नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 6 August 2011

Product development...भाग ३

Product development...भाग १
Product development...भाग २

दिवस पुढे सरकत होता. काळजी वाढत होती. माझ्या चेहेऱ्यावर व तशीच त्या कामाशी निगडीत सर्वांच्या चेहेऱ्यावर. जसे काही दुपारच्या रंगीत तालिमीच्या वेळी माझ्या दगडाची पिलावळ झाली आणि मग प्रत्येकजण काळजीचा एकेक दगड छातीवर घेऊन वावरू लागला. काय होणार...कसं होणार...वगैरे वगैरे.

उरलेले काम पुरे करण्याची घाई. मुख्यमंत्र्यांनी दिलेली वेळ रात्रीचे आठ.
भेट त्याच वेळी होईल काय ? शाश्वती नाही.
किती जणांना परवानगी आहे? जास्तीत जास्त दहा लोकं चालू शकतील.
मग कोणकोण जाणार आहे ?
हा X ८ आणि ती X २. म्हणजेच आठ पुरुष आणि दोन बायका.
कोण कायकाय बोलणार ? हे तू, ते तो आणि ते तो आणि तो.
हे आणि ह्या धर्तीवरचे संवाद सतत कानावर पडत होते.

"Let me know if you want to practice..." इति सर्विसिंग. बॉसने दिलेल्या सूचनांना अनुसरून. मग मी पुन्हा तालीम केली काय ? नाही केली. का बरं ? माज. कसला हो पण ? आहे. लोकांना खूप असतो. मला थोडा आहे.
मी शांतपणे जागेवर बसून काम पुरं केलं. डोकं आणि शरीर हे एकजुटीने काम करतात. बरं की वाईट ? वाईट. माझ्या डोक्याला ताप झाला की माझ्या शरीरात ताप चढतो. नेहेमीच. कपाळ गरम. अंगात कणकण. दोनतीन रात्र झोप नाही. आणि दिवस उजाडला तो असा. आत्मविश्वासाचं वारूळ पोखरणारा.

संध्याकाळी पाचपर्यंत काम जवळपास पूर्ण होत आलं. सर्वांचंच. अगदी ऑडिओ व्हिज्युअल्ससकट. मग भलेमोठे काळे पोर्टफोलिओ इथेतिथे फिरू लागले. पंधरा दिवसांची सर्वांची मेहेनत आत जाऊन बसली. पोर्टफोलिओ उतू जाऊ लागले. मॅकवरील प्रत्येक कामाची जेपेग बनू लागली. पॉवर पाँईंट प्रेझेंटेशन फुगू लागलं. नाटक सुरु होण्याआधीची पडद्याआडची तयारी. धावपळ. लगबग. व्हेअर इज दिस अॅन्ड व्हेर इज दॅट ? हॅव यु टेकन दॅट ? डिड यु डिलीट दॅट स्लाइड...थ्रो दॅट...हु इज अरेंजिंग द स्पीकर्स ? टेक ३/४ कॉपीस ऑफ द सीडीस...डिलीट इट. इट'स रबिश ! डॅम गुड या ! व्हेरी नीट ! अगदी सनई चौघडा वाजाचा बाकी...एकेक पात्र तयार होऊ लागलं. आणि सहा वाजता मी आरशात बघितलं. मरमर कामे करणाऱ्या रोजगारावर जगणारा मजूर. त्वरेने बाजूचेच फिनिक्स मिल्स कंपाउंड गाठले. आंबा रंग ? माहितेय ना ? ही अशी रंगांची नावे क्रिएटिव्ह डिरेक्टरच्या खुर्चीत बसून घेणे म्हणजे...ह्म्म्म ! पण आंबा रंगात जी गंमत आहे ती त्या 'क्रोम येलो'त नाही, त्याला मी काय करू ? मराठमोळा चुडीदार अंगावर. ओढणीबिढणीसकट. आणि अर्ध्या तासात पुन्हा खुर्ची...इथेतिथे येरझारा...खुर्ची...येरझारा.

