु:ख माझ्या ओळखीचं होतं. गेले सहा महिने जीव तोडून हेच ते दु:ख तिच्यापासून मी दूर बांधून ठेवलं होतं.

अचानक तुझ्याबरोबर गावावरून आलेला तो मध्यमवयीन माणूस कुठूनसा डोकावला. "खाली बस आणि आटपून घे ते !" तुझ्या कानात अधिकारवाणीने त्याने सांगितले. हो हो करत तू तिच्या गळ्याला हात लावलास. कोण जाणे का मी तिथून तिरमिरीत वर गेले. मी बधिर होते. माझी घुसमट झाली. मला आक्रोश करायचा होता. एकही आवाज न काढता मी बिछान्यावर बसून आक्रोश केला. असा आक्रोश जो धो धो वाहत्या ओढ्याला अकस्मात एखादा अजस्त्र दगड आडवा यावा आणि ओढा लुप्त व्हावा…तसा आक्रोश मी केला आणि तसाच तो छातीत ढकलून दिला. पुन्हा दाराशी आले. भिंतीला टेकून ठेवलेली छत्री उन्मळून पडल्यागत जमिनीवर पडली होती. तिला घेतले आणि तशीच खाली आले.

ताई,
तोपर्यंत तू दावा साधला होतास.
तिच्या गळ्याभोवती पदर अधिकच आवळला गेला होता.
हृदयाच्या घुसमटी पुढे शरीराच्या घुसमटीचं कुठे काय ?

लहानपणी माझ्या एका मैत्रिणीचे बाबा वारले. तिच्या आईने तिचे मंगळसूत्र कधीच उतरवले नाही. कदाचित त्या बळावर तिने आपल्या तीन मुलांना हिंमतीने वाढवले.
बाबा गेले त्यावेळी आईने तिच्या गळ्यातले मंगळसूत्र काढून माझ्या हातात ठेवले. म्हणाली कपाटात ठेवून दे. त्या मंगळसूत्राची झळ अजून मला माझ्या हातावर जाणवते.
माझ्या कपाटाच्या आत ठेवलेले माझे मंगळसूत्र माझ्या नजरेस अधूनमधून पडतं. हृदय जड होतं.
तुझं लग्न कधी झालं की नाही ? कधी हा प्रश्न मला पडला नव्हता त्यामुळे त्याचं उत्तर मला माहित नाही.
त्या दिवशी देखील तुझ्या गळ्याचा शोध मी घेतला नाही.
आता मला तुला एकदा तरी भेटायचं आहे. दुसऱ्या एखाद्या बाईच्या मनपाखरूचे तडफडणे; एखादी बाई धर्माच्या नावाखाली पचवू तरी कशी शकते हे मला जाणून घ्यायचे आहे.

त्या दिवशी मी दुसऱ्या खोलीत बसले होते. सगळ्या तरुण मुली होत्या तिथे. त्यांना प्रश्न पडले होते…नवरा गेला म्हणून बायको आता कधीच नटू शकणार नाही ? तिच्या हातातला हिरवा चुडा फोडायलाच हवा ? तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र दुसऱ्या कोणी खेचून 'वाढवायला'च हवं ? तिला मग सतीच देऊन टाका. ही माणसं सती देण्याआधीचे सर्व विधी करतात…फक्त तिला जाळत नाहीत ! कारण तो कायद्याने गुन्हा ठरवला आहे ! हा कुठला धर्म ? हा कुठला न्याय ?
दबक्या आवाजातील कुमारिकांचे ते प्रश्न होते.
खोलीत एक भीती दबा धरून बसली होती. भिंतीवरच्या पालीसारखी.
आणि मी ?
ताई, मी अधांतरी होते. 
बधिर.
आयुष्य थांबून गेल्यासारखी.
आतल्या खोलीत हक्काने मंगळसूत्र घालणाऱ्या बायका. 
काही माझ्यापेक्षा वयाने सान.
तर काही माझ्यापेक्षा थोर.
बाहेर गॅलेरीत तरुण कुमारिका.
मी ना इथली.
ना मी तिथली.
शतकानुशतके बायकांवर टाकल्या गेलेल्या ओझ्याखाली फुका मी घुसमटलेली.
माझा नवरा गेला तेव्हा देवाने माझी आणि माझ्या मुलीची काळजी घेतली. ती अशुभ घटना दुबईत घडली. नाहीतर मला खात्री आहे की ही तुझ्यासारखीच कोणी दुसरी धर्मरक्षक बाई माझ्याही समोर चेटकिणीगत उभी राहिली असती ! माझा तमाशा केला असता !

"तू तरी कर ना काहीतरी…"
ही मला करण्यात आलेली विनंती होती ?
ही एक खात्रीलायक हक्काची मागणी ?
मी नक्की काहीतरी करेन….तिच्या आई सोबत घडून येणारी दुर्दैवी घटना मी थांबवेन…
ही आशा…?
आणि मी काय केले ?

माझ्या पायात फुका मणामणाचे ओझे.
डोक्यावर धर्माचा फुकटचा खविस.
पुरुषांनी जन्माला घातलेला.
बायकांनी जोपासलेला.
ताई, आज मी एक मागणी घालणार आहे. तुझ्याकडे नाही. कारण पुरुषांनी केलेले नियम शिरसावंद्य मानून पाळणारी तू बाई आहेस. तुला दुसऱ्या बाईच्या मनाची तशीही पर्वा नाही.
ती बाई, नवरा मेला म्हणून स्वत:च्या नावापुढे लागलेले त्याचे नाव जाळून टाकणार नाही ! हे जग एखाद्या एकट्या बाईसाठी किती धोकादायक असू शकते हे मी तुला सांगायची आवश्यकता मला वाटत नाही. परंतु, त्या काळ्या मंगळसूत्राबरोबर त्या समाजात वावरताना…नवऱ्याच्या अस्तित्वाचे कवच नसताना…ते मंगळसूत्र कदाचित तिला एक संरक्षण देऊ शकेल…हा विचार तर तुम्हा कोणाच्या मनात देखील येत नाही…!

आज माझे आवाहन पुरुषांसाठीचेच आहे.

