नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 15 August 2011

Happy Day...?

"मी अजिबात कोणालाही 'Happy Independence Day' म्हणणार नाहीये."
माझी लेक सकाळचा चहा पितापिता मला म्हणाली. मी देशभरातील आनंदी जाहिराती पहात होते. वर्तमानपत्रातील. मराठी, इंग्लिश. फुल पेज, हाफ पेज, क्वार्टर पेज. काही जाहिराती ब्लॅअॅन्ड व्हाईट तर काही कलर. एकूण कसं आनंदी आनंदी. वेगवेगळ्या कंपन्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य लक्षात घेऊन केलेल्या जाहिराती. कसले श्रीमंत आहोत आपण...माझ्या मनाने विचारांचा तो धागा पकडला होता...
"अं ?"
"हो आणि तशा अर्थाचा एसेमेस, फॉवर्ड देखील नाही करणारेय."
"काय झालं काय ?"
"कारण हॅपी होण्यासारखी परिस्थितीच नाहीये. कोणी जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्याचं आता काय झालंय ? आनंदी होण्यासारखं आहे काय त्यात ?"
"ह्म्म्म. आणि देशभरातील नागरिकांनी happy राहावे ह्यासाठी कोण काय करणार आहे ?"
भारताची पुढील पिढी गप्प झाली.
"काय गं ?"
बाई, हातात मोबाईल घेऊन काहीतरी टुकूटुकू करत होत्या.
"ज्यावेळी देशासाठी काही करण्याचा प्रश्र्न उभा रहातो, त्यावेळी 'समोरचा' किती करतो आहे ह्यावर 'मी' काय करणार आहे हे ठरत नाही. ज्या आपल्या नेत्यांचा तुला अभिमान वाटतो...महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल...ह्यांनी समोरचा किती व काय करतो आहे हे बघून स्वत: किती व काय करायचे आहे हे ठरवले असेल काय ? जन्माला येतो, तो नेता नसतो...तुझ्यामाझ्यासारखंच एक बाळ जन्म घेत असावं...नाही का ? परंतु, आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून, ती बदलण्यासाठी, दुसऱ्याची वाट न बघता 'मी' काय करू शकतो ह्याचा विचार त्यांनी केला...व बदल घडवून आणला... हो की नाही ? व तोच बदल घडवता घडवता कुठल्या तरी एका पायरीवर ते 'नेता' झाले."
शांतता.
"मला माहितेय, आपण आपल्या नात्यांत हा विचार नक्की करतो. निदान समोरच्याने 'मी' त्याच्यासाठी जे करत आहे त्याची जाण तरी ठेवावी अशी अपेक्षा आपण नक्की धरतो...व त्यात चूक ते काय ? परंतु, बाळा, देशासाठी काही करताना अशी अपेक्षा ठेवणे बरोबर आहे काय ? देशासाठी आपण काही करू शकलो...लहान मोठे काहीही...कारण त्यात लहान आणि मोठे असे नसतेच...तर त्यातून जे मानसिक समाधान मिळेल तेच किती मोठे असेल...नाही का ? म्हणजेच...देशकार्य करून जे मला समाधान मिळेल ते माझे मीच 'मला' दिले...असे नाही का ? म्हणजे...तो त्या Happy Independence Day मधील happiness तूच तुला देशील...नाही काय ?"
"हं..." पिढी हुंकारली.
"...पण तो एसेमेस फॉवर्ड न करणे हे मात्र बरोबरच आहे....ते म्हणजे आपण आपल्या पैश्यांची किंमत न ठेवता..त्या मोबाईल कंपन्यांना आपल्या भावनांच्या जोरावर फुकटचे पैसे कमावू देणे हे आहे...म्हणजे माझ्या देशाभिमानाचा ते बाजार करणार...व त्यावर मस्त पैसे कमावणार....मला कोण एसेमेस पाठवतंय...ह्यावर मी त्या व्यक्तीचे देशप्रेम अजिबात ठरवत नाही...आणि त्यापुढे जाऊन सांगायचं म्हणजे, तू मला त्या मूर्खपणाच्या एसेमेससाठी पैसे भरायला लावू नकोस...अजिबात भरणार नाही मी तुझं मोबाईल बिल मग."
"हा...म्हणजे तसले एसेमेसेस मी फॉवर्ड नाहीच केले पाहिजेत...हो ना ?"
"अजिबात नाही केले पाहिजेत...फक्त माझं कारण व तुझं कारण ह्यात फरक आहे."
"हा...तो फरक कळला...आणि हो..पटला..."
घाबरली वाटतं भारताची पुढील पिढी...
मी असातसा सोडत नाही माझा मुद्दा...!
माहितेय माझ्या लेकीला...!
:)

8 comments:

Raindrop said...

I think it was only because forwarding is an impersonal thing....if you speak with someone then nighta ga manatun 'happy intependene day'.....azun aahe khoop kaahi happy honyasarkha pan...use aur badhana hai...see the young ones are so much more conscious of the earth n environment n corruption n r taking up entrepreneurship....apnan lahaan astana kuthe hota he aplya dokyaat....all is not lost but yes it needs to grow...

Anagha said...

मला अजिबात नाही वाटत वंदू की आपण लढाई हरलो म्हणून. मला खात्री आहे की आपण जिंकणार आहोत. फक्त देशभक्तीच्या बाबतीत आपण स्वयंकेंद्रित (अगदी self-centered.) व्हावयास हवे...मी...माझा देश...व माझे माझ्या देशावरील प्रेम...बस्स.
मी माझ्या आईवर प्रेम करते त्यावेळी माझी बहिण किती प्रेम करते हे बघायला मी जाते काय ? त्यावर मी माझ्या प्रेमाचे प्रमाण ठरवणार आहे काय ?
दुसरा काय करतो ह्याला किती दिवस आपण महत्त्व देणार आहोत. तिथेच आपण मार खातो गं...

हेरंब said...

ह्म्म्म.. अजून एक विचार करायला लावणारी पोस्ट :))

Shriraj said...

अनघा, काय गंमत आहे न... मीपण 'पुढच्या पिढी'सारखा विचार करूनच कुणाला SMS पाठवले नव्हते :P
; pan tuza mhanna patla ha :)

Anagha said...

ह्म्म्म..हेरंबा... :)

Anagha said...

आमच्या पिढीने हे असे नेते बनवून ठेवले...
'अब तुम्हारे हवाले वतन साथियों'...असं वाटतंय मला श्रीराज ! :)

भानस said...

मी असा तसा सोडत नाही माझा मुद्दा.... हे वाक्य एकदम पटले बघ. :)

सतत दुसरा काय करतोय याकडेच स्वत:पेक्षा जास्त लक्ष देण्याचे धडे नकळत सगळीकडून मिळत राहतात मग हेच होणार नं... बाकी प्रेमाचं म्हणशील तर प्रमाणात मोजता येतं ते प्रेम नसतच.

Anagha said...

अगदी अगदी भाग्यश्री...
प्रेमाला काय माप लावणार....
:)