शेवटी एकदाचे आरडाओरडा करीत आमचे सैन्य निघाले. हरहर महादेव ? तसेच काहीतरी. कोण कोणाच्या गाडीतून जाणार ? सामान्य गोष्ट नव्हे. मी माझी गाडी काढणे अपेक्षित आहे काय ? इतक्या गाड्यांना तिथे पार्किग मिळणार आहे काय ? आय अॅम टेकिंग माय कार...कम विथ मी...यू आर गोइंग विथ हुम ? पाच मिनिटे चर्चा...दरवाज्यांची उघडझाप. खाडखाड. लांबसडक गाड्या बेसमेंटमधून बाहेर. जशा बिळातून घुशी. माझी रवानगी बॉसच्या गाडीत.

टाऊन. शहरात दिवेलागणी कधीच झालेली होती. लालहिरवे दिवे स्पष्ट उघडझाप करीत होते. एकूणच चढत जाणाऱ्या टेन्शन्समध्ये ट्रॅफिक जॅम भर घालत होता. बॉस स्वत: वाहन हाकत होता व बाजूला मी. माझं कोकरू हृदय कधीच मला विचारू लागले होते...'कॅन आय जस्ट नॉट डू माय जॉब राइट नाव ? फाइंन्डीग इट बीट डिफिकल्ट...'. अरे बाबा, मरेन ना मी ! कर रे बाबा तू तुझं काम...आणि मला माझं काम नीट करु दे ! हे प्रेझेन्टेशन म्हणजे आयुष्य नव्हे...हे सगळं दोन तासात आटपणार...मग आपण घरी जाणार...आणि मग मी झोपणार....म्हणजे मी झोपणार...पण तू तुझं कामच करणार...मी सांगितलं माझ्या कोकराला.
"व्हॉट ? व्हॉट आर यु थिंकिंग ?"...बॉस.
"अं ? नथिंग..."
"नो...यु जस्ट नॉडेड..."
...हो काय ? अरे पण तू समोर बघ ना...गाडी चालव ना...माझे मौन. मी ओठ पसरले...त्यालाच हसणे म्हणतात काय ? त्यावेळी तरी तसे नाही वाटले. Whatever !!

टाऊनमधील एका प्रतिष्ठित पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक छोट्यामोठ्या खोल्या त्या राजकीय पक्षाने राखून ठेवल्या होत्या. त्यातील एक खोली आम्हांला मिळाली. दिस इज टू स्मॉल या...आस्क फॉर द नेक्स्ट रूम ना...आय थिंक दॅट वन इज बिगर...ट्रेनीज, जुनिअर्स एकदोन बरोबर आणले गेले होते...ही धावपळ करायला। मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी चालू होत्या. अजून तासभर तरी जाईल असा निरोप आम्हांला मिळाला. ८.३०. लेट्स सेट अप हियर ओन्ली या. सीडी प्लेअर, डॉल्बी सिस्टीम...हे ! आय थिंक दिस स्पीकर इज नॉट वर्किंग !...व्हॉट !...या ! यू डिड्न्ट चेक इट बिफोर ऑर व्हॉट ?...स्टुपिड....आय डिड या...देन ? कानावर पडणारी वाक्ये...मग कोणीतरी काहीतरी केले...आणि आमचे स्पीकर्स चालू झाले. सटासट सगळे इलेक्ट्रॉनिक्स ठरवून दिलेल्या जागेवर गेले. त्यानंतर माणसे...कोण कुठे बसणार हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय...माझी खुर्ची ठरवण्यात आली. बॉसच्या बाजूला. आता मी बाजूला बसून ह्याचे हातवारे कसे काय बघणार ? त्याने सांगितलंय ना मला...अधूनमधून त्याच्याकडे बघायला...Whatever !! मी माझी नजर भोवताली फिरवली. लांबसडक आयताकृती मंच. आयताकृती खोली. दालन म्हणता न येण्याजोगी. दरवाज्यासमोर आडवा लागलेला मंच. बरोब्बर दरवाज्याला तोंड करून माझे आसन. माझ्या उजव्या बाजूला बॉस. डाव्या बाजूला काटकोनात बसलेली आमची पूर्ण टोळी. डाव्या भिंतीवर स्क्रीन. अकस्मात खोलीचे दार उघडले व आमचे 'सी.इ.ओ' हजर झाले. ओह ! हे पण असणार काय ? आता त्या खोलीत एकूण वरिष्ठ अधिकारी तीन. मुंबई क्रिएटिव्ह हेड, मुंबई ब्रान्च हेड आणि आमचे सी.इ.ओ ! म्हणजे एकूण सर्व श्रेष्ठ हजर ! हम्म्म्म.
आता ? आता वाट बघणे. आम्ही फक्त एक एजन्सी चालवतो. आमचे मुख्यमंत्री राज्य चालवायचा प्रयत्न करतात. पैसे कोण देणार ? ते. म्हणजे मग मोठा कोण ? ते ! ग्राहक देव. आम्हांला थांबणे भाग. अर्धा तास. एक तास...चुळबूळ चुळबूळ. हे म्हणजे आचारी जेवण तयार करून वाट बघत बसण्यासारखं...पंगत काही बसत नाही...ताटं काही लागत नाहीत.