…ज्यांना गावकी आहे…ज्यांच्या आयुष्यात त्यांची गावची माणसे फार मोठे स्थान राखून आहेत…सोयर असो वा सुतक…ज्यांचे कुठलेही कार्य ह्या धर्मरक्षकांशिवाय पुढे सरकत नाही…ज्यांची ही माणसे स्वत:ला; माणुसकीपेक्षा धर्माचे रक्षक मानतात…ज्या ज्या पुरुषांना आपल्या बायकांविषयी थोडी तरी आपुलकी आहे… त्या प्रत्येक पुरुषाने आत्ताच एक काळजी घ्यावी…आपल्या त्या धर्मरक्षक आप्तस्वकीयांना सांगून ठेवावं…
"मी मेल्यावर माझ्या बायकोला सती देता येत नाही म्हणून तिच्या मनाला असे सती देऊ नका….! तिच्या गळ्यातले मंगळसूत्र, तिच्या हातातील हिरव्या बांगड्या… ह्यांचे नक्की काय करायचे ह्याचा विचार तिला आणि फक्त तिलाच करू द्या. तो निर्णय तिने कधी घ्यायचा हा निर्णय देखील तिचाच हवा…आणि ही माझी शेवटची इच्छा असेल ! माझ्या नावावर ही नसती बिलं फाडू नका ! ती नटलेली मला शेवटचे जे काही बघायचे असेल ते मी आणि ती जिवंतपणी बघून घेऊ ! मी मेलो म्हणून माझ्या बायकोवरची सगळी सत्ता तुमच्या हातात आल्यागत तिचे हृदय जाळून टाकू नका !"

अनघा

Monday, 24 June 2013

किंवा…कदाचित…

वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि त्यातून पराकोटीची घटना घडते. मृत्यू. कधी एखादा तर कधी असंख्य. त्याला कारण कधी आपला स्वत:चा निष्काळजीपणा वा कधी दुसऱ्या कोणाचा. उदाहरणार्थ, कधी मी सिग्नल तोडून माझे वाहन पुढे आणलेले असते वा बागेत चालल्यासारखी मी भर रस्त्यात चालत असते. अशी अनेक कारणे असतात मृत्यू ओढवायाला. कधी भीषण तर कधी एखाद्या माणसाला शांत मरण येऊन जाते. म्हणतात ते त्याचे पुण्य असते.

मृत्यू हे सत्य आहे आणि तो वेगवेगळ्या स्वरूपात येतो.

मला फार लहानपणी माझ्या माणसांच्या मृत्यूची भीती वाटत असे. पराकोटीची भीती. बाबा कधी झोपलेले दिसले की मी वारंवार त्यांचा श्वास चालू आहे की नाही ह्याची खात्री करून घेत असे. त्यांच्या मृत्युच्या भीतीने मला रात्ररात्र झोप लागत नसे. कधी माझ्या स्वप्नात माझे बाबा मेलेले असत तर कधी माझी बहिण. रोज रात्री माझ्या रडत उठण्याला माझे बाबा सोडून सगळे कंटाळलेले होते. शेवटी बाबांनी माझ्या उशाखाली छोटा चाकू ठेवायला सुरवात केली आणि कसं कोण जाणे पण मला मृत्यूविषयी भीतीदायक स्वप्नं पडणे बंद झाले. हा बाबांचा कोकणातील रामबाण उपाय.

मग कधी बालपणीची मैत्रीण, कधी सख्खी आजी, कधी  एखाद्या मैत्रिणीचे बाबा, नेहेमी घरी येणारे एखादे काका असं करत करत मृत्यू आमच्या दारात आला आणि माझ्या बाबांना घेऊन गेला. ते फार भयंकर झाले. म्हणजे एखाद्या माणसाची नुसती ओळख होणे वेगळे आणि एखादा माणूस अगदी आरपार आपल्या घरात शिरणे वेगळे. हा तर कधीच नकोसा असलेला पाहुणा…
पण मग हे आयुष्यातील सत्य वळलं. त्यातील टाळता न येण्याचा अविर्भाज्य घटक कळला. हळूहळू एखादी मैत्रीण, शाळेतल्या एखाद्या लाडक्या बाई, मामेबहीण, मावसबहीण…काळाच्या ओघात नाहीसे होणाऱ्या माणसांची ही यादी वाढतीच असते…तेव्हा शेवटी त्याला इत्यादी इत्यादी लागू शकते हे पण जाणवले. कारणे वेगवेगळी. कधी हृदयविकाराचा झटका, कधी एखादा अपघात, इथेतिथे कर्करोग अशी विविध कारणे. बाबा गेले तेव्हा एक डॉक्टर मावशी म्हणाली, "मरायला शेवटी एक कारण लागतं." त्यावेळी हे असं मावशी कसं काय बोलू शकली वगैरे वगैरे वाटलं. बुद्धी थोडी बाल होती. आयुष्यात अजून बरंच काही शिकायचं होतं.

मृत्यू ही एक अंतिम आणि अटळ घटना असते. आणि तो शरीराचा होत असतो. आपल्या वागण्याने आपण आप्तांच्या आत्म्याला रोज जे क्लेश देत असतो तो त्या आत्म्याचा ऱ्हास अधिक वाईट. तीळतीळ मरण. आत्म्याचे.
हे झाले विषयांतर.

आपले आप्तस्वकीय गेले की होणाऱ्या दु:खाला सीमा नसते. आणि त्यात कुठलीही तुलना नसते. म्हणजे आज माझा नवरा गेला तेव्हा माझे दु:ख अधिक तुझा तर काय बाबाच गेलाय…असे काही डोक्यात येणे हा तद्दन मूर्खपणा. तसेच आज एखाद्या माणसाचे आईवडील वारले तर त्याला होणारे दु:ख; हे मला अनोळखी असेल वा माझ्यापर्यंत ते पोहोचूच शकत नाही…असे म्हणणे हे कितीसे बरोबर ? प्रत्येकाच्या आयुष्याला हा मृत्यू स्पर्श करून गेलेलाच असतो. काल, आज ना उद्या. आपल्या माणसाची चिता पेटवणे, ते कायदेशीर कागदपत्र तयार करून घेणे, मृतदेहाची ओळख पटवून देणे, आपल्या माणसांची  कुजलेली, किडे पडलेली शरीरे ताब्यात घेणे, त्यावर ते सोपस्कार करून त्यातून थंड डोक्याने बाहेर येऊन पुढले आयुष्य काहीच झाले नाही असे जगू लागणे हेच तर आयुष्य असते. शेवटी परीक्षा जिवंत माणसाची असते. मृत नाही. एकदा का हे कळले आणि वळले की जगता येते. त्यासाठी मरणाचे सगळेच प्रकार समजून घेण्याची गरज पडत नाही.

