नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 18 August 2011

मैत्री...आपली तुपली

पावसाळा सुरु आहे. हिरवे हिरवे गार गालिचे, मुलायम शालू वगैरे धरतीने आपल्या घरात, अंगावर पांघरून घेतले आहेत. एकूणच नैसर्गिक वैभवाने ती नटलेली आहे. आनंदी आहे. तर त्याच त्या शालूच्या भरजरी कलाकुसरीत एक वेलबुट्टी आहे गवताच्या तणांची. जीवाच्या घाईने उचललेले पाऊल क्षणभर थांबवा आणि डोकवा रस्त्याच्या कडेला भरभरून उगवलेल्या त्या णां. तिथेच मिळेल तुम्हांला आपली मैत्री...मैत्री नाजूक...आणि तरीही सर्वत्र पसरलेली...अगदी जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणी देखील...मग घेऊया का शोध, आपण आपल्या मैत्रीचा ? काय उतरेल ती त्या नाजूक कसोटीस...आपली तुपली मैत्री ?

सर्वत्र पसरलेले हे तण. त्या धरतीला आधी विचारा...चालेल का तिच्या शालूतील वेलबुट्टी आपण थोडी खुडली तर ?


आता त्या तणांना थोडं तयार करा आपल्या परीक्षेसाठी...


चला...आता एका बाजूने तुम्ही एक तण पकडा...एका बाजूने मी...परीक्षा दोघांना द्यावयाची आहे...नाही का ? :)
त्या पातळश्या तणाला अगदी हलकेच दुभागा...तुम्ही तुमच्या बाजूने...मी माझ्या...आता तितक्याच हळुवारपणे दुभागत या हलकेच पुढे...जपा हं...मैत्री आहे ती...नाजुकशी...आपली....नाही जपलेत प्रेमाने...तर जाईल ना तुटून...मग दु:ख करून काय उपयोग ? तुटलेले तण काय जोडले जातात थोडेच...?



तुटली का ? आहे ना नाजूक ? हिरवीकंच. पण नाजूक. ठीक आहे...ठेवा तो तण बाजूला...विसरून जा...कधी काळी एक तडा गेला होता आपल्या मैत्रीला.

चला...पुन्हा करुया सुरुवात...नव्याने...तेव्हढ्याच जोमाने...मैत्री तर करायचीच आहे आपल्याला...मग का हार मानायची ? हो ना ? उचला पाहू दुसरा तण. पुन्हा तितक्याच प्रेमाने...जपून...दुभागा...आणि या पुढे...तुम्ही माझ्या दिशेने...मी तुमच्या दिशेने...प्रयत्न दोघांनी करावयाचे आहेत. नाते हे दोघांनी जपायाचे आहे..तितक्याच हळुवारपणे...तुमच्या हातात दोन भाग आहेत ना...मग द्या त्यातील एक माझ्या हातात. आणि हा घ्या माझा नाजूक तण तुमच्या हातात... आता माझे नाजूक मन अर्धे ताब्यात तुमच्या...जसे तुमचे माझ्या ताब्यात...


अजून थोडे पुढे...बघा...काय झाले ? किती नाजूकपणे काळजी घेत आलात ना तुम्ही पुढे ? झाला ना हलकाच हिरवा चौरस तयार ? किती सुंदर...किती तो हळवा...किती नाजूक...आपल्या तुपल्या मैत्रीचा तो नाजूक धागा....जपला तुम्ही...जपला मी...



आता कधीही न तुटणारा...आपल्या तुपल्या मैत्रीचा हा नाजूक बंध....हो ना ?


बालपणी, अगदी जिवलग मैत्रिणंींबरोबर ही मैत्रीची परीक्षा खूप वेळा दिली. आणि जेव्हा जेव्हा ती चौकट तुटून गेली तेव्हा तेव्हा अगदी डोळ्यात पाणी आणून ती अतूट होण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले. परवा मुंबई गोवा हमरस्त्यावर हे वाऱ्याच्या झोक्यावर डोलणारे तण दिसले आणि ही आठवण जागी झाली...म्हणून मग परत एकदा ती चौकट अगदी तितक्याच असोशीने तयार केली...तुमच्याबरोबर.
:)

30 comments:

rajiv said...

अनघा !!! काय सुंदर आहे हि निसर्गाबरोबरची - आपली तुपली मैत्री !!
अप्रतिम !! हळुवार व तरल नात्याची समज किती छानपैकी सांगून गेलीस !!
" नाते हे दोघांनी जपायाचे आहे..तितक्याच हळुवारपणे... आणि हा घ्या माझा नाजूक तण तुमच्या हातात... आता माझे नाजूक मन अर्धे ताब्यात तुमच्या...जसे तुमचे माझ्या ताब्यात..."

Shriraj said...

माझ्या चेहऱ्यावर एक मोठं स्मित पसरलंय, अनघा :)

Yogini said...

popatee choukat :) :)

BinaryBandya™ said...