अकरा वाजले. अर्थात रात्रीचे ! आणि पळापळ झाली. मुख्यमंत्र्यांचे सहकारी इथे तिथे पळू लागले. आमच्या खोलीत दोघेतिघे डोकावून गेले. आता येतील हा साहेब...तुम्हीं तयार आहात ना ? आमचे साहेब त्यांच्या मराठीत...हो हो. आमी वाट बघतोय. मग पुन्हा आमचे आम्हीं खोलीत एकटे. लेट इट स्टार्ट या नाव.

आणि दरवाजा उघडला. साहेब अवतरले. मागून पाचजण. आम्हीं सगळे उभे राहिलो. का ? अर्थात मान द्यायला ! साहेब स्थानापन्न झाले. मग आम्हीही बसलो. ओळखपाळख. आमची बिझनेस कार्ड्स त्यांच्या पुढ्यात मंचावर रांगेत बसली. त्या खोलीत पंधरा लोकांत बायका दोनच. मुंबई क्रिएटिव्ह हेड आणि दुसरी अर्थात मी ! समजून घ्या हो !
बोलायला सुरुवात. आधी सी.ई.ओ...मी असा असा.
मग मुंबई ब्रान्च हेड...मी तसा तसा.
मग क्रिएटिव्ह हेड...मी अशी अशी.
रोजचे खाडखाड इंग्लिश कोपऱ्यात जाऊन बसले. मराठी रुबाबात पुढे आले.
मोजून पंचवीस मिनिटे तुम्हांला दिली जातील असा आधीच निरोप आम्हांला दिला गेला होता. त्यावर पुन्हा साहेबांनी शिक्कामोर्तब केलं.
"ठीकेय...मी आपल्याला लगेच माझं प्रेझेंटेशन दाखवतो...पटकन आटपतो..."
"करा सुरु..."
सर्वांच्या माना वळल्या. नजरा भिंतीवरील शुभ्र पडद्यावर टेकल्या. बॉसने त्याच्या लॅटॉपवर बटणे दाबली...एकेक स्लाईड पडू लागली. पहिला रूट समोर येऊ लागला. बॉसच्या डाव्या बाजूला पडदा व उजव्या बाजूला साहेब बसलेले. साहेबांच्या समोर पडदा. त्यांच्या चेहेऱ्यावरील भाव टिपण्याची आमची चोरटी धडपड. आत्तापर्यंत भाव ठीकच होते. शेवटची स्लाईड पडली. आणि एव्ही सुरु झाला. जोरदार कविता गुरु ठाकूर. संगीत अजित परब. आम्हा तिघांची ती मेहेनत. साहेबांनी मान हलवली. नकारार्थी. "हे असे आम्हांला म्हणायचे नाही. हे चुकीचे आहे." ताबडतोब, साहेबांच्या आजूबाजूला बसलेले त्यांचे सहकारी त्यातील चुका वेचू लागले.
"तुमी त्यावरचे आमी केलेले काम बघून घेता का...तर बरा होईल..." बॉस.
साहेबांनी खोलीभर चिंतेची फवारणी केली होती. आमच्या दिशेने.
"पटकन दाखवा.."
संदीप पुढे झाला. "हो हो...मी लगेच दाखवतो..."
आगगाडी सुरु...लॉंच फिल्म...पहिला डबा...प्रेस...दुसरा डबा...साहेबांची चलबिचल...चेल्यांचं अकडंतिकडं...बॉसची आवराआवर. पहिला रूट कत्तल.
चिंता आता सर्वत्र पसरली होती. फवारणीच इतकी प्रखर.
"आमी अजून काही केलंय...आपण बघणार का ?"
"काय आणलंय अजून ?" साहेब.
पेशवीणीची शालू खरेदी म्हणे अशी व्हायची. राज्याराज्यांतून वेगवेगळ्या ढंगांचे शालू घेऊन व्यापारी येत. आणि पेशवीण थाटात नाके मुरडी...शालू वर शालू समोर पसरले जात...व पेशवीणीचे नाक म्हणे मुरुडून मुरडून दुखे. असो...आम्हीं काही इतिके शालू आणिले नव्हिते.