सध्या उत्तराखंडामधील मृत्यूच्या बातम्या आपण ऐकत आहोत. बघत आहोत. त्यात कोणाची चुकी ह्यावर चर्चा होत आहेत आणि काही दिवस होत रहातील. चर्चा करणे हा मनुष्याचा स्वभावधर्म आहे. प्राण्यांची भाषा मनुष्याला अवगत नसल्याकारणाने तिथे वाहून गेलेले घोडे, हरणे ह्यांच्या विषयी त्यांच्यात चर्चा झाली की नाही हे समजायला मार्ग नाही.

माझा स्वत:चा कर्मावर फार विश्वास आहे. थोडंफार वाचन आणि वडिलांच्या विचाराचा प्रभाव हे कारण असू शकेल. आज जे काही बरं म्हणा वा वाईट म्हणा माझ्या कुठल्या ना कुठल्या तरी कर्माचे ते फळ आहे. कधी गोड तर कधी कडू. महाभारतामध्ये ज्यावेळी द्रौपदी कृष्णाला विचारते," माझ्यावर हा असा भयानक प्रसंग ओढवला (वस्त्रहरण) त्यात माझी काय चूक ?" त्यावरचे कृष्णाचे उत्तर मला माझी प्रत्येक कृती ही माझी जबाबदारी आहे हे समजून, जाणून घेण्यास भाग पाडते. आणि हलकेच हसू देखील आणते. "जातीचे कारण देऊन तू कर्णाला नाकारलेस. त्याचा अपमान केलास. कर्णाला वरले असतेस तर त्याने तुला वाटून घेतले नसते, असे द्यूतात लावले नसते. तेव्हा तू जे कर्म केलेस त्याची जबाबदारी उचल. ती नाकारू नकोस."
हे असे स्पष्ट उत्तर कृष्णाच्या जिवाभावाच्या सखीला, द्रौपदीला, फारसे आवडले नाही म्हणे.
तसेही समोरच्याने आपली चूक दाखवून दिलेली कोणाला आवडते ?

मग आता उत्तराखंडातील महाप्रलयामध्ये जी मनुष्यहानी झाली त्यात त्या माणसांचा दोष काय ?
कदाचित…
ह्याचे उत्तर ज्यात्या आत्म्याने शोधावयाचे असेल.

किंवा…
कदाचित…
देवाला, जो संदेश मनुष्यजातीपर्यंत पोहोचवायचा होता; तो संदेश पोचवण्याची कामगिरी…हेच त्या अनेक जीवितांचे कार्य असेल. आणि त्याचा संदेश फक्त एखाद्या व्यक्तीमार्फत नव्हे तर अनेक व्यक्तींमार्फत, तो मनुष्यजातीपर्यंत त्याने पोहोचवला असावा. मृत व्यक्तींचा आकडा जितका मोठा तितका त्या देवलोककडून आलेला संदेश महत्त्वाचा नव्हे काय ?

किंवा…
कदाचित…
ज्या देवावरील अतीव विश्वासाच्या आधारे; आत्यंतिक कष्ट सहन करीत त्याचे भक्त त्याच्या द्वारी पोहोचले होते…त्याच्या द्वारी शरीरत्याग करिता येणे…आत्मा अनंतात विलीन होणे हे एका परीने पुण्यच नव्हे काय ?

किंवा…
कदाचित…
भौगोलिकदृष्ट्या नाजूक व देवाचे वास्तव्य जेथे आहे ( असे मानले जाते आणि म्हणूनच तर तेथे रीघ लागते ) अशा परिसरात, बेसुमार व निसर्गाचे भान न ठेवता बांधकामे केली जात आहेत, त्याच्या वास्तव्याचे बाजारीकरण केले आहे; आणि असे असूनही तेथे श्रध्देच्या भावनेने जाणे म्हणजेच तिथे चालू असलेल्या पापामध्ये वाटेकरी होणे, असे त्या देवाचे म्हणणे असेल व त्या 'कर्मा'ची ही फळे नसतील असे कशावरून ?

किंवा…
कदाचित…
मनुष्यजातीकडून नित्य होणाऱ्या असह्य शारीरक क्लेशामुळे देव तिथून कधीच निघून गेला असेल.

किंवा…
कदाचित…
परवाचा महाप्रलय हा त्याचा कोप असेल….
"आता मला एकट्याला, शांततेने जगू द्या !" असा हा त्याचा आकांत असेल.

कोण जाणे. 


Friday, 21 June 2013

चिंधी...

"परवा स्कूटरवर मागे बसलेल्या एक बाई पडल्या आणि गेल्या."
"कशा पडल्या ?"
"रस्त्यात स्पीड ब्रेकर होता…त्याच्यावर रंग नव्हता मारला…त्यामुळे तो त्या बाईंच्या मुलाला, जो स्कूटर चालवत होता, त्याला कळला नाही…त्याने स्पीड कमी नाही केला…बाईंनी हेल्मेट नव्हतं घातलं…योगायोग जुळून आला…त्या उडाल्या…आणि खाली पडून गेल्या."
"काय यार…कसं पण येऊ शकतं ना मरण ? चिंधी एकदम !"

हल्ली काही सांगता येत नाही…
मरण 'चिंधी' येऊ शकेल…
मग आपण आपलं जगणं...
'भरजरी' विणलं तर ?

Thursday, 20 June 2013

पुन्हा वाचन…

कान आणि डोळे कार्यरत असले की तोंड बंद रहातं. एखाद्या मधमाशांच्या पोळ्यागत, आपला मेंदू नित्य नव्या ज्ञानाने प्रसरण पावू शकतो. आणि त्यातून आपले डोळे उघडतात.

मिलिंद बोकीलांचं 'गोष्ट मेंढा गावाची' हे पुस्तक. एक आदिवासी गाव. मेंढा. देवाजी, गावातील प्रत्येक गावकऱ्याला सोबत घेऊन सर्वांच्या विचारांत व त्यातून सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणतात. परिस्थितीला एक धडा म्हणून बेधडक अंगावर न घेता पळवाटा पकडणाऱ्याने, तर आधी हे पुस्तक मिळवावे.  
शहरातील आमची पाच बोटं एकजूट का नाही दाखवत ?
कारण त्या प्रत्येक बोटाला दुसऱ्यापेक्षा अधिक उंचीची आस आहे.