सहीच ...

नाती जपणे वाटते तेवढे सोप्पं नक्कीच नाही ..

छान लिहलंय ..

Anonymous said...

:):)
"चालेल का तिच्या शालूतील वेलबुट्टी आपण थोडी खुडली तर?"
मस्तच!

Madhura said...

फार छान.. गेले काही दिवस झपाटल्या सारखे तुमचे पोस्ट वाचतेय.. एका मागून एक.. वेळ आणि समाधान याचं गणित मांडताही येणार नाही आता..
काय बोलू.. खूप खूप छान वाटतंय..

Anagha said...

धन्यवाद राजीव...

Anagha said...

श्रीराज, आहे ना मैत्री....? आपली तुपली ? :)

Anagha said...

योगिनी, छान आहे नाव !...पोपटी चौकट ! :)
आभार गं.

Anagha said...

खूप कठीण...जीवघेणे बंड्या.

धन्यवाद...ह्या मैत्रीबद्दल ! :)

Anagha said...

आल्हाद, आभार ! :)

Anagha said...

मधुरा, तुझी अशी उस्फूर्त प्रतिक्रिया वाचून खूप खूप छान वाटलं मला ! खरोखर !
एक आधार...

मनापासून धन्यवाद. :)

हेरंब said...

मस्तच लिहिलंयस.. खूप सुंदर !

एक पुणेरी कमेंट : तणाची पाती म्हणतील "तुमचा खेळ होतो आणि..... " :P

भानस said...

खरेच गं! अगदी नाजूक तरीही... वादळवार्‍यातही तृणासारखी तग धरणारी कणखर अशी तरल, हळुवार व समंजस आपली मैत्री... :)

खुप आवडलं निसर्गाशी सांगड घालून उलगडलेली मैत्रीची लडी!

Raindrop said...

let's do this when we are together next time...by the way is 'tupli' a marathi word?

Anagha said...

हेहे ! हेरंबा ! अगदी अगदी ! मला तर खरंच असं वाटतं ही अशी तोडातोडी करताना ! :)

Anagha said...

वंदू, हे असं लहानपणी बोलायचो...तेव्हा त्याचा एव्हढा अर्थबिर्थ नव्हता बघितला.
पण तू विचारलंस ते बरं झालं...मग मी शब्दकोश उघडला.
तुपला: तुझा.
:)

Anagha said...

:) भाग्यश्री...सगळ्या लहानपणीच्या हळुवार आठवणी...कोण जाणे सर्वात आधी कोणी करून दाखवली आम्हांला अशी चौकट ! पावसात तर सुटायचोच आम्ही एकदम ! सारख्या ह्या चौकटी करत! :)
तुम्ही करायचात का गं कधी ?

Raindrop said...

tujhi ani majhi maitri....like a thin grass blade....the storms can't break it but it should be careful of the little scratches which can rip it apart

Anagha said...

Right Vandu ! :)

Trupti said...

oh...mast...mala aavdali aapali tupali maitri...Anggha di...:)

Pankaj - भटकंती Unlimited said...

बहुधा आपल्या कधीच प्रत्यक्ष न भेटलेल्या मैत्रीला ही परीक्षाच द्यावी लागू नये अशी सोय देवाने केलेली आहे. आणि दिली तरी चौकट न तुटता अखंड विस्तारत राहो.

Prof. Narendra Vichare said...

tujhi ani majhi maitri....like a thin grass blade....the storms can't break it but it should be careful of the little scratches which can rip it apart
20 August 2011 13:28
अनघा, अतिशय Creative संकल्पना आणि त्याच सोबत या तुझ्या सर्जनशील संकल्पनेचा वंदनाने उपरोल्लेखित कित्ती समर्पक आणि मार्मिक गर्भितार्थ सांगितलाय, नाही का ? अनघा आणि वंदना, ग्रेट मैत्रीची हीच तर ओळख असते.. टच वूड .. :-)

Anagha said...

:) धन्यवाद तृप्ती.

Anagha said...

तशीच राहील पंकज...चौकट नक्की अतूट राहील. :)

Anagha said...

खूप खूप आभार सर ! :)

Anonymous said...

सुंदर सुंदर आणि सुंदर :)

सौरभ said...

आ... लौली... आपन थोडा इकोफ्रेन्ड्ली बनून अस्ले प्रयोग करुयात... रब्बरबॅंड चालेल काय???

Anagha said...

तन्वे, आभार गं ! :)

Anagha said...

रबर बॅण्ड घे...तो दोन बोटात अडकव...त्यात कागदाचा तुकडा अडकव...आणि खेच बॅण्ड आणि दे सोडून कागद ! खट्यॅक !
हे पण नसते उद्योग केलेत सौरभा...आणि ते पण वर्गातल्या मुलांविरुद्धच्या युद्धात ! बाकावर उभं राहून ! :p