"नाही. अजून एक रूट आणला होता."
"चला,दाखवा मग लवकर." साहेबांनी फर्मावले. बॉसच्या उजव्या हाताला साहेबांचा एक चेला बसला होता. तो बॉसच्या कानी कुजबुजला. आटपा लवकर.
"हो हो." बॉसची नजर माझ्याकडे.
आंबा रंगाचा कुर्ता व आंबा रंगाची ओढणी. मी खुर्चीतून उठले. ओढणी मागे सारली. पडद्यावर दुसऱ्या रूटची एकदम शेवटची स्लाइड टाकली गेली होती. इलाज नव्हता. आता वेळ संपत आलेली होती. एव्ही सुरु झाला. पुन्हा गुरु ठाकूर आणि अजित परब. व त्या गाण्यावर आमच्या फिल्म विभागाने एका रात्रीत तयार केलेले प्रभावी ऑडियो व्हिज्युअल.
तुतारी...घोड्यांच्या टापा...मावळ्यांची ललकारी. लई भारी.
शेवटची स्लाइड सर्वात महत्त्वाची. टॅग लाईनची. आणि तीच टॅग लाईन ओवून पूर्ण गाणे गुंफलेले. जोरकस. अख्ख्या खोलीने तो ताल पकडला...तुतारी घुमली...अंगावर काटा आला.
आणि पुढे काय जाहले...स्मरत नाही. मी बोलायला सुरुवात केली. एकामागून एक...दुपारची आगगाडी नाहीशी झाली होती. आता घोडदौड होती. अतिशय सराईतासारखी. माझ्या आजूबाजूला कोण आहे ह्याचा मला विसर पडला. माझ्यासाठी त्या खोलीत कुणीही नव्हते. ना मुंबई क्रिएटिव्ह हेड, ना मुंबई ब्रान्च हेड आणि ना आमचे सी.इ.ओ. माझ्या बोलण्याला मान डोलावणारे साहेब व त्यांच्या समोर मी ताठ उभी...फक्त स्वच्छ आवाजात एकेक बोर्ड त्यांच्यासमोर धरत...व त्यावर एखाददुसरे वाक्य बोलत. फिल्म्स झाल्या...प्रेस झाले...होर्डींग्स....साहेब व त्यांचे चेले बघत गेले. माना डोलवत गेले. आम्हीं ह्यावर एक रेडिओ देखील केला आहे. मी ऐकवू का ? मी विचारले. साहेबांनी मान डोलावली. मी माझी नाटिका सुरु केली. त्या रेडिओ स्पॉटमधील प्रत्येक व्यक्तिमत्त्वात मी आपोआप शिरले...त्यातील शाळकरी मुलगा मी झाले...त्याची ताई मी होते...व त्याचे बाबा देखील मीच होते.
खरं तर माझ्यासाठी फक्त पाच मिनिटे उरली होती. पण ती मिनिटे कधी संपली व त्यावर अर्धा तास कसा ओलांडला कळले नाही. माझे प्रेझेंटेशन संपले. आणि आम्हीं सर्व क्रिएटिव्ह लोकं खोलीबाहेर आलो. मला सगळ्यांनी गराडा घातला. मिठ्या मारल्या.
"You were too good Anags !"..."Congrats ya !"...."Superb !" हे आणि असेच अनेक.
आत इतर गोष्टींविषयी चर्चा. आम्हीं अजूनही बाहेरच उभे. वीसेक मिनिटानंतर साहेब बाहेर आले. माझ्या आजूबाजूचे सगळे तोपर्यंत पांगले होते. साहेबांच्या हातात फाईल्स. त्यांच्या उजव्या बाजूला दोन हातांवर मी उभी. "You are a very good presenter !" साहेब मनापासून उद्गारले.