एका देशातील पक्षी जेव्हा दुसऱ्या देशातील भेटत असेल तेव्हा ते एकमेकांत  कुठल्या भाषेमध्ये संवाद साधीत असावेत ?
जर त्यांना कधीही ही पंचाईत पडत नसेल तर ती मला का पडावी ?
मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येतं कारण ती माझी मातृभाषा आहे. शाळेत इंग्रजी होतं तरीही इंग्रजीतून बोलण्याचा फारसा प्रसंग येत नसे. आणि कॉलेजमध्ये अर्धेअधिक मराठी बोलणारे त्यामुळे तिथेही काही अडले नाही. नोकरीला लागल्यावर मात्र कधी आणि कसे कोण जाणे परंतु इंग्रजी, जिभेला हलके वाटू लागले आणि डोळ्यांना झेपू लागले. परंतु, बंगाली भाषेचा आणि माझा संबंध शून्य. मुंबईत बरेच बंगाली आहेत परंतु त्यांना मातृभाषा येत नाही. त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांचे दुर्दैव अधिक आहे. ते देखील माझ्यासारखेच ब्रिटीश जी भाषा सोडून गेले त्या भाषेचा आधार घेऊन रवींद्रनाथ टागोर वाचतात.

Chokher Bali.
वाळूकण. 
डोळ्यामध्ये खुपणारा.
आणि शिंपल्यामध्ये मोती फुलवणारा देखील वाळूकणच.
तरुण विधवा बिनोदिनी ही त्या वाळूकणासारखी.
रूपवती, बुद्धिमान, अहंकारी. सरळसाध्या, हळव्या, आशाच्या आयुष्याची होळी पेटविण्यास निघालेली ही बिनोदिनी.
रवीन्द्रनाथांच्या ओघवत्या बंगाली भाषेमधील हे पुस्तक मला वाचता आले असते तर काय बहार आली असती !

Broken nest and other stories.
पुन्हा भाषांतर.
ह्या कथेचा चित्रपट आला तो चारुलता ह्या नावाने. पुस्तकातील नायिकेचे नाव चारुलता. माझ्या सौभाग्याने मला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी मिळाली होती. आणि नशिबाने ती मी दवडली नव्हती. चित्रपट आधी आणि त्यानंतर पुस्तक वाचणे ही तशी काही फारशी आनंदाची गोष्ट नव्हे. परंतु ज्यावेळी दिग्दर्शक सत्यजित रे असतात त्यावेळी त्या चित्रपटाविषयी असे काही बोलता येईल काय ? पुस्तकामध्ये टागोरांनी आपल्या शब्दांमध्ये श्रीमंत घरातील तरुण चारूचे उदास, एकटे दिवस टिपले आहेत तर चित्रपटात तेच सत्यजित रेंनी तितक्याच भकासतेने टिपले आहे. एकटेपणातून आपल्या दिराकडे नकळत ओढली जाणारी चारू…निर्बळ, हताश चारू. 
वितभर लांबीचं हे पुस्तक आणि कृष्ण धवल सिनेमा. त्यातील ही ९३ पानांची गोष्ट.
एकही शब्द जसा उणादुणा नाही तशीच चित्रपटामधील एकही चौकट ही अडगळ नाही.
त्याच पुस्तकातील The Ghat's tale, Notebook आणि Postmaster ह्या लघुकथा.
"आई, तुला त्यातली कुठली गोष्ट सर्वात आवडली ?"  माझ्या लेकीने पुस्तक वाचून संपवून पलंगावर ठेवता ठेवता मला विचारलं. मी विचारात पडले. "The Ghat's tale." मी म्हटलं. 
"तुला गं ?" 
"काही सांगताच येत नाही. पण मला वाटतं मला Postmaster आवडली."
हे पुस्तक नक्की मिळवा. संपल्याशिवाय खाली नाही ठेऊ शकणार तुम्ही.
मूळ तुर्क भाषेतील 'My name is Red' हे इंग्रजी पुस्तक वाचताना हे भाषांतर आहे असे अजिबात जाणवले नव्हते. दुर्दैवाने सदर बंगाली साहित्याचे तसे नाही म्हणता येत. बऱ्याच वेळा शब्द टोचतात. वाक्य खुपतात. भाषांतर सुंदर असायला हवं होतं अशी चुटपूट वाटत रहाते. 
"Why these translations are so bad?" मी माझ्या एका बंगाली मित्राला विचारलं. बंगाली लोकांचं इंग्रजी वाईट असतं असं न पटणारं उत्तर मला मिळालं. कोण जाणे माझ्या प्रश्नातील दु:ख त्याला झेपलं नसावं.
दुसऱ्या एका मूळ बंगाली 'इंग्रजी कॉपी रायटर'ला देखील मी हाच प्रश्न विचारला. तो म्हणाला…God knows. मी म्हटलं," Why don't you try ?"
"My Bengali is not good!"

मराठी भाषेतील भाषांतर कदाचित मला खटकले नसते काय ?

The Little Prince.
हे पुस्तक तुम्ही अजून नाही वाचलंत तर काय वाचलंत ? 
हा आणि हाच प्रश्न योग्य आहे. इतके हे पुस्तक सुंदर आहे. १९४३ साली, ओंत्र दि सा-एक्झुबे ह्या फ्रेंच लेखकाचे हे पुस्तक, कमीतकमी २५० भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. माझ्या हातात हा छोटा राजपुत्र विसावला तो गौरीच्या घरातून. शंभर पानांची ही गोष्ट. जन्माला आल्यावर आपण धडपडत चालू लागलो होतो…कुठलेही नियम ज्ञात नव्हते. कागदावरच्या चार रेघांमध्ये, अवकाशातील कुठल्याही आकारामध्ये आपल्याला काहीही गवसू शके. हळूहळू ती नजर धुसर होत गेली…आणि तरी देखील आपल्याला समज आली असं उगाच वाटू लागलं. ह्या छोटेखानी जगप्रसिद्ध पुस्तकामधून; लहान राजपुत्राच्या नजरेतून आपण मोठ्यांची आयुष्याची कोडी बघू लागतो…आणि एक सुंदर आणि त्याच वेळी करुणेची एक अस्पष्ट छटा असं मनोहारी चित्र आपल्यासमोर उभं रहातं. 
लेखकाने पानापानावर रेखाटलेली ती सुरेख चित्र…शब्द, विचार, विविध कल्पनांची अखंड भरारी…आपल्याला हे सर्व अशा काही एका उंचीवर नेऊन ठेवतं तो अनुभव मुळातच शब्दातीत. 
आणि माझ्या शब्दांत इतुकी ताकद कुठली ?

सध्या अमेरिकेत रहात असलेली माझी एक भाची खूप छान छान पुस्तकं वाचत असते. त्यामुळे ती सध्या काय वाचतेय ह्याची मी अगदी आवर्जून तिच्या आईकडे चौकशी करत असते. ह्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं…'जय'.

