तेच ते आळोखेपिळोखे. तीच ती ओठांना जबरीने पाडलेली मुरड आणि तेच ते अश्रू. तीन ते चार वर्षांचा इतकुसा तो जीव. पण काय ते थैमान. आणि कोणासमोर? तर ती सात ते आठ वर्षांची ताई. काय सांभाळणार ताई ह्या आकांड तांडवाला? काळासा चेहेरा. केसांच्या झिपऱ्या. गळत नाक. गोबरे गाल. फुटपाथावरील ग्रीलमध्ये हात अडकवलेले. ताईचा प्रयत्न त्यातून तिला दूर करण्याचा. परंतु, लोखंडी ग्रील व त्यावरील चिमुकल्या हातांची घट्ट पकड. ताईच्या सर्व आवाक्याबाहेरचे.
नजरेसमोर आलं ते हेच. काही वर्षांपूर्वीचे. तेच ते आळोखेपिळोखे. गाल गोबरे. गोरे गोरे. थैमान घालून लालबुंद झालेले. अंग सगळे सोडून द्यावयाचे. रस्त्यात फतकल मारायचे. ओठ असे काढायचे. टपोऱ्या डोळ्यांतून पाण्याचे हुकमी लोट वहावायाचे. आसपास लोक बघत बसावे. आणि हे भर रस्त्यावील नाटक अगदी रंगात यावे. फुटपाथाच्या अलीकडील एका जीवाला कधीच कळून गेले होते. बालहट्ट हा असाच करावा. भोकांड हे असेच पसरावे. आसपासच्या जनतेचे लक्ष हे असेच वेधून घ्यावे. आईला वा बाबांना आपल्याला हवे ते करावयास भाग पाडावे.
वय तेच. हट्ट पुरवून घेण्याची तऱ्हा तीच. पण मग वेगळे काय?
...वेगळे, नशीब.
फुटपाथावरील त्या चिमुकल्या जीवाला बालहट्ट करण्याचा अधिकार, नियतीने नव्हता दिला. कधीतरी एक दिवस त्या जीवाला हे कळून चुकेल. त्याच्या आयुष्याचे सत्य...हट्ट, हा हक्क आपला नव्हे....
तिच्या ताईने तिचं बखोट हाती पकडलं...फरफटत ती वरात फुटपाथाच्या कोपऱ्यावर असलेल्या झोपडीकडे चालती झाली...तितक्यात सिग्नल सुटला व टॅक्सीवाल्याने गाडी सुरू केली.
जर जन्माला यावयाच्या आधी कोणा पोटी जन्म घ्यावा ह्याची निवड करता आली...तर काय मग काहीजण निपुत्रिक रहातील?
18 comments:
अनघा! अगदी पटलं! कधी कधी वाटतं, लोक आजूबाजूला बघून संवेदनशील होण्याइतके राहिले आहेत का? आजच्या मुलांना इतर सगळ्या भडीमारापुढे तुम्ही रस्त्यातलं जे दृष्य दाखवलंय (फक्त लिहिलंय असं नाही)ते दिसेल का? आपण त्याना ते बघ! असं सांगितलं तर मुलं बघतील? थोडं नकारात्मक होतंय खरं.पण प्रश्न उभे केलेत तुम्ही नेहेमीप्रमाणे!
:((
तोच हट्ट, तीच तर्हा पण दोन वेगवेगळी टोकं, दोन वेगवेगळी जगं... :((
विनायक, खरं आहे तुमचं म्हणणं. नाही विचार करत कोणी...कोणाला वेळ देखील उरलेला नाही. काय माहीत त्या वेळी लेक बरोबर असती तर काय प्रतिसाद मिळाला असता....
प्रतिक्रियेबद्दल आभार.
इंद्रधनू, असं वाटतं न की जन्माला आलेल्या प्रत्येकाला निदान बालहट्ट करण्याचा हक्क तरी मिळून जावा...व ज्याच्याकडे हट्ट करता येईल असं कोणीतरी जगात असावं.
हेरंब, करतात ना...आपली पोराबाळं देखील तसाच तर हट्ट करतात...
पण सर्वांच्याच नशिबी कोणी हट्ट पुरवणारं नसतं...
अनघा, तुझे हे पोस्ट वाचून गपगार झालोय
आयुष्याची सत्य अशी पावलोपावली विखुरलेली मिळतात....
हम्म्म...
हट्ट करा रे, हट्टापोटी फळे मिळती रसाळ गोमटी
फुटक्या नशिबाचे असाल तर मिळतील लाथाबुक्के आणि धपाटी...
परिस्थिती की नशीब?
नक्की काय हा गहन प्रश्न आहे. :(
नशिबाचा भाग म्हणून बदलता न येणारी परिस्थिती..नाही का योगेश?
नशिबानं मिळालेली परिस्थीती... :(
accident of birth decides who we become and we think we are the ones who decide what we want to be
सौरभ...सर्व नशिबाच्या गोष्टी.
खरं आहे आनंद.
आभार रे.
So true Vandu !
:(
दया येते गं.. पण मग ते भिकार्यांचं नेटवर्क अन काय काय.. सगळा गोंधळ उडतो मनात!
खरं आहे विद्याधर...फक्त बालपण निरागसच असतं नाही का रे...त्याला नाही लागत पत्ता ह्या मोठ्या जगाच्या गणितांचा.
Post a Comment