मग किती मिटींगा आल्या...किती प्रेझेंटेशन्स झाली.
अशाच एका मोठ्या प्रेझेंटेशन नंतर बाहेर पडल्यापडल्या बॉस म्हणाला..."You are a very good presenter !"
हल्लीच कधीतरी एक प्रश्र्न मी कोणाला विचारला...मी आपल्या सी.इ.ओ.ला आठवते तरी काय ?
"What are you saying ! According to him you are the best presenter the company has !"

मी फक्त हसते.
शाळेत सुरु झालेले माझे काटेरी वर्तुळ तोडून मी हलकेच बाहेर पडले होते.
मावळ्यांच्या त्या तुतारीने छातीवरील जुन्या पाषाणाला, जबरदस्त सुरुंग लावला होता.

समाप्त.
23 comments:

Gouri said...

सही! प्रॉडक्ट डेव्हलपमेंट भलतंच यशस्वी झालंय की! बाकी अश्या आपल्याच आतल्या लढाया जिंकण्यात खरी गंमत असते, नाही का? आणि बाहेरच्या जगाला सगळ्या धुमश्चक्रीचा पत्ताही नसतो!

Raindrop said...

growth in its purest form...I don't think ladhai mhanta yeil...pan halu halu ek ek payri chadhtanna samorach dislis tu mala he vachlyawar :)

Anagha said...

अगदी खरं गं गौरी. बाहेरील जगाशी खेळाव्या लागण्याऱ्या लढायांसाठी, ह्या आपल्या आतल्या लढायाच किती बळ देऊन जातात...हो ना ?

Anagha said...

लढाई माझीच माझ्याच मनाशी वंदू. शाळेपासून चालू राहिलेली.
ह्म्म्म. एकेक पायरी...खरंय...फक्त बऱ्याचदा एकेक पायरी खूप उंचावर असते बघ...मग जीवतोड प्रयत्न करावे लागतात चढताना. :)

Prof. Sumedha said...

superlike...

Shriraj said...

अनघा, तुला माहितेय ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे... मला अशी भीति जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा मी ही गोष्ट नक्की वाचेन

Anagha said...

आभार सुमेधा ! :)

Anagha said...