देवदत्त पटनाईक ह्या तरुण लेखकाचं हे पुस्तक मग मी माझ्या लेकीच्या वाढदिवसाला भेट दिलं. तिने प्रथम वाचलं आणि त्यानंतर मी ते हातात घेतलं. वाचन चालू असलेलं पुस्तक, त्याच्या शेवटच्या पानापर्यंत सतत माझ्या बरोबर असतं. माझं पोट आणि माझं डोकं हे अगदी लहानपणापासून एकत्र जेवायला बसतात !

'जय' ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे महाभारतातील विविध कथा लेखकाने आपल्यासमोर उभ्या केल्या आहेत. त्या अर्थात नव्या नाहीत, परंतु, त्यांना त्याने छोट्या छोट्या स्वरूपात, सरल भाषेत शब्दबद्ध करून, प्रत्येक गोष्टीखाली त्याने आपले विचार मांडले आहेत. महाभारत ज्यावेळी घडले, त्यावेळची समाजाची स्थिती, त्यावेळचे रीतीरिवाज, स्त्रियांचे विचारस्वातंत्र्य; हे इतक्या सुलभतेने त्याने आपल्यासमोर उभं केलं आहे की मनात विचार येतो…आपण ज्यावेळी महाभारत वाचलं त्यावेळी आपण नक्की काय वाचलं ? अर्थात महाभारत हे एक असे काव्य आहे जे तुमच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तुमच्याबरोबर वाढत जातं. दुर्गा भागवतांचं 'व्यासपर्व' हे माझं फार लाडकं पुस्तक. त्यातून त्यांनी महाभारतातील वेगवेगळी व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर वेगळ्या उजेडात आणली. जसं आम्ही आमच्या कॉलेजमध्ये स्थिरचित्र काढत असू. त्यावेळी समोरची मांडणी माझ्या खुर्चीतून मला जशी दिसे तशीच ती माझ्या सहविद्यार्थ्यांना दिसत नसे. त्याचा कोन वेगळा; त्याच्यासमोरच्या रचनेवर सूर्यप्रकाशाने मांडलेला खेळ वेगळा. तसं काहीसं. विचारांना प्रवृत्त करणारी पुस्तकं मला फार आवडतात. हे पुस्तक तर मध्येच मला हसायला भाग पाडी. "हे कधी माझ्या डोक्यातच आलं नाही !" असं म्हणून मी माझ्या लेकीला तिने वाचलं असूनही परत तिला वाचून दाखवी !

पटनाईकांनी स्वहस्ते काढलेल्या चित्रांचा उल्लेख न करणे हे म्हणजे अचानक स्मृतीभ्रंशाचा झटका आल्यासारखं !
माझ्या कचेरीतील बहुतेक सर्व तरुण इंग्रजी वाचकवर्गाने ह्या पुस्तकाचं वाचन कधीच केलंय. आणि त्यांना हे पुस्तक फार भावलंय देखील. त्यातल्या प्रत्येकाला मी एक प्रश्न हमखास विचारी, "Have you read the original Mahabharata ?" बहुतेक वेळा तरी मला उत्तर नकारार्थी मिळालं. आपल्या तरुणवर्गाची महाभारताशी ओळख अमर चित्रकथा वा टीव्ही मुळे झाली. पण मग त्याने नक्की काय बिघडलं ? मी जेव्हा महाभारत वाचलं त्यावेळी कदाचित लहान वयामुळे म्हणा किंवा बुद्धीदौर्बल्यामुळे म्हणा; मला एकही प्रश्न पडला नव्हता. परंतु, मला कधीही न पडलेले प्रश्न ह्या पुस्तकाने माझ्यासमोर आणले आणि त्यातील सगळ्या करड्या रंगाच्या नाना छटा माझ्यासमोर उलगडल्या !

… महाभारत माझी पाठ अशीतशी सोडणार नाही बहुतेक. आता इरावती कर्व्यांचं 'युगांत' मिळवलंय ! मराठी.
त्यांच्या अभ्यासातून, त्यांना दिसलेला तोच तो कृष्ण…आणि त्याचं ते महाभारत !
पटनाईक एका ठिकाणी म्हणतात, गांधारीने आपल्या शंभर मुलांकडे डोळे उघडे ठेवून बघितले असते तर कदाचित महाभारत घडले नसते !
मला आशा आहे युगांत मला आगळा वेगळा आनंद देईल.   

गेल्या दोन ते तीन महिन्यांत मी ही पुस्तकं वाचली. चांगलं काही वाचनात आलं तर ते आजूबाजूला पसरवावं असं मला फार वाटतं. म्हणजे एखादं चित्र छान जमून गेलं की ते वर्गात सगळ्यांना दाखवावं अशी इच्छा शाळेत देखील फार होई !

तसं काहीसं.

Monday, 10 June 2013

देहदान

आपले आयुष्य हे दुसऱ्याचे ओझे होऊ नये.
आकाशातून पुढे सरकताना ढग मागे ओझे ठेवून जात नाही.

सभोवताली सगळे मर्त्य मानव जेव्हा माझ्या मरणाविषयी बोलू लागले त्यावेळी मला जाणवले. आपला अवतार आता संपवायला हवा. इतर कोणी येऊन घाव घालण्याआगोदर आपणच आपले मरण ठरवावे. जन्म ह्याच माणसांनी दिला खरा. पण त्याला आता पन्नास वर्षे उलटली. आपल्या जन्मदात्या वृद्ध आई बापांचा सहवास म्हणजे डोक्यावरचे ओझे मानणारा हा माणूस. त्याला माझे कसले सोयर ?

"पुन्हा अर्ज पाठवून बघा. आणि आता काय करणार ?"
आमच्या सोसायटीच्या अंगणात मी उभा होतो. ताडमाड. नित्य भरपूर नारळ देत असे. कधी कोणाला त्रास नाही. पण अडचण झालो खरा. संस्थापक सभासदांनी जेव्हा इमारत उभी केली त्यावेळी असे बरेच माड पेरले. सोसायटीला आयते उत्पन्न आम्ही मिळवून दिले. परंतु, आता काळाची गरज वेगळी होती. इमारतीचे जेष्ठ सभासदांना 'लिफ्ट'ची गरज भासू लागली. ज्यावेळी इमारत उभी राहिली त्यावेळी सर्वात वरच्या मजल्यावरची घरे त्यांनी घेतली खरी. परंतु, जसा मी पन्नाशीला जाऊन ठेपलो तशी ही मंडळी सत्तरीच्या पुढे गेली. मी वरून खाली बघितले तर मला इमारतीची गच्ची दिसते. पण इतके आता आमच्या जेष्ठ नागरिकांना नाही चढवत. मग वास्तूशास्त्रज्ञ बोलावले गेले. अभ्यास झाला, नकाशे काढले गेले. आणि त्यात माझे मरण ओढवले. महानगरपालिकेला अर्ज गेले. नकार मिळाला. माड असा तोडता येणार नाही, असे सांगितले गेले. पुन्हा अर्ज पाठविला गेला. पुन्हा नकार. माड तोडण्यासाठी लागणारा खर्च काढला गेला. अंदाज काढल्याशिवाय कोणत्याही गोष्टी पुढे सरकू शकत नाही. दहा हजाराचा एक अंदाज वर्तविला गेला. मरण महाग. पुन्हा एक अर्ज. पुन्हा नकार. हवं तर झाडाच्या फांद्या तोडा, पण तुम्ही झाड तोडू शकत नाही. महानगरपालिका म्हणाली. माझ्या भोवती बांधलेल्या लालचुटूक पाराभोवती जमून सर्व चर्चा होत. माझ्या कानावर तर पडतच. माझ्या अंगाखांद्यावर तुरूतुरू धावणारी खारुताई पण सर्व ऐकत असे. आणि मग कुजबुजे माझ्या कानात. मी विचार करू लागलो होतो. अगदी पहिल्या दिवशी जेव्हा एका वास्तूशास्त्रज्ञाने माझ्याकडे बोट रोखले होते, तेव्हाच खरं तर मी विचारात पडलो होतो. सरळसोट विचार. कुठेही गुंता नाही. भूमीत रोवलेला पारंब्यांचा गुंता नाही.

अनुभव बरेच शिकवतो. कोणी माझ्या झावळ्यांवर घाला घातला नाही. म्हणजे मला शरीरत्याग करणे भाग होते. मी अडचण झालो होतो. माणसांना जाचक झालो होतो. आपली माणसं प्रगती करू पहात असता घरातील वृद्ध माणसांनी काळाची गरज मानून दूर व्ह्यावयास हवे. असे काही तरी.

काल मुंबईत पाऊस सुरू झाला. माझ्या विचारांना दिशा मिळाली. मी शरीर झोकून दिले. शरीर त्यागिले. जेव्हा समोर रस्त्यावर आडवा झालो तेव्हा एक मात्र केलं. पदपथाला लागून असलेल्या दोन गाड्यांच्या मधोमध जाऊन विसावलो. विजेचा खांब जपला. आपल्यामुळे कोणाचेही नुकसान व्हायला नको….देता येईल तितके द्यावे…कोणाचे देणे डोक्यावर ठेवू नये. कुठून कुठून तरुण मंडळी धावली. दहा बारा नारळ हाहा म्हणता गायब झाले. कोणा तहानलेल्याच्या तोंडी पाणी आणि भुकेल्या पोटी खोबरे.

फायर ब्रिगेडची गाडी आली. माझे अवयव वेगवेगळे झाले. तुकडे केले गेले. 
झावळ्या, शहाळी आणि लांबसडक मजबूत खोड.
मी देहदान केले.

जसे जीवन तसे मरण कामी आले.

वरून कोसळणाऱ्या पावसाच्या त्या धारा अंगावर घेत आमची कावरीबावरी खारुताई थरथरत उभी होती.
आवरता न येणारं खारं पाणी पावसाच्या धारेत कधीच मिसळून गेलं.


Thursday, 6 June 2013

नवे पान

महिन्याच्या पहिल्या शनिवारी दुपारी पेपरवाले काका यायचे; गेला महिना टाकलेल्या महाराष्ट्र टाईम्सचे पैसे जमा करण्यास. मला कडेवर घेऊन बाबा दार उघडीत. मग दरवाजापासून ते आत शयनगृहातील गोदरेज कपाटापर्यंत बाबांच्या कडेवर मी बसून असे. ते कपाट उघडीत. प्लास्टिकचा हिरव्या रंगाचा डबा बाहेर काढीत. त्यांनी आणि आईने महिन्याच्या पहिल्या तारखेलाच रात्री जागून दोघांच्या पगारातून वेगवेगळी पाकीटं तयार करून त्या डब्यात ठेवलेली असत. दूध, शाळा फी, वाणी, वगैरे. त्यात एक असे पेपर बिल. त्यातले पैसे बाबा पेपरवाले काका, बागवे ह्यांच्या हाती सुपूर्द करीत असत.

काका अजूनही डोळ्यासमोर येतात. काळसर वर्ण. पांढरा सदरा व पांढरा लेंगा. हातात पावती पुस्तक. हसतमुख चेहरा. बाबांच्या हातातून पैसे घेतले की जे काही एखाददुसरं मिनिट त्यांना पावती लिहिण्यास व फाडण्यास लागे त्यात त्यांच्या बाबांशी दोनचार वाक्यांच्या गप्पा होत असत. काका मान डोलावत निघून जात. बाबा दार बंद करून आत येत. मी कडेवरच. 

वर्तमानपत्र रोज दाराखालून सरकत असे. नित्यक्रम.
काही माणसं आपल्या आयुष्याला घड्याळ जोडतात.
अदृश्य घड्याळ. 

माझे घर आणि माझ्या आईबाबांचे घर ह्यात तसे फारसे अंतर नाही. त्यामुळे ज्यावेळी आम्ही इथे रहावयास आलो त्यावेळी बागव्यांशिवाय कोणी इतर पेपर टाकू शकेल असे कधी माझ्या मनात नाही आले. आमच्या घरी देखील पेपरवाले बागवेच वर्तमानपत्र टाकू लागले.

वर्तमान भूतकाळात जमा होत गेला.
आमच्या घरातील माणसांची गणती कमी अधिक होत गेली.
आणि कधीतरी "मी बागव्यांचा मुलगा. बाबा गेले. आता मी पेपर टाकीत जाईन." असे म्हणत एक मध्यम उंचीचा तरुण मुलगा दारात उभा राहिला. रहाट गाडगं अथक फिरू लागलं.

आत्मकथा जगता जगता, त्यातील लढे लढता लढता माझे इतर कादंबऱ्या वाचणे बंद पडले होते. वर्तमानपत्र वाचणे वाढले. कळायला लागल्यापासून जरी महाराष्ट्र टाईम्स डोळ्यांसमोर होता तरी आता ते वर्तमानपत्र शहाण्याने हातात धरण्याच्या लायकीचे वाटेनासे झाले. टाईम्सच घरात नको म्हटल्यावर टाईम्स ऑफ इंडिया देखील बंद करून टाकला. मग लोकसत्ता, डिएनए, हिंदुस्तान टाईम्स दरवाजाच्या कडीमागे रोवून ठाम उभे लागू लागले. जाणीवा विस्तारू लागल्या. निदान तसा समज होऊ लागला.