श्रीराज, धन्यवाद हं ! :)

विनायक पंडित said...

य्य्ये बाऽऽत! हे ऐनवेळेला असं बळ, असं व्यक्तं होणं कुठून येतं असं वाटत रहातं नेहेमी.आपण नाही, कुणी दुसराच ते करतोय असंही वाटतं.खरं तर ते आतच असतं, नाही? मला वाटतं त्या दगडातलीच एक सकारात्मक बाजू असते ती! ते ’कोकरू’ तेच असेल का? (फार होतंय नाही हे? :P)

अपर्णा said...

हिप हिप हुरे...

मला न ही कथा तुझ्याकडून ऐकायला जास्त आवडेल..मुख्य त्यातील काही निवडक वाक्य जसं...

>> पेशवीणीचे नाक म्हणे मुरुडून मुरडून दुखे

>>हे म्हणजे आचारी जेवण तयार करून वाट बघत बसण्यासारखं...पंगत काही बसत नाही...ताटं काही लागत नाहीत.

आणि अशी बरीच...:)

Anagha said...

विनायक, मला आता वाटू लागलंय की जे आपण सादर करणार आहोत ते जर आपल्याला स्वत:ला पूर्ण पटलंय.. (खरं तर जाहिरात क्षेत्रात असं खूप कमी वेळा होतं ! ) किंवा आवडलंय तर ते आपोआप चांगल्या रीतीने बाहेर येत असावं...नाही का ?
आणि आभार हं... :)

Anagha said...

अपर्णा, एकेक मजा आयुष्यातील... :)

आणि ये इथे..बस माझ्यासमोर...मग सांगते सगळी धमाल ! :)

विनायक पंडित said...

अगदी खरंय अनघा! आधीच जाहिरात क्षेत्र आणि त्यात असलं प्रॉडक्ट! खरं तर तारेवरची कसरत केलीए तुम्ही! तेही मुख्यमंत्र्यांसारख्या समोर! सगळ्याच दृष्टीने आव्हानात्मक होतं हे! हॅट्स ऑफ! क्षेत्रात नव्यानी येणार्‍यांनी जरूर वाचला पाहिजे असा अनुभव तुम्ही मांडला आहे! :)

Trupti said...

so sweet.मला हि थोडे बळ आले हे वाचून ...

Prof. Narendra Vichare said...

अनघा, तो तुझा आतला आवाज होता. तो फक्त तुझ्या हिम्मतीची वाट पाहात होता. का कोण जाणे पण वाचताना मला मात्र "Three idiots " सिनेमाची अधून मधून आठवण येत होती.. घोकंपट्टी पेक्षा ...वगैरे वगैरे...

Anagha said...

:) खरंय ना ते सर ?
कसले घाबरले होते सगळे आमचे वरिष्ठ अधिकारी ! काय करते आता ही बया असं वाटत होतं त्यांना ! मज्जाच येते आता मला ही आठवण झाली की ! :D

Anagha said...

तृप्ती, आभार गं ! :)

भानस said...

भले बहाद्दर! शाबास! अभिनंदन! अगं तुझ्यातल्या आतल्या आवाजाच्या बळावर जिंकणार होतीसच. एकदाचा सुरुंग वर्मी बसला. :)

आनंद पत्रे said...

प्रचंड प्रचंड प्रचंड भारी लिहिलंय.. नेहमीप्रमाणेच.. जबरदस्त

Anagha said...

:D हो गं ! अगदी अगदी, भाग्यश्री !

Anagha said...

आनंद, आभार ! :D

सौरभ said...

जे ब्बात... भारीच... डायरेक्ट मंत्र्यांनाच गारद केलंत की...

हेरंब said...

आत्ता वाचलं मी हे.. कसं काय राहून गेलं होतं काय माहित..

सुपर्ब सुपर्ब लिहिलं आहेस.. मस्तच प्रेझेन्टरबाई मस्तच :))