महिन्याच्या पहिल्या रविवारी धाकले बागवे पेपर बिल घेण्यासाठी येऊ लागले. आईवडीलांच्या चांगल्या सवयी आपण बहुधा उचलत नाही. आनुवंशिकतेने जे गुण येतात तेव्हढे फक्त आपल्यात शिरतात. त्यामुळे बागवे माझ्यासमोर पेपर बिल धरत, व मी त्यांना तितकी रक्कम देऊन टाके. आईबाबा करीत तसा महिन्याचा खर्च लिहून ठेवणे वगैरे लग्नाच्या सुरवातीला काही वर्षं केलं.
चांगल्या सवयी सदऱ्यावर पडलेल्या गुलाबाच्या पाकळीसारख्या असतात. मागमूस न ठेवता गळून जातात.

गेले काही महिने मात्र रोजचे वर्तमानपत्र दारी येण्याची वेळ हळूहळू पुढे सरकू लागली. घड्याळ बेताल झालं. पुढे पुढे सरकू लागलं. कधी आठ. कधी नऊ. तर कधी पार दहा. बागव्यांना फोन लावले. विनंत्या केल्या. पत्र टाकणाऱ्या मुलाची वेळ साधून गाठ घेतली. उशिरा येण्यामागचे त्याचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला. "मला नऊ वाजता घरातून निघणे भाग आहे…त्यामुळे तू नऊला पाच मिनिटं असताना पेपर टाकलास तर काय फायदा ? मला वाचायलाच वेळ मिळत नाही. रद्दी फक्त वाढते…बाकी काही नाही !" चांगले शब्द…थोडा ओरडा…विनंत्या…आवाज वरखाली करीत मी माझा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करून पाहिला. प्रश्नाच्या मुळापाशी शिरून त्या मुळाचा नायनाट झाला तर प्रश्न पुन्हा उद्भवणार नाही अशी आशा मला नेहेमीच असते.

"एक तारखेपर्यंत बघा. नाहीतर बंद करा." धाकले बागवे एकदा फोन केला तेव्हा म्हणाले.
"बरं."
बऱ्याचदा कमी शब्दांमागे विचारांची आवर्तने दडलेली असतात.

'बागवे' हे आडनाव…त्यांचे वडील, माझे वडील…वर्तमानपत्र वाचण्याची माझी सुरवात…वगैरे.
विचारांना चित्रांची जोड. आमच्या घराचा दरवाजा…थोरले बागवे…आणीबाणीच्या काळात रोजच्या पेपराची वाट बघणारे बाबा…

घडाळ्यात नऊ…खांद्याला पर्स…उबदार घराबाहेर पडून बंद वातानुकुलित कचेरीत शिरण्याची वेळ…दार उघडले तर पायाशी वर्तमानपत्र. 'रविवारी रद्दीवाल्याला बोलवायला हवं. कपाटात रद्दी ओसंडून वहायला लागली आहे.'

पहाटे साडेसहाच्या सुमारास चालून परत येताना दिसले होते, तळमजल्यावरील आंबेकरांच्या दारात त्यांचा पेपर विसावला होता.

त्यांच्या दरवाजाची घंटा वाजवून, त्यांच्या पेपरवाल्याचा दूरध्वनी क्रमांक घेण्यास मोजून दोन मिनिटे.
"मी निगवेकर. आंबेकरांच्या घरी तुम्ही पेपर टाकता ना ? सकाळी साडे सहाच्या आत ? उद्यापासून आमच्या दारी पण तुम्ही पेपर टाका."
"टाकतो."

दुसरा फोन…
"बागवे, मी निगवेकर बोलतेय. उद्यापासून तुम्ही टाकू नका आमच्या दारात पेपर."
"चालेल."

माझ्या आठवणींचा बाडबिस्तरा मी आवरला, कचऱ्याच्या पिशवीत भरला, घराबाहेर ठेवून दिला. जिथे बागवे पेपर ठेवीत असत…तिथेच !

बागव्यांच्या वडलांशी मी बालपणी नातं जोडलं होतं. बाबांच्या कडेवर बसून. त्यांच्या मुलाशी त्याचा काय संबंध ? 'चालेल'…ह्या एका शब्दात मला त्या मागे पडलेल्या आठवणीतून बागव्यांनी बाहेर आणलं…धाकले बागवे वर्तमानपत्र टाकण्याचा धंदा करीत होते… दारोदार नाती जोडीत फिरत नव्हते !

तसंही…
झाडाचे एखादे पान गळले तर त्या झाडाच्या आयुष्यात असा काय फरक ?
तिथे नवे पान फुटते…जागा भरून निघते.
मलाही हे अंगवळणी पाडून घ्यायला हवे.


Saturday, 1 June 2013

अचानक...

आजवर रस्त्याला होती फार वळणं…नको इतके फाटे…नको तितके चढ आणि नको तितके उतार. अनेक.
कधी धाप कधी थकवा. कंटाळलो. थकलो. नको ते जीणं वगैरे. 
अचानक आज…रस्त्याला वळणं नाहीत, रस्ता नागमोडी नाही, रस्त्याला एकही फाटा नाही. चढ नाही. उतार देखील नाही. हल्ली तो चंद्र मंदावत नाही. आजकाल हा सूर्य विसावत नाही.
सगळं धुसर, नजरेला दिसेनासं.
डोळे घट्ट मिटून उघडावे म्हटलं…दिसेल एखादं वळण, येईल एखादा फाटा. एखादा.
थकून का होईना पुन्हा धावू लागेल माझा रस्ता.

दुसरं काही दिसलं नाही…पण
…डेड एन्डचा बोर्ड मात्र स्पष्ट दिसला.

( कर्करोग हा असा रोग आहे म्हणतात जो आपल्याला आपला ह्या पृथ्वीवरचा कालावधी ठरवून देतो. काही दिवस. काही महिने. कदाचित एखादं वर्ष.  तो कालावधी आपण आपली बाकी राहिलेली कामे उरकण्यासाठी वापरावा अशी शहाण्यासुरत्या माणसाकडून अपेक्षा असते. परंतु, हे असे साक्षात मरण समोर उभे असता, यमाचा फास आकाशात आपल्या डोक्याभोवतीच फिरत असताना त्या माणसाचे नक्की काय होत असेल…? )


Tuesday, 28 May 2013

मैत्री आणि अर्थ

मैत्री, प्राजक्ताचं फूल वगैरे...
की मैत्री, सूर्याचे किरण ?
अंधारात प्रकाशाची ती रेघ…
की उन्हाची एक तिरीप आणि मैत्रीच्या नाजूक फुलाचा अखेरचा श्वास.

आयुष्यात मित्रमैत्रिणींची गरज कोणाला नसते ?
काही नाती आपल्याला चुकीचा मार्ग दाखवतात तर काही खोल गर्तेतून देखील सहजगत्या बाहेर काढतात.
आपल्या हातून सत्कृत्ये घडवून आणतात.
जगण्याला दिशा देतात.

मला दोन्ही अनुभवयास मिळाली.
आयुष्याचे धडे घेतले.
शहाणी झाले.
थोडीफार.

कुंभार घड्याला आकार देत असतो, त्यावेळी घडा किती वेदना सहन करतो.…कोण जाणे.

कठीण प्रसंगांमध्ये कोणत्याही मैत्रीकडून अर्थसहाय्य न लागणे हे उत्तम.
नाही तर आयुष्यभर जपलेल्या मैत्रीची नको इतकी लक्त्तरे निघतात.
कारण त्या 'अर्था' वर आपण मैत्रीतील 'अर्था'चे ओझे लादतो.

आपल्या भविष्याची, पुर्वसुचना न देता येणाऱ्या वावटळींसाठी आपण आपली कवचकुंडले निर्माण करावी.
आपल्या लाडक्यांना, आपल्यासाठी, आपल्या मैत्रीपुढे हात पसरायला आपण भाग पाडू नये.
अर्थात भाग आपण पाडत नाही.
भाग परिस्थिती पाडते.
मात्र अशी हतबल परिस्थिती आपली होण्यास आपणच जबाबदार नसतो काय ?

आपली मैत्री आपल्या माणसांशी असते.
आपल्या जिवाभावाच्या ह्या माणसांनी त्यांच्या आयुष्याची गणिते मांडलेली असतात.
तशीही सध्याच्या काळात प्रत्येकाने आपले, आपल्या कुवतीप्रमाणे गणित हे मांडलेलेच असावे.
आपल्या चुकलेल्या गणितांसाठी, वा आपण कधी गणित मांडलेच नाही म्हणून, कोणा मित्राकडे 'हातचा' मागावा लागू नये.  मैत्रीखातर आपल्याला 'हातचा' पुरवण्याने मग एकतर त्याचे त्याने मांडलेले गणित चुकते…
वा…
आपली इतक्या वर्षांची मैत्री…आणि त्यातून एक हातचा देखील उसना मिळू नये ?
असे घातकी विचार आपल्या मनात येऊ लागतात.

तशीही आयुष्य ही एक वजाबाकी.
आयुष्याच्या दिवसांची, रोजची वजाबाकी.
आणि परिस्थितीने निर्माण झालेली आपल्या भोवतालच्या मित्रांची वजाबाकी.
आपण थोडे जबाबदारीने वागलो, तर मात्र ही दुसरी वजाबाकी आपण थांबवू शकतो.

मैत्री आणि अर्थ.
मैत्रीचा अर्थ.
अर्थपूर्ण मैत्री.
मैत्री.
आयुष्याचा अर्थ.

तात्पर्य:
अर्थ आणि मैत्री.
आपण आपले दोन ध्रुवांवर ठेवावे.
खिळा मारून.
अढळ.

नाहीतर हातातील मधुर पेयामध्ये, आपल्याच हाताने विष मिसळल्यासारखे.

Sunday, 26 May 2013

जिवंतपणाचे लक्षण...

तर मंडळी,
१३ मार्चला तुम्हाला हाक मारली होती. त्याला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि म्हणून आपण हे काम पार पाडू शकलो.
सोबत फोटो जोडलेले आहेत. एकजुटीने आणि विश्वासाने एक मोठं काम हाती घेऊन ते पार आपण पाडू शकलो आहोत ह्याचा निखळ आनंद.

एक मात्र खरंच…आपली ६५० मुलं छानपैकी नवा गणवे
ष घालून शाळेत जाणार आहेत. आणि नवा कोरा गणवेष अभ्यास करायला कसा हुरूप देतो हे आपल्याला कोणी सांगण्याची गरज नाही. नाही का ?

मंडळी, ह्या
उपक्रमातून कमावलेला आत्मविश्वास, एकमेकांवरील विश्वास; गाठीशी धरून नव्या आव्हानांचा असाच पुढे शोध घेऊ…आयुष्याला अर्थ देऊ…

बस्स… अजून काय हवं ?



 
 
 
गणवेष मुलामुलींच्या अंगावर चढले ! शोभून दिसले !

Friday, 10 May 2013

तत्त्वज्ञान !

का जे देवावर विश्वास ठेवतात, वार पाळतात, उपासतापास करतात, त्यांनाच नेमकी देवाची कार्यपद्धती पटताना दिसत नाही ? का त्यांना देवाची एखाद्या कृतीमागची भूमिका आवडत नाही ? देवाने हे असं का केलं ह्या विचारावर आपला वेळ व शक्ती वाया घालवताना ते का दिसतात ?

आणि त्या उलट उपासतापास, देवळेमंदिरे न करणारी माणसे; देवाचे विचार समजून घेऊन त्यानुसार आपले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करताना का आढळतात ?

शेवटी देव हे एक आयुष्य जगताना मदत करणारे तत्वज्ञान आहे. देव कायम आपल्यावर लक्ष ठेवून आहे. तो कधीही आपल्याला एकटं टाकत नाही. फक्त तो जे आपल्या आयुष्यात घडवून आणतो, ते त्याने का घडवून आणले असावे, त्याची त्यामागची भूमिका काय असावी व जे काही घडतं त्यातून; आपण आपलं व्यक्तिमत्त्व, आपल्या माणसांच्या, समाजाच्या भल्यासाठी बदलू शकलो, घडवू शकलो तर आपल्या बऱ्यावाईट अनुभवांतून आपण काही शिकलो असे म्हणता येईल.

असो. 
मी समोरच्याला समजण्यासारखं काही लिहिलं आहे की नुसताच माझ्या विचारांचा गुंता समोर ओतला आहे…कोण जाणे !

शेवटी प्रत्येकाचं आयुष्य तेच ते जुनं तत्वज्ञान ओतत घोळत असतं.
पेला अर्धा रिकामा की भरलेला…वगैरे वगैरे.
फक्त हे तत्वज्ञान आपण आपल्या आयुष्याच्या कुठल्या पानावर शिकतो हे महत्त्वाचं.
नाहीतर पुस्तक छप्पन पानांचं.
आणि आयुष्याची ओवी पंचावन्न पानावर !